Tuesday 28 February 2012

विवाहाच्या उत्क्रांतीचा इतिहास !





केव्हाही स्त्री-पुरुष संबंध आणि केव्हाही मूल अशा नीतीनियमविरहित अवस्थेपासून ते विवाहबंधनापर्यंतचा मानवाचा प्रवास का आणि कसा झाला? या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे कोणते होते? विवाहानंतर पत्नीने पतीच्या घरी राहायला जायची पद्धत का व कशी सुरू झाली? विवाहाच्या उत्क्रांतीचा इतिहास उलगडून दाखविणारा लेख-
 
पुरुषाने क्रूर जंगली जीवनापासून परावृत्त व्हावे, कुटुंबव्यवस्थेत त्याला योग्य भूमिका मिळावी, तो स्थिर व्हावा, नातेसंबंधाशी तो भावनिकदृष्ट्या समरस व्हावा, त्याला अपत्यसुख मिळावे- असे प्रयत्न मातांनी सतत केले. आपल्या मातृकुटुंबात पुरुषाला सामावून घेण्याचे प्रयत्न विफल झाल्यावर स्त्रियांनी पुरुषकुटुंबात, पतीगृहात आपला समावेश विवाहाद्वारे मान्य केला. त्याकरिता आपल्या नैसर्गिक मातृकुळाचा आधार आणि भावांचे संरक्षण डोळ्यादेखत कोसळू दिले..
विवाहाच्या उत्क्रांतीचा अभ्यास कशासाठी? तर विवाह ही शरीरसंबंधाची स्वीकारलेली एक पद्धत आहे. अशा शरीरसंबंधाच्या विविध पद्धती आपल्या पूर्वजांनीसुद्धा स्वीकारल्या, बदलल्या. त्यांनाही अडचणी आल्या, पेच निर्माण झाले. त्यातून त्यांनी मार्ग कसे काढले, त्याकरिता मानसिकता कशी बदलावी लागली, हे सर्व गेल्या ५० हजार वर्षांपासून जर आपण तपासलं तर आजही विवाहासमोर ज्या अडचणी आपल्याला वाटतात, त्या सोडविण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या विचारपद्धतीचा काही उपयोग होऊ शकतो का, मार्ग सापडतो का, हे निश्चितच आपल्याला समजू शकेल.
विवाहाच्या उत्क्रांतीच्या इतिहासाला सुरुवात करताना, सर्वप्रथम माणसाच्या शरीरात त्याच्या पूर्वजांच्या तुलनेत कोणते बदल झाले, हे आपल्याला पाहावं लागेल, कारण तरच मानवाचे वर्तन, त्याच्या भाव-भावना, मानसिकता याचा अर्थ आपल्याला समजेल. पहिला शारीरिक बदल हा मानवी स्त्रीमध्ये झाला, तो म्हणजे तिचा ‘estrus period’ म्हणजेच तिचा ‘प्रजनन काल’ उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर नाहीसा झाला. म्हणजे स्त्री-पुरुषांचे केव्हाही संबंध आणि केव्हाही मूल अशी स्थिती निर्माण झाली. साहजिक मनुष्यसंख्येवरचं निसर्गाचं नियंत्रण गेलं आणि ती स्त्री-पुरुषांची जबाबदारी झाली. स्त्रीचा ‘estrus period’ जाणे ही शारीरिक घटनाच शरीरसंबंधाच्या नियमनाच्या पद्धतीची मानवाला गरज वाटण्याची जननी आहे.
त्यानंतर माणसातला दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे, त्याच्या मेंदूचा आश्चर्यकारक विकास! हा पूर्ण विकास गर्भातच झाला असता, तर डोक्याचा आकार इतका मोठा झाला असता की स्त्रीला जन्म देणं शक्य झालं नसतं. म्हणून अर्भकाच्या मेंदूचा गर्भाशयातला विकास हा सुमारे ३० टक्के असतो. बाकीचा विकास हा अर्भकाने जन्म घेतल्यानंतर पुढील १५ ते २० वर्षांत होत असतो. अर्थात मनुष्याची बाल्यावस्था प्रदीर्घ झाली. त्यामुळे
बालसंगोपनाची स्त्री-मातेची वर्षे वाढत गेली. ही एक प्रकारे स्त्रीवरची आपत्ती होती. कारण एका बाजूला सततच्या बाळंतपणाचा धोका आणि त्यात बालसंगोपनाचा काळ वाढलेला. ही परिस्थिती अशीच राहिली असती, तर मनुष्यप्राणी जिवंत राहिला नसता. परंतु याची भरपाई म्हणून निसर्ग आणखी एक शरीरबदल स्त्रीमध्ये आणतो आणि तो म्हणजे ‘मेनापॉज’! हा मेनापॉज फक्त मानवी स्त्रीलाच आहे. तो चिपांझी-गोरिलाच्या प्राणीमातांना नाही.
‘मेनापॉज’मुळे स्त्री मातृत्वचक्रातून मुक्त होत असते. हीच स्त्री मग आपल्या मुलीच्या-मुलांच्या संगोपनात हातभार लावते. इथे Nature’s selection हा डार्विनचा मुद्दा दिसतो. वास्तविक पुरुष हा बालकाचा जैविक पिता असताना, त्याच्याच शरीरात पितृत्वादाखल बदल देऊन ‘पिता’ म्हणून त्याला स्त्रीच्या मदतीसाठी उभे करण्याचे काम निसर्ग करीत नाही, तर तो दोन मातांना तयार करतो. एक जन्म देणारी माता आणि दुसरी आजी-माता! अशा रीतीने आजी-पालकत्वाचा उदय आपल्याला फक्त मानवी जीवनातच दिसतो. अन्य प्राणीजीवनात आजी-पालकत्व आढळत नाही. याबाबतचं संशोधन अमेरिकेतील उटाह विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानववंश शास्त्रज्ञ डॉ. क्रिस्टेन हॉक्स आणि डॉ. निकोलस जोन्स यांच्या टीमने सन १९९८-९९ मध्ये केलं. ते असे की, ‘स्त्रीला मुलं झाली की काही महिने ती अंगावर पीत असतात. मग आई त्यांना कंदमुळं देऊ लागते. पण आईला पुन्हा दिवस गेले की, त्या मुलांना ना अंगावरचं दूध मिळत ना कंदमुळं! अशा वेळी त्या मुलांची आजी, म्हणजे त्या स्त्रीची आई, त्यांच्या मदतीला येते व त्यांच्या खाण्याची जबाबदारी स्वत:कडे घेते. अशी आजी ज्या मुलाला  लाभते, ते मूल पुन्हा बाळसं धरतं व प्रगती करतं. याउलट आजी नसलेल्या मुलाचे हाल होतात.’
मुळातच स्त्रीला स्थैर्याची गरज पुरुषाच्या तुलनेत जास्त असते. तशी ती प्रत्येक प्राणीमातेलाच तिच्या
बाळंतपणासाठी, एके ठिकाणी स्थैर्य गरजेचं असतं. मेंदूच्या विकासातून अग्नीचे उपयोग कळल्यावर, स्त्री ही अग्नी घेऊन गुहेत पहिली स्थिर झाली. स्त्री-समाज पुरुषाआधी स्थिर झाला, असे संशोधक मांडतात, कारण पुरुषाला स्थैर्याची गरज नव्हती.
स्थिर झालेली स्त्री, आपल्या अपत्य संगोपनात अनेक वर्षे घालवू लागल्यावर स्त्रीमध्ये ममत्व आणि 
वात्सल्य या भावना बहरू लागल्या. त्याचबरोबर जंगली अवस्थेतील तिची क्रूरता आणि हिंसकता यांचा झपाटय़ाने ऱ्हास होऊ लागला. मातेच्या दीर्घकाळ सान्निध्यामध्ये अपत्ये राहिल्यामुळे, त्यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होऊ लागला. मात्र, आजच्या भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ वगैरे भावना तेव्हा नव्हत्या. फक्त स्त्री-पुरुषांच्या जोडय़ांना जन्माला घालणारी एक माता आणि एकाच मातृत्वाने बांधलेल्या या जोडय़ा, म्हणून त्यांच्यामध्ये एक सौहार्द होते. हीच भावंडे मोठी होऊन आजच्या भाषेतल्या मामा-मावश्या व्यक्तिमत्त्वाचा मातृटोळीत समावेश होत होता. अशा रीतीने आई-अपत्ये, मामा-मावश्या, आजी असे मिळून मातृटोळ्या जमिनीवर स्थिर होऊ लागल्या.
स्त्री-समाजाच्या स्थिरतेमुळेच शरीरसंबंधाचा प्रश्न ऐरणीवर आला. कारण आधीच्या अस्थिर आणि झाडावर राहून संरक्षण करण्याच्या कालखंडात स्त्रिया पुरुषांना सहज उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे शरीरसंबंधाचे नियमन आपोआपच होत होते. परंतु स्थिर झाल्यावर जंगली पुरुष टोळ्यांना स्त्रिया एका जागी उपलब्ध होऊ लागल्या.
पुरुषांचे ४० हजार वर्षांपूर्वीचे जीवन कसे होते? मेंदूच्या विकासामुळे पुरुष हा कळप-अवस्थेतून टोळी-अवस्थेत आलेला होता. पुरुषांमध्ये एरव्ही पितृत्वादाखल कोणताही शारीरिक बदल आणि भावनिक जाणीव निसर्गाने निर्माण केलेली नव्हती. अपत्य जन्मामध्ये आपलाही भाग असतो, याची पुरुषाला जाणीव नसल्यामुळे, मातृकुळात त्याला बांधून ठेवणारे कोणतेही पाश नव्हते. आक्रमक, हिंसक अशा जंगली पुरुषांच्या टोळ्या तेव्हा होत्या. जंगली पुरुषांचे स्थिर मातृटोळ्यांवरचे हल्ले आणि अर्भके पळविणे, हा मातांचा अत्यंत चिंतेचा विषय होता. अशा वेळेस मातृकुळांची व अपत्यांची सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय मानून,
कुळाबाहेरील जंगली पुरुषांशी शरीरसंबंध टाळण्यातूनच त्या पुरुषांना दूर ठेवत असत. कुळातील पुरुषांशी म्हणजे भाऊ, मामा, भाचे यांच्याबरोबर स्त्रियांनी शरीरसंबंध ठेवणं हे त्यांना कमी धोक्याचे वाटू लागले.
आज जरी आपल्याला सख्खे भाऊ, मावसभावंडे, मामा वगैरे नात्यातले संबंध धक्कादायक वाटत असले तरी
या अतिप्राचीन काळात नात्याने एकमेकांना कोणी ओळखत नसल्यामुळे, नात्यात शरीरसंबंध करू नयेत, ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. जंगली पुरुषाशी कोणत्याच स्त्रीने संबंध करू नयेत, अशी बंदी घालण्यासाठी कुळातल्याच पुरुषाशी संबंध करावेत, अशी सक्ती निर्माण करणे गरजेचे होते. त्याकरिता मातांनी ‘टॉटेम-विश्वासाचा’ उपयोग करून घेतला. कोणा पशु-पक्ष्यामुळे टोळी जन्माला आली असे मानून त्या प्राण्याचे नाव टोळ्यांना दिलेले आढळते. भारतीय संस्कृतीत अशा मूषक, मातंग, नाग, वृषभ टोळ्यांची नावे आहेत. या टॉटेमिझम्मुळे एकच कुलचिन्ह (टॉटेम) असणाऱ्या कुळातील स्त्री-पुरुष यांचे शरीरसंबंध सक्तीचे करणे सोपे गेले.
Endogamy ही अशा रीतीने शरीरसंबंधाची पद्धत म्हणून पुढील काही हजार वर्षे स्थिर झाली. या कालखंडात भावाला काही अधिकार देण्यात आले. त्यापैकी बहिणीची मालमत्ता व तिचा आईकडून येणारा वारसाहक्क सांभाळणे आणि तिच्या मुलांच्या संगोपनात हातभार लावणे, असे दोन अधिकार होते. बहिणीची अपत्ये मात्र कुळातल्या अनेक पुरुषांपासून जन्मलेली असायची. Endogamy च्या पुढील ५ ते १० हजार वर्षांत अनेक शोध लागले. त्यामुळे मातृकुळातून अनेक व्यवसाय, उद्योग उदयाला आले. हळूहळू भाऊ, मामा, भाचे या उद्योगात लक्ष घालू लागले तसेच त्यांचे जंगलातले निर्थक भटकणे संपले आणि ते अर्थपूर्ण झाले. ही मातांच्या दृष्टीने अत्यंत समाधानाची बाब होती. लक्ष घालू लागल्यावर त्यांचं कुळातले वास्तव्य वाढलं. त्यामुळे कुळातील शरीरसंबंधाचं प्रमाण वाढून कुळाची मनुष्यसंख्या हाताबाहेर जाऊ लागली, ही मातांना चिंता होती. त्यापेक्षाही मोठी चिंता अशी होती की, वाढलेल्या शरीरसंबंधामुळे भाऊ, मामा, भाचे यांचे स्त्रियांवरून संघर्ष होऊन हिंसा होऊ लागली.
मात्र याच कालखंडात एक चांगले सामाजिक परिवर्तन येत होते. पुरुष जो कच्चा माल जंगलातून आणत होते,
तो अन्य मातृकुळांनाही ते पुरवीत होते, ज्याची कुलचिन्हे भिन्न होती, त्या कुळातील स्त्रियांशी परिचय होऊन त्यांच्याशी पुरुषांशी संबंध होऊ लागले. त्याचप्रमाणे स्त्रिया आपापली उत्पादने घेऊन दुसऱ्या मातृकुळामध्ये जात असत, तिथे रात्री वास्तव्याला राहण्यातून तिथल्या पुरुषांशी शरीरसंबंध होऊ लागले. अशा रीतीने कुळातच सक्तीचे असणारे संबंध हळूहळू कुळाबाहेर जाऊ लागले. म्हणजे त्याही काळात सक्ती वा बंधने मोडणारे स्त्री-पुरुष होते, हे विशेष!
कुळाबाहेर जाणारे शरीरसंबंध हे मातांसाठी सुचिन्ह होते. त्यायोगे कुळातील संबंधांवर बंदी आणणे सोपे होते. 
अर्थात हळूहळू शरीरसंबंधाची पद्धत उलटी फिरली. एकाच कुळात संबंधाची जिथे काही हजार वर्षे सक्ती होती, तिथे बंदी आली. म्हणजे तांत्रिक शोधामुळे अर्थव्यवस्थेत आणि जीवनपद्धतीत झालेल्या बदलामुळे आधीची शरीरसंबंध पद्धत endogamy पूर्वजांनी संपूर्णपणे रद्द करून exogamy मध्ये प्रवेश केला.
नात्यातल्या संबंधाची काही हजार सवय झालेली असल्यामुळे, हे शरीरसंबंध लगेच बंद पडणार नव्हते. हे ओळखून त्याकरिता काही उपाययोजना आखण्यात आल्या-
* बाहेरील स्त्री-पुरुष संबंधांना मोठं उत्तेजन देण्यात आलं. जसं, आजही आदिवासी जमातीत ‘घोटुळ’ नावाची dormitory गावाबाहेर बांधून देऊन वयात आलेल्या मुला- मुलींना तिथे जाण्यात उत्तेजन देण्यात येत असते. ज्या मातृकुळातील बहुतेक स्त्री-पुरुषांनी कुळाबाहेर संबंध पत्करले त्या कुळातील शांतता व प्रगती हा अन्य कुळांचा आदर्श झाला.
* दुसरा उपाय म्हणजे एकाच मातृकुळामधील हत्या व हिंसांना बंदी आणली गेली. अर्थात ही हिंसा होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कुळांतर्गत असणारे शरीरसंबंध होते. ते थांबवले तरच हिंसा थांबू शकते. त्यातून endogamy बद्दल नकारात्मक मानसिकता तयार होऊ लागली.
* तिसरा उपाय म्हणजे कोणी कुळात शरीरसंबंध केलेच तर मृत्युदंड- डोके छाटण्याची शिक्षा देण्यात येऊ लागली. त्यामुळे स्त्रियांनी आपले मुलगे व भाऊ यांना या शिक्षा होऊ नयेत म्हणून त्यांना अशा संबंधापासून 
परावृत्त करण्यास व स्वत: नकार देण्यास सुरुवात केली.
शेवटचा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे भाऊ व बहीण यांचे वेगळे भावनिक नाते याच कालखंडापासून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. भाऊ-बहीण नात्यात जिव्हाळा व प्रेम हवे, पण शरीरसंबंध नकोत, असे अत्यंत अवघड काम मातांनी अत्यंत कौशल्याने पुढे अनेक शतके अथक परिश्रमाने केले. भाऊ-बहीण नाते हा मानवी जीवनातला चमत्कार होता. हे नाते नैसर्गिक नाही. ते कोणत्याही प्राणी जातीत नाही. ते नाते सांस्कृतिक आहे आणि मानवाच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर निर्माण झालेले आहे आणि तो टप्पा हाच आहे, असे माझे मत आहे.
मातांचे हे प्रयत्न इतके यशस्वी झाले की, भावा-बहिणीमधील शरीरसंबंध ही लाजिरवाणी बाब होऊन ती 
निषेधार्ह, तिरस्करणीय झाली, ती आजतागायत! निव्वळ भाऊ-बहीणच नाही, तर मामा, भाचे, मावसभाऊ या एकाच कुळातील नात्यातील स्त्री- पुरुष शरीरसंबंध थांबवण्यात आले. एकच कुलचिन्ह असणाऱ्या कुळामधील नात्यात संबंधांना बंदी, हीच परंपरा पुढे ‘सगोत्र विवाहबंदी’ म्हणून पितृसंस्कृतीत आलेली दिसते.
अशा रीतीने endogamy सुमारे २० ते २५ हजार वर्षांपूर्वी पूर्णपणे अस्ताला गेली, की तिचे अवशेष आजच्या आदिम, आदिवासी जमातीतही शिल्लक राहिले नाहीत. पण कुळात संबंध आलेच तर प्राचीन काळात सांगितलेल्या शिक्षा तेवढय़ा या आदिम जमातीत दिसतात.
आपण पाहिले की, आपल्या पूर्वजांनी आपली जुनी endogamy सोडून देऊन त्यांनी exogamy पत्करली, यातून आज आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे, असे म्हणायला लागेल.
आज आपणही exogamy मध्ये आहोत; परंतु १५-२० हजार वर्षांमागीली exogamy ची वैशिष्टय़े फार वेगळी होती. मुख्य म्हणजे, मातृकुळातील भाऊ-बहिणी हे कुळाबाहेर शरीरसंबंध करीत होते, तरी ते दोघेही मातृकुळातच राहत होते. भाऊ संबंध करण्यापुरते कुळाबाहेर जात होते आणि बहिणींचे संबंधित पुरुष हे बाहेरून बहिणींकडे येत होते. बहिणी आपले मातृकूळ सोडत नव्हत्या. इथे बहिणींची सुरक्षितता जपली जात होती. हा रिवाज आजही काही आदिम आदिवासीमधून टिकून आहे, याचे पुरावे रॉबर्ट ब्रिफो हा आपल्या ‘X 
The mothers’  या खंडातून देतो. तसेच कमलाताई चट्टोपाध्याय आपल्या ‘Tribes in India’ या पुस्तकातून देतात. तसेच स्टीफन फ्यूज आपल्या १९६३च्या ‘The origin of Man and his culture’ या पुस्तकातून नागा ट्राईब्स, आसाममधील खासी, द. भारतातील नायर तसेच मध्य व पूर्व आफ्रिका, न्यू गिनी, बोर्निओ, ब्राझील वगैरे ठिकाणी मातृकुळातच भाऊ-बहिणी राहत असल्याचे पुरावे देतो. अशा प्रकारे मातृकुळाबाहेर जाऊन संबंध करण्याच्या पद्धतीला आजचे संशोधक Visiting marriage अशी संज्ञा देतात.
विशेष म्हणजे,exogamy च्या कालखंडात स्त्री चमत्काराने मूल जन्मास घालते, हे अज्ञान लयास गेले आणि पुरुषामुळे स्त्रीला मूल होते, या शास्त्रापर्यंत मानव पोहोचला. या ज्ञानामुळे पुरुषाची मन:स्थिती द्विधा झाली. आपले कुळाबाहेरील ज्या स्त्रीशी संबंध आहेत, त्या स्त्रीच्या मुलांमध्ये आपले मूल असणार आहे, याचे भान त्याला येऊ लागले. त्याचप्रमाणे ज्या स्त्रीशी आपले संबंध, ती आणि तिच्या मुलांबद्दल आपल्याला कोणतेही अधिकार नाहीत आणि ज्या बहिणीबद्दल अधिकार आणि तिच्या मुलांविषयीची कर्तव्ये, ती मुले आपली नाहीत, ही जाणीव पुरुषाला अस्वस्थ करू लागली.
पुरुषामधील हा बदल, मातृसंस्कृतीला आशादायक व आनंददायक वाटत होता. पुरुषाची अपत्यांमध्ये होणारी गुंतवणूक हा मानवी संस्कृतीच्या एका टप्प्यावरचा महत्त्वाचा बदल होता. पुरुषाच्या या हळुवार भावनेला प्रतिसाद देण्यासाठी, जगातील काही संस्कृतींनी पुरुषाला ‘सामाजिक पितृत्व’ देण्याचा रिवाज निर्माण केलेला दिसतो. मातृकुळातील पुरुषालाही इच्छा असल्यास अपत्यसान्निध्य मिळावे, हा त्यामागील उद्देश होता. अंदाजे १० ते १५ हजार वर्षांदरम्यानचा हा काळ होता.
स्त्रीला अनेक पुरुषांपासून मुले होत होती. त्या सर्व मुलांचे पितृत्व पुरुषाला देण्याचा हा रिवाज होता. हा संस्कार म्हणजे ‘पिता बनण्याचे व्रत’ असे होते- पुरुषाची पत्नी-स्त्री (आजच्या अर्थाने पत्नी नाही) जेव्हा मूल 
जन्माला घालणार अशा लक्षणाची दिसते, ते चार-पाच महिने पुरुषाने भाला, कुदळीसारख्या शस्त्रांना स्पर्श करायचा नाही. शिकारीला जाण्याचे थांबवायचे. गवत, झाड, लाकूड कापायचं नाही. रक्त वाहील, असे कोणतेही काम करायचे नाही. मांस भक्षण करायचे नाही. पत्नी-स्त्री बाळंत होईपर्यंत त्याने जास्तीत जास्त झोपून राहायचे. झोपून राहण्याचे कारण बाहेर समाजात कोणी कुणाची हत्या केल्यास ते या व्रत करणाऱ्या पुरुषावर घातले जाऊ नये, म्हणून पुरुषाने मातृकुळातच जास्तीत जास्त शांत राहावे असे हे व्रत! Paternity leave ची त्या काळातील ही कल्पना म्हणावी लागेल.
या व्रतामधून एक बाब स्पष्ट जाणवते म्हणजे, पुरुषाठायीची हिंसकता कमी झालेली नव्हती. त्यामुळे अशा
पुरुषाच्या अधिकारात स्त्री व तिची मुले सोपविणे, हे मातृकुळांना मान्य होणारे नव्हते. म्हणून मग त्या पुरुषाने चार-पाच महिने शस्त्र, शिकार, मांसभक्षण यापासून दूर राहून हिंसा व शिकार न करता तो राहू शकतो हे त्याने प्रथम सिद्ध करावे, असा संकेत रूढ झाला. त्या काळच्या पुरुषाच्या ‘लाइफस्टाइल’नुसार त्याच्या पालकत्वाचे हे प्रशिक्षण म्हणायला पाहिजे. हे व्रत केल्यावर झालेले मूल सदोष निघाले किंवा मृत झाले तर त्याचा ठपका व्रत करणाऱ्या पुरुषावर येत असे. ज्या पुरुषाला असे पितृत्व हवे आहे त्याने पितृत्वभावनेशी वचनबद्ध असले पाहिजे, म्हणून वर वर्णन केलेल्या व्रताचे महत्त्व प्राचीन काळात होते.
म्हणजे इथे स्पष्ट आहे की, सामाजिक पितृत्वकल्पना येऊनही समाजाची प्राचीन मातृव्यवस्था कायमच राहिली. प्रत्येक स्त्रीची मुले या नेमलेल्या पित्याजवळ राहून सात-आठ वर्षांची होताच मामाच्या तालमीत येत 
होती. सामाजिक पितृत्वाची ही कल्पना सुमारे दोन-तीन हजार वर्षे टिकली. पण या कालावधीत जे एक सत्य उघडकीस आले, त्या सत्याने ही कल्पना उद्ध्वस्त केली. आतापर्यंत पुरुषापासून स्त्रीला मूल होते, इथपर्यंत मानवी समाज ज्ञानी झाला होता. पण हे मूल अनेक पुरुषांमुळे स्त्रीच्या उदरात तयार होते, अशी कल्पना होती. पण सामाजिक पितृत्व संस्कारामुळे पिता-पुरुषाचे, स्त्रीबरोबर सान्निध्य वाढले. त्यातून, एकाच पुरुषाच्या सततच्या स्त्री-सान्निध्याने स्त्रीला होणारे मूल, हे त्याच पुरुषाचे असते, हे ज्ञान या प्राचीन स्त्री-पुरुषांना प्राप्त झाले. हा कालखंड ८ ते १० हजार वर्षे दरम्यानचा असावा. अर्थात आपली मुले पुरुषाला स्पष्टपणे ओळखता येऊ लागली. त्यामुळे त्यांचा स्वत:च्या मुलांचे हित पाहण्याकडे कल होऊ लागला आणि बहिणीच्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यातून मातृकुळात मामा-भाचे तंटे सुरू झाले. भाऊ-बहिणीचे संबंध बिघडले. बहिणीची मुले व भावाची मुले असे आते-मामे भावंडांत संघर्ष सुरू होऊन त्याची परिणती हिंसेमध्ये होऊ लागली.
पुरुषाला पितृत्वादाखल अधिकार हवे होते, पण हजारो वर्षे लाभलेले भावाचे अधिकारही, त्या संस्कारामुळे, सोडून देण्याची त्याची मानसिकता तयार झालेली नव्हती. परंतु दोन्ही अधिकार एकाच वेळेस पुरुषास प्राप्त होणे, हे व्यवहारात अडचणीचे होत होते. त्यामुळे तत्कालीन समाजाची बंधुप्रधान आणि पितृप्रधान अशा दोन गटांत सरळ विभागणी झाली. मातृप्राधान्य बाजूलाच राहिले. माझ्या मते, याच कालखंडापासून मातांची मातृकुळावरील पकड सैल झाली. माता व बहिणींचा प्रभाव कमी होत गेला, कारण इथे भांडण हे पुरुषांच्या दोन अधिकारातलं होतं आणि पुरुष काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचं झालं. स्त्रीच्या निर्णयाला अर्थ राहिला नाही.
पुरुषाने बंधुप्रधानकी किंवा पितृप्रधानकी यापैकी एक काहीतरी मान्य करण्याने समाजात शांतता नांदणार होती. तेव्हा काही संस्कृतींनी त्याकरिता क्रूर प्रथा स्वीकारल्या. ज्या पुरुषाला पितृप्रधानकी मान्य आहे, त्याने बंधुप्राधान्य सोडले हे सिद्ध करण्यास, बहिणीचा पहिला मुलगा बळी द्यायचा आणि त्याउलट बंधुप्रधानकी मान्य करणाऱ्या पुरुषाने पितृप्रधानकी सोडली हे दाखविण्याकरिता पत्नी-स्त्रीचा पहिला मुलगा ठार करायचा. या प्रथेमुळे मातृकुळात हाहाकार उडाला. प्रत्येक स्त्री ही कुणाची बहीण किंवा पत्नी-स्त्री होतीच. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचे अपत्य बळी जाऊ लागले. कालांतराने पशुबळीची कल्पना स्वीकारली जाऊन हे प्रकार थांबवण्यात आले.
बंधुप्राधान्य विरुद्ध पितृप्राधान्य हा झगडा म्हणजे मातृसंस्कृती विरुद्ध पितृसंस्कृती अशाच एका अर्थाने तो संस्कृती संघर्ष होता. हा संस्कृती संघर्ष पुढील काही हजार वर्षे चाललेला होता. भारतात तर तो आर्य आल्यानंतरही चालू होता.
मध्यंतरीच्या काळात नांगराचा शोध सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी लागला. या नव्या तांत्रिक बदलाने संपूर्ण समाजव्यवस्था नंतरच्या तीन हजार वर्षांत पूर्णत: उलटी फिरवली. नांगर या अवजड साधनामुळे शेती करण्याचे काम पूर्वी स्त्रियांकडे होते, ते पुरुषांकडे आले. पुरुष जमिनी जिंकून आणण्याचे काम प्राचीन काळापासून करीत होते. नांगरामुळे जास्त जमीन लागवडीखाली येऊन भरपूर धान्य निर्माण होऊन
धान्यसाठे निर्माण झाले. शेती उद्योग इतर उद्योगांना ‘किरकोळ’ करून पुढे गेला आणि जमीनदारी उदयास आली. जमीन जिंकून आणणारे आणि ती कसणारेही पुरुष, म्हणून जमीनदारांना शेती उत्पादन आणि जमीन पुढे सांभाळणारा स्वत:चा वारस मुलगा हवा, असे स्वाभाविकपणे वाटू लागले. म्हणून विशेषत: जमीनदार व राज्यकर्त्यांनी रीती, रिवाज, परंपरा निर्माण करून स्त्रियांनी एकाच पुरुषाशी शरीरसंबंध करण्याचे बंधन आणले, तीच विवाहप्रथा होय! साम, दाम, दंड व भेद असे विविध प्रकार वापरून सत्ताधारी पुरुषांनी स्त्री-समाजावर विवाहाची सक्ती लादली. ही विवाह प्रथा राजघराण्यातून झिरपत सामान्य जनतेतही रूढ झाली.
थोडक्यात, गेल्या सुमारे ५० हजार वर्षांत, शरीरसंबंधाच्या प्रस्तुत पद्धती म्हणजे पुरुषाला मातृकुळात सामावून घेण्याचे, त्याला माणूस म्हणून घडविण्याचे मातांनी केलेले प्रयत्न म्हणावे लागतात. पुरुषाने क्रूर जंगली जीवनातून परावृत्त व्हावे, कुटुंबव्यवस्थेत त्याला योग्य भूमिका मिळावी, तो स्थिर व्हावा, 
नातेसंबंधाशी तो भावनिक समरस व्हावा, त्याला अपत्यसुख मिळावे- असे प्रयत्न मातांनी सतत केले.
आपल्या मातृकुटुंबात पुरुषाला सामावून घेण्याचे प्रयत्न विफल झाल्यावर स्त्रियांनी पुरुषकुटुंबात, पतीगृहातही आपला समावेश विवाहाद्वारे मान्य केला. त्याकरिता आपल्या नैसर्गिक मातृकुळाचा आधार आणि भावांचे
संरक्षण डोळ्यादेखत कोसळू दिले आणि गेली  ३-४ हजार वर्षे, पुरुषाचे हित सांभाळण्यासाठी, पतीगृहात पती देईल ते स्थान पत्करून त्या आपला जीव वेचीत राहिल्या, ही आजची वस्तुस्थिती आहे.
‘विवाह’ हा नेहमीच मला पुरुषाचा प्रश्न वाटला. तो स्त्रीचा प्रश्न कधीही नव्हता आणि आजही नाही. आणि हा अभ्यास केल्यावर मात्र विवाह म्हणजे ‘पुरुष जन्मा ही तुझी कहाणी’ असे म्हणावेसे वाटले.
मार्गारेट मीड या संशोधिकेने आपल्या १९४९ साली लिहिलेल्या Male and Female या पुस्तकात वेगळ्या शब्दात हेच मांडलेले आढळते. ती म्हणते, ‘पुरुषाला नक्की कोणती भूमिका द्यावी, ही प्रत्येक समाजाची कायमच मध्यवर्ती समस्या राहिली.’





------ मंगला सामंत


 

No comments:

Post a Comment