Tuesday, 22 January 2013

संत गाडगे महाराज - भाग ३

(१)कोणी जेवत बसले असता एकदम जवळ जाऊन भाकरी मागायची. चतकोर तुकडा देऊ केला का याने अर्धी भाकर मागायची. बरं अर्धी घे म्हटले तर सगळी द्या मागायची. तीही पुढे केली का सगळ्या भाक-या मागायच्या. तुला सगळ्या दिल्यावर आम्ही रे काय करायचे? तुम्ही उपाशी रहा, मला फार भूक लागली आहे. अशा जबाबाने प्रकरण शिव्यागाळी हुसकावणीवर यायचे. तसे ते आले का स्वारी निमूटपणे पुढे चालू लागायची.
(२)एकाद्या गाडीच्या मागेमागे चालायचे. दोनतीन मैल हा कोण चिंध्याधारी गाडीमागे चालतोय, याची गाडीवानाला शंका येऊन तो विचारायचा. मला गाडीत बसू द्या. कुठं जायचं आहे तुला? तुम्ही जाता त्याच गावाला. बरं बस गाडीत. तुम्ही खाली ुतरा मग बसतो मी, बैलांना दोघांचे ओझे होईल. अखेर काय? शिव्या निंदा नि टवाळी. तेवढी पूजा घेतली का स्वारीने पायांचा मोर्चा वळवलाच दुसरीकडे.
(३)दोन प्रहरी एखादी बाी शेतावर नव-यासाठी भाकरीचे गाठोडे नेत असताना, स्वारीने तिला हाक मारून थांबवावे आणि भाकरी मागावी. माय, भूक लागलीय, दे ते भाकरीचं गठोडं मला. औतक-याला मग कायरे देऊ? राहील तो उपाशी, मला काय त्याचे? उस्तळून ती बाई कडकडून शिव्या देऊ लागली का स्वारी निघून जायची.
(४)एखाद्या शहरात हमाल लोक दिवसाच्या मजुरीच्या पैशांची वाटणी करीत बसलेले पाहिले का स्वारी जवळ जायची. भिकारी समजून ते एखादा पैसा देऊ लागायचे, पैसा नको, मला रुपाया हवा. रुपाया? तुझ्या बापाने ठेवलाय, चल हो चालता इथून, प्रकरण धक्काबुक्कीवर आले का पोबारा करायचा.
(५)मोळी विकणारे भेटले का त्यांच्याजवळ लाकडे मागायची. तुला रे लाकडे काय करायची? सैपाक करीन सैपाक करीन बाप्पा. सैपाक? कशावर करणार? धोतरावर करीन. सगळे हसायचे. खांदाडावर डोकं दिसतं पण ते मडकं रे मडकं! धुडकावणी झाली का स्वारीला समाधान.
(६)तीनप्रहरी एखाद्या घराशी जावे नि भाकरी मागावी. भाकरी शिल्लक नाही म्हटले तर शेवया द्या, मला शेवया फार आवडतात. तुझ्या बापाने ठेवल्यात म्हटले तर दूध द्या गाडगेभर अशी मागणी करायची. दूध नाही तर दोन शेर गूळ दे माय. खाऊन पाणी पिईन. घरवाला बाहेर यायचा नि स्वारीला दण्डा दाखवून हुसकावून द्यायचा.
(७)गावच्या विहिरीवर हात पाय सोडून बसायचे. मालक दिसला का त्याला विचारायचे ``काय हो, महारांची विहीर कोणती?’’ डेबूजीला महार समजून तो आईमाईवरून शिव्या देऊ लागायचा. ``पण मालक, मी नुसता बसलो आहे, पाणी नाही प्यालो अजून, आता पितो.’’ मालकाने दगडधोंडे मारून स्वारीला हुसकवायचे.
(८)एकदा एका देवळात पुराण चालले होते. खेडूतांची गर्दी. वेदान्ताचा एक मुद्दा पुराणिकबुवा मोठ्या अवसानाने श्रोत्यांना ओरडून ओरडून सांगत होते. सारेजण मोक्षाच्या विमानात बसल्यासारखे देहभान विसरून रंगले होते. एकदम डेबूजी आरोळी मारतो ``भाकर द्याहो मायबाप. लइ भूक लागलिया पाया पडतो. बापहो, भाकर द्या.’’ या आरोळीमुळे पुराणात एकदम खंड पडला आणि मोक्षाच्या आध्यात्मिक विमानात तरंगत असलेले सारे श्रोते धाडकन बसल्याजागी जमिनीवर असल्याच्या भानावर आले. पुराणिकबुवा संतापले.
पुरा. – काय रे ए गाढवा, मनुष्य आहेस का कोण आहेस?
डेबूजी – मी कोण ते आपण सांगितलंच.
पुरा. – पुराण चाललंय दिसत नाही तुला?
डेबूजी – पुराण चाललंय, दिसतंय मला मायबाप. पण भाकरी मागायला भिकारी आला तर पुराण चालताना ती त्याला देऊ नये, असं कोणत्या पुराणात लिवलंय दादा.
पुरा. – फार शहाणा दिसतोय लेकाचा. पुराणाच्या जागी भीक आणतात का कुणी? चल चालता हो. नाही तर...
डेबूजी –इथं नसलं तर आणवून द्या कुठूनतरी. फार भूक लागलिया बाप्पा.
पुरा. –  पुराण बंद करून तुला भाकर आणून द्यायला, कोण असा तू मोठा साधू लागलास? कोण आहेस तू? महार का मांग?
डेबूजी -  मी माणूस आहे महाराज.
पुरा. – ते कळतंय आम्हाला. जात कोणती तुझी?
डेबूजी – जात? माणसाची.
पुरा. – हे विचित्र सोंग कशाला घेतलंस?
डेबूजी – साधू होण्यासाठी मायबाप.
पुरा. – अरे अकलेच्या कांद्या, हलक्या जातीचे लोक कधी साधू झालेत का आजवर? त्यांना देव तरी कसा भेटणार?
डेबूजी – बरं तर. साधू होण्याचा फंद देतो टाकून. पण मला फार भूक लागलीय. भाकर द्या. लवकर द्या. जीव कासावीस झाला.
``द्यारे हुसकावून द्या या गाढवाला. नसती पीडा शिंची.’’ असे पुराणिकबुवा कमाण्डरच्या अवसानात लोकांना ओरडून सांगत आहेत आणि लोक मात्र जागच्या जागी बसून एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पहात आहेत, असा देखावा तयार होतो.

पुरा. –  (चिडून) खूप धंदा शोधू काढलाय गाढवानं. तरणा बांड असून भिक्षा मागतोस. लाज वाटायला पाहिजे तुला.
डेबूजी – लाज असती तर भिक्षा कशाला मागितली असती महाराज.
पुरा. – पहा पहा कसा चुरचूर एखाद्या पंडितासारखा बोलतोय तो. आजकाल ताळतंत्रच राहिले नाही. जातीचा हा हलका आणि म्हणे साधू होऊ इच्छितो. साधू व्हायला आमच्यासारख्या श्रेष्ठ जातीतले सारे लोक मेले का काय? म्हणून या चिंध्या मडके-धा-यावर ती पाळी आली. सज्जनहो, पहा, ऐका, खालच्या वर्गातले लोक अशी आपली पायरी  विसरून वरिष्ठांची पायमल्ली करू लागल्यामुळेच पाऊसपाणी गेले, शेती बुडाली आणि हे असले भिकार दिवस आले.
इतके वादळ उठले तरी डेबूजी शांत मुद्रेने जागच्या जागी उभाच. ओरडून ओरडून पुराणिकबुवांचा घसा खरचटला. ते किंचित थांबले का दिलीच त्याने पुन्हा जोराची आरोळी भाकर वाढा हो मायबापांनो. अखेर मंडळीतून कोणीतरी उठले आणि त्याला बगोटे धरून लांब दूर नेऊन घालवला.
हरएक गावात कुटाळ लोकांची टोळकी असायचीच. चावडीवर किंवा गावाबाहेरच्या पिंपळाच्या प्रशस्त पारावरत्यांची बैठक. नदीवर पाण्याला जाणा-या बायका पोरींची नि इतरांची टिंगल टवाळी करायचा त्यांचा धंदा अजूनही चाललेला दिसतो. डेबूजी असल्या वाटेने जाऊ लागला का ते टोळके त्याला हाका मारायचे. तो मुक्या बहि-यासारखा पुढेच चालत असायचा. मग टोळीतला कोणीतरी त्याला आडवा जायचा.
-   काय रे, हाका मारल्या त्या ऐकू नाहीत का आल्या? चर फिर माघारा.
-   मला पुढं जायचं आहे.
-   अरे हो मोठा पुढं जाणारा. मागं फिर. पाटील बोलवताहेत तुला.
-   मला काय पाटलाशी करायचं बाप्पा?
-   पाटलांचा कचका माहीत नाही वाटतं. येतोस, का नेऊ खेचीत.
-   खेचीत न्या.
धकांड्या मारीत स्वारीला चावडीपुढे किंवा पाराजवळ आणायचे.
पाटील – कुठून आलास रे?
डेबूजी – इकडून आलो.
पाटील – इकडून? इकडून म्हंजे कुठून?
डेबूजी – इकडून म्हंजे तिकडून.
पाटील – चाललास कुठं?
डेबूजी – पाय नेतील तिकडं.
पाटील – कोण आहेस तू?
डेबूजी – बाप्पा, मी आहे भयाणा.
पाटील – घरदार बायकापोरं काही आहेत का?
डेबूजी – आठवत नाही.
पाटील – आईबाप तरी होते का?
एक टवाळ – का आकाशातनं पडलास?
डेबूजी – हो, अगदी तसंच.
टवाळ – तरणा तगडा दिसतोस. बायको नाही का केलीस?
डेबूजी – केली होतीसे वाटतं.
पाटील – मग घराबाहेर कशाला पळालास?
डेबूजी – बायकोनं दिलं हुसकून म्हणून.
पाटील – बायकोनं हुसकलं नि तू बाहेर पडलास? शहाणाच आहेस.
डेबूजी – शहाणा नाही बाप्पा. भयाणा आहे मी भयाणा. असली कसली तरी भरमसाट उत्तरे देऊन तो आपली मनसोक्त टिंगलटवाळी निंदा करून घ्यायचा. क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरादि षड्रिपूंची खरचटून झाडणी करण्यासाठी डेबूजीने साधकावस्थेच्या केलेल्या या विलक्षण तपश्चर्येला `असामान्य’ हे विशेषण सुद्धा अपुरे पडेल.
ऋणमोचनचे ऋण फेडले
सन १९०७ साली डेबूजी बिनचूक ऋणमोचनच्या यात्रेला आला. या वर्षी त्याने नामसप्ताह आणि भंडा-याची योजना जमातीपुढे मांडली. लगोलग चार पाचशे रुपये जमा झाले. पक्वान्नांची भांडी चुलीवर चढली. तिकडे ओल्या दरडीवर सुकी माती घालण्याचा डेबूजीचा कार्यक्रम चालू झाला. संध्याकाळी ५ वाजल्यावर सरळ ओळीत पद्धतशीर पंगती मांडल्या. सगळ्या स्त्री-पुरुषांना नि मुलांना हातपाय धुवून पानांवर बसवले. वाढणीसाठी स्वयंसेवकांची योजना केली. काही बायकाही तयार झाल्या. प्रत्येक पानापुढे उदबत्त्या लावल्या आणि सर्व सिद्ध झाल्यावर पुण्डलीक वरदा हाsरी विठ्ठलच्या जयघोषात भोजनाला प्रारंभ झाला. परीट जमातीचा हा शिस्तवार भंडारा पहायला गावोगावचे लोक धावून आले. पंगती चालू असताना डेबूजीने एकतारीवर सुस्वर अभंगांचे गायन करून, त्यातूनही आत्मोद्धाराचे नि समाजोन्नतीचे ज्ञान श्रोत्यांना दिले. डेबूजीच्या संघटन-चातुर्याची जो तो मनमुराद वाहवा करू लागला. मागासलेली नि अडाणी नाक्षर परीट जात. पण तिला हे नवीन शिस्तीचे नि संघटनेचे वळण डेबूजीने लावलेले पाहून, त्या जमातीत त्याचा मोठा आदर होऊ लागला. एवढा मोठा मिष्टान्नाचा भंडारा झाला. हजार बाराशे पान झाले. मोठा सोहळा झाला. डेबूजीने अभंग गाऊन पंगतीची करमणूक केली. अखेर खरकटी काढली. भांडी घासली. जागा साफ केली आणि स्वतः मात्र चटकन कोठेतरी जाऊन मिळवलेल्या शिळ्यापाक्या भाकरी चटणीवर नदीकाठी जाऊन आपले नेहमीचे जेवण केलेले पहाताच हजारो स्त्री-पुरुषांच्या डोळ्यांत कौतुकाचे, कृतज्ञतेचे आणि आदराचे अश्रुबिंदू चमकले.

डेबूजीच्या खटपटीमुळे ऋणमोचनच्या पौषी यात्रेला सालोसाल वाढते महत्त्व येऊ लागले. दरसाल यात्रा जमावी. स्नानासाठी नदीकाठच्या घसरणीवर लोकांची घसरगुंडी चालूच रहावी आणि तेथे डेबूजीने सुकी माती टाकायचे हाडमोडे काम करीत रहावे, हे काही ठीक दिसत नाही. हा विचार लोकांच्या मनात घोळू लागला. नदीला फरसबंदी घाट बांधला पाहिजे. एवढी डेबूजीच्या तोंडून अस्पष्ट सूचना निघायची थातड, भराभर जागच्या जागी वर्गण्यांचे आकडे आणि रोख रकमा जमू लागल्या. सांगवी दुर्गडे येथील डेबूजीशी जमिनीबाबत तंटा केलेल्या सावकारांनी – बनाजी प्रीथमजी तिडके आणि त्यांचे बंधु तुकाराम प्रीथमजी तिडके यांनी पुढाकार घेऊन वर्गणीचे ठोक रकमेचे आकडे प्रथम टाकले. सन १९०८ साली पूर्णानदीचा पहिला घाट बांधून तयार झाला. जमलेल्या रु. ७५०० पैकी घाटाचे काम होऊन रकम शिल्लक उरली, तेव्हा वर्गणीदारांच्या इच्छेप्रमाणे घाटाशेजारीच श्री लक्ष्मी-नारायणाचे देऊळ बांधण्यात आले. यानंतर सालोसाल अनेक लोकांनी देणग्या देऊन नदीच्या दोनी तीरांवर योग्य ठिकाणी आणखी चार घाट बांधले. ४-५ वर्षांनंतर डेबूजीने परीट समाजात ऋणमोचन यात्रेच्या निमित्ताने एकेका नवा समाज-संघटनाचा प्रघात चालू करावा. भंडा-याच्या जोडीने त्याने नाम-सप्ताहाची प्रथा चालू केली. मांसभक्षण नि दारूबाजी. या व्यसनांच्या हकालपट्टीची निकराने चळवळ केली. देवीच्या नावाने जागोजाग होणा-या पशुपक्ष्यांच्या हत्या महापाप ठरवून बंद पाडल्या. भंडारा करून उरलेल्या पैशानी मोठमोठी भांडी खरेदी करवली. सन १९१४ साली पत्र्याची धर्मशाळा बांधून ती पंचांच्या ताब्यात दिली. लोकहिताच्या असल्या अनेक खटपटी कराव्या. त्या लोकांच्या हवाली व्यवस्थेसाठी सोपवाव्या आणि आपण मात्र झटकून नामानिराळे रहावे. फार काय, पण पार दूर कोठेतरी निघून जावे, असा त्याच्या जीवनाचा ओघ चालू झाला. `` डेबूजी आमच्या परीट जातीचा पाणीदार मोती आहे,’’ असे एकाने सहज म्हणताक्षणीच, ``नाही हो बाप्पा, मी एक फुटके खापर आहे. मोत्यासारखा कुणाच्या छातीवर हारात रुळत राहण्यापेक्षा, मोत्याच्या थेंबासारखा दवाचा कण म्हणून तान्हेल्या चिमणीच्या घशात नेमका पडावं, ही तर माझी सारी खटपट आहे.’’ असा जबाब द्यायचा.
ऋणमोचनप्रमाणेच मार्की (ता. अमरावती), पिंजर (ता. अकोला) आणि माहूर (निजाम प्रदेश) येथील यात्रांतून डेबूजीने भंडारे, नामसप्ताह आणि धर्मशाळा चालू करून, स्वतः त्या कोठल्याही उद्योगाच्या मोहात नाममात्रही राहिला नाही.
डेबूजी पुढे, कीर्ति मागे.
ठिकठिकाणच्या या कार्यामुळे डेबूजीचे नाव लांबवर फैलावले. कोण हा असावा, तो पाहिला पाहिजे एकदा, असे जिकडे तिकडे लोक बोलू लागले. वाट फुटेल तिकडे जाण्याच्या नित्य क्रमात तो कोठेही गेला, कोणालाही भेटला, तरी त्याने आपले नाव चुकूनही कधी कोणाला सांगितले नाही आणि आजही सांगत नाहीत. तोच हा लोकसेवक डेबूजी असे लोकांनाही पटायचे नाही .एवढी मोठमोठी संघटनेची कामे करणारा आणि परिटांसारख्या मागासलेल्या समाजात जागृतीचे अमृतसिंचन करणारा असा वेडाविद्रा, रकटी चिंध्या पांघरणारा, मडके गळ्यातबांधून फिरणारा, दिगंबर असेलच कसा? याला तरी लोक पुढारी मानतील कसे नि याचे ऐकतील कसे? दरसाल हजारगावे पायपिटीत पालथी घातली, लाखो ब-यावाईट लोकांशी संबंध आला, पण कोणालाही डेबूजीच्या नावागावाचा थांगपत्ता लागला नाही.
डेबूजीची कीर्ती व-हाड, खानदेश, नागपुरापर्यंतच्या मागासलेल्या समाजात फैलावत गेली. स्वतःच्या संसारावर पाणी सोडून इतर हजारो अडाणी नाक्षर म्हणूनच स्वाभिमानाला मुकलेल्या श्रमजीवी कष्टाळू जनांचे संसार ठाकठीक सावरण्याची अक्कल शिकवणारा हा नवीन साधू पहाण्यासाठी ठिकठिकाणचे लोक उत्कंठित झालेले असत. काही दिवसांनी कोणी सगेसोयरे आले, त्यांनी डेबूजीच्या वेषाची, वृत्तीची नि ग्रामसेवेची माहिती दिली म्हणजे ``अरे हो रे हो. परवाच तो आमच्या गावी येऊन गेला. आम्ही समजलो का असेल कोणी वेडापीर. त्याने चावडी सारवून साफ केली. विहिरीचा पाणवठा खराटा घेऊन स्वच्छ केला. ढोरांना पाणी पाडले. त्या सोनबा पाटलाच्या सुनेचे कडब्याचे ओझे डोक्यावर नी तिचे पोर खाकोटीला घेऊन त्याने तिला ७ मैल सोबत केली नि घरी आणून घातली. बाबा, काय भाकर बिकर खातोस का म्हणून विचारले तर काहीही न बोलता नुसता हसला नि नमस्कार करून धावत पळत गेला निघून. अरेरे, दापुरी ऋणमोचनचा तोच का डेबूजी? किती अभागी लोक आम्ही. आम्ही त्याला ओळखले सुद्धा नाही हो. छे छे छे. फारवाईट गोष्ट झाली.’’ असे तडफडायचे.

भटकंतीमध्ये रेल्वेचाही प्रवास यायचा. उतारूंच्या गर्दीत स्वारी खुशाल घुसून आगगाडीत जाऊन बसायची. मनात येईल तेथे आणि फास्ट गाडी असल्यास ती थांबेल तेथे उतरायचे. हा क्रम. तपासणीत तिकीट कलेक्टराला हा बिनतिकिटाचा उतारू आढळला का त्याने शिव्यागाळी करून, धक्के मारून बाहेर काढायचा. झडती घेऊन कफल्लक आढळल्यामुळे, एकदोन चपराका लगावून स्टेशनबाहेर हुसकून द्यायचा. दुसरी गाडी आली का स्वारी घुसलीच आत नि चालली पुढे. हे साधले नाही तर खुशाल पुढची एक दोन स्टेशने पायी चालत जायचे आणि तेथे एकादी गाडी पकडून पुढे चालते व्हायचे.
काशी प्रयाग यात्रेचा प्रवास – डेबूजीने असाच केला. परत येताना इटारसी स्टेशनवर एका गो-या इन्स्पेक्टरने त्याला तिकिटाशिवाय नि कफल्लक प्रवास करताना पाहिले मात्र, हाणली ढुंगणावर बुटाची लाथ नि दिला भिरकावून फलाटफार्मावर. त्या डब्यात एक मुसलमान गृहस्थ बसला होता. त्याच्या डोळ्यांना टचकन पाणी फुटले. तीन चार गटांगळ्या खाऊन, डेबूजी उठला नि तो गोरा अधिकारी दूर गेल्याचे पाहून पुन्हा डब्यात घुसला.
मुसलमान – अरे बाबा, का एवढा हाणमार सोसतोस? जवळ पैसे नसले तर पायी प्रवास करावा. तिकिटाशिवाय का बरं घुसावं नि जागोजाग असली मारपीट खावी?
गाडी चालू झाली होती. डेबूजी हात जोडून त्याला म्हणाला - ``हे पहा जनाबसाहेब, गो-या साहेबाची एक लाथ खाल्ली तर १०० मैल सुखाने पुढे आलो ना मी? पायाने चालतो तर ऊन्ह आहे, थंडी आहे, पाऊस आहे, किती तरी त्रास असतो चालताना. त्यापेक्षा दर जंक्शनवर एक बुटाची ठोकर काय वाईट? एक लाथ बसली का चालला १०० मैल पुढे.’’
त्या सज्जन मुसलमान गृहस्थाने डेबूजीची अवस्था पाहून दहा रुपयांची नोट पुढे केली. ``साधूजी, ए लेव. ऐसी मारपीट मै नही देख सकता.’’ डेबूजीने त्याला हात जोडून विनयाने म्हटले - ``जनाब साहेब, पैसा मला काय करायचा? ही काठी, हे मडक्याचे टवकळ नि अंगावरच्या या चिंध्या, एवढीच माझी धनदौलत नि संपत. आपण दिलदार आहात.’’ डेबूजीची ती निरिच्छ वृत्ती पाहताच त्या गृहस्थाचे डोळे पाण्याने डबडबा भरून आले. ``तुम बडे अवलिया हो’’ असे म्हणून तो डेबूजीचे पाय धरणार तोच तो चटकन बाजूला सरला. ``जनाब, नमस्कार देवाला – अल्ला करावा. माणसाचे पाय धरू नये.’’
घार फिरे आकाशी -
परि चित्त तिचे पिल्लांपाशी. बारा वर्षांच्या वनवासात दापुरी किंवा तेथले घर यांचे दर्शन डेबूजीने कटाक्षाने टाळले होते. चुकून एकदाही तिकडे कधी तो फिरकला नाही. तरीसुद्धा समाजहिताच्या चालू केलेल्या नानाविध कार्यांवर त्याचे लक्ष बिनचूक लागलेले असे. परीट जातीत आणि मागासलेल्या इतर समाजांत ज्या ज्या राक्षसी नि घाणेरड्या रूढींच्या उच्चाटनाची आपण खटपट केली, त्या खरचटून नाहीशा झाल्या का या ना त्या आडपडद्याने तसाच चालू आहेत, याचा तो वरचेवर कानोसा घेत असे. त्याचे एकनिष्ठ मित्र नि अनुयायी त्याला कोठेतरी गाठून भेटून सल्लामसलत घेत असत.
हुण्डा-देज-निषेधाचा तडाखा.
लग्नकार्यात वरपक्षाने किंवा वधूपक्षाने हुंडा किंवा देज देता घेता कामा नये, असा प्रचार त्याने केलेला होता. जो कोणी हे पाप करील, त्याच्या लग्नाला कोणी जाऊ नये, बहिष्कार घालावा. हुंड्याच्या नि देजाच्या प्रघाताने दोन्हीही कुटुंबे कर्जबाजारी होतात. हातच्या शेतीला गुराढोरांना मुकून सावकाराचे दास बनतात. नवविवाहित जोडप्याचा नवा संसार कर्जाच्या उकीरड्यावर चालू करणे महापाप आहे, आत्मघात आहे. लग्नासाठी सावकाराचे कर्ज काढून गावजेवणावळीचा, आरसपरस आहेरांचा नकली श्रीमंतीचा खोटा थाट करण्यापेक्षा, गरिबाला साजेशोभेशा झुणकाभाकरीने तो साजरा करावा, असा त्याचा प्रचार कीर्तनांतून नेहमीच होत असे. आजही तो चालूच आहे.
एका ठरलेल्या लग्नात व-हाडमंडळ जमून नवरानवरीला हळद लागल्यावर, वरपित्याने हुंड्याची मागणी केली. वधूपिता गांगरला. ठरावाची भाषा बदलली तरी हळद लागल्यावर लग्न मोडायचे कसे? हुंड्याची अट पुरी केलीच पाहिजे. सावकाराकडे कर्जासाठी जाणा-या वधूपित्याला डेबूजीच्या स्थआनिक मित्रांनी थोपवून धरले आणि चारी दिशांना हेर पाठवून डेबूजीला तेथे बोलावून आणले. त्याने वरपित्याची समजूत घालण्याचा खूप प्रयास केला. पण तो आपला हट्ट सोडी ना. `हे लग्न मोडले’ असा पुकारा करून डेबूजी जवळच्या एका गावी गेला आणि तेथे एका तरुणाला लग्नासाठी उभा करून त्या मुलीचे त्याच्याशी झुणकाभाकरीच्या मेजवानीने थाटात लग्न करून दिले. नवलाची गोष्ट, त्या हुंडेबाज तरुणाला पुढे कोणीही आपली मुलगी द्यायला धजला नाही आणि तो जन्मभर अविवाहितच राहिला.

भटकंती चालू असताना डेबूजीने शिंदीची एक हातभर फाटकी हातरी आणि एक एकतारी या दोन वस्तुंची आपल्या इस्टेटीत भर घातली. नागपुराकडे हातरीला चापरी म्हणतात. म्हणून त्या प्रदेशात त्याचे नाव चापरेबुवा असे पडले आहे. एकतारी कुठून मिळाली? कोणी दिली? कधी दिली? याविषयी मी स्वतः बाबांना विचारले असता ``मले काय आठवत नाय आता.’’ असे उत्तर मिळाले. ``ओसाड अरण्यात फिरत असता माझी नि एका जख्खड म्हाता-याची गाठ अवचित पडली. तो एकतारीवर भजने गात असे. मलाही भजनाचा नाद. मी पण बसलो त्याच्या शेजारी भजने गात. कधी तो एकतारी वाजवायचा, कधी मी वाजवायचा. दोघांचे काही दिवस छान जमले होते. मी बाळगलेली एकतारी मला कोणी दिली का त्या म्हाता-या बाबाजीनी दिली, आज काही आठवत नाही.’’ हा त्यांनी आणखी खुलासा केला.
आधीच डेबूजीला भजनाचा नाद मोठा. `रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय, गोविंद राधे गोविंद राधे’ हेच नि एवढेच हरिनाम स्मरण करीत तासनतास तो एकांतात निमग्न गात बसायचा. भजनाच्या सरावामुळे आधीच आवाज गोड झारदार, तशात जातिवंत तल्लीनतेने हरिनामाचे गायन, त्यामुळे कोठेही तो गात बसला तरी आजूबाजूचे लोक हां हा म्हणता सभोवार जमून त्याचे भजन मुकाट्याने ऐकत बसायचे. ``अरेच्चा, हा वेडा बुवा भजने छान म्हणतो!’’ ही आवायी आसपासच्या खेडेगावात जायची आणि तो गावात आला म्हणजे, ``बुवाजी, गा थोडे भजन गा’’ असा लोक आग्रह करायचे. गा म्हटल्यावर गाता तर मग तो डेबूजी कसला? लोक म्हणतील त्याच्या काहीतरी उलट करायचे, त्यांना राग आणायचा, त्यांच्या शिव्या खायच्या, चिडून ते मारायला उठले का त्यातच परमानंद मानायचा, हा खाक्या. लोकांनी ``म्हण की लेका एकादा अभंग’’ असा अट्टाहास चालवायचा आणि ``मले कायबि येत नाय दादा’’ असे यांनी म्हणायचे. ``मग झक मारायला ती एकतारी कशाला जवळ बाळगलीस? टाक फोडून’’ असे म्हटल्यावर ``मी कशाला फोडू बाप्पा. तुम्हाला वाटले तर टाका फोडून’’ या उत्तरावर कोण काय जबाब देणार?
कधीकधी भजनासाठी लोक हट्ट धरायचे. स्वारीने एकतारी बेसूर लावायची आणि भसाड्या आवाजात भजनाला प्रारंभ करायचा. मग मंडळी `आता बंद कर बाबा तुझं हे भजन’ असा ओरडा करून निघून जायची.
स्वारी लहरीत असली नि कोणी ``बुवा, भजन करता का?’’ असे विचारले तर ``हो हो. रात्री गावाबाहेर करीन देवाचे कीर्तन. गावक-यांना निमंत्रणे द्या, बत्त्यांची सोय करा, म्हणजे थाट होईल.’’ चिंध्या-मडकेधारी फटिंगाची ही थाटामाटाची भाषा ऐकून लोक नि पोरेटोरे खदखदा हसायची. कोण जातो एवढी कीर्तनाची सरबरायी करायला?
झाले. रात्री १० वाजले. डेबूजीने आपली एकतारी सुरात लावली. रामकृष्ण हरि जय भजनाला सुरुवात केली. गावाबाहेरचा उकीरडा. आजूबाजूला काजळी अंधार. एकतान एकसुरी भजनाचा तो भरघोस गोड आवाजाचा सूर कानी पडताच, ``कोण रे कोठे गात आहे? फार छान भजन चालले आहे. चला चला, जाऊ या तिकडे.’’ म्हणत एक धावला. दुसरा धावला. तिसरा. चवथा, पाचवा. बायकापोरे, बाप्ये, म्हातारेकोतारे सारे गाव जायचे डेबूजीभोवती त्या अंधारात. ``अरे एकादा दिवा तर आणा कुणी.’’ असे कोणी म्हटल्यावर एकादे टमरेल यायचा कुणीतरी घेऊन. लोकानी काहीही केले तरी स्वारी आपल्य ाएकतारीच्या भजनात बेभान तल्लीन. बरेच लोक जमले म्हणजे स्वारीने भजन करायचे बंद. मग लोक ओरडायचे, ``बुवाजी काही तरी सांगा. सांगायचे नसेल तर निदान भजन तरी आणखी वेळ चालू द्या.’’
लहर असली तर हरिनामाचे महत्त्व, समाजावर संतांचे उपकार, या मुद्द्यांचा मुखडा घेऊन, शेतकरी कामकरी समाजातील कित्येक वाईट रूढी, जनावरांची हत्या, शिक्षणाचे माहात्म्य, व्यसनांचा दुष्टपणा, स्वच्छतेची जरूरी, या नि असल्या विषयांवर डेबूजी असे काही चित्तवेधक प्रवचन करायचा का आबालवृद्ध सारे श्रोते अगदी गहिवरून जायचे. `हा म्हणतो ते सारे खरे आहे रे खरे आहे. हा काही वेडा नाही. आपल्या खेडूत समाजाची याची पहाणी फार बारीक आहे. हा साधू आहे. ठेवून घेऊ याला आणखी दोन दिवस आणि करू या याची कीर्तने चांगला बत्त्यांचा झगझगाट करून.’ गावक-यांचा इकडे हा बेत चाललाय तर तिकडे डेबूजी पहाटेलाच उठून गाव सोडून पसार.
दापुरीत काय घडले?
९-१० वर्षे गेली. आता घरच्या सगळ्यांची खात्री पटली का डेबूजी पुनश्च संसारात बसणे अशक्य म्हणून बळिरामजीने थोरली मुलगी अलोकाबाईचे लग्न ठरवले. डेबूजीने आशीर्वाद पाठवला पण लग्नाला आला नाही. मातोश्री सखूबाईचेही प्रपंचावरून चित्त उडाले. रात्रंदिवस ती हरिनामभजन करू लागली. या अपेक्षित क्रांतीची खबर लागताच डेबूजीने ऋणमोचनजवळच्या एका ओसाड खेड्यात एक काट्याकुट्याची झोपडी बांधली. आई, बायको, मुले यांना तेथे रहायला सांगितेल. झोपडीत सारा संसार मडक्यांचा. सखुबाई नि कुंताबाई मोलमजुरी करून कसाबसा निर्वाह करीत तेथे राहिल्या. डेबूजी चुकूनही कधी तिथे वस्तीला किंवा अन्नग्रहणाला रहायचा नाही. कधीमधी फेरा आलाच तर वाजवीपेक्षा अधिक गाडगे मडके आढळल्यास ते कोणाला तरी देऊन टाकायचे. निर्वाहापेक्षा अधिक धान्य दिसल्यास गोरगरिबांना ते वाटायचे आणि जय जय रामकृष्ण हरि गर्जना करीत भटकंतीला निसटून जायचे असा खाक्या चालू झाला.
या चंद्रमौळी झोपडीनेही व-हाड, मुंबई, पुणे वगैरे अनेक ठिकाणी प्रवास केलेला आहे. गाडगे बाबा केव्हा येतील आणि चला उठा म्हणतील, याचा नेम नसायचा. असेल ती झोपडी मोडायची आणि भलत्याच ठिकाणी दुसरी थातरमातर उभारून तिथे आई, बायको-मुलांना सांगायचे रहा म्हणून. ऋणमोचन, आमले, झिंगले, मूर्तिजापूर, पुन्हा आमले, नंतर शेगाव, फाटफ, मुंबई किंग सर्कल. नारायण शेटची वाडी माटुंगा, पुणे, आळंदी, पुन्हा मूर्तिजापूर, परत पुणे, शिवाजीपार्क दादर, वांद्रा अशा अनेक ठिकाणी त्या काट्याकुट्याच्या झोपडीचे स्थलांतर झाले, त्याची याद कोठवर द्यावी? प्रत्येक ठिकाणी नुसती झोपडी कशीबशी उभी राहायची, कोणी चांगली जागा देऊ केली तर ती कटाक्षाने नाकारायची. आणि पोट भरण्याची सोय काय? तर जे मी करतो तेच करा तुम्ही, हा जबाब. गाडगेबुवांचे कुटुंब म्हणून कोणी भक्त काही अन्न धान्य देऊ म्हणेल तर तेही परवडायचे नाही. भटकंतीचा फेरा आला नि झोपडीत काही कापडचोपड धान्य आढळले का निघालेच ते बाहेर आणि झाली त्याची गोरगरिबांना खैरात, हा प्रकार अजूनही चालूच आहे.

याविषयी बाबांचे एका काळचे एक निकटवर्ती अनुयायी मूर्खानंद यांची एक आठवण येथेच वानगीदाखल दिलेली बरी.
``पुण्याला सोमवार पेठेत बाबांची एक धर्मशाळा. तिच्या शेजारी एका लहानशा झोपडीत सौ. कुंताबाई रहात होत्या. आमच्यापैकी काहींनी आणि इतर बाबांविषयी आदर असलेल्यांनी आईंना काही बाही आणू द्यावे. त्यांनी लोभाविष्ट दृष्टीने त्याकडे पहात म्हणावे, ``काह्याले आनलं बाप्पा? साधुबाबा (बाबा) येतीनं, तर राहू देतीन् म्हनतां काय? अईमाय्! त्याहिच्या हातावर तर जसा कर्नराजा (कर्ण) येऊन बसला!’’ बाबांना असे भले बुरे म्हणत आईंनी ती वस्तु घ्यावी आणि आपल्या झोपडीत लपवून ठेवावी.
केव्हातरी बाबा पुण्याला यावेत. आईंनी घाईघाईने धर्मशाळेत येऊन बाबांना म्हणावे, ``तुमाले ममईले जाव् लागते ना?’’ बाबांना ही त्यांची युक्ति माहीत. त्यांनी आपल्या पत्नीशी म्हातारपणाचा विनोद करावा, ``बाप्पा! जेव्यागिव्याले घालीत नाहीस काय मले?’’ आणि त्यांनी आईंच्या झोपडीकडे चालू लागावे.

झाले! झोपडीत मोठ्या युक्तिबाजपणे आईंनी लपवून ठेलेल्या सामानाची लागली वाट! आईंनी घाईघाईने बाबांच्या मागोमाग निघावे. कुणाला ठाऊक? भांडाभांडी करून कदाचित् या वेळी तरी त्यांतली एखादी वस्तु ठेवून घेता येईल!
पण बाबा सरळ झोपडीत शिरायचे! मग मला सर्वहुत यज्ञ करणा-या ऋषींची आठवण व्हावी! बिचा-या आईंजवळ बाबांच्या तीक्ष्ण दृष्टीपासून वस्तू लपवून ठेवण्याची चातुरी कुठून आसणार? बाबा झोपडीत लपलेल्या एकेक चिजा बाहेर काढायचे. कुठे कुणी दिलेली चादर, घोंगडी, लुगडे, तांब्या, परात, पळी, पार सगळ्या वस्तुंचा बाहेर ढीग पडायचा. फारतर काय, आईंनी घर म्हणून ठेवलेले धान्यही बाबा राहू द्यायचे नाहीत!
आणि शेवटी वकिली करूनही बाबांच्यापुढे टिकाव लागला नाही, की आईंनी जणू एखाद्या प्रिय जनाची प्रेतयात्रा निघावी, तशी मुद्रा करून सतृष्ण दृष्टीने त्या वस्तुंकडे पहात कपाळावर हात देऊन बसावे!
बाबांनी कष्टकरी मंडळीस हांका मारून ते सगळे सामान वाटून टाकावे आणि आईस म्हणावे, ``आता कशी झ्याक् झाली तुही (तुझी) झोपडी? बसली काय तथीसा? जेव्याले नाही देत काय?’’
आईंनी तावातावाने म्हणावे, ``आता कुकून (कुणीकडून) घालू जेव्याले? तुमचा हात फिरला अशीन (असेल) सगळा (सगळ्या) झोपडीवर! आतां हाडयाले (कावळ्याला) तुकडा घाल्यापुरतंही पीठ कशाला ठेवलं असन् तुम्ही?’’
बाबांनी मोठमोठ्याने हसत धर्मशाळेकडे निघावे!
आणि हा असा क्रम अनेक वर्षे सुरू होता!’’

सन १९०५ ते १९१७च्या बारा वर्षांच्या साधकावस्थेत मनसोक्त देशपर्यटन, प्रत्यक्ष जनसंपर्काने नि संघर्षाने षड्रिपूंचे दमन, एकतारीचे कीर्तन आणि जागोजाग कट्टर निरिच्छतेने चालवलेली मानवसेवा नि पशुसेवा या गोष्टींच्या साधनाबरोबरच लोकस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण हा डेबूजीच्या चरित्रातील महत्त्वाचा गाभा आहे. आजवरच्या साधुसंतांचा लोकसंग्रह आणि डेबूजीचा लोकसंग्रह यात जमीन अस्मानाचा भेद आहे. हा भेद नीट लक्षात येण्यासाठी या लोकहितवादी कर्मयोगी संताने बृहन्महाराष्ट्रात सिद्ध केलेल्या लोकजागृतीची आणि लोकोपयोगी मोठमोठ्या संस्थांच्या माहात्म्याची पार्श्वभूमी त्याशिवाय नीटशी नजरेत भरणार नाही.
महाराष्ट्राची संत-परंपरा प्राचीन आणि असंख्य आहे.ची आणि लोकोपयोगी मोठमोठ्या संस्थांच्या माहात्म्याची पार्श्वभूमी त्याशिवाय नीटशी नजरेत भरणार नाही.
ट्रात सिद्ध केले त्यांचा लोकसंग्रहही अफाट नि विशाळ आहे आणि त्यातून उद्भवलेले पंथ आणि संप्रदाय यांचीही संखया अगणित आहे. बहुतेक सगळ्या संतसंप्रदायांचा अट्टहास पारलौकीक सौख्य नि मोक्ष यांवरच खिळलेला. पृथ्वीवरील प्राप्त जिण्याची, संसाराची आणि व्यवहाराची प्रत्येक संताने कडकडीत शब्दांत निर्भर्त्सना करून आपल्या शिष्यादि अनुयायांना परलोकच्या अमृतासमान (?) काल्पनिक जीवनासाठी सर्वस्वाला झिजविण्याचाच उपदेश केलेला आहे. संत-परंपरेच्या या महिम्यामुळे महाराष्ट्रात बुवाबाजीचे भरमसाट पीक सारखे पिकत आलेले आहे आणि लक्षावधि स्त्री-पुरुष जागोजागच्या मठस्थ पीठस्थ बुवा-महाराजांच्या भजनी लागून, वाजवी व्यवहाराच्या नि विहित कर्तव्याच्या क्षेत्रांत भ्याड, पराङमुख नि दुबळे होऊन बसले आहेत. जरा कुठे एकादा विचित्र किंवा विक्षिप्त माणूस पारलौकीक मोक्षसाधनेची स्पष्ट वा अस्पष्ट बडबड करताना दिसला, लोकव्यवहारापेक्षा भलतेच वेडेचार करताना आढळला का हां हां म्हणता लोक त्याला बुवा किंवा महाराज बनवतात. त्याला मठ बांधून देतात. देवासारखी त्याची पूजाअर्चा, भजने-आरत्या करतात. बुवाच्या लोकोत्तर नि लोकविलक्षण चमत्कारांच्या गप्पा स्वानुभवाच्या साक्षी-पुराव्याने चोहीकडे फैलावण्यात येतात. मोठमोठे पैसेवाले, निपुत्रिक, पदवीधर, शिकलेले, संसारांत पिकलेले आणि बेकर्तबगार म्हणून दैववादाला विकलेले उल्लू त्या बुवाच्या साधूपणाचा नि अवतारीपणाचा एकच डांगोरा पिटतात. त्याच्या लोकविलक्षण भलभलत्या कुकर्मांवर नि बदकर्मांवरही गूढ अध्यात्माची जरतारी शालजोडी पांघरतात. जिवंतपणी यात्रांचा थाट आणि मेल्यावर समाधीची देवस्थाने निर्माण होतात. त्या बुवा महाराजांचा एक ठराविक संप्रदाय चालू होतो. शिष्यसमुदाय आजूबाजूला तयार झालेलाच असतो. मग बुवांच्या मागे पट्टशिष्य म्हणून गादीवर कोण बसणार या भानगडीचे तंटे लागतात. कारस्थाने चालतात, मारामा-या होतात, मठात जमलेल्या द्रव्यनिधीचे, मठ, समाधि, शेतवाड्या, इमारतींच्या हक्कांचे वाद आणि तंटे-कोर्टकचे-यांच्या पाय-या खतवू लागतात.
काही वकील शिष्य या बाजूला, काही त्या बाजूला असा देखावा उभा राहतो. म्हणजे बुवांचे खरेखोटे आध्यात्म जातेबुवांच्याबरोबर समाधीत आणि मठ समाधिच्या संसाराचे त्रांगडे लागते शिष्य-प्रशिष्यांच्या मागे. या सगळ्या उद्व्यावापात नि मोक्षसाधनाच्या हलकल्होळात देशाची अवस्था काय आहे? मागासलेल्या श्रमजीवी जनतेच्या जिण्याची स्थिती कशी आहे? किती लोक एक वेळा जेमतेम खातात आणि किती उपासमारीने मरत आहेत? भिकारी लोकांची, लंगड्या पांगळ्या वेड्या लोकांची संख्या का वाढत आहे? त्यांच्या जगण्यामरण्याची कोणी विचारपूस करतात का नाही? वर्षभर शेतात राबूनही शेतकरी भिकेला का लागला? शेकडो जमातींची दिनचर्या अनेक घाणेरड्या रूढींनी कशी पाशवी अवस्थेला पोचली आहे? व्यसनातिरेकांनी कुटुंबेच्या कुटंबे उकीरड्यावर कशी झुगारली जात आहेत? सावकारांचा नि सत्ताधा-यांचा जुलूम गावोगाव कसा होत आहे? इत्यादि प्रश्नांची त्या मठ-पीठ-पूजक अध्यात्मवादी गबरूंना चिंता पर्वा दिक्कत लवमात्र नसते. तू तो राम सुमर, जग लढवा दे, हा एकच त्यांचा खाक्या! बुवाबाजीच्या जाळ्यात अडकलेल्या हरएक बाई-बुवाची विवंचना स्वर्गलोकच्या साधनासाठी. तेवढ्यासाठी मारे कथा, कीर्तने, पुराणे नि भजनांचा आटोकाट अट्टहास अखंड चालू.

कथा, कीर्तने, पुराणे आणि भजने या संस्था ब-याच जुन्या आहेत. लोकांत धर्मजागृति केल्याची पुण्याई त्यांच्या पदरी बांधण्याचा एक संभावित शिरस्ता आहे. ती धर्मजागृति कोणती? कथा, कीर्तन, पुराण भजन, वाटेल ते ऐका, त्यात प्रवचनाचा मुख्य ओढा गूढ अशा अध्यात्माच्या काथ्याकूटाकडे. ते अध्यात्म खुद्द कथाकाराला नि पुराणकारालाही उमजलेले नसायचे. फक्त पोथीतल्या जडबंबाळ शब्दांची ते नुसती पोपटपंची करतात. आत्मा, परमात्मा, योग, सिद्धी, समाधी, गुरूपदेश, सदेही विदेही मोक्ष इत्यादि शब्दांची भरमसाट पेरणी केली का चढला कथा-पुराणांना रंग. सारे श्रोते मोक्षानंदात डुलत रहायचे. कथा-पुराण संपून उठले का झाडलेल्या उपरण्याच्या फटका-यातच ते सारे ब्रह्मज्ञान झटकून जायचे. कोरडा पाषाण श्रोता घरी आल्यावर विचारले का, `काय आज कशा कशी काय झाली?’ तर उत्तर काय? `वा वा वा! बुवा मोठे विद्वान. बहुश्रुत. अधिकारी. संगीताची साथ पण छानदार. खूप रंग भरला, खूप रंग भरला.’
कथा पुराणांनी गेल्या दोन तीनशे वर्षांत खरोखरच काही धर्मजागृति केली असती तर हिंदु जनतेला आजची हीन, दीन, लीन, क्षीण अवस्था आलीच नसती. भजनांनी मागासलेल्या समाजात धर्मजागृति केली म्हणावी तर तेथेही हाच परिणाम दिसून येतो. कथा पुराण भजनांनी लोकांत देवभोळेपणा, भिक्षुक बडवे बामणांचा वरचढपणा, भलभलत्या दान-दक्षणांचे घाणेरडे प्रघात, इहलोकाविषयी नि स्वतःविषयी तिटकारा आणि परलोकाच्या प्राप्तीसाठी काळीजतोड विवंचना, बायका-मुले संसार व्यवहाराचा पातकीपणा, तीर्थयात्रांचे दान-पिंडांचे भिक्षुक-भोजनांचे गोदानांचे फाजील स्तोम, धातू दगडधोंड्यांच्या मूर्तिपूजनांचा अट्टाहास, उपासाचा बडेजाव, अशा हजार भिकारड्या भानगडी फैलावण्याचे कर्म मात्र केलेले आहे.
तीनही लोकी श्रेष्ठ असलेल्या (?) ब्राह्मण कथा-पुराणकारांनीच असले भलभलते प्रचार कथापुराणांतून फैलावल्यावर, अनाडी लोकांनी जाखाई, जोखाई, मरीआई, म्हसोबा, बहिरोबा, खंडोबा वगैरे शेकडो गावठी दैवतांची पैदास करून त्यांनाही कोंबड्या-बक-यांचे बळी देऊन संतुष्ट करण्याचा कारखाना खेडोपाडी धूमधडाक्याने चालवला, तर त्यात नवल कशाचे? नाक्यानाक्यावरील ओसाड जागेत एकेक गावदेव ठाण मांडून बसला आणि आवस-पुनवेला कोंबडी बकरी दारूचा नैवेद्य हबकू लागला. माणसांच्या अंगातही तो घुमू लागला. असल्या घुम्यांचा एक पंथच निर्माण झाला. घरात तापसरायी येवो अथवा गावात पटकीचा आजार फैलावो, औषधोपचाराऐवजी सगळ्या गावक-यांची भिस्त देव-खेळव्या घुम्या भगतावर. भटाभिक्षुकांप्रमाणे घुम्या भगत सांगेल ती पूर्व. त्याचा हुकूम व्हायची थातड का गावदेव नि गावदेवीपुढे धडाधड झाल्याच चालू कोंबड्या बक-यांच्या कंदु-या आणि दारूचे पाट. पावसाचे अवर्षण पडले, खेळवा दे. गावकीचे तंटे पडले, लावा देवाला कळी आणि घ्या त्याचा निकाल. घरात मूल जन्माला आले, एकाद्याचे लग्न निघाले किंवा कोणी मेला, तरी दगड्याधोंड्या गावदेवाला कोंबडे, बकरे नि दारू दिलीच पाहिजे. सारा गाव मग झिंगून तर्र! आणि हे सारे कशासाठी? तर देवाधर्माच्या सांगतेसाठी. दस-याला रेड्याचे बलिदान हवेच. नाहीतर रोगरायीच्या तडाक्यात गावाची मसणवटी व्हायची. शिवाय, त्या रेड्याच्या बलिदानात गावमहारांचा नि गावपाटलांचा मोठ्ठा मान असायचा. पटकीचा रोग आला आणि सगळीकडे दुष्काळ असला तरी भीक मागून खंडीवरी तांदळाच्या भाताचे गाडे भरायचे, त्यावर गुलाल शेंदूर उधळायचा, जागोजाग कोंबडी, बकरी कापीत, रक्ताचे सडे पाडीत पाडीत, मरिआईच्या गाड्याची मिरवणूक गावाबाहेरच्या वेशीवर नेऊन सोडायची. याचा अर्थ, एका गावाची इडापीडा दुस-या गावाच्या वेशीवर नेऊन टाकायची असा असल्यामुळे, त्या गावचे लोक काठ्या, बडगे, भाले-बरच्या घेऊन मरिआईच्या गाड्याला विरोध करायला अस्तन्या सरसावून उभे असतात. आमच्या गावाच्या वेशीवर गाडा आणू नका, दुसरीकडे न्या, आणाल तर याद राखा, डोकी फुटतील. या धमक्यांच्या हाका आरोळ्या चालू होतात. गाडा कोणीकडेही नेला, तरी कोणत्या ना कोणत्या गावाची वेस असणारच तेथे. हरएक वेशीवर गावगुंड तयारच असतात मग काय? कचाकचीची मारमारी होते आणि प्रकरणे जातात फौजदारी कचेरीत. तालुक्याच्या वकिलांची पोळी पिकते. जखमी लोकांनी दवाखाने फुलतात. कधीकधी मारामारी टाळण्यासाठी मरिआईचा शेंदूर गुलालानी माखलेल्या खंडीभर भाताचा गाडा तेथेच वेशीवर टाकून बैलांसकट गावकरी माघारी पळतात, कुत्री कावळे सुद्धा तो भात खात नाहीत. कुजून जातो तसाच उकीरड्यावर.
देवाधर्माच्या नावावर शहरांत नि खेड्यांत शेकडो वर्षे चालू असलेल्या असल्या प्रकारांची यादी फार मोठी नि लांब आहे. कथापुराणकार शहरी शहाण्याना मोक्षाच्या नादी लावून लुटीत असतात आणि खेड्यापाड्यातल्या अडाणी म्हणूनच मूर्ख रयतेला गावजोशी, कुलकर्णी, तलाठी, पाटील आणि देवभगत शेकडो फंदांत नादाला लावून हवे तसे पिळीत छळीत असतात.
काही फिरते भजनी संत खेड्यापाड्यांत गेले आणि त्यांच्या कीर्तन-भजनांचा धुमाकूळ चालू झाला, का त्यांच्याही शिकवणीत संसार असार आहे, माणसाचे जीवन पाण्याचा बुडबुडा आहे, कधी फटकन फुटेल त्याचा नेम नाही, बायका पोरे, धनदौलत, घरदार, शेतीवाडी सगळे इथच्या इथे राहणार, बरोबर काही येणार नाही, अखेर चला लंगोटा छोड ही अवस्था. तेव्हा या सगळ्यांचा त्याग करून पंढरीच्या वा-या करा. तो पंढरीनाथ तुमचे तारण करील. रात्रंदिवस विठ्ठल नामाची गर्जना करा. एकादशीचे कडकडीत उपास करा. आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी पायी करा. असल्या उपदेशाचा तडाका चालू व्हायचा. हजारो खेडूत त्या बुवांच्या नादाला लागतात. घरदार धुवून त्यांच्या झोळ्या भरतात. रोजगार व्यवहाराकडे पाठ फिरवून बेकार भणंग होतात. ``तू तो राम सुमर, जग लढवा दे’’ असल्या बेफिकिरीने पंढरीचे वारकरी बनतात. तेथेही त्यांना लुटणारे आणि कुटून काढणारे बडवे आणि भजनी टाळकुटे तयारच असतात. उपाशी तापाशी बेभान टाळ कुटीत नाचणा-या असल्या कंगाल वारक-यांची `अहाहा, केवढी ही विठ्ठलभक्ती आणि केवढा हा नामाचा महिमा’ असे म्हणून वाहवा करणारे लफंगे लोक आजूबाजूला उभेच असतात. त्यांच्या चिथावणीने त्या पोकळडोक्या वारक-यांना आणखीच चेव येतो आणि मोक्षाचे सारे गाठोडे या कंगाल वारकरी जीवनातच आहे, अशा समजुतीने तो त्याच भिकारड्या निष्क्रिय भीकमाग्या आयुष्याचा अभिमानी बनतो. महाराष्ट्रातले लक्षावधी धट्टेकट्टे पुरुष आणि बाया या वारकरी फंदात सापडून स्वार्थाला नि परमार्थाला सफाचट मुकलेले दृष्टीस पडतात.वारकरी पंथाने धर्म जगवला म्हणतात तो हा असा!  संसारात, व्यवहारात कायमच्या नालायक ठरलेल्या आणि देशाला जडभार झालेल्या लक्षावधी नादान बायाबुवांचा वेडपट समुदाय म्हणजेच वारकरी पंथ, अशी व्याख्या करावी लागते. खेडूत मूळचेच नाक्षर, अडाणी म्हणून अविचारी. केवळ मेंढराची जात. दाढीवाल्या बोकडाच्या मागे मुंड्या खाली घालून सगळे जाणारे. तो त्यांना चरायला कुरणात  नेतो का मरायला सरणात नेतो याची चौकशी ते करीत नाहीत. असले अनाडी लोक देहाच्या सार्थकासाठी (म्हणजे कशाच्या? तेही त्यांना अवगत नसतेच.) वारकरी कळपात घुसले, तर त्यांना फारसा दोष देता येणार नाही.
पण आश्चर्याची गोष्ट अशी की अलीकडे गेल्या ५०-७५ वर्षांत कित्येक पांढरपेशा पदवीधर भटा-बामणांनी टाळमाळधारी वारक-यांचे सोंग घेऊन शिंगे मोडून वासरांत घुसण्याचा एक जंगी व्यापार चालू केला आहे. एडिटरकी, मास्तरकी किंवा प्रोफेसरकीच्या उद्योगापेक्षा हा विठ्ठले माझे आई भजनाच आणि ज्ञानदेव तुकाराम संकीर्तनाचा धंदा त्या लोकांना चांगला किफायतशीर झालेला आहे. आधीच भटाची जात सुशिक्षित. कथा, पुराण, प्रवचने सांगण्यात पिढ्यानपिढ्या जिभली सरावलेली आणि सवकलेली. तशात पाश्चिमात्य इंग्रेजी ज्ञानाची भर. कोणताही अध्यात्माचा मुद्दा उलट सुलट झकास विधानांनी रंगवून सांगण्याची सफाई. शहरी शहाण्यात मानकरी, म्हणून खेडुतांनाही त्यांच्या पांडित्याचा मोठा वचक, दरारा नि आदर. असलेही लोक जेव्हा हरिनामाशिवाय मोक्ष नाही, संसार असार आहे, बायका, पोरे वैरी आहेत, अंतकाळी आपले आपण, देहाचे सार्थक करण्यासाठी या मायामोहातून बाजूला झालेच पाहिजे, असा उपदेशाचा तडाका चालू करतात, तेव्हा अडाणी खेडुतांनाही ते हडसून खडसून पटते आणि ते त्यांच्या भजनी लागतात. गुरुदेव म्हणून त्यांच्या पाया पडतात, पायांचे तीर्थ घेतात, त्यांच्या मठासाठी घरेदारे धुतात, काय वाटेल ते करतात. भिक्षुकाचा धंदा बसला. ज्योतिषावरही पोट भरण्याची पंचाईत पडू लागली. मास्तरकी, कारकुनीतही आता काही दम राहिला नाही. म्हणून डोकेबाज भटजी वारकरी बनले. येथे मात्र त्यांना अनुयायी भगतांची उणीव केव्हाच पडत नाही. संसार असार आहे, एक हरिनाम सत्य आहे, हे बडबडत असताना, या वारकरी सोंगाच्या भटा-बामणांचे संसार मात्र आपोआप सोन्या चांदीच्या मुलाम्याने चमकत असतात. विठ्ठलनामाचा केवढा बरे हा प्रताप!
शिवपूर्वकाली आणि कदाचित शिवकाली, मुसलमानांच्या धार्मिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी, विठ्ठलनाम संकीर्तनाने आणि पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाने, हिंदु संघटनेचे काही कार्य केले असले, (मला तर शंकाच येते,) तरी त्यानंतर या संप्रदायाने हरएक म-हाठी हिंदूला माणसातून उठवण्याची आणि व्यवहारी कर्तृत्वाला मुकवण्याची दुष्ट कामगिरीच केलेली आहे. पाच पन्नास लाख लोक पिढ्यानपिढ्या संसार-व्यवहाराला रामराम ठोकून, देहसार्थकाच्या सबबीखाली आणि मोक्षाच्या आशेने गळ्यात माळा घालून टाळ कुटीत जगण्याचा धंदा करीत आढळावे, ही महाराष्ट्राच्या भवितव्यतेवरची मोठी भयंकर आपत्ती आहे.

देवधर्माच्या या टाळाकुटी फिसाटाच्या जोडीनेच दुसरे एक महापाप लोकांच्या बोकांडी बसलेले आहे. ते म्हणजे दैववादाचे. जो पहावा तो दैव दैव करीत कपाळाला हात लावीत असतो. सर्व होणे जाणे तुझ्या हाती  ही देवापुढची कबुली. माणूस म्हणजे कोणी नाही. हवेत उडालेला क्षुद्र पाचोळा. त्याच्या नशिबाची वावडी देवकृपेच्या वा-यावर उडणारी. त्याला स्वतःला काही कर्तृत्व नाही, दैवाच्या अनुकूळतेशिवाय त्याच्या हातून काही घडणारे नाही. दैवाचे प्रतिकूळ वारे अथवा वादळ टाळण्यासाठी देवाच्या आराधनेशिवाय दुसरा मार्गच नाही. देवभक्तीचा आटारेटा करूनही स्वतःचे नि संसाराचे वाटोळे झाले तरी दैवरेषेपुढे कोणाचे काय चालणार? या समजुतीचे समाधान मानायलाही त्याची तयारी. शहरी शहाणा घ्या अथवा खेडूत अडाणी घ्या, सारे दैव-दैव-वादाच्या जंजाळात गुरफाटलेले. माणुसकीचीही चाड कोणात उरलेली नाही. मग भूतदयेची शुद्ध राहतेच आहे कुणाला? ``ज्या देशात भविष्यवादी ज्योतिषांचा धंदा भरपूर चालतो, तो देश हव्या त्या आक्रमकांनी मन मानेल तेव्हा पायदळी तुडवून गुलाम करावा,’’ हाएका पाश्चात्त्य तत्त्वज्ञाचा इषारा भारताच्या इतिहासाला अगदी फिट लागू पडतो.
देव-दैव-वादाच्या भ्रमाने आमची मनेच साफ मारून टाकली आहेत. कोणी कितीही शिकलेला असो, भविष्य पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. या एकाच नाजूक भावनेचा पुरेपूर फायदा धंदेबाज ज्योतिषी आणि अलिकडे वृत्तपत्रकार घेतात आणि पोटे भरतात. म्हणजे दैववादाने आमच्या लाज-शरमेचेही वाटोळे केले, असे म्हणायला हरकत नाही. खेडेगावांत ग्रामजोशाचा थाट दर्जा नि अधिकार सांगायलाच नको. पाळण्यापासून सरणापर्यंत, फार काय सरणावर जळून खाक झाल्यानंतरही, त्याच्या पंचांगातील मुहूर्तावर ग्रहमानावर आणि सल्ल्यावर खेडुताचे जीवन चालले. त्याने साडेसाती वर्तवली का मारुतीच्या तेल शेंदरासाठी आणि शनवारच्या एकादशणीसाठी, लागलीच जोशीबुवांची कातरणी खेडुताच्या फाटक्या खिशाला.
देवांचे नवस हा सुद्धा दैववादाच्या पोटी जन्मलेल्या व्यसनांचा एक भाग आहे. अमूक झाले तर सत्यनारायण करीन. कोंबडे बकरे देईन. भट-भाजन घालीन. असल्या नवसांनी आपण देवाशी व्यापारी बहाणा करतो, याचे आजही कोणाला भान असल्याचे दिसत नाही. नवस केला का काम फत्ते, हीच ज्याची त्याची समजूत. मुलांसाठी नवस. जुगारीसाठी नवस, नोकरीसाठी नवस, बायको मिळण्यासाठी आणि मिळालेली पळाल्यास परत येण्यासाठी नवस, परीक्षेत पास होण्यासाठी नवस, खटला जिंकण्यासाठी नवस, आजारातून बरे होण्यासाठी नवस, अशा नवसांच्या परवडी सांगाव्या तेवढ्या थोड्या.
या नवसांची एक मजेदार गोष्ट ऐका. पुणे शहरात मारुती नि म्हसोबा यांची गचडी फार. त्यांची नावेही चमत्कारिक नि कित्येक तर अश्लील असतात. कचकावून नवसाला पावणारा म्हसोबा पुण्याला जसा आहे, तसा एक शेण्या मारुतीशनिवार पेठेत आहे. परीक्षेची पोरे त्याला नवस करतात. ``देवा बाप्पा मारुतीराया, मी पास झालो तर तुला शेंदूर पेढे वाहीन.’’ मारुतीचा आणि परीक्षेचा संबंधच काय? काही पोरटी पास होतात, ती मारुतीला शेंदूर फासून लालेलाल करतात. मागाहून नापास झालेली पोरटी येतात आणि त्या शेंदरावर शेण थापून मारुतीला माखतात. पासवाल्यांचा शेंदूर आणि नापासवाल्यांची कचकावून शेणथापणी अशा दुहेरी रंगरंगोटीने त्या मारुतीच्या मूर्तीचे हालहाल होतात.
देववादाच्या पाठपुराव्यासाठी निपजलेल्या दैववादाने हिंदु लाकांची अतोनात अवनति केलेली आहे.दगड-माती-धातूचे देव-देवी आणि त्यांच्यासाठी देवळांची पैदास भरमसाट झाल्यामुळे, माणूस स्वतःशी तर बेमान झालाच, पण माणुसकीची किंवा भूतदयेतीही त्याला कसली पर्वा अथवा संवेदना राहिलेली नाही. हिंदुस्थानातले हिंदुधर्मी लोक हव्या त्या जुलुमाला अन्यायाला नि गुलामगिरीला मिटल्या तोंडी सहन कसे नि का करतात? याचे कोडे विचारवंत चिकित्सक पाश्चात्त्यांना बरेच वर्षे सुटत नव्हते. सत्याची चाड नाही, असत्याची अन्यायाची चीड नाही, हवा तो आक्रमक येतो आणि बेलाशक त्यांना तुडवून शिरजोर होतो. पण हे लोक हूं का चूं काही करीत नाहीत! आजवरच्या परक्यांच्या सर्व भारतीय आक्रमणांचे गूढ हिंदूंच्या या दैववादी पिण्ड प्रकृतीतच सापडते. एवढे मोठे शुर पराक्रमी रजपूत राजे. मोगलांच्या किल्ल्याला वेढा पडला, त्यांची बाणाबाणी गोळागोळी चालू झाली, तरी ज्योतिषाला बोलावून प्रतिकाराचे तोंड कधि नी कोणत्या मुहूर्तावर द्यायचे याचा त्याला सल्ला विचारीत असत. असल्या नादान दैववादी राजवटीची मोगलांनी चकणाचूर केला नसता तरच ते एक मोठे आश्चर्य झाले असते. कर्तबगारी थंड पडली का माणूस कुंडल्यांतल्या शनि-मंगळादि ग्रहांची चौकशी करु लागतो. या एकाच रोगाने महाराष्ट्र सध्या पुरा पझाडलेला असल्याने, हरएक क्षेत्रात त्याची पिछेहाट होत चालली आहे. ”निवडणूकीत यशस्वी होईन का?” याचे ग्रहमान पाहून उत्तरासाठी १० रुपयांची मनिऑर्डर पाठवा, अशी एका पुण्याच्या ज्योतिषाची केसरितील जाहिरात पाहील्यावर हा दैववादाचा रोग किती भडकलेला आहे, याची खात्री पटली.

धर्माची देवळे नि देवळांचा धर्म हे एक हिंदु धर्माचे आणि समाजस्वास्थ्याचे महाभयंकर पाप होऊन बसले आहे. हिंदुस्थान दरिद्री झाला, मातीतून सोन काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला, देशी धंदे ठार मेले, मध्यमवर्ग नामशेष झाला, शिक्षित पदवीधारांची बेकारी बोकाळली , असला आरडाओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणार्‍या ब्रम्हांडपंडिताना हिंदूच्या देवळांत किती अपार संपत्ति निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग गोरगरिबांच्या उध्दारासाठी न होता, लुच्चा लफंग्या चोर जार ऎदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे, याची दखल घेण्याची अक्कल अजूनहि सुचलेली नाही. दुष्काळाने कोट्यावधि लोक अन्न अन्न करुन मेले तरी देवाना शिरा केशरि भाताचा नैवेद्यी अखंड चालूच आहे. लाखो श्रमजीवी कर्तबगार तरुण उदरभरणासाठी भयाभया करीत फिरत असले, तरी अब्जावधि रुपयांचे जडजवाहीर आणि सोन्यामोत्यांचे दागिने देवळी देवांच्या अंगावर चढलेले आहेतच. देशाला शेतकरि आणि कामकरी कळणा कोंड्याच्या आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळांतल्या पुजारी आणि सेवेकरी नि बडवे भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळएवढाही खळगा आजवर कधी पडला नाही. ”विद्येची चार अक्षरे शिकवा हो शिकवा” असा शेकडा ९६ जीवांचा गेली शंभर वर्षे सारखा कंठशोष चालला असंताहि देवळांतल्या घुमटांखाली लाखो महामुर्ख भट गोसावडे गंजड भंजड नि ट्गे गंध भस्म रुद्राक्ष्यांच्या पुण्याईवर पोट फुटून वांति होई तो परार्धावरी पल्ले धान्यांचे बिनबोभाट फडसे पाडीत असतात. देवळांच्या छ्परांखाली ब्रम्हचार्‍यांचे वंश किती वाढतात, पति नसतानाही किती विधवा पुत्रवती होतात, किती गोसावडे सावकारी करतात, किती गुरुमहाराज मठ गोकुळातल्या चिखलात कटीबंध बुडतात आणि किती पळपुट्या छंगीभंगी ट्ग्यांचे थर तेथे खुशालचेण्डुप्रमाणे निर्घोर जिवन कंठीत असतात याची, स्वताच्या किंवा पूर्वजांच्या स्मारकांसाठी देवळे बांधणारांनी आणि देवळे म्हणजे धर्मस्थाने समजून आंधळेपणानी त्यांची जोपासना करणारानी दखल घ्यायला नको काय? आज देव देवळांच्या निमित्ताने अब्जावधि रुपयांची संपत्ति हिंदुस्थानात निष्कारण अडकून पडली आहे. आणि ईकडे आमच्या भारत राष्ट्राचा पाय आंतरराष्ट्रीय कर्जाच्या बिनबुडाच्या कर्जात खोल खोल जात आहे. या परिस्थितीचा एकाहि मुत्सद्याने किंवा संताने विचार केलेला दिसत नाही. अनाथ बालकाश्रम , अनाथ विधवाश्रम , गोरक्षण कॄष्ठरोगी लंगडे पांगळे यांचे आश्रम , मागासलेल्या समाजांतील मुलांमुलींचे शिक्षण , कितीतरी समाजजीवनाच्या जगण्यामरण्याचे प्रश्न आहेत. ते सोडवणाराना प्रश्न आहेत. ते सोडवणाराचा घरोघर दारोदार भीक मागावी लागते आणि देव आणि देवळांच्या दगडी प्रतिष्ठेसाठी करोडे रुपयांची संपत्ति शतकान- शतके तळ्घरात गाडलेली राहते, या नाजुक मुद्याचा आजवर एकालाही घाम फुटलेला नाही.
देश-देव - धर्माच्या या असल्या विलक्षण आणि माणूसघाण्या परिस्थितीच्या पार्श्वभागावर उभे राहून डेबूजी गाडगे बाबांच्या सेवा- धर्माची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. मोठमोठ्या शहरांपासून तो ५-१० झोपड्यांच्या कोनाकोपर्‍यांतल्या खेड्यापर्यंत सर्वत्र भट्कंती करीत असताना त्यांची समाज-जीवनाची बारीक सूक्ष्म टेहळणी सारखी चाललेली होती. अत्यंत मागासलेल्या शेतकरी खेडूती समाजात त्यांचा जन्म , त्या समाजाच्या मानसिक शारिरिक आर्थिक सर्व हालापेष्टांचा त्याना पुरा अनुभव . रक्त थिजून -हाडे पिचेपर्य्अन्त शेताची माती तिंबवली तरी सुखाचा घास तोंडात पडत नाहि. वरिष्ठ वर्गाची गुलामगिरी पिढ्यानपिढ्या अखंड चालूच . देवाधर्माच्या आणि रुढीच्या नावावर जागोजाग पशु पक्ष्यांची हत्या बेगुमान चाललेली, गरिबानी मरावे नि श्रीमंतानी मनमुराद चरावे हा समाजव्यवस्थेचा द्ण्डक, गरिबाना गरिबीची लाज नाही. खंत नाही. जीवन सुधारण्याची महत्त्वाकांक्षाही नाही. नाक्षर अडाणी म्हणून आस्ति-नास्ति विचार करण्याची अकलेला सवय नाही. ”ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ति असो द्यावे समाधान.” महार मांगादि जमातीनी इतरांपासून दुर खोर्‍यांतच का रहावे? कुष्ठरोगी वेडे लुळेपांगळे यांची समाजाने कसलिही दाद का घेऊ नये? देव देवळांचा जागोजाग एवढा ऎश्वर्याचा बडीवार चालला असतांहि , गोरगरिबांच्या तोंडांत वर्षातून एकदाहि कोणी साखरेची चिमूट, गुळाचा खडा किंवा तुपाचा थेंब कां घालू नये? यात्रेच्या ठिकाणी भिक्षुक बडव्यांच्या मनस्वी त्रास जाच सोसून लाखो लोक मेण्ढरांसारखे कां जातात? तेथे त्यांच्यापासून पैसे उकळून काढले जातात, पण अन्नपाणी आसर्‍याची निवर्‍याची सोय कां करीत नाहीत? अशा शेकडो प्रश्नांचे डेबूजी आपल्या मनाशी चिंतन करीत असे.तीक्ष्ण निरीक्षणांचे सिध्दांत.

देवधर्माच्या या टाळाकुटी फिसाटाच्या जोडीनेच दुसरे एक महापाप लोकांच्या बोकांडी बसलेले आहे. ते म्हणजे दैववादाचे. जो पहावा तो दैव दैव करीत कपाळाला हात लावीत असतो. सर्व होणे जाणे तुझ्या हाती  ही देवापुढची कबुली. माणूस म्हणजे कोणी नाही. हवेत उडालेला क्षुद्र पाचोळा. त्याच्या नशिबाची वावडी देवकृपेच्या वा-यावर उडणारी. त्याला स्वतःला काही कर्तृत्व नाही, दैवाच्या अनुकूळतेशिवाय त्याच्या हातून काही घडणारे नाही. दैवाचे प्रतिकूळ वारे अथवा वादळ टाळण्यासाठी देवाच्या आराधनेशिवाय दुसरा मार्गच नाही. देवभक्तीचा आटारेटा करूनही स्वतःचे नि संसाराचे वाटोळे झाले तरी दैवरेषेपुढे कोणाचे काय चालणार? या समजुतीचे समाधान मानायलाही त्याची तयारी. शहरी शहाणा घ्या अथवा खेडूत अडाणी घ्या, सारे दैव-दैव-वादाच्या जंजाळात गुरफाटलेले. माणुसकीचीही चाड कोणात उरलेली नाही. मग भूतदयेची शुद्ध राहतेच आहे कुणाला? ``ज्या देशात भविष्यवादी ज्योतिषांचा धंदा भरपूर चालतो, तो देश हव्या त्या आक्रमकांनी मन मानेल तेव्हा पायदळी तुडवून गुलाम करावा,’’ हाएका पाश्चात्त्य तत्त्वज्ञाचा इषारा भारताच्या इतिहासाला अगदी फिट लागू पडतो.

देव-दैव-वादाच्या भ्रमाने आमची मनेच साफ मारून टाकली आहेत. कोणी कितीही शिकलेला असो, भविष्य पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. या एकाच नाजूक भावनेचा पुरेपूर फायदा धंदेबाज ज्योतिषी आणि अलिकडे वृत्तपत्रकार घेतात आणि पोटे भरतात. म्हणजे दैववादाने आमच्या लाज-शरमेचेही वाटोळे केले, असे म्हणायला हरकत नाही. खेडेगावांत ग्रामजोशाचा थाट दर्जा नि अधिकार सांगायलाच नको. पाळण्यापासून सरणापर्यंत, फार काय सरणावर जळून खाक झाल्यानंतरही, त्याच्या पंचांगातील मुहूर्तावर ग्रहमानावर आणि सल्ल्यावर खेडुताचे जीवन चालले. त्याने साडेसाती वर्तवली का मारुतीच्या तेल शेंदरासाठी आणि शनवारच्या एकादशणीसाठी, लागलीच जोशीबुवांची कातरणी खेडुताच्या फाटक्या खिशाला.
देवांचे नवस हा सुद्धा दैववादाच्या पोटी जन्मलेल्या व्यसनांचा एक भाग आहे. अमूक झाले तर सत्यनारायण करीन. कोंबडे बकरे देईन. भट-भाजन घालीन. असल्या नवसांनी आपण देवाशी व्यापारी बहाणा करतो, याचे आजही कोणाला भान असल्याचे दिसत नाही. नवस केला का काम फत्ते, हीच ज्याची त्याची समजूत. मुलांसाठी नवस. जुगारीसाठी नवस, नोकरीसाठी नवस, बायको मिळण्यासाठी आणि मिळालेली पळाल्यास परत येण्यासाठी नवस, परीक्षेत पास होण्यासाठी नवस, खटला जिंकण्यासाठी नवस, आजारातून बरे होण्यासाठी नवस, अशा नवसांच्या परवडी सांगाव्या तेवढ्या थोड्या.
 या नवसांची एक मजेदार गोष्ट ऐका. पुणे शहरात मारुती नि म्हसोबा यांची गचडी फार. त्यांची नावेही चमत्कारिक नि कित्येक तर अश्लील असतात. कचकावून नवसाला पावणारा म्हसोबा पुण्याला जसा आहे, तसा एक शेण्या मारुतीशनिवार पेठेत आहे. परीक्षेची पोरे त्याला नवस करतात. ``देवा बाप्पा मारुतीराया, मी पास झालो तर तुला शेंदूर पेढे वाहीन.’’ मारुतीचा आणि परीक्षेचा संबंधच काय? काही पोरटी पास होतात, ती मारुतीला शेंदूर फासून लालेलाल करतात. मागाहून नापास झालेली पोरटी येतात आणि त्या शेंदरावर शेण थापून मारुतीला माखतात. पासवाल्यांचा शेंदूर आणि नापासवाल्यांची कचकावून शेणथापणी अशा दुहेरी रंगरंगोटीने त्या मारुतीच्या मूर्तीचे हालहाल होतात.
देववादाच्या पाठपुराव्यासाठी निपजलेल्या दैववादाने हिंदु लाकांची अतोनात अवनति केलेली आहे.दगड-माती-धातूचे देव-देवी आणि त्यांच्यासाठी देवळांची पैदास भरमसाट झाल्यामुळे, माणूस स्वतःशी तर बेमान झालाच, पण माणुसकीची किंवा भूतदयेतीही त्याला कसली पर्वा अथवा संवेदना राहिलेली नाही. हिंदुस्थानातले हिंदुधर्मी लोक हव्या त्या जुलुमाला अन्यायाला नि गुलामगिरीला मिटल्या तोंडी सहन कसे नि का करतात? याचे कोडे विचारवंत चिकित्सक पाश्चात्त्यांना बरेच वर्षे सुटत नव्हते. सत्याची चाड नाही, असत्याची अन्यायाची चीड नाही, हवा तो आक्रमक येतो आणि बेलाशक त्यांना तुडवून शिरजोर होतो. पण हे लोक हूं का चूं काही करीत नाहीत! आजवरच्या परक्यांच्या सर्व भारतीय आक्रमणांचे गूढ हिंदूंच्या या दैववादी पिण्ड प्रकृतीतच सापडते. एवढे मोठे शुर पराक्रमी रजपूत राजे. मोगलांच्या किल्ल्याला वेढा पडला, त्यांची बाणाबाणी गोळागोळी चालू झाली, तरी ज्योतिषाला बोलावून प्रतिकाराचे तोंड कधि नी कोणत्या मुहूर्तावर द्यायचे याचा त्याला सल्ला विचारीत असत. असल्या नादान दैववादी राजवटीची मोगलांनी चकणाचूर केला नसता तरच ते एक मोठे आश्चर्य झाले असते. कर्तबगारी थंड पडली का माणूस कुंडल्यांतल्या शनि-मंगळादि ग्रहांची चौकशी करु लागतो. या एकाच रोगाने महाराष्ट्र सध्या पुरा पझाडलेला असल्याने, हरएक क्षेत्रात त्याची पिछेहाट होत चालली आहे. ”निवडणूकीत यशस्वी होईन का?” याचे ग्रहमान पाहून उत्तरासाठी १० रुपयांची मनिऑर्डर पाठवा, अशी एका पुण्याच्या ज्योतिषाची केसरितील जाहिरात पाहील्यावर हा दैववादाचा रोग किती भडकलेला आहे, याची खात्री पटली.


No comments:

Post a Comment