प्रस्तावना
व्यवसायाने कुंभार असल्यामुळे गोरा कुंभार यांच्या वाट्यास येणारी सामाजिक प्रतिष्ठा बेताचीच होती.पण परमार्थात त्यांची पदवी उच्च दर्जाची होती. गोरोबांचे जीवनचरित्र पाहिले तर ते तसे साधेसुधे जीवन आहे. त्या जीवनात कुठलाही थाटमाट किंवा वैभव नाही. त्यांच्या जीवनात वैभव असेल तर ते फक्त परमार्थिक भक्तीचे गोरा कुंभार हे सर्वसामान्य अशा कुंभार कुटुंबात जन्मले अन् वाढले.
गोरोबा-काका हे तेराव्या शतकातील अत्यंत महत्वाचे संत होते. श्री संत ज्ञानेश्वरांनी १३ व्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अध्यात्मिक लोकेशाहीची स्थापना केली. त्यातून अठरापगड जाती-जमातीतील संत निर्माण झाले. कुंभार समाजात गोरोबा कुंभार हे संत म्हणून उदयास आले.
संत गोरा कुंभार यांचा जन्म इ.स. १२६७ साली म्हणजे शालिवाहन शके ११८९ साली प्रभवनाम संवत्सरात, आषाढ शुक्लपक्ष १० गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता "तेर' येथे झाला. "भक्तकथातत्व' नामक ग्रंथात गोरोबांच्या जन्मकालविषयी पुढील माहिती मिळते.
"कुल्लाळवंशी एक जालेले आहे
"कुल्लाळवंशी एक जाण।
महादू कुंभार नामाभिमान।।
तया गावीचे वतन।
करी भजन श़ीहरीचे।।
तया पोटी झाला सुत।
गोरा कुंभार जगविख्यात।।
अकराशे एकोण्णवदात।
प्रभवनासंवत्सर।।'
उस्मानाबाद जिल्ह्यातील "कळंब' तालुक्यातील "तेर' येथे त्यांचे वडील माधवबुवा आणि आई रखुमाई वास्तव्य करीत होते. "तेर' व "ढोकी' ही गावे जवळजवळ असल्यामुळे "तेरढोकी' असे म्हणण्याची एक पध्दती रुढ झालेली आहे. कुर्डुवाडी-लातूर या रेल्वेमार्गावरील "तेर' रेल्वे स्टेशन येते. रेल्वेस्टेशनपासून १ ते १.५ कि.मी. आत गाव येते. "तेर' हे गाव "तेरणा' नदीच्या तीरावर वसलेले आहे. या "तेरे' गावाला पूर्वी "सत्यपुरी' असे म्हणत. कारण क्रता युगात विश्वकर्म्याने "सत्यपुरी' नगरी वसविली. ती राक्षसांनी विध्वंस केल्यानंतर त्रिविक्रमाने "त्रिगर' नावाची नगरी वसविली. ही व्यापारी नगरी बनली. "त्रिगर' ऐवजी "तेगर' असे अपभ्रंशित नाव झाले आणि पुढे कालांतराने "तगेर' चे "तेर' असे आज नाव रुढ झालेले आहे.
गोरोबा काका यांच्या जन्माविषयी :
"तेर' नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. "तेर' येथील "काळेश्वर' या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे "तेर' गावात माधव बुवांना "संत' म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ८ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. ती आठही मुले जिवंत कशी झाली. यासंबंधी एक आख्यायिका संत गोरोबा काका चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी सांगितली आहे. ते आपल्या चरित्रामध्ये म्हणतात,""श्री माधवबुवा "तेर' येथील काळेश्वराची उपासना करीत होते. त्यांना आठ पुत्र होते. त्यांना आठ पुत्र झाले. परंतु ते सर्व एकामागून एक निर्वतले. पुढे कालांतराने परमात्मा पांडुरंग ब्राह्मणाचा वेष घेऊन त्यांचे घरी आले. तेव्हा त्यांनी खिन्न मुद्रा पाहून देवांनी त्यांना विचारले की, तुम्ही दुःखी का?' माधबुवांनी सांगितले की,"आमची आठही मुले देवाने नेली, म्हणून दुःखी आहोत' नंतर देवाने आठ मुलांना जेथे मूठमाती दिली, ती जागा दाखविण्यास सागितले. माधवबुवांनी त्यांना काळेश्वर जवळील स्मशानात नेले, व देवास आठही मुले कोठे पुरली ती जागा दाखविली. देवांनी सर्व मुलांची प्रेते उकरण्यास सांगितली. बुवांनी त्याप्रमाणे आठही मुलांची प्रेते बाहेर काढली. देवाने पाहिले व सात मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले व त्यांना स्वर्गात पाठविले आणि नंतर आठवा मुलगा जिवंत केला. तोही स्वर्गाच्या मार्गाने निघाला. परंतु देवाने त्यास जाऊ दिले नाही. भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधवबुवा रखुमाईच्या स्वाधीन केले. देव म्हणाले, 'तुला गोरीतून काढले म्हणून तुझे नाव गोरोबा ठेवले.'
या आख्यायिकेच्या मागे चमत्काराचा भाग असलेला दिसून येतो. संतांच्या चरित्रात असे अनेकविध चैतन्याचे चमत्कार वर्णिलेले आहेत. चमत्काराचे चैतन्य असते. पण ब-याचदा समृध्द समाजाला अशा चमत्कारातून चेतना मिळण्याऐवजी त्यांच्या ठिकाणी अंधश्रध्दा बळावताना दिसते. संतांचे जीवन दर्शन घडविताना सुध्दा केवळ चमत्कार हे त्यांचे साध्य नव्हते तर साधन होते, याचे भान राखावे. म्हणून फक्त तो त्यांच्या जीवनातील एक चमत्काराचा भाग समजावा. फार तर त्याचा सरळ सरळ अर्थ घेणे योग्य नाही. याबाबत असे म्हणता येईल की माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रध्दा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिला. म्हणून माधवबुवांना तो आपल्या श्रध्देचा, भक्तीचा, महिमा वाटला. यावरुन एवढाच तर्क करता येतो किंवा अंदाज बांधता येतो की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गारोबांचा जन्म झाला आहे.
गोरोबांचे घरचे वातावरण :
गोरोबा काकांचे आई-वडिल आणि गोरोबा असे तीन माणसांचे कुटुंब हे कुटुंब तसे खाऊनपिऊन सुखी होते. त्यांच्या घरात विठ्ठल भक्ती वडिलोपार्जित होती. त्यात वडील काळेश्वराचे भक्त असल्याने विठ्ठल भक्तीला शिवशक्तीची जोड लाभलेली होती. ज्यांनी विठ्ठलाला आपल्या अंतःकरणात कायमचं स्थान दिलेले आहे. हरी आणि हर यात काही मराठी मनानं भेद मानला नाही, हेच तर महाराष्ट्राचं एक खास वैशिष्ट्य होय. त्याप्रमाणे गोरोबांच्या कुटुंबात शिवभक्ती व विठ्ठलभक्ती यांना सारखाचं स्थान होते, महत्त्वही होते. देवाच्या स्वरूपात ज्यांना सुरुवातीपासून ऐक्यभाव आढळला; त्यांना त्यांच्या पारमार्थिक जीवनात द्वैत तत्त्वाचा अनुभव कधीच येणार नाही. गोरोबा शिव आणि विठ्ठल यांची ऐक्यभावानं उपासना करीत होते. किंबहुना विठ्ठलातच त्यांना शिवाचे दर्शन घडत होते.
गोरोबांचा विवाह :
गोरोबांनी आपल्या प्रेमळ आणि कष्टाळू वृत्तीने मातापित्यांचा कौटुंबिक भार कमी केला. परंतु कुंभारकाम म्हटले की अतोनात कष्ट आले आणि त्याचबरोबर हा निसर्गावर अवलंबून असलेला मातीचा धंदा अन् या कुंभारकामात अन्य कुणाची तरी मदत हवी, कोणीतरी जोडीदार हवा असतो, असा गोरोबांच्या वडिलांनी विचार केला. गोरोबा हे काम कसे करणार?अशी चिंता त्यांच्यासमोर उभी राहिली. गोरोबा वयात आले होते. म्हणून गोरोबाला त्याचे वडील म्हणाले, कुंभारकामात तुला कुणीतरी मदत करायला माणूस हवा आहे. कुंभाराच्या चाकावर काम करायला दोन माणसे हवी असतात. आजपर्यंत तुझ्या आईने मला मदत केली. पण तुझी आई आता थकली आहे. तुला कुणीतरी जोडीदारीण हवी आहे. कुंभारकामात मदत करणारी पत्नी गोरोबाला करुन द्यावी, असा वडिलांचा आग्रह होता. यावर गोरोबा काही बोलले नाहीत. आपल्याला काहीच कळले नाही, असे त्यांनी दाखविले म्हणूनच त्यांचे वडील त्यांना म्हणाले, अरे, तुझे दोन हाताचे चार हात व्हायला पाहिजेत. संसार करायचा म्हटला की जोडीदार हवा आहे. चार हातांनी काम झाले म्हणजे चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. तुझे लग्न होणे गरजेचे आहे. माधवबुवांनी गोरोबासाठी चांगली मुलगी पाहिली. ढोकी येथील कुंभारबाबांची मोठी मुलगी पाहिली. तिचे नाव संती. ती मुलगी सद्गुणी व सद्वर्तनी होती. आपल्या गोरोबासाठी ही मुलगी योग्य आहे असे त्यांना वाटले. गोरोबाला देखील संती पसंत पडली. पुढे गोरोबा व संती यांचा विवाह झाला. गोरोबा अशारितीने खऱ्याअर्थाने प्रापंचिक गृहस्थ बनले.
गोरोबांचा दिनक्रम :
गोरोबांच्या मनावर लहानपणापासूनच भगवद्भक्तीचे संस्कार झाले होते.गोरोबांना लिहायला वाचायला येत होते.ज्ञानदेव, नामदेव यांच्या पूर्वकाळात पंढरपूर हे शिव उपासकांचे/भक्तांचे केंद्र होते.अनेक शिवभक्त त्याठिकाणी आपली साधना करीत होते.ते भक्त होते, योगी होते.सिद्ध, साधकही होते.गोरोबा जेव्हा जेव्हा पंढरपूरला जात तेंव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाचं दर्शन होई.त्यांच्या योगसाधनेचं त्यांना कौतुक वाटे, आकर्षण वाटे असे करता करता गोरोबांचा प्रपंच आता परमार्थमय झाला होता.गोरोबा सकाळी उठून अंघोळ करून, देवाची पूजा करणे.नंतर नामस्मरण करावं आणि ध्यानात पांडुरंगाचं रूप साठवून त्याला मनी-मानसी मुरवून घ्यावं आणि मग न्याहारी करुन कामाला लागावं, असा त्यांचा सकाळचा दिनक्रम असे.
दुपारचे जेवण झाल्यावर गोरोबा जरा विश्रांती घेत. ही विश्रांती म्हणजे झोप घेणे नव्हते.तर घराच्या ओसरीवरच्या खांबाला टेकून देवाचे नामस्मरण करीत, अभंग म्हणीत विश्रांती घेत. त्यामुळे त्यांच्या चित्ताला एक समाधानही मिळत असे.पुन्हा लगेच मोठ्या जोमाने कामाला लागत.ते दिवस मावळेपर्यंत.दिवस मावळल्यानंतर हातपाय धुऊन पुन्हा घराच्या ओसरीवर एकतारीवर चिंपळ्याच्या साथीने भजन सुरू होई आणि रात्रीच्या जेवण्याचेवेळी ते थांबे. अन् रात्रीचे जेवण झाल्यानंतर पुन्हा भजन सुरु होई.शेजारपाजारची मंडळीही त्यात सामील होत असत.नंतर परमेश्वराचे नामस्मरण करीत झोपी जात.
गोरोबा माता-पित्याच्या मायेस पारखे :
गोरोबा आता वडिलांचा धंदा सांभाळू लागले होते. गोरोबाची पत्नी मोठी सद्गुणी होती. सारी घरकामे झपाट् यानं उरकून, ती गोरोबांना कामात मदत करु लागली. गोरोबाचा प्रपंच सुखासमाधानात व आनंदात चालला होता. गोरोबाचा सुखाने चाललेला संसार आणि त्याची पत्नी संती ही मोठी गुणी आणि प्रापंचिक असलेली पाहून माधवबुवा व रखुमाई यांना अत्यानंद झाला. गोरोबांचे आईवडील आता खूप थकले होते. त्यांची पंढरीची वारी सतत चालू होती. म्हातारपणाच्या काळात अखंड नामस्मरण आणि भक्ती करीत करीतच निजधामास गेली. अखेरचा श्वास सोडताना वडिलांनी गोरोबांना सांगितलं, गोरोबा तू प्रपंच चांगला करशील पण विठ्ठलाचे नामस्मरण कधी सोडू नकोस आणि पंढरीची वारी कधी चुकवू नकोस.
गोरोबा काका हे पंढरीचे श़द्धानिष्ठ वारकरी, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपी चंदनाचा टिळा, एकादशी व्रत करीत असत. आषाढी कार्तिकी वारी ते कधीही चुकवित नसत. पंढरपूर क्षेत्री विठ्ठलाच्या भेटीबरोबरच संताच्याही भेटीगाठी होत असत. त्या संतांच्या मांदियाळीने व त्यांच्या भजन, कीर्तनानंदाने, टाळमृदुंगाच्या नादाने अवघी पंढरी दुमदुमून जात असे. देव, भक्त आणि नामसंकीर्तन असा त्रिवेणी संगम या वारीच्या भजनानंदात आवर्जून घडत असे. पंढरीचा काला घेऊनच ही संतमंडळी श्री विठ्ठलाचा निरोप घेऊन आपल्या गावी परत येत असत. आणि आपापल्या कामधंद्याला लागत असत. त्याप्रमाणे गोरोबाकाका ही पंढरपूराहून आले की कुंभारकामाला लागत असत.
मूल चिखलात तुडविले :
एके दिवशी गोरोबा पायाने चिखल तुडवित होते. त्यांचे सर्व ध्यान पांडुरंगचरणी लागलेले असे. गोरोबा जरी संसारात दंग होते. तरी विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलाचे नामस्मरण हेच गोरोबांचे जीवन झाले होते. संत जन्मतःच ईश्वरभक्त त्याचकरिता त्यांचा जन्म होता. पांडुरंगाच्या नामस्मरणात ते आपली तहानभूक हरपून जात. स्वदेहाचे भानच त्यांना राहत नसे. गोरोबाकाका विठ्ठल भक्तीत कसे तल्लीन होत हे सांगताना संत नामदेव गोरोबा काकांच्या तन्मय वृत्तीबद्दल लिहितात.
प्रेमे अंगी सदा वाचे भगवंत।
प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा।।१।।
असे घराश़मी करीत व्यवहार
न पडे विसर विठोबाचा ।।२।।
कालवुनी माती तुडवीत गोरा।
आठवीत वरा रखुमाईच्या।।३।।
प्रेमे अंगी असे झाकुनी नयन
करीत भजन विठोबाचे ।।४।।
स्वतः नामदेवांनी गोरोबांच्या तन्मयवृत्तीबद्दल वरील अभंगात दिलेली स्पष्ट कबुली महत्त्वाची वाटते. गोरोबाकाकांच्या चरित्रातील हे तन्मयवृत्तीचे एक अत्यंत प्रभावी असे उदाहरण आहे. अशाप्रकारे एके दिवशी गोरोबा देहभान हरपून अभंग म्हणत माती तुडवीत होते. त्यांचे सर्व ध्यान ईश्वरचरणी लागले होते. अशावेळी त्यांची बायको-संती मुलाला मकरेंद्राला ठेवून पाणी आणण्याकरिता जाते आणि त्यावेळी ती म्हणते, धनी, बाळावर जरा लक्ष ठेवा. घरी त्याला सांभाळण्याकरता कोणी नाही. असे सांगून ती पाणी आणण्याकरिता निघून गेली. पण तिचे सांगणे गोरोबांनी ऐकले का? त्यावेळी गोरोबा देहभान हरपून गेले होते. पण संतीला याची काय कल्पना! इकडे भक्त गोरोबा पांडुरंग चरणी लीन होऊन अभंगातून विठ्ठलाचे स्मरण, जप करीत होते.
असे गोरोबा विठ्ठल नामस्मरणात रममाण झाले होते. गोरोबा चिखल तुडवित आहेत आणि बाळ, रांगतरांगत पित्याकडे धावत आहे. अन् ते खेळत खेळत बापाचा पाय धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले. हसतहसत पित्याच्या पायाला धरता धरता ते चिखलात पडते. श्री.गोरोबा-काका डोळे मिटून भाव समाधीत होते. हृदयी अनंतास आठवीत होते. देहवृत्ती शून्य दशेतच विठ्ठल नामस्मरणात रत होते. मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना त्या चिखलात त्यांचा एकलुता एक मुलगा पायाखाली आला. ते चिखलासवे मुलालाही तुडवू लागले. त्याचा व्हायचा तो अटळ परिणाम झाला. त्याविषयी एकनाथ महाराज सांगतात,
नेणेवेचि बाळ की हे मृत्तिका
मन गुंतलेले देखा पांडुरंगी।।१।।
मृतिकेसम जाहला असे गोळा।
बाळ मिसळला मृतिकेत ।।२।।
रक्तमांस तेणे जाहला गोळा लाल
नेणवे तात्काळ गोरोबासी।।३।।
एका जनार्दनी उटक आणुनी कांता
पाहे तवं तत्वता बाळ न दिसे।।४।।
अशाप्रकारे मुलाचे रक्तमांस, हाडे चिखलात मिसळली. मुलाचा प्राण ताबडतोब गेला. मुलाच्या रक्तमांसाने चिखल रंगला. परमेश्वर भक्तीत तन्मय असलेल्या गोरोबांना बाळाचा स्पर्शही जाणवला नाही. जणु मूल म्हणजे चिखलाचा गोळा आणि अखेर देह मातीतच तुडविला गेला.
संती पाणी घेऊन घरी आली. पण तिला दारात मूल दिसले नाही. पाण्याची एक घागर डोईवर व दुसरी कमरेवर ठेवून ती सगळीकडे बाळाचा शोध घेऊ लागली. पण बाळाचा शोध कुठे लागेना! तिने गोरोबांना विचारले, धनी, आपला बाळ कुठे आहे? परंतु गोरोबांचे लक्ष संतीच्या विचारण्याकडे नव्हते. ते परमेश्वराच्या नामस्मरणात दंगच. संतीने गोरोबांना खूप विचारले पण त्यांना सांगता आले नाही. शेवटी ती मनात दचकली आणि तिची नजर चिखलाकडे गेली. आपला बाळ चिखलात तुडविला गेला आहे, हे तिच्या लक्षात आले. संतीने आक्रोश सुरु केला. बायकोचा आक्रोश कानावर येताच गोरोबा ध्यानावर आले आणि संती रागारागाने गोरोबाला बोलू लागली. ती रागाच्या भरात गोरोबांना काय म्हणते? ह्याचे नामदेव आपल्या अभंगात यथोचित शब्दात वर्णन करतात.
जळो हे भजन तुझे आता।
डोळे असोनिया जाहलासी आंधळा।
कोठोनी कपाळा पडलासी।
कसाबासी तरी काही येती दया।
का रे बाळराया तुडविले।
संतीच्या आकांताने मूल आपल्या पायाखाली तुडविलेले गेले आहे हे गोरोबांच्या लक्षात येते. गोरोबांना या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते. त्यांच्या अंत:करणाला खूप वेदना होतात. पण हातून झालेली चूक दुरुस्त करता येणारी नव्हती. परंतु संतीने विठ्ठलाविषयी जे अनुद्गार काढले. त्यांनी गोरोबा खवळले. त्यांनी तिला हातातील चिपळ्या फेकून मारल्या आणि चाकाचे दांडके काढून मारायला धावले. त्यावेळी संतीने गोरोबांना विठ्ठलाची आण (शपथ) घातली. याप्रसंगाचे नामदेव आपल्या अभंगात यथोचित असे वर्णन करत
हातबोट मज लावशील आता
आण तुला सर्वथा विठोबाची।
ऐकतांचि ऐसे ठेवियेली काठी
राहिला उगाचि गोरा तेव्हा।।
संतीने विठ्ठलाची शपथ घातल्याने गोरोबा मारता मारता तिथेच थांबले. संतीचा आकांत सुरुच होता. शेजार-पाजारचे पुरुष बायका जमा झाल्या. त्या गोरोबांना दूषण देऊ लागल्या. संती माझा बाळा कुठे आहे? माझा बाळा कुठे आहे, म्हणून छाती बडवून घेत होती. हा सगळा प्रकार आता गोरोबाला चांगलाच उमजला अन् गोरोबा संतीला म्हणाले, कारभारणी, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. कर्माची गती वेगळीच असते. देवाचे नामस्मरण करता करता त्या नामाशी एकरूप कधी झालो ते कळलेच नाही असे म्हणून गोरोबांनी आपल्या बायकोची क्षमा मागितली. संतीने देखील याप्रसंगी अखेर मनावर ताबा ठेवला.
येथे भाविकांनी, रसिकांनी गोरोबाकाकांनी मुलाला चिखलात तुडवून मारले. ह्या घटनेचा अर्थ गोरोबांच्या भावभक्तीचा प्रकार मानवा असे वाटते. कारण संतजीवनात, चरित्रात अशा अनेक चमत्कारिक घटना येतात. त्यामागे संतचरित्रे ही सर्वसामान्य माणसाहून वेगळी वाटावी. संत चरित्राचे महत्त्व वाढावे असाच भाव असलेला दिसून येतो. आणि या घटना साधकांना चेतना देणाऱ्या म्हणूनच रेखाटल्या आहेत. म्हणून अशा घटनांचा आजच्या जीवनात अर्थ घेताना भक्तिभावा चा हा प्रकार समजावा.
काही दिवस गोरोबा-संतीचा अबोला चालला, कोणीही कोणाशीच बोलेना चालेला. एके दिवशी संतीने असा विचार केला की, असा अबोला धरून आपला संसार कसा चालणार? संतीला मुलाची आणि मातृत्वाची ओढ होती. "आण ना बाण उगीचच संसारात ताण' निर्माण झाला. उगाउगी आपण धन्याला विठ्ठलाची आण घातली. त्यामुळेच त्यांनी प्रपंचा विषयी विरक्ती स्विकारली, संसारापासून दूर जाऊ लागले असे तिला वाटू लागले. गोरोबा संसारात उदास राहून परमेश्वरात आणि त्याच्या नामस्मरणात अधिक एकरूप होऊ लागले. गोरोबांची संसाराविषयीची उदासीनता संतीला सहन होत नव्हती. एक वंशाचा दिवा गेला आता वंशाला दुसरा दिवा हवा. संत गोरोबांनी तर संसारात पूर्णपणे वैराग्य पत्करलेले. शेवटी संतीने मनाशी विचार केला अन् ती एके दिवशी गोरोबांचे पाय धुण्याकरिता गेली असता गोरोबा म्हणतात, खबरदार, माझ्या अंगाला स्पर्श करशील तर! अग तू मला विठ्ठलाची शपथ घातली आहेस ना? मग माझ्या अंगाला हात का लावतीस! जर माझ्या अंगाला हात लावशील तर तुलाही पांडुरंगाची शपथ! अग सूर्य पश्चिमेस उगवेल! समुद्र आपली मर्यादा सोडील परंतु विठ्ठलाची शपथ मी कधी मोडणार नाही.
अशाप्रकारे असे बरेच दिवस गेले. गोरोबांची अवस्था असोनि संत नसोनी संसारी अशीच झाली होती. अखंड नामस्मरण देवाची भक्ती आणि आपला कामधंदा एवढेच त्यांना माहीत होते. एक वर्ष होऊन गेले तरी त्यांनी संतीच्या अंगाला स्पर्श केला नाही. दुरुनच बोलणे, वागणे. संतीसारखी भावूक मनाची प्रेमऴ, संसारी स्त्री हा दुरावा किती दिवस सहन करणार? तिने गोरोबाची काळजी परोपरीने घ्यायला सुरुवात केली. तिची ही पतिसेवा दिवसेंदिवस एखाद्या व्रतासारखी होऊ लागली. ती गोरोबांना जीवापलीकडे जपू लागली. तरीही गोरोबा तिच्याशी अलिप्तवृत्तीने वागू लागले. त्यामुळे संतीच्या जीवाला एकप्रकारची काळजी लागून गेली. आपण भावनेच्या, दु:खाच्या भरात आपण वाटेल तसे मनाला येईल तसे बोलून जातो. पण त्याचा केवठा मोठा विपरित परिणाम भोगावा लागतो. यातून संतीच्या मनातील संसाराची चिंता आणि गोरोबांच्या मनाची विरक्ती दिसून येते. या सर्व प्रसंगातून गोरोबांच्या कुटुंबाची मानसिकताही स्पष्ट होते.
गोरोबांचा दुसरा विवाह :
संत गोरोबांची कठोर प्रतिज्ञा आणि त्यांची संसारातील वैराग्यवृत्ती पाहून संतीला फार मोठी काळजी वाटू लागली. घराण्याच्या पुढील वंशाचीही काळजी वाटू लागली. घराण्याला वंश हवा. पण गोरोबा तर अंगाला स्पर्श करीत नाहीत. अन् विठ्ठलाची शपथ मी कधी मोडणार नाही ही नवऱ्याची कठोर प्रतिज्ञा हे सर्व पाहून ती चिंताक्रांत झाली अन् ती आपल्या मनाशीच विचार करू लागली की आता मात्र त्यांचे दुसरे लग्न करुन दिल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून स्वतःची बहीणच तिनं सवत म्हणून आणण्याचे ठरविले अन् त्यायोगे तरी संतती वाढेल. ती एके दिवशी गोरोबांना म्हणाली धनी, एकदा हातून चूक झाली. बोलू नये ते मी तुम्हाला रागाच्या भरात बोलून गेले. दुःखात माणूस बोलतो ते खरे मानायचे नसते. मला आपल्यापासून असे दूर केले याचे फार वाईट वाटते.
त्यावर गोरोबा म्हणाले, संती तू बरोबर बोलते आहेस. माणूस दुःखात असला म्हणजे त्याचा विचार त्याला सोडून जातो. पण तू मला प्रत्यक्ष विठ्ठलाचीच आण घातली आहेस. मी तुला स्पर्श करू शकत नाही. विठ्ठलाची आण मी मोडू शकत नाही. असे जर केले तर भक्तावर कुणी विश्वास ठेवील का? त्यावर गोरोबांना संती म्हणाली, तुम्ही फक्त देवाची आणि भक्ताची काळजी वाहता. पण या कुटुंबाची, वंशाची काही काळजी करीत नाही. देवापुढे सगळेच तुम्हाला केरकचरा वाटते. आपल्या कुटुंबाचा वंश कसा वाढणार? प्रपंचाचे कसे होणार? याचा तुम्ही जरुर विचार करावा. त्यावर गोरोबा संतीला म्हणाले, परमेश्वराचे लेकरु परमेश्वराने नेले. हे सारे मायेचे बंध आहेत देवालाच मी आता स्वतःला अर्पण केलेले आहे.
संतीला पश्चाताप होऊ लागला. आपण नव-यालाशपथ घातली अन् नवरा आता आपल्या अंगाला हात लावायलाही तयार नाही. आज उद्या घरात धन-धान्य भरपूर येईल. पण संततीचा विचार काय करावा? अशी ती सतत काळजीकरू लागली. येईल तो दिवस अन् रात्र ती दुःखात घालवू लागली एके दिवशी तिने मनाशी विचार केला की, माहेरी जाऊन वडिलांना आपले दुःख सांगावे. आपल्या नवऱ्याचे दुसरे लग्न करण्याचा विचार वडिलासमोर मांडावा आणि त्यासाठी आपली धाकटी बहीण रामीची मागणी घालावी. असा तिने मनाशी पक्का विचार केला आणि गोरोबांना सांगून ती माहेरी ढोकी गावी आली. संती अचानक आलेली पाहून वडिलांनी विचारले, संती, तू आज अचानक कसे काय येणे केलेस! त्यावर संती मुळूमुळू रडू लागली आणि म्हणाली, माझे नशीबच फुटके, नवऱ्याचा मी खूप अपमान केला. त्यांना वाटेल तसे टाकून बोलले. देवभक्ताची निंदा केली. नव-यालामाझ्या अंगाला हात लावू नका म्हणून मी विठ्ठलाची शपथ घातली आणि पति ही देवाची शपथ मोडेना. शेवटी वंशाचा दिवा तरी कसा लागणाऱ? म्हणून मी तुम्हाला विनवणी करायला आले आहे की, धाकटी बहीण रामी, माझ्या नव-यालाद्या. त्यामुळे घराला वंशाचा दिवा मिळेल आणि लग्नानंतर आम्ही दोघी सुखाने राहू.
संतीच्या वडिलांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले व त्याप्रमाणे रामीबरोबर गोरोबांचा दुसरा विवाह करायला तयार झाले. तेर मध्ये सगळ्या गल्लीत आता गोरोबाचे दुसरे लग्न होणार. संती आपल्या पाठच्या बहिणीला सवत म्हणून घरी आणणार अशी चर्चा सुरू झाली. या घटनेकडे तेर आणि ढोकी या गावाचे आणि गावातील लोकांचे लक्ष लागून राहिले.
संती आणि तिचेवडील गोरोबापाशी आले. सासरे गोरोबांना म्हणाले, जावईबुवा आमचे वचन मानावे. माझी रामी नावाची सद्गुणी कन्या मी तुम्हाला देतो आहे. विधीपूर्वक आपला विवाह करून देतो. गोरोबांनी सास-यांची विनंती मान्य केली.
संतीच्या वडिलांनी सुमूहुर्त आणि तिथी पाहून आप्तेष्ट आणि नातेवाईकांना निमंत्रण देऊन पहिल्या लग्नापेक्षा हा सोहळा अधिक सुंदर झाला. पाहुणे, रावळे, ब्राह्मण इ. ना विविध प्रकारचे आंदण देऊन संतोषविले असा हा लग्नसोहळा चार दिवस चालू होता. शेवटी रामीचा आणि गोरोबाचा विवाह संपन्न झाला. सवतीच्या रूपाने रामीने संतीच्या घरात प्रवेश केला. संतीला लग्न झाल्याचा आनंद वाटला, तिच्या मनाचे समाधान झाले. या प्रसंगाचे वर्णन करताना संत नामदेव म्हणतात,
जाहली तेव्हा श़मी वंश बुडविला।
विठोबा कोपला मजवरी।।
मनामाजी तिने केला तो विचार।
करावे दुसरे लग्न याचे।।
बोलाविला तिने आपला तो पिता।
सांगितली वार्ता त्याजलागी।
कनिष्ठ हे कन्या दे माझ्या भ्रतारा।
नको या विचारा पाहू आता।।
अवश्य म्हणूनिया विनविला गोरा।
लग्नाची हे त्वरा केली तेव्हा।।
अशाप्रकारचे गोरोबाचा आणि रामीचा विवाह संपन्ना होताच. गोरोबाचे सासरे साधे भोळे होते. ते गोरोबांना इतर सर्वासारखेच म्हणाले, आता माझी लेक रामी तुमच्याबरोबर येत आहे. जावईबापू दोन्ही डोळ्यांना ज्याप्रमाणे सारखे जपावे त्याप्रमाणे माझ्या दोन्ही मुलींना जपा. संतीवर जसे प्रेम करता तसे रामीवरही करा. दोघींना सारखेच वागवा. अंजदुजं करु नका (भेदभाव करु नका) तुम्हाला तुमच्या विठोबाची आण (शपथ) आहे. गोरोबा सास-यांना म्हणाले, भली आठवण करुन दिली. संतीप्रमाणेच रामीला वागवीन. त्याबाबत आपण निश्विंत असावे.
गोरोबांनी दुसरा विवाह केला तो संतीच्या मनाप्रमाणे संसार व्हावा म्हणून गोरोबा संती-रामीसह तेर गावी आले. दुसरे लग्न होऊनही गोरोबाचे मन संसारात रमेना. ते सतत भजनामध्ये दंग राहत असत. दोघीशीही त्यांनी अबोला धरला. तेव्हा संती गोरोबांना म्हणाली, मी तुम्हाला विठ्ठलाची आण घातली आहे. म्हणून माझ्याशी तुमचा अबोला आहे. परंतु आपण रामीशी का बोलत नाही आपल्या पोटी संतान नाही. निदान रामीचा तरी स्वीकार करा. तेव्हा गोरोबा म्हणाले, संती, तुझ्या वडिलांनी दोघींना सारखेच वागवा. अजंदुजं करु नका, असे म्हणून मला विठ्ठलाची आण घातली आहे. अन् प्राण गेला तरी मी विठ्ठलाची आण मोडणार नाही संतीने ज्या उद्देशाने गोरोबांचे दुसरे लग्न केले तो उद्देश असफल झाल्याचे, मनाशी रंगविलेले स्वप्न उध्वस्त झालेले पाहून तिला फार वाईट वाटले. गोरोबांचे मन संसारात पुन्हा कसे रमेल यासाठी तिचे प्रयत्न सुरु झाले.
गोरोबांनी दोन्ही हात तोडले :
रामी ऊर्फ राणी आणि गोरोबा यांचा विवाह आनंदात पार पडला. परंतु गोरोबांनी संतीप्रमाणे रामीलाही स्पर्श केला नाही. रामीच्या हितासाठी संतीने एक युक्ती योजिली. ती आपल्या बहिणीला रामीला म्हणाली, हे बघ रामी, आता मी सांगेन तसं वागायचं आपण त्यांना विठोबाची शपथ मोडण्यास भाग पाडू. संतीचे हे बोलणे ऐकून रामी म्हणाली, पण आक्का, ते कसं?
असं नाही तसं नाही. असं म्हणायचं नाही. मी सांगेन तसंच वागायचं! असे संतीने रामीला सांगितले.
संतीने काय करायचे ते रामीला समजावून सांगितले. एका रात्री दोघींनी मिळून त्याप्रमाणे विचार केला. आणि गोरोबा दिवसभर नामस्मरण व भजन करून शांतपणे झोली गेले. अन् संती आणि रामी गोरोबाच्या दोन्ही बाजूस झोपल्या उजव्या हाताला संती आणि डाव्या हाताला रामी झोपली आणि संतीने ठरल्याप्रमाणे गोरोबाचा डावा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला रामीनेही गोरोबांचा उजवा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला. अन् दोघीही शांतपणे झोपी गेल्या. गोरोबा स्नान, पूजा, नामस्मरण, भजन करण्यासाठी लवकर उठत असत. पहाटे त्यांना जाग आली तेव्हा आपले दोन्ही हात कुणीतरी घट्ट धरून ठेवले आहेत. अंधारात त्यांना काही कळेनासे झाले. एवढ्यात बांगड्याचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांना शंका आली, पाहिले तर त्याच्या शेजारी रात्री संती व रामी झोपल्या होत्या.
गोरोबा झटकन् उठले. त्यांना संती व रामी यांचा अत्यंत राग आला गोरोबांचा राग-संताप पाहून रामी व संती मनातल्या मनात फार घाबरून गेल्या गोरोबांचा संताप पाहून संतीने त्यांना दोघींनी केलेला सारा प्रकार सांगितला. तेव्हा गोरोबा म्हणाले, यात तुमचा काही दोष नाही तो माझ्या हातांचाच दोष आहे. अरेरे! घात झाला. मी माझ्या हातांनी विठ्ठलाची शपथ मोडली. विठ्ठल मला भेटायला आला नाही. मी एवढा भाग्यवान नाही मी त्याची शपथ मोडली म्हणून तो तर आणखी दूर गेला.
गोरोबांना झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला, दुःख झाले अन् ते संतीला रामीला म्हणाले, हे काय केले तुम्ही माझ्या विठ्ठलाची आण मोडली संती, मी तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न केले. तुला अन् रामीला मी उगीच त्रास दिला. असे हे माझ्या हातून दुहेरी पाप घडले. माझे हातच अपराधी आहेत. या अपराधी हातांना शासन झाले पाहिजे. रामी आणि संती तुम्ही दोघीही मनाने स्वच्छ आहात. नवऱ्यावर त्यांचा अधिकारही आहे. पण आता मी काय करु! मी विठ्ठलाची आण मोडली! नामदेव महाराजांनी गोरोबांच्या या स्थितीचे पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आहे,
विठोबाची माझ्या मोडियेली आण।
टाकावे तोडून हातचि हे।।
घेऊनिया शस्त्र तोडियले कर।
आनंदला फार गोरा तेव्हा।।
गोरोबांनी शस्त्र घेऊनी आपले दोन्ही हात मनगटापासून तोडून घ्यायचे ठरविले. झाल्या चुकीबद्दल संती-रामी यांनी गोरोबांची खूप क्षमा मागितली, अन् त्या दुःखाने व्यथित होऊन गोरोबापासून दूर निघून गेल्या अन् घरकामाला लागल्या. आणि इकडे गोरोबांनी धारदार शस्त्रावर दोन्ही हात आपटून घेतले. गोरोबांचे हात तुटले. त्यांना शारीरिक वेदना खूप झाल्या. पण प्रायश्चित घेतल्याचे समाधान त्यांना वाटत होते. हा प्रसंग वर्णन करताना संत नामदेव अमृतवाडी ग्रंथामध्ये लिहितात,
लग्न झाल्यावरी घाली वोसंगळा।
दोघासही पाळा समानची।।
न पाळीता आण तुम्हा विठोबाची।
धराया शब्दाची आठवण।
अवश्य म्हणोनिया निघाला तो गोरा।
आला असे घरा आपुलिया।।
कनिष्ठ स्त्रियेशी आले असे न्हाण।
न करी भाषण तिसी काही।।
संतीला आपला नवरा आपल्याशी अन् रामीशी संभाषण करीत नाही याचे आश्चर्य वाटते. त्यावर गोरोबा सांगतात की, मला सास-यांनी विठ्ठलाची शपथ घातली आहे. दोघींना मी सारखेच वागवणार आहे. संतीला या गोष्टीचे वाईट वाटते आपला वंश कसा वाढणार? ही संतीला काळजी होती. दोघी गोरोबांना न सांगता, न कळता त्यांच्या शेजारी झोपण्याचे ठरवितात त्यातून पुढील अनर्थ घडतो आणि विठ्ठलाची आण मोडल्याने गोरोबा आपले हात तोडून टाकतात संती अन् रामी हे दृश्य पाहतात अन् कावऱ्याबावऱ्या होतात. कारण गोरोबांनी हात तोडले तिथे रक्ताचा थेंबही दिसला नाही. अन् शारीरावर जखमही कोठे दिसेना. गोरोबा संतीला व रामीला म्हणाले, तुम्हा दोघींना दोन हात दिलेत ते घ्या आणि तेरणा नदीच्या पलीकडे टाका. त्याप्रमाणे त्या दोघी गोरोबांच्या आज्ञेप्रमाणे हात तेरणा नदीपलिकडे टाकतात. अन् पाहतात तर नवल दोन्ही हात गुप्त झाले. भाविकांनी व रसिकांनी घटनेचा अर्थ असा घ्यावा, की गोरोबांनी संसाराचा त्याग करून परमेश्वर भक्तीचाच मार्ग स्वीकारला आणि आपले दोन्ही हात दोघी बायकांना दिले म्हणजे आता संसाराची धुरा तुम्ही दोघीच व्हा असे सांगितले. अन् आपला पती परमेश्वर भक्त आहे याची संतीला खात्री झाली. गोरोबांचे श़ेष्ठत्व तिच्या लक्षात आले आणि तिच्या मनाचे परिवर्तन झाले. तसेच गोरोबांनी हात तोडले याचा अर्थ असा घ्यावा की, गोरोबा संसार पाशातून विरक्त वृत्तीने राहू लागले. विठ्ठल भक्ती व नामस्मरण यासाठी हात वर्ज्य केले असा हा हात तोडले याचा अर्थ लक्षात घेता येईल. गोरोबांच्या या सर्व कृतीतून आपल्या माणसाबद्दलची आत्मीयता आणि भक्तीमार्गावरील अढळ श़द्धा किती प्रभावी होती हे स्पष्ट होते.
गोरोबांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाचा त्याग केला, संतीने आणि रामीने गोरोबांचे मोठेपण मान्य केले अऩ् त्या दोघी संसार करू लागल्या, पण गोरोबांनी वैराग्यवृत्ती धारण केल्याने घरात धन-धान्य याची कमतरता भासू लागली. दोघी चिंतातुर होऊन कसाबसा संसार सावरू लागल्या. पण शेवटी भक्ताच्या संसाराची काळजी परमेश्वरालाच असते.
पांडुरंगे धरिला कुंभारवेष :
गोरोबांनी हात तोडून घेतले त्यामुळे संती-रामी यांना फार दुःख झाले.गावातील दुष्ट चांडाळ होते ते गोरोबांची निंदा करु लागले.हात तोडायची काय गरज होती.आता आम्हाकडे जर मदत मागायला आला तरी आम्ही तिळमात्र मदत करणार नाही.पण गोरोबांनी निंदकाचे घर असावे शेजारी या न्यायाने त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.क्षेमकुशल आणि कल्याण याची काळजी परमेश्वराला असते.आपला भक्त गोरोबा याच्या संसाराची दयनीय अवस्था पाहून विठ्ठलाला काळजी वाटते.ते गोरोबांच्या घरी भक्ताचे येथे जावयाचे ठरवतात.विठ्ठलाबरोबर रुक्मिणी आणि गरुडही जावयास तयार होतात.ते तिघेही वेष पालटून ढोकीस निघाले.विठ्ठल स्वतः विठू कुंभार झाले.विठ्ठलाच्या सांगण्यावरून रुक्मा कुंभारीण झाली.गरुड गाढव झाले.विठ्ठलाने कुंभाराचे रूपधारण केले.डोक्यावर वेडेवाकडे पागोटे घातले.अंगात बंद नसलेली बाराबंदी घातली.जीर्ण धोतर नेसले.रुक्मिणीने जीर्ण-जुने असे लुगडे नेसले.कपाळावर आडवे कुंकू लावले. नाकात मोत्याची झुपकेदार नथ घातली.गरुड गाढव झाले.
अशाप्रकारे तिघे वेष पालटून तेर गावात आले.अन् आम्ही कुंभार आहोत आणि आम्हाला काम मिळावे म्हणून ते गावात फिरू लागले.गावातल्या लोकांना कुंभाररूपी विठ्ठल सांगू लागले, मी नावाचा विठू कुंभार.रुक्मा माझी बायको.आमचे कुटुंब मोठे आहे.कामधंदा करुन पोट भरण्यासाठी आम्ही आपल्या गावी आलो आहे. कारण आमच्या गावी दुष्काळ पडलेला आहे.आम्ही मन लावून काम करु.आम्हाला मडकी घडावयास व भाजावयास येतात.आमचे काम तरी बघून मग आम्हाला ठेवून घ्या.असे चक्रपाणीचे हे सत्य बोलणे कोणाला कळेना तेर गावातील प्रत्येक जण म्हणू लागला हा गरीब कुंभार आहे.त्याला गोरोबांच्या घरी पाठवूया. आणि गावकरी विठू कुंभाराला सांगू लागले, आमच्या गावचा गोरा कुंभार त्याने आपले हात तोडून घेतले आहेत तेथे तुम्हाला कामधंदा मिळेल.गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे देव गोरोबाच्या घरी जातात अन् गोरा कुंभारला म्हणतात, आम्हांला काहीतरी काम द्या.आम्हांला पैश्याची अपेक्षा नाही.आपण जे सांगाल ते काम करु. यावर गोरोबा काका विचारतात आपण कोण? कुठले? आपले नांव गाव सांगा? तुम्ही कोणता कामधंदा करु शकता? त्यावर देव म्हणाले, मी विठू कुंभार माझी बायको रुक्मा कुंभारीण.आम्हां दोघांची एकमेकाला साथ आहे.हे गाढव (गरुड) आमचे कामधंद्याचे वाहन.आम्ही कारगीर आहोत.मडकी घडणे भाजणे हा आमुचा व्यवसाय आहे.आम्ही पंढरपूर भागातील रहिवासी.आमच्या भागात दुष्काळ पडलेला आहे.म्हणून आम्ही कामधंद्याच्या शोधार्थ, पोट भरण्यासाठी देशोदेशी फिरत आहोत पण हे सांगताना आपण देव आहोत हे कळून दिले नाही.अन् म्हणाले, आपण द्याल ते काम करु आणि मिळेल ते पोटाला खाऊ.गोरोबांनी त्यांना आनंदाने कामाला ठेऊन घेतले.तिघेही आनंदाने गोरोबांच्या घरी राहिले.अन् भक्ताच्या घरी देव माती वाहू लागले. नानाप्रकारची मडकी घडू लागले.प्रेमाने भक्ताच्या घरी काम करु लागले (भाविकांनी ही मूळ कथा ब्रह्म-वैवर्त पुराणात पहावी) गरुड माती वाही.विठ्ठल चिखल तुडवी.रुक्मिणी पाणी भरी.अन् विठ्ठल चाकावर नाना प्रकारची गाडगी-मडकी तयार करु लागला.भगवंत विठ्ठल आपल्या भक्ताच्या नानाप्रकारची कलाकुसरीची मडकी तयार करु लागला आणि ती गाडगी मडकी जाळ्यामध्ये बांधून विठ्ठल आणि रुक्मिणी आसपासच्या गावी बाजारात गाडगी मडकी विकू लागले.विठ्ठलाने कुंभारवेषात तयार केलेली मडकी घेण्यासाठी आसपासच्या गावातील व तेरमधील स्त्रिया मडकी घेऊ लागल्या.स्त्रिया विठ्ठलरुपी कुंभाराचे कौतुक करु लागल्या.
जगदात्मा भक्तमुकी घास घाली :
कुंभारवेष धारण केलेले पांडुरंग आणि रुक्मिणी दिवसभर कुंभारकाम करीत असत. उभयतांना कामाचा कंटाळा असा नसे. संध्याकाळी रुक्मिणी स्वयंपाक करी. गोरोबा आणि विठ्ठल एका पात्रात जेवत असत. संती-रामी यांना वेगवेगळ्या पात्रात वाढी आणि गरुडासाठीही स्वतंत्र पात्र करीत असत. रुक्मिणीने केलेल्या स्वयंपाकाचा सर्वजण आस्वाद घेऊ लागले. एके दिवशी गोरोबा व विठ्ठल एका पात्रात जेवू लागले. विठ्ठल गोरोबाच्या मुखी घास घालून भक्ताला भरवू लागला गोरोबाही विठ्ठलला भरवू लागला. आणि संतीही गोरोबांची सेवा करु लागली. लोकही गोरोबाचे हात नसल्याने त्यांच्याकडून आता गाडगी-मडकी मिळणार नाहीत म्हणून स्त्रिया विठ्ठलरूपी कुंभाराकडून तयार झालेली मडकी विकत घेऊ लागल्या. आणि स्त्रिया गाडगी मडकी घेत असत पण त्याच्या मोबदला देत नसत आणि विठ्ठल व गरुड शेवटी कौशल्याने सर्वांकडून धनधान्याच्या रूपात बैते गोळा करून गोरोबाच्या घरी आणून टाकीत असत.
अशाप्रकारे परमभक्त गोरोबांच्या घरी सेवेसाठी विठ्ठल-रुक्मिणी आले. ते गोरोबांची आणि त्यांच्या कुटुंबाची ही सेवा करु लागले. इतर भक्तांना विठ्ठल कुठेही दिसेना म्हणून विठ्ठलाच्या शोधार्थ संतपरिवार गोरोबाच्या गावी जायचे ठरवतात. तेर नगरीत पांडुरंग सात महिने सव्वीस दिवस राहिले.
संत परिवार येती गोरोबांचे घरी :
तेर नगरीत संत गोरोबा काका अभंग गात, कीर्तन, भजन करीत आणि स्वतः पांडुरंग चिखल तुडवीत असे. एके दिवशी तेरमधील एक कुंभार गोरोबाला म्हणाले की, संत परिवाराचे म्हणणे असे आहे की देव पंढरीला नाहीतच देवाचा शोध घेण्यासाठी आषाढी एकादशीला इकडेच येणार आहेत. हा गोरोबा आणि तेथील कुंभाराचा संवाद ऐकून चिखल तुडविता -तुडविता पांडुरंग क्षणभर थांबत अन् पुन्हा चिखल तुडवायला लागतात. यावर गोरोबा काका म्हणाले, ही चांगलीच गोष्ट आहे. तेर भूमीला संतपरिवाराचे पाय लागतील त्यामुळे उलट आपुली भूमी अधिक निर्मळ होईल.
ज्येष्ठ महिना सुरू झाला. नामदेव अस्वस्थ झाले. कारण देव कुठे लपला हे कळेना. गाईला भेटण्यासाठी तिचे वासरु जसे आतुर होते. त्याप्रमाणे देवाच्या भेटीसाठी संतपरिवार आतुर झाला होता. संत नामदेव, राका कुंभार (पंढरपूर), संत माणकजी बोधला (धामणगाव), संत नरहरी सोनार (वाळुद), संत चोखामेळा (मंगळवेढा), संत कर्ममेळा (जानज), संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर (देवाची आळंदी), संत जनाबाई (पंढरपूर), संत सोयराबाई (चिंचपूर), संत कान्होपात्रा (पंढरपूर) असे पंढरीच्या आसपासचे सर्व संत पंढरीत जमा झाले. देव तेरमध्येच असे समजून ते तेरला निघाले. तेथून पंढरीला जाऊ असे त्यांनी ठरविले गोरोबांना झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला, दुःख झाले अन् ते संतीला रामीला म्हणाले, हे काय केले तुम्ही माझ्या विठ्ठलाची आण मोडली संती, मी तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न केले. तुला अन् रामीला मी उगीच त्रास दिला. असे हे माझ्या हातून दुहेरी पाप घडले. माझे हातच अपराधी आहेत. या अपराधी हातांना शासन झाले पाहिजे. रामी आणि संती तुम्ही दोघीही मनाने स्वच्छ आहात. नव-यावर त्यांचा अधिकारही आहे. पण आता मी काय करु! मी विठ्ठलाची आण मोडली! नामदेव महाराजांनी गोरोबांच्या या स्थितीचे पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आहे,
आषाढी यात्रा आला पर्वकाळ
निघाला संतमेळा पंढरीशी।।१।।
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
आणिक ही अनुभवी संत बहु।।२।।
मार्ग तेरचा धरुनी ते आले।
तेथे गोरोबाशी पुसियेले।।३।।
गावातील जन सांगती प्रकार।
गोऱ्याचा विचार जाहला सर्व ।।४।।
परदेशी कुंभार पंढरीचा विठ्ठल।।
राहिलाशी वाटा करुनिया।।५।।
ज्ञानदेवे खुण आणलीया मनी।।
एका जनार्दनी पाहू त्याने।।६।।
वरील संतांचा मेळा अकलूज मार्गे, काही संत वैराग मार्गे ज्येष्ठ शुद्ध दशमीला निघून तेरला पोहचले. तेरमधील गावक-यांनी संतपरिवाराचा आदर सत्कार केला. संतांनी गावकऱ्यांना गोरोबाकाकांचे कसे काय चालले आहे असे विचारले. त्यावर गावकऱ्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाले गोरोबाकाकांच्या घरी एक परदेश कुंभार येऊन राहिला आहे. तो त्यांच्या घरी कुंभार काम करुन राहतो आहे. तो अत्यंत प्रामाणिक व कुशल कारागीर आहे. परदेशी कुंभार आणि त्याची पत्नी दोघेही कुंभारकामात पारंगत आहेत. उभयतांच्यामुळे गोरोबाकाकांचा व्यवसाय चालतो. इतकेच नव्हे तर परदेशी कुंभार आल्यापासून गोरोबाचे घरची परिस्थितीही सुधारलेली आहे. गावक-यांचे सर्व बोलणे ज्ञानदेवांनी ऐकिले व त्यांना खूण पटली. त्यांनी गोरोबाकाकांना त्रिविक्रम मंदिरात बोलावून घ्यावयास सांगितले. संतांचे बोलावणे आल्याचे ऐकून गोरोबाकाकांना आनंद वाटला. आणि परदेशी कुंभाराला ही संतदर्शनाला चला असे म्हणाले, परदेशी कुंभार हो म्हणाला आणि कुठे गुप्त झाला. गोरोबाकाकांनी त्रिविक्रम मंदिरात जाऊन सर्व संताचे दर्शन घेतले. सर्व संतांनी काकांचे दर्शन घेतले. संध्याकाळी दशमी दिवशी त्रिविक्रम मंदिरात सर्व संतांनी कीर्तन केले. ज्येष्ठ शुद्ध एकादशीला ज्ञानदेवाचे विचारप्रवर्तक कीर्तन ऐकून सर्वजण धन्य झाले. गोरोबांनी सर्व संतांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. गोरोबांच्या विनंतीस मान देऊन ज्येष्ठ शुध्द द्वादशीस संत मंडळी गोरोबा काकांच्या घरी निघाले.
गोरोबांच्या घरी सर्व संतमंडळी आली. गोरोबांनी निवृत्तीनाथासह सर्वांना आलिंगन दिले. सर्वांनी अलिंगन प्रसंगी मौन धारण केले होते. परंतु संतांचे हे मौन फारच बोलके होते, अर्थपूर्ण होते. सर्वजण मनाने अनुभूती घेत होते. ज्ञानदेव गोरोबाकाकांना म्हणाले, आपले तर हात तुटलेले आहेत. मग आपला उदरनिर्वाह कसा चालतो? त्यावर गोरोबा काका म्हणाले, पंढरीचा वाटेकरी तो विठू कुंभार कष्टाळू आणि स्वभावाने चांगला आहे. त्याची पत्नीही खूप कष्टाळू आणि मायाळू आहे. तो परदेशी विठू कुंभार माझे सर्व कुंभार काम करतो आणि त्याची बायको स्वयंपाकपाणी करते. त्या दोघांच्या येण्याने माझ्या घरची सर्व परिस्थिती पालटली आहे. त्यावर ज्ञानदेव म्हणाले, बोलवा! त्या परदेशी विठू कुंभाराला मग गोरोबाकाका आणि संत मंडळीत पुढील संवाद घडला, विठ्ठलाच्या भेटीसाठी कासावीस झालेली संत मंडळी गोरोबाकाकांना म्हणाली, काका, देव तुमच्याकडेच होते. आता कुठे आहेत़?
गोरोबा संतमंडळींना म्हणाले, अहो देव इकडे आलेच नाहीत त्यावर संतमंडळी म्हणाली, काका, देव इथेच होते. तुमच्यापाशीच राहत होते.
त्यावर गोरोबा काका म्हणाले, आमच्या घरी देव आलेच नाहीत फक्त पंढरीचा विठू कुंभार आणि त्याची बायको रुक्मिणी काम करण्यासाठी दोघे माझ्या घरी राहताहेत.त्यावर विठ्ठल दर्शनासाठी आसुसलेले नामदेव म्हणाले, इकडे बोलवा तरी त्यांना नामदेव असे म्हणताच गोरोबांची पत्नी संती परदेशी विठू कुंभाराला शोधू लागली. परंतु संत मंडळी तेर मध्ये दाखल होताच पांडुरंग, रुक्मिणी व गरुड अगोदरच अदृश्य झाले होते. आणि ते पंढरीत दाखल झाले होते. संतीने सर्वत्र पाहिले पण परदेशी विठू कुंभार त्यांची पत्नी कुठेही दिसेना. तिने येऊन सर्वांना सांगितले ती दोघेही कुठे दिसेनात. त्यावर ज्ञानदेव म्हणाले, त्यांनी घडविलेली गाडगी-मड़की इकडे आणा पाहू! सर्व संतमंडळी मडकी पाहू लागली. ती मडकी अप्रतिम वाटत होती. सर्व मडक्यावर कोरीव नक्षीकाम व कलाकुसर केलेली त्यांना दिसली. त्यातले एकेक मडके घेऊन वाजवून पाहली त्या प्रत्येक मडक्यातून विठ्ठलऽऽविठ्ठल असा नाद उमटत होता. यावरून सर्वांचे एकमत झाले की प्रत्यक्ष विठ्ठल आणि रुक्मिणी गोरोबाकाकांच्या कडे काम करुन राहत होती. संत गोरोबाकाकांनाही खेद वाटला की, आपण आपल्या प्रपंचासाठी प्रत्यक्ष विठ्ठलाला राबवून घेतले. पण संतसहवासात हा खेद गोरोबाकाका क्षणभर विसरले आणि सर्व संतमंडळींना भोजन देऊन त्यांची बोलवण केली.
संत येती घराघरा येई घरपण :
घरी गुप्त झाला देवराणा।
तेणे गोरा आणि त्याच्या ललना।।
पश्चाताप होवोनी जाणा।
देवासी राबविले म्हणूनि।।
आपल्या घरी सर्व संतमंडळी आलेली पाहून आणि आपल्या नवऱ्यावषयीचा संतमांदियाळीमध्ये असलेला आदर भाव पाहून, संती-रामी यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटला. गोरोबांची उत्कटभक्ती व मोठेपण यांची अनुभूती जशी सर्व लोकांना आली तशी त्यांच्या पत्नीलाही आली. संती अंतर्मुख होऊन विचार करायला लागली की! आपल्या प्रपंचाच्या विपरित अवस्थेला नशीब जबाबदार नाही. आपल्याच विचित्र स्वार्थी वागण्यानं-दोघांच्या म्हणजेच पतीपत्नींचा नात्यात दुरावा निर्माण झाला. वास्तविक आपण आपल्या नव-याला समजून घेऊ शकलो नाही. याचा तिला पश्चाताप होऊ लागला. आपल्या नवऱ्याचं सात्विक जीवन, अंतःकरण, त्यांच्या ठायी असलेली कारुण्यमयता, सर्वस्व परमेश्वराठायी अर्पिलेले, आपला नवरा खरा साक्षात देवमाणूसच. पण त्याला आपण ओळखू शकलो नाही. त्यामुळे संसारापासून विरक्ती घेणाऱ्या नव-यालाआपण ओळखू शकलो नाही म्हणून मला हे दुःख भोगावयास लागले त्यांनाही दुःख भोगावयास लागले. बहिणीलाही या दुःखात आपण लोटून दिले. अशी संतीच्या मनाला उपरती झाली. संतपरिवाराचे तिच्या घरी येण्याने आणि संतपरिवार पंढरीला निघून जाताच. आता संतीच्या वागण्याबोलण्यात फरक पडू लागला. इतकेच नव्हेतर प्रत्येक गोष्टीतून तिच्यातील समंजसपणा आणि गंभीरपणा गोरोबांच्याही लक्षात येऊ लागला. गोरोबांही पत्नीची विचारपूस करु लागले. संतीबरोबर रामीचीही ते जेवणखाण, कुंभार कामासंदर्भात विचारणा करायला लागले.
यावरून हे स्पष्ट होते की संतीनं व रामीनं गुणदोषासह गोरोबाला आपलसं करण्याचा प्रयत्न केला आणि गोरोबाकाकांनी गुणदोषासह पत्नींची ख्यालीखुशाली विचारायला सुरुवात केली. यातून गोरोबांच्या घरी असलेला कौटुंबिक दुरावा कमी होऊन घरामध्ये एक कौटुंबिक सौंदार्हाचे वातावरण निर्माण झाले. तसेच आणखी एक झाले ते म्हणजे परमेश्वरविषयक सौहार्दभाव ही निर्माण होऊ लागला. गोरोबाप्रमाणे संती-रामी यांनाही विठ्ठल भक्तीचे कौतुक वाटायला लागले. संतीही परमेश्वर भक्तीत रममाण होऊ लागली. रामी घरात काही हवे नको बघायला लागली. अन् कधी नव्हे तो गोरोबांच्या घरी सौख्याचे, सौहार्दाचे नाते निर्माण झाले.
गोरोबांचे पत्नीसह पंढरीस आगमन :
प्रत्येक महिन्याला पंढरपूरला गोरोबा जात असत. संतांची मंदियाळी घरी येऊन गेल्यापासून तर गोरोबा पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी उतावीळ झाले होते.कारण प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणी कुंभाराचा वेष धारण करुन सात महिने सव्वीस दिवस आपल्या घरी राहिले.पण त्यांना आपण ओळखू शकलो नाही याचा गोरोबांना आणि त्यांच्या पत्नींना पश्चाताप झाला.देवराणा-पांडुरंग प्रत्यक्ष आपल्या घरी आला.पण त्याला आपण फक्त राबवून घेतले.म्हणजे प्रत्यक्ष परिस हाताशी लागला होता.पण तो दगड समजून आपण गोफणीत घालून भिरकावून दिला.इतकेच नव्हे तर प्रत्यक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या रूपाने कामधेनू घरी आली. पण आम्ही काठीने मारून हाकलून लावली.याप्रकारचा पश्चाताप गोरोबाकाकांना झाला.आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्याचा निर्धार केला.कारण आषाढी एकादशीला पांडुरंगाचे असंख्य भक्त पंढरीस येणार.टाळ, मृदुंग, दिंड्या, पताका हरिनामाच्या संकिर्तनात व गजरात पंढरी दुमदुमून जाणार.आषाढी एकादशीच्या आदल्याच दिवशी गोरोबा काकांच्या मनाची अस्वस्थता वाढू लागली.गोरोबांची मनाची अस्वस्थता संतीने ओळखली.संती गोरोबांची पंढरीला जायची तयारी करु लागली.ही तयारी करीत असताना संतीच्या अंतःकरणालाही कसली तरी अद्भुत ओढ लागली.गोरोबांना न सांगता तिनेही पंढरीला जाण्याची तयारी करुन ठेवली आणी रामीलाही शिदोरीची तयारी करुन ठेवायला सांगितले.संती व रामीच्या बारीकसारिक हालचालीवर गोरोबांचे बारकाईने लक्ष होते.
पंढरीला निघता-निघता संती व रामीला विचारले की, उद्या आषाढ एकादशी आहे पंढरपूरला येता का! नव-याचे हे बोल ऐकून संती-रामी विलक्षण आनंदीत झाल्या.अन् गोरोबांच्या तोंडून आलेले ते वाक्य त्यांना सुखावून गेले.दोघीनीही होकार दिला.दोघीजणींना घेऊन गोरोबा आषाढी एकादशीवारीला पंढरीला निघाले.दोघीनी गोरोबांच्या पायाचे दर्शन घेतले.दोघींना दंडाना धरून उठवले.आणि सांगितले चला पंढरपूरला आणि अशारितीने गोरोबाचं सारं कुटुंबच पंढरीला निघालं.आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पहाटे गोरोबाचं कुटुंब टाळ-वीण्याच्या साथीत निघाले.दुपारी मध्यान्ह्याच्या सुमारास पंढरीला पोहचले.पंढरीच्या वेशीवर पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसताच गोरोबासह संती-रामी यांची अंतःकरणेही विठ्ठल भेटीसाठी फुलून गेली.
पंढरीत येताच गोरोबा, आणि संती रामी यांनी चंद्रभागेत स्नान केले.भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतले.आणि सर्वांनी प्रफुल्लीत मनाने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला.आणि भक्तिभावाने भारावलेल्या अंतःकरणाने विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि विठ्ठल चरणी माथा टेकवून संती-रामीनं अंतःकरणातील अंहकाराचं, स्वार्थाचं विसर्जन करुन टाकले.गोरोबा सर्व विश्वाकडं समत्व भावनेने पाहणा-या, आणि सर्वांना त्याच भावनेने पहायला शिकविणा-या विठ्ठलाशी उराउरी भेटले.अशा या सगुण निगुर्णाच्या भेटीने गोरोबांच्या अंतःकरणाचा थेट ठाव घेतला अंतःकरणात भक्तिभावाचे अभंगरुपी पुष्प उमलले आणि देहभान हरपून ते मंदिराच्या गाभाऱ्यातच अभंग म्हणून लागले.
निर्गुणाच्या संग धरिला जो आवडी।
तेणे केले देशधडी आपणाशी।।
अनेकत्व नेले अनेकत्व नेले।
एकिले सांडिले निरंजनी।।
एकत्व पाहता अवघेचि लटके।
जे पाहे तितुके रुप तुझे।।
म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव।
तुम्हा आम्हा नाव कैचे कोण।।
प्रारंभापासून गोरोबाकाकांनी निर्गुणाची प्राप्ती होण्यासाठी सगुण सावळ्या विठ्ठलाची परम भक्ती करायला सुरुवात केली होती.निर्गुणाचा ध्यास लागल्यानंतर जी उपासना केली जाते ती फलद्रुप होऊन निर्गुणाचा लाभ होतो.व्यावहारिक जीवन त्यामुळे पार पडते आणि इतकेच नव्हेतर अनेकत्वाचा लोप पावून अद्वैताचा साक्षात्कार होतो.हा झालेला अद्वैताचा साक्षात्कार विठ्ठल दर्शनानंतर प्रगट करतात.तसेच ईश्वर, जीव आणि जगत ही त्रिपुटी सोडून या तिन्ही तत्त्वांच्या ठिकाणी अद्वितीय परमात्मा तत्त्वाच्या ऐश्वर्याची अनुभूती प्रत्ययास येते.विठ्ठलाच्या दर्शनाने द्वैतभाव लोप पावून अद्वैतभाव कसा प्रकटला आहे तो सांगण्यासाठी म्हणजेच अद्वैतभावा चे वैभवशाली वर्णन ते वरील अभंगातून मांडतात आणि गोरोबाचे सारे कुटुंबच परमार्थमय बनले. असा हा गोरोबाकाका यांचा लौकिक पातळीकडून अलौकिक अशा पातळीकडे झेपावणारा भक्तिभावही येथे स्पष्ट होतो.
गोरोबांना हात फुटले :
गोरोबा अभंग गात विठ्ठलाचे नामस्मरण करीत. मंदिराच्या गाभा-यातून बाहेर आले. विरक्त अवस्थेत असलेल्या गोरोबांना विठ्ठलांच्या मूर्तीवाचून दुसरं काही दिसत नव्हते. आता त्यांच्या नजरेस आलं की, महाद्वारात नामदेवाचे रसाळ कीर्तन चाललं होतं. नामदेव वीणा चिपळ्यांच्या साथीनं कीर्तन करीत होते. या कीर्तनात ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव, वटेश्वर, चांगदेव, परिसा भागवत, सावता माळी, चोखामेळा, विसोबा खेचर, नरहरी सोनार, सेना न्हावी, जोगा परमानंद, मुक्ताई, जनाई इ. संतश़ेष्ठ मंडळी सहभागी झाली होती. सर्वजण नामदेवाचे कीर्तन एकाग्र चित्ताने ऐकत होते. नामदेवाच्या कीर्तनात विठ्ठल नामाचा गजर होत होता. त्या विठू नामाच्या गरजाने स्वर्गामध्ये ब्रह्मादीदेव तल्लीन झाले हेतो. सर्वजन देहभान विसरून टाळ्या वाजवित होते.
हरिनामाचा गजर चालला होता. नामदेवाच्या कीर्तनात रंग भरू लागला होता. नामदेवाचे कीर्तनातील निरुपण ऐकून ज्ञानदेवादी सारे संतश़ेष्ठ तल्लीन झाले होते. नामदेव अभंग गातागाता निरुपण करु लागले. अन् त्यांना भक्तांना परमेश्वराने सांगितलेल्या नियत कर्तव्याची जाणीव करुन दिली. अन् अंतःकरणापासून सांगू लागले, "भाविकभक्तगण हो प्रथमतः परमेश्वराने तुम्हाला जीवन जगण्यासाठी जी नियम कर्तव्य सांगितली आहेत ती पार पाडली पाहिजेत. देव प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करावा असे कोणीच सांगत नाही. संसार हे देवाने तुम्हावर सोपविलेले कार्य आहे ते तुम्हाला केलेच पाहिजे. संसार करण्याचे कार्य तुम्ही टाळले तर तो देवाचा अपमान होईल का नाही? परमेश्वराने गीताईच्या रुपाने हा संसारधर्मच सांगितला आहे. म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी घरदार, बायकामुले म्हणजेच संसाराचा त्याग करता येत नाही. फक्त हा संसार कसा करावा ते समजलं पाहिजे. फक्त भक्तांनो होते काय? संसार करताना, संसारताप सांभाळताना प्रत्येकाला वाटते की हा "माझा संसार' अशी तुमची ठाम समजूत होते. पण हे चुकीचे आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही जो संसार करता तो तुमचा नसतोच. तो आगळ्या वेगळ्या अर्थाने परमेश्वराचाच असतो. संसारात राहून आपण जी कर्म करतो. पण त्यातला काही भाग इतरांसाठी करण्याचा तुमचा विचार पाहिजे. असा थोडासा विचार केला तर संसारातील दुःखाचा स्पर्श तुमच्या आत्म्याला होणार नाही. आपण आपली सारी कर्म ईश्वरचरणी समर्पित केलीत तर त्यातही तुम्हाला एक मुक्ततेची अनुभूती येईल. कर्मत्यागापेक्षा कर्माचा स्वीकार, आचार केला तर तुमची मुक्तता होण्याची शक्यता अधिक आहे. निष्काम कर्मयोग्यासाठी माणसाला आधी संसार करावा लागेल. इतकेच नव्हे तर आपला संसाराच परमार्थमय करुन टाकल्यास परमेश्वर प्राप्तीची आपली आकांक्षा तृप्त होईल. संसार करीत करीत पांडुंरंग नामस्मरण हे तुम्हाला सर्वोपयुक्त ठरणार आहे.'
नामदेवाचा हा भक्तिभाव अर्थातच व्यावहारिक भाव सगळेजण एकाग्र चित्ताने ऐकत होते. नामदेवाने संसार हे एक परमेश्वराने दिलेले नियत कर्तव्य कसे आहे? असे प्रतिपादल्यानंतर नामदेवानी शेवटी हरिनामाचा गजर सुरु केला. कीर्तनाला उपस्थित असलेल्या लोकांनी एका तालात टाळ्यांचाही गजर सुरु केला आणि त्यांच्या हातातील टाळांनाही कंठ फुटले. लोकांच्या उपस्थितीत संतश़ेष्ठ बेभान होऊन नामस्मरण करीत टाळ्या वाजवित होते. संती आणि रामीही टाळ्या वाजविण्यात अन् नामस्मणात मग्न झाल्या होत्या. गोरोबा काका मात्र टाळ्या वाजविण्यासाठी हात नाहीत म्हणून संचित होऊन बसले होते. नामदेवाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. तेव्हा नामदेव काकांना म्हणाले, "गोरोबाकाका नामस्मरणात सामील व्हा. हाताने पांडुरंगाचे गुणवर्णन करा.' नामदेवांनी नामाचा उच्चार करण्यासाठी गोरोबासह सर्वांना हात वर करा म्हणून सांगितले.
वरती करा कर दोन्ही
पताकाचे अनुसंधानी ।।१।।
सर्व हस्त करिती वरी।
गोरा लाजला अंतरी।।२।।
नामा म्हणे गोरोबासी।
बरती करणे हस्ताशी।।३।।
गोरा थोटा वरती स्वीकारी
हस्त फुटते वरचेवरी।।४।।
याप्रमाणे नामदेवांनी सांगितल्याप्रमाणे गोरोबाकाकांनी वरती हात करुन ते भजनात दंग झाले असता त्यांना वरचेवर हात फुटले. गोरोबांच्या थोट्या हातांना अचानक पंजे फुटु लागले. थोड्याच वेळात गोरोबांचे हात पूर्ववत झाले. त्यांना आश्चर्य वाटले. पांडुरंगाचाच हा कृपाप्रसाद आणि गारोबांचे अंतःकरणही भरुन आले. अन् इतराप्रमाणे टाळ्या वाजवू लागले. त्यांच्या आनंदाला आणि भक्तगणांच्या संतपरिवाराच्या आनंदालाही सीमाच उरली नाही. नामदेवाच्या कीर्तनाने नामस्मरणाने कृतकृत्य झालेल्या भक्तमंडळींनी नामदेवाचे अन् त्यापाठोपाठ गोरोबा काकांचेही दर्शन घेतले.
संतीलाही तिचा बाळ-मकरेंद्र मिळाला :
परमेश्वराची लिलाच अगाध असते. नामदेवाचे कीर्तन निमित्त धरुन गोरोबा काकांना हात दिले. आपल्या नव-याला पहिल्यासारखे हात मिळाल्यामुळे त्यांच्या बायका संती व रामी या दोघींना आनंद झाला. त्याचबरोबर त्यांना संतांच्या अद्भूत सामर्थ्याचाही प्रत्यय आला. संती मनात विचार करु लागली. आपल्या नव-याला कीर्तनात हात प्राप्त झाले. मी मात्र देवाची अवकृपा झाल्याने बाळाविना राहिले. याचे अतीव दुःख तिला होऊ लागले. ती मनातल्या मनात पांडुरंगाचे स्मरण करु लागली, पांडुरंगाला आळवू लागली,"हे पतितपावन पांडुरंगा, माझे मूल तुझ्या दारी आले आहे. तेवढे मला परत दे. एका मातेचे दुःख तुलाच समजू शकते. माझ्या मनाचे दुःख जाणून माझे बाळ मला परत कर' असे म्हणून तिने पांडुरंगाचे चरणकमळ धरले "माझे बाळ मला परत करेपर्यंत मी तुझे चरणकमल सोडणार नाही' संतीचे ते दुःख पाहून नामदेव संतीला म्हणाले,"पांडुरंगावर दृढ विश्वास ठेऊन. "मकरेंद्राऽऽ झडकरी ये असा धावा कर". संतीनेही पांडुरंगाचे चरण धरुन मकरेंद्राऽऽ मकरेंद्राऽऽ ये! असा धावा करिताच. माता संतीचे प्रेम, वात्सल्य पाहून बाळ-मकरेंद्र दुडूदुडू रांगत आले. संतीने दुडूदुडू धावत येणाऱ्या मकरेंद्राला उचलून उराशी धरिले. तिचा बाळ तिला मिळाल्याने ती आनंदित झाली. गारोबा काका ही ह्या प्रसंगाने आश्चर्यचकित झाले.
संत वचन करावया सत्य।
देव कामे करी नित्य।।
स्वसत्ते काहीच न करीत।
मान देत संत वचना।।
भाविकांनी येथे ही गोष्ट लक्षात घ्यावी की, गोरोबांच्या आयुष्यातील हा एक चमत्कार होय. यावरुन गोरोबाच्या जीवनाशी, प्रपंचाशी विठ्ठल किती एकरुप झाले होत. हे विशद करण्यासाठीच हा चमत्कारपूर्ण प्रसंग वर्णिलेला आहे. हा चमत्कार खऱ्या अर्थाने साधकांना चैतन्य आणि चेतना देणारा आहे. मंडळीचे गोरोबांच्या घरी आगमन झाल्याने त्यांच्या घराला एक घरपण प्राप्त झाले.
गोरोबांनी विरक्तीतून संसारात पदार्पण केले :
गोरोबांचे कुटुंब जणू सर्वच विठ्ठलमय झाले होते. आता केवळ परमेश्वर गुणगाण जपणे होते. पुढे गोरोबांची शपथही सुटली होती. कारण प्रत्यक्ष गोरोबांच्या स्वप्नात येऊन तसेच विठ्ठलाने सांगितले होते. अन् पांडुरंगानेही सांगितले की, "माझी शपथ मी काढून घेतली आहे. आता गृहंपुत्र दारा सुख भोगुनी. संसारी वर्तावे सुखरुपा. आणि मग गोरोबांचा संसार आता खरा समाधानी व आनंदमय बनला, संती आणि रामी यांच्याशी गोरोबा एकरुप झाले आणि हे सर्व कुटुंबच परमेश्वरमय झाले. गोरोबा हे विरक्तीतून परमश़ेष्ठ विठ्ठलभक्त झाले. त्यांच्या कुटुंबात परमेश्वर वृत्तीचा विकास झाला. सारे कुटुंब विठ्ठल भक्तीत रंगू लागले. मुळातच संत गोरोबाकाकांच्या घरी धार्मिक वातावरण होतेच. आता सारे कुटुंबच धार्मिक वृत्तीचे बनले. तोच संस्कार घेऊन संती व रामीही उर्वरित आयुष्यात विठ्ठल भक्तीत रमत संसार करु लागल्या.
संतपरीक्षक गोरोबा कुंभार :
"ईश्वर निष्ठांच्या मांदियाळीत' संत शिरोमणी गोरोबा वयाने जेष्ठ होते. लोक त्यांना आदराने गोरोबाकाका म्हणत। श्री संत गोरोबाकाका भक्ती आणि नामस्मरण या साधनांद्वारे "नराचे नारायण झाले' म्हणजेच विठ्ठल भक्तच विठ्ठल होऊन गेले. अशी ही पंढरीच्या पांडुरंगाची भक्तीची किमया सर्वांना पटवून समजावून दिली. म्हणून संत परिवारात ते वडिलधारी तर होतेच त्याच्याबरोबर आदरणीय, वंदनीयही होते. कारण गोरोबांचा परमार्थिक अधिकारच मोठा होता. प्रपंच करुनही परमार्थ साध्य करणारा हा वैरागी पुरुष अनंत, निर्गुण, निराकार, अशा परब्रह्माचे लौकिक रुप म्हणजे "काका'. म्हणून सर्वजण त्यांना "काका' या नावाने हाक मारीत असत. गोरोबाकाका यांच्या जीवनचरित्रातून त्यांची आध्यात्मिक भाववृत्ती "विठ्ठलमंत्र सोपा असूनही एकवेळी तरी उच्चारावा' ह्या संदेशातून स्पष्ट होते. ते परमेश्वराचे पांडुरंगाचेही आवडते भक्त होते. गोरोबांच्या ठिकाणी समर्पणाचा भाव असल्याने अहंकाराला थारा नव्हता. याचे कारण गोरोबांच्या ठिकाणी असलेला भक्तिभावच त्यांना परमेश्वराप्रत नेणारा होता. पण ही गोष्ट नामदेवाला मात्र मान्य नव्हती. त्यांना असे वाटत होते की आपल्या इतका पांडुरंगाचा आवडता निःसिम भक्त कोणीच नाही. हा नामदेवाचा अहंकार होता. हा नामदेवाचा अहंकार घालविण्यासाठी ज्ञानेश्वरांनी एक युक्ती योजिली. एकदा नामदेव आळंदीत आले असताना गोरोबाकाकांना ज्ञानेश्वरांनी आळंदीस बोलावून घेतले. यापाठीमागील ज्ञानेश्वरांची भूमिका ही होती की, नामदेवाच्या ठिकाणी असलेला अहंकार घालवणे. कारण अहंकाराच्या ठिकाणी समर्पणाचा भाव राहत नाही.
ईश्वरनिष्ठांची ही मांदियाळी एकदा पंढरपुरास गेली असता कीर्तन संपल्यावर सर्व संतांनी काकांना नमस्कार केला होता. पण नामदेवाने अहंकाराने नमस्कार स्वीकारल्याचे दाखवले नाही. त्यावेळी मुक्ताबाईंही नामदेवावर चिडली होती.
ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला सांगितले की,""गोरोबाकाका आळंदीला येतील। निःस्सीम भक्तिभावाने ते परमेश्वराप्रत गेलेले आहेत. जन्मभर त्यांनी मडकी भाजलीत आणि त्यामुळे कच्चे मडके पक्के मडके ओळखण्यात ते वाकबगार आहेत. आता आपण सर्वांचीच परीक्षा त्यांच्याकडून करुन घेऊ. कारण संतपरीक्षा घेण्याचा त्यांचाच अधिकार आहे. ज्ञानदेवाचा हा विचार मुक्ताबाईस पटला. तीही या गोष्टीला तयार झाली. सर्व संतांना ही कल्पना आवडली. पण नामदेवाला या गोष्टीचा थांगपत्ताही कुणी लागू दिला नाही. फक्त नामदेवाला एवढेच कळले की गोरोबाकाका आळंदीस येणार आहेत.
गोरोबा काका आळंदीत येऊन पोहचले. आळंदीत सिध्देश्वराच्या देवळात सर्व संत मंडळी एकत्रित भक्ती रुपाची चर्चा करीत होते. परंतु नामदेव मात्र एकटेच कोपऱ्यात बसून नामस्मरण करीत होते. गोरोबा काका आल्याचे समजताच सर्व संतमंडळीकडून त्यांचे स्वागत केले. ज्ञानेश्वरांनी, निवृत्तीनाथांनी, सोपानदेव व मुक्ताबाई यांनी आणि सर्व संतमंडळींनी त्यांना विनम्रभावे नमस्कार केला. नामदेव मात्र कोप-यात नामस्मरण करीत बसले होते.
गोरोबाकाका यांची नामदेवाकडे नजर गेली. काकांना वाटले की नामदेव नामस्मरणात एकाग्र झाला असावा म्हणून ते थेट नामदेवाकडे गेले आणि नामदेवाच्या पायाचे दर्शन घेतले. नामदेव थोडे गोंधळले. पण अहंकार मनी असल्याने त्यांनी मनाला विचार केला की आपणच थोर भक्त आहोत. त्यामुळे गोरोबांनी आपल्याला नमस्कार केला म्हणून काय झाले. गोरोबाकाका यांनी निर्लेप, निरंकारी भावाने नामदेवाला नमस्कार केला. गोरोबांच्या ठिकाणी असलेल्या समत्वबुध्दीचे सर्वांना कौतुक वाटले. त्यांनी हातपाय धुतले आणि संतमंडळीत येऊन बसले. ज्ञानदेव व गोरोबाकाका यांचा संवाद घडला. त्याने गोरोबाकाका मनोमनी सुखावले.
मुक्ताबाईकडे मिस्किलपणे पाहत ज्ञानदेव गोरोबा काकांना म्हणाले, "" काका तुम्ही आयुष्यभर मडकी भजली आणि आव्यातून मडकी काढून कोणतं मडकं कच्च कोणतं मडकं पक्क याची परीक्षा करीत आला आहात.'' गोरोबांनी ज्ञानेश्वरांना उत्तर दिले की,""ते माझे नियत कर्तव्य आहे ते मी करीत आलेलो आहे.'' त्यावर मुक्ताई म्हणाली,""काका तुम्हाला मातीच्या मडक्याबरोबरच माणसांची मडकी कच्ची आहेत की पक्की हे आपण सहज ओळखत असाल तेव्हा आपण आपल्या अनुभवाच्या थापटण्यानं आम्हा संतमंडळीतील कच्ची मडकी कोणती? व पक्की मडकी कोणती याची परीक्षा घ्यावी. दुरुन हा ज्ञानदेव मुक्ताई गोरोबाकाका यांचा संवाद नामदेव ऐकत होता.
गोरोबाकाकांनी सर्वांचे म्हणणे ऐकून हाती थापटणं घेतले आणि संतपरीक्षा घ्यायला सुरुवात केली. सर्वात प्रथम त्यांनी निवृत्तीनाथाच्या डोक्यावर थापटणं मारलं त्यावर निवृत्तीनाथ काहीही बोलले नाहीत, ज्ञानदेवाच्या डोक्यावर थापटणं मारल्यावर तेही गप्पच हाते, नंतर सोपान, मुक्ताबाई, सावतामाळी, चोखामेळा या सर्वांच्या डोक्यावर थापटणं मारले पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यावर गोरा काकांनी आपले मत दिले की ही सर्व मडकी चांगली भाजलेली आहेत. आता नामदेवाची पाळी आली. गोरोबाकाका नामदेवाकडे वळले आणि नामदेवाच्या डोक्यात थापटणं मारले. त्याबरोबर नामदेव कळवळले आणि डोके चोळीत बसले. त्यावर गोरोबाकाका म्हणाले,""अरेरे, एवढं मडकं तेवढं कच्च निघालं. या मडक्याला अजून भक्तीच्या आव्यात आतून बाहेरुन चांगलंच भाजून काढले पाहिजे.'' संत नामदेवांच्या मनातल्या अहंभावनेवर ही मार्मिक टीका गोरोबांनी केली.
गोरोबांच्या वरील अभिप्रायावरुन सर्व संतमंडळी हसली. नामदेवाला हा अपमान वाटला. त्यांना रडू कोसळले शेवटी ज्ञानदेव नामदेवाजवळ गेले आणि म्हणाले,""तू परमेश्वराचा थोर भक्त आहेस. पण तुझ्या ठिकाणी अहंकारभाव असल्याने समर्पणाचा भाव राहत नाही. आता तू गुरुचा आशिर्वाद प्राप्त करुन घे. त्याशिवाय तुला खरा परमार्थ कळणार नाही'' ज्ञानेश्वरांच्या सांगण्याप्रमाणे नामदेवाने विसोबा खेचरांना पुढे गुरु करुन घेतले.
अशाप्रकारे नामदेवाच्या ठिकाणी असलेला अहंकारभाव गळून गेला. त्यांनी पंढरीत जाऊन विठ्ठलाकडे गा-हाणे सांगितले. विठ्ठलांनी त्यांना सांगितले की,""गोरोबाची कृती संयुक्तिक आहे.'' या प्रसंगातून नामदेवाचा अहंकार गळाला. पण नामदेवासारख्या थोर भक्ताला दुखावल्याचे दुःखही गोरोबाकाकांना झाले. कारण जशी त्यांनी नामदेवावर टीका केली, तशी नामदेवाविषयी त्यांच्या मनात आदाराचीही भावना होती. नामदेवाविषयीच्या आदरयुक्त भावनेचा प्रत्यय त्यांच्या एका अभंगातही येतो, ते आपल्या एका अभंगात म्हणतात,
"कवण स्तुति करु कवणिया वाचे
ओघ संकल्पाचे गिळीले चित्ते।। १।।
मन हे झाले मुके, मन हे झाले मुके
अनुभवाचे हे सुखे हेलावले।।२।।
दृष्टीचे पहाणे परतले मागुती राहिली
राहिले निवांत नेत्रापती।।३।।
म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावे
जीवे ओवाळावे नामयासी।।४।।
परमेश्वराचे स्तवन कोणत्या वाणीने करावे? सुखाचा, समाधानाचा अनुभव इतका उत्कट आहे की मनाची भाषा मुकी झाली. मौनातले सुख घ्यावे. आपले जीवन नामदेवाला वहावे. येथे नामदेव हा शब्द गोरोबांनी परमेश्वर या अर्थानेही वापरला असावा. असे हे संतपरीक्षक गोरोबाकाका!
तेर गावी गोरोबाकाका समाधीस्त :
शालीवाहीन शके ११०० मध्ये अनेक संतांनी अवतार घेतले. अन् भक्तीच्या मार्गाचा प्रसार करुन त्यांनी जनकल्याणाचे दैदीप्यमान असे कार्य केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आजही जनमाणसांच्या मनावर उमटलेला आहे. "ईष्वरनिष्ठांच्या मांदियाळी' ने जनकल्याणासाठी तीर्थयाख केल्यानंतर ते धन्य पावले. त्यानंतर अनेकांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वर, सोपानदेव, चांगदेव, निवृत्तीनाथ, इ. नी समाधी घेतली. मुक्ताई ग्रह्मस्वरुप लीन झाली. या संतांच्या समाधी सोहळ्यास पांडुरंगासंगे गोरोबाकाकाही होते. त्या समाधी प्रसंगांचे वर्णन नामदेव गाथेत नामदेवांनी केलेले आहे ते वाचकांनी वाचावे. पांडुरंगाच्या हस्ते सावतामाळी, नरहरी सोनार, परिसा भागवत, कुर्मा, विसोबा खेचर इ. चारही समाधी सोहळा पांडुरंग हस्ते पार पडला.
अशा प्रकारे वैष्णव समुदायाचा समाधी सोहळा संपन्न झाला. अन् सकल संत समाधीस्त झाल्याने दुरावले. सकलसंत निजधामा गेल्याने गोरोबाकाका मनाने खिन्न झाले. सकल संतांचे अभंग गाऊन पांडुरंग गोरोबाकाकांचे सांत्वन करु लागले. पण गोरोबाकाका विठ्ठलाला म्हणू लागले. संतसंगविना माझे कशातही लक्ष लागत नाही, मनाला समाधान लाभत नाही, संतसंगाशिवाय मला कशाचीही गोडी वाटत नाही, उदा, खिन्न गोरोबाकाका पांडुरंगाच्या मुखाकडे पाहत आणि व्याकुळ होत होते. चैत्र वैद्य दशमी दिवशी गोरोबाकाका खिन्न मनाने विचार करु लागले, ""संतदर्शनाला आता मी पारखा झालो.
संताशिवाय माझे दुसरे कोणीही सोयरे नाहीत. संतसंगतीशिवाय मला दुसरे काही आवडत नाही. संत प्रेमानी मला वेडे केले आहे. संतांच्या प्रेमात मी बांधला गेलो आहे. त्यांच्या प्रेमामुळे मला मी विसरलो आहे.'' पांडुरंगाने गोरोबाची ही स्थिती जाणली आणि गरुडाला सांगून पंढरपुरातून रुक्मिणीसह ज्येष्ठ-श़ेष्ठ अशा वैष्णव भक्तांना तेरला आणावयास सांगितले. भक्त पुंडलिकासह रुक्मिणी सनकदीक, नारद इ. ची दाटी झाली. पांडुरंगाने गोरोबास अलिंगन दिले. भक्त आणि पांडुरंगाची ही भेट पाहून सकलसंतांच्या डोळ्यात आनंदाश़ू उभे राहिले. पताका, टाळ, दिंडीसह संतमंडळीही गंध, चंदन, बेलाची पाने, अक्षता, अर्पूण, निरंजन लावू लागले. प्रत्येकजण संत गोरोबाकाकांना प्रेमभरे भेटू लागले आणि समाधीसाठी आवश्यक असणारी शेज पांडुरंगाने तयार केली. नामाचा गजर करुन इ.स. १३१७ (शके १२६७) साली कृष्णपक्ष त्रैयोदशीस दुपारच्या समयी तेर येथे पांडुरंगानी गोरोबाकाकांना समाधीस्थळी बसविले. तेर येथे कालेश्वर लिंगाशेजारी गोरोबांची समाधी आहे.
अशारितीने श्री गोरोबाकाका यांचे व्यक्तिमत्व, जीवन चरित्र अलौकिक असेच होते. ते परग्रह्म होऊन जीवनमुक्तांचे जीवन जगले. गोरोबाकाकांच्या जीवनचरित्र वाचनाने या जगातील अज्ञानी लोक जितके शहाणे होतील तितके अधिक या भूमंडळातील लोकजीवनातील दुःखे कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर रामनाम जपाने गणिकेचा उध्दार झाला अजामिळाला मुक्ती मिळाली. पापी लोक हरिनामाने तरले हे आपणां सर्वांना ज्ञात आहेच. म्हणून संतशिरोमणी गोरोबाकाका यांच्या जीवनचरित्रातून एकच संदेश घेता येईल, असे वाटते तो म्हणजे, "विठ्ठलमंत्र सोपा असुनी एकेवळी तरी उच्चारावा' या मंत्राने साधक व भाविक भक्तांचे, जनसामान्यांचे जीवनतंत्र सुधारेल. जनसामान्यांना त्यांचे जीवन आदर्श भक्त कसा असावा? यासाठी प्रेरणादायी चैतन्यदायी असे वाटते.
गोरोबाकाका यांच्या कार्याची महती :
श्री.संत गोरा कुंभार यांचे जीवन एका सर्वसाधारण कुटुंबात व्यतीत झाले परंतु त्यांनी आपला भक्तीभाव जपला अन् आपला प्रपंच परमार्थमय करुन टाकला. संसार आणि परमार्थ त्यांनी वेगळा मानला नाही.
श्री.संत गोरोबाकाका यांनी भक्ती आणि नामस्मरण या साधनांच्याद्वारे करणी करे तो नरका नारायण' होईल म्हणजेच "विठ्ठल भक्तच विठ्ठल होऊन गेले' अशी ही पंढरीच्या पांडुरंगाची किमया त्यांनी सर्वांना पटवून दिली. संत गोरोबा संत-मंडळात "वडील' होतेच इतकेच नव्हे तर महाभागवतानाही आदरणीय, वंदनीय होते. संत गोरोबा विरागी पुरुष होते. अनंत, निर्गुण, निराकार अश परब्रह्माचे लौकिक रुप म्हणजे "गोरोबा' म्हणून सर्व संत त्यांना "काका' उपाधी बहाल करतात.पंढरीच्या पांडुरंगाचे नाम महात्म्य सांगताना संत गोरोबा म्हणतात,
"तूझे रुप चित्ती राहो। मुखी तुझे नाम।
देह प्रपंचाचा दास। सुखे करी काम।।
देहधारी जो तो त्याचे। विहीत नित्यकर्म।।
तुझ्या परी वाहिला मी। देहभाव सारा।।
उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा।।
नाम तुझे गोरा। होऊनि निष्काम।।'
गोरोबांच्या ह्या अभंगातून कोणीही अनन्य भावांनी वारकरी पंथात यावे कपाळी अबीर बुक्का लावावा. गळ्यात माळ घालावी आणि पांडुरंगांच नामस्मरण करीत आपला जीवनक्रम चालू ठेवावा. शुध्द अंतःकरणात फक्त भक्तीभावावरुन कळी फुलून द्यावी. म्हणजेच त्या भक्तीचा परिमल सर्वत्र दरवळतो. इतकेच नव्हे तर तो "देवाचा लाडका पुत्र म्हणून सन्मानित होतो' त्यापैकीच गोरोबाकाका होत. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे "संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे सदोदीत.' संत गोरोबा संसारात राहत होते. तरीही त्यांची पांडुरंग चरणी एकनिष्ठा होती. "कासयासी बहु घालिसी मळण. तुज येणेविण काय काज. एकपणे एक एकपणे एक. एकाचे अनेक विस्तारले' हा त्यांचा पारमार्थिक भाव होता
मराठी संतांनी भक्तिमार्गाची कास धरुन भागवत धर्माचा पुरस्कार केला. माणसे सुधारावीत त्यांच्यातील मानवाची, माणुसकीची पातळी उच्चतम करावी, याच तळमळीने संत उपदेश करीत असतात. सात्त्विकपणा, शुध्दाचरण, सद्गुण यांचा विकास आणि श़ध्दामय जीवन याविषयी सर्व संतमंडळींचा स्थायीभाव होता. स्वतः संत व्हावे सभोवतालच्या लोकांवर संतपणाचे संस्कार करावेत. संतपण समाजात पसरावे अशी तळमळ मराठी संतांना होती. आणखी संतांचे विशेष सांगावयाचे म्हणजे "संत जनहिताची मनोगते, संत श़ध्देची अंतःकुजिते, सदा संत देती स्फुर्ती, संत निर्वाणीचे सोबती, संत निर्गुणाचे गुणाकार, संत भवरोगाचे भागाकार, संत पाप तभसी भास्कर, संत वैद्य सर्वांना हे सर्व विशेषभाव इ. ज्यांच्या जीवनचरित्रात आढळतात. त्यापैकी संत शिरोमणी गोरोबाकाका एक होत.
संत गोरोबांनी भागवत धर्माची प्रतिज्ञा भक्तीचा प्रचार व प्रसार करणे. त्यांनी स्वतःचा पारंपारिक कुंभार व्यवसाय करीत संसारही केला आणि संतपणाही सांभाळीत भागवत धर्माची प्रतिज्ञा पार पाडली. भागवत धर्माच्या या प्रतिज्ञेशिवाय पंढरीचा वारकरी मनुष्यच ठरत नाही. जो उगवला दिवस देवाला स्मरुन सार्थकी लावतो तोच वारकरी ठरतो. मग तो आपल्या घरीदारी, नियत कर्तव्यकर्मात, अरण्यात, डोंगर द-याखो-यात कोठेही असो. जे स्वार्थनिष्ठ, लोभी ते वारकरी संत नाहीत. निरनिराळ्या सांप्रदायिक स्वरुपाचे कोणी मानवमात्राच्या कल्याणाचा ध्यास घेणारे, त्याचाच सतत विचार करतात तेच साधुसंत होत. अशा साधुसंतांच्या पुण्याईने समाज साजिवंत राहत असतो. असा महाभाग संसारीही असू शकतो. आपल्या अश़ितांचे भयापासून संरक्षण करावे हा क्रम गृहस्थाश़मी संत सतत पाळत असतात संत गुणदोषांची पारख करुन जनसामान्यातला परमेश्वर जागा करण्याचा प्रयत्न श़ध्देने करतात. याचबरोबर जनकल्याणाचे कार्य निरपेक्ष भावनेने करतात. या कार्यालाच यज्ञ म्हणतात. "जे जे आपणाशी ठावे. ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करुन सोडवे सकळ जन..' या उक्तीप्रमाणे ते संत ज्ञानयज्ञ करतात. जनयज्ञ करतात तो त्यांचा पुरुषार्थ अपूर्वच होय. संतांचे अभंग वाङ्मय जे अभंग असते. ते भाविकांस भेटले की, तो आपण होऊनच संतांचा गुणगौरव करतो. संत मात्र रसिक, भाविक,वाचक, अभ्यासक आणि समिक्षकांच्या "निंदा स्तुतीवर लावोणी फाटी' म्हणजे त्यांच्या टीका टिपणीचा विचार न करता त्यांचा ज्ञानयज्ञ आणि जनयज्ञ आपण असेतोपर्यंत व पश्चातापही सातत्याने पाळलेला असतो. संत शिरोमणी गोरोबाकाका यांची अभंग संख्या कमी असली तरी अभंगवाणीत आढळणारी उत्कटता, भावसमृध्दी यामुळे संतमेळ्यातील त्यांची अभंगरचना त्यांच्या कर्तृत्वाची ग्वाही देणारी आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे अभंग त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. त्यांच्या अभंगवाणीतून साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, उत्कट भक्तीचा अनुभव, अनुभवाची संपन्नता, पवित्र आणि समृध्द असा ज्ञानानुभूतीचा प्रत्यय ही त्यांच्या अभंगवाणीतून प्रत्ययास येतो
नुसतीच व्यर्थ बडबड करणा-यांच्या निरर्थकतेला रामराम करुन अशा आजच्या जमान्यात "देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो.' अशा "निश्चयाचा महामेरु', "आवडता डिंगरु केशवाचा' असे संतशिरोमणी गोरोबाकाका समाजाच्या खालच्या थरातला एक कुंभार आपण ब्रह्मांडाशी एकरुप झाल्याचा असा विलक्षण अनुभव घेतो की, जो योग्यानासुध्दा दुर्मिळ असतो. अद्वैताचा हा अवर्णनीय आनंद आपल्या दरिद्री प्रपंचात राहूनच त्यांनी प्राप्त केला आहे. अभेदाचे बौध्दिक ज्ञान वेगळे, हे सुखाचे सुख, हे भाग्याचे सौभाग्य, हा अत्यानंदाचा आनंदकंद, गोरोबाकाका आपल्या भक्तिभाव बळावर मिळवू शकले. अन् "मौनं सर्वार्थ साधनम्' असे ब्रीद उरी बाळगणाऱ्या शीलवान कर्मयोग्यास अवघे पन्नास वर्षाचे आयुष्यमान लाभले होते. संत गोरोबाकाकांनी अनंत काळाला आपल्या जीवनचरित्राचा आणि कार्याचा, कर्तृत्वाचा जो आदर्श निर्माण केला होता तो इतिहासाला कदापिही विसरता येणार नाही.
लेखक- डॉ. प्रकाश कुंभार