Tuesday 28 February 2012

प्रवासाला निघताना







मार्च, एप्रिल महिन्यात अनेक प्रकारचे मानसिक ताण अनुभवाला येतात. परीक्षेचा ताण केवळ विद्यार्थ्यांनाच असतो असे नव्हे, तर पालकांनाही हा ताण येतोच. 31 मार्चला आर्थिक वर्ष संपणार असल्यामुळे मोठा व्यवसाय असो वा नोकरी असो, ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक व्यवसायात मार्च महिन्यात अधिक वेळ काम करावे लागते. एवढे करून संपूर्ण वर्षाचा नफा-तोटा डोळ्यासमोर दिसायला लागल्यानेसुद्धा बऱ्याच वेळा मानसिक ताण तयार होतो. म्हणून असेल किंवा "केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार' या उक्‍तीप्रमाणे असेल, पण परीक्षा संपण्यापूर्वीच परीक्षेनंतर येणाऱ्या सुट्टीचे नियोजन सुरू होते. 

सुट्टीसाठी कोठे जावे, यावर बरीच चर्चा होऊ शकते. ज्यांच्या घरात लहान मुले आहेत त्यांना मुलांना समजेल, त्यांना आनंद वाटेल, खेळता येईल, काहीतरी नवीन पाहता येईल असे ठिकाण निवडावे लागते. मुले मोठी असतील तर ती स्वतंत्रपणे आपल्या मित्रमंडळींबरोबर प्रवासाला जाऊ शकतात. सुट्टीत एखाद्या कला प्रशिक्षणाच्या वर्गाला जाणे; चित्रकला, पोहणे वगैरे छंद जोपासणे; वनस्पतींची माहिती मिळविण्यासाठी जवळपासच्या रानात भटकायला जाणे वगैरे जीवनात उपयोगापेक्षा आनंद देणाऱ्या गोष्टी शिकण्यासाठी मुले स्वतंत्रपणे जाऊ शकतात. त्यांचे पालक कुठल्यातरी नवीन स्थळाला भेट देण्यासाठी, तिथले लोकजीवन पाहण्यासाठी प्रवासाचा बेत ठरवू शकतात. प्रत्येक प्रवासात एखादा नवीन प्रदेश पाहणे, तेथील लोकांचे जीवन, त्यांच्या चालीरीती पाहणे, त्यांच्याबरोबर राहण्याचा अनुभव घेणे, याचा आनंद घेता येतो. त्याचबरोबर आरोग्यासाठी, म्हणजेच ज्या ठिकाणी पंचकर्माची सोय आहे, ज्या ठिकाणी शरीराला आवश्‍यक असणारे अभ्यंग, स्पा वगैरे उपचार मिळू शकतील, अशा ठिकाणी ते जाऊ शकतात. नायगरा फॉल्स, ताजमहाल वगैरे जगातील चमत्कार पाहण्यासाठीही प्रवासाचा बेत ठरविता येतो. सध्या ऍग्रो टुरिझम म्हणजे आपण जे अन्न खातो त्या अन्नधान्याची, शेतीभातीची माहिती करून घेण्यासाठी कोठेतरी जाता येते. आपण जी वस्त्रे वापरतो ती चांगली-वाईट आहेत हे कसे ठरवावे, ती कशी तयार होतात, रेशमी वस्त्र कसे तयार होते, अशा तऱ्हेची माहिती मिळविण्याच्या दृष्टीने प्रवास करता येतो.

प्रवासाला कुठेही जायचे असले- ठिकाण जवळ असो वा लांब, स्वतःच्या देशात असो वा परदेशात असो, त्याची आखणी वेळच्या वेळी करणे, प्रवासाचे व राहण्याच्या जागांचे आरक्षण आगाऊ करणे, आपण जर
मित्रमंडळींकडे वा नातलगांकडे उतरणार असू तर त्यांना वेळच्या वेळी तसे कळवणे, त्यांची सोय पाहणे आवश्‍यक असते. प्रवासाची तयारी जर व्यवस्थितपणे केलेली असली तर प्रवासाचा ताण अजिबात जाणवत नाही, प्रवास सुखकर होतो. ज्या ठिकाणी प्रवासाला जाणार त्या ठिकाणी खाण्या-पिण्याची काय सोय आहे, आपण जे अन्न नेहमी खातो ते अन्न आपल्याला तेथे मिळू शकणार आहे का, नसल्यास आपल्याला काय सोय करावी लागणार आहे, कोणते रेडिमेड पदार्थ नेता येतील वगैरे विचार करून त्यानुसार तयारी करणे इष्ट ठरते.

प्रवासात कुठलाही आजार येऊ नये किंवा कुठलाही त्रास होऊ नये याची खूप काळजी घ्यावी लागते. अपरिचित हवामान, अपरिचित खाद्यपदार्थ यामुळे तब्येत बिघडू शकते. आपल्याला मधुमेह, रक्‍तदाबासारखे विकार असतील तर त्यासाठी आवश्‍यक असलेली औषधे दोन-तीन ठिकाणी विभागून बरोबर ठेवावीत. सामान
उशिरा येणे, हरवणे असे झाल्यास औषधे बरोबर असल्यास गैरसोय टळू शकते. सर्व औषधे ठेवलेले सामान हरवले वा वेळेवर पोचले नाही तर बरोबर डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्यास औषधे मिळतीलच याची खात्री नसते, परदेशात तर तेच औषध वेगळ्याच नावाने मिळण्याची शक्‍यता असते. 
 
प्रवास जर हिमालयासारख्या ठिकाणचा असेल, म्हणजेच आपण जर अति थंड ठिकाणी वा बऱ्याच उंचीवर जाणार असू तर दमा वगैरे कुठल्याही प्रकारचा त्रास नसावा किंवा तेथे गेल्यावर कुठल्याही प्रकारचा श्‍वसनाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. असा त्रास होण्याची शक्‍यता वाटत असल्यास त्यावरची औषधे, श्‍वास लागल्यावर आवश्‍यक असणारा स्प्रे घेऊन जाणे इष्ट ठरते. तसेच थंडी बाधू नये अशा दृष्टीने तसे कपडे नेणेही गरजेचे असते. थंडी असली तर बहुतेक वेळा स्वेटर, मफलर, कानटोपी वापरली जाते, परंतु पायाकडे दुर्लक्ष केलेले असते. पाय अति थंड जमिनीवर ठेवले गेले तर त्रास होऊ शकतो, या दृष्टीने पायमोजे बरोबर असणे महत्त्वाचे असते. सुंठ-तूप-गूळ यापासून बनवलेली गोळी, आलेपाक, आयुर्वेदिक औषधातील श्‍वासकुठार, "प्राणायाम, योग' वगैरे औषधे उपयोगी पडू शकतात. हृदयविकार असणाऱ्यांनी जिभेखाली ठेवायची गोळी बरोबर घेतली असली तरी आयुर्वेदीय पद्धतीने बनविलेली मधातील औषधे ताबडतोब कार्य करतात, हृदयाला ताकद देतात- ज्यामुळे वातावरणात झालेल्या बदलाचा, थंडीचा त्रास होत नाही हे लक्षात ठेवून अशी औषधेही बरोबर घ्यावीत.

जुलाब, उलटी, ताप व सर्दी या चार गोष्टींपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने यावर उपयोगी पडणारी औषधे अवश्‍य बरोबर ठेवावीत. प्रवासाच्या दिवसांत काही त्रास होऊ लागल्यास ताबडतोब डॉक्‍टर उपलब्ध होणे, तसेच औषधे मिळणे शक्‍य होईलच असे नसते. त्यातही रात्रीची वेळ असल्यास अधिकच त्रास होऊ शकतो.

प्रवासाला गेले असता तेथल्या वातावरणाशी समरस होऊन प्रवासाचा आनंद प्रत्येकाने घ्यावा, संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीशी प्रेमाने व मैत्रीपूर्ण भाव ठेवून संबंध प्रस्थापित करावेत, म्हणजे प्रवासाचा अधिक आनंद व फायदा मिळू शकतो.
* पहिलाच सहकुटुंब प्रवास असेल तर शक्यतो व्यावसायिक सहल आयोजकांमार्फत सहलीला जावे.
ह आपल्याबरोबर असणार्‍या लहान मुलांच्या खाण्यापिण्याची वेगळी माहिती सहल व्यवस्थापकाला व्यवस्थित द्यावी. ‘लहान मूल आहे. मग हे लागणार एवढे कळत नाही का?’ असे प्रश्‍न विचारून येणारे कटू प्रसंग टाळावेत.
* एकत्र सहलीला गेल्यावर नवरा-बायकोपैकी एकाने शक्यतो जेवणासाठी थांबण्याअगोदर इतर काहीतरी खाऊन घ्यावे, ज्यामुळे तुम्हाला मुलाला खाऊ घालणे सोपे जाते. अन्यथा कुणाचेच जेवण व्यवस्थित न झाल्याने मनस्ताप होऊन सहलीचा आनंद कमी होऊ शकतो.
* हिंदुस्थानातल्या सहलीला जाताना आपल्या मुलांमुळे एखादे ठिकाण दोघांना एकत्र पाहणे शक्य नसल्यास, एकाने बसमध्ये किंवा हॉटेलमध्ये थांबून मुलाकडे पूर्ण लक्ष द्यावे व दुसर्‍याने सहलीचा आनंद घ्यावा. सहल ही ८-१५ दिवसांची असली तरी, त्या आनंदासाठी मुलांची जबाबदारी टाळणे योग्य नव्हे.
* सहकुटुंब सहलीला जाताना आपल्या मुलांचीच औषधे न घेता मोठ्यांना लागणारीही नेहमीची औषधे जवळ ठेवावीत.
* स्वत:च्या वाहनाने प्रवास करताना ज्या भागात प्रवास करणार आहोत त्या भागातील, आपल्या वाहनाच्या संबंधित सर्व्हिस सेंटर / डिलर इत्यादींची माहिती शक्यतो प्रिंट स्वरूपात जवळ ठेवावी.

* सहकुटुंब प्रवास करताना बरोबरच्या सर्वच सदस्यांच्या गरजांचा तसेच उद्देशांचा विचार करावा. एखाद्या बीचवर सहकुटुंब सहल काढताना, कुटुंबातल्या ज्येष्ठ सदस्यांसाठी एक संध्याकाळ त्या ठिकाणच्या मंदिरात जावे, ज्यायोगे ‘सहल म्हणजे दररोजच्या धावपळीतून सुटका’ हे सर्वांसाठीच शक्य होते.


कपडे-
  • कुठेही गेलात तरी कपडे हे सुटसुटीत असावेत ही गोष्ट लक्षात ठेवा.
  • आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणच्या हवामानानुसार कपड्यांची निवड करावी. थंड हवामानाच्या जागी अंग पूर्ण झाकणारे सुती कपडे न्यावेत. साड्या शक्‍यतो टाळा. पंजाबी सूट चालेल. कुठल्याही वयाच्या स्त्रियांना चालेल असा हा अत्यंत सुटसुटीत पोशाख आहे. लेगिन्स आणि त्यावर वेगवेगळे कुर्ते हा सध्याचा लोकप्रिय पर्यायही वापरून पाहायला हरकत नाही.
  • कपड्यांची संख्या शक्‍य तितकी कमीच ठेवावी.
  • एक लक्षात ठेवावं, की आपण बाहेर फिरायला जात आहोत ते नवीन गोष्टी पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी. कपड्यांचं प्रदर्शन करायला आपण तिथे जात नाही. त्यामुळे खूप भडक, अंगात खूप फिट्ट बसणारे, उत्तेजक कपडे घालू नका.
  • ट्रेकिंगला जायचं असेल तर मुलींनी जीन्स घालणं टाळावंच. त्याऐवजी ट्रॅकसूट किंवा लूज टी शर्ट आणि पॅंट घालणंच चांगलं.
इतर वस्तू-
  • बाहेर फिरताना पायांत अगदी स्पोर्टस शूज नसले तरी पाय बंद राहतील असे आरामदायी शूज शक्‍यतो असावेत. मुख्य म्हणजे त्यांची खरेदी आदल्या दिवशी करू नये, बरीच आधी करून ठेवावी आणि एकदोनदा घालून पायांना थोडी सवय असू द्यावी.
  • तुमचं जास्त चालणं होणार असेल तर चपला अजिबात नेऊ नका.
  • प्रवासात दागिने आणि तत्सम मौल्यवान वस्तू नेणं, अंगावर घालणं हे अत्यंत चुकीचं. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अशा वस्तू सांभाळणं अवघड असतं. त्यामुळे शक्‍य तेवढं मोकळं जाणं, राहणं, असा दृष्टिकोन ठेवावा.
  • कॅमेरा नीट चार्ज करून घ्या.
  • फॅन्सी पर्सेस टाळा. त्याऐवजी शक्‍य असेल तर खांद्यांवर क्रॉस करून घालता येण्यासारखी बॅग घ्यावी.
  • साधी, जास्त कप्पे नसलेली अशी पर्स किंवा बॅग घ्या. ती आधी रिकामी करून ठेवा; नाही तर आधी त्यात ठेवलेली बिलं, याद्या, छोट्या-मोठ्या वस्तू यात प्रवासात आवश्‍यक असणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू म्हणजे तिकिटं वगैरे गहाळ होऊन बसतात.
पॅकिंग-
  • बऱ्याचदा बॅगांची निवड अत्यंत चुकीच्या पद्धतीने केली जाते. एक मोठी, एक छोटी असं तोल बिघडवणारं आणि शरीरावर ताण आणणारं वजन तयार होतं. परत आल्यावर त्यामुळे पाठदुखी वगेैरे त्रास होऊ शकतात. म्हणून एकच मोठी बॅग घेण्याऐवजी दोन सारख्या वजनाच्या बॅगा घ्याव्यात.
  • प्रत्येक गोष्ट ही घरूनच नेली पाहिजे, हा अट्टहास टाळावा.


No comments:

Post a Comment