Monday, 2 November 2015

ताकाचा मसाला



सध्या उन्हाचा पारा चांगलाच वर चढू लागलाय. अशावेळी थंडपेये हवीशी वाटतात. पण त्यापेक्षा ज्युस, सरबते, आणि ताक हे सगळ्यात उत्तम पेय आहे. ताक नुसते पिण्यापेक्षा त्यात हा घरगुती मसाला घातला तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतील.
साहित्यः दोन वाट्या धने, दोन वाट्या जीरे, पाव वाटी ओवा, एक चमचा हिंग पावडर, एक चमचा सुंठ पावडर, एक चमचा शेंदेलोण, एक चमचा पादेलोण.
masala
कृती: धने, जीरे, ओवा वेगवेगळे खमंग भाजून घ्या. गार करायला ठेवा. गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्या. तीनही गोष्टी एकत्र करा, त्यात हिंग, सुंठ्पावडर, शेंदेलोण, पादेलोण मिक्स करा. परत एकदा सगळे मिश्रण मिक्सरला फिरवून नीट मिक्स करा. मसाला थोडा खारट लागला पाहिजे म्हणजे ताकात घातल्यावर चव बरोबर लागते. चवीनुसार दोन्ही मीठांचे प्रमाण वाढवण्यास हरकत नाही. पाचक म्हणूनही ताकात घालून घेता येईल.

----- मिसळपाव 

Tuesday, 4 August 2015

मत्स्यपालन अर्थात फिशटॅन्क ठेवण्याविषयी माहिती.

मत्स्यपालन अर्थात फिशटॅन्क ठेवण्याविषयी माहिती.


मासे पाळण्याची आवड बहुतेक आपल्या सर्वांनाच असते. निदान लहानपणी तर नक्कीच. रंगीबेरंगी माशांचं हे जग आपल्यावर कधी गारुड करुन जातं ते समजत नाही. काहींची ही भूल उतरते आणि माझ्यासारख्यांना मात्र आयुष्यभर साथ देते.
ह्या छंदाचा पाठपुरावा करताना मिळालेले काही आनंदक्षण आणि काही ज्ञानकण तुमच्याबरोबर वाटून घ्यावेत म्हणून हा लेखनप्रपंच. मत्स्यपालनाचे बहुतेक सर्व पैलू आपण इथे यथाशक्ती चर्चूया आणि आपल्या शंका निरसून घेउया.
सुरुवात करुया एका मूलभूत प्रश्नापासून. मासे का पाळायचे ? छंद, आवड, घराची सजावट म्हणून, ब्लडप्रेशर, टेन्शन अश्या काही व्याधींवर उपचार म्हणून... "चाय पीणेचे फायदे" सारखी अशी अनेक कारणं देता येतील. पण मला विचाराल तर यात अनेक पैलू दडल्येत असं मी म्हणेन. पण ह्या सर्वापेक्षाही जास्त असते ती निसर्गाच्या जवळ जाण्याची आपली ओढ. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला निसर्गाच्या जास्त जवळ येत नसल्याने आपण निसर्गालाच आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करु शकतो घरात एक अ‍ॅक्वेरीयम ठेवून. आपला अ‍ॅक्वेरीयम हा एक निसर्गाचा जिवंत तुकडाच असतो, त्यातल्या मासे, झाडं एव्हढच काय तर पाण्यासहीत.
फिशटॅन्क म्हणजे तूम्ही घराच्या आत बनवलेली बाग असू शकते. त्या माश्यांसाठी तूम्ही तयार करुन घेतलेल एक घर असतं ते. त्यात सोडलेले मासे विचारात घेतले तर ती एक जिवंत प्राण्याची जबाबदारीही असते. ह्या छंदायोगे आपण मुलांना मासे, त्यांच जीवनचक्र, त्यांच्या गरजा, त्यांच्या भावना (होय, माशांनाही भावना असतात) ह्यांची ओळख करुन देउ शकतो. त्यांची जबाबदारी घ्यायला शिकवू शकतो. साधारणत: एखादा पाळीव प्राणी पाळून मुलांना जे काही काही शिकवता येउ शकतं त्यापेक्षा मासे पाळून आणखीन जास्त शिकवता येतं असं मी म्हणेन. अर्थात यात आपणही शिकत जातोच.
मासे पाळण्याचा एक फायदा म्हणजे ही आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आवाक्यातली गोष्ट आहे. ह्याला फारशी जागा लागत नाही, ह्यांची इतर प्राण्यांइतकी काळजी ह्यावी लागत नाही, वेळच्यावेळी खाणं आणि साफसफाईची काळजी घेतली तर फारसे रोगही होत नसल्याने हा छंद फारसा महाग पडत नाही. अर्थात इतर सार्‍या गोष्टींप्रमाणे ह्यातही आपण करु तेव्हढा खर्च कमीच असण्यचीही उदाहरणं कमी नाहीत, पण आपल्याला नेमकं काय हवय ते आधीच ठरवल तर हा छंद नक्कीच परवडण्याजोगा असतो.
मासे पाळायचे ठरवल्यावर सर्वात आधी पडणारा एक प्रश्न म्हणजे, टॅन्क की बाउल ? म्हणजे गोल की चौकोनी टॅन्क ...
Fishbowl.jpg
गोल फिशबाउलने बर्‍याच जणांच्या छंदाची सुरुवात झाली असली तरीही, त्याचे काही सनातन तोटे आहेत जे विचारात घेतले पाहिजेत.
१. ह्यात ठेवल्या जाणार्‍या माशांची संख्या आणि प्रकार मर्यादित असते. म्हणजे ठराविक जातींचे आणि तेही ठराविक संख्येपेक्षा जास्त मासे यात ठेवता येत नाहीत. शक्यतो मोठे वाढणारे मासे, उदा. कोई, अरवाना वगैरे.
२. बाउल्सना तडा गेल्यास ते रिपेअर होत नाहीत.
३. बाउल्स स्टॅन्डर्ड साईझेस (आणि अर्थात शेप्स) मध्येच मिळतात.
३. बाउल्स आकाराने गोल असल्याने त्यात मासे व्यवस्थित दिसत नाहीत.
मासे पाळायचं ठरवण्यावेळीच टॅन्क ठेवण्याची जागा नक्की करुन घ्यावी. जवळच पण उंचावर ईलेक्ट्रीकल सॉकेटस् असावीत जेणेकरुन पुढे फिल्टर्स, एरिएटर्स, हिटर्स वगैरे लावताना जास्त वायरिंग करावे लागत नाही. टॅन्कची जागा दिवसाचे दोन तास तरी सूर्यप्रकाश टॅन्कवर पडेल अशी असावी. टॅन्कमध्ये झाडे लावायची असल्यास सूर्यप्रकाशाचा फायदाच होतो. जास्त वेळ सूर्यप्रकाश हा टॅन्कसाठी त्रासदायक ठरु शकतो पण त्यावर उपाय आहेत.
शक्यतो लोक टॅन्क बैठकीच्या खोलीत ठेवतात, शयनगृहात ठेवणारेही आहेत. पण जर स्वयंपाकघरात ठेवणार असाल तर टॅन्कवर झाकण मस्ट आहे, अन्यथा टॅन्कवर तेलकट तवंग येउ शकतो. टॅन्क ठेवायच ठरवतानाच त्याची जागाही निशित करुन घ्यायला हवी. शक्यतो बैठकीच्या खोलीतली निवांत बसून वाचायची जागा ही बेस्ट चॉईस असू शकते. आसपास मोकळी जागा असावी कारण उद्या साफसफाई करताना अडगळीच्या जागेत वाकून काम करणं कठीण होउ शकतं. (मला विचारा. टॅन्कमध्ये वाकून हजारेक पिल्लं पकडून मोजणं हे किचकट वेळखाउ आणि पाठदुखीच काम आहे ह्याची गॅरेंटी देउ शकतो मी)
जागा ठरवतानाच टॅन्कचा आकार आणि त्यावरुन त्याचे वजन ठरेल. हे वजन, टॅन्कसाठी स्टॅन्ड बनवून घ्यायचा असल्यास कामी येते. साधारणत: एका घनफूटास अठठावीस लिटर (म्हणजेच अठठावीस किलो) (१ घनफूट = १ फूट x १ फूट x १ फूट) हे पाण्याचे वजन + टॅन्कचे वजन + दगड / वाळू ठेवणार असल्यास त्याचे वजन. हे सर्व टॅन्क आणण्याआधीच विचारात घेणे जरुरी आहे. तुम्हाला हवे असलेल्या आकारात टॅन्क बनवून घेता येतो. आणि हा आकार कोणताही असू शकतो अगदी आपल्या विचारांच्या पलिकडलाही.
मी सुरुवात करताना २ फूट रुंद, १.५ फूट उंच आणि १ फूट तिसरी डायमेन्शन असलेला टॅन्क घेतला होता. वाळू, दगड, पाणी आणि इतर सर्व अ‍ॅसेसरीज बसवूनही त्याचं वजन माझ्या रायटिंग टेबलने सहज पेलवलं होतं. टॅन्क बनवून देणार्‍याला त्याच्या मजबूतीविषयी पूर्ण कल्पना असल्याने शक्यतो काचेच्या जाडीत तडजोड करु नये.
टॅन्क त्याच्या जागेवर ठेवल्यानंतर तो डोळ्यांच्या पातळीत आल्यास अधिक सुंदर वाटतो. अर्थात टॅन्ककडे बघताना तुम्ही उभे असणार की बैठकीच्या जवळपास ठेवून बहुतेक वेळा तो बसूनच बघितला जाणार हे ठरवावे.
एकूणच, सुरुवात करण्यापूर्वीच जेव्हढी माहिती गोळा करता येउ शकेल तेव्हढी करायला सुरुवात करा. प्रत्यक्ष काम करण्यापूर्वीच आपल्याला नक्की काय करायचय ते ठाउक असणं बर असतं नाही का ?
विकत घेतानाच शक्य तेव्हढा मोठा टॅन्क घ्यावा. याचं कारण म्हणजे, मोठा टॅन्क सेट करताना जो त्रास होईल तेव्हढा सोडला तर छोट्या टॅन्कपेक्षा तो सोयीचा पडतो. त्यात जास्त पाणी राहु शकत असल्याने प्रत्येक साफसफाईच्या वेळी आपण जास्त पाणी बदलु शकतो. साफसफाईला दुप्पट मोठ्या टॅन्कला दुप्पट वेळ नाही लागत, छोट्या टॅन्कपेक्षा थोडाच जास्त वेळ लागतो. शिवाय जास्त पाणी जास्त वेळ साफ, स्वच्छ, सुरक्षित राहू शकते, जास्त पाण्यात जास्त मासे सुखाने राहू शकतात. थोडक्यात म्हणजे ज्यादाके ज्यादा फायदे. मात्र मोठा टॅन्क म्हणजे जास्त जागा, जास्त वजन, जास्त मजबूत स्टॅन्ड, जास्त वाळू, जास्त किंवा मोठे मासे हेही विसरता कामा नये.
टॅन्क सेट करणे
जागा, टॅन्कची साईझ निश्चित करावी. आपल्याला टॅन्क नक्की कसा सजवायचाय ते ठरवावे, लागणारे सामान एकदम घेउन यावे. खाली दिलेल्या यादीतील सगळे सामान कम्पल्सरी नाही.
स्टॅन्ड
टॅन्क
वरती ठेवायला काच / शेड
पाठीमागे लावायला बॅकग्राउंड वॉलपेपर
शेडमध्ये लावायला दिवा व त्याची फिटिन्ग्ज
टॅन्कच्या आकाराची दोन ते तीन एमएम जाडीची थर्माकोलची शीट
लाकूड (बॉगवूड)
सायफनिंग व पाणी भरण्यासाठी पाण्याचा पाईप
वाळू, दगड, गोट्या.....
झाडे
फिल्टर
एरिएटर (ऑक्सिजन मशीन), हवेची ट्यूब, २ रेग्युलेटर, २ स्टोन..... टी जंक्शन,
हिटर (पाण्याचे तपमान २४ डि. से. च्या खाली जात असल्यास)
लिटमस पेपर
खड्याचे मीठ
थर्मामीटरचा स्टीकर.
मासे (शक्यतो टॅन्क घेताना घेउ नयेत)
बाजारातून आणलेला टॅन्क दोन तीनदा धुवून घ्यावा, शेवटचे मीठाचे पाणी वापरुन धुतल्यास उत्तम. धुताना साबणाचा स्पर्शही होउ देउ नये. वाळू, दगड पाणी स्वच्छ नीघेपर्यंत धुवून घ्यावेत.
टॅन्क ठेवणार असलेली जागा स्वच्छ पुसून घ्यावी. त्यावर थर्माकोलची शीट ठेवावी. त्यावर टॅन्क ठेवावा, त्यात दगड ठेवावेत, वर वाळु ओतावी. वाळु आणि दगड सेट करताना काही गोष्टी विचारात घेणे जरूरीचे आहे.
दगड टोकदार, धारदार नसावेत, पोहताना घासल्यास माशांना इजा होण्याची शक्यता असते. दोन दगड एकमेकांच्या आधाराने वाळूत घट्ट बसवल्यास गुहेचा फील बनवता येतो. रेडिमेड गुहा आणण्यापेक्षा हे स्वस्त पडतं. गुहेचा उपयोग माशांना खेळायला, लपायला होऊ शकतो. त्याशिवाय दगडांचा अजून एक फायदा म्हणजे, दगडाने पाण्याच्या प्रवाहात येणार्‍या अडथळ्यामुळे तीथे घाण जमून रहाते. सायफनिंग (साफसफाई) च्या वेळी एका ठिकाणी मिळणार्‍या घाणीमुळे बराच वेळ वाचतो.
सर्वात आधी टॅन्कमध्ये खरे / खोटे दगड ठेवून घ्यावेत. मध्यभागी एखादा जरा मोठा दगड टॅन्कमध्ये खूप छान दिसतो. दगड एकमेकांवर ठेवून त्यांना वाळूत खुपसल्यावर ते न डगमगता राहू शकतात. अश्या प्रकारे बनवलेली गुहा दिसत्येही सुंदर आणि माशांना लपण्यासाठी छान जागाही होते. गुहेसाठी चांगले दगड सापडत नसल्यास, खापरं किंवा हरताळकेसाठी आणलेली सुगडं (छोटे माठ) खालून फुटके असल्यास वापरता येतात. घाबरलेले , थकलेले किंवा दुसर्‍या कुठल्याही आडोसा हवा असलेले मासे ह्यात विश्रांती घेउ शकतात.
Slide16.JPG
आता टॅन्कमध्ये वाळू सोडायला हरकत नाही. साधारण दिड ते दोन इंचाचा वाळूचा थर पुरेसा ठरतो. वाळु टॅन्कमध्ये टाकल्यावर त्यात डोंगर दर्‍या तयार कराव्यात. वाळू एका पातळीत दिसण्यापेक्षा उंचसखलपणा असल्यास जास्त चांगली दिसते. तसेच वाळूला टॅन्कच्या एका बाजूला उतार द्यावा. उताराच्या ठिकाणीही घाण जमा होउन रहात असल्याने सायफनिंगच्या वेळी सोयीचे पडते.
वाळूला आपल्याला हवा तसा शेप देउन झाला की, मग त्यावर एखादी प्लास्टिक शीट (नसल्यास वर्तमानपत्रही चालेल) ठेवावी. मग त्यात वरुन हळूहळू पाणी ओतावे. प्लास्टिक शीट मुळे पाण्याचा फोर्स कमी होउन वाळू उधळली जात नाही त्यामुळे पाणी घाण होत नाही.
टॅन्क पाण्याने अर्धा भरल्यावर मग त्यात झाडे वगैरे लावावीत. झाडांच्या विविध प्रकाराची ओळख करुन घेतल्यास त्यांच्या विषयी माहिती मिळते आणि कुठली झाडे कुठे लावावीत ह्यासाठी मदत होते.
Slide4.JPG
टॅन्कच्या सजावटीला अ‍ॅक्वास्केपिंग असे नाव असून हे एक फार पुढारलेले शास्त्र आहे. ह्यात झाडे, लाकडाचे तुकडे, दगड व इतर गोष्टींचा वापर केला जातो. यात एखाद्या स्थापत्यशास्त्रज्ञाने आरेखलेल्या बागेप्रमाणे टॅन्क जतन केला जातो. मासे हे फक्त लाईफ बॅलन्सिंगसाठी वापरले जातात. पण आपला प्रमुख उद्देश मत्स्यपालन असल्याने आपण फक्त याची तोंडओळखच ठेवूया. अर्थात एखाद्याला मासे पाळण्यापेक्षा ह्यातच जास्त इंटरेस्ट वाटत असल्यास हेही करायला हरकत नाही.
टॅन्कमध्ये जिवंत झाडे लावायची असल्यास वाळु ही मिडियम जाडीची असावी. त्यात झाडाची मुळे न दुखावता खोचून झाड नीट रोपावे. गवतासारखे उंच सॅजिटारीया, साधे व स्पायरल (स्क्रू) वॅलेस्नेरीया, पिग्मी ग्रास, छोटुल्या पानांचे बकोपा, लालसर दिसणारे लुडविगीया, झुडुपाप्रमाणे असलेले अ‍ॅमेझॉन स्वोर्ड, नाजुक कबम्बा, भरपूर ऑक्सिजन सोडणारे हायड्रीला ही झाडे सहज उपलब्ध असतात व जगतात ही. झाडे लावतानाच उंच झाडे पाठीमागे व बुटकी झाडे पुढे अशी वर्गवारी करुन घ्यावी. सॅजिटारीया, वॅलेन्सेरीया यासारखी झाडे टॅन्कच्या मागच्या काचेच्या जवळ सरळ रेषेत लावावी. एखाद्या कोपर्‍यात हायड्रीला, कबम्बाचा गुच्छ ठेवावा. कबम्बासारखे नाजुक झाड शक्यतो दांडगाई करणार्‍या माश्यांबरोबर ठेवू नये. झाडे लावतानाच मुळांशी दगडाचे आळे केल्यास झाडे उपटली जाण्यास प्रतिबंध होतो. अर्थात झाडांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो सूर्यप्रकाश. दिवसातून दोन तीन तासही सूर्यप्रकाश मिळत नसल्यास लाइट लावणे गरजेचे ठरते. थंबरूलप्रमाणे १ लिटरला १ ते ३ वॅट लाइट असावा व साधारण बारा तास चालू ठेवावा. पण रिझल्ट तपासूनच. कारण जास्त प्रकाश म्हणजे अल्गीजची जास्त वाढ आणि कमी प्रकाश म्हणजे झाडांची कमी वाढ व निस्तेज होणे.
Slide1.JPGSlide2.JPGSlide3.JPG
लाईट्सची अ‍ॅरेंजमेंट करतानाच त्यात ट्यूबलाईट, एनर्जी सेव्हर लॅम्प्स, नाईट लॅम्प अशी सोय करुन ठेवावी. म्हणजे मूड लायटींग (आपल्या मूड्स प्रमाणे) करता येईल.
निसर्गातले उजेड काळोखाचं गणित समजवून घेतलं की टॅन्कमध्ये लाईट कसे लावायचे ते लक्षात येतं. जसा सूर्य उगवण्यापूर्वी असलेला अंधूक प्रकाश सूर्योदयानंतर उजळतो तसेच टॅन्कमध्येही प्रकाश हळूहळू वाढवत न्यावा. अचानक प्रखर प्रकाश टाळावा, मासे दचकू शकतात. प्रकाश कमी करत जातानाही हळूहळू करावा. ह्यासाठी एकापेक्षा जास्त ट्यूब्ज / बल्बज् लावता येतील. अर्थात हे करताना लाईटच्या बिलाचा विचार विसरुन चालणार नाही. १००० वॅट १ तास चालवल्यावर एक युनिट वीज खर्च होते. जर १०० वॅटचा बल्ब रोज एक तास जाळला तर एका महिन्यात १०० x १ x ३० = ३००० वॅटअवर्स = ३ युनिट्स = ३ x ३.५ रु ( किंवा जो काही रेट असेल तो) = महिना १०.५ रु बिलातली वाढ. यासाठीच सूर्यप्रकाशासारखा स्वस्त पर्याय नाही. स्मित
टॅन्कमध्ये झाडे नीट जगली की मग मासे सोडायला हरकत नाही. आपण ठरवलेले मासे दुकानातून आणले की ती पिशवी माश्यांसकट टॅन्कमध्ये तशीच ठेवावी. पिशवीतले पाणी हळूहळू टॅन्कमधल्या पाण्याच्या तपमानाला येईल. साधारण दहा मिनीटांनी पिशवीतले मासे टॅन्कमध्ये सोडावे. नवीन मासे आणतानाही ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच नवीन मासे टॅन्कमध्ये सोडताना आधीच्या माशांना खाणे घालावे, यामुळे त्यांचे लक्ष खाण्याकडे रहाते. नाहितर जुन्या रहिवाश्यांनी नव्यांचा पाठलाग करणे शक्य आहे.
माशांना दिवसातून दोनवेळा तरी खायला घालावे. ट्यूबीफ्लेक्स (गांडूळांसारखे दिसणारे किडे), ब्लड वर्म्स, डॅफ्निया (Daphnia), व्हाईट वर्म्स, बीअरवर्म्स, डासांच्या अळ्या असे अनेक प्रकारचे जिवंत व वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य निर्मित खाणे बाजारात उपलब्ध असते. वेगवेगळ्या प्रकारचे खाणे खात राहिल्याने मासे; तजेलदार, तरतरीत, चपळ व चमकदार रहातात. मोठ्या प्रमाणावर मत्स्यपालन करणार्‍यांना खाणे बनवताही येउ शकते. ह्याशिवाय चिकन, मटण व बीफ हार्टसारखे पर्यायही वापरले जाउ शकतात.
दोन तीन मिनीटात संपेल एव्हढे खाणे माश्यांना पुरेसे असते. पण सगळ्या माश्यांना खाणे मिळते आहे ना यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नाहितर मोठे / अ‍ॅग्रेसिव्ह मासे खाणे संपवून टाकतील आणी लहान मासे उपाशीच रहातील. दोन तीन ठिकाणी खायला घातल्यास सर्वाना पुरेसे मिळू शकेल. किडे घालण्यासाठी तरंगणारे, भोके असलेले कप्स मिळतात. त्यात सोडलेले किडे त्या भोकांतून बाहेर पडण्यासाठी वळवळत रहातात व माश्यांचे भक्ष्य बनतात. यामुळे खाण्यासाठी टाकलेले किडे, वाळूत जाउन लपून बसण्याची शक्यता कमी होते. तसेच रेडिमेड फिशफूड साठी फ्लोटिंग रिंग्ज मिळतात. टाकलेले फूड त्या रिंगमध्येच तरंगत रहाते व माश्यांना ते खाणे सोपे जाते.
कोणताही मासा साधारणत: वरून बघितल्यास डार्क व खालून बघितल्यास पेल दिसतो. निसर्गाने त्यांच्या शत्रूला ते सहज दिसू नयेत म्हणून केलेली ही एक साधी युक्ती आहे. वरुन बघणार्‍याला पाण्याखालच्या जमीनीमुळे डार्क रंगाचा मासा दिसणे कठीण तसेच खालून बघणार्‍याला वरच्या आकाशामुळे फिकट रंगाचा मासा दिसणे कठीण.
माश्यांच्या रंगरुपावरुन त्यांच्या सवयी ओळखण्याचे काही आडाखे आहेत. मासा जेव्हढा रंगीत तेव्हढा त्याला सूर्यप्रकाश जास्त आवडतो. अंगावर उभे पट्टे असलेल्या माश्यांना उनसावली असलेल्या (उंच झाडे असलेल्या) भागात फिरणे पसंत असते.
लॅटरल लाईन (तोंडापासून सुरु होउन शेपटापर्यंत जाणारी शरीरमध्य रेषा) च्या वरती तोंड असलेले मासे (उदा. गप्पी, डॅनिओज) हे टॅन्कच्या वरच्या भागात त्यांचे खाणे शोधतात, लाईनवर तोंड असलेले मासे (बार्बस्, गुरामी) मध्यभागात तर लॅटरल लाईनच्या खाली तोंड असलेले मासे (लोच, कॅटफिश) पाण्याच्या तळाशी भक्ष्य शोधत फिरतात. टॅन्कमध्ये कोणते मासे ठेवायचे हे ठरवताना हि माहिती फायद्याची ठरते. सगळ्या प्रकारचे एक दोन जातीचे मासे ठेवले की टॅन्क भरलेला वाटतो. नुसते वरवर फिरणारे मासे असले तर टॅन्कचा मध्यभाग रिकामा वाटत रहातो.
Slide28.JPG
मासे : http://en.wikipedia.org/wiki/List_of_freshwater_aquarium_fish_species
Slide29.JPG
अ‍ॅक्वेरीयममध्ये साधारणतः ठेवले जाणारे मासे खालील ग्रुप्समध्ये विभागले जातात.
लाईव्ह बेअरर्स किंवा पिल्लांना जन्म देणारे मासे - यात गप्पी, मॉली, प्लॅटी, स्वोर्ड टेल्स, ट्रॅन्जेलीन हे मासे येतात. पाळायला व ब्रीड करायला अत्यंत सोपे असे हे मासे बहुत्येकदा बिगिनर्सचे पहिले मासे असतात. काही विशेष गरजा नसल्याने हे पाळणे अजिबात कठिण नसते. शक्यतो एका नरास दोन माद्या ह्या प्रमाणात ठेवावे. ह्यांचे खालचे ओठ किंचीत जाडसर असतात, झाडांच्या पानावर जमलेलं शेवाळ खायला ओठांचा उपयोग होतो. ह्यामुळेच कदाचित ह्यांना बाकीच्या माश्यांना टोचायची आवड असते. आकाराने मोठ्या माशांना ह्यांचा त्रास होत नाही उलट झुपकेदार शेपटीमुळे गप्पीसारख्या माश्यांनाच इतरांपासून सांभाळायला लागते. लाईव्ह बेअरर्समध्ये मेल फिमेल ओळखण्याची सहज सोपी खूण म्हणजे गुदद्वाराजवळचा पर. फिमेल्समध्ये हा त्रिकोणी असून मेल्समध्ये तो जननेंद्रीयाचे काम करतो आणि आडव्या नळीसारखा व लांबट असतो. ब्लॅक मॉलीच्या फोटोंमध्ये हा फरक स्पष्टपणे पहाता येईल. मेल्स हे फिमेल्सपेक्षा आकाराने लहान असतात.
Slide10.JPG
गप्पीला अ‍ॅक्वेरीयममधले फुलपाखरु म्हंटले जाते ते त्यांच्या चित्तवेधक रंगांमुळे आणि लहरणार्‍या शेपटीमूळे. कल्पनेपलिकडल्या रंगात उपलब्द्ध असलेले गप्पी कुणाच्याही नजरेला सहज आकर्षून घेतात. फिमेल्स त्यामानाने कमी रंगीत असतात. रंग आणि शेपटीच्या आकारावरु ह्यात कित्येक जाती आहेत. गप्पी साधारणतः एक ते दिड इंचापर्यंत वाढतो. पिल्ले वाढवून विकताना मेल्स व फिमेल्स सेपरेट टाक्यात ठेवतात. त्यामुळे मेल्सच्या टेल्सची वाढ चांगली व लवकर होते. मेल्सच्या टॅन्कमध्ये दोन तीन फिमेल्स ठेवल्यास शो ऑफ करण्याच्या नादाने शेपट्या आणखीनच छान बनतात. डोळा मारा
Slide11.JPG
मॉलीजचे काळे, पांढरे, सोनेरी, चंदेरी एकसमान रंग त्यांना पॉप्युलर बनवतातच पण त्यापेक्षाही चांगली गोष्ट म्हणजे त्यांची कुणाशीही न भांडण्याची वृत्ती. ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे स्वतःची पिल्ल खातं नाहीत. त्यामुळे टॅन्कमध्ये फक्त मॉलीजच असल्यास (मेल व फिमेल्सही) त्यांची संख्या वाढणारच. ह्यात फिनेज वरुन सेल फिन, मून टेल, लायरा टेल असे प्रकार असतात.
Slide12.JPG
प्लॅटी, स्वोर्डटेल आणि ट्रॅन्जेलीन हे एकमेकांचे चुलतभाउच. त्यामुळे ते एकमेकात सहज ब्रीड होतात. लाल रंग हा ह्यांचा बेस असला तरी हे बर्र्याच रंगात मिळतात. पैकी प्लॅटीला स्वोर्ड नसते. बाकी दोघांच्याही मेल्सना शेपटीच्या खालच्या टोकाला तलवारीसारखे लांब टोक असते. स्वोर्डटेल आणि ट्रॅन्जेलीन मधला मुख्य फरक म्हणजे स्वोर्डटेल्सचे डोळे काळे असतात तर ट्रॅन्जेलीन्सचे लाल. ट्रॅनजेलिन्सच्या सगळ्या व्हरायटीज ह्या फिन्सच्या आकारावरुन आहेत. प्लॅटि व स्वोर्डटेल्सच्या व्हरायटीज रंग आणि फिनेजमधील फरकांमुळे ओळखता येतात. प्लॅटि आकाराने दिड ते दोन इंच वाढतात तर स्वोर्डटेल्स / ट्रॅन्जेलीन चार ते पाच इंच वाढतात.
Slide23_0.JPG
अ‍ॅनाबॅन्टीड्स - लॅबॅरिन्थ ग्रुपच्या माश्यांचं वैशिष्ट्य असं की ह्यांना हवेतला ऑक्सिजन घेता येतो. अर्थात पूर्णपणे नाही. त्यामूळेच आरामात पोहत असताना अचानक सूळकन् पृष्ठभागावर येउन जाणं ही ह्यांची सवयच असते. कल्ल्यांखाली असलेले फिलर्स ह्यांना स्पर्शज्ञान करुन देतात. सयामीज फायटर्स, गुरामीज, पॅरॅडाईज फिश ही ह्या प्रकारच्या माशांची नावं. हे ही पाळायला अत्यंत सोपे असतात आणि ब्रीडींगलाही. पाण्याच्या पृष्ठभागावर पानाच्या आधाराने तोंडातून बुडबुडे काढून बनवलेलं ह्यांच घरटं आणि त्यानंतर नर घेत असलेली पिल्लांची काळजी हे बघत रहाण्याजोगे असतात.
फायटर हा बिगिनरसाठी चांगला मासा आहे. मूळचा सयाम (थायलंड) च्या भाताच्या खेचरात वाढणारा हा मासा तिथे (कोम्बड्यांच्या झुंजीसारख्याच) झुंज खेळण्यासाठी वापरला जातो. एक मेल दुसर्‍या मेलला आपल्या एरियात सहन करुच शकत नाही. सगळे पर फुलवून एकमेकांवर प्राणांतिकपणे तूटून पडून केलेली हि मारामारीही बघत रहाण्याजोगी पण क्रूर असते. त्यामुळे टॅन्कमध्ये एकावेळी एकच मेल (सुखाने) राहू शकतो. पण फिकर नॉट. कमीत कमी जागेत राहू शकणारा व हवेतला ऑक्सिजनही घेउ शकणारा हा मासा असल्याने तूम्ही ह्याला चक्क हॉर्लिक्सच्या बरणीतही अगदी आरामात पाळू शकता. तेजस्वी रंग आणि झुबकेदार शेपटी व इतर पर ह्यामुळे हा अतिशय देखणा दिसतो. साधारणतः तीन इंचापर्यंत वाढणारा हा मासा तसा स्वभावाने शांत असतो. लाल, निळा, हिरवट, सोनेरी, पांढरा, काळा व ह्यांचे मिक्स अश्या विविध कलर्समध्ये मिळतो. मेल्स हे फिमेल्सपेक्षा जास्त रंगीत व जास्त मोठे पर असणारे असतात आणि सहज ओळखता येतात.
पर्ल गुरामी हा गुरामी फॅमिलीमधला (माझ्यामते) सर्वात सुंदर मासा. सहा इंचापर्यंत वाढणारा हा मासा स्वभावाने अत्यंत शांत, पाळायला अगदी सोपा असतो. पिवळसर सोनेरी रंगाच्या शरीरावर पाढरट ठिपके, लॅटरल लाईनवर काळ्या ठिपक्यांची नक्षी, पाण्यात सहज विहरणे हे अतिशय सुंदर तर दिसतेच पण त्याहून सुंदर वाटतो तो मीलनाच्या काळात मेल्सच्या गळ्यावर दिसणारा लालभडक रंग. मेल फिमेल ओळखण्याची आणखीन एक सोपी खूण म्हणजे मेल्सचा वरचा पर फिमेल्सपेक्षा लांब असतो.
गोल्डन गुरामी रंगाने सोनेरी असून साधारण पर्ल गुरामी एव्हढाच वाढतो. ब्ल्यू गुरामी हा अत्यंत स्टर्डी मासा असून त्याच्या रिक्वायरमेंटस् जास्त नाहीत. हा पाण्याच्या तपमान व PH च्या बर्‍याच मोठ्या रेंजशी जुळवून घेउ शकत असल्याने पाळणे अगदी सोपे जाते.
किसिंग गुरामीचे नाव असे पडण्याचे कारण म्हणजे त्यांच्या (अश्लाघ्य स्मित) सवयी. रंग गुलाबी असल्याकारणाने असेल कदाचित पण दोन किसिंग समोरा समोर आल्यावर त्यांच्या अंगात इमरान हाश्मी संचारतो. हा आकाराने फुटभरापेक्षा जास्त मोठा होउ शकतो.
हनी गुरामी पिवळसर तर कॉपर गुरामी तांबट लाल असतो हे दोन्ही मासे तसेच ड्वार्फ गुरामीही दोन ते तीन इंचापेक्षा जास्त मोठे होत नाहीत. पैकी ड्वार्फ गुरामीज अत्यंत लाजाळू असून ह्याला लपण्यासाठी जागा आवश्यक असते.
Slide17.JPG
सर्व गुरामीज मध्ये फिमेल मेलपेक्षा आकाराने मोठी असते व कमी प्रमाणात असलेल्या रंगावरून ओळखता येते.
Slide18.JPG
टेट्रा - अत्यंत शांत असे हे मासे हे झाडांनी गच्च भरलेल्या टॅन्कमध्ये अतिशय खूलून दिसतात. ग्रुपने रहाण्याची आवड असल्याने हे शक्यतो डझनाच्या संख्येने पाळावेत. आकाराने लहान असल्याने हे ग्रुपमध्ये नजरेत भरतात. ब्लॅक विडो सारखा अपवाद सोडला तर जवळ जवळ बाकी सगळे टेट्राज हे टिपीकल टॉर्पेडो शेपची बॉडी असलेले, सीझर्स शेप टेल असलेले असतात. सगळ्या माश्यांत मिळून मिसळुन रहात असल्याने कम्युनिटी टॅन्कमध्ये ह्यांच्यासारखे दुसरे मासे नाहीत. पण छोट्या आकारामूळे ह्यांना जास्त मोठ्या माश्यांबरोबर ठेवू नये.
Slide13.JPG
बार्बस् - नावाप्रमाणेच अत्यंत शार्प असलेला हा ग्रुप. रोझी बार्ब, शुबर्टी बार्ब, चेरी बार्ब, टायगर बार्ब, टिनफॉईल बार्ब ही ह्यातली काही नावे. ग्रुपने रहाणे, चपळाईने पोहोणे, अ‍ॅग्रसिव्ह टेरेटोरीयल बिहेव्हीयर ही ह्यांची वैशिष्ट्ये. स्वतः आकाराने जास्त मोठे नसल्याने मोठ्या माश्यांच्या वाटेला हे जात नाहीत पण टिनफॉईल बार्ब आकारानेही मोठे होतात तेव्हा लहान माश्यांबरोबर ह्याना ठेवणे जरा विचारपूर्वकच करावे.
Slide19.JPG
डॅनिओ - ह्यात चार जाती आहेत. झेब्रा, स्पॉटेड, पर्ल आणि जायंट. ह्यातला जायंट ३ इंचापर्यंत वाढतो बाकीचे दोन इंचापर्यंतच. पण अत्यंत चपळ असलेले डॅनिओज टॉर्पेडो शेप मुळे उत्कृष्ठ स्वीमर असतात. सहा ते बारांच्या संख्येत ठेवल्यास मोजणे कठीण जावे अश्या वेगाने सतत इकडून तिकडे पोहोत असताना अ‍ॅक्वेरीयम चैतन्यमय भासू लागतो.
Slide22.JPG
चिकलेटस् (Chichlids) छोट्या आकाराच्या रामारेझी (Apostograma Remirezi) पासून ते मोठाल्या ऑस्कर पर्यंत वाईड रेंज असलेला हा ग्रुप. आकाराने चपटे, आकारानुसार थोडेसे अ‍ॅग्रेसिव्ह, टॅन्कमध्ये लपण्याच्या जागा, गुहा असणे आवश्यक. (एरिया ठरवायला सोपे पडते). हे रोग चटकन पकडतात पण रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे रोगाशी झगडतातही. ह्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे हे पिल्लांची काळजी घेतात. त्यांना अंगावर पाजतातही (अंगातून स्रवणारा एक द्रव) त्यामुळे एकच पेअर ठेवल्यास पिल्लं मिळवणं फारसं कठीण नसतं (तसही आपल्याला काहीच कराव लागत नाही, त्यांच तेच करतात फिदीफिदी ) ह्यांच्यात जोडी जमते आणि एकत्र रहाते. अर्थात एक गेल्यास दुसरा (री) शोधणंही चालतं पण एकदा जमलेली जोडी विनाकारण बिनवसून घेत नाही.
Slide34_0.JPG
एन्जल्स (pterophyllum scalare) हे मूळचे अ‍ॅमेझॉनच्या खोर्‍यातले मासे, आठ ते दहा ईंचांपर्यंत वाढणारा हा मासा दिसतोही सुंदर आणि वागतोही सुंदर. तीन काळे पट्टे असलेले मार्बल एन्जल्स, पट्टे नसलेले स्वच्छ सोनेरी गोल्डन एन्जल्स, अंगावर चट्टे असलेले स्कार एन्जल्स, लाल डोळे असलेले रेड आय एन्जल्स, वेल टेल, घोस्ट, ब्लॅक अश्या जवळ जवळ ३० व्हरायटीज आहेत.
ह्या ग्रुपमधला माझा सर्वात लाडका म्हणजे रामारेझी. ह्याला रॅम्स चिकलेट असही लाडकं नाव आहे, दोन अडीच ईंचापर्यंत वाढणारा हा मासा त्याच्या अंगावरल्या रंगाच्या उधळणीमुळे खासच दिसतो.
Slide15.JPG
शार्कस् : होय शार्क्सच पण हे खरेखुरे शार्क्स नव्हेत. हे लोच / कॅटफिशची एक व्हरायटी आहे. फुटभरापेक्षा जास्त वाढणार्‍या टायगर शार्क पासून ते सुंदर रंगसंगती असणार्‍या रेड टेल शार्क सारख्या चार प्रजाती आपल्याकडे कॉमन आहेत.
Slide24.JPG
जरी आपण बहुतेक ग्रुप बघितले असले तरीही काही सांगणे बाकी आहे. त्यापैकी एक प्रकार म्हणजे बॉटम फीडर्स. यात कॉमन सकरफिश (प्लेको), कॅटफिश, लोच, ईल यासारखे मासे येतात. तळाशी चरणारे हे मासे टॅन्कच्या साफसफाईत महत्वाची भूमिका बजावतात. दगड, झाडं, काच यावर जमलेले शेवाळ खाणं हा यांचा आवडीचा उद्योग.
Slide14.JPG
हे काही माझ्या खास आवडीचे देखणे मासे.
Slide20.JPG
हार्लेक्वीन रासबोरा : रासबोरा ग्रुपमधला हा मासा. ह्याच्या अंगावरील त्रिकोणी आकाराचा निळसर काळा पॅच अगदी खुलून दिसतो. ह्याचा कळप / थवा / जथ्था (Shoal) एकत्र पोहोताना सुंदर दिसतो. दोन ईचापर्यंत वाढणारा हा मासा अगदी शांत असतो.
व्हाईट क्लाउड माउंटन मिनो : सायप्रिनीडस् (Cyprinids) ग्रुपमधला हा मासा खरा थंड पाण्यातला. अतिशय चपळ असा हा मासा १.५ ईंचापर्यंत वाढतो. स्वभावाने शांत असा हा मासा ग्रुपने रहातो. हा आपली अंडी खात नाही.
ग्लास कॅटफिश : संपूर्ण पारदर्शक असा हा मासा बघणार्‍याला बुचकळ्यातही टाकतो आणि माशाच्या शरीररचनेच ज्ञानही देतो स्मित
बोस्मॅन रेनबो : रेनबो ग्रुपमधला हा मासा अतिशय सुंदर दिसतो. हा चार ते पाच ईंचापर्यंत वाढतो.
Slide21.JPG
फ्लॉवर हॉर्न आणि पॅरटफिश: अंगावर फुलांची नक्षी आणि डोक्यावर टेंगूळ असलेला हा मासा. ह्याला पॅरटफिशप्रमाणेच शास्त्रीय नाव नाही कारण ते दोघेही निसर्गतः आढळुन येत नाहीत.
पिर्‍हाना : अत्यंत बदनाम असणार्‍या ह्या माश्याच्या तीन चार जाती आहेत. आकाराने फुटापेक्षा जास्त वाढू शकणारा का मासा बघतानाच त्याच्या विषयीचा दरारा जाणवतो.
टॅन्कमधील ईतर प्राणी : यात गोगलगाई, श्रिम्प्स आणि क्रॅब्स तसेच न्यूटस वगैरे ही येतात. क्रुस्टेशिअन ग्रुपची हि मंडळी सुंदरही दिसतात आणि उपयोगीही असतात.
काही विचित्र मासे : दिसायला कितीही वेगळे वाटत असले तरीही हे नैसर्गिक मासेच आहेत.. स्मित
Slide26.JPG
अ‍ॅक्वेरीयम मधला सर्वात जास्त फेमस मासा म्हणजे गोल्डफिश. हा मूळचा थंड पाण्यातला मासा, क्रुशियन कार्प पासून डेव्हलप झालेला हा गोल्डफिश, कोई माश्याचा जवळचा नातेवाईक. मातकट हिरवटसर रंग असलेल्या मूळ माश्यापासून कल्पनेपलिकडले रंग आणि आकार निर्माण झाले. हे करण्यामागे चीन व जपान ह्यांची चार ते पाच शतकांची कामगिरी आहे. दहा बारा ईंच वाढु शकणारा हा मासा ईतक्या वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे की ते प्रकार बघून म्युटेशन्स, अ‍ॅडेप्टेशन्स आणि सिलेक्टीव्ह ब्रीडींगच्या मानवी साद्ध्यांनी थक्क व्हायला व्हावे.
Slide8.JPGSlide9.JPGSlide33.JPG
कॉमन गोल्डफिश, ह्याच्या मूळ रुपातील अवताराला बुलडॉग म्हणायचे पूर्वी पण सध्या तसले कुठेच दिसत नाहीत. काळाकभिन्न ब्लॅक मूर, रंगीबेरंगी शिंतोडे उडवलेला शुबंकीन, बाहेर आलेल्या डोळ्यांचे टेलिस्कोपीक आय, लांबसडक कॉमेट, गुळगुळीत (खवलेरहीत भासणार्‍या) शरीराचे कॅलीको, एखाद्या चेंडूसारखे गरगरीत पर्ल स्केल, बबलगमच्या फुग्यांसारखे फुगे डोळ्यावर असलेले बबलआय, पांढरेधोप शरीर आणि लाल टोपी असलेले रेड कॅप, सिंहाच्या आयाळीसारखे खवले असलेल्या डोक्याचे लायनहेड हे आणि असे कित्येक प्रकार आहेत गोल्डफिशमध्ये.
पुढच्या लेखनाची रुपरेखा.
३. मासे : रोग,
४. मेन्टेनन्स, वॉटर बॅलन्सिंग व लाईफ सिस्टीम
५. लाईट, हिटर, फिल्टर, इतर अ‍ॅसेसरीज
६. ब्रीडींग






---------------- मायबोली



Monday, 20 April 2015

पूरणाची पोळी!

 पूरणाची पोळी!

तर मंडळी आपल्या मराठी लोकांच्यात बारा महिन्यांचे बारा सण! गुढि उभारुन झाली, तोवर आकित्ती(अक्षयतृतिया) आली. हा साडेतीन मुहुर्ता पैकी एक मुहुर्त सुद्धा आपण गोडाधोडानेच साजरा करतो. तो पर्यंत आला बेंदूर! मग आला श्रावण, भाद्रपद यांच्या महतीबद्द्ल मी काय बोलावं? मग दसरा, दिवाळी, त्यातच आषाढी, कार्तिकी एकादश्या मग संक्रात अन शेवटाचा सण होळीचा!
या बर्‍याच सणांना अगदी अलिकडेपर्यंत कोल्हापुरात पोळ्या व्हायच्या घरोघरी. कोल्हापूर म्हणायच कारण अस की, पुण्यामुंबईचे लोक तेंव्हा पूरणपोळ्या खायला गावीच् जावं लागतं अस बोलुन दाखवायचे. (आळशी मेले)
गावी तर या सणांबरोबरच पावणा-रावणा, पूजा, समारंभ, लेक आली, जावाय आला, भाऊ आला अन मेव्हणा पाहूणा, अश्या झाडून सगळ्या गोष्टी पूरण घालायच निमित्त होउ शकतात. अगदी परवा परवा पर्यंत तेराव्या नंतर तोंडगोड करायला आलेल्या सगळ्या नातेवाईक स्त्रीया, कंबर कसून रात्रभर पोळ्या करुन घराच सूतक मोडून जायच्या.
तर अशी ही पूरणाची पोळी! जीवाभावाची! रांधायला जरा अवघड! अगदी सुगरणींचा सुद्धा कधी कधी कस पाहणारी!! पण आपल्या मातीची!! अन म्हणुनच अविट गोडीची.


तर आता राहू दे बाकिच पुराण. चला घालुया शिजाया पूरण.
एक अ‍ॅडीशन हं. गुज्जू लोक्स ही पूरण्पोळी तूर डाळीची करतात, साउथ मध्ये आपल्या सारखीच हरभरा डाळ वापरली जाते, पण आपल्या सारखी तिकडे पूरण पोळी राजमान्य नाही! त्यांचे आपले पायसम! 


तर घ्या साहित्यः
१. पूरण पोळीचे
पाव किलो हरभरा डाळ. पाव किलो गूळ. सुंठ एक अर्धा बोटभर तुकडा. ६ वेलच्या. २ मिरे.
कणिक {गव्हाचे पिठ} ( कणिक घेताना आधी हरभरा डाळ वाटीने मोजावी. अन त्या मापाच्या दिडीने कणिक घ्यावी. मी येथे पावकिलो डाळ एका भांड्याने मोजली अन तेव्हढं भांड भरुन+ आणखी अर्ध भांड अशी कणिक घेतली)
मिठ. हळद. अन बक्कळ तेल.


2. कटाची आमटीचे 

कट, सुक्या खोबर्‍याचा तुकडा इंचभर, लवंग, दालचीन, जीरे, मिरे, कोथींबीर,लसूण पाकळ्या ४-५, भाजलेला कांदा (छोटासा), तिखट , मिठ, आमसूल.

फोडणीसाठी- लसूण पाक्ळ्या २-३, कढीपत्ता, हिंग, हळद.



कृती:-
हरभरा डाळ निवडुन,(त्यात हरभर्‍याचे वरचे साल असलेले, आणि हिरव्या रंगाचे डाळे काढुन टाका) धुवुन कुकरला लावा. चांगल्या पाच सहा शिट्ट्या येउ द्या.
तोवर कणिक भिजवायला घ्या. चाळलेल्या कणकेत मिठ, हळद अन दोन तीन चमचे तेल घालुन व्यवस्थीत मिसळुन घ्या अन पाणी घालून साधारण घट्ट्सर कणिक मळून घ्या. आता एक हा कणकेचा गोळा मावेल इतक आकाराचं भांड घ्या अन त्यात पाणी घालून त्यात हा कणकेचा गोळा सोडा. कणकेच्या वर पाणी आलं पाहिजे. झाकण ठेवा अन एका कोपर्‍यात हे भांड
ठेवुन द्या.

तोवर कुकर जरा थंड व्हायला आला असेल. उघडू नका इतक्यात. बाजूला पूरण आटवायला एक जरा मोठ्ठ तपेलं घ्या. त्यात साधारण दिड-दोन लिटर पाणी घाला चार मिर्‍याचे दाणे टाका अन ते पाणी उकळायला ठेवा.
तोवर इकडे आणखी जरा एक छोटी वाटीभर हरभरा डाळ घ्या आणि धुवुन पुन्हा पाण्यात घालून ठेवा भिजायला.
कुकर उघडुन त्यातुन डाळ काढुन घ्या अन त्याच कुकर मध्ये हातोहात वरणाची डाळ आणि बटाटे घाला. गॅस सुरु करा अन येउदेत आणखी पाच शिट्ट्या.

आता इकडे जे मोठ्या तपेल्यात पाणी उकळायला ठेवले आहे त्याकडे वळा. पाणी जर कडकडीत होउन उकळायच्या बेतास असेल, तर त्यात शिजवलेली हरभर्‍याची डाळ घाला. एक चार पाच मिनीटात पाणी उकळू लागेल. आता हे पाणी नुसत पाणी नाही तर कट आहे. याला आता पासून कट म्हणायच. काय?

 

तर हा कट अगदी काळजीपूर्वक दुसर्‍या पातेल्यात ओतून घ्या. हव तर एखादी चाळ्ण ठेवा डाळ पडू नये म्हणुन. सगळ पाणी निचरलं, की हे डाळीचे भांडे पुन्हा गॅसवर ठेवा आणी एका उलथन्याने अथवा चपट्या डावाने तळापासून हलवायला सुरु करा. [अशी डाळ पुन्हा उकळत्या पाण्यातुन काढल्याने पूरण चिकट न होता खुसखुशीत होते. वर आणि आमटीला रॉ मटेरियल मिळते ते वेगळच.] पूरण साधारण घट्ट होत आले की मिरे दाणे काढून टाकुन आता या डाळीत गूळ मिसळा. पण पाव किलो जो गूळ आपण घेतलाय, त्यातला एक बारकासा खडा बाजूला काढा. जेव्हढ्यास तेव्हढ्या गूळाने पोळी खूप गोड होते. गूळ हवा असेल तर बारिक फोडून अथवा चिरुन घालू शकता. चिमटभर मिठ पण यावेळेस घालुन घ्या. गूळ घातला की हे पूरण पुन्हा पातळसर होउ लागते. जर पूरण मिक्सरवर करायचे असेल तर; असे पातळ्सर असतानाच ते गॅस वरुन उतरवा आणि मिक्सरच्या भांड्यात घालुन बारिक करुन घ्या, अथवा पुन्हा जाडसर होइ पर्यंत हलवुन मग पूरण यंत्रातुन अथवा पाट्यावर वाटायला घ्या. जर मिकसरवर बारिक करायचे असेल, तर फिरवुन झाल्यावर पुन्हा गॅसवर ठेवुन घट्ट होइतो आटवुन घ्या. आता हे पूरण थंड व्हायला बाजूला ठेवुन द्या. हव असेल तर आता पूरणाचे शिजवणे संपले असल्याने पूरण एखाद्या बाऊलमध्ये काढुन, पूरण आटवलेल्या भांड्यात कट ओतून घ्या. त्यामुळे कट घट्ट आणि गोडसर होतो. एक भांडे घासायचे वाचते.

आपण आमटीसाठी जे खोबरं घेतलं आहे, तो तुकडा तसाच डायरेक्ट गॅसवर धरा. खोबर्‍यातल्या तेलाने तो पेटून उठेल. पेटू द्या जरा. मस्त काळा रंग आला, आणि खरपूस वास सुटला की आग विझवा आणि या खोबर्‍याचे तुकडे करुन घ्या. एक बारकासा कांदा जर मावे असेल तर १ मिनीट मावेत घालून घ्या. चुर्र्र्र्र्र असा आवाज येइल. काही ऐकू नका त्याची कागाळी. काढा बाहेर अन ठेवा त्यालाही डायरेक्ट गॅसवर!! तो ही तितकाच पेटून उठेल! जरा पेटू द्या. वरची दोन आवरणं जळाली अस वाटलं की गॅस बंद करा. अन वरची जळकी आवरणं काढुन कांदा सोलून घ्या. आता यात चमचाभर जीरे, दोन लवंगा, अर्ध बोट दालचीन, चार मिरे, दोन काड्या कोथींबीर अन चार पाच पाकळ्या लसूण घाला. हे सगळ एकत्र मिक्सरवर वाटुन घ्या. जरा जाडसर राहिलं तरी चालत. तोवर कटात एखाद दुसरं आमसूल टाकुन द्या.
फोडणी साठी गॅसवर एक छोटं भांड ठेवा अन त्यात तेल घाला जरा मोकळ्या ढाकळ्या हाताने. एव्हाना तूर डाळीचा अन बटाट्याचा कूकर झाला असेल. तो उघडून थंड व्हायला ठेवा अन त्या दुसर्‍या गॅसवर कटाचे भांडे चढवा. फोदणी साठी लसूण ठेचून घ्या. तेलावर लसूण, कढीपत्ता, हिंग,हळद घाला. आता त्यावर तिखट घाला. जरा परता आणि आपण खोबर्‍याचे जे वाटण वाटले आहे ते घाला. मस्त ठसका आला की ही फोडणी मोठ्या कटाच्या भांड्यात ओता. कटाला मस्त उकळी येउ दया. मिठ घाला. हवी असेल तर वरुन चिरलेली कोथींबीर पेरा अन आमटीचे भांडे खाली उतरवा. हवा असल्यास आणखी एखादा गूळाचा खडा यात टाकावयास हरकत नाही. 

आमटी तयार!!!




गॅसवर दुसर्‍या कढईत तेल गरम करुन, पापड पापड्या कुरडया सांडगे तळुन घ्या. फिफ्थ वन इज रेडी ऑलरेडी!!
पुन्हा एकदा कूकरला साकडे घाला अन पांढरा भात शिजवायला ठेवा याच गोंधळात. काय तीन शिट्ट्या! झाला.
आता जरा घोटभर पाणी प्या. तयार झालेला सगळा स्वयंपाक व्यवस्थीत बाजूला मांडुन ठेवा. गॅसवर जरा सगळं रिकामं करुन घ्या. अब हाजीर है क्विन ऑफ महाराष्ट्रा!
एव्हाना पूरण थंड झालं असेल. त्यावर सुंठ वेलचीची पूड टाकून चांगले मिसळुन, साधारण एका पोळीला लागेल एव्हढ्या आकाराचे मुटके करुन घ्या.

कणिकेवर जे पाणी आहे, ते ओतून द्या अन त्याच भांड्यात कणिक जरा तिंबुन घ्या. हे तिंबण जरा जोरकस व्हायला हवं. आठवा तो ऑफीसातला कलीग! साला प्रमोशनसाठी माझं काम स्वतःच्या नावावर खपवुन गेला. आठवा तो शेजारी, उठल सुठल भिंतीवर धडक्या मारत असतो, आंधळा! कालच रस्ता ओलांडताना ती बाईक अश्शी धडकून गेली....बास. झाली असावी कणिक तिंबुन. त्या कणकेचे एक टोक धरुन वर उचल्ले तरी न तुटता ती एक सारखी तार धरुन ओघळते ना खाली? झाली कणिक तिंबुन. आता हनीमुन आठवा.



हात स्वच्छ करुन घ्या. कणकेला जरा चांगल वाटीभर तेल ओतून ठेवा. गॅसवर तवा चढवा अन गरम होउ द्या. एकदा चांगला गरम झाला की आंच् मध्यम करुन घ्या. पोळपाटाला जरा अर्धी पळी तेल लावुन घ्या. लाटण्याचं पण अभ्यंग यातच होउ दे. मग याच तेलाच्या हाताने कणकेचा एक साधारण लिंबाएव्हढा तुकडा तोडा. तो गोळा सारखा करुन घ्या. कणिक चोहोबाजूने ओढत ओढत मध्ये रिचवायची म्हणजे अगदी गुळगुळीत गोळा तयार होतो. आता त्यात पूरणाचा मुटका भरा. सगळी कडुन फिरवत फिरवत तो मुटका कणकेच्या गोळ्याच्या आत गायब झाला की हा तयार झालेला गोळा पोळपाटावरचे तेल एकत्र करत त्यावर ठेवा अन हाताने दाबुन चपटा करा. यामुळे पूरण सगळीकडे सारखे पसरेल. अगदी तळहाताएव्हढा गोळा चपटा करत न्या अन मग लाटन्याला पुन्हा तेलाचा हात लावुन बोटांच्या चिमटीत लाटणे पकडुन पोळी पसरवायला सुरवात करा. साधारण आपल्या चपाती पेक्षा थोडा मोठा आकार झाला की तव्यावर तेल टाका सगळीकडे व्यवस्थीत.

लाटलेल्या पोळीवर पण एक तेलाची धार गोलसर फिरवा, पोळीच्या एका बाजूला लाटणे ठेवुन त्यावर पोळीची एक कडा टाका आणि हळुवार लाटण्याभोवती गुंडाळत पोळी पोळपाटावरुन उचला आणि तव्यावर टाका. तव्यावर टाकताना पोळीची गुंडाळेली आतली बाजू, जीच्यावर आपण शेवटी तेल टाकलयं, ती तव्यावर गेली पाहिजे. साधारण आंच मोठी करा. पोळी पचली की मस्त फुगायला लागते. मग तीला पुन्हा वरच्या बाजुने तेल लावुन उलथण्याने पलटी करा. मस्त खमंग भाजून घ्या.

पोळी तय्यार !  अरे हाय क्काय नि नाय क्काय !!



पोरासारांना हाका मारा! नैवेद्याची मूद काढा म्हणावं. ताटाला पापड कुरवडी, भाजी कोशींबीर लावायला सांगा. अन अश्या भरगच्च भरलेल्या राजदरबारात ही तव्यावरची पोळी अगदी हळुच घडी घालत ठेवा. वरुन जायफळ खिसा ठिपकाभर. त्यावर तूपाची धार घसघशीत. बाजूला दुधाची वाटी!



 

 अन मनोभावे त्या अन्न्पूर्णेला नमस्कार करा, अन म्हणा 
"देवा असाच गोडाधोडाचा नैवेद्य तुला मिळु दे! भरल्या ताटाचा आशिर्वाद माझ्या घराला लाभू दे!"


----------   मिसळ पाव