Friday, 17 August 2012

सुंदर आणि श्रीमंत !


अहमदाबाद मुंबई-गुजरात मेल. अहमदाबाद स्टेशनात मी धावतच गाडी गाठली. रात्रीचे पावणेदहा वाजून गेले होते आणि कामं आटोपून वेळेवर निघायचं म्हणून मला जेवणालाही फाटा द्यावा लागला होता. स्टेशनवरल्या स्टॉलवरून दोन सामोसे आणि अर्धा डझन केळी विकत घेऊन मी गाडीत चढलो आणि बर्थ गाठला.. समोरचा बर्थ पाहून एकदम फ्रेश झालो. तिशी-पस्तिशीचं एक नितांत सुंदर जोडपं समोर बसलं होतं. पुरुष हिंदी सिनेमातला नट शोभावा असा होता. निळी जीन्स, त्याला शोभेसा शुभ्र पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, पायात कोल्हापुरी वहाणा. ती पावलंही इतकी नितळ होती, की माझा रिझव्‍‌र्ह्ड बर्थ असूनही मला माझ्या पायातले बूट काढायची लाज वाटू लागली. बरोबर त्याची बायको असावी. त्याच्यापेक्षाही कांकणभर सरस, उंच, सडपातळ, केसाचा बॉब, खूप गहिरे काळेभोर डोळे, चिकणा तलम गुलामी पंजाबी ड्रेस.. एका सुंदर स्त्रीचं वर्णन करताना जे जे बोलता येईल ते सर्व तिच्याकडे होतं. इतकी देखणी स्त्री जवळ असलेला हा पुरुष या क्षणाला मला जगातला सर्वात श्रीमंत पुरुष वाटत होता. गाडी सुटली तशी माझी नजर वारंवार त्या दोघांकडे जाऊ लागली आणि लक्ष्मीनारायणाचा जोडा असाच असावा, हे मी मनोमन मान्य करून टाकलं.
मी लॅपटॉप काढला, उगाचच काहीतरी करायचं म्हणून बोटं फिरवू लागलो. मधूनच मी चोरट्या नरजरेनं दोघांकडे बघून घेत होतो. रात्र झाली आणि थोड्याच वेळात मला झोपावं लागणार आहे, याचंच मला वाईट वाटत होतं. त्यांना काहीतरी जाणवलं असावं. त्या नारायणानं बॅगेतून प्लॅस्टिकचा डबा काढला. त्यातून सँडविच काढून लक्ष्मीला दिलं. तिनं हातानंच ते नाकारलं. मला त्यांनी सँडविच खाण्याकरता विचारावं, अशी माझी अपेक्षा नव्हती; पण विचारलं असतं तर संवादाला सुरुवात करता आली असती. गाडीतले नऊ निरस तास बरे तरी गेले असते.
‘‘तू अजून रागावली आहेस काय?’’ नारायणने विचारलं. मी त्याचा आवाज प्रथमच ऐकला. प्रश्न मराठीतून आल्याने मला बरं वाटलं. तिचा आवाज आता ऐकायला मिळणार, या आशेनं मी कान टवकारले.
‘‘तुझ्या आईला अक्कल नाही रे अजिबात.’’ लक्ष्मीनं एकदम बॉम्ब टाकला. लॅपटॉपआड मी थरारलो. इतक्या सुस्वरूप स्त्रीकडून इतक्या कडवट शब्दांची मी अपेक्षाच केली नव्हती.
‘‘असं का म्हणतेस?’’ नारायणाचा स्वर अजिजीचा आलेला मला जाणवला.
‘‘आपल्या डॉक्टर सुनेला अशा सूचना देऊ नये, हे एवढं साधं कळत नाही त्यांना? मी काय झोपा काढतेय दवाखान्यात, गेली दहा वर्ष?’’
‘‘अगं, तू एवढय़ा वर्षानंतर प्रथमच प्रेग्नंट आहेस म्हणून काळजीपोटी बोलते ती?’’
‘‘तू आणखी बेअक्क्ल. ती मूर्ख बाई बोलते अन् तू तिची बाजू घेऊन मलाच समजावतोस?’’
‘‘माझ्या आईला माझ्यासमोर हे असे शब्द?’’
‘‘काय बोलू मग? व-हाडातल्या कुठल्या खेड्यातून आलेली बाई ही, चार बाळंतपणं घरी झाली हिची आणि ही मला, एका डॉक्टरला प्रेग्नन्सीत कसं वागावं हे शिकवते! स्टुपिड.’’
‘‘ऐकून घेत जा ग कधीतरी. फार चांगल्या मनानं सांगते ती आपल्याला.’’
‘‘का ऐकावं? तू सॉफ्टवेअर इंजिनियर, मी डॉक्टर. लाख रुपये कमवते मी महिन्याला. सीनियर डॉक्टरसुद्धा माझ्या पर्सनॅलिटीकडे बघून ‘मॅडम मॅडम’ म्हणत मागेपुढे गोंडा घोळतात माझ्या. आणि मी या फाटक्या बाईचं ऐकून घेऊ? नेव्हर.’’
‘‘जाऊ दे ग, जुने लोक आहेत, त्यांची निश्चित मतं असतात काही.’’
‘‘ए, मतं माझ्यावर लादलेली मी नाही खपवून घेणार हं आणि यांना इतकं कळतंय, तर तुझी बहीण का मेली बाळंपतणात?’’
‘‘मेली नको म्हणूस ग, गेली बिचारी. तिचं सासर थेट खेड्यात, वेळेवर डॉक्टरी मदत मिळाली असतील तर वाचली असती ताई.’’
‘‘म्हणजे, आईचा शहाणपणा आला का कामास? ती आई तशीच आणि तिची मुलगीही तशीच.’’
‘‘बरं तू म्हणतेस तसंच. पण तू काही खाल्लेलं नाहीये, आतातरी खाऊन घे काहीतरी.’’
‘नो वे. तुझ्या आईनं सांगितलंय ना, आता तर तोंड नाही हलवणार. मी माझ्याच टाइमटेबलने चालणार. तुला समजतंय ना?’’
नारायणरावांनी नंदीबैलासारखी मान हलवली. मला सहनच होईना. या एवढय़ा चाळीस-पंचेचाळीस मिनिटांच्या संवादांत, मनातल्या मनात मी कधी चकीत झालो, कधी संतापलो, कधी मला त्या क्षुद्र माणसाचा गळा दाबावासा वाटला, तर कधी चक्क त्या बाईला ‘या.. या नंदीबैलाला इंजिनियर बनवताना आणि इतर चौघांना आपल्या पायावर उभं करताना त्या माऊलीनं काय सोसलं असेल याची कल्पना आहे का?’ असं ओरडून विचारावंसं वाटलं. मला तिच्यासाठी लक्ष्मी हे नाव सहनच होईना. तासाभरापूर्वीची ती सुस्वरूप सुंदरी मला कुरूप दिसायला लागली आणि तो पुरुष जगातला सर्वात दरिद्री पुरुष.
आपला स्वत:वरचा ताबा सुटून आपण काहीतरी बोलू या भीतीनं मी लॅपटॉप मिटला, बर्थवर आडवा झालो आणि कोच अटेंडंटने दिलेली पांढरी चादर कानावर घट्ट लपेटून झोपून गेलो.
दादरला उतरलो तेव्हा प्रयत्नपूर्वक त्या दोघांकडे पाठ केली होती मी. पहाटे त्यांचे कुरूप चेहरे पाहिले असते तर दिवस निश्चितच नासला असता माझा. तसाच एसटी स्थानकावर आलो. अलिबागची बस लागलेलीच होती. खिडकीतच सीट मिळाली म्हणून ईश्वराचे आभार मानले अन् डोकं मागे टेकून, डोळे मिटून शांत बसून राहिलो.
‘‘बसू का दादा हीतं?’’ विटलेलं लुगडं नेसलेली, विस्कटलेल्या केसांची एक मध्यम वयाची बाई विचारीत होती. मी जरासा खजीलच झालो. अलिबागपर्यंत हा शेजार मला सहन करावा लागणार ही कल्पना फारशी सुसहय़ नव्हती.
मी खिडकीकडे सरकलो. बाई संकोचाने बसल्या. त्यांच्या शेजारी एक कॉलेजवयीन मुलगी येऊन बसली. साडेसहाला एसटी सुटली. गार वारा आत आला. बरं वाटलं. गाडीतले सगळे प्रवासी पेंगायला लागले. बाई मात्र टक्क जागी होती. आपल्याला झोप लागली आणि ही आपली बॅग घेऊन मध्येच उतरली तर पंचाईत या भीतीने मलाही झोपता येईना. तिच्या शेजारच्या तरुणीची मात्र झोपेमुळे मान कलायला लागली होती. मी पाहात होतो, तिचं डोकं हळूच बाईच्या खांद्यांवर विसावलं. बाई तिच्याकडे सरकली. आपला हात अलगद तिच्या डोक्यावर ठेवला. पोरगी दचकली. आपलं डोकं तिने बाईच्या खांद्यावरून पटकन काढून घेतलं.
‘‘झोप बाळा, व्यवस्थित झोप. -हाऊ दे डोकं माझ्या खांद्यावर.’’
‘‘सॉरी हं, चुकून झालं.’’
‘‘अग, सवारी कशापायी, माजी नात बी झोपत्ये की असंच. तु बी तेवढीच.’’
‘‘कुठे असते नात तुमची?’’ मुलीनं उगाच विचारलं. मला आवडलं नाही. कारण ही बाई  एकदा बोलायला लागली की, तिला थांबवणं कठीण झालं असतं.
‘हीतंच असत्ये ममईला. आता आली न्हवती का सोडायला मला? अलिबागला जाऊ नको म्हून लय मागं लागली माज्या.’’
‘‘ओके, तुम्ही अलिबागला जाताय होय?’’ मुलीच्या थांबतच नव्हत्या.
‘‘व्हय बाळा. सवत लय आजारी हाय माजी. तिचं करनारं न्हाई कुनी.’’
‘‘कोन आजारी आहे?’’ मुलीला ‘सवत’ हा शब्द ऐकायला गेला असावा. मलाही जरा आश्चर्यच वाटलं. दहा-पंधरा मिनिटांच्या आणि पाच-सात वाक्यांच्या परिचयावर बाई त्या मुलीशी ती आपली सख्खी नात असल्यासारखं बोलत होती.
‘‘सवत. दादल्याची ठेवलेली बाई. नऊ-धा वर्स झाली. मी मुलीजवळ ममईला, त्यो अन् सवत अलीबागला. आमची जमीन बक्क्ळ, पन ती बया घालून बसलीय घशात.’’
‘‘तरीही तुम्ही ती आजारी आहे म्हणून तिचं करायला जाताहात?’’
‘‘मग कोन करनार तिचं? तिची मुलं इचारेना तिला अन् दादल्याचं वय हाय का धावपळ करायचं?’’
‘‘अहो, पण नवऱ्यानं तुम्हाला सोडून तिला ठेवलीय ना?’’ मला अगदीच राहवेना म्हणून मी मध्येच तोंड घातलं.
‘‘तर काय भाऊ? या अशा येळेस बी राग लोभ धरायचा? त्यांचं केलं त्याचेपाशी आणि आपुन काय मोठं करतोय? आपुन पैशानं न्हाई करु शकत काई तर कष्टानं करावं. आपण चार कष्ट केल्याने कुनाला बरं वाटत असंल तर हरकत? शरीर झिजल तेवढं बरं दादा. आता या खेपेला वारी चुकंल माजी, पन या वर्साला इठोबाची न्हाई तर या रखमाईची सेवा घडंल.’’
माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले. ही वाणी या गरीब फाटक्या बाईची का कुणा संताची? काहीच वेळापूर्वी कुरूप दिसणारी ही बाई मला देखणी आणि तेज:पुंज दिसू लागली. मघाची मरगळ सहजच दूर झाली. मला स्वत:चाच अभिमान वाटू लागला.
जगातील सर्वात सुंदर आणि श्रीमंत स्त्रीच्या शेजारी या क्षणाला मी बसलो होतो. पुढील अडीच तासांचा प्रवास अविस्मरणीय होणार होता!

------------ प्रहार 

No comments:

Post a Comment