गोड खाण्याचं टेम्प्टेशन एकदा का झालं की ते जाम जोरात होतं. सध्या
अधूनमधून खाण्यावर कंट्रोल ठेवण्याचं भूत मानगुटीवर बसत असल्यामुळे गोडाशी
संबंध संपल्यात जमा आहे. हो.. मोडायचाच निग्रह तर मासेमटणासाठी मोडावा,
गोडासाठी नको..
पण आज पोराचा बालहट्ट झाला..
मुळात झालं असं होतं की मी माझ्या शाळकरी वयात रुचिराकृपेने एक
चॉकलेटची पाककृती करायचो. ती एकदम जमून गेली होती. माझे बाबा मी बनवलेल्या
चॉकलेटचं ताट रिकामं करुन टाकायचे. मग माझी कॉलर ताठ.
बाबा गेल्यावर बरीच वर्षं, बरीच म्हणजे वीसेक वर्षं हे बनवलंच नाही. मग
मलाच पोरगं झालं तेव्हा बनवलं. त्याला न कळत्या वयात ते तितकंच आवडलं
जितकं माझ्या बाबांना आवडायचं. तसाही एरवी बर्याचदा तो माझा बाप
असल्यासारखा वागत असतोच. म्हणून मलाही बाबांना परत एकदा चॉकलेट करुन
दिल्याचं समाधान मिळतं. म्हणून मग हे पुन्हा बर्याचदा बनवलं जायला लागलं.
हे चॉकलेट फाईव्ह स्टार किंवा डेअरी मिल्कसारखं गुळगुळीत मऊ नाही. ही
तर चॉकलेटची वडी. पण तिचं वैशिष्ट्य असं की ती खूप खुटखुटीत आणि खमंग
असते. तुम्ही करुन पहा, तुम्हालाही कदाचित एकदम आवडेल.
पहिल्यांदा खाली दाखवलेलं सामान गोळा करा:
-एक वाटी साखर, खूप गोड आवडत असेल तर दीड वाटी.
-एक वाटी मिल्क पावडर. नेसले एव्हरीडे अत्यंत रेकमेंडेड. शक्यतो दुसरी नकोच.
-एक वाटी लोणी. घरच्या शुभ्र लोण्याने अनेकदा ही कृती केली पण नंतर शोध लागला की अमूल बटरने खूप जास्त अफलातून स्वाद येतो. त्यामुळे एक पॅक अमूल बटर.
-ड्रिंकिंग चॉकलेट पावडर किमान सहा चमचे. कितपत डार्क हवंय त्यावर सात किंवा नऊ चमचेही घेऊ शकता. प्युअर कोको वापरलात तर तो कडू असतो. तो चारच चमचे घ्या.
-आवडत असले तर तीनचार काजू आणि बेदाणे. नसले तरी चालेल.
-एक वाटी मिल्क पावडर. नेसले एव्हरीडे अत्यंत रेकमेंडेड. शक्यतो दुसरी नकोच.
-एक वाटी लोणी. घरच्या शुभ्र लोण्याने अनेकदा ही कृती केली पण नंतर शोध लागला की अमूल बटरने खूप जास्त अफलातून स्वाद येतो. त्यामुळे एक पॅक अमूल बटर.
-ड्रिंकिंग चॉकलेट पावडर किमान सहा चमचे. कितपत डार्क हवंय त्यावर सात किंवा नऊ चमचेही घेऊ शकता. प्युअर कोको वापरलात तर तो कडू असतो. तो चारच चमचे घ्या.
-आवडत असले तर तीनचार काजू आणि बेदाणे. नसले तरी चालेल.
साखर एका विस्तीर्ण कढईत घ्या. आवेशाने ढवळ ढवळ ढवळायला पुष्कळ वाव हवा. छोटी कढई नको.
त्यात साखर जेमतेम भिजण्याइतकं पाणी अतिशय बेताने घाला. साखरेला लगेच
पाणी सुटत असल्याने एकदम भसकन पाणी घालू नये हे वेगळं सांगायला नको. पाणी
जास्त झालं तर तितका जास्त वेळ आटवत बसून हाताला रग लागेल.
दूधभुकटी आणि ड्रिंकिंग चॉकलेट किंवा कोको पावडर एकत्र करुन घ्या.
एव्हरेडीखेरीज अन्य दूधभुकटी असेल तर सरळ चाळणीतून पाडून घ्या म्हणजे एकदम
सुंदर मिश्रण होईल. चाळणीची स्टेप फक्त स्मूथनेससाठी आहे. टाळली तरी चालेल.
साखरेच्या कढईखाली ग्यास पेटवा. मध्यम आचेवर पाकाला उकळी येऊ द्या. मधेमधे घोटत रहा आणि करपून कॅरेमलाईज होऊ देऊ नका.
सगळी साखर विरघळली आणि उकळता पाक जरा घट्ट वाटायला लागला की त्यात
मिल्क पावडर आणि ड्रिंकिंग चॉकलेट पावडरचं मिश्रण घाला आणि तातडीने
ढवळायला सुरुवात करा.
आता गुठळ्या होऊ न देणं, मिश्रण बाजूला न चिकटू देणं, करपू न देणं हे
सगळं अत्यावश्यक असल्याने फोटू काढायला दुसर्या कोणालातरी बोलवा.
पोराबाळांना काय बनतंय ते उंच उचलून दाखवायचं असेल तर आत्ताच पटकन दाखवून
घ्या. कारण आता सटासट ढवळण्याचा अखंड कार्यक्रम चालू होतोय.
त्या पाघळलेल्या रटरटत्या मिश्रणात बटर घाला आणि त्याला विरघळताना बघत बघत एक "सिनफुल फीलिंग" घ्या.
मिश्रण दहाएक मिनिटं ढवळत ढवळत मध्यम आचेवर ठेवलं की हळूहळू घट्ट व्हायला लागेल
आता ढवळताना अधिकाधिक जोर लागायला लागेल. अशा वेळी ढवळण्याचा वेग अतीतीव्र करा. यावर स्मूथनेस अवलंबून आहे.
एका ताटाला थोड्याश्या लोण्याचा हात लावून तयार ठेवा. हे आधीच करुन ठेवलं तरी चालेल. ढवळण्यातून फुरसत मिळायला अवघड.
काजू किंवा इतर नट्स आवडत असतील तर या स्टेजला ते मिश्रणात तुकडे करुन घाला. बेदाणे आत्ता घालू नका. ते फुगून येतील.
मिश्रण ढवळता ढवळता आता ते घट्ट झाल्याचं लक्षात येईल. नेमकं केव्हा
खाली उतरवायचं हा अनुभवाने शोधण्याचा पॉईंट आहे. पण अंदाज येण्यासाठी फोटो
देतो आहे. फार घट्ट होऊ देऊ नका. नपेक्षा हत्यार म्हणून किंवा
गोळाफेकीसाठी वापर करावा लागेल. फार आधी उतरवलं तर फाईव्हस्टारसारखं मऊशार
आणि दाताला चिकटणारं होईल.
बटरचा हात लावलेल्या ताटात हे मिश्रण झटझट ओतून घ्या.
ते सेट होण्यासाठी ताटाला हलवा. या स्टेजला त्यात बेदाणे रुतवा.
अर्ध्या-एक तासाने सुरी किंवा उलथन्याने वड्या कापा.
अशा रितीने खुटखुटीत आणि खास आपल्या हातचा टच असलेल्या चॉकलेट वड्या
तयार. पोरं जाम म्हणजे जाम खूश होतात. कढईतली उरलेली खरपूडही चाटून काढतात
मांजरासारखी.
ही घ्या:
आणखी हवीत?
बनवा.. आणि कशी लागतात सांगा.. खूप सोपी आहे ही चीज.
"कुछ मीठा हो जाय"चे खूप प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येवोत ही
शुभेच्छा.. (लगेच टेन्शन कशाला घेताय? इतरही बर्याच प्रकारच्या "गुड
न्यूज" असतात की हो..
------------ मिसळपाव
No comments:
Post a Comment