Monday, 3 September 2012

कोकणातील गरम पाण्याचे झरे


पृथ्वीतलावर आढळून येणाऱ्या भूशास्त्रीय चमत्कारांपैकी एक म्हणजे गरम पाण्याचे झरे वा उन्हेरे (याला कुणी उन्हवरे, उन्हाळे, गरम कुंडे असेही म्हणतात) होत. पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक प्रक्रियांमुळे गरम होऊन झऱ्यांद्वारे भूपृष्ठावर अवतीर्ण होणाऱ्या उष्ण पाण्याच्या उगमस्थानासही विविध नावे दिलेली आहेत. इंग्रजीत यालाच "हॉट स्प्रिंग' वा "थर्मल स्प्रिंग' असे म्हणतात.

पावसाच्या जमिनीत खोलवर मुरणाऱ्या पाण्यापासून उन्हेऱ्याची निर्मिती होत असते. अनेक उन्हेरे ज्वालामुखी प्रदेशात आढळतात. अशा प्रदेशात शिलारसाचे वास्तव्य भूपृष्ठालगत खोलीवर, परंतु जमिनीच्या वरच्या थरालगत असते. भूपृष्ठावरील पाणी खडकांच्या फटींमधून खाली झिरपते. असे झिरपणारे पाणी शिलारसाच्या सान्निध्यात येताच तापते, प्रसरण पावते; त्याच्या काही भागाची वाफ होते. हे तापलेले पाणी खडकांमधील नाळींतून भूपृष्ठाकडे ढकलले जाते व उन्हेऱ्याच्या रूपाने बाहेर पडते. बऱ्याचदा अशा पाण्यात खडकांमधील गंधक वगैरेसारखे द्रवपदार्थ विरघळतात. काही उन्हेऱ्यांतून असे गंधकयुक्त पाणी बाहेर येत असते. अशा पाण्यात स्नान केल्याने काही त्वचारोग बरे होऊ शकतात. बहुतेक उन्हेऱ्यांजवळ माणसाने मंदिरे बांधली आहेत. उन्हेऱ्यांना भोवताली भिंत बांधून कुंड स्वरूपात बंदिस्त केले आहे. अशा जागा यथावकाश जत्रा-यात्रांची ठिकाणे व आता पर्यटनस्थळे बनल्या आहेत. 
महाराष्ट्रात विविध भागांत शोध घेता आतापर्यंत 32 उन्हेऱ्यांच्या जागा आढळून आल्या आहेत. त्यांपैकी जेमतेम आठ उन्हेरे राज्याच्या पठारी भागात आहेत (नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि नांदेड इ. जिल्ह्यांत), बाकी उरलेले सर्व उन्हेरे कोकणात आढळतात. कोकणची वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्रीय रचना व इतिहास यास कारणीभूत आहे. कोकणातील उन्हेरे नकाशावर पाहिल्यास ते एका जवळपास सरळरेषेत उत्तर-दक्षिण असल्याचे दिसते. कारण उत्तर-दक्षिण असलेल्या भ्रंश रेषेला धरून हे उन्हाळे आहेत. यातील काही प्रमुख उन्हेऱ्यांचा हा परिचय. 
गणेशपुरी : ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्‍यात तानसा नदीच्या पात्रात व काठाने किमान 60 ठिकाणी उष्णोदकाचे उमाळे आहेत. खुद्द गणेशपुरीला श्री नित्यानंद महाराजांचे समाधिस्थानाजवळ व्यवस्थित बांधून काढलेले व लोकमान्यता पावलेले गरम जलकुंड आहे. या परिसराच्या मागच्या बाजूला तानसा नदीचे पात्र आहे. तानसा नदीवरच्या पुलावरून उत्तरेकडे पाहिले असता नदीच्या मध्यातील बेटवजा भाग दिसतो. इथे वडांच्या वृक्षांनी वेष्टित श्री पातालबाबाचे समाधिमंदिर आहे. या बेटावर काही गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे नदीपात्र उत्तर-दक्षिण आहे. बेटाच्या पल्याड नदीपात्रात उतरून उत्तरेकडे चालत गेल्यास नदीपात्रातच गरम पाण्याचे अनेक झरे आढळून येतात. सगळे मिळून इथे डझनभर तरी झरे असावेत. यापैकी नदीपात्राच्या ऐन मध्यावर एक मोठे कुंड आहे. आसपासच्या सर्व कुंडांमध्ये या कुंडाचे तापमान सर्वाधिक, म्हणजे सुमारे 55 अंश ते 58 अंश सें.ग्रे. असते. त्यामुळे या कुंडास "अग्निकुंड' असे योग्य नाव दिलेले आहे. या कुंडात तांदूळ टाकल्यास भात शिजतो, अशी समजूत असल्याने जागोजागी गरम पाण्याच्या प्रवाहात तांदूळ टाकलेले दिसून येतात. उत्तर दिशा धरून चालत राहिल्यास तानसा नदीच्या पलीकडल्या काठावर आपण पोचतो. इथे रस्त्याच्या पल्याड शिवअनूसया मंदिर आहे. इथे दोन गरम पाण्याची कुंडे असून, त्यापैकी एकाला "अनसूया कुंड' असेच नाव आहे. इथूनच निंबवली- गोरूड रस्त्याने वज्रेश्‍वरीकडे जाणारा रस्ता आहे. मात्र हा रस्ता खराब असल्याने गणेशपुरीला जाऊन मोठ्या चांगल्या रस्त्याने वज्रेश्‍वरीला जावे हे बरे. वज्रेश्‍वरी-भिवंडी रस्ता आणि तानसा नदीच्या दरम्यान अनेक मंदिरे व गरम पाण्याची कुंडे आहेत. वज्रेश्‍वरी बस स्थानकालगत श्री रामेश्‍वर महादेवाचे मंदिर आणि कुंड आहे. जवळच नदीपात्रात चार-पाच कुंडे आहेत. यांना "अकलोली कुंडे' असे म्हणतात. त्यापैकी सूर्यकुंड आणि चंद्रकुंड प्रसिद्ध आहेत. 
सातवली : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्‍यात टिकालाजवळ हे विशेष प्रसिद्ध नसलेले उन्हाळे आहे. महामार्गावरूनच डावीकडे (पश्‍चिमेकडे) हिरवागार वृक्षाच्छादित परिसर आणि मंदिरांचे कळस दिसतात. मंदिरे शंकर आणि हनुमानाची आहेत. वांद्री या छोट्या नदीच्या डाव्या तीरावर ही मंदिरे आणि लहान-मोठी डझनभर गरम पाण्याची कुंडे आहेत. यातील तीर्थकुंड सर्वांत उष्ण व महत्त्वाचे आहे. जवळच अगदी साधी धर्मशाळा आहे. अहमदाबाद रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर मुंबईच्या दिशेकडे हाय-वे ढाबा आहे. भोजनाची सध्या तरी ही एकमेव व्यवस्था आहे.  
उन्हेरे पाली (गणपती) : खोपोलीजवळचे गणपतीचे पाली हे अष्टविनायकांपैकी एक. खोपोलीकडून पलीकडे जाताना पालीच्या अगदी जवळ पोचलो, की उजवीकडे उन्हेऱ्याची पाटी दिसते. उन्हेरे मुख्य रस्त्यापासून जेमतेम एक किलोमीटर आत आहे. हा परिसर अंबा नदीच्या काठावर आहे. पार्किंगसाठी मोठी विस्तीर्ण जागा आहे. विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराजवळच दोन कुंडे- एक मोठे, एक छोटे- आहेत. जवळच भक्तनिवास आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्नानाची स्वतंत्र सोय असणारा कायमस्वरूपी मंडप आहे. पार्किंग जागेजवळ चहा-नाश्‍त्याच्या टपऱ्या आहेत. जेवणसुद्धा आगाऊ कल्पना दिल्यास तयार करून देतात. पालीला मुक्कामास राहूनही हे ठिकाण साधता येते.  
सव : मुंबई-गोवा महामार्ग महाडजवळ जिथे सावित्री नदीला खेटून जातो तिथे नदीपल्याड जो हिरवागार देवराईसारखा परिसर दिसतो तिथे सवची गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे होडीने नदी ओलांडून पलीकडे जावे लागते. झाडीतून गेलेली पायवाट आपल्याला कुंडापाशी आणून सोडते. कुंडांना लागूनच शाह शैलानी यांचा दर्गा आहे. दर्ग्यातील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. इथे जानेवारी-फेब्रुवारीत उरूस भरतो. कुंडाचा तळ नारळाच्या खोडांपासून बनवला असून, त्यामुळे कुंडाची खोली कमी झाली आहे. परिणामी, डुंबणे सुरक्षित झाले आहे. आसपास बरीच घरे असून, बहुतेक वस्ती मुसलमान बांधवांचीच आहे. इथे यायला आणखी एक वाट आहे, पण ती लांबची आहे. महाड-आंबेत रस्त्यावरून शेतातून/ बांधावरून गेलेल्या वाटेने सुमारे 15 मिनिटे पायपीट केली की आपण या कुंडाशी येतो.  
पालवणी : मंडणगडकडून आतल्या रस्त्याने (पालवणी मार्गाने) दापोलीकडे जाताना जिथे भारजा नदी रस्त्याशी लगट करू पाहते तिथे नदीच्या डाव्या तीरावर चंडकाई, मुकाई आणि वळजाईची एकाकी मंदिरे व जवळच नदीकाठाने उन्हाळे आहेत. नदीकाठाने व लगतच्या डोंगरी भागात भरपूर झाडी असून, नदीच्या काठाने "महाराष्ट्र वृक्ष' म्हणून प्रसिद्ध पावलेल्या तामणाची असंख्य झाडे आहेत. उन्हाळ्यात भेट दिल्यास सुंदर जांभळ्या फुलांची उधळण बघून डोळे सुखावतात. ज्यांना पक्षिनिरीक्षणाची आवड आहे त्यांच्यासाठी ही जागा आदर्श आहे. मुख्य रस्त्याकडून मंदिराकडे जाणारा कच्चा रस्ता (जो थोडा उतरून यावा लागतो) सहजी लक्षात येत नाही. त्यामुळे जरा लक्ष ठेवावे लागते. चंडिकादेवी मंदिराभोवती आसपास बांबूची दाट बने आहेत. कुंड जांभा दगडाने बांधलेले भरभक्कम असून, जवळच ओबडधोबड पिंडी व शेजारी सावली देण्यास सदैव सज्ज असलेला महाकाय आम्रवृक्ष आहे. सर्वांत निसर्गरम्य उन्हेरे, असे याचे वर्णन करता येईल.
दापोली : खेड-दापोली रस्त्यावर पन्हाळे काजी लेण्याकडे जाणारा रस्ता धरावा. पुढे या रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडील फाटा पन्हाळेकाजी लेण्याकडे जातो. डावीकडला उन्हवऱ्याकडे जातो. रस्ता पुढे पुढे उतरत जातो. हा रस्ता आपल्याला थेट फरारीच्या खाडीवर घेऊन जातो. एसटी स्थानकाजवळील मोकळ्या जागेत गाडी लावता येते. दुरूनच जमिनीतून वाफा बाहेर पडत असल्याचे अपूर्व दृश्‍य दिसते. मूळ स्रोत असणारे कुंड डाव्या बाजूला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचे कुंड, असा याचा लौकिक आहे. (तापमान 70 अंश सें.ग्रे.! अबब!!) त्यामुळे या कुंडाकडे सावधतेने जायला हवे. लहान मुलांना (व स्वतःलाही) दूर ठेवावे. पाण्याची (वाफेची धग दुरूनही जाणवते. याच कुंडातले पाणी एका चरातून दुसऱ्या कुंडात नेले आहे. तापमान कमी असल्याने तेथे स्नानाचा आनंद उपभोगता येतो. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी सोय आहे. समोरच्या डोंगरउतारावरील मदरशाची आधुनिक पद्धतीची इमारत पाहून थक्क व्हायला होते. शाळेची इतकी सुंदर इमारत पुण्यालाही नसेल. मुख्य कुंडातून स्रवणारे गरम पाणी आसपासच्या सुमारे एक एकर परिसरात पसरत असल्याने गरम चिखलयुक्त पट्टा तयार झाला आहे. या चिखलात अधूनमधून गाई-गुरे रुतून बसतात व मृत्यूला सामोरी जातात. गरम कुंडाचे पाणी फरारीच्या खाडीला जेथे मिळते तेथे पाण्याचे तापमान 40 अंश सें.ग्रे. आहे. त्याच्या थोड्या वरच्या अंगाला पाण्याचे तापमान 35 अंश सें.ग्रे. आहे. अशा ऊन पाण्यातही शंख-शिंपले, मासे, फिरताना पाहून आश्‍चर्य वाटते. "मुख्य कुंडात अंडी उकडतात, मेलेली कोंबडी सोलण्यापूर्वी या पाण्यात बुडवून ठेवतात, नंतर ती सोलायला सोपी जाते,' इ. माहिती चहावाल्याने पुरवली. या परिसरात सर्व हिंदू व मुसलमान कुंडावर लग्नाचा नारळ फोडतात. तशी प्रथाच या पंचक्रोशीत आहे. या परिसराचा अधिक नियोजनपूर्वक विकास होणे गरजेचे आहे. खाण्याची सुविधा नीटशी उपलब्ध नाही. मुक्कामाचीही सोय नाही. अर्थात खेड वा दापोलीला मुक्काम करून इथे येणे सोपे आहे. 
राजापूर राजापूरची गंगा प्रसिद्ध आहे. या गंगातीर्थाच्या रस्त्यावर उन्हाळे आहेत. अर्जुना नदीच्या काठाने ही उन्हाळे आहेत. जवळच श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. कुंड बंदिस्त आहे. फाट्यापासून 1.5 किलोमीटरवर आहे. 
तुरळ : मुंबई-गोवा मुख्य महामार्गावर संगमेश्‍वर तालुक्‍यात राजवाडीजवळ हे कुंड आहे. रस्त्यावर "हॉट स्प्रिंग' नावाचेच हॉटेल आहे. या हॉटेलच्या शेजारून मागे गेलेली पायवाट उन्हाळ्याकडे जाते. जवळ राजगंगा नदी व हॉटेलला लागून वाघजाई चंडिकामाता मंदिरे आहेत. 
राजवाडी :  चिपळूणकडून गोव्याकडे जाताना सुमारे 40 किलोमीटर अंतरावर डावीकडे राजवाडी फाटा आहे. आत वळताच सुरवातीला राजगंगा नदीवरचा पूल व लगेचच कोकण रेल्वेच्या रुळाखालून पलीकडे राजवाडी आहे. गाव छोटे व टुमदार आहे. गावात गाडी लावून साईबाबांच्या मंदिराजवळून पायऱ्यांची वाट कुंडाकडे जाते. शंकराच्या मंदिराला लागून आमराई व त्याला लागून गरम पाण्याची दोन कुंडे आहेत. शंकराच्या मंदिरातील लाकडी खांब, कमानी व तुळ्यांवरील कोरीव काम बघण्यासारखे आहे. पाच तोंडांची गाय, गंडभेरुंड व हत्ती, वाघाशी तलवारीने लढणारा योद्धा, उंट, दौडणारा घोडेस्वार, आठ मोरांचे गोलाकार अष्टमंडळ, फेर धरून नाचणाऱ्या नर्तिका, कमलपुष्प, डुकराच्या शिकारीचे दृश्‍य, राम-सीता, हनुमान अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. दुर्दैवाने कोरीव कामाला जागोजागी भुंगे लागले आहेत, भोके पडली आहेत. मंदिराचा परिसर निसर्गरम्य, मात्र राहण्या-जेवणाची सोय नाही. 
अरवली : गोवा महामार्गावरील गड नदीचा पूल ओलांडला (गोव्याकडे जाताना) की लगेचच डावीकडे हे कुंड आहे. जवळच वरदाई, कालिमाता, केदारनाथाची मंदिरे आहेत. कुंडाचे पाणी फारसे स्वच्छ नाही. 


कोकणातील सर्वच्या सर्व 22 कुंडे चार दिवसांत पाहणे शक्‍य आहे. मात्र त्यासाठी स्वतःचे वा भाड्याचे वाहन हवे. त्याचा कार्यक्रम असा ....

दिवस पहिला : मुंबईतून प्रवासास सुरवात करावी. अहमदाबाद महामार्गाने पालघर तालुक्‍यातील दहिसर (तर्फे मनोर) गाठावे. हमरस्त्याला लागूनच हलोली येथील पाटीलपाडा आणि पाडोसपाडा कुंडांना भेट देणे. तेथून मुंबईच्या वाटेवर टिकालाजवळ सातवलीला यावे. त्यानंतर मनोरमार्गे पालघरच्या वाटेवरील कोकनेर पाहावे. परत येऊन मनोरला हमरस्ता सोडून वाड्याचा रस्ता पकडावा. वाटेत थोडी वाकडी वाट करून खारिवलीजवळ पिंगेमान येथे वैतरणेच्या पाण्यात बुडलेली कुंडे लांबूनच पाहावीत. पुन्हा हमरस्ता गाठून मांडवी फाट्यावरून गणेशपुरी- वज्रेश्‍वरी जवळ करावे- अर्थात रात्रीच्या मुक्कामासाठी. 
दिवस दुसरा : पहाटे लवकर उठून गणेशपुरी, निंबवली, गोराड, अकळोली- वज्रेश्‍वरी परिसरातील गरम पाण्याची कुंडे स्नानकर्मासह व्यवस्थित पाहून घ्यावीत. आसपासची मंदिरे व समाविष्ट स्थाने पाहून होईपर्यंत दुपार उजाडते. इथेच जेवण करून अंबाडीमार्गे टिटवाळ्याला गणेशदर्शन करावे. तेथून मधल्या घाटमार्गाने अंबरनाथ जवळ करून बदलापूर- कर्जतमार्गे खोपोली फाट्यावरून गणपती पालीकडे प्रयाण. उन्हेऱ्याची कुंडे पाहून मुक्कामासाठी पालीस जावे.  
दिवस तिसरा : पालीवरून गोवा महामार्गास लागावे व थेट महाड गाठावे. महाड परिसरातील कोंडिवते व सवची कुंडे पाहून महामार्ग सोडून उजवीकडे मंडणगड गाठावे. (दुपारचे जेवण,) उन्हवरे (पालवणी) करून उन्हवरे (दापोली) ला जावे. तेथून खेडला मुक्कामासाठी यावे. गावाबाहेरील मरू घातलेले उन्हवरे पट्टीचे उन्हाळे पाहून गावातच मुक्काम करावा. 
दिवस चौथा: पहाटे खेड सोडावे. चिपळूण मार्गाने प्रथम अरवली, नंतर तुरळ, राजवाडी, फणसावणे, मठ (पाण्याखाली) इथली कुंडे पाहून राजापुरास (हॉटेल राजापूर) दुपारचे जेवण घ्यावे. नंतर राजापूर कुंडास भेट द्यावी, की संपला प्रवास।
 
-------------------- सकाळ 

No comments:

Post a Comment