Tuesday 21 February 2012

येरमाळ्याची येडेश्वरी देवी


येरमाळ्याची येडेश्वरी देवी
-
--


कळंब तालुक्याती येरमाळा हे गाव मुख्य राज्यमहामार्गावर येत असून बालाघाटाच्या कुशी वसले आहे. येथील श्री येडेश्वर देवी जागृत देवस्थान असून महाराष्ट्रासह इतर राज्यातील भक्तगणांचा मोठा जनसागर नारळी पौर्णिमा आणि नवरात्रात याठिकाणी हजेरी लावतो.
हे मंदिर गावच्या दक्षिण बाजूस ३०० ते ४०० फूट बालाघाटाच्या पर्वतीय रांगेत डोंगर माथ्यावर असून या मंदिरात जाण्यासाठी भक्तमंडळींना ४०० ते ४५० पाय-या चढून वर गेल्यानंतरच पुरातन कालीन हेमाडपंथी बांधकाम करण्यात आलेल्या मंदिराच्या आतमध्ये तीन-चार फूट व्यास असलेली यावर शेंदूर लेपून केलेल्या आणि डोक्यावर मुकूट, नाकात नथ, गळ्यात माळ अशा अलंकाराने नटविलेल्या श्री देवी येडेश्वरी तांदळ्याचे भाविकांना दर्शन होते.
देवीसमोर पुत्र परशुरामाची चांदीची मूर्ती आहे. मदिराच्या बाहेरील आवारात देवी मातंगी, हवन होम, श्री गणेश, श्री दत्त, महादेव आणि काळभैरवनाथांचे छोटी मंदिरे आहेत. मंदिरात पाच डिकमल आणि मंदिराच्या मागील डोंगरावर तुळजाभवानी मातेचे मंदिर व एक डिकमल आहे.
या ठिकणी देवीचे स्नानगृह असून देवी येडेश्वरी पार्वतीचे रुप असून रेणुका, अंबा, जगदंबा, तुकाई अशा अनेक नावाने प्रसिध्द असलेल्या असंख्य भक्तांचे देवस्थान म्हणजेच ग्रामीण भागातील येडाई होय. परंतु या देवीच्या कोनाशिला स्थापनेबाबत पुरातत्त्व खात्याकडे कोणतीही नोंद नाही. या देवीबाबात अख्यायिका सांगितली जाते.
एकदा प्रभू राम सितेच्या शोधात या भागात भटकंती करीत असताना देवी पार्वतीने विश्रांतीसाठी थांबलेल्या रामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण करुन येताच रामाने ‘तुकाई तू तर माझी सीता नसून माझी व्याकुळता पाहून सितेचे रुप धारण केलेली तू तू माझी वेडी आई (वेडाई) आहेस’ असे म्हटले. यामुळे देवीस वेडाई या नावाने ओळखले जाते.
आबाजी पाटलांचे कुलदैवत माहूर गडची रेणुका देवी असल्याने त्यांना त्याठिकाणी देवीला वारंवार जाणे शक्य होत नसल्यामुळे त्यांनी येरमाळा येथे डोंगरावरच माहूरगडाप्रमाणे देवीचे हुबेहुब मंदिर बांधले. श्री येडेश्वरी देवीच्या तांदळा माहूरच्या रेणुका देवी प्रमाणेच असून येथील एकमुखी दत्तमंदिर आणि कल्लोळ याचे पुरावे म्हणून भक्तांना पाहवयास मिळतात. चालत आलेल्या परंपरेनुसार आजही नवरात्रामध्ये देवीला भल्यापहाटे पाच दिवस भक्तगण खेटे प्रदक्षिणा पाठीमागे न पाहता घालतात. आजही खेटे घालताना थुंकणे, पाठीमागे पाहणे अनिवार्य मानले जाते. यावेळीच भाविक पांढरा दोरा वाहून डोंगराभोवताली देवीच्या पायथ्यापासून नवसाचे साकडे घालतात. 

नवमीच्या दिवशी देवीला पहाटे अजाबळी देण्याची प्रथा रुढ झाली असून नवमीच्या पहाटे होमहवन तर अश्विन शुध्द दशमीस सिमोल्लंघन केले जाते. येथील देवी राज्यासह इतर राज्यातही प्रसिध्द असून भाविक, लोकप्रतिनधी यांच्या निधीतून सभामंडप, पाय-या कठडे आदी उभे करण्यात आले असून श्री देवी येडेश्वरी देवथान ट्रस्ट येरमाळ (ता. कळंब) यांच्या माध्यमातून भक्तांच्या सोयीसुविधांसाठी आणि त्यांना रांगेतच उभे राहवे लागते यासाठी उड्डाण पुलाची व्यवस्था आणि त्यावरील निवारा करण्यात आला आाहे. मलाकूर येथील पाझर तलावातून पाईपलाईन करून ती उपळाई येथील शेतक-यांच्या विहिरीत पाण्याची साठवण करून मंदिरात आणि मंदिर परिसरात कामयस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात आला आहे. भाविकांसाठी शौचालय व्यवस्था, मंदिरासह परिसरात प्रकाश व्यवस्थाही केली आहे.
ट्रस्टच्यावतीने प्रसाद केंद्र चालविले जात असून, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासठी जाण्यासाठी देवी ट्रस्टच्या माध्यमातून सिमेंट रस्ता व प्रकाश योजना राबविण्यात आली आहे.

 --- Sabhar (shivsankalp)

4 comments:

  1. ￰अतिशय सूंदर माहिती पोस्ट केली आहे धन्यवाद.

    ReplyDelete
  2. आम्ही दोन वेळा जाऊन आलो. जय आई येडेश्र्वरी.

    ReplyDelete