गर्दीनं वेढलेल्या शहरांत घरं छोटी झाली. घरामागचं अंगण तर फक्त आठवणीतच उरलं. घरात माणसं तीन-चार तरी नोकरी-कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या बाईला रोजच्या धावपळीत एक अख्खा दिवस अपुरा पडू लागला. चारचौघींनी एकत्र येऊन करायच्या गोष्टींना तर सवडच उरली नाही. घरातल्या पापड-कुरडयांच्या डब्यांची, लोणच्यांच्या बरण्यांची जागा ‘घरगुती’ विशेषणांच्या विकतच्या पाकिटांनी घेतली. आता तशी जागा नाही, पूर्वीसारखा वेळ नाही या सबबींखाली एकेकाळची आई-आजी, लेकीबाळींच्या लगबगीनं गजबजलेली ‘वाळवण’ संस्कृती हरवत गेली..
उन्हाळ्याची चाहूल लागल्यानं मी माझ्या नेहमीच्या दुकानात गेले आणि खास उन्हाळ्याच्या सामग्रीची यादी सांगितली. गुलकंद, चटक सुपारी, कोकम सरबत, एक दोन मसाल्याची पाकिटं असं किरकोळ सामान घेऊन दुकानदाराला बिल करायला सांगितलं. त्यानं


खरंच, किती धम्माल असायची या एप्रिल मे महिन्यात! माहेर मुंबईचं, मुलुंडचं. तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची मुंबई आतासारखी नव्हती. आपआपली दारं लावून फ्लॅटमध्ये बंदिस्त असलेली.. आमची नात्यातलीच दोन दोन खोल्यांची चार बिर्हाडं. पुढं मागं मोठ्ठं अंगण. मागच्या दारात आंबा, शेवगा, पारिजातक नि झाडून सगळी फुलझाडं. अगदी शुभ्र कापूस देणारं कापसाचं झाडही होतं. पुढच्या दारी जांभळाचं निळं-जांभळं झाड होतं. परीक्षा संपल्या की वाळवणांची
गडबड उडायची. कुरडयांसाठी गहू तीन दिवस भिजत घालायचे. मग त्याचं सत्त्व काढून ते निवळत ठेवायचं. दुसर्या दिवशी आधणात तेल, मीठ घालून ते पांढरेशुभ्र सत्त्व हळूहळू ओतायचं. आई रवीनं भराभर ढवळायची. गुठळी होता कामा नये म्हणून तिची उडालेली धांदल अक्षरश: तिचा घाम काढायची. मग तुकतुकीत असा चिकाचा गोळा तयार व्हायचा. लाल लाकडी सोर्यामध्ये आई गरमागरम चीक भरून द्यायची. आम्ही सख्ख्या चुलत बहिणी त्या बाजेवर अगदी निगुतीनं आई-आजीनं शिकवल्याप्रमाणे सोर्या गोल गोल फिरवून दळदार
कुरडईचं फुल काढायचो. अंगणातून स्वयंपाक घरापर्यंत जाताना सोर्या उघडून त्याच्या तळाशी राहिलेला चीक गट्टम करून टाकायचो. आईने तेवढा ’लॉस’ गृहीत धरलेला असायचा. कुरडया घालून पूर्ण झाल्या की अधिकृतपणे चीक वाटीत घेऊन खाल्ला जायचा. मग दुपारी एका हातात पुस्तक व एका हातात धुणं वाळत घालायची उंच काठी घेऊन मागच्या दारात पायर्यांवर राखणीला बसायचं. कावळ्यांना उडवून लावायचं. आई आडवी झाल्याची खात्री झाल्यावर मधली एखादी, बाजूनं वाळत आलेली पण आत ओली असलेली कुरडई उचलून, मावली नाही तरी अख्खीच्या अख्खी तोंडात कोंबायची. मग पुन्हा राखण सुरू. दुसर्या दिवशी त्या उलटून परत कडकडीत वाळवायच्या. नि घट्ट झाकणाच्या पत्र्याच्या डब्यात भरून ठेवायच्या.


नंतर पापडाचा कार्यक्रम असायचा. मोठी काकू पोह्याच्या पिठाचा गोळा कुटून कुटून अगदी चमकदार करायची. त्या लुसलुशीत गोळ्याच्या
कधी एकदा लाट्या पडतायत असं होऊन जायचं. पापड लाटण्यासाठी हात शिवशिवायचे. काकू दोर्यानं पटापट एकसारख्या लाट्या पाडायची. आम्ही पोळपाट लाटणं घेऊन तयार असायचोच. ’छान गोल लाटा गं’ आजीचं बारीक लक्ष असायचं आमच्यावर. पहिले पाच-दहा पापडांचं तर परीक्षणही व्हायचं. लाटलेले पापड वर्तमान पत्रावर टाकले जायचे. जरा वेळानं पापड लाटायचं कौतुक संपायचं. कंटाळा यायचा. लाटलेल्या पापडाच्या मोबदल्यात लाट्या घेऊन स्वयंपाकघरात जायचं. एका कॉमन तेलाच्या वाटीत लाट्या भसकन बुडवून त्या जिभेवर ठेवताना काय सुख मिळायचं म्हणून सांगू ! ती तिखटाची, पापडखाराची अन् पोह्याची चव एकत्र जिभेवर रेंगाळत राहायची. माझी दुसरी काकू सालपापडया फार सुंदर करायची. कुकरमधून एक वाफ देऊन बाहेर काढल्या की सुईनं अगदी अलगद न फाडता त्या काढायच्या. सॉलिड कौशल्य लागतं बरं का त्याला. ती सालपापडी इतकी पातळ असायची ना! जरा जरी सुईचा अंदाज चुकला की फाटलीच म्हणून समजा. असाच बटाट्याचा कीस, साबुदाण्याच्या पापड्या, साबुदाणा-बटाट्याच्या कुरडया, सांडगे अन् सांडगी मिरच्या व्हायच्या. पण त्यात खायला काही मिळायचं नाही. त्यामुळे त्या कामात फारसा रस नसायचा. फक्त आईच्या धाकानं मदत मात्र करावीच लागायची. शेवयांचं काम पूर्णपणे आज्जीकडे असायचं. अतिशय अवघड आणि कौशल्याचं काम. आईसकट आम्ही सर्व जणी म्हणजे तिच्या असिस्टंट असायचो. धुणं वाळत घालायची काठी स्वच्छ धुवून घेऊन ती आडवी ठेवून तिच्यावर आज्जी लांबच्या लांब शेवया घालायची. आज्जीच्या हातांच्या चपळ हालचाली आम्ही मुग्ध होऊन पाहत असू. पण ते कौशल्य काही आम्ही आत्मसात केलं नाही. आणि शेवया फक्त आजी लोकांनाच जमतात, असा समज
करून घेतला. मग हळदीचा -तिखटाचा नंबर लागायचा. लालभडक (ब्याडगी की काय असायची ते तेव्हा कळायचं नाही.) मिरच्यांची देठं काढायची. नि त्या व्हरांड्यात वाळत टाकायच्या. जवळनं गेलं तरी खाट नाकात जायचा. हळकुंड बिचारी निमूटपणे वाळत पडलेली असायची. त्यातली एक-दोन ‘लेकुरवाळी’ हळकुंड बाजूला काढून ठेवली जायची. मिरच्या चांगल्या खळखळ वाजायला लागल्या म्हणजे अगदी खडखडीत वाळल्या, असं समजायचं. मग वेगळ्या गिरणीतून हळद तिखट दळून आणलं जायचं. ते काम मात्र आमच्याकडे नसायचं. कारण त्या गिरणीवाल्याला असं दळ नि तसं दळ असं काहीतरी स्पेशल सांगायचं असायचं. दळून आलेलं ताजं हळद तिखट पत्र्याच्याच डब्यात चार सहा बिब्बे घालून ठेवून दिलं जायचं.


शिकेकाईची अख्खी सरबराई आई करायची. एखादा आठवडाभर तरी शिकेकाईच्या शेंगा उन्हात ठेवायची. संत्र्यांची साल, नागरमोथा, लिंबाची साल, रिठा, गव्हातला कचरा असं काय काय घालून आई शिकेकाई घरी कुटायची. मागच्या अंगणात उखळ ठेवून, काळं मुसळ एकेका हातात पेलत शिकेकाई कुटणारी आईची ती कष्टाळू मूर्ती आजही तितक्याच लख्खपणे आठवते. मागच्या अंगणात आई शिकेकाई कुटत असली आणि आम्ही पुढच्या अंगणात असलो तरी सटासट शिंकायला लागायचो. इतकी निर्भेळ अन् ताजी असायची ती. मग आई एका वेगळ्या चाळणीनं चाळून डब्याला कागद लावून घट्ट झाकणाच्या पत्र्याच्या डब्यात ठेवून द्यायची. तेव्हा शाम्पू नव्हते. न्हायाच्या
वेळेस शिकेकाई उकळायची. वरच्या पाण्यानं केस धुवायचे नि चोथ्यानं तळपाय, कोपरं, पाठ स्वच्छ करायची. आम्हा सगळ्या बहिणींचे केस अगदी दृष्ट लागण्यासारखे होते. दाट, मऊ नि काळेभोर. शिकेकाईनं न्हाल्यावर केस मस्त सुगंधी अन् सळसळीत होऊन जायचे. तेव्हा या केसांचं सौंदर्य वगैरे काही कळायचं नाही. पण मुठीत केस घेऊन हुंगताना आई जाम ग्रेट वाटायची.

घरच्या कैर्यांचं लोणचंही एक मोठा सोहळाच असायचा, वाळवणाची सांगता करणारा.., घरी लोणच्याचा मसाला करून केलं गेलेलं लोणचं वर्षभरही हवंहवंसं असायचं. कैर्यांचे तुकडे करून द्यायला एक माणूस यायचा. त्याच्या वेगळ्या विळीवर तो खटाखट बाठ अलगद बाजूला काढत एकसारखे कैर्यांचे तुकडे करायचा. मोठय़ा परातीत लोणचं कालवून त्याच्यावर गार केलेली खमंग फोडणी घालून, दादरा बांधून काचेच्या फिरकी असलेल्या बरणीत ते बंद व्हायचं. या लोणच्याच्या बाबतीत आई -आजी कडक सोहळं पाळायच्या जे तेव्हा अगदी अंगावर यायचं. आजही जेव्हा केव्हा मी माझ्या घरी लोणचं घालते तेव्हा आपण केलेली मेहनत वाया जायला नको म्हणून भीत भीत ते पाळते. पण त्यात काही अर्थ नाही हेही कळत असतंच.
चारही काकवा व आम्ही सगळ्या बहिणी बहिणी एकत्र येऊन ही वाळवण करायचो हे सारं स्वप्नवतच वाटतं आता. आईसकट तेव्हा नोकरी करणारं कुणीच नव्हतं. तसं म्हटलं तर घर, नवरा, मुलं-बाळं हेच त्यांचं विश्व होतं. पण किती खूश असायच्या त्या सार्या जणी ! कुरडया
घालताना, पापड लाटताना एकमेकींशी किती बोलत असायच्या. काय बोलायच्या ते तेव्हा कळायचं नाही. पण बोलण्याच्या चढ-उतारावरून, आवाजाच्या हलकेपणावरून, मध्येच निर्मळ हसणार्या चेहर्यांकडे बघून त्या गप्पा एकमेकींना सुखावणार्या आहेत हे नक्की कळायचं. या सर्व पदार्थांची एकमेकींकडे देवाणघेवाण तर व्हायचीच, पण आम्ही कोणत्याही काकूकडे जाऊन कधीही, काहीही खायला मागत असू शकू. काही नाही तरी मायेच्या हातांनी भाजलेले खमंग लालसर शेंगदाणे नि पिवळा गोड गुळाचा खडा नक्की मिळायचा आमच्या इवल्याशा हातावर. ’माझ्या पुरतं’ ’माझं’, ’माझ्यासाठी’ हे शब्द फार उशिरा कानावर पडले. लहानपणापासून ऐकत आलो ते ’आम्ही’, ’आमचं ’ , ’आमच्यासाठी ’ हेच शब्द नि वाढलोही त्याच शब्दारासांवर. शिस्तीचे, कामाचे, स्वच्छतेचे, सुगरणपणाचे धडे याच सगळ्या जणींनी शिकवले. त्यांचा आम्हाला धाक होता पण भीती नव्हती. प्रेम होतं पण आंधळी माया नव्हती. वाळवणाची राखण करताना, आपण जे मेहनतपूर्वक निर्माण करतो ते कसं राखायचं याचं बाळकडूच मिळालं जणू ! आमच्या शाळेच्या सुट्या कधी नकोशा वाटल्या नाहीत कुणाला. उलट सुट्यांत आम्हाला घर आणि घराला आम्ही अगदी हवंहवंसं वाटायचो.

काळाच्या ओघात नि रेट्यात ते सगळं सुख नाहीसं होऊन गेलं. अंगण गेलं, बाज गेली. नि वाळवणंही गेली. त्या वाळवणाबरोबर एकमेकींशी सहज होणार्या गप्पाही गेल्या. आता गप्पांसाठी भिशी नाहीतर किटी पार्टी करावी लागते आम्हाला. जुन्या वाड्यांची, घरांची अपार्टमेंट झाली. बंद दाराआडची एक वेगळीच संस्कृती उदयाला आली. त्या संस्कृतीनं मी, माझं, माझ्यापुरतं ही ’म’ ची बाराखडी निक्षून
शिकवली. आम्ही, आमचं, आमच्यासाठी ही ’अ’ ची बाराखडी मनाच्या पाटीवरून कधी पुसली गेली ते कळलंही नाही. साधे दोन गोड शब्दही बोलणं जिथे दुरापास्त, तिथे पापड लाटायला कोण बोलावणार आणि कोण येणार? एकत्र कुटुंब विभागलं गेलं. भावंडांमध्ये आपसूक निर्माण होणारं प्रेम या विभक्त कुटुंबामुळे संपुष्टात आलं. आणि आता भावंडं असतही नाही म्हणा. मनुष्यबळ कमी झालं. घरी काही करण्याची गरजही संपली. बाजारात ’घरगुती’ असं सारं काही मिळू लागलं. हे जेव्हा घरी येऊन खाऊ लागलो तेव्हा तर आई-आजीची आठवण प्रकर्षाने येऊ लागली. त्या घरगुती पदार्थांमध्ये माझ्या त्या घराची चव कुठेच नसायची. पण छान, चविष्ट म्हणून हे पदार्थ स्वीकारण्यावाचून पर्यायच नसायचा. बदलत्या काळानं स्त्रियांना नोकरी करायला लावलीच होती. त्या नोकरीच्या जू खाली बाई शिणत नि वाळत गेली. तिला स्वत:कडे बघायला नि स्वत:चा डबा भरायलाही वेळ मिळेनासा झाला. ती वाळवणं कुठून घालणार ! पुढच्या दारानं सारी ’भौतिक’ सुखं अगदी पत्ता विचारीत विचारीत आली. आणि मागच्या दाराने शाश्वत मानसिक सुखांनी जुन्या भाडेकरूप्रमाणे त्या भौतिक सुखांसाठी जागा खाली केल्या. भौतिक सुखं फारशी अंगी न लागल्यामुळे माणसं आरोग्याच्या बाबतीत जरा
जास्तच जागरूक झाली. ’तळलेलं नको’ या एका वाक्याच्या फटक्यासरशी पापड, कुरडया लांब फेकल्या गेल्या. अगदीच सणावारी, आयत्या आणलेल्या (घरगुती) पाकिटातल्या पापड, कुरडया पानाची शोभा वाढवू लागल्या. तमाम स्त्री वर्गाप्रमाणे मी पण या बदलाच्या रेट्यात सापडलेली आहे.. खरंच तीस-पस्तीस वर्षांत केवढा बदल झाला ! एक पूर्ण पिढी बदलली. या बदलांमुळे छोट्या छोट्या आनंदाला घरातली बाई तर मुकलीच, पण इतर सारेही त्या आनंदापासून वंचित झाले. दोष कुणाचाच नाही. कारण ‘बदल‘ हीच तर कायम स्थिर असणारी गोष्ट आहे.


रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरनी एकामागून एक येणार्या आठवणींना खीळ घातली.. ऊन तापत होतं. घरी आले. बाकीचं सामान भरलं. वाळवणांच्या आठवणींनी पछाडलेली मी घरी गेल्या गेल्या पापड, कुरडयांचं पाकीट फोडलं. उन्हाची वेळ होती तरी तेल घालून गॅसवर कढई तापत ठेवली. कात्रीनं त्या लाल भडक पापडाचे चार तुकडे केले. चतकोर तुकडा तापलेल्या तेलात सोडला. खरंच कढईभर फुलला. झार्यानं निथळून ताटलीत काढला. कुरडई पण तळली. तीही अशीच सरकन फुलली. टेबलावर ताटली ठेवून खुर्ची ओढून खुर्चीवर बसत, पापडाचा तुकडा मोडत परत आई आजीबरोबर घराच्या अंगणात वाळवणाच्या लगबगीत हरवून गेली.
-------------------- अर्चना बापट
No comments:
Post a Comment