Thursday, 19 April 2012

तिशी ओलांडल्यानंतर




तिशी ओलांडल्यानंतर स्त्री-पुरुषांना निसर्ग फारशी मदत करत नाही. त्वचेमध्ये निर्माण होणारे नैसर्गिक तेल व बाष्प या दोन्हींचे प्रमाण उतरत्या क्रमात असते. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसणे, त्यावर सुरकुत्या पडणे वगैरे वार्धक्याची लक्षणे या काळात दिसू लागतात. रोज नियमितपणे किंवा आठवड्यातून निदान तीन वेळा तरी चेहºयाला पोषक द्रव्यांचा मसाज आवश्यक आहे. शरीराला व चेह-याला मसाज (मर्दन) करणे ही एक अतिप्राचीन कला आहे. त्वचेच्या थराखाली असलेल्या स्नायूंना चिवटपणा व लवचीकपणा यावा, त्यांची शिथिलता कमी व्हावी हा मसाजचा मुख्य हेतू आहे. स्नायूंच्या बळकटीबरोबरच त्यांना जोडलेल्या त्वचेचे सौंदर्यही मसाजमुळे वाढते.

चेह-याच्या त्वचेला मसाज करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी. जितकी त्वचा शुष्क होईल तितकी आतल्या पेशींची शुष्कता वाढते, त्यांची रचना बदलते. परिणामी चेहºयावर बारीक सुरकुत्या पडतात. त्या जर कमी करायच्या असतील तर त्वचा स्निग्ध व आर्द्र ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्वचेवर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक दबाव आणणे किंवा चुकीचा मसाज करणे चेह-याच्या नाजूक त्वचेला हानिकारक ठरेल.

मसाज सुरू करताना प्रथम मानेच्या तळापासून हाडापर्यंत (कॉलरबोन) तो सुरू करावा. तसेच मानेच्या दोन्ही बाजूंना कानाखाली जो स्नायू असतो - ज्याला मस्टरॉइड असे म्हणतात - त्या स्नायूपासून सुरू करावा. मसाज करताना हाताची फक्त बोटेच वापरतात. प्रत्येक बोटाला एक ठरावीक प्रकारचा दाब (प्रेशर) असतो. त्यामुळे मानेपासून वर प्रत्येक भागावर फक्त ठरावीक बोटांचाच वापर करावा, मान आणि कपाळ यांवर विशेष दाब किंवा दबाव दिल्यास हरकत नाही; पण डोळ्यांना मात्र अगदी हलक्या बोटाने मसाज करणे आवश्यक आहे.

मान : दोन्ही हातांची पहिली चारही बोटे मसाज करण्यासाठी आवश्यक आहेत. वर दाखवल्याप्रमाणे मानेच्या तळापासून प्रत्येक रेषेवर एका हातामागून दुसरा असे स्ट्रोक्स देऊन तीन-चार वेळा मसाज करावा. मानेच्या एका कडेपासून तो दुसºया कडेपर्यंत मसाज झाल्यानंतर पुन्हा हीच क्रिया तीन वेळा करावी. म्हणजे मानेवरील प्रत्येक रेषेवर नऊ वेळा मसाज होतो. मसाज अगदी शांतपणे, लयबद्ध असा असावा. नृत्यातील तालबद्धता मसाजमध्ये असावी. अशा प्रकारे केलेल्या मसाजमुळे अतिशय आराम मिळतो.

हनुवटी : १) हाताची फक्त तीन बोटे (पहिले बोट सोडून) या मसाजसाठी वापरावी. हनुवटीच्या मध्यावर दोन्ही हात घेऊन हनुवटीच्या खालच्या बाजूला दोन्ही कानांच्या दिशेला वर्तुळाकार मसाज करावा. हीच क्रिया तीन वेळ करावी. २) पहिल्या दोन बोटांत कात्रीसारखी हनुवटी पकडून मध्यापासून कानांपर्यंत मसाज करावा. एका हाताने एका कानापासून मसाज केल्यानंतर दुसºया हाताने तीच क्रिया करावी, म्हणजे एकूण तीन वेळा मसाज होईल.

ओठ : प्रत्यक्ष ओठांवर जरी मसाज करावयाचा नसला तरी त्यांच्या भोवतालच्या भागाला मसाजची आवश्यकता आहे. हा मसाज फक्त अंगठ्याने करावा. दोन्ही हाताच्या अंगठ्यांची टोके हनुवटीच्या वरच्या बाजूला ओठांच्या खाली दाबून धरावी आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे नाकाच्या खालच्या भागापर्यंत छोट्या वर्तुळाकार दिशेने मसाज करावा. ही क्रिया तीन वेळा करावी.

कपाळ : ओठांचा मसाज झाल्यावर हात कपाळावर न्यावेत आणि मानेप्रमाणेच चारही बोटांनी चांगला दाब देऊन कपाळावर वरच्या दिशेने मसाज करावा.

गाल : कपाळानंतर गालावरही मसाजसाठी फक्त मधली दोन बोटे वापरावीत व आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक रेषेवर मध्यापासून ते कानशिलापर्यंत असा मसाज करावा. प्रत्येक रेषेत नऊ वेळा मसाज झाला पाहिजे. एका हातानंतर दुसरा हात या क्रमाने लयबद्ध रीतीने तो केला पाहिजे.

डोळे : डोळ्यांना मसाज करताना फक्त अनामिकेच्या (करंगळीजवळच्या बोटाचा) उपयोग करावा. डोळ्यांखालची आणि वरची त्वचा अतिशय शुष्क असते. चेह-याच्या इतर भागांतील त्वचेच्या मानाने या विभागात तैलग्रंथी अतिशय कमी असतात. त्यामुळे वयोमानाने कमी प्रमाणात निर्माण होत जाणाºया तेलाचा दृश्य परिणाम असा होतो, की ही जागा काळी पडत जाते. मग आपण डोळ्याभोवती काळी वर्तुळे पडली असे म्हणतो. म्हणून डोळ्यांना मसाज करताना कोणत्याही शुद्ध तेलाचाच वापर करावा आणि डोळ्याच्या बाहेरच्या कोप-यापासून सुरुवात करून डोळ्याखालून सहा वर्तुळे आणि वरील भागावर तीन वर्तुळे असा मसाज करावा. ज्या वेळी डोळ्यांना अतिशय त्रास झालेला असेल किंवा डोळ्यांना थकवा आलेला असेल, त्या वेळी भुवईच्या आतल्या कोप-यावर अनामिकेने भुवई चिमटीत पकडल्याप्रमाणे दाब द्यावा.

पाठ : डोळ्यानंतर दोन्ही हातांनी जमेल तेवढ्या खालपर्यंत पाठीला मसाज करावा. उजव्या हाताने उजव्या खांद्यावर व पाठीवर वर्तुळाकार मसाज करावा. स्वत:च स्वत:च्या पाठीला मसाज करणे थोडे अवघड पडते; परंतु मान व चेहरा याचबरोबर पाठ व खांद्याच्या मागचा भाग यांवरही मसाज होणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांवर जमेल तितका मसाज करावा.




No comments:

Post a Comment