Tuesday 28 August 2012

शेझवान सॉस सोबत चिकन लॉलीपॉप

शेझवान सॉस सोबत चिकन लॉलीपॉप



नमस्कार मंडळी,
इंडो-चायनिज् च्या पहिल्या भागात आपलं सहर्ष स्वागत.
गेल्या बुधवारी संतोषने झक्कास व्हेज रोल आणि त्या जीवघेण्या शेझवान सॉस चा फोटो टाकला तेव्हा पासुन आमच्या जीभेचा वाहणारा नळ काही बंद होईना.
काही तरी बनवुन कोंबल्या शिवाय तो बंद होणार नाही ते आम्ही तेव्हाच ताडले.
तर आजचा मेन्यु बच्चे कंपनीच लाडक चिकन-लॉलीपॉप. (आम्हीही अजुन ल्हानच आहोत Wink )
आजकाल बाजारात रेडीमेड लॉलीपॉप्स मिळतात. पण आपल्या कडे अजुन सर्वत्र मिळतीलच अस नाही.
त्यामुळे तुम्हाला चिकन्-विंग्जस् पासुन लॉलीपॉप कसे बनावायचे ते पण सांगतो.
साहित्यः
चिकन विंग्जस् . एका विंगचे दोन लॉलीपॉप होतात.

१ चमचा आल-लसुण भरड वाटलेल.
१ चमचा काळा सोयासॉस.
१ चमचा काळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.
१ वाटी मैदा.
१ चमचा कॉन फ्लॉवर.
२ चमचे बेसन.
१ चमचा लाल तिखट.
तंदुरीचा रंग. (ऑपशनल)
कृती:
चिकन विंगच्या सांध्यात सुरीने कापुन एका विंगचे दोन तुकडे करा.

चित्रात दाखवल्या प्रमाणे विंगच्या टोलाका सुरीने हाडा भोवती गोल चरा द्या.
मग अंगातुन टी-शर्ट काढावा त्या प्रमाणे हाडाच्या चरा दिलेल्या टोकाला पकडुन मांस (इन साईड आउट) खाली खेचा.
विंगच्या खांद्याकडील भागाला एकच हाड असत. तर खालच्या भागात दोन हाड असतात.
तसच वरच्या भागात मांस जास्त असत तर खालच्या भागात कमी.
खालच्या भागाच लॉलीपॉप बनवताना दोघा पैकी एक हाड काढुन टाकाव.

सगळे लॉलीपॉप तयार झाल्यावर त्यांना मीठ, आल-लसुण, कळीमिरी पुड, सोयासॉस लावुन १५-२० मिनिटे मुरत ठेवाव.

एका भांड्यात मैदा, बेसन, कॉन फ्लॉवर, मीठ, लाल तिखट नीट एकत्र करुन घ्याव.
थोड थोड पाणी टाकत भजी सारख घट्ट पीठ तयार कराव. (भजी पेक्षा किंचीत जाडं)
रंग टाकायचा झाल्यस पाणी टाकल्यावर घालावा.
कढईत तेल तापवुन घ्याव.
एक एक लॉलीपॉप त्या पीठात घोळवुन खरपुस तळुन घ्यावे.
लहान मुलांना सॉस सोबत नी त्यांच्या बाबाला थंडगार बियर सोबत सर्व्ह करा. (आईने पण घेण्यास आमची ना नाही ) Wink

***************************
संतोषने शेझवान सॉस ची रेसिपी दिली आहेच....
मी थोड्या वेगळ्या पद्धतीने हा सॉस बनवतो.
खाली सौरभने विचरणा केली आहे म्हणुन इथेच देतो.
शेझवान सॉस.
सहित्यः
१०-१२ लाल सुक्या लाल मिरच्या.
दोन गड्डे लसुण.

५-६ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
१ कांदा बारीक चिरुन. (पांढरा असल्यास उत्तम)
२ इंच आल किसुन.
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
मीठ.
तेल.
१ चमचा कॉन फ्लॉवर.

कृती:
दोन गड्डे लसुण सोलुन, लाल मिरच्यां बरोबर १५-२० मिनिटं पाण्यात शिजत ठेवावा.

गार झाल्यावर. पाणी गाळुन मिरच्या आणि लसुण मिक्सर मध्ये वाटुन त्याची घट्ट पेस्ट करावी. पाणी फेकुन देउ नये.

एका भांड्यात २ चमचे तेल टाकुन त्यात मिरची लसुण आल परतुन घ्याव.
त्यात कांदा टाकुन तो चांगला गुलाबी होइस्तव परतुन घ्यावा. लाल रंगासाठी १ चमचा काश्मिरी मिरची पुड टाकुन चांगल परतुन घ्याव.

मग त्यात मिरची लसणाची पेस्ट टाकुन ३-४ मिनिट शिजवावे.
गाळलेले पाणी यात टाकुन योग्य प्रमाणात घनता आणावी.
उकळी आली की १चमचा कॉन फ्लॉवर पाण्यात मिसळुन यात टाकुन १-२ मिनिट शिजवाव.




पुर्ण पणे गार झाल्यावर हवाबंद बाटलीत काढुन फ्रिज मध्ये ठेवा.











---------------  मिसळपाव 

Monday 27 August 2012

 
खाद्यसंस्कृतीत 'मिसळ'लेलं पुणं ! 
 

"पुण्यात त्या काळांत हल्लींसारखा हॉटेलांचा सुळसुळाट झाला नव्हता. चहा-कॉफीची दुकानंही नव्हतीं. फराळाची दुकानं मात्र भरपूर असत. बुधवार पेठेत पुणें नगर वाचन मंदिराच्या दोन्ही बाजूंना फराळाची दुकानं असत. त्या दुकानातले फराळाचे जिन्नस म्हणजे घरगुती दिवाळीच्या दिवसांतल्या फराळाचे असत. करंज्या, लाडू, अनरसे, चिरोटे, कडबोळी, शंकरपाळी, चकल्या, चिवडा असेच जिन्नस मुख्यतः असत. जिलेबी, शिरापुरी, कांद्याची भजी यांचा प्रचार क्वचितच झाला होता. त्या दिवसांत पाव-बिस्किटांचाही प्रसार झाला नव्हता. अंडी उघड विक्रीला दुकानात ठेवण्याचे धाडस कोणी करू शकत नव्हता...''

पुण्याच्या श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर हे महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी केलेलं हे पुण्याचं वर्णन! हा काळ आहे 1883 ते 1897 च्या दरम्यानचा. हे पुणं आहे, "खाद्यसंस्कृती' हा शब्दही जन्माला यायच्या आधीचं.

गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत पुण्याचं खाद्यजीवनही पुण्यासारखंच चहूबाजूंनी उमलून आलं आहे. "कॉंटिनेंटल फूड'पासून ते आजच्या गतिमान तरुणाईला भावणाऱ्या चटपटीत, चमचमीत "फास्ट फूड'पर्यंत. पुणेकरांच्या चैनीची परमावधी आता मटार उसळ आणि शिकरणाच्या कितीतरी योजनं पलीकडं गेली आहे. कॅम्पातल्या इराण्याकडं (चोरून...!) प्यायलेल्या चहाच्या आधी ऑम्लेट-पावाचा आस्वाद घेणं, ही सांस्कृतिक क्रांतीची खूण मानणाऱ्या पुण्याचा प्रवास, शनिवारी-रविवारी हॉटेलांत रांगा लावून जेवणारे पुणेकर "वीकएंड'ला घरात चूल पेटवतच नाहीत की काय, असं वाटण्यापर्यंत झाला आहे. पुण्यात दरवर्षी साजरे होणारे उत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाच्या श्रीमंतीचा एक महत्त्वाचा पैलू मानला, तर आता 12 महिने 13 काळ पुण्यात चालणाऱ्या "खाद्योत्सवा'नं या श्रीमंतीला आगळीच झळाळी आणली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

"खादाड असे माझी भूक' हे कविवचन शब्दशः खरं करणाऱ्या पुण्याच्या खाद्यविश्‍वाच्या या प्रवासात जाणवणारं महत्त्वाचं सूत्र म्हणजे, अजूनही अनेकांगांनी परंपराप्रिय असणाऱ्या पुणेकरांनी या खाद्यपरंपरेच्या काही अनवट "जागा' आणि "घराणी' अजूनही जोपासलेली आहेत! म्हणूनच पुण्याला लगटून असणाऱ्या लोभसवाण्या टेकड्यांना न जुमानता (प्रसंगी त्या होत्याच्या नव्हत्या करून!) पुण्याची क्षितिजं कितीही विस्तारली, तरी "बेडेकरां'ची, "वैद्यां'ची, "श्रीकृष्ण'ची, "श्री'ची, "रामनाथ'ची, चिंचवडच्या "कवीं'ची मिसळ, "प्रभा'चा, "टिळक स्मारक'चा, "भरत'चा, कॅम्पातल्या जे. जे. गार्डनजवळचा, लक्ष्मी रोडवरच्या काकाकुवा मॅन्शनच्या दारातला वडा, "पुष्कर्णी'ची भेळ, "मार्झोरिन'ची सॅंडविचेस्‌, "कयानी'ची श्रुसबरी बिस्किटं, "पूना गेस्ट हाउस'चं थालीपीठ आणि खिचडी, "शिव-कैलास'ची लस्सी, कोंढाळकरांची मस्तानी... हे सारे खाद्यविशेष आपापलं स्थान टिकवून आहेत. ही काही संपूर्ण यादी नव्हे; पुण्यात ह्या यादीचे आणखीही काही मानकरी आहेत. एखादा "तबियतदार' तज्ज्ञ या यादीत हवी तेवढी भर घालू शकेल.

खवैयांच्या मैफलीत नाही, असा पुणेकर मिळणं कठीणच. इथं प्रत्येकानं स्वतःसाठी ठरवलेल्या खास जागा आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी मिळणारी चीज वेगळीच आहे. सकाळी लॉ कॉलेजच्या, "फर्ग्युसन'च्या किंवा अशाच कुठल्याही टेकडीवर आधी मोकळी हवा खायची किंवा टेनिसशी चार हात करायचे आणि मग खाली उतरून डेक्कन जिमखान्याचं "अप्पाचे कॅंटिन' सुरू होतं, तेव्हा "अप्पाचे कॅंटिन' किंवा लॉ कॉलेजचं कॅंटीन, "रूपाली', "वैशाली', "वाडेश्‍वर'मध्ये बसून खिचडीचा, इडली-चटणीचा नाहीतर उप्पीटाचा समाचार घ्यायचा, हा विविध वयोगटांतल्या पुणेकरांचा रोजचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी कॅलरीज्‌च्या आधी थोडं पेट्रोल जाळायला त्यांची ना नसते. (सायकल वापरून हा उपक्रम करणारे उत्साही पुणेकरही आहेत!)

अगदी इतिहासात शिरायचं म्हटलं तर पुण्यात काम-धंद्यानिमित्त लोक यायला लागले, तसा हा व्यवसाय वाढत गेला. रविवार पेठेतली वैद्य मिसळ आणि आवारेंची सामिष खानावळ, असे शताब्दी साजरी केलेले सेलिब्रिटीज्‌ही इथं आहेत. 19 व्या शतकाच्या सुरवातीला कर्नल वेल्सनं पुण्याचं वर्णन "सर्व मराठी साम्राज्याच्या व्यापाराचं एक मोठे केंद्र' अशा शब्दांत केलं आहे. ब्रिटिश आमदानीत संस्थात्मक जीवनाबरोबरच पुण्याच्या समाजजीवनामध्येही स्थित्यंतरं येऊ लागली. "क्षुधाशांती भुवन' अशा सरळ सोप्या नावाच्या खाणावळी त्या काळी, बाहेरून पुण्यात शिकायला, काम-धंद्याला येणाऱ्यांचा पहिला आधार असायच्या. पुढील काळात या आधारांमध्ये सरपोतदारांचं पूना गेस्ट हाऊस, बादशाही, गुजराथ लॉज, पूना बोर्डिंग, जनसेवा, आशा डायनिंग, सुवर्णरेखा यांनी मोलाची भर घातली.

पुण्यातली हॉटेलं लाडू, चिवडा, करंज्यांमधून बाहेर पडली विसाव्या शतकाच्या मध्यात केव्हातरी. आजही खाद्यपदार्थातली पुण्याची खासियत कोणती, या प्रश्‍नाला थोड्याफार फरकानं "मिसळ' हेच उत्तर मिळतं. पुण्यातल्या मिसळीची जगातल्या कोणत्याच मिसळीशी तुलना होऊ शकत नाही, अशी तमाम पुणेकर मिसळप्रेमींची श्रद्धा आहे! मिसळीच्या कटाची आंबट-गोड चव हे पुणेरी मिसळीचं वैशिष्ट्य. या कटाच्या चवीवर मिसळीची "घराणी' ठरतात. मग पोहे, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, भाजक्‍या किंवा पातळ पोह्यांचा चिवडा, ओलं खोबरं, आलं, हिरवी मिरची अशा विविधतेतून "रामनाथ', "श्री', "श्रीकृष्ण', "मार्केट' वगैरे विशिष्ट पिढीजात चवीची मिसळ साकारते. पुण्यातल्या परंपरागत मिसळींमध्ये आता "काटा किर्रर्रर्र...', "पुरेपूर कोल्हापूर', "पोटोबा' यांसारख्या नव्या पिढीतल्या मिसळींनीही स्थान मिळवलं आहे. कोल्हापुरातल्या खासबागेतली प्रसिद्ध मिसळही आता पुण्यात आली आहे आणि "मुंजाबाचा बोळ, नारायण पेठ, पुणे 30', हा आपला परंपरागत पत्ता सोडून, बेडेकर मिसळही आता कर्वेनगरात स्थिरावली आहे.

तारांकित हॉटेलांचा कितीही अनुभव पाठीशी (किंवा पोटाशी!) असला तरी आपल्या गावात जगप्रसिद्ध असलेल्या एखाद्या बोळातल्या तुलनेनं कळकट्ट हॉटेलात बसून मिसळ किंवा पहिल्याच घासाला ब्रह्मांडाची आठवण करून देणारा तत्सम पदार्थ चापण्यात आनंद असतो, हे वैश्‍विक सत्य पुण्यातल्या कोणत्याही पारंपरिक हॉटेलात अनुभवता येऊ शकतं.

सत्तरीच्या दशकात दाक्षिणात्य पदार्थांना पुण्यानं आपलंसं केलं. "संतोष भुवन' हे एकेकाळचं इडली-डोसा (खरा उच्चार "दोशा...' इति एक दक्षिणभाषाभिमानी पुणेकर!) मिळण्याचं खास ठिकाण. नंतरच्या काळात "रूपाली', "वैशाली', "मॉडर्न कॅफे', "वाडेश्‍वर', "कॉफी हाऊस' ते "रामकृष्ण' अशी दाक्षिणात्य; विशेषतः उडुपी पदार्थ देणाऱ्या हॉटेल्सची एक साखळीच पुण्यात उभी राहिली. रास्ता पेठेतल्या "कॉफी हाऊस'च्या दाक्षिणात्य कॉफीची जिभेवर रेंगाळणारी चव आणि याच परिसरातल्या साउथ इंडियन मेसमधलं रसम्‌ ही दक्षिणी खासियत. यातल्या बऱ्याच ठिकाणांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं गेल्यानंतर ऑर्डर काय द्यायची, हा फार मोठा प्रश्‍न नसतो इतकं चवीतलं सातत्य या मंडळींनी राखलं आहे.

पुण्याबरोबरच पुण्यातली खाद्यसंस्कृतीही विस्तारत गेली. पंजाबी, मुघलाई, चायनीज्‌ आणि आता मल्टी क्‍युझिन रेस्टरंट्‌स असा हा प्रवास आहे. या सगळ्याच्यामध्ये "फास्ट फूड'ची एक मोठी लाट आली आणि आता पुण्यात अमुक तमुक कॉर्नरवरील वर्ल्ड फेमस पावभाजीपासून ते मल्टिनॅशनल चेनमधल्या पिझ्झापर्यंतची रेंजच उपलब्ध आहे.

"ऑक्‍सफर्ड ऑफ ईस्ट' या बिरुदामुळं पुण्याच्या लौकिकाबरोबर खाद्यजीवनातही मोलाची भर पडली आहे. महाविद्यालयीन तरुणाईच्या प्रत्येक पिढीनं खवय्येगिरीबरोबर तितक्‍याच लज्जतदार गप्पा मारण्यासाठी खास कट्टेच "डेव्हलप' केले आहेत. कॉलेजात आणि कॉलेजबाहेरही. जिथं जिथं या सळसळत्या तरुणाईचा वावर असू शकतो, तिथं तिथं हे कट्टे सापडतात. इथलं खाद्यवैविध्यही "अमेझिंग' असतं. वडा-पाव, मिसळ, बनवडा, ऑम्लेट, अंडा भुर्जी, इडली-डोसा, पाव-भाजी, सॅंडविच, पाणी-पुरी, रगडा पॅटिस, भेळ, दावणगिरी अन्‌ लोणी डोसा ते पिझ्झा, बर्गर अन्‌ "चिकन मॅक्‍ग्रिल'पर्यंत! या कट्ट्यांवर हवा तेवढा वेळ बसा. इथं एक कप कॉफी किती जणांनी आणि किती वेळ प्यावी, याचं गणित काहीही असू शकतं. ऑर्डर देत राहा अन्‌ मित्र-मैत्रिणी जमवून मजेत दुनियाभरच्या टवाळक्‍या करा, प्लॅन्स करा, काहीही सेलिब्रेट करा, फारच कामसू असाल तर बसल्याबसल्या एखादं कामही करा. तुमची मर्जी. शहरात अनेक ठिकाण असे कट्टे हमखास सापडतात. कोथरूडमध्ये एमआयटीच्या रस्त्यावर, गोखले इन्स्टिट्यूटच्या समोरचा पीडी कट्टा, वाडिया परिसरात मंगलदास रोडवरची अप्पाची टपरी, फूडक्राफ्ट इन्स्टिट्यूटचा रस्ता आणि ज्ञानप्रबोधिनीच्या रस्त्यावरचा "जिवाला खा'! इथली खासियत म्हणजे नुसती "जिभेची तृप्ती ते उदरभरण' इतकी रेंज मिळते आणि खिसाही फार हलका होण्याची शक्‍यता नसते. नव्याने विकसित झालेल्या पुण्याच्या अनेक भागांमध्ये खाऊगल्ल्या डेव्हलप झाल्या आहेत. "मार्झोरिन'समोरची खाऊगल्ली अशीच व्हरायटी देणारी. तिथला खमण ढोकळा लक्षात राहणारा. सारसबाग, कमला नेहरू पार्क, कॅम्पापासून ते अगदी चांदणी चौकापर्यंत शहरात अशा "चौपाट्या' आहेत. पोहे, खिचडी, कबाब, तंदुरी अशा पदार्थांपासून सिझलर्स, शोर्बा, कोजी वेर्का चेटीनाड, फिश फिंगर्स, थाई करी, तंदुरी रान अशी शाकाहारी-मांसाहारी कॉम्बिनेशन्स इथं मिळतात. "हिंदुस्थान', "संतोष', "पूना बेकरी'चे पॅटिस ही अनेक पुणेकरांची रविवार सकाळची मुख्य डिश! पॅटिससाठी एकेकाळी रांगा लागायच्या. आता अस्सल पुणेरी पॅटिसही विश्‍वात्मकतेच्या पातळीवरून मांचुरिअन, चीज, नूडल्स अशा व्हरायटीत मिळू लागली आहेत.

"पुष्कर्णी भेळ' हे पुण्यातलं आणखी एक आश्‍चर्य. न बदलणारी चव हे या भेळेचं वैशिष्ट्य. "आमची कोठेही शाखा नाही' हे पुणेरी व्यावसायिकांचं ब्रीदवाक्‍य काळाच्या ओघात अनेकांनी सोडलं, तशी पुष्कर्णी भेळेचीही शाखा निघाली, आणखीही काही पदार्थ तिथं मिळायला लागले; पण भेळेच्या मूळ चवीत फरक नाही. भेळ आणि पाणी-पुरीच्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं बदल आणला तो "गणेश' आणि "कल्याण' भेळ यांनी. गाडीवरच्या चाट, पाणीपुरी आणि भेळेला त्यांनी एकदम "कॉर्पोरेट' करून टाकलं! तरीही शनिवारवाडा, सारसबाग, बंडगार्डन अशी भेळेची पारंपरिक ठिकाणं आपलं स्थान टिकवून आहेतच. निगडीत तर एका चौकालाच भेळेच्या गाड्यां मुळे "भेळ चौक' असंच नाव मिळालय!

साग्रसंगीत भेळेइतकंच लोकप्रिय मिश्रण म्हणजे मटकी-भेळ. विशेषतः रात्री लक्ष्मी रस्त्यावरची दुकानं बंद होण्याच्या वेळेला मिळणारी गणपती चौकातली, सोन्या मारुती चौकातली, भानुविलास आणि विजय टॉकीजच्या चौकातली मटकी-भेळ हे उत्तरसंध्याकाळी सक्रिय होणाऱ्या खवय्यांचं आणखी एक आकर्षण. अगदी घरातून जेवून-खाऊन कुटुंबकबिल्यासह या भेळेचा आस्वाद घेणारे पुणेकर अनेक सापडतील. दिवसाउजेडी मिळणाऱ्याही काही चांगल्या मटकी-भेळेंपैकी सारसबागेच्या पिछाडीला मिळणारी भेळ किंवा सातारा, नगर आणि सोलापूरकडं जाताना जकातनाक्‍यांच्या पलीकडं गेल्यावर मिळणारी कोरडी भेळही अनेकांच्या विशेष आवडीची आहे. फक्त भेळ तिथं बसून खायची की बांधून घ्यायची, हे ज्याचं त्यानं ठरवावं. यातल्या काही भेळीही आता मागील पिढीकडून पुढील पिढीकडं गेल्या आहेत. याच मालिकेतला, आता बंद झाला असला तरी, अजूनही आठवणीत असणारा फरासखान्याजवळचा भगवंतांचा चिवडा!

तसा लक्ष्मीनारायण चिवडा हा खास पुणेरी. पोह्यांच्या आणि बटाट्याच्या किसाच्या चिवड्यांच्या असंख्य चवींमध्ये प्रत्येकाची एक खास चव जपली गेली आहे. पिढ्यान्‌पिढ्या चव जपणारे असंख्य खाद्यपदार्थ पुण्यात आहेत. "चितळ्यां'ची बाकरवडी, "स्वीट होम'चं करपलेल्या वरणाच्या वळणावर जाणारं सांबार (काही न मुरलेले पुणेकर याला सांबार मानत नाहीत; पण त्याकडं लक्ष देण्याचं काहीच कारण नाही), "काका हलवाई'चा कट सामोसा, "एसएनडीटी'च्या बोळातला साबूदाणा वडा, ग्राहक पेठेच्या दारातले "वृंदाज्'चे रोल आणि आणखी कितीतरी.

काळाच्या ओघात पुण्यातली इराणी हॉटेलं आता विस्मृतीत जात असली तरी त्यांच्याशिवाय पुण्याची खाद्यसंस्कृती अपुरीच राहील. ब्रिटिशांबरोबर इथे स्थिरावलेली ही हॉटेल्स म्हणजे एकेकाळी निवांतपणाचं दुसरं नाव असायचं! बन-मस्का, ब्रून हे इथलं स्टेपल डाएट. चहाची चव सगळीकडं सारखी असली तरी प्रत्येक जागेचा "नोकझोक' वेगवेगळा. नवकवींची आणि नवोदित प्रेमवीरांची वर्दळ इथं हमखास असणार, याचं मुख्य कारण म्हणजे एक सिगारेट आणि एक ग्लास चहा या भांडवलावर कितीही वेळ घालवण्याची मुभा! त्यातही "घराणी' होती. "कॅफे डिलाईट' हा एकेकाळचा डाव्या बुद्धिवाद्यांच्या चर्चेचा अड्डा. "लकी' देव आनंदचं लाडकं. समोरचं "गुडलक' आपला वेगळा आब राखून असणारं. "पॅराडाईज'मध्ये पडीक असणं हा कित्येकांचा पूर्ण वेळचा उद्योग असायचा! "अलका'समोरच्या "रीगल'मध्ये चहा आणि बनवरोबर रेकॉर्डवर हवं ते गाणं चार आण्यात ऐकण्याची सोय होती. कॅम्पातली इराण्याची हॉटेलं हा आणखी वेगळा विषय. "नाझ'मधला सामोशांचा "डोंगर' आता फक्त आठवणीत उरला आहे!

पुण्यातले डायनिंग हॉल हा एक स्वतंत्र विषय आहे. "जीपीओ'समोरचं "रिट्‌झ', आपटे रोडवरचं "श्रेयस', फर्ग्युसन रोडवरचं "आम्रपाली', टिळक रोडवरचं "दूर्वांकुर', लॉ कॉलेज रोडवरचं "कृष्णा', शनिवार पेठेतलं "रसोई', भांडारकर रस्त्यावरचं "पंचवटी', डेक्कनवरचं "सुकांता' हे नेहमीचे टप्पे... यांच्या जोडीला मेहेंदळे गॅरेज परिसरातलं "अभिषेक', तुळशीबागेतले "अगत्य' ते बाणेर रस्त्यावरचं "राजवाडा', औंधमधलं "सूर्या', "थाटबाट'ची साखळी आणि "एनआयबीम' रस्त्यावरचं हाय प्रोफाईल "झेडकेज्‌' या क्रिकेटवीर झहीर खानच्या हॉटेलापर्यंत अशी वळणंही. शेफ विष्णू मनोहरांची "विष्णूजी की वाडी' हे या यादीतलं ताजं नाव.

केवळ चांगलंचुंगलं खायला मिळतं म्हणून नव्हे; तर फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरचं "हॉर्न ओ के प्लीज' आणि नगर रस्ता परिसरातलं, कारचा फील देणारं "बॉनेट' अशी काही हॉटेल्स त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सजावटींमुळंही लक्षात राहतात.

सामिषप्रेमींसाठीही पुण्याच्या खाद्यजीवनात स्वतंत्र दालनं आहेत. "आवारे', "नेवरेकर' यांच्या खास बोलाईच्या मटणाच्या खानावळींबरोबर "गुडलक', "लकी' आणि त्याच परिसरातलं "डायमंड क्वीन' ही अगदी सहज आठवणारी नावं. नुसती बिर्याणी म्हटलं तरी "दोराबजी', "ब्ल्यू नाईल', "जॉर्ज' ह्या पारंपरिक नावांत कित्येकांच्या कित्येक आठवणी गुंतलेल्या असतील! "दोराबजी'ची आख्खी लेनच गोयंची सय देणारी! यावरून आठवलं, "वैद्य मिसळी'ची आणखी एक खासियत म्हणजे आजही तिथल्या मांडणीत फार फेरफार न करता तिथं थेट विसाव्या शतकाच्या मध्यातल्या एखाद्या फिल्मसाठी शूटिंग करता येईल! तर बिर्याणी. "दुर्गा', "एसपीज्‌' आणि "तिरंगा' ह्याही महत्त्वाच्या जागा. अलीकडच्या काळात त्या भर पडलीय ती "हंड्रेड बिर्यानीज्‌' आणि "लखनवी बिर्याणी'ची. "कलकत्ता बोर्डिंग', नळस्टॉपजवळचं "निसर्ग', अभिनेत्री लालन सारंग यांच्या "मासेमारी'सारख्या ठिकाणी मत्स्यप्रेमी हमखास सापडणारच. पुणेरीपणाच्या अर्काचं पेटंट असणाऱ्या सदाशिव पेठेतल्या एकाच रस्त्यावर पाऊण किलोमीटर अंतराच्या आत-बाहेर किमान डझनभर नॉनव्हेज हॉटेल आहेत, हा खास पुणेरी तिढा!

"शबरी', "गिरिजा', "मथुरा' यांसारख्या मंडळींनी भाकरी, भरली वांगी, मटकीची उसळ, कुरडया वगैरे टिपिकल मराठी पदार्थ एकदम लोकप्रिय करून टाकले. गुजराथी जेवणातल्या फरसाणाऐवजी "पूना गेस्ट हाऊस'पासून अलीकडंच नव्या रूपात सुरू झालेल्या "सुगरण'पर्यंत लोकांनी महाराष्ट्रातल्या सुरळीच्या वड्या, कोथिंबिरीच्या वड्या, पाटवड्या, भाजणीचे वडे, वांग्याचे काप, मिरगुंड देण्याचा प्रघात आता रूढ केला आहे. मसालेभात, आळूचं फतफतं, मोदक, पुरणपोळ्या असं खास पुणेरी जेवण थेट जर्मनीत इंट्रोड्यूस करण्याऱ्या "श्रेयस'च्या चितळ्यांनी महाराष्ट्रीय आणि कॉंटिनेंटल पदार्थांच्या "जुगलबंदी'चा प्रयोग केला होता. वरणफळं आणि पास्ता, मोदक आणि डिमसम अशा जोड्यांना पुणेकरांनी मनापासून दाद दिली होती.

झुणका-भाकरी खाणं हे "स्टाईल स्टेटमेंट' होण्याच्या खूप आधी भाकरी पुण्याच्या खाद्यजीवनात आणली ती हमाल पंचायतीच्या "कष्टाची भाकर'नं. "एक रुपयात झुणका-भाकर' या घोषणेचं राजकियीकरण होण्यापूर्वी हमाल पंचायतीच्या "कष्टाच्या भाकर'बरोबर गरम जिलेबी आणि कांदा भजी या मेन्यूनं माजी पंतप्रधान विश्‍वनाथप्रताप सिंह यांच्यासह भल्याभल्यांना भुरळ घातली होती. "पोळी- भाजी केंद्रं' ही आता व्यग्र पुण्याची गरज बनत असताना काहीसा विस्मरणात गेलेला "इंदिरा कम्युनिटी किचन'सारखा प्रयोग आणि महिला समूहांनी चालवलेली "जेवणघरं'ही याच खाद्यसंस्कृतीचा आणखी एक भाग.

पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचा साद्यन्त आढावा घेणं हे हिमनगाची खोली मोजण्याइतकंच अनगड काम आहे. नुसती आइस्क्रीम्सच घ्या ना! "कावरे', "गणू शिंदे', "बुवा', "गुजर', "शिरीष' हे लोकल ब्रॅंड्‌स लोकांच्या जिभेवर अजून आहेत. "दुग्धालय' अशा भारदस्त नावाची दूध, खरवस, विविध मिठाया विकणारी दुकानंही पुण्यात असत. कोल्हापूरसारखी समोर म्हैस पिळून दूध मिळण्याचीही सोय पुण्यात होती, अशीही आठवण सांगितली जाते. पण सोन्या मारुती चौक, स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानक अशा काही ठिकाणी रात्री कढईतलं आटीव दूध प्यायला मात्र अनेकजण अजूनही गर्दी करतात. लक्ष्मी रस्त्यावरच्या "जनसेवा दुग्धालया'नं प्रसिद्ध केलेलं पियुष हे पेयही अनेकांच्या आठवणीत असेल. आता राष्ट्रीय पेय बनण्याच्या मार्गावर असलेल्या चहाला "अमृततुल्य' असा दर्जा देऊन चहाचीही चव जपण्याची किमया इथं आहे! डेक्कनवरचं "तुलसी', जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर फुगेवाडी जकातनाक्‍यासमोरचा चहा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या मागचा चहा आणि शहरातल्या असंख्य कॉर्नर्सवरच्या चहाच्या गाड्या आणि दुकानं थकल्या- भागल्या पुणेकरांचा आधार आहेत.

अगदी मनापासून खवय्येगिरी करणाऱ्या बहुतेक पुणेकरांचे पानवालेही ठरलेले आहेत. जेवायला कुठंही गेलं तरी पान खायला प्रसंगी वाट वाकडी करून अनिलकडं, जंगलीमहाराज रोडला आणि कुठं कुठं जातील.

पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचं आणि पुणेरी स्वभावाचंही एक मजेशीर नातं आहे. ते व्यक्त होत राहतं हॉटेलातल्या खास पुणेरी पाट्यांतून. "इंटरनेटकरां'नी जगभर पोचवलेल्या या पाट्या नकळत कुठंतरी अस्सल पुणेरी रोखठोकपणाही मिरवताना दिसतात. सदाशिव पेठेतल्या जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या एका हॉटेलात तर इतक्‍या पाट्या होत्या, की तिथं जेवणाऱ्याला कुणी काहीही बोललं नाही तरी "अगदी घरच्यासारखा' फील यायचा असं म्हणतात! "कामाशिवाय बसू नये' ही पाटी इथं फार कुणी मनावर घेत नाही; पण "एक मिसळ दोघांत घेतली तर दीड मिसळीचा आकार पडेल,' हा हिशेब होऊ शकतो तो केवळ पुण्यातच!

ही पुण्याच्या खाद्यसंस्कृतीची केवळ एक झलक. ही संस्कृती समजावून घ्यायची असेल तर ती अनुभवायलाच हवी. या अभ्यासाचे पुण्यातले नियम स्वतंत्र आहेत, त्यांचाही अभ्यास लागतो. गेले हॉटेलात, मागवलं काहीतरी, असं नाही चालत. ते नुसतं पोट भरण्याचं काम; पण एकदा का हे अस्सल पुणेरीपण समजावून घेतलं, की मग त्या "पूर्णब्रह्मा'ची गोडी नुसतीच कळत नाही, तर ती भिनत जाते!

------------------ माधव गोखले


 

Friday 17 August 2012

सुंदर आणि श्रीमंत !


अहमदाबाद मुंबई-गुजरात मेल. अहमदाबाद स्टेशनात मी धावतच गाडी गाठली. रात्रीचे पावणेदहा वाजून गेले होते आणि कामं आटोपून वेळेवर निघायचं म्हणून मला जेवणालाही फाटा द्यावा लागला होता. स्टेशनवरल्या स्टॉलवरून दोन सामोसे आणि अर्धा डझन केळी विकत घेऊन मी गाडीत चढलो आणि बर्थ गाठला.. समोरचा बर्थ पाहून एकदम फ्रेश झालो. तिशी-पस्तिशीचं एक नितांत सुंदर जोडपं समोर बसलं होतं. पुरुष हिंदी सिनेमातला नट शोभावा असा होता. निळी जीन्स, त्याला शोभेसा शुभ्र पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, पायात कोल्हापुरी वहाणा. ती पावलंही इतकी नितळ होती, की माझा रिझव्‍‌र्ह्ड बर्थ असूनही मला माझ्या पायातले बूट काढायची लाज वाटू लागली. बरोबर त्याची बायको असावी. त्याच्यापेक्षाही कांकणभर सरस, उंच, सडपातळ, केसाचा बॉब, खूप गहिरे काळेभोर डोळे, चिकणा तलम गुलामी पंजाबी ड्रेस.. एका सुंदर स्त्रीचं वर्णन करताना जे जे बोलता येईल ते सर्व तिच्याकडे होतं. इतकी देखणी स्त्री जवळ असलेला हा पुरुष या क्षणाला मला जगातला सर्वात श्रीमंत पुरुष वाटत होता. गाडी सुटली तशी माझी नजर वारंवार त्या दोघांकडे जाऊ लागली आणि लक्ष्मीनारायणाचा जोडा असाच असावा, हे मी मनोमन मान्य करून टाकलं.
मी लॅपटॉप काढला, उगाचच काहीतरी करायचं म्हणून बोटं फिरवू लागलो. मधूनच मी चोरट्या नरजरेनं दोघांकडे बघून घेत होतो. रात्र झाली आणि थोड्याच वेळात मला झोपावं लागणार आहे, याचंच मला वाईट वाटत होतं. त्यांना काहीतरी जाणवलं असावं. त्या नारायणानं बॅगेतून प्लॅस्टिकचा डबा काढला. त्यातून सँडविच काढून लक्ष्मीला दिलं. तिनं हातानंच ते नाकारलं. मला त्यांनी सँडविच खाण्याकरता विचारावं, अशी माझी अपेक्षा नव्हती; पण विचारलं असतं तर संवादाला सुरुवात करता आली असती. गाडीतले नऊ निरस तास बरे तरी गेले असते.
‘‘तू अजून रागावली आहेस काय?’’ नारायणने विचारलं. मी त्याचा आवाज प्रथमच ऐकला. प्रश्न मराठीतून आल्याने मला बरं वाटलं. तिचा आवाज आता ऐकायला मिळणार, या आशेनं मी कान टवकारले.
‘‘तुझ्या आईला अक्कल नाही रे अजिबात.’’ लक्ष्मीनं एकदम बॉम्ब टाकला. लॅपटॉपआड मी थरारलो. इतक्या सुस्वरूप स्त्रीकडून इतक्या कडवट शब्दांची मी अपेक्षाच केली नव्हती.
‘‘असं का म्हणतेस?’’ नारायणाचा स्वर अजिजीचा आलेला मला जाणवला.
‘‘आपल्या डॉक्टर सुनेला अशा सूचना देऊ नये, हे एवढं साधं कळत नाही त्यांना? मी काय झोपा काढतेय दवाखान्यात, गेली दहा वर्ष?’’
‘‘अगं, तू एवढय़ा वर्षानंतर प्रथमच प्रेग्नंट आहेस म्हणून काळजीपोटी बोलते ती?’’
‘‘तू आणखी बेअक्क्ल. ती मूर्ख बाई बोलते अन् तू तिची बाजू घेऊन मलाच समजावतोस?’’
‘‘माझ्या आईला माझ्यासमोर हे असे शब्द?’’
‘‘काय बोलू मग? व-हाडातल्या कुठल्या खेड्यातून आलेली बाई ही, चार बाळंतपणं घरी झाली हिची आणि ही मला, एका डॉक्टरला प्रेग्नन्सीत कसं वागावं हे शिकवते! स्टुपिड.’’
‘‘ऐकून घेत जा ग कधीतरी. फार चांगल्या मनानं सांगते ती आपल्याला.’’
‘‘का ऐकावं? तू सॉफ्टवेअर इंजिनियर, मी डॉक्टर. लाख रुपये कमवते मी महिन्याला. सीनियर डॉक्टरसुद्धा माझ्या पर्सनॅलिटीकडे बघून ‘मॅडम मॅडम’ म्हणत मागेपुढे गोंडा घोळतात माझ्या. आणि मी या फाटक्या बाईचं ऐकून घेऊ? नेव्हर.’’
‘‘जाऊ दे ग, जुने लोक आहेत, त्यांची निश्चित मतं असतात काही.’’
‘‘ए, मतं माझ्यावर लादलेली मी नाही खपवून घेणार हं आणि यांना इतकं कळतंय, तर तुझी बहीण का मेली बाळंपतणात?’’
‘‘मेली नको म्हणूस ग, गेली बिचारी. तिचं सासर थेट खेड्यात, वेळेवर डॉक्टरी मदत मिळाली असतील तर वाचली असती ताई.’’
‘‘म्हणजे, आईचा शहाणपणा आला का कामास? ती आई तशीच आणि तिची मुलगीही तशीच.’’
‘‘बरं तू म्हणतेस तसंच. पण तू काही खाल्लेलं नाहीये, आतातरी खाऊन घे काहीतरी.’’
‘नो वे. तुझ्या आईनं सांगितलंय ना, आता तर तोंड नाही हलवणार. मी माझ्याच टाइमटेबलने चालणार. तुला समजतंय ना?’’
नारायणरावांनी नंदीबैलासारखी मान हलवली. मला सहनच होईना. या एवढय़ा चाळीस-पंचेचाळीस मिनिटांच्या संवादांत, मनातल्या मनात मी कधी चकीत झालो, कधी संतापलो, कधी मला त्या क्षुद्र माणसाचा गळा दाबावासा वाटला, तर कधी चक्क त्या बाईला ‘या.. या नंदीबैलाला इंजिनियर बनवताना आणि इतर चौघांना आपल्या पायावर उभं करताना त्या माऊलीनं काय सोसलं असेल याची कल्पना आहे का?’ असं ओरडून विचारावंसं वाटलं. मला तिच्यासाठी लक्ष्मी हे नाव सहनच होईना. तासाभरापूर्वीची ती सुस्वरूप सुंदरी मला कुरूप दिसायला लागली आणि तो पुरुष जगातला सर्वात दरिद्री पुरुष.
आपला स्वत:वरचा ताबा सुटून आपण काहीतरी बोलू या भीतीनं मी लॅपटॉप मिटला, बर्थवर आडवा झालो आणि कोच अटेंडंटने दिलेली पांढरी चादर कानावर घट्ट लपेटून झोपून गेलो.
दादरला उतरलो तेव्हा प्रयत्नपूर्वक त्या दोघांकडे पाठ केली होती मी. पहाटे त्यांचे कुरूप चेहरे पाहिले असते तर दिवस निश्चितच नासला असता माझा. तसाच एसटी स्थानकावर आलो. अलिबागची बस लागलेलीच होती. खिडकीतच सीट मिळाली म्हणून ईश्वराचे आभार मानले अन् डोकं मागे टेकून, डोळे मिटून शांत बसून राहिलो.
‘‘बसू का दादा हीतं?’’ विटलेलं लुगडं नेसलेली, विस्कटलेल्या केसांची एक मध्यम वयाची बाई विचारीत होती. मी जरासा खजीलच झालो. अलिबागपर्यंत हा शेजार मला सहन करावा लागणार ही कल्पना फारशी सुसहय़ नव्हती.
मी खिडकीकडे सरकलो. बाई संकोचाने बसल्या. त्यांच्या शेजारी एक कॉलेजवयीन मुलगी येऊन बसली. साडेसहाला एसटी सुटली. गार वारा आत आला. बरं वाटलं. गाडीतले सगळे प्रवासी पेंगायला लागले. बाई मात्र टक्क जागी होती. आपल्याला झोप लागली आणि ही आपली बॅग घेऊन मध्येच उतरली तर पंचाईत या भीतीने मलाही झोपता येईना. तिच्या शेजारच्या तरुणीची मात्र झोपेमुळे मान कलायला लागली होती. मी पाहात होतो, तिचं डोकं हळूच बाईच्या खांद्यांवर विसावलं. बाई तिच्याकडे सरकली. आपला हात अलगद तिच्या डोक्यावर ठेवला. पोरगी दचकली. आपलं डोकं तिने बाईच्या खांद्यावरून पटकन काढून घेतलं.
‘‘झोप बाळा, व्यवस्थित झोप. -हाऊ दे डोकं माझ्या खांद्यावर.’’
‘‘सॉरी हं, चुकून झालं.’’
‘‘अग, सवारी कशापायी, माजी नात बी झोपत्ये की असंच. तु बी तेवढीच.’’
‘‘कुठे असते नात तुमची?’’ मुलीनं उगाच विचारलं. मला आवडलं नाही. कारण ही बाई  एकदा बोलायला लागली की, तिला थांबवणं कठीण झालं असतं.
‘हीतंच असत्ये ममईला. आता आली न्हवती का सोडायला मला? अलिबागला जाऊ नको म्हून लय मागं लागली माज्या.’’
‘‘ओके, तुम्ही अलिबागला जाताय होय?’’ मुलीच्या थांबतच नव्हत्या.
‘‘व्हय बाळा. सवत लय आजारी हाय माजी. तिचं करनारं न्हाई कुनी.’’
‘‘कोन आजारी आहे?’’ मुलीला ‘सवत’ हा शब्द ऐकायला गेला असावा. मलाही जरा आश्चर्यच वाटलं. दहा-पंधरा मिनिटांच्या आणि पाच-सात वाक्यांच्या परिचयावर बाई त्या मुलीशी ती आपली सख्खी नात असल्यासारखं बोलत होती.
‘‘सवत. दादल्याची ठेवलेली बाई. नऊ-धा वर्स झाली. मी मुलीजवळ ममईला, त्यो अन् सवत अलीबागला. आमची जमीन बक्क्ळ, पन ती बया घालून बसलीय घशात.’’
‘‘तरीही तुम्ही ती आजारी आहे म्हणून तिचं करायला जाताहात?’’
‘‘मग कोन करनार तिचं? तिची मुलं इचारेना तिला अन् दादल्याचं वय हाय का धावपळ करायचं?’’
‘‘अहो, पण नवऱ्यानं तुम्हाला सोडून तिला ठेवलीय ना?’’ मला अगदीच राहवेना म्हणून मी मध्येच तोंड घातलं.
‘‘तर काय भाऊ? या अशा येळेस बी राग लोभ धरायचा? त्यांचं केलं त्याचेपाशी आणि आपुन काय मोठं करतोय? आपुन पैशानं न्हाई करु शकत काई तर कष्टानं करावं. आपण चार कष्ट केल्याने कुनाला बरं वाटत असंल तर हरकत? शरीर झिजल तेवढं बरं दादा. आता या खेपेला वारी चुकंल माजी, पन या वर्साला इठोबाची न्हाई तर या रखमाईची सेवा घडंल.’’
माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले. ही वाणी या गरीब फाटक्या बाईची का कुणा संताची? काहीच वेळापूर्वी कुरूप दिसणारी ही बाई मला देखणी आणि तेज:पुंज दिसू लागली. मघाची मरगळ सहजच दूर झाली. मला स्वत:चाच अभिमान वाटू लागला.
जगातील सर्वात सुंदर आणि श्रीमंत स्त्रीच्या शेजारी या क्षणाला मी बसलो होतो. पुढील अडीच तासांचा प्रवास अविस्मरणीय होणार होता!

------------ प्रहार 

Tuesday 14 August 2012

घरच्या घरीच सौंदर्य



आजच्या धावपळीच्या जीवनात सौंदर्य टिकवण्यासाठी दर वेळी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी घरच्या घरीच सौंदर्य जपता आले तर?... वेळ आणि पैशांची बचत करून सौंदर्य खुलवणाऱ्या अशा सहजसोप्या उपायांविषयी. 
 
माणसाला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे, किंबहुना थोडी अधिकच वाढल्याचे दिसते. "आपण सुंदर दिसावे' या जाणिवेमुळेच सौंदर्य टिकवण्यासाठी, अधिक खुलविण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातात. सौंदर्य टिकविण्यासाठी पूर्वी नैसर्गिक गोष्टींवर अधिक भर दिला जायचा. मात्र हळूहळू माणसाची प्रगती होऊ लागली, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत गेले तसा सौंदर्यशास्त्राचाही विकास होत गेला आणि त्यातूनच शास्त्रशुद्ध पद्धतीने सौंदर्य जपण्याचा मार्ग दाखवणाऱ्या, सौंदर्यवृद्धीसाठी मदत करू शकतील अशा "ब्युटी पार्लर्स'ची निर्मिती झाली. 

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकवण्याची गरज वाढत असल्याचे दिसत असले, तरी त्यासाठी प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी काही साध्या- सोप्या उपायांच्या साह्याने घरच्या घरी सौंदर्य जपता येऊ शकते; तेही कोणताही खर्च न करता! सौंदर्य टिकविण्यासाठी, खुलविण्यासाठी घरच्या घरीच करता येणारे सहजसोपे उपाय. 

त्वचेची देखभाल 

खरे तर आपला चेहरा नितळ, सतेज, निरोगी असावा यासाठी सगळेच अगदी मनापासून प्रयत्न करत असतात. पण रोजच्या धावपळीत चेहऱ्याच्या स्वच्छतेकडे, निगराणीकडे पुरेसे लक्ष देता येतेच असे नाही. शिवाय वातावरणातील बदल, प्रदूषण, धूळ, ऊन अशा कितीतरी गोष्टींचे दुष्परिणाम त्वचेवर होत असतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी, त्वचा नैसर्गिकरीत्या तजेलदार राहावी यासाठी अर्थातच थोडा वेळ देण्याची गरज आहे. घरच्या घरी सोपे उपाय करण्याआधी आपली त्वचा नक्की कोणत्या प्रकारात मोडते ते जाणून घ्यायला हवे. सर्वसाधारणपणे त्वचेचे तेलकट, कोरडी आणि सर्वसाधारण असे तीन प्रकार केले जातात. या प्रकारानुसार त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलता येऊ शकते. 

सर्वसाधारण त्वचेसाठी  

* नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे. 
* दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन पुळ्या- पिंपल्स येत नाहीत. 
* त्वचा निरोगी दिसण्यासाठी रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी तर होतेच, शिवाय त्वचा तजेलदार व्हायलाही मदत होते. 
* रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. दिवसभराची धूळ त्यामुळे निघून जायला मदत होते. रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होतो. 
* अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतला, तर निस्तेज त्वचा उजळ होण्यासाठी फायदा होऊ शकतो. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्यानेही त्वचा उजळायला मदत होते. 
* त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी 3-4 थेंब लिंबूरस, चिमूटभर शुद्ध हळद, 1 चमचा काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. 
* काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावता येऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो. तसेच त्वचा मऊ व्हायलाही हे रस उपयुक्त असतात. 
* त्वचा अतिशय नाजूक असते, हे लक्षात घेऊन मेकअप करतानाही काळजी घेणे गरजेचे असते. तसेच मेकअप व्यवस्थित उतरवलाही जायला हवा. त्यासाठी क्‍लिंजिंग म्हणून कच्च्या दुधाचा वापर करता येईल. मेकअपमुळे होणारी त्वचेची हानी टाळता येऊ शकेल. 
* मेकअप उतरवण्यासाठी 1 टेबल स्पून तांदळाची पिठी आणि 2 टेबल स्पून दही एकत्र कालवून तयार झालेले मिश्रणही क्‍लिंजिंगप्रमाणे वापरता येईल. 
* त्वचेला घट्टपणा यावा, त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हाव्यात याकरता ग्लिसरिन, अंड्याचा पांढरा भाग, 3-4 थेंब मध या मिश्रणाचे चेहऱ्याला दोनदा थर द्यावेत आणि मिश्रण वाळल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. 
* जायफळ दुधात उगाळून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी व्हायला मदत मिळते. 

तेलकट त्वचेसाठी  

* "आपली त्वचा तेलकट का?' या प्रश्‍नाने अनेकांना वैताग आणलेला असतो. कारण तेलकट त्वचा असणाऱ्यांना पिंपल्सच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यावर उपचार करताना नाकीनऊ येतात. मात्र, समतोल आहार आणि भरपूर पाणी पिण्याबरोबरच जर काही साध्या-सोप्या गोष्टींचा अवलंब केला, तर तेलकट त्वचाही त्रासदायक वाटणार नाही. 
* रात्री कच्च्या बटाट्याचा कीस चेहऱ्याला चोळून सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतला, तर त्वचेतील अतिरिक्त तेल कमी व्हायला मदत होते. 
* गव्हाचा कोंडा, मुलतानी माती, चंदन, गुलाबपाणी यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा निरोगी आणि थंड व्हायला मदत होते. 
* चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करून त्वचा उजळ, मऊ व्हावी यासाठी रात्री मसूर पाण्यात भिजत घालावेत; सकाळी ते वाटून दुधामध्ये घालून मिश्रण तयार करावे आणि ते चेहऱ्याला लावावे. 
* पिंपल्सचा त्रास असणाऱ्यांनी 15 दिवसांतून एकदा चेहऱ्याला वाफ द्यावी. पाव चमचा गुलाब पावडर, अर्धा चमचा चंदन पावडर, ग्लिसरिन, गुलाबपाणी यांचा "फेसपॅक' करून लावल्यानेही त्वचा मऊ होते आणि तेलकटपणाही कमी होतो. 

कोरड्या त्वचेसाठी 

* तेलकट त्वचेच्या मानाने कोरड्या त्वचेला कमी काळजी घ्यावी लागते. पण जर त्वचा खूपच कोरडी झाली, तर ती निस्तेज वाटते. त्यामुळे कोरडेपणा जास्त असणाऱ्या त्वचेची उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. 
* कोरडेपणा कमी करण्यासाठी चेहरा दिवसातून एकदा तरी कच्च्या दुधाने धुवा. 
* त्वचा मऊ- मुलायम व्हावी यासाठी सर्वांगाला लोण्याने मसाज करावा. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहायला मदत मिळू शकते. 
* रात्री झोपण्यापूर्वी तीळ, बदाम, लवंग असलेल्या तेलाने सर्वांगाला मसाज करावा. 
* थंडीत कोल्डक्रीम, मॉइश्‍चरायझरचा आवर्जून वापर करायला हवा. त्यामुळे त्वचा फुटणार नाही आणि त्वचेचे थंडीपासून संरक्षण होऊ शकेल. 
* नारळाच्या पाण्यात ताजी साय घालून तयार केलेले मिश्रण लावण्यानेही त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व सुरकुत्याही कमी होतात. 
* चेहरा मऊ होण्यासाठी, रुक्षपणा घालवण्यासाठी कलिंगडाचा रस चेहऱ्याला लावून 15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवावा. 

ओठांचे सौंदर्य कसे टिकवायचे?  

* चेहऱ्याच्या सौंदर्यात निरोगी त्वचेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच ओठांनाही आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे ओठांची काळजी घेतली तर संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य खुलून दिसेल. 
* ओठांसाठी नेहमी उत्तम दर्जाची "लिप प्रॉडक्‍ट्‌स' वापरावीत. शक्‍यतो नॅचरल लिपस्टिकचा वापर करावा. 
* लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना "लिप प्रोटेक्‍टर' लावावे. त्यामुळे ओठ काळे पडणार नाहीत. 
* ओठांचा काळेपणा नष्ट करण्यासाठी लिंबाचा रस आणि ग्लिसरिन यांचे मिश्रण लावावे. 
* थंडीच्या दिवसांत ओठ फुटण्याची शक्‍यता असते. अशा वेळी ओठांना नियमित साजूक तूप, ताजी साय लावावी. त्यामुळे ओठांचा मऊपणा टिकून राहायला मदत मिळेल. 

डोळ्यांचे सौंदर्य  

* खरे तर आपले डोळे हे नुसते बघण्यासाठी नसतात, तर आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवण्याचे कामही हे डोळेच करत असतात. या डोळ्यांचे सौंदर्य जपावे यासाठी डोळ्यांची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, तरच डोळे आरोग्यदायी दिसू शकतील. 
* डोळे स्वच्छ व सतेज दिसण्यासाठी कापसावर गुलाबपाणी घेऊन ते धुवावेत. 
* डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास दुधात बदाम उगाळून ते मिश्रण किंवा काकडीच्या साली डोळ्यांखाली लावाव्यात. 
* डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप, गार दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात. 
* संगणकाच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो. तो ताण दूर करण्यासाठी लिंबूरस व बदामतेल एकत्र करून डोळ्यांना हलका मसाज करावा. 
* डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी अनवाणी पायांनी हिरवळीवर चालावे. 
* झोपताना डोळ्यांत आयुर्वेदिक अंजन घातल्याने किंवा आयुर्वेदिक काजळ घातल्यानेही डोळ्यांचे आरोग्य टिकून राहायला मदत मिळते. 

हाता-पायांचीही काळजी  

* चेहेऱ्याची जितकी काळजी घेतली जाते तेवढी हाता-पायांची घेतली जातेच असे नाही. त्यामुळे अनेकदा हात-पाय काळवंडलेले दिसतात. चेहऱ्याप्रमाणेच हाता-पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठीही घरच्या घरी उपाय करता येतात. 
* उन्हाने रापलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचे पीठ दुधात कालवून हातांना मसाज करावा. 
* पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो. 
* लिंबाचा रस कोपर व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो. 
* थंडीच्या दिवसांत हाता-पायांना लवंगतेल, बदामतेल, कोल्डक्रीमने मसाज केल्यास त्यांचा मऊपणा टिकून राहतो. 
* आठवड्यातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून त्यात 10 मिनिटे पाय ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा. त्यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौंदर्यही वाढते. 
* पायांना भेगा असल्यास ग्लिसरिन व लिंबूरसाचे मिश्रण भेगांना रोज रात्री लावल्यानेही फायदा होऊ शकतो. 
* नखांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना कॅल्शिअमची आवश्‍यकता असते. त्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लिंबू चोळण्याने नखांना चमक येते. 
* नखांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती तुटतात. ती मजबूत व्हावीत याकरता ग्लिसरिन, मध, लवंगतेल यांच्या मिश्रणात नखे भिजवावीत. 

निरोगी केसांसाठी  

* लांबसडक, निरोगी, काळेभोर केस हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. 
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. 
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो. 
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. 
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. 
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. 
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. 
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. 
एकूणच सांगितल्याप्रमाणे साध्या-सोप्या उपायांचा अवलंब केला, तर घरच्या घरी नखशिखांत सौंदर्य खुलवणे आपल्याच हातात असेल, नाही का? 
हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 
* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. 
* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. 
* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो. 
* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. 
* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. 
* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. 
* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. 
* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. 
एकूणच सांगितल्याप्रमाणे साध्या-सोप्या उपायांचा अवलंब केला, तर घरच्या घरी नखशिखांत सौंदर्य खुलवणे आपल्याच हातात असेल, नाही का? 



------------------ दै. सकाळ 

पुण्याचा सिंहगड !




पुण्याचे दोन मानबिंदू, एक शनिवारवाडा तर दुसरा सिंहगड! यातही सिंहगड म्हटले, की नरवीर तानाजी मालुसरेंचे रणकंदन, डोंगरदऱ्यांचा मावळ, हिरव्यागर्द झाडीचा आधार, शांत-निवांत सकाळ-संध्याकाळ आणि भन्नाट वारा असे बरेच काही डोळय़ांसमोर येते. इथे मिळणारी झुणका-भाकर, कांदाभजी, मडक्यातील दही या गोष्टीही खुणावू लागतात. यामुळे अनेक भटक्यांची पावले सिंहगडची ही वाट वर्षांनुवर्षे चढत असतात.
पुण्याहून अवघ्या २४ किलोमीटरवर हा गड! उंची ४३२९ फूट! पायाच्या आतकरवाडीतून वर चढणारी वाट, पण ज्यांना गड चढायचा त्रास त्यांच्यासाठी अलीकडे गोळेवाडीतून एक घाटवाट अगदी गडावर नेऊन पोहोचवते. याशिवाय जातीचे भटके कात्रज-सिंहगड, कोंढणपूर-कल्याण-सिंहगड, खानापूर-सिंहगड अशा अन्य डोंगरवाटांवरूनही त्यांची ही पंढरी गाठत असतात. खरेतर सिंहगडावर वर्षभर पर्यटक येत असतात, पण पाऊस सुरू झाला, की तो जास्तच खुणावू लागतो.
या पाऊसवेळी कधीही आलो, तरी हा गड तुम्हाला जिंकून घेतो. हिरवे रान, डोंगर-दऱ्या, त्यावरचा
ऊन-पावसाचा खेळ, रानफुलांची नक्षी, डोंगरकपारीच्या असंख्य जलधारा, ढग-धुक्याचे लोट, सुसाट वारा आणि या साऱ्यांशी टक्कर देत मधोमध एखादे जहाज नांगरल्यासारखा उभा असलेला तो उमदा गड! सिंहगडाचे हे राजबिंडे रूपच प्रथमदर्शनी मनावर ठसते. हिरवाईचे हे रूप पाहातच तासाभरात आपण गडमाथ्यावर दाखल होतो.
काहीसा कुऱ्हाडीसारखा गडाचा आकार. यातही पूर्वेकडची डोंगररांग सोडल्यास उर्वरित बाजूंना तुटलेले कडे. या उभ्या कडय़ांवरच सिंहगडच्या तटबंदीची चिलखते चढवली आहेत. तब्बल ३३ बुरूज आणि दोन प्रवेशमार्ग! एक पुण्याकडून तर दुसरा कल्याणहून शिरणारा राजमार्ग! पैकी पुणे दरवाजाची तीन तोरणे गडाच्या सुरुवातीच्याच खांदकडय़ाखाली दडली आहेत. हा खांदकडा म्हणजे गडाची एक माची! या माचीवरच आता सिंहगडाची ओळख बनलेला दूरदर्शनचा मनोरा उभा आहे. या माचीत अद्याप पाण्याची टाकी आणि घरांचे अवशेषही दिसतात. या माचीवरच दुसऱ्या महायुद्धातील कैद्यांना ठेवण्यात आले होते. या माचीची एक गंमत इथेच सांगतो, छत्रपती शिवराय जेव्हा मिर्झाराजे जयसिंहाबरोबर तहाची बोलणी करायला बसले तेव्हा त्यांना दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत त्यांनी सिंहगडबरोबर चतुरपणे या माचीलाही आणखी एक किल्ला म्हणून जोडले. राजाच्या अंगी केवळ पराक्रम असून चालत नाही, तर त्याबरोबरच चातुर्य आणि मुत्सद्देगिरीही असावी लागते, तेव्हाच स्वराज्य उभे राहते. याचेच हे उदाहरण!

पुणे मार्गात तीन दरवाजे. यातील पहिल्या दरवाजाला आपल्या टपाल तिकिटावर स्थान मिळालेले आहे. या मालिकेतील पहिले दोन मराठेशाहीतील तर तिसरा यादवकाळातील! त्याच्या अंगा-खांद्यावरची स्तंभ कमळांची रचनाच याचे पुरावे देतात. आत शिरताच लगेच लागणारे ‘घोडय़ाची पागा’ नावाचे खोदकाम तर त्याहून प्राचीन! खरेतर हे सातवाहनकालीन लेणेच! मधोमध खांब सोडलेल्या खोल्या, आतमध्ये बसण्यासाठी ओटे, समोर मोकळे प्रांगण ही सारी विहाराची रचना! अशा ठिकाणी कुणाच्यातरी डोक्यात ‘घोडय़ाची पागा’ अशी कल्पना आली आणि घोडय़ांना न विचारताच ती रूढही झाली. या खोदकामाची उंचीही घोडय़ांना आत सामावू शकत नाही, तिथे आम्ही पागा तयार केली.
अशाच पद्धतीची आणखी दोन खोदकामे वाटेत गणेश टाके आणि देव टाक्याच्या पाठीमागे एका भूमीलगत टाक्यातही दिसतात. यावरून हा गड किमान दोनएक हजार वर्षांपूर्वीपासून वाहता असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. कुठल्याही गडावर फिरताना त्याच्या असे मुळाशी गेले, की इतिहास आणि ते स्थळ दोन्हीही रंजक होते.
या प्राचीनकाळी गडाचे नाव होते कौंडिण्यदुर्ग! कोणा कौंडिण्यऋषींच्या वास्तव्यावरून हे पडले. पुढे ऋषींनीच इथे कौंडिण्यश्वराची स्थापना केली. पुढे यादवकाळात या जागी मंदिर बांधले गेले. मग काही दिवसांनी अपभ्रंश होत या कौंडिण्यदुर्गचा झाला कोंढाणा आणि कौंडिण्यश्वराचे झाले कोंढाणेश्वर! यातूनच गडाखालच्या गावालाही नाव मिळाले कोंढणपूर!

यादवकाळापर्यंतचा हा प्रवास! यानंतर गडावर आल्या मुस्लिम राजवटी! कोंढाण्याचा पहिला लेखी उल्लेख याच काळात सापडतो. इसवी सन १३५० मध्ये लिहिलेल्या ‘शाहनामा-ए-हिंद’ या फारसी काव्यातील २२३व्या प्रकरणात मुहम्मद तुघलकाने ‘कुंधियाना’ जिंकल्याचा उल्लेख आहे. हा ‘कुंधियाना’ म्हणजेच कोंढाणा! यानंतर मग गडावर निजामशाही, आदिलशाही अवतरल्या. पुढे छत्रपती शिवरायांनी खेड शिवापूरच्या बापूजी मुगल नऱ्हेकर देशपांडे यांच्या मदतीने इसवी सन १६४७ मध्ये गडावर हिंदवी स्वराज्याचे तोरण चढवले. पण लगेच शहाजीराजांच्या अटक प्रकरणात त्यांना हा गड सोडावा लागला. १६५३ मध्ये त्यांनी तो पुन्हा घेतला आणि गडाचे नामकरण केले ‘सिंहगड’! पुढे मिर्झाराजेंबरोबरच्या तहात हरवलेला किल्ला हस्तगत करण्यासाठी तानाजी मालुसरेंना प्राणाची आहुती द्यावी लागली. शिवरायांच्या निधनानंतर हा गड कधी मोगलांकडे तर कधी मराठय़ांकडे राहिला. यामध्येच एक जुलै १६९३ मध्ये नावजी बलकवडे आणि विठोजी कारके या रणमर्दानी तानाजींच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करत गड जिंकला. या गडावरच तीन मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराममहाराजांचे निर्वाण झाले. यानंतर दोनच वर्षांनी औरंगजेबाने सिंहगड पुन्हा जिंकला आणि त्याचे नाव ठेवले ‘बक्षी-दा-बक्ष’! ‘बक्षी-दा-बक्ष’चा अर्थ दैवी देणगी! पण औरंगजेबाची ही देणगी त्याच्याकडे दोनच वर्षे राहिली. मराठय़ांनी पुन्हा हा गड जिंकला आणि तो १८१८च्या अखेरच्या मराठे-इंग्रज लढाईपर्यंत त्यांच्याकडेच राहिला!

या शेवटच्या लढाईनंतर इंग्रजांचा सिंहगड लुटीचा तपशीलदेखील धक्कादायक आहे. हा गड घेतला त्या वेळी इंग्रजांना गडावर ६७ तोफा, त्यांना पुरेल एवढा दारूगोळा, जडजवाहीर, दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज मिळाला. याची त्या वेळी किंमत होती तब्बल पन्नास लाख रुपये! गडावरील एका बांधीव खांबात सोन्याची एक गणेशाची मूर्ती मिळाली. या मूर्तीचीच पाच लाख रुपये एवढी किंमत भरली. पुढे अनेक दिवस हे इंग्रज गडावरील ही लूट टोप्यांमध्ये भरभरून आणून पुण्याच्या बाजारात विकत होते.
इतिहासाचा हा साराच भाग अनेक संदर्भ-तपशील पुरविणारा. तो लक्षात ठेवतच या सिंहाच्या गुहेत शिरावे.
तिसऱ्या दरवाजातून आत शिरताच डाव्या हातास दारूगोळय़ाचे कोठार लागते. गडावरची आज शाबूत असलेली ही एक इमारत. या कोठारावरच ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. ज्यामुळे गडावरील अनेक इमारतींना हानी पोहोचली होती. ज्याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे. गंमत अशी, की पुढे याच इमारतीत ब्रिटिशांनी काही काळ चर्चही थाटले होते.
गडाच्या मध्य भागात किल्लेदाराचा वाडा, अमृतेश्वर-कोंढाणेश्वर मंदिर, तानाजी स्मारक, राम-गणेश-देव टाक्या आदी ऐतिहासिक वास्तू आहेत. पैकी किल्लेदाराचा वाडा आता पडून गेला आहे. त्याचा तट आणि कमानीचा दरवाजाच तो काय शिल्लक आहे. या जागेतच आता गडावरील पोलीस चौकी थाटली आहे. अमृतेश्वराचे मंदिरही पडले आहे. पण गाभाऱ्यातील शुद्ध पाषाणातील भैरव-भैरवीची मूर्ती मात्र आजही लक्ष वेधून घेते. या चतुर्भुज भैरवाच्या हातात जांबिया, डमरू, त्रिशूळ आणि एका हातात नरमुंड आहे. या नरमुंडातून ठिबकणारे रक्त पिणारा श्वानही पायाशी दाखवला आहे.

अमृतेश्वर मंदिराच्या पाठीमागे तानाजी मालुसरेंचे स्मारक आहे. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले ते हे ठिकाण. त्या वेळी शिवकाळातच बांधलेल्या या चौथऱ्यावर सुरुवातीला २० फेब्रुवारी १९४१ रोजी तानाजींचा अर्धपुतळा बसवला गेला. पुढे २४ मार्च १९७६ रोजी पहिला पुतळा काढून त्याजागी आताचा धातूचा पुतळा बसविण्यात आला.
या लगतच्या टेकडीवर कोंढाणेश्वराचे प्राचीन मंदिर! यादवकाळातील हेमाडपंती शैलीतील हे बांधकाम. या मंदिराचे विविध द्वारशाखांनी सजलेले प्रवेशद्वार तर हमखास पाहावे असे. या टेकडीवरून उत्तरेकडे उतरलो, की वाटेत आणखी एक स्मारक दिसते. चौथऱ्यावर घुमटीत एका हाताची रचना तर पायाशी एका घोडेस्वाराची प्रतिमा ठेवली आहे. असे म्हणतात, तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड या दोघांमधील लढाईत या जागी तानाजींचा हात तुटला, त्याचेच हे स्मारक!
हा रस्ता असाच पुढे टिळक बंगला आणि राजाराममहाराजांच्या समाधीकडे उतरतो. सिंहगडावरचे हवामान, वातावरणाने आजवर अनेकांना मोहात पाडले आहे. यामध्ये लोकमान्य टिळक हेदेखील होते. टिळक १८८९ मध्ये गडावर राहण्यास आले. इथल्या निसर्गरम्य एकांतात त्यांनी ‘आक्र्टिक होम इन वेदाज’ हा ग्रंथ आणि ‘गीतारहस्य’ची मुद्रणप्रत तयार केली. याच बंगल्याने १९१०मध्ये टिळक आणि महात्मा गांधीजींची ऐतिहासिक भेटही अनुभवली. गांधीजी टिळकांना आपले गुरू मानत. अशा या गुरू-शिष्यांमध्ये त्या वेळी नेमकी काय चर्चा झाली ते काळालाच ठाऊक! याशिवाय नेताजी सुभाषचंद्र बोसही १९३१ साली सिंहगड भेटीवर आले होते. टिळक बंगल्यातच ते मुक्कामाला होते. कराची काँग्रेस सोडून आलेल्या नेताजींनी या सिंहगडावरच टिळक बंगल्याच्या सहवासात नव्या लढाईची प्रेरणा घेतली. आज इथे आलं, की हे सारे इतिहासभारले क्षण रोमांच उमटवत आठवतात.
या बंगल्यामागूनच एक वाट उत्तरेकडे राजाराममहाराजांच्या समाधीकडे उतरते. ऐन कडय़ालगत ही वास्तू! महाराष्ट्रातील हे एक देखणे स्मारक! चौकोनी बांधकाम, चारही दिशांना निमुळते होत गेलेले छत! इथे आतमध्ये राजारामांच्या पादुका, देवीची एक मूर्ती आहे. शिवाजीमहाराजांच्या नित्यपूजेतील एक तेजस्वी बाणही (शिवलिंग) इथे होता. हा बाण कोणी-कुठे हलवला याची माहिती मिळत नाही. समाधीचा हा परिसर स्वच्छ, मोकळा, शांत आहे. शेजारी पाण्याचे टाके आहे. पाठीमागे आता काही वर्षांपर्यंत गुलाबाची बाग होती. खरेतर इतिहासकाळात या समाधी आणि परिसराची व्यवस्था पाहण्यासाठी काही योजना लावून दिलेली होती. या साऱ्यांमुळेच हे स्मारक आज या अवस्थेत दिसते.
सिंहगडाचा हा मध्यभाग पाहात पुन्हा देव टाक्यावरून कल्याण दरवाजात उतरावे. एका खाली एक दोन दरवाजे! पैकी वरच्या दरवाजाच्या माथ्यावर दोन ओळींचा शिलालेख आहे.
‘‘श्री शालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान’’
बाळाजी बाजीरावाने हा दरवाजा बांधला किंवा दुरुस्त केला असा याचा अर्थ! या दरवाजाभोवतीच्या बुरुजांवर माहुतांसह हत्तीशिल्पं कोरली आहेत. पैकी डावीकडील अद्याप शाबूत आहे. याचा लाकडी दरवाजा आत्ता वीस-पंचवीस वर्षांपर्यंत उत्तम अवस्थेत होता. पण पुढे त्याला पाय फुटले. त्याच्या पोलादी साखळय़ा आजही दिसतात. आता त्या तरी भुरटय़ा चोरांपासून वाचवल्या पाहिजेत.

हे सारे पाहावे आणि दरवाजामागील टेकडीवर चढावे. इथे उदयभान राठोड यांचे स्मारक! एकेकाळी चौथरा आणि घुमटी असलेले हे स्मारक आता जवळपास भुईसपाटच झाले आहे. त्याचे ते कोरीव दगड अस्ताव्यस्त पडले आहेत. पुरातत्त्व खात्याच्या देखरेखीखाली असलेल्या या गडावर दिवसामागे ऐतिहासिक इमारती नामशेष होत आहेत आणि दुसरीकडे रोज एक नवी टपरी वाढते आहे. या गडाचा तट आता अनेक ठिकाणी ढासळू लागला आहे. कल्याण दरवाजाचा बुरूज नुकताच ढासळला. उदयभानचे स्मारकही नाहीसे झाले. दुसरीकडे गडावर वाढलेले बाजारू पर्यटनही सिंहगडाला त्रासदायक ठरू लागले आहे. या पर्यटकांकडून सरकार प्रवेशशुल्कापोटी पैसे गोळा करते. पण त्याचा वापर प्रत्यक्ष किल्ला वाचविण्यासाठी करण्याऐवजी सुशोभीकरणावरच होत आहे. गडावर झुणका-भाकरी, दही-ताकापुरता असलेला स्थानिक लोकांचा रोजगार ठीक होता, पण आता गडाच्या दरवाजात पानाची टपरी टाकून पान-तंबाखू विक्री होत असेल तर हे पुरातत्त्व खाते खरेच झोपले आहे असे म्हणावे लागेल.
असो! सिंहगडाच्या नशिबाचे भोग म्हणावेत आणि पुढे निघावे. उदयभान स्मारकाच्या या टेकडीवरून आपण थेट दक्षिणेच्या झुंजार बुरुजावर उतरतो. या बुरुजावर आलो, की लगेचच समोरच्या डोंगररांगांतील राजगड, तोरणा खुणावू लागतात. काही भटके याला प्रतिसाद देत सिंहगड-राजगड-तोरणा अशी वारीही करतात.
झुंजार बुरूज ते पश्चिम टोकाचा कलावंतिणीचा बुरूज यामध्ये एक भलीमोठी तटबंदी घातली आहे. या दरम्यानच्याच डोणागिरीच्या कडय़ावरून तानाजी त्यांचे मावळे घेऊन वर आले होते. हे सारे पाहात कलावंतिणीच्या बुरुजावर यावे. समोरचा दऱ्याखोऱ्यांचा खेळ मन गुंतवून टाकत असतो. आकाश निरभ्र असेल तर इथे उभे राहून तळातील हालचाल निरखावी. मुठेचे ते चमचमते पात्र आणि त्याभोवतीची शेतीवाडी पाहावी. कधी इथूनच तो धीरगंभीर सूर्यास्त पाहावा आणि पूर्वेला उगवणारा तो पौर्णिमेचा चंद्रही मनात साठवावा. पाऊसकाळी बाष्पाने भरलेले ढग हा कडा चढत असतात. ते वेगाने येतात, आदळतात आणि विस्कटतातही. सारी दरी धुकटाने भरून जाते. मग त्याला हटवत मधेच ‘सू ऽ सूऽऽ’ आवाज करत वाराही घोंगावतो. निसर्गाचे हे सारे खेळ अनुभवताना समाधी लागते आणि मग अचानकपणे त्या वाऱ्यावर डफ आणि शाहिरांचे आवाजही स्वार होतात.
..चार फेब्रुवारी १६७०, माघ वद्य नवमीची ती काळरात्र! तो शूर नरसिंह आणि पाचशे रणमावळे! घोरपड लागावी त्याप्रमाणे ते सारे कडय़ाला चिकटले.. कडा चढून गडावर दाखल झाले.. हर हर महादेवच्या गर्जना उठल्या आणि त्या अंधाऱ्या रात्री सिंहगडावर एकच हलकल्लोळ झाला. प्रचंड मोठे रणकंदन झाले. पाचशे मावळे दीड हजार गनिमांना भिडले. तलवारीला तलवार भिडली. जणू विजेवर वीजच आदळली. वादळ वणवा पिसाटला.. उदयभान आणि तानाजी मालुसरे तर एकमेकांवर तुटून पडले.. घावावर घाव पडू लागले.. यातच रावांची ढाल तुटली, पण तरीही ते लढले. अखेर दोघेही धारातीर्थी कोसळले. नरवीर झाले. मराठय़ांचा सिंह गेला, पण गड आला! शिवबांच्या तानाजीने पूर्वीच ठेवलेले ‘सिंहगड’ हे नाव सार्थक केले!
सिंहगडाला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात, पण त्यातले अनेकजण गड कुठे दिसलाच नाही असे म्हणत नाक मुरडतात. ‘इतिहास’ दिसण्यासाठी त्यात बुडावे लागते आणि ‘भूगोल’ सापडण्यासाठी त्यात हरवावे लागते. असे ज्याला जमते, त्याच्या डोळय़ांपुढे मग सतराव्या शतकातील ते रणकंदनही सहज नाचू लागते!


------------ लोकप्रभा 



Thursday 9 August 2012

मस्त मटनाची मेजवानी!




असं म्हणतात की प्रत्येक दहा मैलावर भाषा बदलते, तसेच पदार्थ पण बदलतात. परिसरात मिळणाऱ्या गोष्टींचा प्रभाव प्रत्येक प्रदेशाच्या पदार्थावर दिसतो. कोकणात नारळ, काजूचा वापर तर देशावर सुकं खोबरं, कडधान्य, लाल मीरची! आता हेच बघा नं, एकच मटण, पण त्याचे प्रदेशाप्रमाणे प्रकार तरी किती.. अहो म्हणूनच अगदी नवाबापासून तर अगदी सामान्य माणसापर्यंत याचे सगळेच चाहते! या आठवडय़ात मटणाचे विविध प्रदेशातील त्या मातीचा गंध घेऊन आलेले प्रकार बनवायला हवेत की नाही..  
 

हिरव्या मसाल्याचं विदर्भी मटण!
 
 

साहित्य : 
मटण - वीथ बोन - अर्धा किलो. 

मसाल्याचं साहित्य : 
धणे - २ टीस्पून, जिरे - १ टीस्पून, काळी मिरी - १ टीस्पून, तेजपान - १, दालचिनी - १ तुकडा, वेलची हिरवी - ४-५, स्टार फूल - १, तीळ - २ टीस्पून, खसखस - ३ टीस्पून, सुकं खोबरं किसलेलं - ४-५ टीस्पून, लवंग - ७-८, हिरव्या मिरच्या - ५-६, कोथिंबीर - १ जुडी (धुऊन, देठासकट, मूळं कापून घ्या)
इतर साहित्य : तेल - ४-५ टेबलस्पून, बारीक चिरलेला कांदा -२ मध्यम आकाराचे, आलं लसूण पेस्ट - ३-४ टीस्पून, हळद - १ टीस्पून, मीठ- २-३ टीस्पून. 

कृती : 
मटण व्यवस्थित धुऊन त्याला मीठ, हळद, आलं, लसूण लावून ठेवून घ्या. साधारणपणे १ तास तरी असं मॅरिनेट करून ठेवा.
मंद आचेवर मसाल्यासाठी दिलेलं साहित्य भाजून घ्या. भाजून झाल्यावर सगळ्यात शेवटी हिरवी मिरची व कोथिंबीर टाका व गॅस बंद करा. आता हा मसाला थंड पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या. कढईत तेल गरम करावं, कांदा टाकून लाल होईपर्यंत परतून घ्या. आता मटण टाकून छान परतून घ्या. थोडं गरम पाणी टाकून मंद आचेवर मटण २०-२५ मिनिटे शिजवून घ्या. मग वाटलेला हिरवा मसाला टाका. आवश्यक असल्यास थोडं पाणी टाका व मटण व्यवस्थित शिजवून घ्या व गरमागरम भाकरीबरोबर सव्‍‌र्ह करा.
* वाटलेला हिरवा मसाला शक्यतो शेवटी टाका, म्हणजे जास्त काळा होणार नाही.
खोबरं किसायच्या आधी वरचा काळा भाग चाकूनं कापून घ्या, म्हणजे आपला मसाला जास्त काळा होणार नाही.

मँगलोरीयन मटण सुक्का!

 

साहित्य : 
मसाला :- बेडगी मिरची - ५-६, काश्मिरी मिरची -४, काळे मिरे - १ टी स्पून, जिरे पाव चमचा, धणे १ चमचा, चक्रफूल - १, दालचिनी  - १ (छोटा तुकडा), वेलची - ३, सुके खोबरे किसलेले - १ वाटी, लसूण - ३-४ पाकळ्या, आलं - १ छोटा तुकडा, बडिशेप अर्धा चमचा, खसखस - १ टी स्पून, मेथीचे दाणे - ४-५ दाणे, मटण - अर्धा किलो (बोनलेस)

मटण शिजवत असताना लागणारं साहित्य : 
आलं लसूण पेस्ट - २ टी स्पून, हळद १ टीस्पून, लाल मीरची - १ टी स्पून, मीठ आवश्यकतेनुसार.

कृती : 
मटण नीट धुऊन उकळत्या पाण्यात टाकून एका मिनिटानंतर गाळून घ्या व पाणी फेकून द्या व मटण पुन्हा धुऊन घ्या. आता मटणाला आलं, लसूण, हळद, लाल मिरची व मीठ लावून घ्या. साधारणपणे १ तास बाजूला ठेवून द्या. आता पाणी (१ लीटर) उकळायला ठेवा. आता एका भांडय़ात थोडं तेल टाकून, मटण थोडं तेलावर परतून घ्या व मग गरम पाणी टाकून मटण उकळत शिजवून घ्या. (साधारणपणे पाऊण तासात मटण शिजायला हवं. मटण शिजत असताना बाकीचा मसाला वगरे करून घ्या.)
मसाला करण्यासाठी मंद आचेवर मसाल्यासाठी दिलेलं साहित्य भाजून घ्या व मिक्सरमधून थोडं पाणी टाकून बारीक करून घ्या. आता पॅनमध्ये तेल गरम करून, हा मसाला परतून घ्या व मग शिजलेलं मटण व मटणाचं पाणी टाकून छान शिजू द्या. मसाला सगळा मटणाला चिटकायला लागल्यानंतर गॅसवरून काढून ताबडतोब सव्‍‌र्ह करा. या प्रीपरेशनबरोबर आप्पम छान लागतात. भाकरीबरोबर पण छान लागत.
* मसाला मंद गॅसवरच भाजा, नाहीतर करपेल व मसाला कडू होईल.

हैदराबादी पथ्थर का गोश्त!
 
 

 ही एक हैदराबादी पद्धतीची रेसिपी आहे. खरं तर पारंपरिक पद्धत म्हटली तर कोळशावर जाड दगड ठेवून तो गरम करून त्यावर हे शिजवतात, पण आपण ही रेसिपी जाड तव्यावर करणार आहोत.

साहित्य : 
मटण (बोनलेस) बोटी - ३०० ग्रॅम, कच्च्या पपईची पेस्ट सोलून - २ टी स्पून, आलं लसूण पेस्ट -२ टी स्पून, बडिशेप पावडर- अर्धा चमचा, मीठ - चवीनुसार, जायफळ पावडर -  १ चिमूट, गरम मसाला - अर्धा टीस्पून, जिरा पावडर - अर्धा टीस्पून, धणे पावडर - अर्धा टीस्पून, मोहोरीचं तेल - २-३ टीस्पून, बांधलेलं घट्ट दही (हंगकर्ड)- अर्धी वाटी, काळं मीठ - १ टीस्पून, काळी मिरीपूड - चिमूटभर, लाल मिरची पेस्ट - १ टीस्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर -२ टीस्पून, दगडफूल पावडर -१ चिमूट (असल्यास), खसखस बदाम पेस्ट (भिजवून केलेली) - ४-५ टीस्पून.

कृती : 
मटणाला हॅमरनं किंवा एखाद्या बत्त्यानं जरा मारून घ्या व चाकूनं टोच्या मारा. म्हणजे मसाला व्यवस्थित आत जाईल. मग वरील दिलेले सगळे साहित्य मटणाला लावून घ्या. सगळं मिक्स करून मटणाला ३-४ तास मॅरिनेट करून घ्या. आता तवा गरम करून मंद आचेवर थोडं तेल घालून, मटणाचे तुकडे अलगद एक एक घाला. झाकण लावून मंद आचेवर शिजवा.दोन्हीही बाजूनं उलटून पालटून शिजवून घ्या (झाकण लावून). साधारणपणे १० ते १५ मिनिटांत मटण शिजायला हवं. गरमागरम, पराठय़ाबरोबर किंवा नुसतंच सव्‍‌र्ह करा.
*
शक्यतो मटण कोवळं असलं पाहिजे जून नको. व्यवस्थित मॅरिनेट करा.


 ------------------  लोकसत्ता