ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा
``सखू माहा कारभार अटपला! मराले शेवटी मी
लोकाच्या उंबरठ्यात ईऊन पळलो! मेल्यावर मळ जायाले पैसा लोकाचाच; कायनं आली
असिल हे अवदसा? देवका-याच्या दारुनं! काहाचे हे देव अन् काहाचे ते दगळा
गोटवाईचे देवकारे? दारूच्यापाई घरदार, वावर जमिन मान मयराद्याले सोळल्यानं
आपल्या संसाराचे कोयसे झाले. आता माहा आईक. आताच्या आता तो खंडोबा ती आसरा
अन् सर्वच्या सर्व देवपाटातले दगळगोटे दे फेकुन भुलेसरीत. आखीन एक काम
आपल्या लाळाच्या डेबुले वारा नोको लागु दिऊ त्या देवदेवीचा. निर्मय राहुदे
त्याला या देवदेवी अन् देवका-याच्या पापापासुन. अरेरे काहाचे हे धरम अन्
कुयधरम? या खोट्या देवाईले कोंबळे बक-याईचे इनाकारन कापन्याच्या पापी फंदात
मी पळलो नसतो त दारुच्या नांदात कायले गोयलो असतो? लोकाईले काम्हुन बदलामी
देवाव? माझ्या जोळ पैशाईचा आसरो होता तथुरोक मले त्याहीनं दारुसाठी कोरलं.
लोक असेच असतात सखू. पन आता माह्या डेबुजीले संभाळवो बरं? तो पिसाट,
देवाले न माननारा झाला तरी बरं होईन. पन त्याले या बकरेखाऊ अन् दारुपिऊ
देवाचा नांद लागु देऊ नोको बरं?’’
देवकार्याची फलश्रुति
``सखू, माझा कारभार आटोपला! मरायला अखेर मी परक्यांच्या दारवंटात येऊन पडलो! मेल्यावर जाळायला सुद्धा पैका परक्यांचाच. कशाने आली ही अवदसा? देवकार्याच्या दारूने. कसले हे देव नि कसले त्या दगड धोंड्यांचे ते देवकार्य? दारूच्या पायी घरदार शेतवाडी मानमरातबाला मुकून आपल्या संसाराचे कोळसे झाले. आता माझे ऐक. आत्ताच्या आत्ता तो खंडोबा, ती आसरायी आणि ते सगळे देव्हा-यातले दगडधोंडे दे भिरकावून भुलेश्वरी नदीत. आणखी एक काम. आपल्या लाडक्या डेबूजीला वारा नकोसा लागू देऊ त्या देवदेवींचा. निर्मळ ठेव त्याला ये देवदेवी नि देवकार्याच्या पापापासून. अरे अरे! कसले हे धर्म नि कुळधर्म! या खोट्या देवांना कोंबडी बक-याचे हकनाहक बळी देण्याच्या पापी फंदात मी पडलो नसतो तर दारूच्या व्यसनात कशाला गुरफटलो असतो? लोकांना दोष कशाला द्या. होती माझ्याजवळ पैक्याची माया, तोवर पोखरले दारूसाठी त्यांनी मला. समाज असाच असतो सखू. पण आता माझ्या डेबूजीला संभाळ. तो सैराट नास्तिक मुलगा झाला तरी परवडले. पण त्याला बोकडखावू दारुड्या देवांचा नाद लागू देऊ नकोस.’’
``सखू, माझा कारभार आटोपला! मरायला अखेर मी परक्यांच्या दारवंटात येऊन पडलो! मेल्यावर जाळायला सुद्धा पैका परक्यांचाच. कशाने आली ही अवदसा? देवकार्याच्या दारूने. कसले हे देव नि कसले त्या दगड धोंड्यांचे ते देवकार्य? दारूच्या पायी घरदार शेतवाडी मानमरातबाला मुकून आपल्या संसाराचे कोळसे झाले. आता माझे ऐक. आत्ताच्या आत्ता तो खंडोबा, ती आसरायी आणि ते सगळे देव्हा-यातले दगडधोंडे दे भिरकावून भुलेश्वरी नदीत. आणखी एक काम. आपल्या लाडक्या डेबूजीला वारा नकोसा लागू देऊ त्या देवदेवींचा. निर्मळ ठेव त्याला ये देवदेवी नि देवकार्याच्या पापापासून. अरे अरे! कसले हे धर्म नि कुळधर्म! या खोट्या देवांना कोंबडी बक-याचे हकनाहक बळी देण्याच्या पापी फंदात मी पडलो नसतो तर दारूच्या व्यसनात कशाला गुरफटलो असतो? लोकांना दोष कशाला द्या. होती माझ्याजवळ पैक्याची माया, तोवर पोखरले दारूसाठी त्यांनी मला. समाज असाच असतो सखू. पण आता माझ्या डेबूजीला संभाळ. तो सैराट नास्तिक मुलगा झाला तरी परवडले. पण त्याला बोकडखावू दारुड्या देवांचा नाद लागू देऊ नकोस.’’
इतके बोलून झिंगराजीने प्राण सोडला.
सखूबाईने हंबरडा फोडला. व-हाडातील अमरावती तालुक्यातील कोतेगावची ही सन
१८८४ सालची गोष्ट. झिंगराजी हा शेणगावच्या घरंदाज नागोजी परिटाचा नातू.
घराणे सुखवस्तू. जातीने परिट, तरी मुख्य व्यवसाय शेतीचा. गोठा
गाई-म्हशी-बैलानी डवरलेला. परीट जमात मागासलेली. तशात नाक्षर. अनेक अडाणी
रूढी, भलभलती कुलदैवते, त्यांना नेहमी द्याव्या लागणा-या
कोंबडे-बकरे-दारूचे नवस, यांचा कहर माजलेला. कोणी कितीही शहाणा असला,
विचारी असला, तरी जमातीच्या मुर्वतीसाठी वर्षातून एकदा तरी देवकार्याचा
धुडगूस घालून दारूच्या पाटात बक-याची कंदुरी प्रत्येक घरात झालीच पाहिजे,
असा त्यांचा सामाजिक दण्डक. घरातल्या हव्या त्या ब-या वाईट भानगडीसाठी
खंडोबाला आसरायीला किंवा गावदेवाला संतुष्ट करायचे म्हटले का आलीच कंदुरी
नि दारू. मूल जन्माला आले, करा कंदुरी. तान्ह्या मुलाला पडसे ताप खोकला
आला, बोलवा भगताला देव खेळवायला, कापा गावदेवापुढे कोंबडे, दाखवा दारूचा
नैवेद्य, लावा त्याचा आंगारा का म्हणे होणारच ते खडखडीत. देवकार्य केले
म्हणजे पाहुण्यांच्या बरोबरीने यजमानानेही दारूचा एक घोट तरी घेतलाच
पाहिजे. घेतला नाही, तर देव कोपणार, अंगावर नायटे-गजकर्ण उठणार, घरादाराचे
वाटोळे होणार. अशा धमकीदार धर्मसमजुतीपुढे मोठमोठ्या मानी माणसांनाही
–इच्छा असो वा नसो – मान वाकवून दारू प्यावीच लागते. देवकार्यच कशाला?
पाहुणा राहुणा आला की त्याच्यासाठी (मटणाचा बेत नसला तरी) दारूची बाटली
आणलीच पाहिजे. दारू देणार नाही तो यजमान कसला नि घरंदाज तरी कसला?
सारी परीट जमात असल्या फंदात अडकलेली, तर
बिचारा झिंगराजी त्या चरकातून सुटणार कसा? बरीच वर्षे त्याने दारूचा मोह
टाळून, संसार-व्यवहार कदरीने केला. अखेर आजूबाजूच्यांच्या नादाने तो
देवकार्यांच्या निमित्ताने अट्टल दारूड्या बनला. दारूचे व्यसन लागायचाच काय
तो अवकाश असतो. ते लागले का संसाराच्या नौकेला हळूहळू भोके पडून, ती
केव्हा सफाचाट रसातळाला जाईल, हे ज्याचे त्यालाही समजत उमजत नाही.
सर्वस्वाला मुकून झिंगराजी फुप्फुसाच्या रोगाने अंथरुणाला खिळला. घरदार,
शेतवाडी, गुरेढोरे, आधीच वाटेला लागलेली. विष खायलाही फद्या जवळ उरला नाही.
जवळ बायको सखूबाई आणि सन १८७६ साली जन्माला आलेला एकुलता एक मुलगा डेबूजी.
दोन वेळा साज-या व्हायची पंचाईत, तेथे कसले आले औषधपाणी? भरभराटीच्या ऐन
दिवसांत झिंगराजीशेट झिंगराजीशेट म्हणून तोंडभर वाहवा करून त्याच्या पैशाने
दारूबाजीच्या मैफली उडवणारे आता थोडेच त्याच्या वा-याला उभे राहणार?
शेणगावच्या भुलेश्वरी (भुलवरी) नदीच्या पलीकडे कोतेगाव येथे त्याचे मावसभाऊ
यादवजी आणि जयरामजी रहात होते. त्यांनी या पतित कुटुंबाला आपल्याकडे नेले.
त्याच ठिकाणी मरणाला मिठी मारण्यापूर्वी झिंगराजीने सखूबाईला प्रारंभाचा
उपदेश केला.
मूर्तिजापूर तालुक्यात दापुरे गावी तिचे
माहेर होते. वृद्ध आईबाप हयात असून कर्तबगार भाऊ चंद्रभानजी घरदार, शेतवाडी
पहात होता. ६०-६५ एकर जमीन, नांदते मोठे घर, १०-१२ गुरेढोरे, घराणे चांगले
सुखवस्तु होते. म्हाता-या हंबीररावाला झिंगराजीच्या मृत्यूची बातमी
समजताच, त्याने चंद्रभानजीला पाठवून संखूबाई नि डेबूजीला घरी आणवले. छोटा
डेबूजी काही दिवस इतर मुलांच्या बरोबरीने खूप खेळला बागडला, गावाबाहेर
हुंदाडला, नदीत डुंबला, आईच्या हाताखाली राबला. एक दिवस तो चंद्रभानजी
मामाला म्हणाला - ``मामा, गुरेचारणीसाठी नोकर कशाला हवा आपल्याला? मी जात
जाईन रोज आपली गुरे घेऊन चरणीला. मला फार आवडते हे काम.’’ अरेच्चा, वाटला
तसा हा पोरगा ऐतखावू दिसत नाही. याला कामाची हौस आहे. हे चटकन ओळखून
चंद्रभानजीने डेबूजीची गुरेचरणीच्या कामावर नेमणूक केली.
डेबूजीच्या क्रांतिगर्भ जीवनाचा श्रीगणेशा गुरेचरणीने झाला. खरेच, लोकोत्तर युगपुरुषांच्या चरित्राचा ओनामा गुरेचरणीनेच होत असतोसे दिसते. यादव श्रीकृष्णाने बालपणी गुरेचरणीचीच दीक्षा घेतली होती.
डेबूजीच्या क्रांतिगर्भ जीवनाचा श्रीगणेशा गुरेचरणीने झाला. खरेच, लोकोत्तर युगपुरुषांच्या चरित्राचा ओनामा गुरेचरणीनेच होत असतोसे दिसते. यादव श्रीकृष्णाने बालपणी गुरेचरणीचीच दीक्षा घेतली होती.
डेबूजीचे गोवारी जीवन
डेबूजीने रोज मोठ्या पहाटे उठावे, गोठा साफ करावा, शिळ्या भाकरीचा तुकडा चावून वर घोटभर पाण्याने न्याहारी करावी, दुपारच्या जेवण्यासाठी दिलेली कांदा भाकरीची पुरचुंडी बगलेच मारावी आणि गाई-म्हशी-बैल चरणीला घेऊन जावे. माध्यान्हीला सूर्य आला का गुरांना पाणी पाजून त्यांना सावलीत बसवायचे, आपण भाकर खायची नि रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरि भजने गात जवळच लवंडायचे. कित्येक वेळा गुरे डेबूजीची नजर चुकवून शेजारच्या शेतात घुसायची. राखणदार तणतणत यायचा. डेबूजी त्या गुराला वळवून आणून, त्याची हात जोडून क्षमा मागायचा. या त्याच्या विनम्र वृत्तीला इतर गवारी पोरे टिंगलीने हसायची. एकादवेळी राखणदाराची चपराकही तो मुकाट्यने सहन करायचा. पण उलट शब्द
डेबूजीने रोज मोठ्या पहाटे उठावे, गोठा साफ करावा, शिळ्या भाकरीचा तुकडा चावून वर घोटभर पाण्याने न्याहारी करावी, दुपारच्या जेवण्यासाठी दिलेली कांदा भाकरीची पुरचुंडी बगलेच मारावी आणि गाई-म्हशी-बैल चरणीला घेऊन जावे. माध्यान्हीला सूर्य आला का गुरांना पाणी पाजून त्यांना सावलीत बसवायचे, आपण भाकर खायची नि रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरि भजने गात जवळच लवंडायचे. कित्येक वेळा गुरे डेबूजीची नजर चुकवून शेजारच्या शेतात घुसायची. राखणदार तणतणत यायचा. डेबूजी त्या गुराला वळवून आणून, त्याची हात जोडून क्षमा मागायचा. या त्याच्या विनम्र वृत्तीला इतर गवारी पोरे टिंगलीने हसायची. एकादवेळी राखणदाराची चपराकही तो मुकाट्यने सहन करायचा. पण उलट शब्द
कधी बोलायचा नाही.
गुराढोरांची जोपासना डेबूजी स्वतःपेक्षा विशेष अगत्याने करायचा. वेळी आपण भाकर खायला विसरेल, पण गुरांची दाणावैरण वेळच्या वेळी द्यायला एकदाही चुकला नाही. सकाळ संध्याकाळची त्याची गोठेसफायी पाहून शेजारी पाजारी चकित व्हायचे. ४-५ दिवसांआड गुरांना नदीच्या पाण्यात घालून चांगली मालीश करी. त्यामुळे चंद्रभानजीची गुरे म्हणजे दापुरीत नमुनेदार म्हणून जो तो वाखाणू लागला.
गुराढोरांची जोपासना डेबूजी स्वतःपेक्षा विशेष अगत्याने करायचा. वेळी आपण भाकर खायला विसरेल, पण गुरांची दाणावैरण वेळच्या वेळी द्यायला एकदाही चुकला नाही. सकाळ संध्याकाळची त्याची गोठेसफायी पाहून शेजारी पाजारी चकित व्हायचे. ४-५ दिवसांआड गुरांना नदीच्या पाण्यात घालून चांगली मालीश करी. त्यामुळे चंद्रभानजीची गुरे म्हणजे दापुरीत नमुनेदार म्हणून जो तो वाखाणू लागला.
डेबुजीची गोवारी भजन-पार्टी
मामी कौतिकाबाई पहाटे उठून जात्यावर गाणी गायची. ती गुणगुणण्याचा डेबूजीला नाद लागला. गावातली मंडळी कधीकाळी भजने गायची ती ऐकून वेडीवाकडी म्हणायची त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात गोवारी मंडळ जमवून नदीच्या काठी भजने चालू केली. राकेलचा रिकामा डबा म्हणजे मुरदुंग आणि दगडांच्या चिपांचे टाळ, या साहित्यावर डेबूजीचे हे भजनी मंडळ भजनाच्या कार्यक्रमात खूप रंगू लागले. रोज कोणी ना कोणी एकादा नवीन अभंग ऐकून पाठ करून आणावा नि या टोळीने तो आपल्या भजनात चालू करावा. कामधाम आटोपून रात्रीची भाकर पोटात गेलीरे गेली का हे भजनी मंडळ काळोखात गावाबाहेर जायचे नि हरिनामाचा गजर करीत बसायचे. मध्यरात्रीपर्यंत असे होत राहिल्यामुळे, इतर मुले उशीरा उठायची नि उशिरा कामाला लागायची. त्याची तक्रार चंद्रभानजीच्या कनावर गेल्यामुळे, डेबूजीने एकटेच भजनासाठी बाहेर जाण्याचा क्रम चालू केला. पण त्याचे सवंगडी त्याचा पिच्छा सोडणार थोडेच?
मामी कौतिकाबाई पहाटे उठून जात्यावर गाणी गायची. ती गुणगुणण्याचा डेबूजीला नाद लागला. गावातली मंडळी कधीकाळी भजने गायची ती ऐकून वेडीवाकडी म्हणायची त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात गोवारी मंडळ जमवून नदीच्या काठी भजने चालू केली. राकेलचा रिकामा डबा म्हणजे मुरदुंग आणि दगडांच्या चिपांचे टाळ, या साहित्यावर डेबूजीचे हे भजनी मंडळ भजनाच्या कार्यक्रमात खूप रंगू लागले. रोज कोणी ना कोणी एकादा नवीन अभंग ऐकून पाठ करून आणावा नि या टोळीने तो आपल्या भजनात चालू करावा. कामधाम आटोपून रात्रीची भाकर पोटात गेलीरे गेली का हे भजनी मंडळ काळोखात गावाबाहेर जायचे नि हरिनामाचा गजर करीत बसायचे. मध्यरात्रीपर्यंत असे होत राहिल्यामुळे, इतर मुले उशीरा उठायची नि उशिरा कामाला लागायची. त्याची तक्रार चंद्रभानजीच्या कनावर गेल्यामुळे, डेबूजीने एकटेच भजनासाठी बाहेर जाण्याचा क्रम चालू केला. पण त्याचे सवंगडी त्याचा पिच्छा सोडणार थोडेच?
डेबूजी मंडळाच्या भजनाचे पुढे सप्ताह होऊ लागले. सप्ताहाची समाप्ति
प्रसादाने झाली पाहिजे. पोरांची डोकी ती! कित्येकांनी आईबापांजवळ मागून,
कित्येकांनी गावात भिक्षा मागून, धान्य जमा केले. गुराख्यांच्या
वनभोजनासाठी गोडधोड करून द्यायचा खेडेगावच्या लोकांचा प्रघात असतोच. झाले.
हां हां म्हणता नदीच्या काठावर गुराख्यांनी अन्नकोट उभा केला. डेबूजी
म्हणाला - ``गळेहो आपुन त साराईच जेवतो खावतो. पन जरा भवताल पाहा ना? किती
तरी अंधले, लंगले, रगतपिते, भिकारी मानसं आहेत. त्याहीले बिच्या-याहीले
चुकुन तरी कधी नव्हीची जेवारी बाजरीची भाकर पोटभर खायाले भेटत नाही. आज
आपुन त्याहीले सगळ्याईले बलाऊन आनुन पोटभर जेव्याले घालू. अन्नदानासारखं
महापुन्य नाही. ते आपले गरीब भाऊ अन् बहयनी जेवल्या म्हंजे तोच देवाले खरा
नीवद होईन.’’
डेबूजीच्या भजन मंडळात एक वाबन नावाचा महार गुराखी होता.
त्याने महारावाड्यातले सारे बाप्ये बाया नि मुले शेपाटून आणली. आजूबाजूचे
इतर गोसावी फकीर भिकारी पण बोलावले. डेबूजीने सगळ्यांना एक पंगतीत शिस्तवार
बसवून पुंडलीक वरदा हारि विठ्ठलच्या जयघोषात जेवण घातले. ते लोक जेवत
असताना डेबूजीने निवडक भजने तल्लीनतेने गायली. जेवणा-या मंडळींचा आणि
गुराख्यांचा तो प्रसाद सोहळा पहायला जमलेल्या दापुरीच्या गावक-यांना एक
नवलच आज तेथे दिसले. नंतर गुराखी मंडळी पंगतीने बसली. डेबूजीने बाबाजी
गणाजी महाराला अगदी आपल्या शेजारी बसवले. केरकचरा झाडून साफ केल्यावर हा
समारंभ आटोपला. पण त्या भ्रष्टाकाराची कुरबूर डेबूजीच्या आजोळी नि गावभर
काही दिवस चालूच होती. पण डेबूजीचा खुलासा खोटा पाडण्याचे धैर्य किंवा
अक्कल मात्र कोणातही नसे. दापुरीला डेबूजी असे तोवर असले अन्नदानाचे उत्सव
त्याने अनेकवेळा केले.
मुलाचे पाय पाळण्यात दिसले म्हणे!
गाडगे महाराज या
टोपण नावाच्या असामान्य लौकिकाने वृद्ध डेबूजी गेली ४५वर वर्षे हीच भेदातीत
अन्नदानाची लोकसेवा बृहन्महाराष्ट्राच्या कोनाकोप-यात साजरी करताना पाहून,
दापुरीच्या त्याच्या त्या बालवयातल्या वर्तनाचामुलाचे पाय पाळण्यात
दिसले अशा ठराविक शब्दांनी गौरव करण्याचा श्रीयुती किंवा संताळी मोह
पुष्कळांना होत असतो. इतकेच काय, पण भविष्यकाळी हा कोणीतरी मोठा साधू
सत्पुरुष होईल, अशी पुष्कळांनी अटकळ बांधली होती, असे धडधडीत खोटे विधानही
करायला कित्येक चुकत नाहीत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात? कुणाला दिसतात?
कोण ते पहातात? बरे, ते दिसतात तर मग त्या बालकाला त्या पायांच्या
लक्षणांप्रमाणे पुढे कोणकोण काय काय कसकसले उत्तेजन देतात? प्रत्यक्ष
जन्मदात्या आईबापांनाही त्या पायांच्या लक्षणांची कसली काही कल्पना नसते,
अटकळ नसते, जाणीव नसते. ती लक्षणे कुणाला दिसत नाहीत आणि कुणी ती पाहतही
नाहीत. आत्मविश्वासाने नि आत्मक्लेशाने एकादा माणूस मोठा कर्तबगार झाला,
नामवंत झाला, म्हणजे मग त्याच्या बालपणीच्या ख-या खोट्या आठवणी उकरून
काढून, भविष्याचे सिद्धांत लढवण्याची कसरत लोक करतात, एवढाच त्या
पाळण्यातल्या पायांचा अर्थ आहे. स्पृश्यांस्पृश्यांच्या सहभोजनाबद्दल आणि
नदीकाठच्या भजनाच्या व्यसनाबद्दल बिचा-या बाल डेबूजीला चंद्रभानजी मामाचा
खावा लागलेला कणक्या चोप आज या कल्पना-पंडितांच्या हिशेबी कशाला जमा धरलेला
असेल? शिवाय महार, मराठे, परीट, सुतार, लोहार, सवंगडी आपण एकत्र का बसवतो
खेळतो नि दुपारच्या न्याहारीला एकत्र जेवतो, या कृत्याच्या दूरगामी
परिणामांची तरी बाल डेबूजीला काही निश्चत जाणीव असणार थोडीच? आम्ही सगळे
एक, यापेक्षा कसली विशेष भावना त्या वयात त्याला असणार? शक्यच नाही. हा एक
सद्गुणांचा अंकुर आहे नि तो आपण वाढवला पाहिजे, अशी पुसटसुद्धा कल्पना
त्याच्या विचारांना चाटून गेली नसेल. मनाला ज्यात गोडी वाटते तेवढे करावे,
अशी बालमनाची ठेवणच असते. तिची बैठक सद्गुणांवर स्थिरावणे नि पुढे ती
वाढीला लागणे, हा मानवी जीवनातला एक भाग्यवान अपघातच समजला पाहिजे.
एकादा
मनुष्य रंकाचा राव झाला म्हणजे त्याच्या कर्तबागारीचे श्रेय आईबापाला नि
आजूबाजूच्या अलबत्या गलबत्यांना मोफत वाटण्याची वाईट खोड लोकांना असते.
रामदासाने म्हणजे शिवाजीला राजकारण शिकवले म्हणून तो स्वराज्य स्थापन करू
शकला. या सर्वत्र रूढ केलेल्या प्रवादात या वाईट खोडीचा पाजीपणाच स्पष्ट
उघड होत नाही काय? अनाथ गुराखीपणापासून लोकहितवादी गाडगे महाराज या
कर्मयोगी पदवीपर्यंत सिद्ध केलेल्या डेबूजीच्या जीवनाच्या यशवंत
शर्यतीचे श्रेय एकट्या गाडगेबाबांचे आहे. त्यात इतरांना वाटेकरी बनवण्याचा
मोह मूर्खपणाचा आहे.
दापुरी गावच्या पूर्णा नदीच्या हिवाळ्या-उन्हाळ्यात फार मोठा खोल डोह
पडायचा. गावातली बरीच मोठी मंडळी नि मुले त्यात पोहायला डुंबायला जायची. एक
दिवस डेबूजीच्या मनाने घेतले, ही सगळी माणसे धडाड पाण्यात उड्या मारताहेत,
सरासर पोहताहेत, पाणतळी खोल बुडी मारून भरारा वर येताहेत, मजा आहे मोठी.
आले डेबूजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. आपल्याला पोहता येते का नाही,
याचा कसला सुद्धा विचार न करता, स्वारीने घेतली धडाड उडी डोहात. आणि मग –
आणि मग –
आणि मग? कसचे काय अन् कसचे काय! लागला गटांगळ्या खायला.
घाबरला. ओरडू लागला. आजूबाजूच्यांना वाटले हा मौज करतो आहे. नाकातोंडात
पाणी जाऊन गुदमरून बुडतो आहेसा दिसताच एका दोघांनी पकडून काठावर आणला.
उपचार केले तेव्हा सावध झाला. ``पोहता येत नव्हते तर झक मारायला उडी घेतली
कशाला?’’ जो तो बडबडू लागला. बातमी गावात गेली. आई, मामा, आजोबा धावत आले.
``कुणी सांगितलं होतं तुला उडी मारायला बाबा’’ म्हणून आईने डेबूजीला पोटाशी
धरले आणि ``भलभलत्या फंदात पडायची गाढवाला फार खोड’’ म्हणून मामाने दिली
भडकावून एक डेबूजीच्या. ``खबरदार पुन्हा पाण्यात पाऊल टाकसील तर, तंगडी
मोडून टाकीन.’’ असा सज्जर दम भरला.
माणसाला अशक्य काय आहे?
नेपोलियनप्रमाणेच डेबूजी
गाडगे बाबांच्या कर्तव्यकोशात अशक्य हा शब्दच नाही. बरोबरीचे सवंगडी धडाधड
उड्या मारतात, सपासप सरळ्या मारीत या काठचे त्या काठाला जाता, मनमुराद
डुंबतात आणि मी का वेड्या अनाडी बावळटासारखा त्यांच्याकडे पहात नि त्यांचे
कपडे संभाळीत काठावर बसू? छट्! हे नाही चालायचे. पोहायला मला आलेच पाहिजे.
दोन
प्रहरी आजूबाजूला कोणी नाहीसे पाहून, पाण्यात उतरून डेबूजी दररोज
पोहण्याचा यत्न करू लागला. एक दोन महिन्यांच्या आतच त्याचा आत्मविश्वास
बळावला आणि पोहण्याचा, तरंगण्याचा, बुडी सराळ्या मारण्याच्या नाना प्रकारात
त्याने एवढे प्रावीण्य मिळविले की त्या बाबतीत गावचा नि आसपासचा एकही
आसामी त्याच्याबरोबर टिकाव धरीनासा झाला.
पावसाळ्यात नदीला महामूर पूर
आला म्हणजे पुरात सापडलेल्या माणसांना नि जनावरांना वाचवण्याचे कर्म
महाकठीण, मोठमोठ्या पटाईत पोहणारांची अक्कल थरथरू लागायची. पण डेबूजी तडाड
उडी घेऊन कमाल शहामतीने त्यांना सफाईत तडीपार खेचून काढायचा. असाच एकदा
पूर्णेला पूर आला असता, पल्याडच्या काठावर पोहत जाण्याची अमृता गणाजी
नावाच्या मित्राने डेबूजीशी पैज मारली. लोक नको नको म्हणत असताही दोघांनी
टाकल्या धडाड उड्या. नदी तर काय, एकाद्या खवळलेल्या महासागरासारखी रों रों
करीत, गरार भोवरे भिरकावीत तुफान सोसाट्याने चाललेली. सहज भिरकावलेला
लाकडाचा ओंढा धड शंभर पावले सुद्धा सरळ जाई ना. भोव-यात गचकून झालाच तो
बेपत्ता! आणि हे दोघे आचरट तर चालले आहेत सपासप हात मारीत पाणी तोडीत!
काठावरच्या लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. काय होतय नि काय नाही. डेबूजी तर
रंडक्या मुंडक्या अनाथ आईचा एकुलता एक मुलगा. कुणी भरीला घातला नि कुणी
चिथावले? नसता आपरमात अंगी लागायचा. बरे, घरच्या मंडळींना कळवायचे, तर ती
वेळही निघून गेलेली. आता कोणी घरून आलेच तर काठावरच्या लोकांनाच
शिव्याश्राप खावे लागणार. सखुबाई तर काठावरच माथे फोडून घेणार.
लोक
थिजल्या डोळ्यांनी नुसते पहाताहेत तोच हां हां म्हणता पार दूरवरच्या
पैलथडीवरून डेबूजीची भीमगर्जना ऐकू आली. ``आलो रे आलो, सफाईत येऊन
पोहोचलो.’’ पण त्याचा तो पैजदार दोस्त? अरेरे, तो कुठेच दिसे ना. कशाचा
दिसतो तो? काठाजवळ जाता जाताच एका भोव-याच्या गचक्यात तो सापडला नि बुडाला.
त्याचे प्रेत पुढे सहा मैलांवर कोतेगावी काठाला लागलेले आढळले.
पोहण्याप्रमाणेच आट्यापाट्या, हुतुतु, लगो-या, गोट्या आणि कुस्त्या या
कलांतही डेबूजी दापुरीच्या पंचक्रोशीत कुणाला हार जाईनासा झाला. घरचे
खाणेपिणे तसे म्हटले तर यथातथाच. पण अखंड कष्टांची नि श्रमसाहसाची आवड
उपजतच त्यांच्या अंगी बाणल्यामुळे, डेबूजीची देहयष्टी पोलादी कांबीसारखी
टणक कणखर बनत गेली. ना कधी थेटे ना पडसे. आज ७५ वर्षांचे वय झाले आहे तरी
हव्या त्या प्रचंड डोहात बेधडक उडी घेऊन सहज लीलेने तडीपार होताना बाबांना
पाहून त्यांचे जवान अनुयायी सुद्धा एकमेकांच्या तोंडाकडे पहात उभे रहातात.
डेबूजी चांगला १४-१५ वर्षांचा पु-या उफाड्याचा जवान झाल्यामुळे,
चंद्रभानजीने त्याची गुरेराखणी बंद करून, `` डेबूजी, तू आता शेतावर औताला
जात जा.’’ असे सांगितले. शेतक-याच्या पोराच्या हातात औत येणे आणि
पांढरपेशाचा पोर मॅट्रिक होणे, जवळजवळ सारखेच म्हटले तरी चालेल. फरक एवढाच
की पांढरपेशा पोरगा मॅट्रिक होऊन कमावता होतोच असे नाही, पण शेतक-याचा पोर
औताला लागला का त्यांची कमावणी तेव्हाच चालू होते.
पडेल ते काम चोख
कुसलतेने करायचेही डेबूजीची कर्मयोगी वृत्ती लहानापणापासून दिसून येते.
शेतीचा नांगर हातात येताच, शेतीच्या सगळ्याच लहानमोठ्या तपशिलांच्या कामाला
त्याने पक्का आवर घातला. औताच्या बैलांची निगा राखण्यात त्याची
पहिल्यापासूनच मोठी कदर. स्वत-ला वेळेवर भाकर मिळो न मिळो, पण बैलांची
वैरण, त्यांची गोठेसफाई, रोजची नदीतली अंगधुणी, गोणपाटाच्या रकट्याने
त्यांचे अंग पुसणे इत्यादि कामे डेबूजी अगदी तन्मयतेने करायचा. खांद्यावर
आसूड नि नांगर टाकून जवान डेबूजी भजने गुणगुणत आपले बैल घेऊन शेताकडे जाऊ
लागला का दापुरी गावच्या बाया बाप्ये नजर लावून कौतुकाने त्या बैलांकडे
पाहायचे. शेतकाम डेबूजीने पत्करल्यापासून शेतांची सुधारणा झाली, उत्पन्नही
वाढले. हरएक काम तो जातीने पाहू लागल्यामुळे, बांध-बंदिस्तीपासून तो
पिकाच्या राखणीपर्यंत उधळमाधळीचा किंवा चोरीमारीचा प्रश्नच रहात नसे.
धान्याची कणसे दाणे धरू लागली आणि कपाशीची बोंडे डोळे उघडू लागली का
डेबूजीचा मुक्काम कायमचा शेताच्या माचीवर. हातात लठ्ठ बडगा घेऊन रात्रभर
जागरण. शिवाय दिवसाची दलामल असायचीच. सारांश, शेतीच्या कामात डेबूजी
ईश्वर-भक्तीइतकाच तल्लीन रंगलेला असायचा. कायावाचेमनेकरून केलेल्या
सेवेच्या भक्तीला बिनचूक, प्रसन्न होणारा शेतीशिवाय दुसरा परमेश्वर नाही,
हा सिद्धांत डेबूजीला याच कोवळ्या वयात मनोमन पटला आणि येथेच त्याच्या भावी
चारित्र्याच्या उज्वल कामगिरीचा पाया भक्कम बसला.
कसे होणार याचे दोन हाताचे चार हात?
लहानपणी
मुलामुलींची लग्ने लावण्याचे व्यसन खेड्यापाड्यात आणि मागासलेल्या नाक्षर
शेतकरी वर्गात फार. बालविवाहांना शिक्षा ठोठावणारे कायदे आज जारी आहेत,
तरीही त्यांचे हे व्यसन आजही लपूनछपून चालूच आहे. लग्नाशिवाय माणसाची
माणुसकीची ठरत नाही, असा त्या अडाण्यांचा समज. ही लग्ने तरी थोड्या खर्चात,
आंथरुण पाहून पाय पसरण्याच्या बाताबेताने करतील तर हराम! घरची कितीही
गरिबी असो, सकाळ गेली संध्याकाळची पंचाईत असो, लग्नाचा थाट सरदारी दिमाखाचा
उडालाच पाहिजे. तेवढ्यासाठी – परवा नाही – शेतभात, गाडीघोडा, ढोरंगुरं
टक्के करून सावकाराच्या घरात गेली तरी बेहत्तर, पण लग्नाचा थाट दणक्या
खणक्याचा झालाच पाहिजे. या फंदाने महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग जेवढा
कर्जबाजारी होऊन भिकेला लागला तेवढे इतर कोणत्याही व्यसनाने त्याच्या
जीवनाचे कोळसे केलेले नसतील.
सखूबाई नि डेबूजीची अवस्था काय विचारता? ना
बिस्तर ना बाड, देवळी बि-हाड. आजोबा मामाचा आश्रय मिळाला नसता तर सखूबाईला
हात पोर घेऊन गावोगाव भीकच मागावी लागली असती. जात-जमातीला सगळ्याना हे
माहीत होते. अशा ना घर ना दार पोराला कोण देतो आपली मुलगी? सोयरा बघायचा तो
त्याच्या घरदार शेतीवाडीवरून पसंत करायचा. मग ते घरदार, शेतीवाडी तीन
सावकारांकडे सहा वेळा गहाण पडलेली का असे ना. त्याची पर्वा कोणी करीत नसे.
इतकेच नव्हे तर जवळ कवडी दमडी नसताही, लग्नाच्या थाटाने सोय-यांचे नि
गावक-यांचे डोळे दिपण्यासाठी खुद्द नव-या मुलालाच एकाद्या सावकाराकडे ७-८
वर्षांच्या मुदतबंदीने पोटावारी कामासाठी कायम बांधून दिल्याचा करारनामा
करतात आणि लग्नासाठी पैसा काढून तो उधळतात. असे खेडूतांचे नाना छंद असतात.
त्यापायी खेडीच्या खेडी गुजर, मारवाडी, पठाण सावकारांच्या घशात जावून,
म-हाठा शेतकरी पिकल्या मळ्यावर पोट बांधून सावकराचा गुलाम बनला तरी या
अडाणी लोकांचे डोळे अजून उघडत नाहीत.
काय पाहून मुलगी द्यायची?
`डेबूजी माझा नाती,
चंद्रभानजीचा भाचा, त्याची कर्तबगारी पंचक्रोशीत सगळ्यांना ठावी, मग त्याची
सोयरीक जमायला हरकत कसली? शब्द टाकायची थातड, पाहुण्यांची वरदळ लागेल
आमच्या आंगणात.’ हा हंबीररावाचा नि चंद्रभानजीचा भ्रम थोड्याच दिवसांत दूर
झाला. `मुलगा चांगला आहे हो, पण त्याच काय पाहून आम्ही मुलगी द्यावी? ना
जमीन ना जुमला. ना घर ना दार.’ येई तो पाव्हणा हाच नकार देऊन चालता होऊ
लगाल. मानी माणसाला नकार सहन होत नाहीत. चंद्रभानजी म्हणजे दापुरीतला एक
पुढारी शेतकरी. गावात त्याचा शब्द खाली पडत नसे. नकारांनी पाणथळून न जाता,
त्याने खटपटींचा जोर वाढवला आणि कमालपूर येथील धनाची परटावर आपले वजन
पाडले. त्याला मुलगा पसंत पडला. पण त्याची बायको काही केल्या रुकार देई ना.
हो ना करता १८९२ साली डेबुजीचे लग्न हंबीररावच्या घरी थाटात साजरे झाले.
घरात सौ. कुंताबाई सून आल्यामुळे, सखुबाईच्या वठलेल्या जीवनाला पालवी
फुटली.
सुखवस्तु घरंदाजांवर कर्जाचे पाश टाकण्याच्या सावकारी युक्त्या जुक्त्या
अनेक असतात. तशात तो सुखवस्तु नाक्षर आणि मानपानाला हपापलेला असला तर
सावकारी कसबात तो तेव्हाच नकळत अडकला जातो. दापुरे गावच्या शिवाराच्या
पूर्वेला पूर्णानदीच्या काठी बनाजी प्रीथमजी तिडके नावाच्या सावकाराचा एक ५
एकर जमिनीचा सलग तुकडा होता. जमीन होती उत्तम पण तिची ठेवावी तशी निगा न
ठेवल्यामुळे ती नादुरुस्त नि नापीक झाली होती. तिडके सावकाराने तो तुकडा
चंद्रभानजीला विकला. विकत घेताना काही रक्कम रोख दिली नि बाकीची रक्कम दोन
वर्षांत हप्त्याने फेडण्याचे ठरले. मात्र या खरेदीचा वाजवी कागद रजिस्टर
केला नाही. ``कागदाशिवाय अडलं आहे थोडंच? जमीन एकदा दिली ती दिली. माणसाची
जबान म्हणून काही आहे का नाही?’ असल्या सबबीवर कागद आज करू उद्या करू यावरच
दिवस गेले. दोन वर्षांत डेबुजीने त्या जमिनीची उत्तम मशागत करून ती
सोन्याचा तुकडा बनवली. दोन वर्षात देण्याचे हप्तेही फेडले. तो सावकार
चंद्रभानजीला हवे तेव्हा हव्या त्या रकमा नुसत्या निरोपावर देत गेला. त्या
सावकाराच्या इतर कुळांच्या देण्याघेण्याच्या भानगडी चंद्रभानजीच्या
सल्ल्याशिवाय मिटेनाशा झाल्या. सावकाराने त्याच्यावर आपल्या विश्वासाची
एवढी मोहिनी टाकली की चंद्रभानजीच्या शब्दाशिवाय सावकार कोणाचे ऐकेनासा
झाला. भोळसट चंद्रभानजी गर्वान फुगला. स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी
कुळधर्म, देवकार्य, उत्सव, मेजवान्यांचा थोट उडवण्यासाठी तिडक्याकडून
रातोरात वाटेल त्या रकमा मागवीत गेला. तिडक्याची तिजोरी आपलीच गंगाजळी असा
जरी त्याला भ्रम झाला, तरी तिडके होता जातीचा सावकार. त्याने एकूणेक एक
रकमेचा जमाखर्च लिहून ठेवला होता. एक दिवस तो त्याने चंद्रभानजीला गमती
गमतीने दाखवला आणि या भरंसाट कर्जाच्या फेडीसाठी दे आपली सारी जमीन खरेदी
लिहून, असा पेच टाकला. चंद्रभानजीचे डोळे खडाड उघडले. त्याच्या डोळ्यापुढे
अंधारीच आली. सावकारी सापळा कसा असतो ते त्याला आज उमगले. त्याने ५६ एकर
जमीन गहाण लिहून खत रजिस्टर करून दिल्यावरच घरी परतायची त्याला मुभा
मिळाली.
सावकारशाहीची जादू
डेबुजीला किंवा घरात कोणालाही ही गहाणाची भानगड चटकन उमगली नाही. शेताचे
धान्य कपाशीचे पीक तर घरात महामूर येते, पण सावकाराचे लोक येऊन ते उघड्या
डोळ्यांसमोर घेऊन जातात का नि कशाला? याचा डेबुजीला बरेच दिवस काही थांगच
लागेना. घरासमोर कपाशीचा पर्वत उभा रहावा. धान्यांचे डोंगर एकावर एक चढावे
आणि एकाद्या दिवशी उठून पहावे तर आंगण मोकळे! अखेर चंद्रभानजीच्या गहाणाचे
बेण्ड गावात फुटले. गावातही कुजबूज उठली. घरंदाज म्हणून मिरवणा-या शेतकरी
पुढा-याची जमीन गहाण पडणे ही मोठी नामुष्कीची गोष्ट. वरचेवर सावकराकडून रोख
रकमा उचलता येईनाशा झाल्यामुळे, खर्चासाठी रोकड रकमांची तंगी पडू लागली.
अंगावरच्या नित्याच्या खिडूकमिडूक दागिन्याशिवाय बासनातले ठळक नद दूरगावी
नेऊन त्यांचे टक्के करण्याचा चंद्रभानजीने तडाका चालू केला. त्याची
प्रकृतीही ढासळत गेली. अखेर विपत्तीची विषारी नजर गोठ्यातल्या गोधाकडे
वळली.
डेबुजीडीच्या चरित्राचा श्रीगणेशाच गोधनाच्या संगतीत नि गोसेवेच्या
संगीतात झाल्यामुळे, ज्याचे बैल उत्तम त्याची शेती उत्तम हे तत्त्व
त्याच्या मनावर खोल कोरले गेलेले होते. गोरक्षणाचे मूळ बीजच त्याने हेरले
होते. औताच्या बैलांची तर तो स्वतःच्या प्राणापलीकडे निगा ठेवीत असे.
गायीला गो-हा झाला का डेबुजी त्या गाईची धार काढायचा नाही. सारे दूध
गो-ह्याला पिवू द्यायचा. कोणाला काढूही द्यायचा नाही. लहानपणी गो-ह्यांना
भरपूर दूध मिळाले म्हणजे ते पुढे हाडापेराने बळकट ताकदवान बनतात. अशा २-३
खोंडांना भरपूर दूध पाजून त्याने नमुनेदार बैल बनवले होते.
सावकारशाहीच्या
पोखरणीचे गिरमिट लागलेल्या चंद्रभानजीने गो-हे विकण्याचा प्रश्न काढताच
डेबुजीने जीव देईन पण माझे खोंड विकू देणार नाही, असा खडखडीत प्रतिकार
केला. खोंड नाही तर म्हातारा बैल तरी विकला पाहिजे, असा आग्हर पडताच,
डेबुजीने करड्या आवाजात आजोबाला नि मामाला बजावले - ``दोनच काय तीनही गो-हे
टाका विकून. पण त्या म्हाता-या बैलाला मी विकू देणार नाही. जन्मभर त्याने
तुमचे काबाडकष्ट केले. हजारो रुपयांचे धान्य पिकवले. तुमच्या श्रीमंतीचा
बडेजाव सांभाळला. पोटच्या पोरासारखा आजवर त्याला पाळला, पोसला नि राखला. आज
तो म्हातारा झाला म्हणून काय त्याला कसायाला विकणार तुम्ही? ही काय
माणुसकी झाली? म्हाता-या बैलाप्रमाणे उद्य म्हाता-या माणसांचीही अडगळ
घरातलं काढायला लोक सवकतील, तर त्यांचे हात कोण धरणार? तो बैल विकाल तर
उद्यापासून मी औताला जाणार नाही, मला घरात ठेवा नाहीतर हुसकून द्या. कुठेही
चरा घरं भीग मागून पोट भरीन, पण असा कसायीखाना मला परवडणार नाही.’’
मामा, घाबरता कशाला?
डेबुजीचे म्हणणे कितीही
खरे असले तरी त्याने कर्जाचा बिनबुडाचा खळगा थोडाच भरणार होता? चंद्रभानजी
तर अगदी टेकीला आला. डेबुजीने त्याला धीर देण्याचा खूप यत्न केला. तो
म्हणाला, - ``मामा, आपण उपाशी राहू. अंगावर कपडा घालणार नाही. सणवार करणार
नाही. मुलाबाळांसह खूप कष्ट करू आणि आपल्या मायपोट शेतीच्या पिकांवर या
सावकारी पाशातून मोकळे होऊ. पण यापुढे त्या सावकार यमाची पायरी चढणार नाही
अशी शपथ घ्या. खोटेनाटे हिशोब ठेवून त्यानं तुम्हाला सपशेल फसवलंय.
चांगल्या हिशेबी माणसाकडून त्याचे हिशेब तपासून घ्या नि खोट्यानाट्याची
सरकारात फिर्याद लावा. बाकीचे मी पाहून घेतो.’’
झालंय कधी असं?
फिर्याद? कुळाने सवाकरावर लावायची?
खोट्या हिशेबाबद्दल? झालंय कधी असं? शेतक-याचे म्हणणे कितीही खरे असले, तरी
न्यायमंदिरात कागदाची जबानी खरी ठरत असते. आणि कागदांवरच्या आकड्यातच
सावकारी कोलदांड्याची सारी शहामत सामावलेली असते. सावकारी आकडेमोडीमुळे
चांगले शिकले सवरलेले शहाणे कोर्टात गाढव ठरतात. तिथे जन्माचे अडाणी नि
नाक्षर अशा नांगरड्यांचा काय पाड?
कर्जफेडीसाठी शेती उमाप पिकवण्याचा
डेबुजीचा अट्टहास चालू असतानाच, चंद्रभानजी ताप घेऊन झुरणीला लागला आणि
थोड्याच दिवसांत मरण पावला. हंबीररावचे घरच बसले. घरात विधवा सून नि एक
लहान नातू बळिराम. सगळा भार डेबुजीवर पडला.
-------- प्रबोधनकार
No comments:
Post a Comment