Monday, 2 April 2012

पैठणी - मराठमोळ्या सौंदर्याचा मोरपिशी पदर




राजाची राणी होशील, पैठणी नेसून येशील !!!


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत भरजरी पैठणी साडीला मानाचे स्थान आहे. या महावस्त्राची निर्मिती पैठणला होते. एकेकाळी दक्षिण हिंदुस्थानची राजधानी असलेल्या या प्रतिष्ठाननगरीचा ‘वस्त्र व्यापार’ सातासमुद्रापार गेला होता.... पैठणी बनवण्याची कला साधारण २००० वर्ष जुनी आहे. पैठणीचे मूळ गाव म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले मराठवाडयातले 'प्रतिष्ठान' म्हणजेच आताचे पैठण. प्राचीन काळात पैठण रेशीम व जरीच्या व्यापाराचे महत्त्वाचे ठिकाण होते. त्यावेळी रोमन देशाच्या राजाला कापसाचे सूत व रेशीम धागा निर्यात केला जायचा. १८व्या शतकात पेशव्यांचे राज्य होते. पेशव्यांनी पैठणींच्या उत्पादनाला प्रोत्साहन आणि चालना दिली. माधवराव पेशवे यांनी येवल्यात करागीरांना पैठणी विणायला सुरूवात करुन दिली. म्हणून पेशवे इतिहासात येवला हे पैठण इतकेच प्रसिद्ध झाले. 

 असे मानले जाते की हैदराबादचा निजामही या पैठणीवर फिदा होता व त्या निमित्ताने त्याने पैठणला प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्याची स्नूषा निलोफर हिनेही पैठणीच्या काठ व पदरावरचे नक्षीकाम सुचवले होते. मात्र इंग्रजांच्या राज्यात बाकी स्थानिक कलांसारखीच पैठणी तयार करण्याची कलाही कमी होत गेली. पैठणीचे उत्पादन स्वातंत्रपूर्व कालापर्यंत राजाश्रयाने चालत आले. राजाश्रय संपल्यानंतर याचे खास कारागीरांना रोजगार नाहीसा झाल्याने तेथून ते विस्कळीत झाले व जुन्या विणकामामध्ये काम मिळेल तेथे समावेश होत गेले. बनारसी पद्धतीचा शालू, साडी व फेटे करू लागले. त्यातील काही कसबी कामगार किंवा कारागीर निजामशाहीच्या हद्दीबाहेरचे गाव येवला येथे येऊन स्थायिक झाले.

 कालप्रवाहात राजे-राजवाडे गेले. वेदांती-पंडितांची परंपरा खंडित झाली. हिरे माणकांची व्यापारपेठ नामशेष झाली. वैभव लयाला गेले. धार्मिक न्यायनिवाडे करणारे धर्ममार्तंड कालौघात गडप झाले. प्रतिष्ठानचे पैठण झाले. मात्र गतसमृद्ध भूतकाळाची स्मृती जागवणारा एक दुवा आजही कायम आहे. हा दुवा जपला आहे हात मागावर कष्ट करणार्‍या पैठणी विणकरानी! इंद्रधनुष्यी रंगांचे मऊ-मुलायम रेशमी पोत व सुवर्णतंतूंनी गुंफलेले हे रमणीय काव्य म्हणजेच मराठी सौभाग्याचं लेणं ‘‘पैठणी’’!!

पैठणीचे रंग आणि नक्षी वैशिष्टपूर्ण असते. पैठणी मुख्यता दोन रंगात असते. एक साडीचा मूळ रंग व दुसरा कठावरचा रंग. काही साडया 'कॅलिडोस्कोपिक' असतात. म्हणजे त्या साडीची वीण दोन रंगातली असते व आपल्याला कधी एक तर कधी दुसरा असे झटकन बदलणारे रंग दिसतात. पैठणी विणण्याकरता काही ठरलेले रंग आहेत. पैठणीत वापरण्यात येणारे रंग असे - पोफळी (ऑकर), लाल (रेड), फिक्कट जांभळा (लॅवेंडर), जांभळा (वायोलेट), निळा (ब्लू), किरमिजी तांबडा (मॅजेंटा), मोतीया (पर्ल पिन्क), वांगी (ब्रिन्जॉल), मोरपंखी (पिकॉक ब्लू). पूर्वी हे सर्व रंग नैसर्गिक असायचे. वेगवेगळ्या भाज्या, फळे, फुले यांच्यापासून ते तयार होत. कॅलिडोस्कोपिक रंग असे वापरले जातात - कुसूंबी (लाल/जांभळा) , लाल/हिरवा, काळा/पांढरा, लाल/काळा, पिवळा/हिरवा. पैठणी साडीवरची नक्षी देखील वैशिष्टपूर्ण आहे. अजिंठा लेण्यांच्या प्रभावामुळे पैठण कारागीरांवर बौध्द धर्माचा प्रभाव अधिक होता. हा प्रभाव त्यांच्या नक्षीकामातही जाणवतो जसे कमळाचे फूल, हंस, फूलांची वेलबुटटी, नारळी, मोर, राघू-मैना इत्यादीचा वापर अत्यंत आकर्षकपणे केला जातो.

पूर्वी राजाश्रय .... आता लोकाश्रय!

पैठणी ही साडी जगभरात 'रेशीम आणि जरीत विणलेली कविता' म्हणून प्रसिद्ध आहे. आकर्षक, गडद रंग, नाजूक रेशीम, (मागणीनुसार अस्सल सोन्याच्या तारांचा) जरीचा काठ पैठणीला साडयांमध्ये सर्वात वरचे स्थान मिळवून देते. एक साडी पूर्ण करायला एक महिना ते एक वर्ष लागतो. आता जरी आधुनिक यंत्र उपलब्ध असली तरी उत्कृष्ट पैठणी ही फक्त हातानेच विणता येते असे विणकरांचे ठाम मत आहे. आधी पैठणीसाठी लागणारे रेशीम चीनहून आयात केले जायचे. मात्र अलिकडे बंगलोर मधून रेशीम मागवतात.
पैठणी हा हस्तकलेचा नितांत सुंदर नमुना आहे. या महावस्त्राला प्राचीन वारसा आहे. पुरातन परंपरा आहे. दोन हजार वर्षांचा संपन्न इतिहास आहे. शेकडो परकीय आक्रमणे पचवूनसुद्धा हे सांस्कृतिक वैभव टिकून आहे. एकेकाळी राजाश्रय होता म्हणून भरभराट होत गेली. शेकडो वर्षांच्या उलथापालथीत आता पैठणी वस्त्राला लोकाश्रयाने तारले आहे. पूर्वी श्रीमंतांचा शौक म्हणून ऐट मिरवणारी पैठणी साडी १५-२० वर्षांत सामान्यांची स्वप्नपूर्ती करणारी ठरते आहे. पैशाचे मूल्यांकन घटल्यामुळे हे झाले असावे. राजधानीचा दर्जा लाभल्यानंतर पैठणचा परिसर पैठणी साड्यांची बाजारपेठ बनला होता. जगभर या महावस्त्राला मागणी होती.  हा वस्त्रव्यापार या राजधानीचा आर्थिक कणा बनला होता. साडीनिर्मितीसाठी लागणार्‍या साहित्याच्या स्वतंत्र बाजारपेठाच पैठणला निर्माण झाल्या होत्या. हजारोंच्या संख्येने असलेले विणकर आता हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आहेत. पैठणी साहित्य मिळत नसले तरी बाजारपेठांची ‘ती’ नावे मात्र कायम आहेत. ‘पावटा गल्ली’ (चांदीच्या तारांना दावा देणारे साहित्य) ‘जरगल्ली’ ‘तारगल्ली’ व ‘रंगारगल्ली’ अशी गल्ल्यांची नावे आहेत.
महाराष्ट्रीय संस्कृतीत पैठणी वस्त्राला नितांत महत्त्व आहे. मराठी माणूस पैठणीला मंगलतेचे प्रतीक मानतो. तथापि, मधल्या काळात पैठणी साडी निर्मितीची साधना खंडित होण्याची भीती निर्माण झाली होती. नायलॉन, शिफॉन व अन्य धाग्यांचे आकर्षण तसेच नवीन पिढीतील पैठणीबाबतची अनास्था यामुळे महावस्त्राची निर्मिती थंडावली होती. निष्णात कारागिरांनी आपल्या पुढच्या पिढ्यांना अन्य नोकरी धंद्यात पाठवले. प्रचंड कष्टाच्या या व्यवसायातून अनेक विणकर बाहेर पडले. मात्र संस्कृती जपण्यासाठी अनेक संवेदनशील विणकर कुटुंबांनी हा वारसा पुढच्या पिढ्यांना सोपवला. कारण हा ठेवा जपणे त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य मानले होते. आज १५ विणकर कुटुंबांतील १०० पेक्षा अधिक कारागीर महावस्त्राचा धागा-धागा जुळवताना दिसतो आहे. रेशमी पोत व भरजरी काठ या दोन वैशिष्ट्यांनी खुलणारे हे सौंदर्य तयार करताना ‘यांत्रिक’ साधन वापरले जात नाही. सर्व काम हातमागावर होते. तंतू-तंतू मोजून त्यावर हुकूम पैठणी विणली जाते.

 
वेली, फुले, फळे, मोर, पोपट, पक्षी यांची चित्रे काठावर असतात. नक्षी पारंपरिक आकाराची, तर रंग अस्सल नैसर्गिक असतात. लाखो रुपये किमतीची पैठणी बनवताना शुद्ध सोन्याची जर, चांदीच्या तारा वापरल्या जातात. लोकाभिरूची व आर्थिक क्षमता पाहता रेशमी धाग्यांचा वापर केलेली नक्षीदार पैठणी हौस भागवणारी ठरते हे मात्र खरे, नारळी, पंखा, रुईफुली, कळस पाकळी हे नक्षीचे परंपरागत प्रकार आहेत. पैठणीच्या पदरांना असावली, बांगडी, मोर, आकृती व गझवेल यांसारखी अर्थपूर्ण नावे असत. या पदरांवर रंगीत उंची रेशमी धाग्यांनी जी वेलबुटी काढलेली असे तिला मीनाकारी म्हणत. आकृती व असावली हा सर्वात प्राचीन नक्षीप्रकार मानला जातो. असावली या वैशिष्ट्यपूर्ण पदरावर प्रमुख्याने रुईच्या फुलाची नक्षी असे आणि काठ नारळी आकृतिबंधाचे असून, त्यावर 5 ते 18 नारळांच्या प्रतिमा विणलेल्या असत. हिरवा, पिवळा, लाल आणि करडकुसुंबी हे पैठणीचे खास रंग असून, ते करडीच्या मुळांपासून तयार करीत. या रंगांना सुवासही असे. या रंगांखेरीज अंजिरी, सोनकुसुंबी व दुधी इत्यादी रंगांचाही वापर करण्यात येई. पैठणी सुमारे 100 वर्षे टिकत असून ती तयार करण्यासाठी 21 दिवस लागत. त्यापैकी केवळ पदराच्या विणकामासाठी सात दिवस खर्ची पडत.

पैठणीचे दोन प्रकार आहेत. 'डॉबी किनार' आणि 'टिश्यू किनार' असलेली. 'डॉबी किनार' असलेल्या पैठण्यांमध्ये नारळी काठ आणि खवली किनार असे दोन प्रकार असतात. डॉबी किनार असलेल्या पैठण्या बनवण्यास तुलनेने सोप्या असतात. एकदा हातमागावर डिझाइन सेट करून ठेवल्यावर वर्षानुवर्षं त्या डिझाइनमध्ये साड्या बनवता येतात.  जुनी पैठणी जुनी पैठणी 16 हात लांब व चार हात रुंद असून, तिच्या काठपदरावर वेलबुटी किंवा पशू-पक्ष्यांच्या प्रतिमा असत व तिचे वजन साडेतीन शेरापर्यंत (सुमारे तीन किलो 300 ग्रॅम) असे. एका पैठणीसाठी साधारणतः 22 तोळे (सुमारे 256.604 ग्रॅ.) चांदीबरोबर सहा (सुमारे 5.8 ग्रॅ.), आठ (सुमारे 7.8 ग्रॅ.), 12 (सुमारे 11.6 ग्रॅ), व क्वचित 18 मासे (सुमारे 17.4 ग्रॅ.) सोने वापरण्यात येई. बारमासी, चौदामासी, एकवीसमासी यांसारख्या नावांनी पैठणीचा प्रकार, दर्जा व किंमत ठरविण्यात येई. 130 नंबरचे रेशीम वापरलेल्या छत्तीसमासी पैठण्या राजघराण्यात गेल्याची नोंद जुन्या कागदपत्रांत आढळते. 

पैठणच्या सातवाहन राजांचा या कलेला आश्रय होता. मोगल राजवटीत पैठणीचे रूप बदलले होते. अनेक प्रकारची फुले, पक्षी व वृक्षांच्या चित्रकृती गुंफल्या जात होत्या. यादव काळात पैठणी सुवर्ण कमळाने नटलेली असे, तर सम्राट शालिवाहनांच्या सत्ताकाळात पैठणीवर बगळे व हंस यांची चित्रे विणली जात होती.

पैठणीची किंमत तीन हजारांपासून तीन लाखांपेक्षा अधिक असू शकते. जास्त किमतीच्या पैठण्यांमध्ये अस्सल रेशमाचा वापर केला जातो. पैठणीच्या काठावर ९९ टच सिल्व्हर जर वापरली जाते. या जरीवर २४ कॅरेट सोन्याचं पॉलिश केलेलं असतं. प्युअर पैठणीच्या काठासाठी अडीच ते नऊ ग्रॅम सोनं लागतं. तर कमी किमतीच्या पैठणीमध्ये टेस्टेड जरीवर सोनेरी रंगाचं केमिकल पॉलिश केलं जातं. पैठणी मलबारी सिल्कमध्ये बनवली जाते. मलबारी सिल्क जास्त काळ टिकतं. याशिवाय टू प्लाय, थ्री प्लाय, फोर प्लाय रेशमाचाही वापर केला जातो. थ्री प्लायचा वापर सर्रास केला जातो. टू प्लाय रेशीम खास बनवून घ्यावी लागते. मलबारी सिल्कमध्ये हातमागावर विणलेल्या खास पैठण्यांचं कलेक्शन आमच्याकडे आहे. यामध्ये ब्रोकेड बॉर्डर, साखळी-बांगडी मोर, आसावली वेल, अक्रोडी वेल, अनार वेल, मुनियाँ पट्टा अशा विविध बॉर्डर असतात. पैठणीत अंगभर येणाऱ्या बुट्टीतही जकाड बुट्टी आणि हॅण्ड-वुवन बुट्टी असे दोन प्रकार आहेत. आमच्याकडच्या पैठणींमध्ये सिंगल, डबल आणि ट्रिपल पदर पाहायला मिळतात. यामध्ये ट्रिपल पल्लूची किंमत जास्त असल्यामुळे ती फक्त ऑर्डरप्रमाणेच बनवली जाते.

 पैठणीला स्वतचं असं एक ग्लॅमर आहे. पाश्चात्य पेहराव घालणाऱ्या मुलींनाही पैठणीची क्रेझ असते. डिझायनर साडय़ांचं कितीही कौतुक केलं तरी ठेवणीतल्या साडय़ांमध्ये एक तरी पैठणी मराठमोळ्या स्त्रीला हवीहवीशी वाटतेच. अशा या जरतारी पारंपरिक पैठणीचं पारंपरिक रूप कायम ठेवत त्यात ‘व्हॅल्यू अ‍ॅडिशन’ केलं तर भल्या भल्या डिझायनर साडय़ांची कशी छुट्टी होऊ शकते. कपाटं साड्यांनी भरलेली असली तरी पैठणीशिवाय त्याला पूर्णता नाही असे आजच्या स्त्रियांनाही वाटतं. प्रत्येक स्त्रीच्या मनात पैठणी घर करून बसलेली असायची. आयुष्यात एकदा तरी पैठणी नेसायला मिळावी यात स्त्रीला धन्यता वाटायची.

पैठणीशी स्त्रीचं जवळचं नातं... आत्ताच्या काळातही या साडीचं महत्त्व कायम आहे.  एकेकाळी स्त्रियांसाठी स्वप्नवत असलेली पैठणी घराघरात नेसली जाऊ लागली आहे. नऊवारी पैठणीचं आकर्षणही तितकंच आहे. लग्नासाठी खास नऊवारी पैठणी घेणाऱ्या वधंूची संख्याही आता वाढू लागली आहे. कपाटात आणि मनात जपलेली पैठणी आता बाजारातही दिमाखाने आपला तोरा मिरवते आहे. महाराष्ट्राची ओळख असलेल्या या महावस्त्राचं माकेर्टिंग उत्तम होऊ लागलंय त्यामुळे पैठणीला सोन्याचे दिवस आले आहेत. बक्षीस म्हणून पैठणी साडी मिळणार असली की त्या स्पर्धांना, कार्यक्रमांना महिलांचा किती भरगोस प्रतिसाद मिळतो हे वेगळे सांगायला नको. आता अमराठी महिलांमध्येही पैठणी पोहोचली आहे, तशीच ती विदेशातही पोहोचली आहे. 'पैठणी डे' साजरे होऊ लागले आहेत. पैठणीत वापरण्यात येणारी जर आणि सोन्याचे धाग्यांच्या प्रमाणात त्यांची किंमत वाढते. आता तर पैठणीच्या साड्यांबरोबरच कुतेर्, जॅकेट्स, परकर-पोलके एवढेच नव्हे तर पैठणीचे टाय सुद्धा मिळू लागले आहेत. मनामनात वसलेली पैठणी घराघरात आजीपासून नातीपर्यंत वेगवेगळ्या रुपात सजलेली दिसते. महाराष्ट्राचं हे महावस्त्र विणणाऱ्या आणि तिच्यात सौंदर्य ओतणाऱ्या त्या विणकराच्या हातांना सलाम. त्यांच्यामुळे हे महावस्त्र जगाच्या पाठीवर महाराष्ट्राचा झेंडा फडकवित आहे.



No comments:

Post a Comment