Tuesday 5 August 2014

रानातून आणलाय रानमेवा



पावसाच्या एक-दोन जोरदार सरी पडून गेल्या की गावागावांमधले रस्त्याबाजूचे भाग, नदीकाठ, डोंगरउतार हिरवेगार होतात. ही हिरवाई शिवारा-खाचरांमध्येही पेरण्यासाठी सगळे हात कामाला लागतात. शेतीच्या मशागतीच्या कामांच्या या लगबगीच्या दरम्यानच, कोणतीही मशागत-मेहनत न करता आपोआप उगवलेला हिरवा रानमेवाही असतो.  श्रावणात आपण बाजारात फेरफटका मारला तर कितीतरी नवनव्या भाज्याही बघायला मिळतात. या भाज्या एखाद्याच महिन्यात, तेवढ्याच दिवसात दिसतात व नंतर ज्या गायब होतात, त्या एकदम पुढल्या पावसाळ्यात दर्शन देण्यासाठीच! वर्षभरात कुठे शोधू म्हटले तरी त्या दिसणार नाहीत. म्हणून पावसाळ्यात त्यांची ओळख करून घ्यावी, चव चाखावी आणि त्यांचा आस्वादही जरूर घ्यावा. अळंबी – आजकाल बारा महिने मिळणारी पावसाळी भाजी म्हणजे अळंबी. पावसाळ्यात अळंबीच्या छत्र्या जागोजागी उगवलेल्या दिसतात. त्यात विषारी आणि गोड असे दोन प्रकार आहेत. अळंबी थंड व गोड आहेत. यालाच आपण मशरूम असे म्हणतो. ते शक्तीवर्धक असून पचनास थोडे जड, पौष्टिक आहेत. यात भरपूर प्रथिने असल्याने आहारात सावधगिरी बाळगणार्‍यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यात पोटॅशियम, फॉस्फरस व सोडियमचे प्रमाणही लक्षात घेण्यासारखे आहे. यात ‘‘ब’’ जीवनसत्त्वाचे उपघटक ५ ते ३० % पर्यंत आहेत. त्यामुळे मशरूम ही भाजी आपल्या आहारात आलटून पालटून असावीच. टाकळा, फोडशी, शेवळं, करटुली, कुरडू, भारंग, नालेभाजी, रानातलं अळू, गावठी सुरण, वेगवेगळे कंद आदी विविध प्रकारच्या भाज्या पावसाबरोबर जमिनीतून उगवून येतात आणि स्थानिक गावकऱ्यांच्या, आणि अपवादाने का होईना पण मुंबईकरांच्याही ताटात दिसू लागतात.

केवळ पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या या रानभाज्यांचे दर्दी मोजकेच असले, तरी एकदा या रानभाज्यांची चव जिभेवर रुळलेले खवय्ये ठरलेल्या ठिकाणी बसणाऱ्या आपल्या ठरलेल्या भाजीवाल्याकडे आवर्जून या
भाज्यांची चौकशी करतात. या भाज्यांचा मोसम जेमतेम दोन-तीन महिन्यांचा. पावसाला सुरुवात झाल्यानंतर जूनपासून ते फार फार तर सप्टेंबरपर्यंत या रानभाज्या असतात. यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंद, फुले, शेंगा अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. प्रामुख्याने या भाज्या मिळतात मुंबईच्या उंबऱ्यावरच्या पालघर, सफाळे, वसई, कर्जतजवळच्या लहान- लहान गावांमध्ये. या गावांमधल्या महिला, मुलं पहाटे, खरं तर मध्यरात्रीच या भाज्या खुडण्यासाठी बाहेर पडतात. पहाटे अडीच-तीन वाजताच त्यांचे काम सुरू होते. गावात, खाचरांच्या बांधांवर, डोंगरउतारावर उगवणाऱ्या या भाज्या गोळा करून त्या बाजारात घेऊन येतात. मुंबई- उपनगरांत भाजीविक्री करणारे भाजीवाले रानभाज्या खरेदी करून पहाटेच मुंबईच्या दिशेने निघतात. पहाटे चार-पाच-सहा वाजता पालघरहून निघणाऱ्या रेल्वेमध्ये असे भाजीवाले अनेक असतात. पावसाळ्यात त्यांच्या टोपलीत या रानभाज्यांच्याही जुड्या असतात. या भाज्या फक्त पावसाळ्यात मिळतात. त्यातही प्रत्येक भाजीचा सीझन वेगवेगळा असतो. गणपतीपर्यंत या रानभाज्या हळुहळू संपत येतात.

या रानभाज्यांचे बी पेरावे लागत नाही. त्याला खतपाण्याचीही आवश्यकता नसते, कीटकनाशके- औषधे यांचाही वापर केलेला नसतो. त्यामुळे या भाज्या पूर्णतः नैसर्गिक, शुद्ध असतात सध्या उच्चभ्रू वर्गात असलेल्या ' ऑरगॅनिक फूड ' च्या फॅडला या भाज्या निश्चितच उपयुक्त ठरतील.

पालघरजवळच्या अनेक भागांमध्ये अनेक कुटुंबांमधल्या व्यक्ती पावसाळ्यात रानात फिरून अशा भाज्या गोळा करून भाजीविक्रेत्यांना विकतात. गेल्या कित्येक पिढ्यांपासून ही पद्धत सुरू आहे. पावसाळ्यात या भाज्या मुद्दामून खाव्यात, विशेषतः मराठी कुटुंबांकडून या भाज्यांना अधिक मागणी असते, मराठी वस्त्यांमध्ये या भाज्यांची टोपली घेऊन बसलेले विक्रेते दिसतात, असेही ते सांगतात.


पावसाळ्याच्या काळात या गावांतील स्थानिकांच्या आहारात या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या भाज्यांमुळे स्थानिकांना अल्पकाळापुरता रोजगारही मिळतो. शहरी वर्गाच्या कीचनमधून या भाज्या गायब झाल्या असल्या, तरी काही घरांमध्ये या भाज्या आवर्जून शिजवल्या जातात. स्वादिष्ट आणि आरोग्यपूर्ण असलेल्या या भाज्या पावसाळ्यात आवर्जून खाव्यात, असे म्हटले जाते. मात्र या रानभाज्यांमधली व्हरायटी शहरी-उपनगरी भाजी बाजारात तेवढी पाहायला मिळत नाही. त्यातल्या त्यात टाकळा, फोडशी या भाज्याच मुबलक प्रमाणात दिसतात. एरव्ही शेवग्याच्या शेंगा, अळू या जरा गावरान प्रकारांच्या सोबत या भाज्या दिसतात. अळंबीसारखी एकेकाळची गावरान भाजी आज मश्रूमच्या रुपाने फाइव्हस्टार हॉटेलच्या मेन्यूकार्डचा, एलिट सर्कलचा भाग झाली आहे. तेवढ्याच स्वादिष्ट असलेल्या रानभाज्या काही मोजक्यांच्या रसोईचा भाग आहेत. 


टाकळा : महाराष्ट्राच्या काही भागांत खासकरून कोकणात ही भाजी ‘टायकळा’ किंवा ‘टाकळा’ म्हणून ओळखली जाते. टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. कारण कोवळय़ा पानांची भाजी पचायला हलकी असून ती तिन्ही दोष कमी करते. रक्तवात, रक्तपित्त यांसारखे रक्ताचे आजार तसेच नायटा रोगातही ही भाजी आवर्जून खातात. पावसात होणारा खोकला, शरीराला सुटणारी खाज, पोटात जंत होणं, दमा लागणं याही त्रासात ही भाजी जरूर खावी.

गोमेटू : तोंडलीसारखी लांबट हिरवी फळं या भाजीला येतात. आमटीत किंवा भाजीत ही फळं घातली असता त्या पदार्थाच्या चवीत वाढ होते. या दिवसात चिखल्यांमुळे पायाला जखमा होतात. अशावेळी निखा-याच्या आगीवर ही फळं भाजून त्याचा गर पायाला लावल्यास जखमा ब-या होऊन पाय आधी जसे स्वच्छ होते तसेच होतात.

कुळू : गवताची पाती तसंच लव्हाळ्याप्रमाणे दिसणारी ही रानभाजी ‘फोडशी’ म्हणून ओळखली जाते. भिजवलेली मुगाची डाळ किंवा चणाडाळीत कांदा घालून केलेली ही भाजी अतिशय रुचकर लागते. या
भाजीमुळे पोटदुखी थांबते.

कुर्डू : कांदा-लसूण घालून केलेली कुर्डूची भाजी पोटासाठी सारक ठरते. या भाजीत लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे गरोदर स्त्रिया, वाढत्या वयातील मुली, महिला यांनी ती आवर्जून खावी. कुर्डूची फुलं तसंच बियांची चटणी लघवीच्या विकारांवर औषधी ठरते.
कुडाच्या शेंगा : पोटाच्या आजारांसाठी ही भाजी गुणकारी समजली जाते. कोवळ्या कुडाच्या शेंगा मोडून, पीठ पेरून परतून केलेली भाजी या दिवसांत अनेक घरांत खाल्ली जाते. कुडाच्या शेंगाची भाजी आणि चटणी मूतखडय़ावर बहुगुणी समजली जाते. या कुडाच्या कांद्यांना अंकुर फुटल्यावर त्यांचीही भाजी करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ही अंकुर फुटलेल्या कांद्याची भाजी कृमी तसंच जंतूंवर गुणकारी ठरते.


कावळा : या भाजीला संस्कृत भाषेत ‘कचाय’ असंही म्हणतात. ओलं खोबरं घालून बारीक पानं असलेल्या कावळ्याची भाजी करतात. कच्च्या कावळय़ामध्ये गोडं दही आणि सैंधव मीठ घालून कोशिंबीरही केली जाते. ही भाजी कफदोषाच्या विविध आजारांवर गुणकारी समजली जाते.

कोळी : या नावाचा कीटक असतो, ते आपल्या सर्वाना माहीत आहेच; पण या नावाची भाजीही असते. या भाजीचं बळीराजाच्या आहारात विशेष महत्त्व आहे. शेतकरीराजा पाऊस पडल्यावर पेरणी, लावणीच्या कामाला लागतो. त्याही पूर्वी तो ‘कोळीच्या भाजी’चा नवेद्य आपल्या कुलदैवतेला दाखवतो.

कंटोळी : ‘कर्टुल’, ‘कंटोळं’ या नावानेही ही भाजी ओळखली जाते. झाडाझुडुपांत वाढलेल्या कंटोळीची भाजी कांदा-खोब-यासहित परतून केली जाते. संधिवाताच्या तसंच पित्ताच्या विकारांवर ती अत्यंत लाभदायी ठरते.

भोपळयाचा वेल : भोपळ्याच्या कोवळय़ा वेलाची भाजी त्याच्या पानासकट केली जाते. या वेलीत लोह तसंच विविध क्षारांचं प्रमाण अधिक असतं. भोपळ्याच्या केशरी रंगाच्या फुलांच्या भाजीपासून मिळणारं लोह शरीराला पूरक ठरतं. फुलांची भाजी रक्तविकार आणि अंगाचा दाह कमी केल्यास उपयोगी ठरते.

सुरणाचा कोंब : पहिला पाऊस पडल्यावर जमिनीत सुरणाचे कंद रुजून येतात. जमिनीच्या वरच्या बाजूंना हिरव्या रंगाची लांब पानं येतात. सुरणाच्या पानांच्या तंतुमय भाजीत लोह आणि क्षार असतात. लाल तिखट, कढीपत्ता, चिंचेचा कोळ, गूळ टाकून केलेली सुरणाच्या कोंबाची भाजी अप्रतिम लागते.

शेवळ : ‘शेवळ’ किंवा ‘शेवळी’ ही करंगळीच्या जाडीची लाल, पिवळा तसंच जांभळय़ा रंगाची भाजी वातविकारांवर उपयुक्त ठरते. ही भाजी उकडवून तसंच सुकवून वर्षभरही वापरता येते. शाकाहरी तसंच मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या अन्नपद्धतीने ही भाजी तयार केली जाते.

चिवलाचे कोंब : ही भाजी म्हणजे बांबूंचे कोंब. पावसात नवीन बांबू रुजून वर येतात. त्या वेळी ते कोवळे असतात. त्या वेळीच हे बांबूचे कोंब खाण्यासाठी सर्वार्थाने वापरले जातात. पातळ कढण (सूप), भाजी करण्यासाठी ते योग्य असतात. या भाजीत क्षारांचं प्रमाण भरपूर असतं.


सोनअळंबी : अळंबीची खाण्यायोग्य जात म्हणजे सोनअळंबी. प्रथिनं आणि क्षारांचं भरपूर प्रमाण असणा-या सोनअळंबी या आकारानं लहान असल्या तरी पौष्टिक असतात. भाजी, मसाले भात, पुलाव, कढण मध्येही अळंबीचा वापर केला जातो.
बाफळी : पावसाळ्यात बद्घकोष्ठता आणि पोटदुखी हे आजार डोकं वर काढतात. त्यावर बाफळीची भाजी लाभदायी ठरते. या भाजीच्या बिया कांजण्या, देवी आदी रोगांवर औषध म्हणून तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

श्वेतकांचन : या भाजीच्या फुलांची भाजी दमा, खोकला, कफ, वायू, रक्तविकारावर औषधी ठरते.


चवळी : चवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी ‘तांदूळजा’ किंवा ‘तण्डुलीया’ या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते. ही भाजी खाल्ली असता भूक वाढते. शरीरात निर्माण होणारी विषद्रव्यं म्हणजे ‘टॉक्सिन’ शरीराबाहेर टाकण्यासाठी चवळीचा उपयोग केला जातो. मासिक पाळीचा त्रास असणा-या स्त्रियांनी पावसाळयात चवळीच्या भाजीचा जेवणात समावेश करावा. या त्रासात भाजीचा रस पिण्यासाठी घ्यावा. या भाजीमुळे लघवीस भरपूर होतं. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. वेलीच्या चवळीच्या टोकांना कोकणात ‘बोके’ म्हणतात. या टोकांचीही भाजी केली जाते. तंतुमय अशा सारक भाजीची चव काहीशी तुरट असते.

मायाळू : ‘पोतकी’, ‘उपोदिका’ ही ‘मायाळू’ या भाजीची काही नावं. या भाजीच्या लाल रंगाच्या वेलीवर हिरवी पानं उठून दिसतात. वात आणि पित्तदोषाचा नाश करणारी ही भाजी शुक्रधातूंची वाढ करण्यासाठी उपयुक्त असते. आजारपणात ही भाजी खाल्ली असता तोंडाला चव येते.


शेवगा : या वनस्पतीच्या पानं, फुलं आणि शेंगांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. शेवग्याला लाल, पांढरा आणि निळसर-काळपट अशा रंगाची फुलं येतात. यांपैकी लाल फुलं येणारा शेवगा आरोग्यदृष्टय़ा गुणकारी समजला जातो. फुलांची भाजी खाल्ल्याने लघवीस येणारा उग्र दर्प, जडपणा कमी होतो. मात्र जास्त घाम येणं, चक्कर येणं, नाकातून रक्त वाहणं, घसा सुकणं अशी लक्षणं दिसतात तेव्हा फुलांची भाजी खाऊ नये.

अळू : अळूच्या भाजीपासून देठी, ओले चणे-मका तसंच भुईमुगाच्या शेंगाचे दाणे, काळे वाटाणे, फणसाच्या आठळय़ा टाकून केलेली अळूचं साग (जे फतफतं, गरगाट म्हणून ओळखलं जातं), अळुवडय़ा हे पदार्थ तयार केले जातात. अळूच्या कंदांपासून म्हणजे अरवीपासूनही विविध पदार्थ तयार केले जातात. अळूची पानं तसंच देठात लोहाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ही भाजी सर्वानी आवर्जून खावी. पानांची भाजी खाल्ल्याने पोट साफ होतं. मात्र बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी अळूच्या कंदापासून बनवलेली भाजी जपून खावी.


अंबाडी : अंबाडीची कोवळी पानं आणि फळांची भाजी करण्याचा प्रघात आहे. अळूची भाजी करताना अंबाडीची फळं तसंच पाल्याचा वापर केला जातो. फळांपासून सासव, किंवा कुठल्याही भाजीत आंबटपणा आणण्यासाठी उपयोग केला जातो. फळं वापरण्यापूर्वी ती तासावी लागतात. आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी सांभाळून खावी.

वसूची भाजी : पावसाळ्यात ही मुबलक प्रमाणात आढळते. ‘पुनर्वसू’ या नावानेही ही भाजी ओळखली जाते. पांढरी आणि लाल असे या भाजीचे दोन प्रकार आहेत. साधारणपणे पांढ-या वसूचा भाजीसाठी उपयोग केला जातो. यकृताचे आजार, पोटात पाणी होणं, अंगावर सूज येणं, लघवीला कमी होणं या त्रासात पुनर्वसूची भाजी खावी.

हादगा : ही वनस्पती ‘अगस्ता’ या नावाने ओळखली जाते. शेवग्याप्रमाणेच हादग्याच्या कोवळय़ा पानांचा, शेंगाचा आणि फुलांचा जेवणात उपयोग केला जातो. भोंडल्याच्या खेळात खिरापतीत हादग्याच्या फुलांपासून तयार केलेल्या पदार्थाचा उपयोग केला जातो. जेवणानंतर सुस्ती येणाऱ्यांनी हादग्याच्या फुलांची भाजी नाचणीच्या भाकरीसोबत खावी.


प्रत्येक रानभाज्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यातच नेहमीच्या भाज्यांचे वाढलेले दर पाहता अनेक ग्राहक रानभाज्याना विशेष पसंती देत आहेत. बहुतेक रानभाज्यांमध्ये औषधी गुण असल्याने भाजीची जुडी १० रुपये तर अळंबी ८० रुपये किलो दराने विकली जात आहे.
शेताच्या बांधावर किंवा माळरानावर मिळणारी भारंगी पोटाच्या विकारावर, दमा व खोकल्यावर गुणकारी आहे. कडवट चवीच्या कुडाच्या शेंगा मूत्रविकारावर उपयुक्त आहेत. टाकळाच्या भाजीमुळे रक्त शुद्ध होते. कोवळया अळूच्या पानांची भाजी जिभेला चांगली चव आणते. टाकळाची भाजी पचायला हलकी असते. तुरट चवीची ही भाजी पित्तनाशक आहे. बहुतेक सर्व रानभाज्यांचे गुणधर्म सारखेच असले तरी प्रत्येक भाजीत विपूल प्रमाणात लोह, तंतुमय पदार्थ तर इतर खनिज आहेत. तसेच या भाज्यांच्या वाढीसाठी रसायनिक खतांचा वापर होत नसल्याने ग्राहकांकडून यांना विशेष मागणी होत आहे.