Tuesday, 12 June 2012

शेरलॉक होम्स - रेड हेडेड लीग





त्या दिवशी वॉटसन होम्सकडे आला तेव्हा त्याच्याकडे एक क्लायंट येऊन बसलेला होता. त्या क्लायंटची कुठली गोष्ट वॉटसनच्या नजरेत सर्वप्रथम भरली असेल तर त्याचे तांबडेलाल केस! होम्सने त्या क्लायंटची - मि.विल्सन त्यांचं नाव- आणि वॉटसनची ओळख करून दिली. विल्सन साहेबांची हकीकत फारच विलक्षण होती. विल्सन यांचा तारण घेऊन पैसे कर्जाऊ देण्याचा धंदा होता. त्यांच्या कोबर्ग स्क्वेअर मधल्या घरात राहूनच ते हा व्यवसाय एका मदतनिसाच्या साहाय्याने करत असत. धंदा उत्तम नाही तरी ठीकठाक चालला होता. विल्सन आपला मदतनीस व्हिंसेंट स्पॉल्डिंग यावर खूष होते कारण तो कामाला तर चांगला होताच पण मार्केट रेट च्या जवळजवळ निम्म्या पगारात तो हे काम करत होता. त्याची एकच खोड विल्सनना आवडत नव्हती. ती म्हणजे त्याचा फोटोग्राफीचा छंद. उठसूट तो फोटो काढायचा आणि मग तळघरात जाऊन ते डेव्हलप करत बसायचा. पण त्याच्या कामात काही कसूर होत नसल्याने विल्सनना तक्रारीला जागा नव्हती.

एक दिवस व्हिंसेंट एक जाहिरात घेऊन आला. लाल केसांच्या लोकांच्या संघटनेने प्रसिद्ध केलेली ती जाहिरात होती. एक रिकामी जागा भरायची होती. आवश्यक अर्हता - लाल केस. बाकी अटींच्या बाबतीत काटेकोरपणा नव्हता आणि पगार तर फारच आकर्षक; आठवड्याला चार पौंड!! इच्छुकांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावलं होतं. विल्सनना जायची खूप इच्छा झाली आणि व्हिंसेंटने पण त्याला दुजोरा दिला. दोघे मुलाखतीच्या जागी पोहोचले. विल्सन साहेबांचा नंबर आला. लाल केसांच्याच एका माणसाने मुलाखत घेतली. जुजबी प्रश्न विचारले गेले. विल्सनने केसांचा टोपबीप तर घातला नाही याची खात्री करून घेतली कारण नोकरी फक्त लाल केसवाल्यांसाठीच होती! विल्सनची निवड झाली. दुसऱ्या दिवशी कामावर रुजू होण्यास सांगितले. कामाच्या वेळा -सकाळी १० ते दुपारी २. म्हणजे विल्सनना संध्याकाळी आपल्या धंद्यासाठी वेळ देता येणार होता. इतर वेळात व्हिंसेंट होताच. काम काय हे सांगितल्यावर मात्र विल्सन अवाक झाले. काम होतं एन्सायक्लोपीडीया ब्रिटानिका उतरवून काढणे! विल्सनना हे जरा चमत्कारिक वाटलं पण दर आठवड्याला मिळू घातलेले चार पौंड दिसत होते! म्हणून ते काही न बोलता दुसऱ्या दिवसापासून कामावर जाऊ लागले.

दोन महिने असे गेले आणि आज जेव्हा विल्सन कामावर गेले तेव्हा कचेरीला कुलुप आणि तिथे पुढील सूचना लिहिलेली : लाल केसांच्या लोकांची संघटना बरखास्त केली आहे. आजूबाजूला चौकशी केली पण कुठूनही काही समाधानकारक माहिती मिळाली नाही. मग विल्सन सरळ होम्सकडे आले.

होम्सने विल्सनना आणखी काही प्रश्न विचारले. मदतनिसाच्या दिसण्याचे वर्णन ऐकल्यावर होम्सला त्यात काही तरी ओळखीचे वाटले. "मी तुमची केस घेत आहे. आज शनिवार आहे, सोमवार पर्यंत मी तुम्हाला निश्चित काही तरी सांगू शकेन." असे म्हणून होम्सने विल्सनना निरोप दिला.

नंतर होम्सने वॉटसनला घेऊन एका संगीताच्या कार्यक्रमाला जाण्याची टूम काढली. पण तिथे जाण्यापूर्वी ते कोबर्ग स्क्वेअर मध्ये गेले. विल्सन साहेबांचे घर सिटी अँड सबर्बन बँकेच्या पिछाडीस होते. होम्सने विल्सनच्या घराचे दार वाजवले तेव्हा विल्सनचा मदतनीस बाहेर आला. होम्सने  त्याला विचारले "इथून स्ट्रँडला कसं जायचं हो?" त्याने ते सांगितले व आत गेला. पत्ता विचारणे हा होम्सचा हेतू नव्हता हे वॉटसनने ओळखले. त्याबद्दल विचारणा केली असता होम्स म्हणाला "मला त्याची विजार गुडघ्याशी कशी आहे ते पहायचे होते." वॉटसनला अशा उत्तरांची सवय होती! पण कोपऱ्यापासून विल्सनच्या घरापर्यंत जाताना  होम्स मधूनमधून काठी का आपटत होता हे मात्र त्याला कळले नाही. संगीताच्या कार्यक्रमानंतर दोघे आपापल्या दिशेला जायला निघाले. होम्सने वॉटसनला रात्री १० वाजता घरी येण्यास सांगितले आणि येताना पिस्तूल आण असेही सांगितले.

रात्री १० वाजता वॉटसन जेव्हा होम्सच्या घरी पोहोचला तेव्हा तिथे स्कॉटलंड यार्डमधील इन्स्पेक्टर जोन्स आणि सिटी अँड सबर्बन बँकेचे डायरेक्टर आधीच आलेले होते. काही मिनिटातच चौघेजण बाहेर पडले आणि थोड्याच वेळात ते बँकेच्या तळघरात पोहोचले. तिथे काही पेट्या रांगेने लावून ठेवलेल्या होत्या. त्या एकेका पेटीत सोन्याची दोन दोन हजार नाणी आहेत असे डायरेक्टर महोदयांकडून कळले! चौघेही अंधारात बसून राहिले. होम्स म्हणाला विल्सनकडे सर्व निजानीज झाल्यावरच 'ते लोक' हालचाल करतील. तोपर्यंत आपल्याला अंधारातच आवाज न करता बसायला हवे.

बऱ्याच वेळानंतर जमिनीतून एक प्रकाशाची तिरीप बाहेर आली, त्या पाठोपाठ एक हात. त्या हाताने फरशी बाजूला केली आणि एक माणूस वर आला. तो व्हिंसेंट होता! त्याच्या पाठोपाठ एक लाल केसांचा माणूस वर आला पण ह्या चौघांवर त्यांची नजर जाताच त्यांचं धाब दणाणलं. लाल केसवाला (तो विल्सनचा बॉस) पटकन खाली पळून गेला. पण व्हिंसेंट स्पॉल्डिंग उर्फ जॉन क्ले याच्या हातात जोन्सने बेड्या अडकवल्या. त्याचा पूर्वेतिहास होम्स आणि जोन्स यांना माहीत होता. लाल केसवाला पळून गेल्याचे कोणाला काही वाटले नाही कारण दुसऱ्या दारात त्याच्या स्वागतासाठी जोन्सने हवालदार उभे केलेले होतेच.

अशा रीतीने होम्सच्या हुशारीने बँकेवरचा मोठा दरोडा टळला आणि अनेक वर्षे सापडत नसलेला अट्टल दरोडेखोर, खुनी, बदमाश जॉन क्ले हा पण पकडला गेला.




No comments:

Post a Comment