Thursday 26 April 2012

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र




प्रियगुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधूचरित , पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारेनेतेही.  असतात टपलेले वैरी , तसे जपणारे मित्रही, 

मला माहित आहे ! सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत....... तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम, आयत्यामिळालेल्याघबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,  

तुमच्यात शक्ती असती तर ....... त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.गुंडांना भीत जावू नको म्हणावं, त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवित चला त्याला , ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव. मात्र त्याबरोबरच , मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,  सृष्टीचं शाश्वत सौंदर्यअनुभवायला , पाहू दे त्याला , पक्षांची अस्मान भरारी ............ सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं...... शाळेत त्याला हा धडा मिळू दे , फसवूनमिळालेल्या यशापेक्षा , सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे . आपल्या कल्पना, आपले विचार ,
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने , बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी , त्याला सांगा भल्याशी भलायीन वागावं, आणि टग्यांना अद्दल घडवावी .माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत, सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी.

पुढे हेही सांगा त्याला , ऐकावं जनाच अगदी सर्वांच .... पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून , आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, हसत रहावं उरातल दुख्ख दाबून , आणि म्हणावं त्याला आसवांची लाज वाटू देऊ नको.  

त्याला शिकवा ......... तुच्छतावाद्याना तुच्छ मानायला , अन चाटुगिरीपासून सावध रहायला . त्याला हे पुरेपूर समजवा की , करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,  पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.  धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,  कानाडोळा करायला शिकवा त्याला.
आणि ठसवा त्याच्या मनावर,  जे सत्य आणि न्याय वाटते,  त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.  त्याला ममतेन वागवा,  पण, लाडावून ठेवू नका.  आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
 लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,  त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,  अन धरला पाहिजे धीर त्याने,  जर गाजवायच असेल शौर्य .  

आणखीही एक सांगत रहा त्याला ....  आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,  तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,   

माफ करा गुरुजी,   मी फार बोललो आहे_  खूप काही मागतो आहे....... पण पहा........   जमेल तेवढ अवश्य कराच, 

 माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो.

अब्राहम लिंकन





Tuesday 24 April 2012

खेकड्यांच कालवण




  • साहित्य : अर्धा डझन खेकडे, एक वाटी सुकं खोबरं, दोन कांदे, चार हिरव्या मिरच्या, दोन चमचा हळद, कालवणाच्या आंबटपणासाठी आमसुलं, लसणाच्या आठ पाकळ्या, अर्धा इंच आलं, वाटीभर कोथिंबीर, दोन चमचे मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ.
  • गरम मसाल्यासाठी : आठ काळ्या मि-या, चार लवंगा, थोडी खसखस, अर्धी मूठ धने 
  • पूर्वतयारी : कोळणीकडून खेकडे साफ करून घेताना त्यांचे मोठे डेंगे आणि छोटे डेंगे वेगळे काढून ठेवायचे. खेकडय़ाचं पोटही फोडून घ्यायचं. फोडल्यावर काळं आवरण टाकावं लागतं. आवरण टाकण्यापूर्वी त्यातला आतला भाग खरडवून पिवळसर लाल रंगाचा द्रव काढून घ्यावा लागतो. त्याने आमटीच्या टेस्टमध्ये भर पडते. आतल्या पोटाकडच्या पांढ-या भागाला चिकटलेले केस, मिशा काढव्या लागतात. या पांढ-या भागात पिवळसर लाल रंगाचा द्रव असतो. तोही एका वाटीत काढून ठेवायचा. साफ केलेले खेकडे धुऊन घ्यायचे. मोठे आणि छोटे डेंगेही धुऊन घ्यायचे. छोटे डेंगे मिक्सरला लावून घ्यायचे. त्यांचा रस वेगळा काढून घ्यायचा. चोथा काढून टाकायचा. कांदा उभा चिरून त्यातला थोडा कांदा तेलात लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. उरलेला फोडणीसाठी ठेवून द्यायचा. तेलावर परतलेला कांदा वेगळा ठेवायचा. त्याच तेलात खसखस वगळून अख्खा गरम मसाला चांगला भाजून घ्यायचा. तोही वेगळा काढून ठेवायचा. मग सुकं खोबरं भाजून घ्यायचं. सुकं खोबरं भाजल्यावर त्यात भाजलेला अख्खा गरम मसाला आणि कांदा परतून घ्यायचा. मग खसखस घालायची. मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर बारीक वाटून त्याचाही हिरवा मसाला तयार करायचा.
  • कृती : जाड बुडाच्या भांडय़ात तेल गरम करत ठेवायचं. तेल चांगलं गरम झालं की, त्यात चिरलेला कांदा घालायचा. कांदा परतल्यावर खेकडय़ांचे मोठे डेंगे आणि पांढरी पोटं फोडणीला घालायची. फोडणीत खेकडे परतून घ्यायचे. खेकडे परतल्यावर त्यात हिरवा मसाला घालायचा. त्यातही खेकडे परतल्यावर त्यात मालवणी मसाला आणि हळद टाकायची. मसाल्यात पुन्हा एकदा खेकडे परतून घ्यायचे. पेलाभर गरम पाणी फोडणी टाकायचं. पातेल्यावर झाकण मारायचं. पातेल्याच्या झाकणावर पाणी ओतायचं. वाफेवर खेकडे शिजू द्यायचे. खेकडय़ाच्या डेंग्यांना लालसर गुलाबी रंग यायला सुरुवात झाली की, समजावं.. खेकडे शिजण्यास सुरुवात झाली आहे. खेकडे शिजत आल्यावर त्यात कांदा-खोबऱ्याचं वाटण टाकायचं. वाटण शिजत आलेल्या मिश्रणात चांगलं परतून घ्यायचं. या मिश्रणाला चांगली उकळी आणावी. सर्वात शेवटी मिश्रणात कोकमं आणि मीठ घालायचं. खमंग वास यायला लागल्यावर समजावं की, खेकडे पूर्ण शिजून झाले आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तांदळाची भाकरी, भात आणि दाटसर सोलकढीसोबत हे खेकडय़ाचं कालवण चविष्ट लागतं. 

  • टीप : खेकड्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे ते गोडसर लागतात. त्यामुळे कालवण तयार झाल्यावरही त्यात थोडा जास्तीचा मालवणी मसाला घालावा लागतो. अर्थात आपल्या आवडीप्रमाणे ते करावं.





आगरी भयकथा




भाल्या त्याचेच तंद्रीन् बिरी वरत बांधावरशी घरा चालला होता. येलेची न् आजुबाजूला काय चाल्ललाय याची त्याला अजाबात जानीव पुन व्हत नव्हती. तवर्यान मंगारशी आवाज आयला... "ये भाल्या! थांब तखरच... मी पुन यतय". मंग ते दोघ पुन सोबतीनुच चालाला लागल...
"बिरी दे र" भाल्याचे बरब व्हता तो बोलला...
भाल्यान मंग त्याला बिरी दिली...
बरबचा "च्याला... ३० नबंर!!!... मी पुन यीच रोजचे ईच वरत..."
आखरून तख्रूनच्या बाता मारत दोघा चालत व्हत...
तवर्यान..."बिरी दे र" बरबचा परत बोलला...
ती पुन संपली... मंग परत त्यान बिरी मांगली... भाल्या आजून पयलीच बिरी वरत होता... त्याला बिरी दिली न भाल्या जरासा टरकलाच... रातीच १२ वाजून जेलन न सगलेकर किर्रर् कालोख असल्याचा पयल्यांदा भाल्याला समजला... त्यान आज आमोश्या... मंग भाल्यान जोरान चालाला सुरुवात केली... बरबचा नुसत्या येके मान्ग्शी यक अश्या बिर्या मांगत होता... आपले बरब कोन चाललाय ह्या पुन भाल्याला माहित नव्हता... तुक्यादा आसल ऐसा इतकेवेल त्याचा वाटला व्हता... पुन आता तू कोन र बाला? या विचाराचा धारस भाल्याला व्हत नवता... बांध खाजणानशी तो गावान जात व्हता... बांधाचे एके बाजूला मोरका किल्ला न दुसरे बाजूला खारी व्हती... सग्लेकर नुसती समशान शांती पसरली व्हती... मधीनशीच चीम्बोर्यांचे हालचालीमुल पान्याचा आवाज व्हत व्हता... निवट्यानं खारीच्या पान्यान उरी झेतली की बुरुक ऐसा आवाज व्हत व्हता... खरत ये आवाज भाल्यासाठी रोजचच व्हते, पुन आज त्याला तेंच आवाजाचे मुल दचकाला व्हत व्हता... हलुच भाल्यानं खाली पायला त कालोखान बरबच्याच पाय दिसलच नाय... स्वताचेच चपलांचा आवाज भाल्याला ऐकाला येत व्हता... आता भाल्याची हवाच निगाची बाकी व्हती... खाजनानशी कोल्हे-कूई चा आवाज ऐकाला यत व्हता... लय वेल झाला तरी पुन गाव जवल येत नव्हता... भीतीशी भाल्या थरथर कापत व्हता... तो दुसरा अजूनपण बिर्या मांगताच व्हता... शेवटची बिरी रायली व्हती... बिर्या संपल्याव आपला कय व्हणार? ये भीतीशी भाल्यानी पलाला सुरुवात केली... बराच पलल्यावर दमल्यामुल भाल्या थांबला... तवाच त्याला खांद्याव कोणाचातरी हात जानवला न आवाज आयला...
"कती पलशील?... आज आमोशेची रात्र... न तु माझेच हद्दीन हाईस..."
जीवाचे भीतीन भाल्या अजूनुच जोरान पलत सुटला... गावाचे वेशीचे आत जेल्यावर भाल्यानी मांग पाहीला त तो वेशी जवलुच थांबला व्हता... भाल्या पलतूच घरन घुसला...
"काय रं... काय झाला?... आवरा कला घाबरला हाईस?" भाल्याच्या आशीनी विचारला...
भीतीन भाल्याची बोबरीच वलली व्हती... धापा टाकतच घरलेला सगला प्रकार भाल्यानं आईसला सांगला...
आईसन ते कायपन मनाव झेताला नाही... उलट ती बोलली "आरं पण... रोजचाच येतस न बांधावरशी ये वक्ताला... पोटात कय नय तुझे... जा... सकालचा बोंबलाच कालवण न् सुकट हाय... जरासा जेवून झे... मी पुन बसते तुझे बरब जेवाला".
जेवण झाल्याव माय-लेक झोपी जेले... भाल्याला झोप लागत नवती... सकाल व्हायची वाट बघत तो परुन व्हता... सकालचे कुठेतरी भाल्याचा डोला लागला...
भालचंद्र नामदेव म्हात्रे म्हणजे भाल्या... आगरी बाला, लंगोटीन भजीची पुरी न् बगावा तवा वरतय बिरी... ऐसा यो भाल्या... बिरीचा लय दिवाना... दारुचे मुल बापासला जाऊन ११ वर्षा झाली... तवा पासून माय-लेक दोघंच राहतान... भाल्याचा वय ३३, पण आजून अंगाला हलद लागली नाय... लय आलशी माणूस, पुन आपला नशीबुच शेन खातय असा भाल्याचा म्हनना... आईस खंबीर म्हणून चाललाय सगला बरा... दिवसभर बोस्की झेवून जातो... पण बाव काय मिल नाय... हातान पैस टीकतुच नाय... म्हणून जवरा कमवल तवरा आईसचे हातान देतो... पण रोज न चुकता बिरी साठी आईसचे करशी पैशे झेतो...
थोरा उशीराच उठून तोंड घाशीत भाल्या परवीन येऊन बसला... रातीचे प्रकारानं डोका भनभनला व्हता...
लोका हसतीन... कोनाला सांगाचा की नाय ऐसा ईचार चालू होता... 'जाऊदे... नय सांग कोनाला पुन' असा म्हनुन भाल्या घरान शिरला... आईसनी विचारल्याव भाल्यानं तो विषय टालला...
दुपारचा जेवण उरकून भाल्या जरा परला व्हता... तवाच..."भाल्या!... आर ये भाल्या!... येतस का पकटीवर" ये आवाजान भाल्याला जाग आली... बाहेर येऊन बघला त तुक्यादा होता...
तुक्यादा म्हणजे भाल्याचा चुलत काकुस... गावचा पोलीस पाटील... दोघा पकटीवर जायला न्निगले... बांधावरशी जाताना परत रातीचा सगला परकार भाल्याला आठवाला लागला... सांगू का नको... सांगू का नको असा करता करता शेवटी भाल्यानी काल रातचे ज्या काय घरला त्या सगला तुक्यादाला सांगला... आवरी वर्षा झाली पुन तुक्यादान असला कवा आईकला नवता... असला काय घरुच शकत नाय असा तुक्यादाचा म्हणना नवता... पुन भाल्या आजून घाबराला नको म्हणूनशी तुक्यादानं विषय बदलला... पकटीवर पोचल्यावर दोघापन आपआपले कामाला लागले... सगला काम आटपून संध्याकालच्या आतुच भाल्या आज घरा आला आणि लवकरुच झोपला... तुक्यादाला कामा उरकून निघाला रात झाली... तुक्यादा यकटाच बांधावरशी येत व्हता... सकालचे भाल्यानी सांगलेली गोष्ट तुक्यादाला आठवली... तेच ईचारान बांधावरचे वराच्या झाराजवल पोचला... कालोखान वरावर दोन डोल चमकत व्हत... कोनतरी बोंबलतय असा वाटत व्हता.... आता तुक्यादाला जराशी भिती वाटाला लागली आणि तवर्यान फरफर करत दोन तीन घुबरा किल्ल्याकर उराली... फरफर संपल्याव परत रातीचे शांततेनं तुक्यादाला पकरला... एकटाच असलेमुल तुक्यादाचा डोका फिराला लागला व्हता न तवर्यान आवाज आयला...
"तुक्यादा!... थांब जुरुसा... यक बिरी दे..."
तुक्यादाचचे अंगाव काटा आयला... थोरावेल तुक्यादा तयाच घट झायला... कालोखान वराखाली कोनतरी बसल्याचा जानवत होता, पुन आवरे रातचे वराखाली कोन बसलाय?... हातानचा तयाच टाकून तुक्यादान जो पल कारला तो थेट घरा पोचे पर्यंत एकदापुन मांग वलुन पायला नाय... तुक्यादा येरापिसा झाला व्हता... घरा या सांगताच त्याचे बायकोनी दोन आठवर्यापूर्वी घरलेले गोष्टीची आठवन तुक्यादाला करुनशी दिली...
दोन आठवर्यापूर्वी पक्या यकटाच सांचेपारा चिंबोऱ्या पकराला खारीन जेला व्हता... दोन दिस आलाच नाय परत... म्हनुनशी गावांचे लोकाई लय शोधाशोध केली त पक्याचा मुर्दा खाजणान सापरला... पक्याला पुरमांग कोनीच नव्हता... यकटाच असाचा... गावान कोनाशीच पटाचा नाय त्याचा... कोनशी न कोनशी तरी भांडना चालूच असाची... बिरीचा लय शोकीन व्हता... पक्या कैसा मेला ह्या कोनालापुन मायती नवता... कोनीतरी त्याला वर पोचवला....आशी गावांची लोक बोलाची आनी बांध ह्येच खाजनानशी जात व्हता...
या आठवल्याव तुक्यादा उरालाच... तैसाच भाल्याचे घरा पोचला आनी सगला सांगला... आता भाल्याचे आईसचा पुन ईश्वास बसला... म्हनजे पक्याचा भूत?... पन कोनीतरी मानुसच या सगला कराची शक्यता व्हतीच... पण कोन करनार आसा?... कोनचा जीव वर आलाय येवरा?... असलाच त तो रम्या असला पायजे... पन दारु पीऊन नसत लफर करतय म्हनुनशी रमेशला त १० महीन्या आगुदरच मारून मारून गावानशी हाकलून दिला होता... आयुष्यान परत कोनची पुन खोरी कारनार नाय ऐशी त्याची हालत गावांचे लोकाई केली व्हती... तव पासून तो कोनाचे नजरेन सुदीक परला नव्हता... यो त भुताचाच परकार!!! पक्याच तो... नयतरी नेहमीच आख्खे गावावर खार खाऊन असाचा तो...
बांधाव पक्याचचा भूत हाय ऐशी खबर दुसरे दिवशी गावभर पसरला एल लागली नाय... बांधावरशी येवा-जावाला नको म्हनुन थोरे दिवस पकटीवरचे झोपरीन राहूनुच डोलीला जावाचा निरनय भाल्यानी झेतला...
बिरीवाले पक्याचे भुतानी आख्खे गावाला येरा करुन सोरला व्हता... भीतीचे मुल लोकाई सांचे डोलीला जावाचा बंद केला... पक्यानी तरास देवाला नको म्हनुन येणार जाणार बांधावरचे वराखाली बिरीची पाकीटा पक्यासाठी ठेवाला लागली.... पुण मयना उलटला तरी रोज कोनला ना कोनला ऐसाच अनुभव यत व्हता...आता मात्र कयतरी उपाय केलाच पायजे असा सगले गावखीन ठरला...
तवर्यान आजूच रमेश बांधाव दिसला व्हता ऐशी बातमी आयली... आवरे दिवस रमेश कोनाला दिसलाच नाय न आता यो बांधाव कनशी आयला?... आनी गावान न येता बांधाव काय करतय?... नायतरी रमेशव संशय व्हताच... काय त्या सोक्ष-मोक्ष लावाचाच म्हनुन आज रातचे ५-६ जना एकत्र बांधाव जाऊ असा तुक्यादान ठरवला... ठरले प्रमाने राती तुक्यादा, भाल्या न अजून ४ जना बांधाव पोचल... कैसीच चाहूल नवती... वराखाली कोनतरी आरवा परलेला दिसला... जवल जाऊन बघतय त त्या रमेशुच व्हता... तुक्यादान त्याला उठवाचा प्रयत्न केला, पुन कायपन हालचाल झाली नाय... मुर्दाच तो... हलनार कैसा? प्रेताच डोल जरा जास्तच लाल रगता सारख दिसत व्हत... रमेशचे बॉरीवर कयाच मारल्याच्या वला दिसत नवत्या... मंग यो मेला कैसा?... दुसरा कोन असल?... पक्याचाच भूत... आवरे दिवस पक्यानी कोनाला मारला नवता, पुन आता त रमेशचा मुरदाच पारला... गावंची लोका लयुच घाबरली... दिवसाचे पुन बांधावरशी जायला लोका घाबराला लागली... भगता शिवाय आता उपाय नवता... मंग तुक्यादान शेजारचे गावानशी एक भगत बोलवला... पक्या जीता व्हता तवा त्याचे वापराची येखादी वस्तू लागनार आनी येते आमोशेला एक बोकर देवाला लागल असा भगतानी सांगला... आमोश्या दोन दिसावरुच व्हती... तोपर्यंत पक्याचे खोलीनशी पक्याचा शर्ट तुक्यादान पलवला... मंग आमोशेच्या राती भगत न गाववाल बांधावरचे वराखाली पोचल... सगला मांडून झाल्याव मंत्र बोलाला सुरुवात झायली... भगतानी आगीन कवटी ठेवली... आगीमुल कवटी लालभरक झाली... कवटीव हलद-कुकू टाकून भगत मंत्र बोलत व्हता... आमोशेच्या कालोखात आगीचे प्रकाशान वर न्हाऊन निन्गालाला व्हता... आजुबाजूचे वातावरणान भीती जानवत व्हती... मधीनुच येखादा दचकून आखर तखर बघत व्हता... बरोब १२ वाजता भगतान पक्याचा शर्ट आगीन टाकला न बोकराची आहूती दिली... पुरचा सगला प्रकार संपवून गाववाल सकाल्चेच गावान परत आल...त्याचे नंतर पुरचे २-३ राती पक्या परत कोनाला दिसला नाय... भगतान आपलं काम केला होता...
मागचे मयन्यात भाल्याच्या डोलीला लय बाव लागला...पापलेट, सुरमाई, रावस, हलवा, बांगडा...
लागलुच ना!... डोलीला कोनपन जात नवता न भाल्या पकटीवरुच असलेमुल रोजूच जात व्हता... पक्याचा लफरा नीस्तरल्यामुल बरेच दिवसानशी भाल्या घरा आला व्हता... नंतर एक आठवरा तो पकटीवर जेलाच नाय... येके दुपारचे जेवान उरकून परवीत बिरी फुकत बसला होता...
"काय र... बिरी आणाला पैशे मांगत नाय आजकाल..." आईस
आईसचे कर बघत भाल्या हलुच हसला... जरा येग्लाच हसू होता तो... खरात... लय दिवस पुरतीन आवर्या बिर्या मागचे एक-दीर मयन्यान भाल्याकर जमल्या होत्या... आनी जे दिवशी रमेशचा प्रेत सापरला तेच दिवशी शेजारचे गावान दारुच्या ईषबाधेमुल आजून ५ जना मेली व्हती.....................


 -------------मिपा 












Friday 20 April 2012

नळदुर्ग किल्ला





नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैद्राबादकडे निघाल्यावर सोलापूर पासुन ५० कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव आहे. या गावातच नळदुर्ग हा अप्रतिम बांधकामाचा हा अजोड किल्ला आहे.

स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहमनी सुलतानांच्या ताब्यामध्ये होता. बहमनी राज्याची शकले उडाली व त्यातुन ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैद्राबादच्या निजामाकडे सोपवली.

नल-दमयंती या जोडीशी नाते सांगणारा हा किल्ला चांगला १-२ दिवसांचा वेळ काढुन बघण्यासारखा आहे.

 सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे. संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या भागात खंदक आहे. त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या बाजुच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे. हे पाणी बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात आणण्यात आला. हे पाणी कायम रहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग या मध्ये धरणाच्या बंधार्‍या सारखी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरुपी पाणी साठून रहाते. त्यामुळे या बाजुने शत्रुला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही. खंदक आणि नदीचा प्रवाह याने अभेदता निर्माण करून आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे.वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते. यामध्ये वैशिष्ट्यपुर्ण असलेला नवबुरुज आपल्या लक्षात रहातो. हैद्राबाद महामार्गाच्या बाजुला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरुज आहे. या भल्याथोरल्या बुरुजाला नऊ पाकळ्या आहेत. यामुळे याला नवबुरुज म्हणतात . असे बांधकाम इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही.नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणार्‍या बंधार्‍यामध्ये जलमहाल आहे. या बंधार्‍याची उंची १९ ते २० मीटर उंच आहे. बंधार्‍यामध्ये चार मजले आहेत. बंधार्‍याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. बंधार्‍याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महीरपीने सजवलेल्या आहेत. याच्या भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. याचा अर्थ असा होतो की, या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रुचे डोळ्यापुढे अंधारी येईल. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधार्‍यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावे आहेत. नळदुर्ग किल्ला त्याची रचना, संरक्षण व्यवस्था, टेहाळणीचा उपळ्या बुरुज, त्यावरील लांब तोफ दरवाजाचा वक्राकार मार्ग यामुळे चांगलाच लक्षांत रहातो. 
शहरातील ऐतिहासिक किल्ला, पाणी महालावरील नर-मादी या नावाने ओळखले जाणारे धबधबे, किल्ल्याच्या पश्चिमेला असणारा शिलक धबधबा आणि येथून २ किलोमीटरवर पूर्वेला असलेला रामतीर्थ मंदिर परिसरातील रामडोह धबधबा ही पर्यटकांची पावसाळ्यातील खास आकर्षणे होय. त्यामुळेच नळदुर्गला पावसाळ्यात ‘दक्षिणेतील काश्मीर’ म्हणून संबोधले जाते.किल्ल्याच्या दक्षिण बाजूने वाहणाऱ्या बोरी नदीचा एक फाटा किल्ल्याच्या आत वळवून त्यावर बंधारा बांधला आहे. तोच पाणी महाल होय. या बंधाऱ्यात साठलेले अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी दोन सांडवे सोडण्यात आले आहेत. त्यालाच नर-मादी असे संबोधले जाते. या दोन सांडव्यांतून दीडशे-दोनशे फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, त्यातून उडणारे तुषार आणि त्यातून तयार झालेले सप्तरंगी इंद्रधनुष्य म्हणजे स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुनाच. 
किल्ल्याच्या पश्चिमेला बोरी नदीचा मूळ प्रवाह वाहतो. तेथे शिलक धबधबा असून पर्यटक या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात. पाणी महालावरील धबधबे, शिलक धबधबा आणि रामडोहचा धबधबा इत्यादी गोष्टी आणि नल-दमयंती या जोडीशी नाते सांगणारा हा किल्ला चांगला १-२ दिवसांचा वेळ काढुन बघण्यासारखा आहे.

दिस नकळत जाई...


Thursday 19 April 2012

परांडयाचे दुर्गवैभव!




सहय़ाद्रीची मुख्य धार सोडून देशावर सरकू लागलो, की किल्ल्यांचे रूप गिरिदुर्गाकडून भुईकोटांकडे वळते. उस्मानाबाद ऊर्फ धाराशिव जिल्हय़ातील परांडा तालुक्याच्या गावीही असाच एक बुलंद भुईकोट आहे. गावात शिरेपर्यंत त्याचे हे रूप ध्यानी येत नाही, पण एका वळणावर अचानक होणारे त्याचे दर्शन धडकी भरवून जाते!
मूळची ही प्रत्यंडक नगरी! काही ठिकाणी याचा उल्लेख परमधामपूर, प्रकांडपूर, पलियंडा असाही झाला आहे. कल्याणीच्या चालुक्यांचे हे शहर आणि त्यांचीच ही दुर्गनिर्मिती! ज्याला पुढे मुस्लिम राजवटींनी अधिक बुलंद केले. कर्नाटकातील धारवाड जिल्हय़ातील हावेरी तालुक्यातील होन्नत्ती गावी शके १०४६ म्हणजे इसवी सन ११२४ सालचा एक शिलालेख मिळाला आहे, ज्यामध्ये या पलियंड गावचा उल्लेख आला आहे. चार हजार गावांचे मुख्य केंद्र असलेल्या या पलियंड नगरावर महामंडलेश्वर सिंघणदेव राज्य करत असल्याचा हा उल्लेख! हा पलियंड पुढे पलांडा, मग परिंडा आणि आताचा परांडा होत गेला!
सोलापूर जिल्हय़ातील कुर्डूवाडी शहरापासून २५ तर बार्शीपासून २३ किलोमीटरवर हे परांडा गाव आणि किल्ला! या परांडय़ाला येण्यासाठी पुणे, मुंबई, सोलापूरहून थेट बससेवाही उपलब्ध आहे. याशिवाय भूम, बार्शी आणि कुडरूवाडीतूनही इथे येण्यासाठी ठराविक अंतराने बससेवा आहे. पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावरील कुर्डूवाडी स्थानकावर उतरूनही परांडा जवळ करता येते.
कोट-परकोट आणि त्याभोवती खंदक अशी या भुईकोटाची रचना! पूर्वी गडात जाण्यासाठी या खंदकावर काढ-घाल करण्याजोगा पूल होता. तो जाऊन आता त्यावर कायमस्वरूपी पूल झाला आहे. या पुलावरूनच गडात वाट शिरते. एका मागे एक तीन दरवाजे. या नागमोडी मार्गातील पहिला दरवाजा त्याच्या त्या तुटलेल्या दरवाजांसह आपले स्वागत करतो. या दरवाजातील चौकी-पहाऱ्याच्या खोल्यांना सामोरे जात पुढे एका चौकात यावे तो सर्व बाजूने तट-बुरुजांचे बांधकाम अंगावर येते. वर निमुळते होत गेलेले ते अर्धगोल-अष्टकोनी बुरूज, त्याच्या टोकाकडील ते गवाक्ष, तोफांच्या खिडक्या, अंगावर बाण सुटावेत त्याप्रमाणे त्या तटातून विविध कोनांतून बाहेर येणाऱ्या जंग्या (मारगिरीची छिद्रे), संपूर्ण तटातून जागोजागी डोकावणाऱ्या तोफांच्या नळय़ा.. हे सारे दृश्यच पहिल्यांदा त्या काळाचा दरारा निर्माण करते. हे झेलतच पुढे दुसऱ्या दरवाजाची कडी वाजवावी. याचाही दरवाजा अद्याप शाबूत. त्याला ओलांडून पुन्हा एक वळण घेत तिसऱ्याच्या दारात उभे ठाकावे. या दरवाजाच्या दारात एक चौकोनी आकाराची छोटीशी विहीर आहे. या विहिरीला आजही पाणी असून त्यावर झाकण बसविण्याचीही योजना आहे. जणू या विहिरीचे पाणी पायांवर घेतच किल्ल्यात प्रवेश करायचा.
या दरवाजाच्याही लाकडी फळय़ा, त्यावरील पोलादी सुळे, साखळदंड अद्याप शाबूत आहेत. याच्या कमानीवर मध्यभागी डोळय़ाच्या आकारात एक फारसी लिपीतील शिलालेख बसवलेला आहे. याचे वाचन झालेले नसल्याने त्याचा अर्थ लागत नाही. पण बहुधा या परांडय़ाला हे बुलंद रूप देणाऱ्या कुठल्यातरी शाही राजवटीचाच यावर उल्लेख असणार!
हा गड मूळचा हिंदू राजवटीचा! त्याच्या खाणाखुणा आजही इथल्या बांधकामावर जागोजागी दिसतात. त्याची पुनर्उभारणी केली बहमनी सत्तेचा प्रधान महमद गवान याने. पुढे निजामशाही, मोगल, आदिलशाही आणि पुन्हा मोगल असा या गडाने बराच काळ मुस्लिम राजवटींचाच अनुभव घेतला. यामुळे इथल्या स्थापत्यशैलीवरही त्यांचाच प्रभाव जाणवतो. पण यामध्येही इसवी सन १६२८च्या सुमारास शहाजीराजांकडेही काही काळ या गडाची सूत्रे होती. ज्यांनी या गडावरूनच निजामशाहीचा वारस मूर्तझा याला मांडीवर घेत कारभार सुरू केला होता. छत्रपती शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज यांचाही या गडाशी संबंध आल्याचे एक-दोन उल्लेख आहेत. हा सारा इतिहास लक्षात ठेवत दुर्गदर्शन सुरू करावे. वाटेत उजव्या हाताला दारूगोळा आणि तोफांनी भरलेले एक कोठार दिसते. दारूगोळय़ासह हजरतीस असलेले आज हे एकमेव दारूकोठार. काही वर्षांपूर्वी गडावर करण्यात आलेल्या सफाईमध्ये मिळालेले दारूगोळे आणि छोटय़ा तोफा इथे हारीने लावून ठेवल्या आहेत. या कोठारालाच लागून एक छोटासा चौकोनी आड आहे.
उजव्या हाताची वाट एका छोटय़ा दरवाजातून गडातील पूर्वाभिमुख मशिदीत जाते. चाळीस खांबांची ही मशीद! तिचे खांब, उत्तरेकडील भिंतीतील दगडी जाळी हे सारेच दगडावरील कलाकुसरीचे सौंदर्य दाखवणारे! खरेतर हे स्तंभ किंवा अन्य भाग हे यादवकालीन हिंदू शैलीतील आहेत. ते अन्य ठिकाणचे वाटतात. त्याचीच जुळणी करत ही मशीद उभारल्याचे दिसते. इतिहासात सत्ताबदलानंतर होणाऱ्या सांस्कृतिक आक्रमणाचा हा एक भाग आहे. पण आता या साऱ्याच गोष्टींकडे एक इतिहास म्हणून पाहिले पाहिजे! अशी दृष्टी तयार केली म्हणजे इतिहास समजणे आणि जपणे सोपे जाते.
या मशिदीमागे एका पडक्या खोलीत गडावरील साफसफाईत मिळालेली काही शिल्पे, शिलालेख, देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. नागफण्यांची प्रभावळ घेतलेला पाश्र्वनाथ, शेषावर आरूढ झालेला विष्णू, गद्धेगाळचे शिल्प, एक फारसी लिपीतील शिलालेख, विरगळ आणि अन्य बरेच काही इथे आहे. यातील विविध आयुधे, कमळ, मोदक घेतलेल्या सहा हातांच्या गणेशाची दुर्मिळ मूर्ती तर आवर्जून पाहावी अशी. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातच या सहा हातांच्या गणेशाचा उल्लेख आला आहे.
देखा षड्दर्शने म्हणिपती। तेचि भुजांची आकृती।
म्हणऊनि विसंवादे धरिती। आयुधे हाती।।
तरी तर्क तोचि फरशु। नीतीभेदु अंकुशु।
वेदान्तु तो महारसु। मोदकु मिरवे।।
एके हाती दंतु। तो स्वभावता खंडितु।
तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा।।
मग सहजे सत्कारवादु। तो पद्मकरू वरदू।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु अभयहस्तु।।
ही मूर्ती डोळे भरून पाहावी आणि मध्यभागी असलेल्या राजवाडय़ाच्या भागात यावे. १९६० साली गडाची राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा होण्यापूर्वी इथे या राजवाडय़ाच्या काही भागांत सरकारी कचेरी आणि न्यायालय भरत होते. या राजवाडय़ाचा बराच भाग आता कोसळला आहे. या भागातच एक तलाव आणि नृसिंहाचे मंदिरही आहे. हे मंदिर आदिलशाही सरदार मुरार जगदेवने बांधल्याचे बोलले जाते. बाहेरच्या परकोटालगतही एक महादेवांचे मंदिर आहे. अन्य एका मंदिरात गरुडावर स्वार लक्ष्मी-नारायणाची मूर्तीही दिसते.
या भागातच कमानींची रचना असलेली बहुमजली अष्टकोनी विहीर आहे. एका कमानीखालील भुयारी मार्गातूनच या विहिरीत आपण उतरतो. प्रत्येक मजल्यावर उतरण्यासाठी बांधकामातच जिन्यांची रचना केलेली. या जिन्यांनी या मजल्यावर आलो, की अष्टकोनातील प्रत्येक भागातील कमानींच्या त्या रचनेतून विहिरींचे सौंदर्य निराळे भासू लागते. आजही या विहिरीला भरपूर पाणी आहे. असे म्हणतात, या विहिरीचे पाणी हत्तीद्वारे उपसले जाई. कमानींची रचना, बांधकामातील जिने, खोल्या, गच्ची, गवाक्ष या साऱ्यांमुळे गुजरातमधील शिल्पजडित विहिरींची आठवण होते.
तोफांची दहशत!
गडाचा आतील भाग पाहून मग त्याच्या तटावर चढावे. परांडय़ाचे खरे वैभव हे या बुलंद तटबुरूज आणि बुरुजांवरील त्या प्रचंड तोफांमध्ये! गडाला २६ बुरूज आणि या प्रत्येक बुरुजावर धडकी भरवणाऱ्या २६ मोठाल्या तोफा! यातील सहा तर पंचधातूच्या, उर्वरित पोलादी! यांची नावेही दहशत बसवणारी- मलिक-मैदान ऊर्फ रणरागिणी, अझदहपैकर ऊर्फ सर्परूप, लांडा कासम, खडक अशी एकापेक्षा एक! निजामशाहीची शान असलेली ‘मलिका-ए-मैदान’ (जिचा आपण सारे ‘मुलूख-ए-मैदान’ असा चुकीचा उल्लेख करतो.) ही तोफ या गडावर काही काळ होती. इथून ती मुरार जगदेव याने आदिलशाहीच्या संरक्षणासाठी विजापूरला नेली. गडावरील या तोफांवर ती ओतणाऱ्या, घडवणाऱ्यांचे लेखही आहेत. दरवाजाशेजारील ढालकाठीच्या बुरुजावरील पंचधातूची तोफ अशीच बलदंड, आक्रमक! सारा बुरूज तिने व्यापलेला आहे. जिच्यावर तीन ठिकाणी लेख कोरलेले आहेत. तसेच मध्यभागी वीतभर उंचीची सिंहांची एक जोडीही विसावलेली आहे. पश्चिम तटाच्या कोपऱ्यावरील बुरुजावरील तोफेला मगरीचा चेहरा दिलेला असून तिच्या त्या अक्राळविक्राळ जबडय़ात तो तोफेचा गोळाही दाखवला आहे. या तटावरच एका तोफेवर ईस्ट इंडिया कंपनीचा मोनोग्राम आणि १६२७ सालचा उल्लेख आहे. पोलादी तोफाही अशाच भल्यामोठय़ा आकाराच्या आहेत. यातील उत्तरेकडील बुरुजांवरील दोन अजस्र पोलादी तोफा पाहूनच दडपण यायला होते. त्यांचा आवाज, विध्वंस वृत्ती याची कल्पनाही करवत नाही. परांडय़ाचा हा बुलंद दुर्ग पाहताना त्याच्या या धडकी भरवणाऱ्या तोफा कायमच्याच लक्षात राहतात.
परांडय़ातील या तोफा, तोफगोळे, हिंदू देवतांची शिल्पे, प्राचीन शिलालेख या साऱ्या ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या वस्तू आहेत. पण हा सारा ऐवज आज ऊन-वारा-पावसात धूळ खात पडून आहे. चोरा-लुटारूंचे त्याला भय आहे. यातील काही तोफांच्या कडय़ा, छोटेमोठे भाग कापून चोरल्याचेही दिसते. तेव्हा या सर्व वस्तूंना संरक्षण आणि आश्रय देण्यासाठी या किल्ल्यातच एखादे संग्रहालय उभारले तर परांडय़ाच्या श्रीमंतीत भर पडेल आणि लाखमोलाच्या या ठेव्याचेही संरक्षण होईल.
परांडय़ाच्या तटावरून फिरताना गडाच्या अन्य स्थापत्याकडेही लक्ष जाते. भल्या जाडजूड रुंदीच्या या तटावरून खालीवर करण्यासाठी जागोजागी जिने, भुयारी मार्ग ठेवलेले आहेत. या गडाच्या प्रत्येक बुरुजापुढे अन्य एका बुरुजाचे चिलखत घातलेले आहे. याला ‘शेर हाजी’ असे म्हणतात. या तटाला वरच्या बाजूने पाकळय़ांची झालर लावलेली आहे. ही खास मुस्लिम स्थापत्यशैली! या तटाला आतल्या बाजूने मशाली अडकवण्यासाठी केलेल्या दगडी कडय़ाही काही ठिकाणी दिसतात. पश्चिम तटावर टेहळणीसाठी एक दुमजली मनोराही बांधलेला आहे. या किल्ल्याच्या बांधकामात हत्तींची माळ, वीरगळ, कीर्तिमुख, शरभ अशी हिंदू मंदिरांवरील अनेक शिल्पे दिसतात. स्थानिक लोकांच्या मते परांडय़ाजवळील माणकेश्वर मंदिराचे हे कोरीव दगड आहेत. या तटावरून फिरत असतानाच त्याच्या लगतच्या खंदकाकडेही आपले सतत लक्ष जात असते. पाण्याने भरलेला खंदक हा कुठल्याही भुईकोटाची पहिली संरक्षक फळी असते. परांडय़ाला असा हा संपूर्ण किल्ल्याभोवतीने भला लांब-रुंद खंदक आहे. पण त्याचे आज गावभराचे गटार, उकिरडा आणि वेडय़ा बाभळीच्या झाडांचे जंगल झालेले आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणेही घुसलेली आहेत. पश्चिम तटाच्या कडेने तर अनधिकृत टपऱ्यांची एक नवी तटबंदीच उभी राहिलेली आहे. एरवी कुठल्याही ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धन-विकासाचा मुद्दा आला, की कायदा दाखवणाऱ्या पुरातत्त्व विभागाला या गोष्टी दिसत नाहीत का याचे आश्चर्य वाटते. तसेच फुटकळ धार्मिक गोष्टींसाठी अभिनिवेश बाळगणारी आमची जनता आणि लोकप्रतिनिधींचेही उत्तरदायित्व या वेळी कुठे जाते हेही कळत नाही. जातिधर्माच्या गोष्टींना संरक्षण मिळते, पण राष्ट्रीय वारशाला कुणीच वाली उरत नाही असेच काहीसे..!
परांडा हे शहर मराठवाडय़ातील अन्य गावांप्रमाणेच एक मागासलेले! खरेतर या भागात खर्डा, करमाळा, परांडा, सोलापूर, नळदुर्ग, औसा, उदगीर अशी बुलंद भुईकोटांची एक मोठी साखळीच आहे. पर्यटनाच्या अंगाने या दुर्गाचा विकास केल्यास अजंठा-वेरुळ आणि समुद्रकिनारीच रेंगाळणारे आमचे पर्यटक इकडेही येतील, ज्याचा थोडाफार हातभार इथले मागासलेपण दूर करण्यासाठीही होईल! पण त्यासाठी तशी दृष्टी हवी. आमचा खरा मागासलेपणा हा तिथेच आहे!





------------- लोकप्रभा 

मधुचंद्राचा गोडवा .....

 



डोळ्यांत होमामुळे येणारं पाणी, जमणारी आसवं, मुंडावळ्यांच्या गर्दीतून एकमेकांकडे चोरटे कटाक्ष, विधी करताना होणारा स्पर्श, त्यातून उमजणारे भाव, वाटणारी भीती, उत्कंठा, जरतारी वस्त्रांची झगमग, जोडीला सनईचौघड्यांचे आवाज, हास्यविनोद, पक्वान्नांचा सुवास, सटासट उडणारे फ्लॅशेस... थोडक्यात सेलिब्रिटी असण्याचं एक दिवसाचं का होईना फीलिंग देणारा सोहळा म्हणजे लग्न. वर सांगितलेले सर्व तपशील सर्वांना तंतोतंत लागू पडतातच असं नाही. काही ठिकाणी विधीऐवजी सही ठोकली जाते, काही ठिकाणी झटपट उरकलं जातं,   साधेपणानं. रीती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या एक दोन तासांमध्ये बाजूची व्यक्ती आपल्याशी आयुष्यभरासाठी बद्ध होते. मग लग्न ठरवून असो वा अगदी बरंच र्कोटिंग करून परिचित झालेल्या माणसाशी असो. संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलतं. निदान थोडंतरी आणि लग्नसोहळा कसाही असला तरी एक रिवाज मात्र आवर्जून पाळला जातो, हनिमून वा मधुचंद्राचा!

पूर्वी घरगुती असणारा विवाहसोहळा सध्या एक इव्हेंट झालाय. त्यामुळे घरोघरी या वेळी धावून येणारे नारायण न दिसता प्रोफेशनल मंडळी दिसू लागलीत. आधी कुजबुजत चर्चिला जाणारा मधुचंद्रसुद्धा इव्हेंट होऊन राहिलाय. लग्न होईल तेव्हा होईल, पण हनिमून डेस्टिनेशन मात्र जाहीर केलं जातं. परदेशात रिहर्सल डिनर म्हणून लग्नाच्या आधी रंगीत तालीम असते, तसा रिहर्सल हनिमूनही कुठेकुठे होतो. पण काही ठिकाणी मात्र लग्नानंतर पूजा, मग कुलदैवताला जाणे, नंतर गर्भादान विधी उरकून नवदांपत्य मधुचंद्राला जातं.

अशी जोडपी डिसेंबरपासून पार एप्रिल-मेपर्यंत सगळ्या पर्यटनस्थळी दिसतात. मेंदीचे हात, चुडा, एकदम पॉश कपडे, नवं कोरं लगेज... कळतंच, हळद अजून ओली आहे. यातलं काहीही जरी नसलं तरीदेखील सराईत हॉटेलवाल्यांना ही हनिमुनाळू जोडपी पटकन ओळखू येतात. म्हणजे लग्नाच्या मागील कारणं सूचक रीतीने पूर्वी सांगणारा हा मधुचंद्रसुद्धा पब्लिक झालाय. टूर कंपन्यांनी हनिमून स्पेशल सुरू करून एका प्रकारे याला लग्नसोहळ्यानंतरचा अपरिहार्य भाग करून टाकलाय. अधोमुख होऊन हातात दुधाचा पेला घेऊन संकोचाने खोलीकडे जाणारी नववधूही आढळत नाही. एका अर्थी हा बदल तसा स्वागतार्ह आहे. उगाचच दडपण आणणा-या गोष्टी मोकळ्या वातावरणात आल्या की त्यांचे ओझे कमी होते. हे सगळं जरी होत असलं तरी मधुचंद्र या शब्दाची नशा मात्र आहे तशीच आहे. मग ते मैसूर, उटी, बंगळुरू, महाबळेश्वर अशा ठरलेल्या ठिकाणी जाणारं जोडपं असो वा युरोपला पोचणारं कपल... मेड आणि मॅड फॉर इच अदर हा भाव त्यांच्यात दिसतोच.

वर्षानुवर्षे अनेक दांपत्यांना रोमांचित करणारा आणि आजही ताजा वाटणारा हा मधुचंद्र म्हणजे नक्की काय? वाह्यात उत्तर मलाही ठाऊक आहे पण ही संकल्पना आली कशी? आपल्याकडे लग्न झालं की गावाला जाऊन कुळाचार करण्याची पद्धत होती. हा झाला देशी हनिमून. जोडपे म्हणून एकत्र राहायला सुरुवात करण्याआधी दोघांची व्यवस्थित ओळख व्हावी. संकोच (असलाच तर) दूर व्हावा, आधी जरी मित्र असला तरी नवरा झाल्यावर त्याचा रोल व व्यक्तिमत्त्व बदलतंच. लग्नाआधीच्या तिच्या फारशा न जाणवलेल्या काही सवयी नव्या नवरोबाला खटकतात. प्रियकर असलेला तो नवरा म्हणून जरा जास्तच वागतो हे बायकोला जाणवतं. जवळपास 80 टक्के हनिमून भांडणाने सुरू होऊन थोड्या दुराव्याने, अबोल्याने, लाडिक रुसव्याने संपतात. अर्थात हे कुणी कबूल करणार नाहीत कारण हनिमून या गोष्टीबद्दल आपल्याकडे एवढं अतिरेकी वर्णन केलं जातं की  हनिमून अस्साच हवा हे डोक्यात पक्क फिक्स होतंय. काय करू नये यापेक्षा काय कारायला हवं याचे अनुभवी जाणकारांकडून मिळणारे सल्ले गोंधळात अधिक भर घालतात. मग यात पलंगतोड पानापासून सगळं आलं. अर्थात हे नवख्या मंडळींना. लग्नाआधी लिबर्टी घेतलेल्या मॉड कपल्सचाही हनिमून दुस-या कुठल्यातरी कारणाने बिनसतो. It is not pure bliss! बस, ट्रेनमध्ये आपण ढकलून जशी चौथी सीट पकडतो आणि काही काळाने नकळत मध्ये येतो तसंच हनिमूनच्या बाबतीत घडायला हवं. मला हवं तस्संच वागणारा/री लग्नानंतर बदलतेच. नकळत एका अधिकाराची भावना येते. पण या अधिकाराचं ओझं होता कामा नये याचं भान बाळगलं जात नाही. आपल्याबरोबर आपले गुरुवार, संकष्टी पाळणारा तो खरंतर काहीच मानत नाही आणि नेहमी टापटीप राहाणारी ती बाथरूमध्ये एवढा वेळ घेते, अशा अनेक वास्तव सत्यांची जाणीव या मधुचंद्राच्या काळात होते. दिवसात एखाददोन तासांसाठी भेटणे वेगळे. (आपलं बेस्ट बिहेविअर तेव्हाच दाखवलं जातं) आणि 24 तास एकत्र राहाणं वेगळं. जेवताना तो मचमच आवाज करतो, तो ड्रिंक घेतो, सिगारेटसुद्धा ओढतो असे अनेक शोध बायकोला लागतात आणि तिला फक्त सिरियल्सच आवडतात, तयार व्हायला ती प्रचंड वेळ घेते आणि प्रत्येक गोष्टीत टोकत राहण्याची वाईट खोड तिला आहे हे नव-याला जाणवतं. थोडंसं कर्मठ वाटलं तरी एक आहे. नवरा हा संपूर्णपणे बिघडलेला, बेशिस्त प्राणी असून त्याला आपल्यासारखे बनवणे हे ध्येय असल्यागत ब-याच नववधू वागतात. लग्नाआधी तशी अप्राप्य वाटणारी मुलगी बायको झाल्यावर पुरुषांची पारंपरिक मानसिकता उफाळतेच. मग तो हायफंडा राहुल असो वा मध्यमवर्गीय रमेश. एक निर्धास्तपणा त्यात येतो. आणि आधी आपलं सग्गळं ऐकणारा, सो कूल आणि क्यूट तो असा वागूच कसा शकतो हे तिला कळत नाही. लग्नानंतर संपूर्ण वेगळ्या वातावरणात बाईला जायचं असतं (हो...आजही) त्यामुळे तिचे आपल्याला सर्वांत जवळच्या त्याला घट्ट पकडण्याचा स्त्री सुलभ प्रयत्न होतोच. दोघांच्याही मानसिकतेनुसारच हे घडते...त्यावरून लगेच निष्कर्ष काढणे चूक आहे.

हनिमून ही 100 टक्के यशस्वी चाचणी नव्हे, लग्नाआधीचं ते लाँचिंग पॅड व प्रिलिम म्हणा ना. त्यामुळे त्यात थोडे प्रॉब्लेम्स, अडचणी येणारच. साधा नवा बूट दोन चार दिवस पायाला चावतो. इथे तर अख्खा हाडामांसाचा माणूस आयुष्यात आलाय. थोडे धक्के साहजिकच आहेत. सिनेमे पाहून मधुचंद्राची कल्पना आखणं म्हणजे लोकलला गर्दी नसणं इतकं काल्पनिक आणि अवास्तव ठरेल. सध्या पूर्वीइतकं कर्मठ वातावरण उरलेलं नाही. पुरेसा मोकळेपणा आलाय पण तो वरपांगी न ठेवता वागण्यातही आणणं गरजेचं आहे. मधुचंद्रात भांडणे, कुरबुरी होणार पण त्या लॉजिकल आणि तात्पुरत्या हव्यात. अवास्तव अपेक्षा ठेवून वागणं नेहमी तापदायक ठरतं. तुम्ही जसे आहात तसेच वागा. कारण उद्या ना परवा गाडं मूळपदावर येणारच. मुख्य म्हणजे भ्रामक कल्पना मनात ठेवू नका. समोरच्याने आपलं ऐकलंच पाहिजे हा हट्ट योग्य नाही. पूर्वीसारख्या अल्लड वयात हल्ली लग्न होत नाहीत त्यामुळे   पुरेसा समंजसपणा आलेला असतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक संबंध. याविषयी आजही गैरसमजुती आढळतात. लग्नाआधी बाकी प्लॅन करताना विवाहपूर्व समुपदेशन घेणे हे गरजेचे आहे. अगदी प्रेमविवाह असला तरी बहुतांशी कुरबुरी इथूनच सुरू होतात. त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही तर डाव दुर्दैवाने मांडण्याआधीच उधळला जातो. ते टाळणे आपल्याच हातात असते.

कुंडलीबरोबर रक्तगट, एड्स टेस्टसुद्धा हवे असणारे हे जग आहे. त्यांच्यात जो वस्तुनिष्ठ, शास्त्रीय दृष्टिकोन असतो तोच थोडाफार यातही हवा. जीन्स, टी शर्ट आणि कोपरापर्यंत चुडा ठेवला म्हणजे आपण तसे मॉड झालो, हे आधी मनातून काढा. पोशाखी मॉडनेस नको. हे सोपे उपायच मधुचंद्र पुढच्या सर्व वैवाहिक आयुष्यभर ठरवतील. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे हॉटेल निवडलंय त्याच्या दर्जाविषयी पक्की खातरजमा करा. तुमचे खाजगी क्षण, एकांत जाहीर करायला समाजकंटक सगळीकडे असतात. सोबत भारंभार दागिने अजिबात नेऊ नका.  तुमचे तपशील मित्रमैत्रिणींना फोनवरून मुळीच सांगू नका. हनिमूनला निघण्याआधी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन मगच गर्भप्रतिबंधक गोळ्या घ्या. स्वत: डॉक्टर होऊ नका. पण डॉक्टरांचा नंबर मात्र जवळ ठेवा. हनिमून ही सुरुवात आहे, तो निर्णायक प्रसंग नाही म्हणून त्यावरून पुढचे आडाखे अजिबात मारू नका. या साध्या गोष्टी पाळल्यात की तुमचा हनिमून आयुष्यभर ताजा राहील.

सुटसुटीत कपडे व सामान असावे म्हणजे गाडी चुकली बिकली तरी जड लगेजमुळे होणारा त्रास वाचतो.

हनिमून म्हणजे खरेदी नव्हे. त्यामुळे त्यात वेळ आणि पैसा अजिबात खर्च करू नका. तो एकमेकांवर करा.

या काळात अगदी चोवीस तास एकमेकांबरोबर राहायची गरज नाही. थोडासा वेळ फक्त स्वत:साठी ठेवा.

जमल्यास ट्रॅव्हलर्स चेक वापरा. कॅश टाळा.

आपली औषधे, कॉस्मेटिक्स आधी पॅक करा.

हनिमून तुमचा आहे. त्याची जाणीव फक्त तुम्हालाच हवी, त्यामुळे चारचौघातलं तुमचं वागणं व्यवस्थित हवं.

उठल्यासुटल्या आईला, मैत्रिणीला कॉल हे टाळा. नव-यानेसुद्धा मित्रांना थोडं विसरणं योग्य. 





तिशी ओलांडल्यानंतर




तिशी ओलांडल्यानंतर स्त्री-पुरुषांना निसर्ग फारशी मदत करत नाही. त्वचेमध्ये निर्माण होणारे नैसर्गिक तेल व बाष्प या दोन्हींचे प्रमाण उतरत्या क्रमात असते. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसणे, त्यावर सुरकुत्या पडणे वगैरे वार्धक्याची लक्षणे या काळात दिसू लागतात. रोज नियमितपणे किंवा आठवड्यातून निदान तीन वेळा तरी चेहºयाला पोषक द्रव्यांचा मसाज आवश्यक आहे. शरीराला व चेह-याला मसाज (मर्दन) करणे ही एक अतिप्राचीन कला आहे. त्वचेच्या थराखाली असलेल्या स्नायूंना चिवटपणा व लवचीकपणा यावा, त्यांची शिथिलता कमी व्हावी हा मसाजचा मुख्य हेतू आहे. स्नायूंच्या बळकटीबरोबरच त्यांना जोडलेल्या त्वचेचे सौंदर्यही मसाजमुळे वाढते.

चेह-याच्या त्वचेला मसाज करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी. जितकी त्वचा शुष्क होईल तितकी आतल्या पेशींची शुष्कता वाढते, त्यांची रचना बदलते. परिणामी चेहºयावर बारीक सुरकुत्या पडतात. त्या जर कमी करायच्या असतील तर त्वचा स्निग्ध व आर्द्र ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्वचेवर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक दबाव आणणे किंवा चुकीचा मसाज करणे चेह-याच्या नाजूक त्वचेला हानिकारक ठरेल.

मसाज सुरू करताना प्रथम मानेच्या तळापासून हाडापर्यंत (कॉलरबोन) तो सुरू करावा. तसेच मानेच्या दोन्ही बाजूंना कानाखाली जो स्नायू असतो - ज्याला मस्टरॉइड असे म्हणतात - त्या स्नायूपासून सुरू करावा. मसाज करताना हाताची फक्त बोटेच वापरतात. प्रत्येक बोटाला एक ठरावीक प्रकारचा दाब (प्रेशर) असतो. त्यामुळे मानेपासून वर प्रत्येक भागावर फक्त ठरावीक बोटांचाच वापर करावा, मान आणि कपाळ यांवर विशेष दाब किंवा दबाव दिल्यास हरकत नाही; पण डोळ्यांना मात्र अगदी हलक्या बोटाने मसाज करणे आवश्यक आहे.

मान : दोन्ही हातांची पहिली चारही बोटे मसाज करण्यासाठी आवश्यक आहेत. वर दाखवल्याप्रमाणे मानेच्या तळापासून प्रत्येक रेषेवर एका हातामागून दुसरा असे स्ट्रोक्स देऊन तीन-चार वेळा मसाज करावा. मानेच्या एका कडेपासून तो दुसºया कडेपर्यंत मसाज झाल्यानंतर पुन्हा हीच क्रिया तीन वेळा करावी. म्हणजे मानेवरील प्रत्येक रेषेवर नऊ वेळा मसाज होतो. मसाज अगदी शांतपणे, लयबद्ध असा असावा. नृत्यातील तालबद्धता मसाजमध्ये असावी. अशा प्रकारे केलेल्या मसाजमुळे अतिशय आराम मिळतो.

हनुवटी : १) हाताची फक्त तीन बोटे (पहिले बोट सोडून) या मसाजसाठी वापरावी. हनुवटीच्या मध्यावर दोन्ही हात घेऊन हनुवटीच्या खालच्या बाजूला दोन्ही कानांच्या दिशेला वर्तुळाकार मसाज करावा. हीच क्रिया तीन वेळ करावी. २) पहिल्या दोन बोटांत कात्रीसारखी हनुवटी पकडून मध्यापासून कानांपर्यंत मसाज करावा. एका हाताने एका कानापासून मसाज केल्यानंतर दुसºया हाताने तीच क्रिया करावी, म्हणजे एकूण तीन वेळा मसाज होईल.

ओठ : प्रत्यक्ष ओठांवर जरी मसाज करावयाचा नसला तरी त्यांच्या भोवतालच्या भागाला मसाजची आवश्यकता आहे. हा मसाज फक्त अंगठ्याने करावा. दोन्ही हाताच्या अंगठ्यांची टोके हनुवटीच्या वरच्या बाजूला ओठांच्या खाली दाबून धरावी आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे नाकाच्या खालच्या भागापर्यंत छोट्या वर्तुळाकार दिशेने मसाज करावा. ही क्रिया तीन वेळा करावी.

कपाळ : ओठांचा मसाज झाल्यावर हात कपाळावर न्यावेत आणि मानेप्रमाणेच चारही बोटांनी चांगला दाब देऊन कपाळावर वरच्या दिशेने मसाज करावा.

गाल : कपाळानंतर गालावरही मसाजसाठी फक्त मधली दोन बोटे वापरावीत व आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक रेषेवर मध्यापासून ते कानशिलापर्यंत असा मसाज करावा. प्रत्येक रेषेत नऊ वेळा मसाज झाला पाहिजे. एका हातानंतर दुसरा हात या क्रमाने लयबद्ध रीतीने तो केला पाहिजे.

डोळे : डोळ्यांना मसाज करताना फक्त अनामिकेच्या (करंगळीजवळच्या बोटाचा) उपयोग करावा. डोळ्यांखालची आणि वरची त्वचा अतिशय शुष्क असते. चेह-याच्या इतर भागांतील त्वचेच्या मानाने या विभागात तैलग्रंथी अतिशय कमी असतात. त्यामुळे वयोमानाने कमी प्रमाणात निर्माण होत जाणाºया तेलाचा दृश्य परिणाम असा होतो, की ही जागा काळी पडत जाते. मग आपण डोळ्याभोवती काळी वर्तुळे पडली असे म्हणतो. म्हणून डोळ्यांना मसाज करताना कोणत्याही शुद्ध तेलाचाच वापर करावा आणि डोळ्याच्या बाहेरच्या कोप-यापासून सुरुवात करून डोळ्याखालून सहा वर्तुळे आणि वरील भागावर तीन वर्तुळे असा मसाज करावा. ज्या वेळी डोळ्यांना अतिशय त्रास झालेला असेल किंवा डोळ्यांना थकवा आलेला असेल, त्या वेळी भुवईच्या आतल्या कोप-यावर अनामिकेने भुवई चिमटीत पकडल्याप्रमाणे दाब द्यावा.

पाठ : डोळ्यानंतर दोन्ही हातांनी जमेल तेवढ्या खालपर्यंत पाठीला मसाज करावा. उजव्या हाताने उजव्या खांद्यावर व पाठीवर वर्तुळाकार मसाज करावा. स्वत:च स्वत:च्या पाठीला मसाज करणे थोडे अवघड पडते; परंतु मान व चेहरा याचबरोबर पाठ व खांद्याच्या मागचा भाग यांवरही मसाज होणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांवर जमेल तितका मसाज करावा.




सिझलर्स



पंजाबी सिझलर्स
पदार्थ : पनीर टिक्का, पंजाबी ग्रेव्ही, पंजाबी टिक्का
पनीर टिक्काचे साहित्य ः 200 ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, एक कप चौकोनी आकारातील कांदा व सिमला मिरचीचे तुकडे, 100 ग्रॅम घट्ट दही, एक चमचा मूगडाळीचे पीठ, एक चमचा आले-लसूण
पदार्थ : पनीर टिक्का, पंजाबी ग्रेव्ही, पंजाबी टिक्का
पनीर टिक्काचे साहित्य ः 200 ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, एक कप चौकोनी आकारातील कांदा व सिमला मिरचीचे तुकडे, 100 ग्रॅम घट्ट दही, एक चमचा मूगडाळीचे पीठ, एक चमचा आले-लसूण पेस्ट, एक चमचा कसूरी मेथी, एक चमचा तंदुरी मसाला पावडर, दोन चमचे मोहरी, मीठ.
कृती ः
1. सगळे मसाले एकत्र करून घ्या.
2. पनीर, कांदा आणि सिमला मिरचीला तो मसाला लावून घ्या.
3. पंधरा मिनिटे मॅरिनेट करून स्टिकला पनीर, कांदा व सिमला मिरचीचे काप लावा.
4. नॉनस्टिक तव्यावर मोहरीचे तेल टाकून त्यावर हे टिक्के हलकेसे परतून घ्या.

पंजाबी ग्रेव्ही
साहित्य ः अडीचशे ग्रॅम बारीक चिरलेला टोमॅटो, एक कांदा चिरलेला, 50 ग्रॅम काजू पावडर, गरम मसाला, जिरे, लाल तिखट, कसूरी मेथी, आले-लसूण पेस्ट प्रत्येकी एक चमचा, चार लवंगा, एक चमचा तेल, 50 मिलिलिटर ताजे क्रीम, मीठ.
कृती ः
1. एका भांड्यात टोमॅटो, लवंगा आणि तेल व थोडे पाणी घेऊन पाच मिनिटे उकळा.
2. त्याचे वाटण करून घ्या.
3. पॅनमध्ये बटर घेऊन त्यात जिरे, आले-लसूण पेस्ट व कांदा घाला.
4. व्यवस्थित परतून त्यात टोमॅटो प्युरी घाला.
5. मग त्यात लाल तिखट, गरम मसाला, कसूरी मेथी, काजू पावडर, मीठ घालून पाच मिनिटे शिजवा.

पंजाबी टिक्की
साहित्य ः 100 ग्रॅम वाफवलेली फरसबी, दीडशे ग्रॅम उकडलेला बटाटा, एक चिरलेली सिमला मिरची, दोन चमचे लसूण-हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा धने-जिरे पूड, एक चमचा गरम मसाला व आमचूर पावडर, मीठ, अडीचशे ग्रॅम शिजविलेला पिवळा जिरा पुलाव.
कृती ः
1. पुलाव वगळता सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.
2. मिश्रणाचे गोळे करून ते शॅलो फ्राय करावेत.

सिझलर :
1. दोन सिझलर प्लेट लाल रंगाच्या होईपर्यंत गरम करून, त्या लाकडाच्या ट्रेमध्ये ठेवा.
2. प्रत्येक प्लेटच्या मध्यभागी जिरा पुलाव घाला.
3. त्याच्या एका बाजूला दोन टिक्की ठेवा. त्यावर दोन पनीर टिक्कीच्या स्टिक्‍स ठेवा.
4. भांड्यात एक चमचा तेल आणि पाणी असे मिश्रण बनवा. सिझलिंग इफेक्‍टसाठी तेलाचे मिश्रण प्लेटवर घाला व पंजाबी ग्रेव्हीसह लगेच सर्व्ह करा.

सब्जी तवा राईस सिझलर
साहित्य ः अडीचशे ग्रॅम बासमती तांदूळ, दीडशे ग्रॅम पनीर क्‍यूब, एक उकडलेला बटाटा चौकोनी आकारात, 50 ग्रॅम वाफवलेली फरसबी, दोन टोमॅटो, प्रत्येकी एक सिमला मिरची व कांदा चिरलेला, एक चमचा लसूण चिरलेला, एक चमचा बेडगी-काश्‍मिरी मिरचीची पेस्ट, तेल, चाट मसाला, एक चमचा मीठ, हळद.
कृती ः
1. बासमती तांदळाचा भात शिजवून घ्यावा.
2. पनीर, बटाटे, फरसबी, मीठ व चाट मसाला एकत्र करून घ्या.
3. एका पॅनमध्ये तेलावर लसूण, कांदा, टोमॅटो परता.
4. त्यात मिरचीची पेस्ट, हळद, पावभाजी मसाला, मीठ घालून शिजवा.
5. त्यात पनीरचे मिश्रण घाला व शिजवून घ्या.
6. वर चिरलेली कोथिंबीर पेरा.
7. वर सांगितल्याप्रमाणे सिझलरची प्लेट तयार करून घ्या.
8. त्यावर कोबीची पाने पसरा. त्यावर भात पसरून वर तवा भाजी घाला.
9. कोथिंबीरीने सजवा व सर्व्ह करा.

चायनिज सिझलर
साहित्य ः अडीचशे ग्रॅम उकडलेल्या नूडल्स, 50 ग्रॅम स्वीट सॉस, 100 ग्रॅम टोमॅटो सॉस, दोन चमचे बटर, सोया सॉस, मीठ, 200 ग्रॅम किसलेले पनीर, एक चिरलेली सिमला मिरची, एक चमचा किसलेले आले, ब्रेडचे तीन स्लाइस भिजवून कुस्करलेले, कोथिंबीर, 50 ग्रॅम मैदा, सोडा, तेल, 100 ग्रॅम कुरकुरे, 100 ग्रॅम किसलेले चीज, बारीक चिरलेला कोबी व पातीचा कांदा.
कृती ः
1. पॅनमध्ये बटर घेऊन त्यात उकडलेल्या नूडल्स टाकाव्यात.
2. त्यात टोमॅटो सॉस, स्वीट सॉस, मीठ घालून परतून घ्यावे.
3. एका भांड्यात किसलेले पनीर, सिमला मिरची, आले, कोथिंबीर घ्यावी.
4. त्यात ब्रेड, कुरकुरे, सोडा, सोया सॉस घालावा.
5. मग त्यात मीठ घालून, मिश्रणाचे गोळे करून, ते सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
6. सिझलर प्लेट तयार करून त्यावर कोबीची पाने व त्यात पनीरचे गोळे ठेवावेत.
7. वरून नूडल्स घालाव्या.
9. कोबी, पातीचा कांदा व चीज घालून सजवावे.

चिझी एग सिझलर
साहित्य ः दहा अंडी, दोन चिरलेले टोमॅटो व कांदे, एक चिरलेली सिमला मिरची, दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 100 ग्रॅम कापलेले मश्रुम्स, दीडशे ग्रॅम किसलेले चीज, दीडशे ग्रॅम बेसन, तीन चमचे हळद, तिखट, चिमूटभर सोडा व ओवा, एक चमचा धने पूड, बटर, तेल, बन किंवा ब्रेड रोल.
कृती 1 ः
1. दोन अंडी उकडवून त्याचे छोटे काप करावेत.
2. पॅनमध्ये बटर घालून त्यावर सिमला मिरची, कांदा, हळद, तिखट घालून शिजवावे.
3. मग त्यात अंडी व मीठ घालून परतावे.
कृती 2 ः
1. एका भांड्यात दोन अंडी फोडून घ्यावीत.
2. त्यात टोमॅटो, कांदा, मश्रुम्स, हिरवी मिरची, हळद व मीठ घालावे.
3. हे सर्व फेटून भुरजीप्रमाणे करून घ्यावे.
कृती 3 ः
1. दोन अंडी उकडून घ्यावीत.
2. दोन तुकड्यांमध्ये कापून घ्यावीत.
3. एका भांड्यात बेसन घेऊन त्यात ओवा, धनेपूड, हळद, सोडा व मीठ घालावे.
4. बेसनात अंडी बुडवून तेलात तळून घ्यावीत.
सिझलर ः
1. सिझलरची प्लेट तयार करून घ्यावी.
2. गरम प्लेटमध्ये कोबीची पाने घालून त्यावर अंडी ठेवावीत.
3. त्यावर भुरजी घालावी. मग बेसनाच्या आवरणातील अंडी ठेवावीत.
4. वरून किसलेले चीज घालावे.पेस्ट, एक चमचा कसूरी मेथी, एक चमचा तंदुरी मसाला पावडर, दोन चमचे मोहरी, मीठ.
कृती ः
1. सगळे मसाले एकत्र करून घ्या.
2. पनीर, कांदा आणि सिमला मिरचीला तो मसाला लावून घ्या.
3. पंधरा मिनिटे मॅरिनेट करून स्टिकला पनीर, कांदा व सिमला मिरचीचे काप लावा.
4. नॉनस्टिक तव्यावर मोहरीचे तेल टाकून त्यावर हे टिक्के हलकेसे परतून घ्या.

पंजाबी ग्रेव्ही
साहित्य ः अडीचशे ग्रॅम बारीक चिरलेला टोमॅटो, एक कांदा चिरलेला, 50 ग्रॅम काजू पावडर, गरम मसाला, जिरे, लाल तिखट, कसूरी मेथी, आले-लसूण पेस्ट प्रत्येकी एक चमचा, चार लवंगा, एक चमचा तेल, 50 मिलिलिटर ताजे क्रीम, मीठ.
कृती ः
1. एका भांड्यात टोमॅटो, लवंगा आणि तेल व थोडे पाणी घेऊन पाच मिनिटे उकळा.
2. त्याचे वाटण करून घ्या.
3. पॅनमध्ये बटर घेऊन त्यात जिरे, आले-लसूण पेस्ट व कांदा घाला.
4. व्यवस्थित परतून त्यात टोमॅटो प्युरी घाला.
5. मग त्यात लाल तिखट, गरम मसाला, कसूरी मेथी, काजू पावडर, मीठ घालून पाच मिनिटे शिजवा.

पंजाबी टिक्की
साहित्य ः 100 ग्रॅम वाफवलेली फरसबी, दीडशे ग्रॅम उकडलेला बटाटा, एक चिरलेली सिमला मिरची, दोन चमचे लसूण-हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा धने-जिरे पूड, एक चमचा गरम मसाला व आमचूर पावडर, मीठ, अडीचशे ग्रॅम शिजविलेला पिवळा जिरा पुलाव.
कृती ः
1. पुलाव वगळता सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.
2. मिश्रणाचे गोळे करून ते शॅलो फ्राय करावेत.

सिझलर :
1. दोन सिझलर प्लेट लाल रंगाच्या होईपर्यंत गरम करून, त्या लाकडाच्या ट्रेमध्ये ठेवा.
2. प्रत्येक प्लेटच्या मध्यभागी जिरा पुलाव घाला.
3. त्याच्या एका बाजूला दोन टिक्की ठेवा. त्यावर दोन पनीर टिक्कीच्या स्टिक्‍स ठेवा.
4. भांड्यात एक चमचा तेल आणि पाणी असे मिश्रण बनवा. सिझलिंग इफेक्‍टसाठी तेलाचे मिश्रण प्लेटवर घाला व पंजाबी ग्रेव्हीसह लगेच सर्व्ह करा.

सब्जी तवा राईस सिझलर
साहित्य ः अडीचशे ग्रॅम बासमती तांदूळ, दीडशे ग्रॅम पनीर क्‍यूब, एक उकडलेला बटाटा चौकोनी आकारात, 50 ग्रॅम वाफवलेली फरसबी, दोन टोमॅटो, प्रत्येकी एक सिमला मिरची व कांदा चिरलेला, एक चमचा लसूण चिरलेला, एक चमचा बेडगी-काश्‍मिरी मिरचीची पेस्ट, तेल, चाट मसाला, एक चमचा मीठ, हळद.
कृती ः
1. बासमती तांदळाचा भात शिजवून घ्यावा.
2. पनीर, बटाटे, फरसबी, मीठ व चाट मसाला एकत्र करून घ्या.
3. एका पॅनमध्ये तेलावर लसूण, कांदा, टोमॅटो परता.
4. त्यात मिरचीची पेस्ट, हळद, पावभाजी मसाला, मीठ घालून शिजवा.
5. त्यात पनीरचे मिश्रण घाला व शिजवून घ्या.
6. वर चिरलेली कोथिंबीर पेरा.
7. वर सांगितल्याप्रमाणे सिझलरची प्लेट तयार करून घ्या.
8. त्यावर कोबीची पाने पसरा. त्यावर भात पसरून वर तवा भाजी घाला.
9. कोथिंबीरीने सजवा व सर्व्ह करा.

चायनिज सिझलर
साहित्य ः अडीचशे ग्रॅम उकडलेल्या नूडल्स, 50 ग्रॅम स्वीट सॉस, 100 ग्रॅम टोमॅटो सॉस, दोन चमचे बटर, सोया सॉस, मीठ, 200 ग्रॅम किसलेले पनीर, एक चिरलेली सिमला मिरची, एक चमचा किसलेले आले, ब्रेडचे तीन स्लाइस भिजवून कुस्करलेले, कोथिंबीर, 50 ग्रॅम मैदा, सोडा, तेल, 100 ग्रॅम कुरकुरे, 100 ग्रॅम किसलेले चीज, बारीक चिरलेला कोबी व पातीचा कांदा.
कृती ः
1. पॅनमध्ये बटर घेऊन त्यात उकडलेल्या नूडल्स टाकाव्यात.
2. त्यात टोमॅटो सॉस, स्वीट सॉस, मीठ घालून परतून घ्यावे.
3. एका भांड्यात किसलेले पनीर, सिमला मिरची, आले, कोथिंबीर घ्यावी.
4. त्यात ब्रेड, कुरकुरे, सोडा, सोया सॉस घालावा.
5. मग त्यात मीठ घालून, मिश्रणाचे गोळे करून, ते सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
6. सिझलर प्लेट तयार करून त्यावर कोबीची पाने व त्यात पनीरचे गोळे ठेवावेत.
7. वरून नूडल्स घालाव्या.
9. कोबी, पातीचा कांदा व चीज घालून सजवावे.

चिझी एग सिझलर
साहित्य ः दहा अंडी, दोन चिरलेले टोमॅटो व कांदे, एक चिरलेली सिमला मिरची, दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 100 ग्रॅम कापलेले मश्रुम्स, दीडशे ग्रॅम किसलेले चीज, दीडशे ग्रॅम बेसन, तीन चमचे हळद, तिखट, चिमूटभर सोडा व ओवा, एक चमचा धने पूड, बटर, तेल, बन किंवा ब्रेड रोल.
कृती 1 ः
1. दोन अंडी उकडवून त्याचे छोटे काप करावेत.
2. पॅनमध्ये बटर घालून त्यावर सिमला मिरची, कांदा, हळद, तिखट घालून शिजवावे.
3. मग त्यात अंडी व मीठ घालून परतावे.
कृती 2 ः
1. एका भांड्यात दोन अंडी फोडून घ्यावीत.
2. त्यात टोमॅटो, कांदा, मश्रुम्स, हिरवी मिरची, हळद व मीठ घालावे.
3. हे सर्व फेटून भुरजीप्रमाणे करून घ्यावे.
कृती 3 ः
1. दोन अंडी उकडून घ्यावीत.
2. दोन तुकड्यांमध्ये कापून घ्यावीत.
3. एका भांड्यात बेसन घेऊन त्यात ओवा, धनेपूड, हळद, सोडा व मीठ घालावे.
4. बेसनात अंडी बुडवून तेलात तळून घ्यावीत.
सिझलर ः
1. सिझलरची प्लेट तयार करून घ्यावी.
2. गरम प्लेटमध्ये कोबीची पाने घालून त्यावर अंडी ठेवावीत.
3. त्यावर भुरजी घालावी. मग बेसनाच्या आवरणातील अंडी ठेवावीत.
4. वरून किसलेले चीज घालावे.