Thursday, 17 January 2013

त्र्यंबकेश्वर - संपूर्ण इतिहास


 

 

त्र्यंबकेश्वर - ब्राह्मणांचा गाव


त्र्यंबकेश्वर हे प्राचीन देवस्थान. भारतातल्या प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये या क्षेत्राची गणना होते. पूर्वापार लोक इथे येत आहेत. पण अगदी अलीकडे पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत इथे आजच्या इतकी गर्दी नव्हती,गजबज नव्हती. भाविक येतच असत,पण त्यांच्या झुंडी नसायच्या. महिन्याकाठी पाच-दहा नागबळी झाले,तरी पुष्कळ म्हणायचे; आज शेकडोंनी या पूजा होत आहेत. ही घडामोड लक्षणीय आहे. इथल्या बुजुर्ग मंडळींनाही त्र्यंबकेश्वरात अचानक वाढलेल्या या गर्दीचा अचंबा वाटतो !
शिवजी के दर्शन करने आये है जी|’
त्र्यंबकेश्वरात भेटलेला राजवर्धन शर्मा सांगत होता. राजवर्धन हा रायपूरचा. छत्तीसगढमधला. कुशावर्त तीर्थापासून सरळ वर जाणा-या गल्लीतल्या शिंपी समाजाच्या धर्मशाळेत त्याचा सहपरिवार मुक्काम होता. तिथंच तो भेटला होता. मध्यम वयाचा,मध्यम बांध्याचा,गोरापान चेहर्‍याचा,रेशमी कुडत्यावर कुठल्याशा सुगंधाचा दरवळ ल्यालेला राजवर्धन सांगत होता,
‘दो साल पहले कुंभ में यहॉं आया था...’
‘भाईजी,हम तैयार है,पूजा के लिये निकलना है ना?’
त्याच्या रूममधून त्याला कुणीतरी पुकारलं. रूममध्ये जाता जाता राजवर्धन म्हणाला,
‘चलते है जी... हमारे भाईसाब है,उनका नागबली करवाना है|’
त्र्यंबकेश्वरात तुम्ही केव्हाही गेलात तरी असा कुणी ना कुणी राजवर्धन तुम्हाला भेटेलच. कुठून कुठून इथे येत असतात लोक! गुजरात,राजस्थान,मध्यप्रदेश,छत्तीसगड,पंजाब,कर्नाटक,आंध्र... शिवाय परदेशात स्थायिक झालेले भारतीयही आधी अपॉईंटमेंटस् ठरवून येत असतात म्हणे! महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी तर त्र्यंबकेश्वर हक्काचंच. कुणाला नारायण बली करायचा असतो, कुणाला नागबली, कुणाच्या पत्रिकेत अनिष्ट योगांनी ठाण मांडलेलं असतं, त्यासाठी ग्रहशांती करायची असते. कुणाला आपल्या पितरांच्या उद्धारासाठी श्राद्ध घालायचं असतं,तर कुणाला त्र्यंबकेश्वराला रुद्राभिषेक करायचा असतो. कुणी केवळ त्र्यंबकेश्वराच्या निव्वळ दर्शनासाठी आसुसलेला असतो. इथले उत्सव असतात,यात्रा असतात,सण असतात,व्रतं असतात,इथे येण्यासाठी अशी अनेक निमित्तं असतात. गेला बाजार,दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा हे सर्वांत मोठं निमित्त! सगळी गोळाबेरीज केली तर वर्षाकाठी पंचवीस-तीस लाख यात्रेकरू सहज भरतील. सरासरीच्या भाषेत सांगायचं तर महिन्याला अडीच-तीन लाख, म्हणजे दिवसाला साडे आठ-नऊ हजार यात्रेकरू! २००१च्या जनगणनेनुसार,त्र्यंबकेश्वरची लोकसंख्या आहे दहा हजार, अगदी काटेकोरपणे सांगायचं तर ९८०४. म्हणजेच,कोणत्याही वेळी इथली सगळी डोकी मोजली, तर दर दोन डोळ्यांच्यामागे एक डोकं यात्रेकरूचं भरेल! या आकडेवारीवरून त्र्यंबकेश्वरात भाविकांची किती चहलपहल असते, हे स्पष्ट होतं.
त्र्यंबकेश्वर हे प्राचीन देवस्थान आहे. भारतातल्या प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये या क्षेत्राची गणना होते. पूर्वापार लोक इथे येत आहेत. पण अगदी अलीकडे पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत इथे आजच्या इतकी गर्दी नव्हती,गजबज नव्हती. भाविक येतच असत,पण त्यांच्या झुंडी नसायच्या. महिन्याकाठी पाच-दहा नागबळी झाले,तरी पुष्कळ म्हणायचे; आज शेकडोंनी या पूजा होत आहेत. ही घडामोड लक्षणीय आहे. इथल्या बुजुर्ग मंडळींनाही त्र्यंबकेश्वरात अचानक वाढलेल्या या गर्दीचा अचंबा वाटतो.
तसं पाहिलं तर, दूरदूरवरून यात्रेकरू येणं या गावाला नवे नाहीच. उदाहरणच द्यायचं झालं, तर इथे गोदावरीचं उगमस्थान असलेल्या दुर्गम ब्रह्मगिरीची वाट सोपी व्हावी म्हणून १९०७ साली दोन पंजाबी भाविकांनी पाचशे पाय-यांचं बांधकाम केलं,तसेच गंगाद्वारची चढण सोपी व्हावी म्हणून १९१८ मध्ये कच्छच्या एका भाविकाने अशीच पाय-या बांधून आपली सेवा इथे अर्पित केली होती. या घटना जवळपास शंभर वर्षांपूर्वीच्या आहेत. म्हणजेच,हा शिरस्ता जुना आहे, नवी आहे ती गर्दी!
त्र्यंबकेश्वर आजही तीन-साडेतीन हजार उंब-यांचंच गाव आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या आमदानीत त्र्यंबकेश्वरात नगरपालिका स्थापन झाली,ती इथल्या लोकसंख्येमुळे नव्हे,तर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणा-या यात्रेकरूंची सोय करणं सुलभ व्हावं म्हणून! आजही इथली लोकसंख्या नगरपालिकेसाठी आवश्यक निकष पूर्ण करत नाही. दीडशे वर्षांपूर्वी इथली लोकसंख्या अडीच-तीन हजार असेल, आज ती जवळपास तिप्पट झाली आहे. इतर गावं आणि शहरांच्या तुलनेत लोकसंख्यावाढीचा हा दर फारच कमी म्हणायचा. दीडशे वर्षांपूर्वी इथल्या सिंहस्थ पर्वणीला दहा-वीस हजार लोक येत असतील,आज ही संख्या लाखांच्या घरात मोजावी लागते. थोडक्यात, गावाची लोकसंख्या वाढत नाहीये, भाविकांची गर्दी वाढतेय! तीन-साडेतीन हजार उंब-यांचं हे गाव आता वेशीबाहेर विस्तारतंय,ते इथल्या लोकसंख्येमुळे नव्हे तर,भाविकांच्या सतत वर्दळीमुळे,मठ,आश्रम,भक्त निवास,धर्मशाळा,लॉजेस असा हा विस्तार आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात भारतभरातल्या सर्वच लहान-मोठ्या तीर्थक्षेत्रांमध्ये यात्रेकरूंची गर्दी सातत्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. हाच कल त्र्यंबकेश्वरमध्येही दिसत आहे. त्र्यंबकेश्वर मधल्या या घडामोडीला किनार आहे ती कर्मविधींची. राजवर्धन शर्मांसारखे हजारो भाविक शास्त्रपुराणांमध्ये सांगितलेले कर्मविधी पार पाडण्यासाठी त्र्यंबकेश्वरला येत असतात. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. राजवर्धन शर्मा सांगतो,
‘दोन वर्षांपूर्वी माझी परिस्थिती फारच वाईट होती. धंद्यात मंदी होती चारही बाजूंनी कोंडी झाली होती. खूप प्रयत्न करूनही सुटका होत नव्हती. धंद्यात असं,तर कुटुंबातही कटकटी सुरू झाल्या होत्या. घर मोडतंय की काय,अशी स्थिती झाली होती. अखेर एका ज्योतिषाला पत्रिका दाखवली, त्याने त्र्यंबकेश्वरात ग्रहशांती करण्यास सांगितलं. म्हणून सिंहस्थाच्या निमित्ताने इथं आलो. ग्रहशांती करवून घेतली. आता परिस्थिती खूप सुधारलीय. धंदा सुरळीत मार्गावर आलाय. कुटुंबातली भांडणं थांबली आहेत. माझ्या भावाला संततीचा प्रॉब्लेम आहे. त्याला नागबळी करायला सांगितलाय,म्हणून आता आम्ही इथे आलो आहोत. ‘गंगामैय्या की कृपासे सब ठिक हो जायेगा!’
इथल्या त्र्यंबकेश्वर,गोदेच्या रूपातील गंगामाईवर आणि त्यांच्या साक्षीने केलेल्या कर्मविधींवर लोकांची अशी श्रद्धा आहे. इथले शास्त्री-पुरोहित म्हणतात,लोकांना आज असुरक्षिततेच्या भयानं ग्रासलंय,खूप प्रयत्न करूनही म्हणावं तसं यश मिळत नाही,किंवा पदरात अपयशच येतं. मनोकामना पूर्ण होत नाहीत. इच्छित संतती प्रात होत नाही,देवधर्म केल्याने यथासांग कर्मविधी केल्याने मार्ग सापडेल,उन्नती होईल अशी आशा त्यांना वाटते. या आशेमागे मोठी परंपरा आहे, श्रद्धा आहे,विश्वास आहे. या क्षेत्राचं महात्म्य मोठं आहे. भाविकांना त्याची प्रचीती येते, त्यांच्या दुःखाचं निवारण होतं.
प्रवासात शेजारी एक आध्यात्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ बसले होते. त्यांच्याशी बोलता बोलता भाविकांचा विषय निघाला,तर ते म्हणाले,‘पापं एवढी वाढली आहेत,थोडं फार पुण्य पदरी पडावं म्हणून ही सगळी धडपड!’
त्यांचं म्हणणं, आज लोकांना कष्टाचा मार्ग नकोय. झटपट सुख आणि श्रीमंती हवीय. त्यासाठी देवाला साकडं घालतात. काहींच्याकडे भरपूर पैसा झालाय. भल्या-बु-या मार्गाने तो कमावलेला असतो. त्यामुळे मनात भीती असते,चिंता असते. देवाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि त्याच्या नावावर चार पैसे खर्च केले तर सगळं सुरळीत होईल अशी लोकांची धारणा झालीय. त्याचा हा परिणाम आहे.
एक खरे,की गेल्या पंधरा-वीस वर्षांत झपाट्याने आर्थिक-सामाजिक बदल घडत आहेत. मोठं संक्रमण होत आहे. आधीची घडी विस्कटली आहे,नवी घडी अजून बसायची आहे. लोक संक्रमित आहेत,चाचपडत आहेत,असुरक्षित झाले आहेत. कुणीसं म्हटलं आहे की,माणूस जेव्हा संभ्रमित होतो,दिशाहीन होतो तेव्हा त्याला श्रद्धेचा मार्ग जवळचा वाटतो. कदाचित असं काहीसं घडत असेल.
शिवाय मीडियाचाही प्रभाव आहेच. १९९१च्या सिंहस्थानंतर त्र्यंबकेश्वरात भाविकांचा ओघ वाढला. त्यावेळी देशभरात उपग्रहवाहिन्या अजून पोहोचल्या नव्हत्या,मात्र दूरदर्शनचं जाळं चांगलंच विस्तारलेलं होतं. त्यावेळी नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याचं प्रथमच सा-या देशाला दर्शन घडलं. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या महात्म्याबद्दल या काळात बरंच लिहिलं-छापलं गेलं. साहजिकच या तीर्थक्षेत्राचा लौकिक देशाच्या कानाकोप-यात सर्वसामान्यांपर्यंत पोहचला. २००३च्या सिंहस्थापर्यंत उपग्रहवाहिन्या चांगल्याच फोफावल्या. या सिंहस्थात त्यांनी किती कदर केली हे वेगळं सांगायला नकोच. त्र्यंबकेश्वराची ख्याती त्यामुळे आता सातासमुद्रापार पोहोचली आहे.
या सा-याच्या परिणामातून त्र्यंबकेश्वरात भाविक मोठ्या संस्थेने येत आहेत. देवदर्शन करत आहेत,कर्मविधी पार पाडत आहेत. त्यातून पैशांचीही मोठी उलाढाल होत आहे. वर्षाकाठी ती सहज काही कोटींच्या घरात जात असेल. अर्थात, भाविक यात्रेकरू हीच तीर्थक्षेत्रांची रोजीरोटी असते. इथलं अर्थकारण भक्तांशी बांधलेलं असतं. तीर्थक्षेत्राचा महिमा जितका मोठा, तितकी ही उलाढाल मोठी,हे चित्र भारतातल्या बहुतांशी तीर्थक्षेत्रांमध्ये दिसतं,त्र्यंबकेश्वर त्याला अपवाद कसं असावं?
नाशिक जिल्ह्यात,नाशिकपासून अवघ्या २८ किलोमीटर अंतरावर वसलेलं त्र्यंबकेश्वर हे इटुकलं गाव. गावातल्या नीलपर्वत या टेकडीवरून पाहिलं,तर सारं गाव एका मुठीत मावेल इतकं छोटं भासतं, आणि गोदेच्या उगमस्थानापासून म्हणजेच गंगाद्वारवरून पाहिलं, तर ते सहज दोन बोटांच्या चिमटीत पकडता येईल! आईच्या कुशीत एखादं लहान मुलं हातपाय दुमडून विसावतं, तसं हे गाव सह्याद्रीचा एक मानबिंदू असलेल्या ब्रह्मगिरीच्या कुशीत विसावलंय. मात्र या छोट्याशा गावाचा महिमा मोठा आहे. त्याला भक्कम पौराणिक अधिष्ठान लाभलंय. हे अधिष्ठान बहुपदरी आहे. देशभरातल्या बारा आद्य ज्योतिर्लिंगांपैकी हे एक. ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शिवाचं जागृत स्थान. दक्षिण गंगा मानलेल्या गोदावरीचं हे मूलस्थान. तसंच दर चार वर्षांनी संपन्न होणार्‍या कुंभमेळ्याच्या चार पवित्र स्थानांपैकी हे एक नाथपंथीयांचंही हे पवित्र स्थान आहे. गोरक्षनाथांनी इथं तपश्चर्या केली. निवृत्तिनाथांना इथेच गहिनीनाथांनी उपदेश दिला. याच स्थानी निवृत्तिनाथांनी संजीवन समाधी घेतली. त्र्यंबकेश्वराच्या लौकिकाला असे अनेक पदर आहेत.
त्र्यंबकेश्वराच्या स्थान महात्म्याच्या संदर्भात अनेक आख्यायिका, धार्मिक ग्रंथांमधून सांगितल्या आहेत. भगवान शंकराचा इथं साक्षात् निवास आहे, असं मानलं जातं. त्याविषयी आख्यायिका अशी आहे-
ब्रह्मदेवाने एकदा विष्णूला म्हटले,‘मी सृष्टिकर्ता असल्यामुळे शिवमहिमा काय तो मलाच माहीत आहे.’ विष्णूने मात्र नम्रपणे सांगितलं की,‘मी पुष्कळ तप केलं, परंतु मला अजूनही शिवाचं ज्ञान झालेलं नाही.’ या संवादानंतर ब्रह्मा आणि विष्णूंनी शिवाचा शोध घ्यावा असं ठरवलं. ब्रह्माने शिवाचं मस्तक शोधावं आणि विष्णूने चरण. दोघांनी पुष्कळ शोध घेतला, पण तो व्यर्थ ठरला. तेव्हा ब्रह्मदेवाने एक कारस्थान रचलं. त्याने आपल्या सामर्थ्याने गाय आणि केतकीपुष्प निर्माण केलं आणि त्यांना आपल्या बाजूने साक्ष देण्यास राजी करत आपल्याला शिवाचं मस्तक सापडल्याचा दावा केला. देवांना या दाव्याबद्दल शंका वाटली. तिचं निराकरण करण्यासाठी ते शिवलोकात गेले. त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाचं कारस्थान शिवाच्या ध्यानात आलं. तो क्रोधीत झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाला शाप दिला, ‘आजपासून भूतलावर तुझी कोणीही पूजा करणार नाही.’
ब्रह्मदेवालाही शिवाचा राग आला आणि त्यानं शिवाला प्रतिशाप दिला. ‘तू भूतलावर पर्वत होऊन राहशील’
नंतर ब्रह्मदेवाला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. त्याने शिवाची तपश्चर्या केली. शिव प्रसन्न झाला. त्याने ब्रह्मदेवाला वचन दिलं,‘पर्वतरूपाने भूतलावर माझं वास्तव्य असेल आणि या पर्वताचं नाव ब्रह्मगिरी असेल!’
तोच हा ब्रह्मगिरी पर्वत. याच ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आद्य ज्योतिर्लिंगाचं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. या मंदिरात शिवपिंडींवर शाळूंका नाही. कळशीभर पाणी मावेल एवढ्या खड्‌ड्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची बारालिंगं आहेत. या पिंडीतून सतत पाणी स्रवत असतं.
शिवाच्या शापाला उःशाप म्हणून की काय, त्र्यंबकेश्वरात ब्रह्मा, सावित्रीचं मंदिर आहे, मात्र ते गावापासून थोडं दूर अंतरावर आहे. ब्रह्मदेवाची फारशी मंदिरं आढळत नाहीत. राजस्थानात पुष्कर इथे एक मंदिर आहे. त्र्यंबकेश्वरातलं मंदिर असंच दुर्मिळ आहे.
वास्तविक, ब्रह्मगिरी हा सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल पर्वत आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १२९५ मीटर आहे. याच्या दक्षिणेला कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन अशी सह्याद्रीतली उत्तुंग शिखरं आहेत. ब्रह्मगिरी पर्वतातून वैतरणा, अहिल्या आणि गोदावरी या नद्यांचा उगम होतो. वैतरणा पश्चिम दिशेने खाली उतरते आणि अरबी समुद्राकडे जाते तर गोदावरी पूर्वेच्या दिशेने विशाल प्रदेश कवेत घेत आंध्रप्रदेशात राजमहेन्द्री इथे बंगालच्या उपसागराला मिळते. ही नदी मोठा भूप्रदेश व्यापत असल्याने,दक्षिण भारतातली ती महत्त्वाची नदी आहे.
भारतीय संस्कृतीत नद्यांना देवता मानलं गेलंय. नदीचं उगमस्थान पवित्र क्षेत्र मानलं जातं. सर्वसाधारणपणे सर्वच नद्यांच्या उगमस्थानी शिवाचं अधिष्ठान असल्याचं आढळतं. गोदावरी नदीलाही हे महात्म्य प्राप्त झालंय. पुराणांमध्ये गोदावरीची जन्मकथा सांगितली आहे.
भगवान शंकराच्या जटेतलं गंगेचं अस्तित्व पार्वतीला रुचत नव्हतं. ही गोष्ट गणपतीच्या ध्यानात आली. गणपतीने वृद्ध तपस्व्याचं रूप धारण करून गौतमऋषींच्या आश्रमात वास्तव्य केलं आणि मोठ्या युक्तीने गौतमऋषींच्या हातून गोहत्येचं पातक घडवून आणलं. हे पातक दूर कसं होईल असा प्रश्न गौतमऋषींना पडला. तेव्हा गणपतीने त्यांना शंकराची तपश्चर्या करून गंगेचं वरदान मागण्याचा आणि तिच्या पाण्यात स्नान करून हे पातक दूर करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, गौतमऋषींनी शंकराची तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाला तेव्हा त्यांनी गंगेची मागणी केली. शंकराने ती मान्य केली, मात्र गंगा जटेतून बाहेर येण्यास तयार होईना. तेव्हा शंकर क्रोधित झाला आणि त्याने ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि गंगेचा प्रवाह मोकळा केला. अशाप्रकारे गंगा ब्रह्मगिरी पर्वतावर अवतरली. पण ती लगेचच लुप्त झाली. गौतमऋषींनी विष्णूची आराधना करून तिला परत मिळवलं. दर्भाच्या कुशाने चौकोन रेखून त्यांनी तिला अडवलं. हेच कुशावर्त तीर्थ या तीर्थात गौतमऋषींनी स्नान केलं आणि त्यांचं गोहत्येचं पातक दूर झालं.
गौतमऋषींच्या तपश्चर्येनं गंगेची प्राप्ती झाली म्हणून तिला ‘गौतमी गंगा’ असं म्हटलं जातं, तर तिनं गोहत्येचं पातक दूर केलं म्हणून ती. ‘गोदावरी’ झाली. ‘गोदा महात्मा’मध्ये गोदेची महती वर्णन केलेली आहे. गोदास्नान पुण्यदायी मानलं जातं. त्र्यंबकेश्वरात गोदावरी उगम पावत असल्यानं तिथं तिला ‘मूळ गोदावरी’ म्हणतात. कुशावर्त तीर्थात तिचं वास्तव्य आहे, त्यामुळे हे तीर्थ परम पवित्र मानलं जातं. त्र्यंबकेश्वर मंदिरामागे अहिल्या आणि गोदावरी यांचा संगम झाला आहे. हे संगमक्षेत्रही पवित्र मानलं जातं.
कुशावर्त तीर्थात अस्थिंचा विलय होतो, असं मानलं जातं. श्राद्धादिक कर्म कुशावर्त तीर्थावर केल्यानं पितरांचा उद्धार होतो, असं धर्मग्रंथ सांगतात. या संदर्भात श्रीरामाचा दाखला दिला जातो. श्रीराम वनवासात असताना पंचवटीत त्यांचा मुक्काम होता. तेव्हा कश्यपऋषींनी श्रीरामाला त्र्यंबकेश्वरी कुशावर्त तीर्थावर जाऊन पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्धादिक कर्मं करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार श्रीरामाने इथे हे कर्म केले असा उल्लेख स्कंद पुराणात आहे.
दर बारा वर्षांनी सिंह राशीत गुरुचा जेव्हा प्रवेश होतो, तेव्हा त्र्यंबकेश्वर इथे कुंभमेळा संपन्न होतो. यावेळी गुरु सिंह राशीत असल्याने, याला ‘सिंहस्थ पर्व’ म्हणतात. गुरु एका राशीत साधारण बारा महिने, म्हणजे एक वर्ष राहात असल्याने तो पुन्हा सिंह राशीत येण्यास बारा वर्षे लागतात. कुंभमेळ्याविषयी आख्यायिका सर्वपरिचित आहे.
देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केलं. या मंथनातून इतर रत्नांबरोबरच अमृतकुंभाचाही लाभ झाला. हा अमृतकुंभ स्वर्गात सुरक्षितरीत्या नेण्याची जबाबदारी इंद्रपुत्र जयंत यांच्यावर सोपवण्यात आली. हा कुंभ स्वर्गात नेत असताना दानवांनी देवांवर हल्ले करून कुंभ मिळवण्याचा वारंवार प्रयत्न केला. देवांनी त्यांना प्रतिकार केला. देव-दानवांमध्ये एकूण चार युद्धं झाली. प्रत्येक युद्धाच्या वेळी अमृतकुंभ भूतलावर ठेवण्यात आला. हरिद्वार, प्रयाग, त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन ही ती चार ठिकाणं. अमृतकुंभाचा स्पर्श झाला म्हणून या चार स्थानी कुंभमेळे संपन्न होतात.’
कुंभमेळ्यांचं वेळापत्रक गुरुच्या भ्रमणानुसार ठरलेलं आहे. जेव्हा कुंभराशीत गुरु असतो,तेव्हा प्रयाग इथे कुंभमेळा भरतो. आधी म्हटल्याप्रमाणे गुरु सिंह राशीत असताना त्र्यंबकेश्वर इथे, तर गुरु सिंह राशीतच पण त्याचबरोबर रवि मेष राशीत आणि चंद्र तूळ राशीत असतात तेव्हा उज्जैन इथे कुंभमेळा संपन्न होतो.
सिंहस्थपर्व काळात त्र्यंबकेश्वर इथे सर्व देव-देवतांचा निवास असतो,असं मानतात. पुराणातील आख्यायिकेनुसार,गौतमऋषींना शिवाने गंगा देण्याचं वचन दिलं,परंतु गंगा भूतलावर येण्यास राजी नव्हती; तेव्हा सर्व देवदेवतांनी तिला वचन दिलं, की सिंहस्थपर्व काळात आम्ही तुझ्या समीप येऊन राहू. त्यामुळे सिंहस्थपर्व काळात मूळ गोदावरीत स्नान करणं पुण्यदायी असल्याची समजूत आहे. या काळात ठिकठिकाणचे महंत आणि साधू त्र्यंबकेश्वरात मुक्काम करतात आणि मिरवणुकीने शाही स्नानासाठी कुशावर्त तीर्थावर येतात. नागा साधू हे त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य मानलं जातं. हे साधू निर्वस्त्र राहतात. पर्वणीच्या वेळी भल्या पहाटे ते कुशावर्त तीर्थावर येतात आणि दिवस उजाडण्यापूर्वी आपल्या आखाड्यात परत जातात.
पुराणादी धर्मग्रंथांमध्ये त्र्यंबकेश्वराला त्रिसंध्या क्षेत्र असं संबोधलं आहे. त्र्यंबकेश्वर हे मुक्ती देणारं महाक्षेत्र मानलेलं आहे. ‘अतो विमुक्तिदं क्षेत्र त्रिसंध्याख्यामिति धु्रवम्‌|’ असं या संदर्भातील संस्कृत वचन आहे. हिंदू धर्मात पुनर्जन्माचा विचार आहे. जन्म-मरणाच्या फे-यातून सुटका होणं, म्हणजे मोक्षप्राप्ती. मनुष्य जन्मात पुण्यसंचय केल्याने मोक्षप्राप्ती होते अशी धारणा आहे. गत्‌जन्मातील पाप-पुण्याची ङ्गळं या जन्मात मनुष्याच्या वाट्याला येतात, असं मानलं जातं. या जन्मीच्या सुख-दुःखांचा संबंध अशाप्रकारे गतजन्मीच्या पाप-पुण्याशी जोडलेला आहे. पूर्व जन्मातील पापकर्म या जन्मात शाप होऊन त्रास देते. धर्मग्रंथात हे शाप अन्य प्रकारचे सांगण्यात आले आहेत. त्यापैकी प्रेत शाप, पितृ शाप किंवा सर्प शाप असेल तर पुत्रसंतती होत नाही, शारीरिक त्रास उद्भवतो असं सांगितलं जातं. जन्म कुंडलीतल्या काही ग्रहदशा अशा शापांचे संकेत देतात. अशा कुंडल्यांना शापित कुंडल्या म्हटलं जातं. कालसर्प योगाची कुंडली अशा शापित कुंडलींपैकी असते. असं शास्त्री-पुरोहित सांगतात. अशा प्रकारच्या पापांतून-शापांतून मुक्ततेसाठी त्र्यंबकेश्वरी ग्रहशांती, नारायणबळी, नागबळी विधी करावेत असं सांगितलं जातं.
‘गोदावर्या कुशावर्ते त्रिसंध्या क्षेत्र भूमीषु |
पीडानां परिहारार्थ कार्यो नारायण बलीः ||
असा या संदर्भातला श्लोक स्कंद पुराणात आहे. पुत्रसंतती व्हावी म्हणून नारायणबळी, नागबली हे विधी करावेत, त्याचप्रमाणे इतर सर्व प्रकारच्या शापांतून-पिडेतून मुक्तीसाठी हे ग्रहशांती हे विधी करावेत असं इथले शास्त्री-पुरोहित सांगतात. नारायणबळी आणि नागबळी हे दोन्ही विधी स्वतंत्रपणे किंवा एकत्रपणे करता येतात. पिडेच्या स्वरूपावरून हे ठरवता येतं. पूर्व जन्मात व्यक्तीच्या हातून सापाची वा नागाची हत्या झाली असेल, तर त्याच्या शापाने पुत्रसंतती होत नाही, यासाठी नागबळी हा विधी धर्मशास्त्राने सांगितला आहे. हे विधी श्राद्ध स्वरूपाचे आहेत. ते प्रत्येकी तीन दिवसांचे असतात. त्यामध्ये विष्णू श्राद्ध, नाग दहन वगैरे विधींचा समावेश असतो. विधीच्या काळात उपवास, सुतक पालन सांगितलेले आहे. तिस-या दिवशी ब्राह्मण भोजन आणि दक्षिणा दानाने या पूजेची सांगता होते. विधी समाप्तीनंतर सुवर्णाच्या नागाचे दान करावे, असे संकेत आहेत. आपल्या प्राप्तीचा सहावा किंवा दहावा भाग दानासाठी खर्च करावा असे धर्मशास्त्र सांगतं. हे विधी पूर्ण मनोभावे व श्रद्धापूर्वक केले, तर त्याचं फळ निश्चित लाभतं, असा दावा केला जातो. त्र्यंबकेश्वरच्या स्थान महात्म्याचे हे प्रमुख पैलू आहेत. भक्कम पौराणिक अधिष्ठानावर हे तीर्थक्षेत्र उभं आहे.
प्राचीन धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये त्र्यंबकेश्वरचे उल्लेख आढळत असले, तरी आज जी वस्ती इथं आहे, तिचं वय साधारणपणे पाचशे वर्षांचे आहे, म्हणजेच आज जी व्यवस्था इथे दिसते, तिची जडणघडण गेल्या चारशे-पाचशे वर्षांतली आहे. अर्थात् त्या आधीही इथे वहिवाट होतीच. मुळात हा प्रदेश ठाकर, महादेव कोळी अशा आदिवासींचा. शेती करणं, गुरं पाळणं हे आदिवासींचे व्यवसाय. शीव, कमळजा, राम, वीर, भैरोबा, मरीआई आदी यांची दैवतं त्र्यंबकेश्वर हा मूळचा यांचा देव. त्याच्या पूजे-अर्चेच्या वहिवाटीसाठी ब्राह्मण इथे आले. त्र्यंबकेश्वरला लाभलेल्या स्थान महात्म्यामुळे त्यांचं बस्तान इथे बसलं. शीवकाळात आणि नंतर पेशवाईत त्र्यंबकेश्वरला स्थैर्य लाभलं आणि उपजीविकेसाठी कोकण तसंच पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातून अनेक ब्राह्मण इथे येऊन स्थायिक झाले. आज त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी इथल्या पूजे-अर्चेचा, कर्मविधींचा वारसा पुढे चालवला आहे.
त्र्यंबकेश्वराचं दर्शन आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा ही परंपरा जुनी आहे. संत ज्ञानेश्वरांचा काळ इसवी.सनाच्या तेराव्या शतकाचा. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ब्रह्मगिरी पर्वतावरच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेल्या गहिनीनाथांचे दर्शन निवृत्तिनाथांना घडलं. गहिनीनाथ नाथ संप्रदायाचे,त्यांचे गुरू गोरक्षनाथांनीही त्र्यंबकेश्वरी तप केलं होतं. गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. उपदेश केला. निवृत्तिनाथांनी हा उपदेश ज्ञानेश्वरांना केला. पुढे ज्ञानेश्वरांनी आळंदीत संजीवन समाधी केली. सोपानदेवही समाधिस्त झाले, मुक्ताबाई आकाशतत्त्वात विलीन झाली, त्यानंतर उद्विग्न झालेल्या निवृत्तिनाथांनी त्र्यंबकेश्वरची वाट धरली. त्यांनी म्हटलं,
‘आता माझे श्रम| नका घेऊ हरी ॥
जावे त्र्यंबकेश्वरी | समाधीसी ॥
ज्या स्थानी ज्ञानप्राप्ती झाली त्याच त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तिनाथांनी संजीवन समाधी घेतली. या घटनेला आता सातशे वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. निवृत्तिनाथांच्या समाधीमुळे त्र्यंबकेश्वरच्या स्थान महात्म्यात आणखी भर पडली. वारकरी संप्रदायाचंही ते श्रद्धास्थान बनलं.
ब्रह्मगिरी पर्वतावरचा त्रिंबक गड हे त्या काळातल्या राजकीय घडामोडींचं केंद्र. देवगिरीच्या राजा रामचंद्रदेव यादव याच्या अधिपत्याखाली काही काळ हा गड होता. त्यानंतर त्याची बरीच हस्तांतरं झाली. इ.स.१६२९ मध्ये हा किल्ला शहाजीराजांच्या ताब्यात असल्याची नोंद मिळते. शहाजीराजांकडे नासिक, संगमनेर, जुन्नर आणि कोकण हा प्रदेश होता, मात्र शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात हा गड दाखल झाला. इसवी सन १६७२ मध्ये मोरोपंत पिंगळ्यांनी हा गड जिंकला होता, मात्र या किल्ल्यावरचं मराठ्यांचं अधिपत्य फार काळ टिकलं नाही. इसवी सन १६८२ च्या सुमारास हा गड मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे इसवी सन १७५१ मध्ये त्रिंबक सूर्याजी प्रभू यांनी हा गड जिंकून पेशवाईत दाखल केला. त्र्यंबकगड ताब्यात यावा म्हणून तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेबांनी त्र्यंबकेश्वराला साकडं घातलं होतं. गड ताब्यात आल्यानंतर त्यांनी हा नवस फेडण्याची नोंद पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये मिळते. पुढे पेशवाईच्या पतनानंतर हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आज या गडाचे भग्नावशेष आढळतात.
शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीवर जाण्याआधी त्र्यंबकेश्वरी आले होते अशी नोंद मिळते. आपदेव भट ढेरगेशास्त्री हे शिवाजी महाराजांचे तसंच नागपूरकर भोसल्यांचे तीर्थोपाध्याय होते. त्र्यंबकगड स्वराज्याच्या अधिपत्याखाली नव्हता, तेव्हा मोगलांचे लोक त्याच्या भिक्षुक ब्राह्मणांना त्रास देत. ढेरगेशास्त्रींच्या माध्यमातून ही माहिती शिवाजी महाराजांना मिळाली होती. त्यांनी इथल्या ब्राह्मण-पुरोहितांच्या रक्षणासाठी कौल लावून कौलनामा जारी केला होता आणि ब्राह्मणांना आधार दिला होता. शिवाजीच्या काळातच इथल्या ऋग्वेदी आणि यजुर्वेदी ब्राह्मणांमध्ये यजमानांचे पौरोहित्य करण्याच्या संदर्भात वाद निर्माण झाला होता. त्यावर शिवाजी महाराजांनी निवाडा दिल्याची नोंद शिवकालीन पत्रव्यवहारामध्ये आढळते. या निवाड्यानुसार ऋग्वेदी यजमानांचं पौरोहित्य ऋग्वेदी पुरोहितांनी, तर यजुर्वेदी यजमानांचे पौरोहित्य यजुर्वेदी पुरोहितांनी करावं. इतर यजमानांची कृत्ये यजमान आणि ब्राह्मण यांच्या परस्पर इच्छेनुसार करावीत अशी व्यवस्था त्यांनी लावून दिली.
पेशवाईच्या काळात त्र्यंबकेश्वरची ख-या अर्थाने भरभराट झाली. पेशव्यांनी घालून दिलेल्या व्यवस्था आजही ब-याच प्रमाणात प्रचलित आहेत. त्र्यंबकगड हाती यावा यासाठी पेशव्यांचे सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांनी त्र्यंबकेश्वराला नवस केला होता. या नवसाची फेड म्हणून पेशव्यांनी त्र्यंबकेश्वरला सोन्याचा मुखवटा व वस्त्रं अर्पण केली. इ.स. १७५१ मध्ये त्र्यंबकगड पेशवाईत दाखल झाला त्यानंतर काही काळ नानासाहेब पेशव्यांचं त्र्यंबकगडावर वास्तव्य होतं.
त्र्यंबकेश्वराचं आजचं भव्य मंदिर ही पेशवाईची देणगी. नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराची उभारणी केली. सन १७५५ मध्ये हे बांधकाम सुरू झालं. ते १७८६ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पूर्ण झालं. त्यासाठी त्या काळात दहा लाखांवर रुपये खर्च झाले. संपूर्ण दगडी बांधणीचे हे मंदिर ऐटबाज आहे. मंदिराच्या भोवती चिरेबंदी बांधणीचा तट आहे. विशाल फरसबंदी प्रांगणात हे मंदिर विसावलेलं आहे. या पूर्वाभिमुखी मंदिराची रचना पंचदालनी आहे. मंदिराच्या तीन बाजूंना सुबक कलाकुसरीचे प्रवेशमंडप आहेत. मंदिरावर पाच कळस आहेत. कळसांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. तत्कालीन स्थापत्यकलेचा हा एक उत्तम नमुना आहे. आपल्याकडे मंदिरांच्या पुरस्कर्त्यांच्या नोंदी मिळतात, पण प्रत्यक्ष रचनाकर्त्यांची आणि कारागिरांची नावं मात्र काळाच्या ओघात लुप्त होतात. हे एकप्रकारे दुर्दैवच.
त्र्यंबकेश्वराच्या पूजे-अर्चनेची. वहिवाट पेशव्यांनी कायम केली. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांकरता नियम घालून दिले. ब्राह्मणांनी सोवळ्यातच देवाजवळ जावे, झगा, मुंडासे असा वेश करून ओवळ्याने देवाजवळ जाऊ नये, ब्राह्मणेतरांनी देवाचं गाभा-याच्या बाहेरूनच दर्शन प्यावं, अस्पृश्यांनी देवळाच्या बाहेरून दर्शन घ्यावं, स्त्रियांनी दरवाजाच्या बाहेरूनच देवदर्शन करावं असे हे नियम होते. या नियमात कसूर झाल्यास प्रायश्चित घेणं भाग होतं. त्र्यंबकेश्वराच्या त्रिकाल पूजेची परंपरा होती. ती पेशव्यांनी कायम केली. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन प्रहरांच्या पूजेचे अधिकार शुक्ल, तेलंग आणि दशपुत्रे या घराण्यांकडे होते. ते पेशव्यांनी कायम केले. आजही ही व्यवस्था कायम आहे. या तीन घराण्यांकडे त्र्यंबकेश्वराच्या पूजेचे अधिकार आहेत.
त्र्यंबकेश्वराची पूजा उतरवण्याचे अधिकार तुंगार घराण्याकडे आहेत. त्र्यंबकेश्वरासमोरील दानपात्रात जमा होणा-या दक्षिणेवर या घराण्याचा अधिकार आहे. असं म्हणतात की, औरंगजेबाचे लोक त्र्यंबकेश्वरातील ब्राह्मण-पुरोहितांना त्रास देत. त्र्यंबकेश्वराचं मंदिर लुटण्याचा-उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा डाव होता त्यावेळी तुंगार घराण्यातल्या मंडळींनी पुढाकार घेतला. त्यांनी लोकवर्गणी काढून जमलेली रक्कम औरंगजेबाच्या लोकांच्या हातावर ठेवली आणि मंदिराचं रक्षण केलं. त्यांच्या या कामगिरीमुळे संभाजीराजांनी तुंगार घराण्याला हा अधिकार दिला. पेशव्यांनी हा अधिकार कायम केला, पुढे ब्रिटिशांनीही त्यात ढवळाढवळ केली नाही. आजही हा अधिकार तुंगार घराण्याकडे आहे. मंदिराच्या लगतच तुंगाराची घरं आहेत. असंही म्हणतात की, महादेव कोळ्यांकडून देवस्थानची देखभाल नीट होत नसल्याने तुंगारांनी संभाजीराजांकडे देवळाचा ताबा मागितला आणि तुंगारांचं योगदान ध्यानात घेऊन संभाजीराजांनी त्यांना तो बहाल केला.
पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नारो अप्पाजी जोगळेकर यांच्याकडे सोपवली होती. नारो अप्पाजी मूळचे कोकणातले उपजीविकेची सोय व्हावी म्हणून ते नाशिकला आले. त्यांचे एक नातेवाईक गोविंद हरी सहस्त्रबुद्धे नाशिकजवळ मणूर येथे राहात होते. त्या काळात त्र्यंबकवर मोगलांचं अधिपत्य होतं; मात्र त्र्यंबकची सरदेशमुखी पेशव्यांकडे होती. पेशव्यांच्या वतीने मोगलांशी वाटाघाटी करण्याचे आणि त्र्यंबकेश्वरामध्ये वसुली करण्याचं काम सहस्त्रबुद्धे करीत. सहस्त्रबुद्ध्यांनी हे काम जोगळेकरांकडं सोपवलं. जोगळेकरांनी या कामात जम बसवला आणि पेशव्यांची मर्जी संपादन केली. तेव्हापासून त्र्यंबकेश्वर देवस्थानाचं व्यवस्थापन पिढ्यान् पिढ्या जोगळेकर घराण्याकडे चालत आलं. त्र्यंबकेश्वर देवस्थानाची आर्थिक गरज पेशव्यांच्या तिजोरीतून भागवली जात होती. त्यासाठी वर्षासन ठरवून देण्यात आलं होतं. त्याचे हिशेब जोगळेकरांकडून पेशवे दरबारात सादर होत असत. पुढे ब्रिटिश आमदनीतही शासनाकडून वर्षासनाची परंपरा कायम राहिली. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बांधकामाआधी कुशावर्त तीर्थावर घाट बांधण्याचं काम सुरू झालं होतं. सन १७५० मध्ये इंदूरच्या होळकर सरदारांचे फडणवीस रावजी महादेव पारनेरकर यांनी हे काम सुरू केलं. ते १७६८ मध्ये पूर्ण झालं. कुशावर्त तीर्थाच्या तीन बाजूंनी ओव-या बांधलेल्या आहेत. हे संपूर्ण बांधकाम दगडी आणि शिल्पसौंदर्याने नटलेलं आहे. कुशावर्त तीर्थ हाही परंपरागत भारतीय वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे. या बांधकामासाठी त्या काळात सात लाख रुपये खर्च झाला. पेशव्यांचं कुशावर्त तीर्थाच्या बांधकामावर लक्ष होतं. त्या संदर्भात ते अनेक बारीक-सारीक सूचना करत असत. या तीर्थासंबंधीही त्यांनी नियम घालून दिले होते. हिंदूंशिवाय अन्य धर्मीयांनी तीर्थात जाऊ नये, आस एक नियम होता. या तीर्थावर श्राद्धादी कर्मे होत असल्याने लोक मुंडन करीत. हे केस तीर्थापासून दूर नेऊन टाकावे असा नाभिकांसाठी त्यांनी नियम केला होता. तीर्थावर केस आढळल्यास नाभिकांना जबाबदार धरून त्याचं प्रायश्चित करवून घेतलं जाई.
सिंहस्थ पर्वणीच्या काळात विविध पंथांचे साधू कुशावर्त तीर्थात स्नानासाठी येत असत. तेव्हा स्नानाच्या अधिकारावरून त्यांच्यात तंटे होत. लढाया होत. एका सिंहस्थात गिरी आणि पुरी यांच्यात स्नानावरून झगडा झाला. तेव्हा पेशव्यांनी दोन्ही महंतांचे हात धरून कुशावर्तात स्नान केलं आणि हा झगडा मिटवला असा उल्लेख आढळतो. साधूंच्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील शाहीस्नानांची व्यवस्था पेशव्यांनीच लावून दिल्याचा इतिहास आहे.
भक्तश्रीमंत असलेला त्र्यंबकेश्वर पेशव्यांच्या काळातच ख-या अर्थाने ‘श्रीमंत’ झाला. विरक्त योगी असलेल्या त्र्यंबकेश्वराला पेशवाईत अनेकांनी दागदागिने आणि सुवर्णालंकार अर्पण केले. त्र्यंबकगड पेशवाईत आल्याने नवसपूर्ती म्हणून पेशव्यांनी त्र्यंबकेश्वराला सोन्याचा पंचमुखी मुखवटा चढवण्याचा उल्लेख आधी केला आहेच. दिल्लीचा जामदारखाना जेव्हा पेशव्यांच्या हाती आला, तेव्हा मोगलांनी म्हैसूरमधून लुटून रत्नजडित मुकुट या जमादारखान्यात होता. पेशव्यांनी हा मुकुट त्र्यंबकेश्वरी आणून शिवाजी अर्पण केला. आजही हा मौल्यवान दागिना त्र्यंबकेश्वराच्या तिजोरीत आहे. दर सोमवारी त्र्यंबकेश्वराचा मुखवटा कुशावर्त तीर्थावर मिरवणुकीने स्नानासाठी नेण्याची प्रथा आहे. या मिरवणुकीनंतर देवस्थानच्या कार्यालयात हा मुकुट भाविकांना दाखवला जातो. एका सोमवारी पेशवे आपले लष्कर आणि सरंजाम घेऊन या मिरवणुकीत हत्तीवर बसून सहभागी झाले होते, त्यावेळी हा रत्नजडित मुकुट त्यांनी आपल्या हाती धरला होता. पेशव्यांच्या या स्वारीचं चित्र त्र्यंबकेश्वरमधील हरी नावाच्या चित्रकारानं चित्तारलं होतं; दुस-या बाजीरावाच्या कारकीर्दीत हे चित्र नष्ट झाल्याचा उल्लेख नारो अप्पाजी जोगळेकरांच्या पुढच्या पिढीतील दामोदर गोविंद जोगळेकर यांनी लिहिलेल्या वृत्तांतात आहे.
पेशवाईच्या काळात अनेक मातब्बर मंडळींनी इथल्या मंदिरांचा, तीर्थांचा, कुंडांचा जीर्णोद्धार केला. सुबक-देखणी बांधकामं केली आणि या गावाच्या शिल्पसौंदर्यात भर घातली. या गावावर आजही ‘पेशवाई छाप’ स्पष्टपणे दिसते.
पेशव्यांनी घालून दिलेल्या व्यवस्थेमध्ये ब्रिटिश आमदनीत ङ्गारशी ढवळाढवळ झाली नाही. त्र्यंबकेश्वर देवस्थानचा कारभार जोगळेकर घराण्याकडे होता. ब्रिटिश आमदनीत देवस्थानचा ट्रस्ट स्थापन झाला आणि जोगळेकरांची या ट्रस्टवर एकमेव सदस्य म्हणून नियुक्ती झाली. ही व्यवस्था अगदी अलीकडे म्हणजे, १९८५ पर्यंत कायम होती. त्याआधी जोगळेकर घराण्याचे आताचे वारसदार भास्कर महादेव जोगळेकर यांनी विश्वस्तपदाची सूत्रं शासनाच्या हवाली केली होती. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या लगतच्या गल्लीतच जोगळेकरांचा चौसोपी वाडा आजही रुबाबदारपणे उभा आहे. या वाड्याचे भक्कम लाकडी खांब, तुळया, प्रशस्त दिवाणखाना, गालिचा, झुंबरं गतवैभव जपत आहेत. भास्कररावांचं वय आज ऐंशीच्या पुढे आहे. त्यांचे वडील माधवरावांनी त्र्यंबकेश्वरात अनेक सुधारणा घडवून आणल्याचं ते आवर्जून सांगतात.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची वास्तूसुद्धा ऐटबाज आहे. पेशव्यांच्या काळाच्या खुणा या वास्तूनेही जपल्या आहेत.
आता त्र्यंबकेश्वर देवस्थानचा सार्वजनिक ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. या ट्रस्टवर पाच जणांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे दिवाणी न्यायाधीश या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी या ट्रस्टचे पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत. या शिवाय गावातील तीन प्रतिष्ठित व्यक्तींची या ट्रस्टवर सदस्य म्हणून नियुक्ती होते. या तीन सदस्यांपैकी भाऊलाल शेठ सारडा हेच आज हयात आहेत. अन्य दोन मयत सदस्यांच्या जागेवर अद्याप शासनाकडून नियुक्ती झालेली नाही.
त्र्यंबकेश्वर देवस्थानला उत्पन्नाचं नियमित साधन नाही. दानपात्रातील रकमेवर तुंगार घराण्याचा अधिकार असल्याने तो पैसा देवस्थानला मिळत नाही. कायद्यानुसार, ट्रस्टला मंदिरात स्वतंत्र दानपेट्या ठेवण्याचा अधिकार नाही. यावर तोडगा म्हणून माधवराव जोगळेकर एकमेव विश्वस्त असताना त्यांनी ट्रस्टने भाविकांकडून देणग्या घेण्याचा मार्ग काढला. या देणग्या ट्रस्टच्या कार्यालयात स्वीकारल्या जातात. त्याची रीतसर पावती दिली जाते. देणग्या गोळा करणं सोयीचं व्हावं म्हणून आता मंदिराच्या आवारातच काऊंटर उघडण्यात आले आहे. तथापि, त्र्यंबकेश्वर मंदिर हा स्थापत्यकलेचा राष्ट्रीय ठेवा मानला गेल्यानं त्यावर भारतीय पुरातत्व संशोधन खात्याचा अधिकार आहे. त्यांच्या परवानगीशिवाय ट्रस्टला मंदिरात एक साधा खिळा ठोकण्याचाही अधिकार नाही. देणगीच्या या काऊंटरला पुरातत्व खात्याचा आक्षेप आहे, असं देवस्थानची कारभारी मंडळी सांगतात.
त्र्यंबकेश्वराची नित्यपूजा, साङ्गसङ्गाई आणि कर्मचा-यांच्या वेतनाकरता ट्रस्टला शासनाकडून अनुदान मिळतं, मात्र ते फारच तुटपुंज असल्याचं, या कारभा-यांचं म्हणणं आहे. त्र्यंबकेश्वराची त्रिकाल पूजा, नैवेद्य याचा खर्चही त्यातून भागत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. देणगीच्या रूपातून मिळणारं ट्रस्टचं उत्पन्न वर्षाकाठी सरासरी पन्नास-साठ लाख रुपये आहे. यातून मंदिराचे नियमित खर्च, दर सोमवारची शोभायात्रा आणि त्र्यंबकेश्वराच्या उत्सवांचे खर्च भागवले जातात. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला त्र्यंबकेश्वराची रथयात्रा संपन्न होते. यावेळी मंदिरावर दिव्यांची रोषणाई केली जाते. माघ महिन्यात महाशिवरात्रीचा उत्सवही देवस्थानाकडून साजरा होतो. त्र्यंबकेश्वराच्या रत्नजडित मुकुटाची देखभाल आणि संरक्षणावरही देवस्थानची बरीच शक्ती खर्च होते. देवस्थानच्या कार्यालयात त्यासाठी मजबुत तिजोरी बांधण्यात आली आहे. आमदनी आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला सार्वजनिक सुविधांची उभारणी करणं शक्य होत नाही. असं कारभा-यांचं म्हणणं आहे. ट्रस्टच्या वतीनं गावात इस्पितळ उभारण्याची योजना आहे, पण ती अद्याप कागदावरच आहे.
त्रिपुरारी पौर्णिमा आणि महाशिवरात्री खेरीज त्र्यंबकेश्‍वरात वर्षभरात इतरही काही मोठे उत्सव साजरे होतात. माघ महिन्यामध्ये गंगा- गोदावरी उत्सव १२ दिवस चालतो. त्र्यंबकेश्वर हे जागृत शिवस्थान मानलं गेल्यानं श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी इथे जणू यात्राच भरते. श्रावणातल्या तिस-या सोमवारी ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकेश्वराला प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात आहे. यावर्षीच्या श्रावणातील तिस-या शनिवारी इथं तीन लाख भाविकांनी गर्दी केली होती. याशिवाय निवृत्तिनाथांचा उत्सव तीन दिवस चालतो, दरवर्षी चैत्र एकादशीला उटीची यात्रा भरते. आषाढ आणि कार्तिक महिन्यात निवृत्तिनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरी येतात. प्रत्येक उत्सवाला सरासरी दीड ते दोन लाख भाविकांची गर्दी असते. याचा ताण देवस्थानच्या व्यवस्थेवर पडतो. येणा-या प्रत्येक भाविकाला त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाची आस असते. मात्र त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पैसे देऊन विशेष दर्शनाची सोय नाही. प्रत्येक भाविकाला रांगेतूनच दर्शन घ्यावं लागतं. अनेकदा ही रांग अनेक पदरी असते. मात्र रांग कितीही मोठी असली तरी भाविकाला दोन ते तीन तासांत दर्शन घडतं, असा दावा देवस्थानचे कारभारी करतात.
त्र्यंबकेश्वरच्या या गर्दीचा ताण इथल्या नगरपालिकेवरही पडतो. आधी म्हटलं त्याप्रमाणे, त्र्यंबकेश्वरची लोकसंख्या नगरपालिकेसाठी आवश्यक निकष पूर्ण करत नाही, तरीही इथं नगरपालिका आहे, हे भाविक यात्रेकरूंचं भाग्यच म्हणायचं. ब्रिटिशांच्या दूरदृष्टीला दाद द्यायला हवी. वर्षभरात इथे येणार्‍या यात्रेकरूंच्या सरासरी पाहिली, तर नगरपालिकेला किमान २० ते २५ हजारांची व्यवस्था पाहावी लागते. पूर्वी नगरपालिकेला यात्रेकरूंकडून यात्रा कर घेता येत असे, परंतु तो कर आता रद्द झाला आहे, त्याऐवजी शासनाकडून यात्रा अनुदान मिळतं. नगरपालिकेला उत्पन्नासाठी पूर्वी जकातीचंही साधन होतं; पण आता जकात करही रद्द झाल्याने त्याऐवजी जकात अनुदान मिळतं. त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी हेच नगरपालिकेचं प्रत्यक्ष उत्पन्नाचं साधन आहे. मात्र या उत्पन्नाला मर्यादा आहेत. दर बारा वर्षांनी येणार्‍या सिंहस्थाकरता केंद्र आणि राज्य शासनाकडून विशेष विकास अनुदान मिळतं, या अनुदानातूनच गावातली विकासाची कामं होतात, त्र्यंबकेश्वर दर बारा वर्षांनी कात टाकतं असं म्हणतात ते त्यामुळेच!
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचं यावर्षीचं अंदाजपत्रक १ कोटी ८६ लाख रुपयांचं आहे. यापैकी फक्त २४ लाख रुपये मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतून अपेक्षित आहेत, उर्वरित सगळं शासकीय अनुदान पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची देखभाल, दिवाबत्ती अशा सुविधांची जबाबदारी नगरपालिकेवर आहे. कुशावर्त तीर्थात हजारो भाविक स्नान करतात, त्यामुळे या तीर्थाच्या स्वच्छतेकडे विशेष ध्यान देण्याची गरज असते. गेल्या सिंहस्थात कुशावर्त तीर्थाजवळ आधुनिक फिल्टरेशन प्लॅन्ट शासनाने दिला पण तो चालवण्यासाठी प्रशिक्षित सेवकवर्ग नगरपालिकेकडे नाही. त्यामुळे हा प्लॅन्ट केवळ शोभेची वस्तू बनला आहे! नगरपालिकेकडे १७ सफाई कामगार आहेत, पण यात्रेच्या काळात ते अपुरे पडतात. इतर नगरपालिकांप्रमाणेच त्र्यंबक नगरपालिकेसमोरील कचरा-सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचे प्रश्न आहेतच. तरीही गावातून फेरफटका मारल्यानंतर घाणीची फारशी बजबज दिसून येत नाही. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानात या गावाने नाशिक जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने आलेल्या पैशातून गावातल्या रस्त्यांचं रुंदीकरण झालंय, काँक्रिटिकरण झालंय, शौचालयं झाली आहेत. नगरपालिका चार कोटींची पाणीपुरवठा योजना राबवतंय. नगरपालिकेने भक्तांच्या सोयीसाठी दोन भक्तनिवास उभारले आहेत. अमृतकुंभ आणि शिवनेरी दोन्ही मिळून पन्नास खोल्या आहेत. ७५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत भाड्यात या खोल्या उपलब्ध होतात. त्र्यंबकेश्वरच्या नागरी सोयी-सुविधासुद्धा अशा प्रकारे यात्रेकरूंशी जोडल्या गेल्या आहेत.
त्र्यंबकेश्वरात ब्राह्मणांची जवळपास साडेचारशे-पाचशे घरं आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्त तीर्थ या परिसरात प्रामुख्यानं त्यांची वस्ती आहे. पौरोहित्य हा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. इथे येणारा यात्रेकरू हा त्यांचा यजमान असतो. यजमानांकरता हे ब्राह्मण त्यांचे क्षेत्रोपाध्याय किंवा तीर्थोपाध्याय असतात. इथल्या बहुतांश ब्राह्मणांनी वेदांचा अभ्यास केला आहे. उपजीविकेची सोय म्हणून साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वीपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून ब्राह्मण इथे आले. या स्थानाला भक्कम धार्मिक चौकट होतीच. या आधारावर त्यांनी आपल्या चरितार्थाची नीट व्यवस्था केली. वेदाभ्यासाचा अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून इथल्या शास्त्रीपंडितांनी वेदपाठशाळा उभ्या केल्या. ऋग्वेदी आणि यजुर्वेदींच्या मिळून अशा तीन वेदपाठशाळा इथं आहेत. एक संस्कृत पाठशाळा आहे. पौरोहित्याला आवश्यक अशा सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास इथले ब्राह्मण करतात. आजही ही परंपरा कायम आहे. लघुरुद्र-महारुद्र तर इथल्या ब्राह्मणांच्या लहान लहान मुलांनाही मुखोद्गत आहेत. इथल्या अनेक ब्राह्मणांनी ज्योतिषाचाही अभ्यास केला आहे. इथे संपन्न होणा-या कर्मविधींना ज्योतिषशास्त्राची बैठक आहे. इथल्या काही ब्राह्मणांचे मोठे वाडे आहेत. काहींची मोठी घरं आहे. त्यांच्या घरांमध्ये यजमानांचा सतत राबता असतो. पूजा-पाठ, होमहवन, ब्राह्मणभोजन अशी त्यांच्या घरांमध्ये सतत गजबज असते.
त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्त तीर्थासभोवतीच्या गल्लीबोळांमधून तुम्ही फेरउफटका मारलात तर जवळपास प्रत्येक घरावर ‘मूळ गोदावरीचे उपाध्याय’ किंवा ‘श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे उपाध्याय’ अशा पाट्या दिसतील. बहुतेक ब्राह्मणांच्या नावांमागे वेदमूर्ती वेदविद्यासंपन्न’ अशी बिरुदावली दिसेल. पाठीवर प्रमुख कर्त्याच्या बरोबरच त्यांच्या मुलांची आणि नातवांचीही नावं दिसतील. पौरोहित्याचा वारसा पिढ्या न् पिढ्या पुढे कसा सरकतो, याचं हे द्योतक!
आपल्या उपजीविकेची वहिवाट पक्की करणारी यजमान तीर्थोपाध्याय ही परंपरा इथल्या ब्राह्मणांनी रूढ केली. ती आजतागायत चालू आहे. पूर्वी त्र्यंबकेश्वरात पाऊल टाकल्यानंतर एस्.टी.स्टॅण्डच्या बाहेरच जाडजूड चोपड्या घेऊन बसलेले ब्राह्मण दिसत. तुमचं नाव, गाव, कुळ सांगितल्यावर त्यांच्यातला एखादा ब्राह्मण पुढे येई, ‘या, तुम्ही आमचेच यजमान आहात.’ असं म्हणत त्याच्या घरी घेऊन जाई. त्याची चोपडी उघडून तो तुम्हाला तुमच्या घराण्यातले पूर्वी इथे कोण कोण येऊन गेले. त्यांनी येथे कोणते विधी केव्हा केले याची सविस्तर नोंद दाखवत असे. ब-याचदा अशा नोंदी यजमानाने स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या असत किंवा नोंदीखाली त्याची सही किंवा अंगठा असे.
या चोपड्यांना नामावली म्हणतात, सुमारे तीनशे वर्षांपासूनचा यजमानांच्या पिढ्यांचा वारसा त्यात नोंदवलेला आहे. हा पुरावा इथल्या ब्राह्मण मंडळींनी काटेकोरपणे जपला आहे. या चोपड्यांसाठी बांबूपासून बनवलेला टिकाऊ कागद आपण चामड्याचं कव्हर म्हणून वापरण्यात आला आहे. लाखेपासून बनवलेल्या पक्क्या शाईचा वापर नोंदीसाठी केलेला आढळतो.
गेल्या पंधरा-वीस वर्षांत भाविक स्वतःच तीर्थोपाध्यायांचा पत्ता शोधत येऊ लागल्याने गावाच्या वेशीवर चोपड्या घेऊन उभं राहण्याची गरज ब्राह्मणांना उरलेली नाही. तरीही नामावलीचे महत्त्व कमी झालेलं नाही. ती त्यांची सर्वांत मोठी मालमत्ता आहे. पिढ्या न् पिढ्यांची रोजीरोटी आहे. एखाद्या ब्राह्मणाच्या घरात वाटण्या झाल्या तर स्थावर-जंगम मालमत्तेबरोबरच ‘यजमानां’चीही वाटणी होते. यजमानांचं पौरोहित्य करण्यावरून ऋग्वेदी आणि यजुर्वेदी ब्राह्मणांमध्ये झालेल्या वादात शिवाजी राजांनी दिलेल्या निवाड्याचा उल्लेख आधी केलेला आहेच. यजमानांचं पौरोहित्य कुणी करायचं यावरून असाच एक वाद शिवकाळात शिवाजीराजांचे तीर्थोपाध्याय टेरगे शास्त्रींच्या भाऊबंदांमध्ये झाला होता. त्या वादाच्या निराकरणाची व्यवस्था शिवाजीराजांनी केली होती, असं आणखी एक उदाहरण शिवकालीन पत्रव्यवहारातून दिसून येतं.
ब्राह्मणांची नवी पिढी या नामावल्यांचं संगणकीकरण करण्याच्या विचारात आहे. तसा प्रयत्नही सुरू झाला आहे. या याद्या समाजशास्त्रीय इतिहासाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकतात. कायद्याच्या दृष्टीनेही त्यांचं महत्त्व आहे. वारसाहक्काचा पुरावा म्हणून या नामावलीतील नोंदी मान्य केल्या जातात.
ब्राह्मणांची नवी पिढी अधिक स्मार्ट आणि प्रोफेशनल आहे. त्र्यंबकेश्वरात पौरोहित्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा पुढे नेताना आधुनिकतेचा साधन म्हणून वापर करण्याचा स्मार्टपणा या पिढीत आहे आणि त्याला कारणही आहे. पुरोहितांची नवी पिढी उच्चशिक्षित आहे. अनेकजण कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचे पदवीधर, उच्चपदवीधर आहेत. काहींनी वकिलीत पदवी मिळवलीय. काहींनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलंय. या शिक्षणाशी निगडित व्यवसायांमध्ये उतरण्याचा पर्याय त्यांना उपलब्ध होता. भिक्षुकी-पौरोहित्याचा व्यवसाय करणं ही मागच्या पिढीची कदाचित अपरिहार्यता असावी, पण आजच्या पिढीचं तसं दिसत नाही. ते त्यांच्या पसंतीने या व्यवसायात उतरलेले दिसतात. एकतर सध्या या व्यवसायाला चांगले दिवस आहेत, घरात चालत आलेला वारसा आहे. त्यांच्यापैकी कोणी एखादा म्हणतोही, ‘पदवी आहे हो; पण नोकर्‍या कुठे मिळतात? पौरोहित्य करण्यात लाज कसली?’ असं असलं तरी, या व्यवसायात चांगला पैसा आहे, हे या पिढीच्या ध्यानात आलंय. म्हणून ती जास्त सजग आहे. जास्त प्रोफेशनल आहे. ‘त्र्यंबकेश्वरचा महिमा हायटेक’ पातळीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. यापैकी काही मंडळी इंटरनेटवर पोहोचली आहेत. ‘त्र्यंबक डॉट कॉम’ आणि ‘त्र्यंबकेश्वर डॉट कॉम’ अशा दोन वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या स्थान महात्म्याबरोबरच पुरोहितांचे नाव-पत्ते उपलब्ध आहेत.
परंपरेने पौरोहित्य करणारे इथले ब्राह्मण तसे फारसे श्रीमंत कधीच नव्हते. दोन-चार घराणी काय ती मातबर असतील. बाकी मंडळी खाऊन पिऊन सुखी म्हणावीत अशीच. यजमान हाच त्यांचा आधार. या आधारावर त्यांना उधार-उसनवारी करता येत असे, कर्ज मिळत असे. यजमानांच्या प्रतीक्षेत जाडजुड चोपड्या घेऊन त्यांना एस्.टी.स्थानकाच्या बाहेर चोपड्या घेऊन उभे राहावं लागे. यजमान समाधान पावला पाहिजे, त्याची खातिरदारी चांगली झाली पाहिजे. ही व्यावसायिकता ते आजवर जपत आले आहेत.
नारायणबळी, नागबळी, कालसर्प योग शांती अशा विधींचा वाढता प्रचार आणि प्रसार हे इथल्या ब्राह्मणांची परिस्थिती पाळण्याचं प्रमुख कारण आहे. इथले जुन्या आणि नव्या पिढीतलेही ब्राह्मण हे नाकबूल करत नाहीत, पण त्याविषयी बोलण्यास मात्र ते नाखूष असतात. कोणी एखादा बुजुर्ग ब्राह्मण म्हणतोही, ‘या विधींचं व्यावसायीकरण झालं आहे.’ कोणी एखादा ज्योतिषी आणि ब्राह्मणांमध्ये तयार झालेल्या साखळीचा उल्लेख करतो पण नंतर लगेचच गप्प होतो, असा उल्लेख करताना त्याचा रोख कुंडलीतल्या कालसर्प योगाच्या वाढत्या प्रस्थाकडे असतो.
जन्मकुंडलीत कालसर्प योग असल्याने राहू-केतू या ग्रहांच्या शांतीबरोबरच नारायण बळी आणि नागबळी हे विधी करून घेण्याचा सल्ला व्यावसायिक ज्योतिषी मंडळी देतात आणि लोकांना त्र्यंबकेश्वरची वाट दाखवतात. सर्वसाधारणपणे, जन्मकुंडलीत राहू आणि केतू या दोन ग्रहांच्या मध्ये उर्वरित ग्रह असल्यास ही कुंडली कालसर्प योगाची असल्याचं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. याशिवाय आणखीही काही बारीकसारीक तपशील आहेत, ज्यामुळे कुंडली कालसर्प योगाची ठरते. हा योग अशुभ आणि पीडादायक मानला जातो, त्यासाठी शांती करण्याचा तसंच सर्पाच्या शापातून मुक्ततेसाठी नागबळी करण्याचा सल्ला दिला जातो.
संदर्भात ज्योतिष मंडळींमध्ये मतभेद आहेत. काही ज्योतिषांच्या मते, कालसर्प योग हा पूर्णतः भ्रामक आहे. ज्योतिषशास्त्रात याला काहीही आधार नाही. वराहमिहीर, मंगेश्वर, बृहत्पाराशरी, लघुपाराशरी, बृहत्‌जातक संहिता अशा ज्योतिषशास्त्राच्या कोणत्याही प्राचीन ग्रंथात या योगाचा उल्लेख नाही. काही ज्योतिषी म्हणतात फलज्योतिषामध्ये राहू आणि केतू हे ग्रह गतजन्मीच्या शापाचे निदर्शक आहेत. राहूच्या युतीत शनि अथवा अन्य पापग्रह असल्यास, शापाची पीडा उद्भवते. प्राचीन ग्रंथांमध्ये या योगाचा उल्लेख नाही, परंतु शापित कुंडल्यांचा उल्लेख आहे, शापित कुंडल्या व कालसर्प कुंडल्यांमध्ये अनेक साम्यस्थळं आढळतात, म्हणूनच हा पूर्ण भ्रामक योग आहे, असं म्हणणं बरोबर नाही.
हा योग भ्रामक आहे, असं मानणारे ज्योतिषी शापित कुंडल्यांचं अस्तित्व मान्य करतात, परंतु राहूच्या शापाने उत्पन्न होणारी पीडा वाढून न लाभणं, घराण्याला ऊर्जितावस्था नसणं, घरात सतत कटकटी-भांडण तंटे असणं, एका विशिष्ट रोगाने प्रत्येक पिढीतील एकजण पीडित असणं अशी असते. त्यावर नारायणबळी किंवा नागबळी हे उत्तर नाही. हे विधी पुत्रसंततीशी निगडित आहेत. संततीचा नाश करणारी पिशाच्च पीडा दूर व्हावी यासाठी ते विधी आहेत. अशी मत-मतांतरं असली तरी ते चलनी नाणं असल्यानं त्यावर कोणी बोलत नाही आणि यजमानाला पीडेतून मुक्त व्हायचं असल्यानं तो याचा विचारही करत नाही.
मात्र खरोखरच ज्योतिषी आणि ब्राह्मणांची साखळी तयार झाली आहे काय? या संदर्भात एका ज्योतिषाला विचारलं असता, तो म्हणतो,‘आमच्याकडं लोक येतात. आम्ही त्यांची पत्रिका पाहतो. त्यांची समस्या काय आहे, ते विचारतो. पत्रिकेतल्या कोणत्या ग्रहदशेमुळे ती उद्भवली आहे, हे पाहतो. ग्रहदोष असतील तर त्यांच्या निराकरणाचा मार्ग सांगतो. नारायणबळी-नागबळी करणं आवश्यक असेल, तर तो त्र्यंबकेश्वरी जाऊन करण्याचा सल्ला देतो, कारण तिथेच हे विधी करणं आवश्यक असतं. हे विधी करायचे की नाही, हे त्या व्यक्तीवरच अवलंबून असतं?
काहीही असो, गेल्या पंधरा-वीस वर्षांत कालसर्प योगाची शांती आणि नारायणबळी-नागबळी विधी करणा-या यजमानाची संख्या त्र्यंबकेश्वरात सातत्याने वाढतेय हे खरं!
नारायणबळी आणि नागबळी हे विधी त्र्यंबकेश्वरीच केले पाहिजेत हे ठासून सांगण्याचं प्रमाणही गेल्या पंधरा-वीस वर्षात्च वाढलंय. या संदर्भातील या स्थानाचं महत्त्व उलगडून सांगणारं बरच लिखाण इथल्या शास्त्री पंडितांनी केलं आहे. तसं पाहिलं तर, या संदर्भातही मत-मतांतर आहेत. पं. महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या संस्कृती कोशात या विधींचे उल्लेख आहेत, पण ते त्र्यंबकेश्वरीच केले जातात असा उल्लेख नाही. पण इथल्या शास्त्री-पंडितांनी अनेक धर्मग्रंथ-पुराणांतून आधार शोधून मोठ्या अहमहमिकेने त्र्यंबकेश्वरच यासाठी योग्य ठिकाण असल्याचं प्रतिपादन केलंय.
त्र्यंबकेश्वरात नारायणबळी-नागबळी करण्यासाठी किमान तीन हजार रुपये खर्च येतो. ब-याचदा हा दर यजमानांनुसार ठरतो. त्याची वाच्यता फारशी कुणी करत नाही. इथले ब्राह्मण म्हणतात, ‘यजमानाच्या आर्थिक शक्तीनुसार आम्ही विधी करतो. कुणाची अडवणूक-पिळवणूक करत नाही.’ आर्थिक कुवत कमी असलेल्या यजमानांसाठी सामुदायिक स्वरूपात हे विधी केले जाऊ लागले आहेत. याबाबतीत, दिंडोरीच्या स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून प्रयत्न झाले आहेत. दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्राचा मोठा असा मठ त्र्यंबकेश्वरात उभारण्यात आलाय. इथे स्वामी समर्थांची नित्य पूजा-आराधना चालते. इथे त्र्यंबकेश्वरात येणा-या भाविकांच्या निवासाची अल्पदरात सोय करण्यात येते. इथले सेवेकरी सांगतात,‘ज्या भाविकांची हे विधी करण्याची इच्छा असते, त्यांची सोय आम्ही काही पुरोहितांकडे करतो,इतकंच.’
नारायणबळी- नागबळी हे विधी त्र्यंबकेश्वर मंदिरामागे अहिल्या-गोदावरी संगमावर होतात. तिथे यासाठी धर्मशाळा आहे. पूजन सामग्रीची सर्व सोय ब्राह्मणमंडळी करतात. एकंदरीत या विधींच्या वाढत्या प्रस्थामुळे त्र्यंबकेश्वर ब्राह्मणांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यांनी आपली जुनी घरं नव्यानं बांधून विस्तार केला आहे. यजमानांसाठी अधिक सोयी-सुविधा केल्या आहेत.
त्र्यंबकेश्वरात महादेव कोळ्यांची बहुसंख्या आहे. ठाकरांचीही घरं गावात आहेत. उपजीविकाही ब-याच प्रमाणात या तीर्थक्षेत्रावर अवलंबून आहे. गंगाद्वार-ब्रह्मगिरी पर्वतावर चढून जाणं वृद्ध भाविकांना शक्य नसतात. त्यांना डोलीतून वाहून नेण्याचं काम ही मंडळी करतात. याशिवाय द्रोण-पत्रावळ्या, सरपण, बेल-फुलं वगैरे इथल्या ब्राह्मणांच्या गरजेची साधनसामग्री हे लोक पुरवतात. त्यांची गावात वनौषधींची दुकानं आहेत. याशिवाय या आदिवासी जमातीतील पुरूषमंडळी ब्राह्मणांकडे हरकामे म्हणून काम करतात. पूजेच्या आधीची सर्व तयारी ही मंडळी करतात. या आदिवासी जमातींच्या स्त्रिया ब्राह्मणांकडे मोलकरणीचं काम करतात. त्र्यंबकेश्वरात अन्य जाति-पातींचे लोक आहेत. त्यांचे परंपरागत व्यवसाय आहेत. दुकाने आहेत. काहींची आसपास शेती आहे. नाशिक-त्र्यंबकेश्‍वर फे-या करणा-या जवळपास १०० टॅक्सी आहेत. यापैकी बहुतांश त्र्यंबकेश्वरातीलच आहेत. गावात ५०-६० रिक्षा आहेत. ब्राह्मणेतर लोकांमधील तरुण हे वाहतुकीचा व्यवसाय करतात.
त्र्यंबकेश्वरच्या आसपास छोट्या गावांमध्ये प्रामुख्याने ठाकर आणि महादेव कोळी या आदिवासींची वस्ती आहे. शेती आणि गुरं पाळणं हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. भात आणि नाचणी ही त्यांची प्रमुख पिकं. प्रत्यक्ष त्र्यंबकेश्वरामध्ये बाबा-बुवांचं फारसं प्रस्थ नसलं, तरी आसपासच्या गावांमध्ये काही बाबा-बुवांनी बस्तान बसवलंय. मध्यंतरी. एका गावातल्या एका बाबाने आदिवासी जमातीतल्या एका मुलीला फसवल्याचं प्रकरण गाजलं. अलीकडेच त्र्यंबकेश्वरातही एका महिलेची ती लहान मुलांवर जादूटोणा करते म्हणून धिंड काढण्याची घटना घडली. मात्र ही बाई गावातली नाही आणि तिची धिंड काढणारी माणसंही गावातली नाहीत असं त्र्यंबकेश्वरचे लोक सांगतात. गावाबाहेर आसपासच्या गावातले काही लोक येऊन राहात आहेत, तिथं हा प्रकार घडला. त्याचा गावाशी संबंध नव्हता असा खुलासा गावातील लोक करतात. मात्र या प्रकरणावरून राजकारण तापलं होतं.
असं असलं तरी, त्र्यंबकेश्वर आणि त्याच्या आसपासचा टापू राजकीय दृष्ट्या उदासीन आहे. मुळात त्र्यंबकेश्वर तालुका लोकसभेच्या बाबतीत डहाणू मतदारसंघाशी जोडलेला आहे, तर विधानसभेसाठी इगतपुरी मतदारसंघात त्याचा समावेश आहे. हे दोन्ही मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे त्यात राजकीयदृष्ट्या त्र्यंबकेश्वरचं वजन नाही. तसं नेतृत्वही या तालुक्यात नाही.




-------------- http://uniquefeatures.in

No comments:

Post a Comment