गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत
क्रुरपणे त्वचा सोलली जातीय दुधी भोपळ्याची
सपास्सप सुरी चालवत कांद्याची कापाकापी चाललीय
डोळ्यांची आग-आग होतोय........
शहाळ्या-नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय
हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी
तडतडतेय मोहरी........
हा अखेरचा फडफडाट कढीपत्त्यांच्या पंखांचा उकळत्या तेलात
आणि तिखट टाकलं जातंय भाजीच्या अंगावर डोळ्यात........
धारेवर किसली जातायत गाजरं
पिळवणूक चाललीय आंब्याची
सर्वहारा बनलीय कोय......
वरवंट्याखाली चिरडतेय मीठमिरची
बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात
फड्क्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय
चक्का बनण्यासाठी......
हे भरडले जातायत गहू
लाहीलाही होतीय मक्याची ज्वारीची
भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात
पोलीस नुस्तेच बघतायत......
संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्रं
उतरवली जातायत दिवसाढवळ्या
मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी
आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर
हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी......
------------------- अशोक नायगावकर
No comments:
Post a Comment