Tuesday, 3 April 2012

आयुष्यावर बोलू काही .....



आरोग्य हे कधीही महत्त्वाचं असतं. त्यामुळेच पहिल्या टिप्स आरोग्याच्या
  भरपूर पाणी प्या.
ब्रेकफास्ट राजासारखा घ्यावा, दुपारचं जेवण एखाद्या राजकुमारासारखं आणि रात्रीचं एखाद्या भिकाऱ्यासारखं. (खरं तर ही म्हण इंग्लिशमध्ये ऐकायला जास्त चांगली वाटते. आपण मराठी माणसं सर्वसाधारणपणे रात्रीचं जेवण भरपूर जेवतो. म्हणूनच ही म्हण खास मराठीत.) कसं खावं नि किती खावं याचं मार्गदर्शन करणारी ही म्हण कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे.
हिरवं अन्न अधिक खावं. म्हणजे अर्थातच पालेभाज्या, भाज्या, कडधान्यं. पण बटाटा, कंद यासारखं अन्न कमी प्रमाणात खावं.
जगण्यासाठी तीन ‘ई’ महत्त्वाचे आहेत. एनर्जी, एन्थुझिएझम, एम्पथी
तुम्ही नास्तिक असलात तरी प्रार्थना, ध्यान-धारणा आणि योगासनं करायला हवीत. कारण ह्यात मिळणारी शांतता फार महत्त्वाची असते, आजकालच्या आपल्या आयुष्यात शांत वेळ कुठेतरी गायब झाली आहे.
टीव्ही बघण्यापेक्षा कार्ड गेम्स, बोर्ड गेम्स खेळा. जरा रिफ्रेशिंग वाटेल.
काही पुस्तकं वाचली का तुम्ही? वाचन केलं नसेल तर  नक्की काही पुस्तकं वाचा. जर भरपूर पुस्तकं वाचली असतील तर त्यापेक्षाही जास्त वाचा.
झोपेमुळे शरीराची झीज भरून निघते. म्हणूनच दररोज सात तास झोपा. पण अति झोप टाळणंही आवश्यक आहे.
रोज किमान १० ते ३० मिनिटं चालणं आवश्यक असतं. चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही, असं म्हणतात. पण ते असं का म्हणतात, हे किमान काही दिवस चालल्याशिवाय कळणं शक्यच नाही. म्हणूनच चाला..
नेहमी आनंदी आणि तणावमुक्त राहा, काळजी केल्याने अडचणी कमी होत नाहीत. अडचणीवर मात करण्याची पराकाष्टा करा किंवा ते शक्य नसेल तर त्या गोष्टींची काळजीच करू नका.
आपल्या आवडत्या (पण भिन्न लिंगी) व्यक्ती बरोबर किमान तासभर वेळ घालवा. 

--------------------------------

आरोग्य सांभाळलं की आत्मविश्वासावर सकारात्मक परिणाम होतोच. स्वाभाविकच हा आत्मविश्वास पर्सनॅलिटीच्या माध्यमातून डोकावायला लागतो. पण ही पर्सनॅलिटी अधिक इम्प्रेसिव्ह व्हावी यासाठी आणखी प्रयत्न करायलाच हवेत. 

स्वत:ची तुलना इतरांशी कधीच करू नये. त्यांचा प्रवास कशासाठी आणि कोणत्या दिशेने सुरू आहे, याची तुम्हाला कल्पनाच नसते. मग तुलना अर्धवट होते. त्यामुळे तुलना टाळणं हे सगळ्यात उत्तम.
आपल्या मनात नकारात्मक विचार येतात. त्या नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्या वागण्यावर होत असतो. म्हणूनच या नकारात्मक गोष्टी जितक्या टाळता येतील, तितक्या टाळाव्यात. तुम्ही असे नकारात्मक विचार मनात कधीच आणू नका, ज्यांच्यावर तुम्ही नियंत्रणच ठेवू शकणार नाही आणि भरकटत जाल. त्यापेक्षा तुमची एनर्जी सकारात्मक गोष्टींचा विचार करण्यात वापरा.
एखादी गोष्ट किती प्रमाणात करायची, हे प्रत्येकालाच माहीत असतं. म्हणूनच अतिरेक टाळा. मर्यादा सांभाळणं गरजेचं असतं.
स्वत:ला किती सिरिअसली घ्यायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. इतर जण आपला फार विचार करत नसतात, ना आपल्याला फार सिरिअसली घेत असतात. त्यामुळे थोडं चील करायला हरकत नाही.
गॉसिप करायला मजा येते, हे खरं आहे. पण तरी गॉसिप करण्यात, त्यानंतर त्या गोष्टींवर विचार करण्यात आपण बरीच एनर्जी वाया घालवतो. म्हणूनच सेव्ह युअर एनर्जी. गॉसिप करू नका.
जागेपणी स्वप्नं बघा, ती स्वप्न पूर्ण होण्याचे चान्सेस जास्त असतात.
दुसऱ्यांवर जळणं हे तर सगळ्यात वाईट. तसं जळून काही मिळत नसतं. तुम्हाला जे हवं ते तुमच्याकडे खरं तर सगळं असतं किंबहुना आहे. फक्त त्याची तुम्हाला जाणीव नसते.
भूतकाळ विसरा. सांगणं सोपं, करणं कठीण.. माहिती आहे. पण ते विसरून पुढे जाताना आनंद मिळतो. भूतकाळ सोबत घेऊन गेलं की ओझं कायम वाढतच जातं. तुमच्या पार्टनरच्या भूतकाळातल्या चुकांची त्याला किंवा तिला कधीच कायम आठवण करून देऊ नका. तुम्ही त्या भूतकाळापायी वर्तमान आणि भविष्य दोन्ही बिघडवता.
इतरांचा तिरस्कार करू नका. तुमच्या शब्दांतून पाझरणारा तिरस्कार तुमच्या चेहऱ्यावर परिणाम करतो. हसरा चेहरा सगळ्यांनाच आवडतो. आणि तसंही आयुष्य फार मोठं नाही. किती काळ असा तिरस्कार करण्यात घालवणार आहात?
तुमच्या भूतकाळाशी तडजोड करून मोकळे व्हा. म्हणजे वर्तमान डिस्टर्ब होणार नाही.
तुमचा आनंद इतरांवर अवलंबून कधीच नसतो. तुम्हाला आनंदी वाटलं तर तुम्ही आनंदी होता आणि तुम्हाला दु:खी वाटलं तर तुम्ही दु:खी होता. याची जाणीव कायम बाळगा आणि इतरांच्या बोलण्यामुळे दु:खी, उदास होणं टाळा.
आयुष्यामध्ये आपण निरंतर शिकत असतो. हे जीवन ही खरोखरच एक शाळा आहे. आपल्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या समस्या काही काळापुरत्या येतात, आपल्याला नव्या गोष्टी शिकवून निघून जातात. पण आपण त्या समस्या कायम लक्षात ठेवतो. त्यातून काय शिकायला मिळालं हे विसरतो. म्हणूनच काय शिकलो ते लक्षात ठेवा, त्या वेळचा त्रास आणि अश्रू लक्षात ठेवून काय उपयोग?
हसा आणि लठ्ठ व्हा, असं आपण कायम म्हणतो. अर्थात लठ्ठ होऊ नका पण पोटभर हसा नक्की. त्यामुळे तुमची फेस व्हॅल्यू वाढते.
प्रत्येक वाद आपण जिंकायला हवं असं काही आवश्यक नसतं. आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही हे आपल्याला माहीत असलं तर पुरेसं आहे. इतरांना का पटवून द्यायचं?
आपल्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या समस्या काही काळापुरत्या येतात, आपल्याला नव्या गोष्टी शिकवून निघून जातात. पण आपण त्या समस्या कायम लक्षात ठेवतो. त्यातून काय शिकायला मिळालं हे विसरतो. म्हणूनच काय शिकलो ते लक्षात ठेवा, त्या वेळचा त्रास आणि अश्रू लक्षात ठेवून काय उपयोग?
-------------------------------------

अशा हेल्थ आणि पर्सनॅलिटी टिप्स मिळाल्यावर आपण स्वत:त तर नक्की सुधारणा घडवून आणू शकतो. पण आपली समाजाप्रतीही काही कर्तव्यं असतात. त्या कर्तव्यांचा विचार करायला हवा. पण ती कर्तव्यं कपाळाला आठय़ा घालून पार पाडण्यात काहीच अर्थ नाही.


कुटुंबातल्या सगळ्यांशी बोला. त्यांची विचारपूस करा. कुटुंबापासून लांब राहत असाल तर त्यांना फोन करा. त्यांची काळजी घेणारं कोणी आहे याची जाणीव करून द्या.
प्रत्येक दिवशी इतरांना चांगलं द्यायचं प्रयत्न करा. हे चांगलं म्हणजे एखादी वस्तू असावी असं नाही, हे चांगलं म्हणजे एखादं छानसं हसूही असू शकतं किंवा कोणाची समस्या ऐकून घेण्यासाठी दिलेला वेळही असू शकतो.
कोणत्याही चुकीसाठी त्या व्यक्तीला क्षमा करा. ती क्षमाशील वृत्ती अंगी बाणवली तर आपल्यालाच शांत वाटेल.
आपल्याला आयुष्यात दोन वेळा बालपण अनुभवता येतं. एक तर खरं बालपण आणि दुसरं म्हणजे वृद्धत्व. या दोन्ही वयातल्या निरागस गोष्टी अनुभवण्यासाठी त्यांच्याबरोबर वेळ घालवा. खूप काही शिकायला मिळेल.
दर दिवशी किमान तीन लोकांना हसवायचा प्रयत्न करा. इतर हसले की आपल्याला नक्कीच बरं वाटतं..
इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार तुम्ही कशाला करायचा? तसा विचार केल्याने इतरांचे विचार तर बदलत नाहीत आणि तुम्हीही इतरांबद्दल विचार करताच की ! मग त्यात वेळ का घालवायचा?
जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुमची विचारपूस कोण करतं? तुमची काळजी कोण घेतं? तुम्हाला बरं वाटावं म्हणून कोण प्रयत्न करतं? तुमचे घरचे आणि तुमचे मित्र.. त्यांच्याशी केवळ गरजेपुरतं बोलू नका. कायम संपर्कात राहा.
-----------------------------------------------
आयुष्यात कोणत्या गोष्टी करायच्या त्याचा विचार करणंही गरजेचं आहे. 

जे काम तुमचे म्हणून ठरविण्यात आलेले आहे ते कुठल्याही परिस्थितीत तुम्हीच वेळेवर पूर्ण केले पाहिजे. तुमचे कर्तव्य तुम्हाला प्राणाहून प्रिय हवे. अगदी मृत्यूलाही तुमची कामे पूर्ण करूनच सामोरे जा.
कामाला त्याच्या महत्त्वानुसार योग्य क्रम लावावा, तातडीच्या कामांना पहिल्यांदा हात घाला.
योग्य गोष्टीच करा. मनाला त्या गोष्टी योग्य वाटल्या पाहिजेत तरच त्या करताना मजा येते.
  ज्या गोष्टी चांगल्या नाहीत, सुंदर नाहीत, आनंदी नाहीत त्यांच्यापासून चक्क सुटका करून घ्या.
देवावर विश्वास ठेवा. तो सगळ्या दुर्दैवी गोष्टींवर उपाय सांगत असतो. आपले कान फक्त उघडे हवेत.
परिस्थिती कितीही चांगली किंवा वाईट असो, ती बदलते एवढंच अंतिम सत्य आहे.
तुम्हाला कसंही वाटत असू दे, उठा, तयार व्हा आणि जगाला समोरं जा.
बेस्ट गोष्ट अजूनही आयुष्यात घडणार आहेत. आयुष्य संपलेलं नाही. त्यामुळे जरा वाट बघा आणि आशावादी राहा.
जेव्हा तुम्ही सकाळी जिवंत उठता, तेव्हा देवाचे आभार मानायला अजिबात विसरू नका. हा सुंदर दिवस तुम्हाला त्याच्यामुळे दिसत असतो.
तुमचं अंतर्मन हे कायम आनंदी असतं पण ते तुम्हाला कळत नाही. म्हणूनच कायम आनंदी राहा. आणि सगळ्यात शेवटी
या टिप्स इतरांनाही सांगा, म्हणजे त्यांच्याही आयुष्यात सकारात्मक बदल होतील आणि त्यांना आनंद मिळेल.


Monday, 2 April 2012

पैठणी - मराठमोळ्या सौंदर्याचा मोरपिशी पदर




राजाची राणी होशील, पैठणी नेसून येशील !!!


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत भरजरी पैठणी साडीला मानाचे स्थान आहे. या महावस्त्राची निर्मिती पैठणला होते. एकेकाळी दक्षिण हिंदुस्थानची राजधानी असलेल्या या प्रतिष्ठाननगरीचा ‘वस्त्र व्यापार’ सातासमुद्रापार गेला होता.... पैठणी बनवण्याची कला साधारण २००० वर्ष जुनी आहे. पैठणीचे मूळ गाव म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले मराठवाडयातले 'प्रतिष्ठान' म्हणजेच आताचे पैठण. प्राचीन काळात पैठण रेशीम व जरीच्या व्यापाराचे महत्त्वाचे ठिकाण होते. त्यावेळी रोमन देशाच्या राजाला कापसाचे सूत व रेशीम धागा निर्यात केला जायचा. १८व्या शतकात पेशव्यांचे राज्य होते. पेशव्यांनी पैठणींच्या उत्पादनाला प्रोत्साहन आणि चालना दिली. माधवराव पेशवे यांनी येवल्यात करागीरांना पैठणी विणायला सुरूवात करुन दिली. म्हणून पेशवे इतिहासात येवला हे पैठण इतकेच प्रसिद्ध झाले. 

 असे मानले जाते की हैदराबादचा निजामही या पैठणीवर फिदा होता व त्या निमित्ताने त्याने पैठणला प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्याची स्नूषा निलोफर हिनेही पैठणीच्या काठ व पदरावरचे नक्षीकाम सुचवले होते. मात्र इंग्रजांच्या राज्यात बाकी स्थानिक कलांसारखीच पैठणी तयार करण्याची कलाही कमी होत गेली. पैठणीचे उत्पादन स्वातंत्रपूर्व कालापर्यंत राजाश्रयाने चालत आले. राजाश्रय संपल्यानंतर याचे खास कारागीरांना रोजगार नाहीसा झाल्याने तेथून ते विस्कळीत झाले व जुन्या विणकामामध्ये काम मिळेल तेथे समावेश होत गेले. बनारसी पद्धतीचा शालू, साडी व फेटे करू लागले. त्यातील काही कसबी कामगार किंवा कारागीर निजामशाहीच्या हद्दीबाहेरचे गाव येवला येथे येऊन स्थायिक झाले.

 कालप्रवाहात राजे-राजवाडे गेले. वेदांती-पंडितांची परंपरा खंडित झाली. हिरे माणकांची व्यापारपेठ नामशेष झाली. वैभव लयाला गेले. धार्मिक न्यायनिवाडे करणारे धर्ममार्तंड कालौघात गडप झाले. प्रतिष्ठानचे पैठण झाले. मात्र गतसमृद्ध भूतकाळाची स्मृती जागवणारा एक दुवा आजही कायम आहे. हा दुवा जपला आहे हात मागावर कष्ट करणार्‍या पैठणी विणकरानी! इंद्रधनुष्यी रंगांचे मऊ-मुलायम रेशमी पोत व सुवर्णतंतूंनी गुंफलेले हे रमणीय काव्य म्हणजेच मराठी सौभाग्याचं लेणं ‘‘पैठणी’’!!

पैठणीचे रंग आणि नक्षी वैशिष्टपूर्ण असते. पैठणी मुख्यता दोन रंगात असते. एक साडीचा मूळ रंग व दुसरा कठावरचा रंग. काही साडया 'कॅलिडोस्कोपिक' असतात. म्हणजे त्या साडीची वीण दोन रंगातली असते व आपल्याला कधी एक तर कधी दुसरा असे झटकन बदलणारे रंग दिसतात. पैठणी विणण्याकरता काही ठरलेले रंग आहेत. पैठणीत वापरण्यात येणारे रंग असे - पोफळी (ऑकर), लाल (रेड), फिक्कट जांभळा (लॅवेंडर), जांभळा (वायोलेट), निळा (ब्लू), किरमिजी तांबडा (मॅजेंटा), मोतीया (पर्ल पिन्क), वांगी (ब्रिन्जॉल), मोरपंखी (पिकॉक ब्लू). पूर्वी हे सर्व रंग नैसर्गिक असायचे. वेगवेगळ्या भाज्या, फळे, फुले यांच्यापासून ते तयार होत. कॅलिडोस्कोपिक रंग असे वापरले जातात - कुसूंबी (लाल/जांभळा) , लाल/हिरवा, काळा/पांढरा, लाल/काळा, पिवळा/हिरवा. पैठणी साडीवरची नक्षी देखील वैशिष्टपूर्ण आहे. अजिंठा लेण्यांच्या प्रभावामुळे पैठण कारागीरांवर बौध्द धर्माचा प्रभाव अधिक होता. हा प्रभाव त्यांच्या नक्षीकामातही जाणवतो जसे कमळाचे फूल, हंस, फूलांची वेलबुटटी, नारळी, मोर, राघू-मैना इत्यादीचा वापर अत्यंत आकर्षकपणे केला जातो.

पूर्वी राजाश्रय .... आता लोकाश्रय!

पैठणी ही साडी जगभरात 'रेशीम आणि जरीत विणलेली कविता' म्हणून प्रसिद्ध आहे. आकर्षक, गडद रंग, नाजूक रेशीम, (मागणीनुसार अस्सल सोन्याच्या तारांचा) जरीचा काठ पैठणीला साडयांमध्ये सर्वात वरचे स्थान मिळवून देते. एक साडी पूर्ण करायला एक महिना ते एक वर्ष लागतो. आता जरी आधुनिक यंत्र उपलब्ध असली तरी उत्कृष्ट पैठणी ही फक्त हातानेच विणता येते असे विणकरांचे ठाम मत आहे. आधी पैठणीसाठी लागणारे रेशीम चीनहून आयात केले जायचे. मात्र अलिकडे बंगलोर मधून रेशीम मागवतात.
पैठणी हा हस्तकलेचा नितांत सुंदर नमुना आहे. या महावस्त्राला प्राचीन वारसा आहे. पुरातन परंपरा आहे. दोन हजार वर्षांचा संपन्न इतिहास आहे. शेकडो परकीय आक्रमणे पचवूनसुद्धा हे सांस्कृतिक वैभव टिकून आहे. एकेकाळी राजाश्रय होता म्हणून भरभराट होत गेली. शेकडो वर्षांच्या उलथापालथीत आता पैठणी वस्त्राला लोकाश्रयाने तारले आहे. पूर्वी श्रीमंतांचा शौक म्हणून ऐट मिरवणारी पैठणी साडी १५-२० वर्षांत सामान्यांची स्वप्नपूर्ती करणारी ठरते आहे. पैशाचे मूल्यांकन घटल्यामुळे हे झाले असावे. राजधानीचा दर्जा लाभल्यानंतर पैठणचा परिसर पैठणी साड्यांची बाजारपेठ बनला होता. जगभर या महावस्त्राला मागणी होती.  हा वस्त्रव्यापार या राजधानीचा आर्थिक कणा बनला होता. साडीनिर्मितीसाठी लागणार्‍या साहित्याच्या स्वतंत्र बाजारपेठाच पैठणला निर्माण झाल्या होत्या. हजारोंच्या संख्येने असलेले विणकर आता हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आहेत. पैठणी साहित्य मिळत नसले तरी बाजारपेठांची ‘ती’ नावे मात्र कायम आहेत. ‘पावटा गल्ली’ (चांदीच्या तारांना दावा देणारे साहित्य) ‘जरगल्ली’ ‘तारगल्ली’ व ‘रंगारगल्ली’ अशी गल्ल्यांची नावे आहेत.
महाराष्ट्रीय संस्कृतीत पैठणी वस्त्राला नितांत महत्त्व आहे. मराठी माणूस पैठणीला मंगलतेचे प्रतीक मानतो. तथापि, मधल्या काळात पैठणी साडी निर्मितीची साधना खंडित होण्याची भीती निर्माण झाली होती. नायलॉन, शिफॉन व अन्य धाग्यांचे आकर्षण तसेच नवीन पिढीतील पैठणीबाबतची अनास्था यामुळे महावस्त्राची निर्मिती थंडावली होती. निष्णात कारागिरांनी आपल्या पुढच्या पिढ्यांना अन्य नोकरी धंद्यात पाठवले. प्रचंड कष्टाच्या या व्यवसायातून अनेक विणकर बाहेर पडले. मात्र संस्कृती जपण्यासाठी अनेक संवेदनशील विणकर कुटुंबांनी हा वारसा पुढच्या पिढ्यांना सोपवला. कारण हा ठेवा जपणे त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य मानले होते. आज १५ विणकर कुटुंबांतील १०० पेक्षा अधिक कारागीर महावस्त्राचा धागा-धागा जुळवताना दिसतो आहे. रेशमी पोत व भरजरी काठ या दोन वैशिष्ट्यांनी खुलणारे हे सौंदर्य तयार करताना ‘यांत्रिक’ साधन वापरले जात नाही. सर्व काम हातमागावर होते. तंतू-तंतू मोजून त्यावर हुकूम पैठणी विणली जाते.

 
वेली, फुले, फळे, मोर, पोपट, पक्षी यांची चित्रे काठावर असतात. नक्षी पारंपरिक आकाराची, तर रंग अस्सल नैसर्गिक असतात. लाखो रुपये किमतीची पैठणी बनवताना शुद्ध सोन्याची जर, चांदीच्या तारा वापरल्या जातात. लोकाभिरूची व आर्थिक क्षमता पाहता रेशमी धाग्यांचा वापर केलेली नक्षीदार पैठणी हौस भागवणारी ठरते हे मात्र खरे, नारळी, पंखा, रुईफुली, कळस पाकळी हे नक्षीचे परंपरागत प्रकार आहेत. पैठणीच्या पदरांना असावली, बांगडी, मोर, आकृती व गझवेल यांसारखी अर्थपूर्ण नावे असत. या पदरांवर रंगीत उंची रेशमी धाग्यांनी जी वेलबुटी काढलेली असे तिला मीनाकारी म्हणत. आकृती व असावली हा सर्वात प्राचीन नक्षीप्रकार मानला जातो. असावली या वैशिष्ट्यपूर्ण पदरावर प्रमुख्याने रुईच्या फुलाची नक्षी असे आणि काठ नारळी आकृतिबंधाचे असून, त्यावर 5 ते 18 नारळांच्या प्रतिमा विणलेल्या असत. हिरवा, पिवळा, लाल आणि करडकुसुंबी हे पैठणीचे खास रंग असून, ते करडीच्या मुळांपासून तयार करीत. या रंगांना सुवासही असे. या रंगांखेरीज अंजिरी, सोनकुसुंबी व दुधी इत्यादी रंगांचाही वापर करण्यात येई. पैठणी सुमारे 100 वर्षे टिकत असून ती तयार करण्यासाठी 21 दिवस लागत. त्यापैकी केवळ पदराच्या विणकामासाठी सात दिवस खर्ची पडत.

पैठणीचे दोन प्रकार आहेत. 'डॉबी किनार' आणि 'टिश्यू किनार' असलेली. 'डॉबी किनार' असलेल्या पैठण्यांमध्ये नारळी काठ आणि खवली किनार असे दोन प्रकार असतात. डॉबी किनार असलेल्या पैठण्या बनवण्यास तुलनेने सोप्या असतात. एकदा हातमागावर डिझाइन सेट करून ठेवल्यावर वर्षानुवर्षं त्या डिझाइनमध्ये साड्या बनवता येतात.  जुनी पैठणी जुनी पैठणी 16 हात लांब व चार हात रुंद असून, तिच्या काठपदरावर वेलबुटी किंवा पशू-पक्ष्यांच्या प्रतिमा असत व तिचे वजन साडेतीन शेरापर्यंत (सुमारे तीन किलो 300 ग्रॅम) असे. एका पैठणीसाठी साधारणतः 22 तोळे (सुमारे 256.604 ग्रॅ.) चांदीबरोबर सहा (सुमारे 5.8 ग्रॅ.), आठ (सुमारे 7.8 ग्रॅ.), 12 (सुमारे 11.6 ग्रॅ), व क्वचित 18 मासे (सुमारे 17.4 ग्रॅ.) सोने वापरण्यात येई. बारमासी, चौदामासी, एकवीसमासी यांसारख्या नावांनी पैठणीचा प्रकार, दर्जा व किंमत ठरविण्यात येई. 130 नंबरचे रेशीम वापरलेल्या छत्तीसमासी पैठण्या राजघराण्यात गेल्याची नोंद जुन्या कागदपत्रांत आढळते. 

पैठणच्या सातवाहन राजांचा या कलेला आश्रय होता. मोगल राजवटीत पैठणीचे रूप बदलले होते. अनेक प्रकारची फुले, पक्षी व वृक्षांच्या चित्रकृती गुंफल्या जात होत्या. यादव काळात पैठणी सुवर्ण कमळाने नटलेली असे, तर सम्राट शालिवाहनांच्या सत्ताकाळात पैठणीवर बगळे व हंस यांची चित्रे विणली जात होती.

पैठणीची किंमत तीन हजारांपासून तीन लाखांपेक्षा अधिक असू शकते. जास्त किमतीच्या पैठण्यांमध्ये अस्सल रेशमाचा वापर केला जातो. पैठणीच्या काठावर ९९ टच सिल्व्हर जर वापरली जाते. या जरीवर २४ कॅरेट सोन्याचं पॉलिश केलेलं असतं. प्युअर पैठणीच्या काठासाठी अडीच ते नऊ ग्रॅम सोनं लागतं. तर कमी किमतीच्या पैठणीमध्ये टेस्टेड जरीवर सोनेरी रंगाचं केमिकल पॉलिश केलं जातं. पैठणी मलबारी सिल्कमध्ये बनवली जाते. मलबारी सिल्क जास्त काळ टिकतं. याशिवाय टू प्लाय, थ्री प्लाय, फोर प्लाय रेशमाचाही वापर केला जातो. थ्री प्लायचा वापर सर्रास केला जातो. टू प्लाय रेशीम खास बनवून घ्यावी लागते. मलबारी सिल्कमध्ये हातमागावर विणलेल्या खास पैठण्यांचं कलेक्शन आमच्याकडे आहे. यामध्ये ब्रोकेड बॉर्डर, साखळी-बांगडी मोर, आसावली वेल, अक्रोडी वेल, अनार वेल, मुनियाँ पट्टा अशा विविध बॉर्डर असतात. पैठणीत अंगभर येणाऱ्या बुट्टीतही जकाड बुट्टी आणि हॅण्ड-वुवन बुट्टी असे दोन प्रकार आहेत. आमच्याकडच्या पैठणींमध्ये सिंगल, डबल आणि ट्रिपल पदर पाहायला मिळतात. यामध्ये ट्रिपल पल्लूची किंमत जास्त असल्यामुळे ती फक्त ऑर्डरप्रमाणेच बनवली जाते.

 पैठणीला स्वतचं असं एक ग्लॅमर आहे. पाश्चात्य पेहराव घालणाऱ्या मुलींनाही पैठणीची क्रेझ असते. डिझायनर साडय़ांचं कितीही कौतुक केलं तरी ठेवणीतल्या साडय़ांमध्ये एक तरी पैठणी मराठमोळ्या स्त्रीला हवीहवीशी वाटतेच. अशा या जरतारी पारंपरिक पैठणीचं पारंपरिक रूप कायम ठेवत त्यात ‘व्हॅल्यू अ‍ॅडिशन’ केलं तर भल्या भल्या डिझायनर साडय़ांची कशी छुट्टी होऊ शकते. कपाटं साड्यांनी भरलेली असली तरी पैठणीशिवाय त्याला पूर्णता नाही असे आजच्या स्त्रियांनाही वाटतं. प्रत्येक स्त्रीच्या मनात पैठणी घर करून बसलेली असायची. आयुष्यात एकदा तरी पैठणी नेसायला मिळावी यात स्त्रीला धन्यता वाटायची.

पैठणीशी स्त्रीचं जवळचं नातं... आत्ताच्या काळातही या साडीचं महत्त्व कायम आहे.  एकेकाळी स्त्रियांसाठी स्वप्नवत असलेली पैठणी घराघरात नेसली जाऊ लागली आहे. नऊवारी पैठणीचं आकर्षणही तितकंच आहे. लग्नासाठी खास नऊवारी पैठणी घेणाऱ्या वधंूची संख्याही आता वाढू लागली आहे. कपाटात आणि मनात जपलेली पैठणी आता बाजारातही दिमाखाने आपला तोरा मिरवते आहे. महाराष्ट्राची ओळख असलेल्या या महावस्त्राचं माकेर्टिंग उत्तम होऊ लागलंय त्यामुळे पैठणीला सोन्याचे दिवस आले आहेत. बक्षीस म्हणून पैठणी साडी मिळणार असली की त्या स्पर्धांना, कार्यक्रमांना महिलांचा किती भरगोस प्रतिसाद मिळतो हे वेगळे सांगायला नको. आता अमराठी महिलांमध्येही पैठणी पोहोचली आहे, तशीच ती विदेशातही पोहोचली आहे. 'पैठणी डे' साजरे होऊ लागले आहेत. पैठणीत वापरण्यात येणारी जर आणि सोन्याचे धाग्यांच्या प्रमाणात त्यांची किंमत वाढते. आता तर पैठणीच्या साड्यांबरोबरच कुतेर्, जॅकेट्स, परकर-पोलके एवढेच नव्हे तर पैठणीचे टाय सुद्धा मिळू लागले आहेत. मनामनात वसलेली पैठणी घराघरात आजीपासून नातीपर्यंत वेगवेगळ्या रुपात सजलेली दिसते. महाराष्ट्राचं हे महावस्त्र विणणाऱ्या आणि तिच्यात सौंदर्य ओतणाऱ्या त्या विणकराच्या हातांना सलाम. त्यांच्यामुळे हे महावस्त्र जगाच्या पाठीवर महाराष्ट्राचा झेंडा फडकवित आहे.



पुरुषाचा जन्म कित्ती छान!!



महिलांनो, विचार करा पुरुषाचा जन्म किती सुखाचा! 
तुम्ही पुरुष असलात तर...

१. तुमचं आडनाव बदलत नाही.
२. तुम्हाला गरोदर राहायची भीती नाही.
३. वॉटर पार्कमध्ये व्हाइट टी शर्ट घालून बागडू शकता.
४. वॉटर पार्कमध्ये टी शर्ट न घालताही बागडू शकता.
५. बाइक/कारचे मेकॅनिक तुमच्याशी खरं बोलतात.
६. स्क्रू कोणत्या बाजूला पिळायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत नाही.
७. बाईएवढेच काम करून तुम्हाला जास्त पगार मिळतो.
८. गालावरच्या सुरकुत्या तुम्हाला आदर मिळवून देतात.
९. लोक तुमच्याशी बोलताना तुमच्या चेह-याकडेच पाहतात.
१०. तुमचा एक मूड बराच काळ टिकतो.
११..तुमचा एक फोन अर्ध्या मिनिटाच्या वर चालत नाही.
१२..पाच दिवसांच्या सुटीसाठी बाहेर जाताना फक्त एका सुटकेसमध्ये सामान मावतं.
१३ .तुम्ही फडताळातून डबे स्वत:चे स्वत: काढू शकता.
१४ .कोणत्याही डब्याचं झाकण स्वत: उघडू शकता.
१५..पादत्राणांचे दोन जोड पुरतात.
१६ .बिनधास्त शॉर्ट वापरू शकता.
१७ .तुम्ही पाच जणांच्या कुटुंबासाठीची संपूर्ण कपडेखरेदी केवळ पाच मिनिटांत उरकू शकता.
१८ . तुमचं पोट सुटलं तर कोणी काही बोलत नाही.

आंतरजालावरून साभार