Tuesday, 25 September 2012

आली गं माहेरवाशीण.. गौराई



लाडके गौराय कधी येसी..ऽऽऽ
पानी पडलं नय (नदी) भरलं.ऽऽऽ
भादव्याला येन्, कोरे सुपावर झनकत येन्


अशा आतुरतेने गौरीची वाट सारेच पाहतात! वारली आदिवासींच्या या गीतातून गौरीच्या सणाशी जोडलेला स्नेह, उत्साह आणि झनकत ये अशी तालबद्ध आगमनाची चाहूल, आनंद या साऱ्याच भावना दाटून आल्या आहेत. तिच्या आगमनाच्या कल्पनेने मोहरलेलं मन तिला साद घालतंय!
भाद्रपद महिन्याची सुरवातच मुळी हरितालका, गणपती, ऋषिपंचमी आणि गौरीच्या तयारीच्या लगबगीने होते. अगदी पहिल्या आठ दिवसांतच इतके सगळे पार पाडताना घरातल्या बायकांची पार धांदल उडते.
एकूणच मानवाच्या सांस्कृतिक परिवेशात मातृदेवतांच्या पूजनाची प्राचीन परंपरा आपल्याला दिसते. स्त्री देवता या निरनिराळ्या स्वरूपात पूजल्या जातात. कधी धान्याच्या रूपात, कधी वृक्षांच्या, वनस्पतींच्या स्वरूपात, कधी तांदळाच्या रूपात तर कधी मुखवटय़ाच्या रूपात! त्यांचे पूजन करताना निरनिराळे मूर्त रूप आपल्या डोळ्यासमोर असते. भाद्रपदात गौरी-गणपती हे महत्त्वाचे सण असले तरी हरितालिकेचं व्रत त्याआधी पार पाडलं जातं. भाद्रपदातील तृतीयेला हे व्रत केलं जातं. पार्वतीने शंकराला इच्छित वर म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत केलं, त्याचप्रमाणे बायका, कुमारिका इच्छित वरप्राप्तीसाठी हे व्रत करतात. यावेळी शंकर-पार्वतीची पूजा करून त्यांच्यापाशी मनोकामना व्यक्त केली जाते. नदीच्या वाळूपासून तीन शिवलिंगे तयार करून किंवा पार्वती शिवाच्या प्रतिमा आणून ही पूजा केली जाते.
‘हरिकाली’ व्रत हे भाद्रपद शुद्ध तृतीयेला केलं जातं. सात धान्यांच्या अंकुरावर एका सुपात कालीची पूजा करतात. त्याच रात्री हे सूप जलाशयात विसर्जित करतात. ‘काली’ या दक्षकन्येचा शिवाशी विवाह झाल्यावर देवसभेत शिवाने तिला काली म्हटल्यावर तिला राग आला व तिने अग्नीत उडी घेतली आणि नंतर हिमालयाच्या घरी जन्मली. पुढे युद्धात तिने देवांना साहाय्य केले आणि देवांनी तिला वर दिला की जे स्त्री-पुरुष हिरवळीवर कालीची पूजा करतील त्यांना सौख्य, सौभाग्य व दीर्घायु प्राप्त होईल अशी लोककथा आहे.
यानंतर गणेश चतुर्थी पार पडली की भाद्रपद शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन होते. आदिवासींकडे तर गौरीची कहाणी सांगणारे स्वतंत्र गीतच आहे. या गीतात खेळून आलेली गौर सासू, सासरे, नणंद, दीर या साऱ्यांना हाक मारते, परंतु कुणीच तिला घरात घेत नाही म्हणून ती वनवासी जाते. तिच्या सर्वागावर फोड येतात ते पाहून पाटलीणही तिला आपल्या दारावरून हाकलते आणि पुढे-
गेली वारल्या वलेल्या
गेली कोल्याच्या वलेल्या
पाणी पाजा गवरायाला
वारलीन घराबाहेर आली
कोलीन घराबाहेर आली
गऊर पुढे निघून गेली
गेली महाराजे वलेला
हाका मारी महारीनबाई..
आणि महारीणबाई गौरीला घरात नेऊन पाटावर बसवते, आंघोळ घालून जेवायला वाढते असा कथाभाग पुढील गीतात आला आहे.
या वारली आदिवासींच्या कथेप्रमाणे आपल्याला प्रदेशपरत्वे जसे गौरी आणण्याच्या पद्धतीत वैविध्य दिसते तसेच कहाण्यांमध्येही ती विविधता आढळते.
एकदा गरीब ब्राह्मणाच्या मुलांनी घरी गौर आणण्याचा हट्ट धरला होता. पण त्याला हे शक्य नसल्याने तो नदीत उडी मारून प्राणत्याग करण्यास निघाला. तेवढय़ात एका म्हाताऱ्या सवाष्णीने त्याला असे करण्यापासून परावृत्त केले. तो ब्राह्मण तिला घरी घेऊन आला आणि दरिद्री ब्राह्मण समृद्ध झाला. त्यानंतर या सवाष्णीने तू मला नदीवर सोडून ये असे सांगितले. परंतु आता जर ही गेली तर घरी दारिद्रय़ येईल, असे त्याला वाटले. त्याने आपल्या मनातील ही चिंता तिला सांगितली. तेव्हा ती म्हणाली, विसर्जनानंतर मी तुला वाळू देईन ती तू घरभर टाकलीस की तुझी संपत्ती जाणार नाही.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची कहाणी आणखी थोडी वेगळी आहे. राजाने आपल्या आवडत्या व नावडत्या राण्यांपैकी नावडतीला राजवाडय़ाबाहेर काढल्याने ती मुलासह एकटी राहू लागली. एके दिवशी राणीच्या दोन मावशा तळ्याकाठी असणाऱ्या दास्यांकडे चौकशी करू लागल्या आणि त्यांनी राणीविषयी विचारले. त्या आवडत्या राणीकडे गेल्या. परंतु तिने त्यांना हाकलले. मात्र जेव्हा त्या नावडत्या राणीकडे गेल्या तेव्हा गरिबी असूनही तिने त्यांचा आदरसत्कार केला. त्यांनी तिला जर तू महालक्ष्मीची पूजा केलीस तर तुला वैभव प्राप्त होईल असे सांगितले. त्याप्रमाणे तिने महालक्ष्मीची पूजा करताच तिला वैभव प्राप्त झाले आणि राजाही तिच्याकडे आला. तेव्हापासून सौभाग्यप्राप्ती व समृद्धीसाठी महालक्ष्मीचे पूजन केले जाते.
भाद्रपद महिन्यात शेतात पीक उभे राहिलेले असते. आदिवासींकडे ‘नवे खाण्याचा’ सणही भाद्रपदातच होतो. तेव्हा शेतात तयार झालेले हळव्या जातीचे भात प्रथम देवाला अर्पण केले जाते व नंतर स्वत: खाल्ले जाते. कुठलेही नवीन तयार झालेले अन्न हे देवाला दाखवून मग स्वत: खाण्याची पद्धत तर भारतीय संस्कृतीत सर्वत्र आढळते. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांकडे आजही महालक्ष्मीसमोर धान्याची रास घालण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा (सोवळ्याची) आणि कनिष्ठा (ओवळ्याची) या दोघी घरात विराजमान झाल्या की ज्येष्ठेसमोर तांदळाची व कनिष्ठेसमोर गव्हाची रास केली जाते. एकप्रकारे धान्यांच्या राशीची पूजाही याप्रसंगी होते.
धान्यरूपात स्त्री देवतांचे पूजन फक्त भारतात नाही, तर इतरत्रही केले जाते. इंडोनेशियात भात हे मुख्य पीक असून समृद्धीचे प्रतीक आहे. स्थानिक परंपरेनुसार इंडोनेशियाच्या राजांच्या लक्ष्मी या त्याच्या पत्नीरूपात राहत आणि जेव्हा त्याच्या एका राणीरूपी लक्ष्मीचे विष्णूवर प्रेम जडले व ती या प्रेमामुळे मरण पावली. तिला तेथे पुरण्यात आले. तेथे अनेक वनस्पती उगवल्या. भाताचे रोप तिच्या नाभीतून उगवले म्हणून ते सर्वश्रेष्ठ ठरले.
सुदानमधील लोक ही समृद्धीची देवता स्वर्गातून येऊन पृथ्वीवर भात उत्पन्न करते असे मानतात. या सर्व लोकश्रद्धांनी, लोकसंकेतांनी, पुराणकथांनी आपले अस्तित्व विविध सण, रूढी व विधींद्वारा अबाधित राखले आहे, हे धान्याची रास देवीसमोर मांडण्याच्या विधीतून आपल्याला प्रकर्षांने जाणवते.
सी.के.पी. सोमवंशीय क्षत्रिय, मराठा समाज तसेच कुणबी, वारली आदिवासी यांच्याकडे गौर येते ती पानाफुलांच्या स्वरूपात! निसर्गाशी असणारे साहचर्य, तादात्म्य आणि कृतज्ञता व्यक्त होते ती अशा पानाफुलांचे वैभव आपल्या घरात मांडण्यातून! या सर्वाकडची गौर ही तेरडय़ाच्या रूपात येते. सोमवंशीय क्षत्रिय समाजात मात्र तेरडय़ाबरोबरच, कोंबडा (वनस्पती), इदई व वासाच्या फुलाच्या पाच डहाळ्याही आणल्या जातात. विविध वनस्पती स्त्रीदेवतेच्या प्रतिकरूपात पुजण्याची परंपरा अतिशय प्राचीन आहे. शाकांबरी/ बनशंकरी ही अशीच एक देवी आहे. विष्णुधर्मसूत्र, महाभारताचे वनपर्व, पद्मपुराण यातही तिचा उल्लेख आला आहे. दुष्काळ पडला असता लोकांचे अन्न-पाण्यावाचून मृत्यू होऊ लागले म्हणून देवीला लोकांची दया आली. तिने आपल्या अंगातून अनेक शाकभाज्या उत्पन्न केल्या आणि लोकांची भूक भागवली, म्हणून तिला शाकांबरी हे नाव मिळाले. अशी शाकांबरी देवीची उत्पत्ती कथा देवीभागवतात दिली आहे.
स्त्री-देवतांचे पूजन वनस्पतींच्या रूपात होते, तसेच तांदळाच्या रुपातही होते. याचा प्रत्यय आपल्याला गौरीच्या कहाणीत आला आहे. ब्राह्मणाला म्हातारी जलाशयाकाठी पोहचल्यावर सांगते की ‘दरवर्षी असेच जलाशयावरून खडे आणून माझे पूजन कर त्यांना माझेच रूप समज!’ म्हणूनच नदी, तलाव, सरोवर अशा पाणवठय़ाच्या जागेवरून दगड-खडे आणून गौरी म्हणून त्यांचे पूजन होते. एकूणच पाणवठय़ाचे ठिकाण आणि तेथे असलेल्या जलदेवता आजही लोकमानसात ‘साती आसरा’ म्हणून ओळखल्या जातात. पाणवठय़ावरून खडे आणण्याच्या संकेतात लोकमानसाची श्रद्धास्थाने आणि या संकेतांमार्फत येणारे सुप्त प्रवाह आपल्याला जाणवतात. जलदेवतांना इजिप्शियन संस्कृतीतही महत्त्व आहे. ‘इसीस’ ही जलप्रलय करणारी देवता आहे. ती
जलप्रलय करून शेतांना पाणीपुरवठा करते म्हणून इजिप्शियन संस्कृतीत ‘इसीस’ला विशेष स्थान आहे. गौरीच्या सणाच्या वेळी जसे पाणवठय़ाला महत्त्व आहे तसेच खड्डय़ांनाही!
गौरीला जेव्हा निरनिराळे दागिने घालून स्त्रिया नटवतात, तेव्हा त्या तिचे सौभाग्य अधोरेखित करतात. या सौभाग्य अलंकारातून समृद्धीचा प्रत्यय येतो आणि अशी समृद्धी आपल्या घरी चिरस्थायी असावी ही इच्छा त्यातून व्यक्त होते.
गौरी पाना-फुलांच्या असोत किंवा सुगड रचून उतरंड मांडलेल्या, मानवी मन या सर्वानाच मनुष्याकृती आकार देऊन या सर्व प्रतिकांशी आपली नाळ अलवार जोडतो. म्हणूनच मुखवटा असलेली गौर आपल्याला पाहायला मिळते. मुखावाटे माणसाचा प्राण जातो असे मानतात म्हणजेच मुख असल्यावर प्राण आहे, चैतन्य आहे या भावनेतूनच गौरीचा मुखवटा लावून पूजा करण्याची पद्धत दिसते. बोहाडय़ासारख्या उत्सवाची सांगता देवीच्या देवळात होते. देवीचे सोंग घेताना मुखवटा लावलेला असतो. तिथेही ज्या देवाचा मुखवटा आपण धारण करतो, त्या देवाचा संचार आपल्यात होतो अशी लोकश्रद्धा आहे.
गौरीचे आगमन तेरडय़ाचे रोप मुळापासून सुपात घेऊन असो किंवा सुगडीच्या स्वरूपात असो, ती घरी येते तेव्हा ‘सोन्यामोत्यांच्या पावलांनी ये..’ असे म्हटले जाते. ‘गौरी गौरी काय पाहतेस?’ असे विचारले की ती घरातल्या समृद्धीचे वर्णन करते. गौरीचा सण हा खास माहेरवाशिणींचा समजला जातो आणि त्याचा प्रत्यय लोकगीतातूनही येतो.
‘‘बंधु येईल माहेरी न्यायला
गौरी गनपतीच्या सनाला.’’
या गौरीच्या वेळी आलेल्या माहेरवाशीणींचे थेट साखरचौथ होईपर्यंत माहेरपण करतात.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांकडे १६ भाज्या (चटण्या, कोशिंबीरी) पाच तऱ्हेच्या पोळ्या, पाच प्रकारच्या भजी करण्याची पद्धत आहे. भाज्यांमध्ये अंबाडी, भेंडी, पडवळ, कारलं, डांगर, दुधी, श्रावणघेवडा, मेथी, नवलकोल, कोबी, फ्लॉवर, मटार, वालाच्या शेंगा, गवार, अळू, चाकवत या भाज्या असतात.
कोशिंबिरीत मुळा, गाजर, सफरचंद, डाळिंब, काकडी, केळी, मिरचीचे पंचामृत, ज्वारीचे आंबील असते. चटण्यांमध्ये तीळ, खोबरे, कारळे, जवस, डाळ्या इ.च्या चटण्या केल्या जातात. बटाटा, गलका, अळू, मिरची, पालक अशा पाच भाज्या केल्या जातात. पुरणपोळी, सांज्याची पोळी, खव्याची पोळी, गुळपोळी, तूप-साखर पोळी या पाच प्रकारच्या पोळ्या नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात. प्रदेशपरत्वे-स्थानपरत्वे यात थोडाफार फरक आपल्याला दिसतो.
सीकेपी लोकांकडे घावन घाटलं, लाल माठाची भाजी असते आणि गौर जेवते त्या दिवशी मटण-वडय़ांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. एखाद्या घरात जर गौरी आणि गणपती दोघेही असतील तर त्या दोघांमध्ये पडदा लावण्यात येतो. गौरीच्या विसर्जनाच्या वेळी नैवेद्यात मुरडीचा कानवला करण्यात येतो. मुरडीप्रमाणे ‘तू पुढल्या वर्षी परत ये’ हा संकेत त्यात असतो आणि वारली आदिवासींकडे
‘रानकेलीचा गाभा पिवला ग
गौराय नेसली पिवला पातल गं
गौरानं घेतल्या लाह्य़ा कुरमुऱ्या ग
गौराय चालली दरया पुजाया ग..’
असे म्हणून गौरी विसर्जन केले जाते. या सर्वामधून येणारी आणि टिकणारी समृद्धीच प्रतित होते.
स्त्री देवतांची आराधना विविध रूपात केली जाते. कधी समृद्धी, सौभाग्य, सुफलनाचे विधी इ.मार्फत ती होते, तर कधी प्रजननक्षम मातृदेवता म्हणून पुजली जाते. या स्त्री देवतांची आराधना करताना निरनिराळ्या प्रतीकांचा स्वीकार केला जातो आणि गौरीच्या सणातून ही निरनिराळी प्रतीकं, विविध माध्यमे, विधी, पूजा करण्याची पद्धत याद्वारे एकत्र आलेले दिसतात. गौरीचा मुखवटा लावून, तांदळा म्हणजेच दगड इ.द्वारे पूजन, धान्याची रास तिच्यासमोर मांडणे आणि निरनिराळ्या वनस्पतींच्या डहाळ्या आणून त्यांचे पूजन करणे या सर्व प्रकारातून स्त्री देवतांचे पूजन करताना त्या निरनिराळ्या माध्यमांद्वारे आपले अस्तित्व दाखवतात आणि पुजली जातात. त्या विविध माध्यमांचा अंगीकार निरनिराळ्या जाती-जमातीतील लोकांनी केलेला दिसतो. स्त्री देवतांच्या पूजनाची माध्यमे निरनिराळी असली तरी गौरी ही देवता समृद्धी, संपन्नता, सौभाग्य चिरंतन राहण्याच्या उद्देशानेच पुजली जाते. गौरीच्या कथेत सांगितल्याप्रमाणे जेव्हा तिचे विसर्जन केले जाते, तेव्हा घरातील समृद्धी अखंड राहण्यासाठी वाळू आणून ती घरभर टाकली जाते. या लोकसंकेतातून समृद्धी चिरकाल अबाधित राहो हीच भावना दिसते. या ज्येष्ठेची पूजा भारतभर केली जाते. हिमाचल प्रदेशात ही बिह माता म्हणून ओळखली जाते. या देवीचे सापडणारे गीत आपल्याला वारली गाण्यातल्या गौरीशी साधम्र्य दाखवते.
‘जेठो मीनो त्वार वार,
बाह्मणे घरे आई बी-मां
चुडदे नाके पिजरे केशे आई,
ब्राह्मण देवे नहा धोआ
बीअ पापो मेऊवे ध्वाक. ओं
प्रात: स्नान करा,
हाथे पैरे महदसीरी गुंदा
चन्द्र, सूरज बी-बचात,
नरक तीड स्वर्ग सीड
धूप-दीप नैईवेद्य,
पण्ड प्रणाम प्रशन करा।’


--------- लोकसत्ता 

No comments:

Post a Comment