Monday 27 February 2012

कोकणचो फेरफटको -




भगवान विष्णूचा सहावा अवतार म्हणजे जमदग्नी आणि रेणुकामाता यांचा पुत्र परशुराम. निसर्गरम्य कोकणभूमीची निर्मिती परशुरामाने केली. प्राचीन समाजाच्या आचार-विचारांची, चालीरीतींची, संस्कृतीची व देवस्थानांची महत्त्वपूर्ण नोंद आपल्याला कोकणच्या इतिहासात सापडते.
रत्नागिरीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सर्वात जुना उल्लेख राष्ट्रकुटांचा आहे. राष्ट्रकूट राजांची देवता गजान्तलक्ष्मी ही होती. जेथे-जेथे त्यांचा मोठा शिलेदार असे, तेथे या देवीच्या मूर्ती स्थापन केल्या असाव्यात. शिलाहारांचा राजा अपराजित याने आपले राज्य खूप वाढवले, ही घटना दहाव्या शतकातील आहे. त्याच्या राज्यात पुणे, संगमेश्वर, चिपळूण यांचा समावेश होता. तीन-चार पिढय़ांनंतर अपरादित्य गादीवर आला आणि त्याने आपली गादी


प्रणाल-पन्हाळेकाझी येथे नेल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर विक्रमादित्य, हरपाल देव, मल्लिकार्जुन हे राजे होते. मल्लिकार्जुनने बाराव्या शतकात चिपळूणवर राज्य केल्याचा उल्लेखही आढळतो.
कोकण हा भाविकांचा प्रदेश, त्यामुळे कोकणात प्रत्येक गावात ग्रामदेवतेचे मंदिर आढळते. नयनरम्य सौंदर्याने नटलेल्या कोकणभूमीतील प्रत्येक मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे.
भगवान परशुराम हा शिवभक्त होता, त्यामुळे कोकणातील प्रत्येक गावात एखादे तरी शिवमंदिर आढळते. एकटय़ा संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे दोनशेहून अधिक मंदिरे आहेत. कोकणातील मंदिरांमध्ये प्रामुख्याने नवलाई, पावणाई, वरदान, वाघजाई, विठलाई, चणकाई, भैरवनाथ, जोगेश्वरी, वाघजाई या देवींच्या मूर्तीचा समावेश असतो.
भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्राला मागे हटवले आणि तेथे परशुराम भूमीची निर्मिती झाली. चिपळूणनजीक असलेले परशुराम मंदिर इसवी सन पूर्व १५०० च्या सुमारास निर्मित झाल्याचे सांगितले जाते.
कोकणातील काही देवस्थानाची प्रचीती संपूर्ण भारतभर पसरली आहे तसेच काही देवस्थानांचा परिचयही नाही पण त्यांची वैशिष्टय़े मात्र आपण विसरू शकत नाही. मंडणगड किल्ल्यावरील गणेश मंदिर, वेसवी येथील गणेश मंदिर, बाणकोट येथील गणेशमंदिर, पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस यांच्या वेळास या गावातील भैरी व दुर्गादेवी मंदिर, दापोलीतील कडय़ावरचा गणपती, आसूद येथील केशवराज मंदिर, आंजर्ले येथील दत्त मंदिर, दाभोळ येथील गुहेतील चंडिका देवीचे मंदिर, गुहागर तालुक्यातील व्याडेश्वर मंदिर, हेदवी येथील दशभूजा लक्ष्मीगणेश मंदिर, संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर मंदिर, मारळ येथील मार्लेश्वर मंदिर, शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिर, बुरंबाडचे आमनायेश्वर मंदिर, देवरुख येथील सोळजाई मंदिर, महिपत गडावरील भवानी मंदिर अशी प्रसिद्ध स्थळे आहेत.
तसेच राजापूर तालुक्यातील गंगामाता, आडिवरेची महाकाली, कुणकेश्वर मंदिर, कशेळीचे कनकादित्य मंदिर, धोपेश्वर येथील धूतपापेश्वर मंदिर, सागवे येथील कात्रादेवी मंदिर यांसह अनेक मंदिरे भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.
  कडय़ावरील गणपती
 दापोलीपासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या आंजर्ले येथील कडय़ावरच्या   गणपतीचे मंदिर पर्यटकांचे एक आकर्षण बनले आहे. या गणपती मंदिराला ११ व्या शतकापासूनचा इतिहास आहे. १२ व्या शतकात मंदिर निर्मितीसमवेत मंदिरासमोर असलेला तलाव आणि तटबंदी यांची रचना पूर्ण झाली. या पूर्वाभिमुखी मंदिराची लांबी ५५ फूट, रुंदी ३९ फूट आहे. या विश्वात्मक, विश्वाधार, मूलाधारस्थित, ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे मुक्त दर्शन सर्वाना करता येते. अशी ही गणेशदेवता सदैव अनुरक्त असते. दर्शनासाठी भाविकांची रीघ असते. येथील निसर्गसौंदर्य अवर्णनीय व आल्हाददायक असते. त्यामुळे निसर्गपर्यटनाचा आनंदही लुटता येतो. दापोलीतून आंजर्ले येथे थेट बसने जाण्याची व्यवस्था आहे. मुंबई - आंबेत - मंडणगड - कांदिवली - आंजर्ले असा रस्ता आहे. या रस्त्याला थेट कडय़ावरील गणपतीच्या मंदिरापर्यंत पोहोचणारा जोडरस्ता आहे.
  श्री क्षेत्र परशुराम
मुंबईहून चिपळूणकडे जाताना घाटाच्या माथ्यावर श्री परशुरामाचे देवस्थान आहे. महामार्गापासून देवस्थानाला जाण्यासाठी थोडेसे आत जावे लागते. सहाशे वर्षांपूर्वीच्या आदिलशाही वैभवाची वास्तू येथे पाहावयास मिळते. जांभ्या दगडांची पाखाडी उतरताना दोन्ही बाजूंना झाडेझुडपे, जुनी परंतु प्रशस्त घरे, उजव्या बाजूला पुरातन मंदिरे आणि जलकुंडाचे दर्शन घडते. चारही बाजूंनी जांभ्या दगडांच्या भिंतीने बंदिस्त असलेले हे श्री परशुरामाचे पवित्र मंदिर पुरातन आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ-काम-परशुराम अशा काळ्या पाषाणाच्या तीन सुबक मूर्ती आहेत. या तीन मूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार होते. परशुरामाचा अवतार चिरंजीव असून, त्याचे अस्तित्व या भूमीत आहे, असे मानले जाते.
श्री परशुराम मंदिराच्या मागे परशुरामाची माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी आयुधे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. या जागृत देवतांचे आणि तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी भाविक पर्यटकांची येथे सतत ये-जा असते. येथे जाण्यासाठी मुंबईहून चिपळूणकडे जाणाऱ्या वाटेत घाटाच्या माथ्यावर श्री क्षेत्र परशुराम थांबा आहे.
केळशी
केळशीचं खास आकर्षण म्हणजे सुमारे अडीच कि.मी. लांबीचा पांढरीशुभ्र वाळू असलेला समुद्रकिनारा व वाळूची टेकडी, या टेकडीवर धावणे-घसरणे म्हणजे लहान मुलांना एक पर्वणीच, तसेच टेकडीवर बसून सूर्यास्त पाहणे म्हणजे आनंदाचा परमावधीच. विस्तीर्ण समुद्र किनारा, महालक्ष्मी मंदिर आणि गणेश मंदिर यामुळे दापोली तालुक्यातील केळशी हे गाव पर्यटन कंेद्र बनले आहे. हे महालक्ष्मीचे मंदिर शके १८०८ मध्ये बांधले असावे, हे मंदिर पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा नमुना आहे. बेलेश्वर, राधाकृष्ण मंदिर, उंटबरकरणी देवीचे मंदिर, उजव्या सोंडेचा गणपती आणि भाईमियांचं बेट ही या ठिकाणची वैशिष्टय़े मानली जातात. केळशी हे गाव दापोलीपासून ४० कि.मी. अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे तसेच रिक्षासुद्धा मिळतात.
उफराटा गणपती
गुहागरनजीक असलेले उफराटा गणपती मंदिर पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. सुमारे ३०० वर्षांपूर्वीची ही मूर्ती समुद्रामध्ये पाणी वाढल्यावर गुहागरच बुडून जाईल अशी भीती काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांना वाटली. त्यांनी पूर्वेकडे तोंड असलेल्या या गणपतीचे तोंड उलटीकडे फिरविले. तेव्हापासून उफराटा गणपती म्हणून हे मंदिर ओळखले जाऊ लागले. गणपतीची मूर्ती पांढरीशुभ्र असून तिच्या हातात परशू व त्रिशूळ आहे. डाव्या सोंडेच्या या मूर्तीभोवती नागाने वेटोळे केलेले आहे.
  दाभोळची चंडिकादेवी
वाशिष्ठी नदीच्या खाडीकिनारी दापोली तालुक्यात दाभोळ हे गाव वसलेले आहे. चंडिकादेवी ही मूळ गावात उंच डोंगरावर पांडवकालीन गुहेत वसलेली आहे. हे मंदिर पांडवकालीन असून शिवाजी महाराजांनी या मंदिरासाठी संरक्षण दिले होते. या देवीच्या मंदिरात विद्युतप्रकाश चालत नाही. देवी उंच व मुख्य डोंगराच्या एक उतरत्या भुयारात वसलेली आहे. या मंदिरात उतरताना काळोखातच नतमस्तक होऊन उतरावे लागते. गाभाऱ्यात छोटे तेलाचे दिवे पेटत असतात, त्या प्रकाशातच दगडावर कोरलेल्या स्वयंभू चंडिका देवीचे दर्शन घेता येते. या मंदिराच्या पश्चिमेला पसरलेला अरबी समुद्र तर एका बाजूला वेढलेल्या डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळतात.
  हेदवीचा गणेश
गुहागरातील हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यावरील दशभुज गणेश मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार गुहागर-नरवण या रस्त्यालगत असून, तेथूनच मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे. दोन्ही बाजूला रंगीबेरंगी फुलझाडं असल्याने मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मंदिराचा परिसर स्वच्छ असल्याचं आपल्या लक्षात येतं. मंदिराच्या आवारातील उंच दीपमाळ मंदिराच्या स्थापनेपासून असल्याचं सांगितलं जातं. दशभुज गणेशमूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धींपैकी एक ‘सिद्ध लक्ष्मी’ वसलेली आहे. उजव्या वरच्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग फळ आहे. डाव्या बाजूच्या वरच्या महिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात नीलकमळ, चौथ्या हातात रदन व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मंदिराची उंची साठ फूट, रुंदी चाळीस फूट तर कळसापर्यंतची उंची पन्नास फूट इतकी आहे. समुद्राच्या सान्निध्यात वसलेले असल्याने हे मंदिर पाहून पर्यटकांची पावले बीचकडे वळू शकतात. येथे येण्यासाठी गुहागर आणि चिपळूण बसस्थानकावरून एस.टी. बसेस सुटतात.
  वेळणेश्वर
गुहागरपासून १५ कि.मी. अंतरावर असलेले वेळणेश्वराचे मंदिर भक्त व पर्यटकांना मोहून टाकते. हे मंदिर १२०० वर्षांपूर्वी बांधले गेले आहे असे म्हटले जाते. एक एकराच्या परिसरात चौफेर चिरेबंदी तट आहेत. भाविकांच्या नवसाला पावणारा वेळणेश्वर अशी या मंदिराची ख्याती आहे. पुढील बाजूला काळभैरव मंदिर आहे. पाऊस वेळेत सुरू झाला नाही व दुष्काळ पडला, तर वेळणेश्वर व काळभैरवाचे गाभारे पाण्याने भरण्याची प्रथा आहे. नवस म्हणून हे पाणी भरले जाते व या नवसाला यश येऊन पाऊस सुरू होतोच अशी भक्तांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला या देवस्थानचा उत्सव साजरा हातो. स्वयंभू शिवलिंग आणि प्रशस्त, स्वच्छ समुद्रकिनारा लाभलेले आवार पर्यटकांना मोहून टाकते.
  व्याडेश्वर
चिपळूणजवळील गुहागर तालुक्यातील व्याडेश्वर हे अत्यंत जागृत व ऐतिहासिक देवस्थान आहे. श्रावणात व महाशिवरात्रीला विशेष गर्दी होते. भगवान परशुरामाने गूढ गुहेसारख्या या स्थानाची तपश्चर्येसाठी निवड केली, या गूढ वनात वास्तव्य कर असा वर व्याडीमुनीना दिला, या ठिकाणी मग परशुराम शिष्य व्याडीमुनीने एका शिवलिंगाची स्थापना केली व छोटेसे मंदिर बांधले. त्याचे पुढे व्याडेश्वर झाले. मंदिर प्रशस्त व शिवपंचायतन असून काळ्यापाषाणाची शिवपिंड असून तेथे गोमुख आहे. बांधकाम दगडी आहे. चार कोपऱ्यात गणपती, देवी, विष्णू व सूर्य यांची मंदिरे आहेत. नंदिकेश्वराची मूर्ती आहे.
  मारळचा मार्लेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील देवरुखपासून अवघ्या २१ किमी तर आंगवली या गावापासून ११ कि.मी अंतरावर असणारे श्री क्षेत्र मार्लेश्वर हे उभ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे.
सह्याद्रीच्या कडेकपारीतील गुहेत श्री मार्लेश्वराची स्वयंभू पिंडी आहे. या क्षेत्राला पर्यटनक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्याने आता खूप सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी पायऱ्यांची सोय केली आहे. पायऱ्या चढताना आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगांच्या आपण मोहात पडतो. येथील हवामान थंड आहे. पायऱ्या पूर्ण चढून गेल्यावर मंदिर आहे व मंदिराच्या पाठीमागे मोठा धबधबा पाहावयास मिळतो, या धबधब्याला बाराही महिने पाणी असते. धबधब्याखालील नदीतील पाणी बर्फासारखे थंड असते. या स्थानाला भेट देऊन जीव सुखावतो. संगमेश्वर, देवरुख, मारळ असा पक्का मार्ग आहे. देवरुख येथून एस.टी. बसेसची सोय आहे.
कऱ्हाटेश्वर
जयगड बंदराजवळील नांदिवडे गावाजवळील जुन्या बांधणीचे कौलारू छपराचं कऱ्हाटेश्वराचं मंदिर म्हणजे जयगडमधील एक रम्य निवांत स्थळ. बाजूला डोंगराळ परिसर, गरजणारा समुद्र, जवळील दीपगृह मन वेधून घेतं. हे मंदिर शिलाहारकालीन असून सायंकाळ नंतर बंद ठेवण्यात येते. देवगिरी यादवांच्या काळात या ठिकाणी गंगा अवतीर्ण झाली होती. त्या जागेला आता बेभाटी गंगा म्हणून ओळखले जाते. कार्तिक वद्य प्रतिपदेला या ठिकाणी गंगा आली होती पण १९२२ साली मंदिराभोवतालची जागा रुंद करण्यासाठी खडक फोडले तेव्हापासून ती लोप पावली. मंदिराशेजारी धर्मशाळा आहे. रत्नागिरीपासून ४० कि.मी. अंतरावर असणाऱ्या कऱ्हाटेश्वर मंदिरात जाण्यासाठी रत्नागिरीहून जयगडला जाणाऱ्या बसने नांदगावपर्यंत सहज जाता येते.
  गलबतवाल्यांचा गणपती - गणेशगुळे
गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला या म्हणीवरून हे गाव प्रसिद्ध आहे. हे गाव मुसाकाजी बंदराकडे जाणारा डोंगर व बंदरासमोरील डोंगर असा दोन डोंगरांच्या मध्यभागी वसले आहे. जवळच समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू बांधकामाला उपयुक्त अशी विशिष्ट क्रिस्टल स्वरूपात आहे. हे मंदिर पुरातन काळातील आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, मंदिर आजपण चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
गणपतीपुळे
श्री क्षेत्र गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. गणपतीपुळ्याचे देवस्थान स्वयंभू व जागृत म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या पायथ्याशी, अफाट सागणाच्या विस्तीर्ण रुपेरी वाळूच्या किनाऱ्यावर वसले आहे. या गणेशाची स्थापना पुरातनकाळी बाळंभटजी भिडे यांनी केली व तेव्हापासून हे देवस्थान प्रसिद्ध आहे. निराकार स्वरूप डोंगराला म्हणजेच श्री गजाननाला प्रदक्षिणा घालण्यासाठी या मंदिरापासून निघून या डोंगराला वळसा गाळून परत मंदिरात येणारी फरसबंदी पाखाडी आहे. या प्रदक्षिणेच्या वाटेवर केवडय़ाचे बन, तलाव व विहीर आहे. देवालयास लागूनच दक्षिणेस पूर्वापार धर्मशाळा आहे. देवालयाच्या ईशान्य कोपऱ्यात देवालयालगतच काळ्या दगडी असून त्यातून नाभी गंगोदक झिरपत असते. त्याच्या शेजारी तुळशीवृंदावन व द्वारदेवता आहे. उत्तरेकडील मुख्य दरवाजातून मंदिरात प्रवेश केल्यावर देवाचा मुख्य घुमट आहे. यात प्रवेश करण्यासाठी पश्चिमेस व उत्तरेस दरवाजे आहेत. सदरहू घुमट हा छत्रपती शिवाजीराजे यांचे प्रधान अण्णाजी दत्तो यांनी बांधला असे सांगण्यात येते. देवाच्या समोरील सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रशस्त सोपे आहे. दक्षिणेकडील सोप्यात श्रींची शयन करण्याची जागा असून त्या ठिकाणी रोज रात्री श्रींचा पलंग घालून त्यावर गाद्या घातल्या जातात.
देवळाच्या समोर १२ कि.मी लांबीचा रुपेरी वाळूचा व फेसाळणाऱ्या लाटांच्या संगीताची पाश्र्वभूमी लाभलेला समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण या किनाऱ्यावर खडक नाहीत. दरवर्षी फेब्रुवारी आणि नोव्हेंबर या महिन्यांच्या पहिल्या आठवडय़ात मावळतीच्या सूर्याची सोनेरी किरणे मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाजातून श्री गणेशावर पडतात. हे नैसर्गिक नयनरम्य दृश्य पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.
मुंबई-गोवा महामार्गावरून रत्नागिरीला येण्यापूर्वी १५ कि.मी वर निवळी येथे गणपतीपुळ्याला जाणाऱ्या रस्त्याचा फाटा फुटतो. तेथून सुमारे ३५ कि.मी अंतरावर श्रींचे मंदिर आहे. रत्नागिरीहून एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे.
पर्यटकांसाठी पर्यटन विकास महामंडळाची निवासाची व्यवस्था शिवाय तंबू निवास व बोटिंगची सोय आहे.

प्राचीन कोकण
गणपतीपुळे देवस्थानापासून केवळ १ किमी अंतरावर कोकण टुरीझम डेव्हलपमेंट आणि रीसर्च सेंटर यांचा ३ एकर परिसरात उभारलेला प्राचीन कोकण हा प्रकल्प आहे. "पर्यटनातून रोजगार निर्मिती" हा विषय घेऊन काही महाविद्यालयीन तरूण तरुणी येथे काम करीत आहेत. ५०० वर्षापूर्वीचे कोकण, तेथील जीवनपद्धती, रोजगार, संस्कृती यांची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आल्या आहेत.
गावात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला एक गुहा लागते. हि गुहा म्हणजे काळाचे प्रतिक असून आपण वर्तमानकाळातून भुतकाळात प्रवेश करतो. प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्याकरीता संस्थेचे मार्गदर्शक आपल्या सोबत असतात. गावात आपल्याला प्रथम दिसते ती "नक्षत्र बाग". आपली संस्कृती निसर्गातून फुलली आहे. आपल्या पुर्वजांनी विविध वनस्पती, प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात एक राखीव जंगल असे त्याला देवराई म्हणत. विविध धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन हि नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष "आराध्यवृक्ष" मानला जातो. त्याचे पुजन केल्यास त्या व्यक्तीला आरोग्य, सौख्य लाभते असे मानले जाते. नक्षत्र बागेतून आपआपल्या राशींचे आराध्यवृक्ष पाहत आपण गावात प्रवेश करतो. गावात प्रवेश केल्यावर आपल्याला दिसते ते "वाघजाई" या ग्रामदेवतेचे मंदिर. अंगणातच सुपारी कातरत बसलेले खोत आपल्याला दिसतात. माजघरात खोताची बायको उभी आहे. कोकणी स्त्रिया शूर व सुंदर होत्या पन त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माजघराचा उंबरठा हि त्यांच्या साठी मर्यादा होती. पडवीत खोतांची दोन मुले परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. खोताच्या घराची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे. खोताच्या घरातून आपण जातो ते एका शेतकऱ्याच्या घराकडे. पूर्वी बारा बलुतेदार, राजे यांना धान्य पुरवण्याचे काम शेतकरी करायचा. शेतकऱ्याच्या घराशेजारीच गोठा आहे. त्याची सर्व अवजारे जसे, नांगर, इरलं, मासे पकडायची खोयणी, कणगी आपल्याला येथे पहायला मिळतात.
अशा प्रकारे गावात फेरफटका मारताना आपल्याला एक एक बलुतेदार भेटत जातो. गणपती सणाला लाल मातीचे गणपती, मातीची भांडी बनविणारा कुंभार, सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी बनविणारा सुतार, पाण्यात जाळे टाकून मासे पकडणारा कोळी व त्याची बायको, तेलाच्या घाण्यावरून तेल काढणारा तेली, चर्मकार यांच्या घरांना भेट देत देत आपण पोहचतो ते पाणवठयावर. उंचावरून पडणारे पाणी, मातीचा बांध, पाणी भरणाऱ्या कोकणी स्त्रिया हा सर्व देखावा सुंदर आहे. गावात सर्वात जो उंच पाणवठा असे तेथे बंधारे बांधून ते पाणी प्रत्येक घराकडे नेले जाते. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव असे ठिकाण कि जेथे सगळेजण एकत्र येत असे.
कोकणात आढळणाऱ्या निरनिराळ्या जातींच्या सापांचे व कोकणातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आपणास बघावयास मिळते. गावात फेरफटका मारून तुम्ही दमलात आणि भुक लागली असेल तर इथले "आतिथ्य" रेस्टॉरंट तुमच्या स्वागताला तयार आहे. खास कोकणी पदार्थ म्हणजेच भाजणीचे गरमागरम थालिपीठ, उकडीचे मोदक, फणसाचे सांजण, कोकम/आवळा सरबत यावर यथेच्छ ताव मारता येतो. जर तुम्हाला येथे काही खरेदी करावयाची असेल तर कोकण टुरीझमच्या हस्तकला केंद्रात अनेक गोष्टी आपणास पहायला आणि खरेदी करायला मिळतात. या संस्थेने केवळ ५०० वर्षापूर्वीच्या कोकणसंस्कृतीचे दर्शन देणारे केवळ खेडेच नाही उभारले तर कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ देण्याचा प्रयत्नही चालवीला आहे.


डेरवण 
चिपळूण तालुक्यातील चिपळूणपासून 19 कि.मी. अंतरावर असलेले एक छोटेसे खेडेगाव. चिपळूणपासून रत्नागिरीच्या दिशेने गोवा हमरस्त्यावरून निघालो की सावर्डे हे गाव लागते. सावर्डे ही पंचक्रोशीतील गावांची बाजारपेठ. सावर्डे गावातून रत्नागिरीकडे निघालो की डाव्या हाताला दुर्गवाडी गावाकडे जाणारा फाटा फुटतो. या मार्गाने तीन-चार कि.मी. गेल्यावर रस्त्याच्या दुतर्फा श्री शिवरायांचे मावळे आपले स्वागत करतात हाच तो श्री क्षेत्र डेरवण येथील श्री शिवसमर्थ गड.
गडाला भव्य शिवकालीन प्रवेशद्वार असून दोन भव्य हत्ती, पायदळ व घोडदळातील मावळ्यांसह आपलं स्वागत करतात. शिल्पकार कै. दादा पाटकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी श्री दिगंबरदास महाराजांच्या कल्पनेला शिल्परूप दिले आहे.
विविध रंगातील असंख्य रोमंचकारी चित्रशिल्पं बघून डोळ्यांचे पारणे फिटते. इतिहासाचे स्फूर्तिदायक दर्शन काही काळ का होईना पण बुद्धीला आत्मपरीक्षण करावयास लावते. देव, देश
आणि धर्म या विलयीच्या कर्तव्याचे स्मरण जागृत होते. याच कारणासाठी येत्या शिवजयंतीला आपण डेरवण येथील शिवसृष्टीस आवर्जून भेट द्या! पंचखंडात जिला तोड नाही अशी ‘शिवसृष्टी’ शिल्परूप होऊन आपल्या स्वागतासाठी इथं उभी आहे!
तेज तम अंसपर कान्हा जिमी कंसपर । 
त्यो म्लेंच्छ बंसपर सेर सिवराज है॥

 
पावसचे श्री स्वरूपानंद
रत्नागिरीपासून सुमारे १६ कि.मी. अंतरावर पावस हे निसर्गरम्य गाव आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्याने पुनीत होऊन ते तीर्थक्षेत्र बनले आहे. १५ ऑगस्ट १९७४ रोजी स्वामींनी येथेच समाधी घेतली. त्यांची समाधी व स्मृतिमंदिर येथे बांधण्यात आले आहे. समाधी मंदिराच्या शेजारी एक आवळीच्या झाडात काही वर्षांपूर्वीच एक स्वयंभू गणपती प्रकट झाला आहे. स्वामींचे वास्तव्य असलेली ‘अनंत निवास’ ही इमारत समाधीजवळच आहे. १९३४ ते १९७४ पर्यंत स्वामीजींचे वास्तव्य होते. या घरासमोरच पर्यटक व भक्तांसाठी स्वरूपाश्रम, भक्त निवास व माऊली माहेर अशा सर्व सोईनी उपयुक्त इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. स्वामींच्या समाधी मंदिरात मर्यादित निवासाची व भोजनाची सोय आहे. रत्नागिरी एस.टी. स्टँडवरून पावस या मार्गावर दर तासाने बससेवा उपलब्ध आहे.
मालगुंडमधील केशवसुत स्मारक
नारळी-पोफळीच्या बागा, आंबा, फणस, काजू यांची झाडे आणि इतरही अनेक वृक्षांची गर्द छाया मिरवीत असलेलं मालगुंड हे गाव. या गावात केशव विठ्ठल दामले राहात. ते शिक्षण खात्यात शिक्षक होते. पत्नी, तीन पुत्र असा संसार होता. पंधरा मार्च १८६६ या दिवशी केशव दामल्यांना व त्यांच्या पत्नीला चौथ्या पुत्ररत्नाचा लाभ झाला. केशवरावांनी या पुत्राचे नाव ‘कृष्णाजी’ असे ठेवले. कृष्णाजी पुढे महाराष्ट्र सारस्वताच्या एका संपूर्ण शतकावर प्रभाव टाकणारे कीर्तिवंत कवी झाले. त्यांनी अभिमानाने स्वत:ला ‘केशवसुत’, केशवरावांचा पुत्र म्हणून घेतले. वडिलांच्या निवृत्तीनंतर ते दापोली येथील वळणे गावी राहू लागले. नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरवलेले श्रेय, अंत्यजाच्या मुलास अशा अजरामर कविता लिहिणाऱ्या या थोर कवीच्या स्मारकास आवर्जून भेट द्यावी. रत्नागिरीपासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर असणाऱ्या या गावात जाण्यासाठी एस.टी. बसेसची सोय आहे.
शिरंबेचा मल्लिकार्जुन
संगमेश्वर तालुक्यात शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिर वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध आहे. हे मंदिर चोहोबाजूनी पाण्याने वेढलेले आहे. सुमारे ५० चौरस फुटाच्या तळ्याच्या मध्यभागी मंदिराची उभारणी केली गेली आहे. मंदिरात जाण्यासाठी छोटा पुल बांधण्यात आला आहे. मंदिराच्या चारी बाजूंनी स्वच्छ वाहते पाणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे एकमेव ठिकाण असं आहे की जे पाण्यात आहे. येथील शिवलिंगही पाण्यामध्येच आहे. सभामंडपाची रचना तळ्याच्या पाण्याच्या उंचीप्रमाणे करण्यात आली आहे, त्यामुळे गाभारा सभामंडपाच्या खूप खाली आहे. शिवलिंग निम्मे पाण्यातच आहे. मंदिराभोवतालीचे वातावरण निसर्गरम्य आहे. मंदिराजवळ ग्रामदेवता व गणपतीचे मंदिर आहे. संगमेश्वर एस.टी. बसस्थानकावरून शिरंबे येथे जाण्याची सोय आहे.
रत्नागिरीकरांचे ग्रामदैवत श्री देव भैरी
रत्नागिरीच्या शहरी गजबजाटापासून दूर वसलेले श्री देव भैरीचे मंदिर शांत आणि सावलीला आहे. कार्तिक वद्य अष्टमीला भैरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या परिसरात मारुती, दत्त, तृणबिंदूकेश्वर, जंबुकेश्वर, पंचायतन, त्रिमुखी देवी व देव भैरव अशी मंदिरे आहेत. हरतालिका ही वैशिष्टय़पूर्ण मूर्ती आहे. तिला घागरा घातला असून ती काळ्या पाषाणाची दोन हात असलेली मूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपाचे १२ खांब म्हणजे १२ मानकऱ्यांचे प्रतीक समजतात. ग्रामदैवत म्हणून हजारो रत्नागिरीकरांवर गेली कित्येक वर्षे आपल्या कृपेची छाया धरणाऱ्या श्री देव भैरी मंदिराकडे जाण्यासाठी बसस्थानकावरून बसेसची सोय आहे. शिवाय रिक्षा किंवा खाजगी वाहतूकपण उपलब्ध आहे.
कसबा येथील कर्णेश्वर मंदिर
संगमेश्वरपासून अवघ्या ४ कि.मी अंतरावर असणारे कर्णेश्वराचे पुरातन मंदिर धार्मिक म्हणून नव्हे तर कलाविष्काराचे मंदिर म्हणून आवर्जून पाहायला हवे. इसवी सनाच्या सहाव्या ते बाराव्या शतकाच्या सुमारास बांधलेले हे मंदिर काहींच्या मते हेमाडपंती धाटणीचे तर काहींच्या मते चालुक्यकालीन वाटते. मंदिराची एकूण रचना आणि त्यातील कोरीव काम पाहता पुरातन भारतीय कलासंस्कृतीचा एक जिवंत इतिहास आपल्यासमोर प्रकट होतो. कर्णेश्वर हे शिवमंदिर आहे. हे मंदिर सुमारे ४०० चौ.मी. क्षेत्रफळात बांधलेले आहे. या शिवमंदिरातील दगडात कोरलेल्या पराती हे मंदिराचे खास वैशिष्टय़ आहे. मंदिरात पांडवमूर्ती कोरलेल्या आहेत. स्तंभावर व छतावर सुंदर नक्षीकाम आहे. यामंदिराव्यतिरिक्त या परिसरात काशीविश्वेश्वर, कार्तिकेय आदी अनेक मंदिरे चौथरे, स्तंभ, खांब यांची पडझड झालेल्या अवस्थेत उभी आहेत. मंदिरांमधील देखणे शिल्पकाम पुरातन संस्कृतीची आठवण करून देतात. तसेच जवळच शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांना औरंगजेबाने अटक करून त्यांचा अतोनात छळ करून तुळापूर मुक्कामी त्यांचा क्रूर वध केला. संभाजी महाराजांची आठवण म्हणून त्यांचा अर्धपुतळा व एक स्तंभ उभारण्यात आला आहे. संगमेश्वरपासून अवघ्या ४ कि.मी. असणाऱ्या कसबा गावी जाण्यासाठी एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे.
निसर्गसंपन्न केशवराज
कोकणचं सृष्टीसौंदर्य तर जग जाहीर आहे. हिरवीगार झाडी, डोंगरांच्या रांगा, विविध देवळं हे तर कोकणाचं वैशिष्ट मानलं जातं. ह्य वैशिष्टय़ांपैकी एक वैशिष्ट म्हणजे दापोलीपासून हर्णेच्या वाटेवर साधारण ८ कि.मी. वर अंतरावर भगवान विष्णुच वेगळं रूप असणारं केशवराजाचं मंदिर. मंदिराकडे जाण्यासाठी आसुदबाग थांब्यावर उतरावे लागते. सभोवताली पोफळ - नारळाची, आंब्या-फणसाची दाट झाडी पाहून मन मोहून जातं. ही झाडी इतकी दाट आहे की त्यातून सूर्यप्रकाशसुद्धा जमीनीवर पडत नाही. याच झाडांच्या सावलीतून केशवराज मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. वाटेत कासव नदीवरचा पूल ओलांडून दुसऱ्या डोगरापाशी जावे लागते. १५-२० मिनिटांची चढण चढून गेल्यावर केशवराज मंदिर लागते.
केशवराज मंदिर गर्द झाडीत लपलेलं, ऐसपैस दगडी देऊळ आहे. मंदिराच्या आवारात गोमुख आहे, या गोमुखातून १२ महिने थंडगार व स्वच्छ पाणी वाहत असते. केशवराजाच्या मुख्य दगडी मंदिरांच्या प्रवेशद्वारावर गणपती तर खालच्या बाजूस ‘शरभा’ची मूर्ती पहावयास मिळते. डाव्या बाजूला मारुती व उजव्या बाजूला गरुड आहे. केशवराजाच्या हातात शंख, चक्र, गदा, पउा अशी चारही आयुधं आहेत.
कार्तिकातल्या पहिल्या एकादशीपासून ५ दिवस येथे उत्सव असतो. पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद असतो. तर दुसऱ्या एकादशीपासून तीन दिवस उत्सव असतो. त्रयोदशीला महाप्रसाद असतो.
देवळाच्या बाजूला एक सभामंडप आहे, त्यामध्ये २० ते २५ जणांची मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते. देवळाच्या मागील डोंगराव दाड झाडी असल्याकारणाने इथे जंगलात खूप पक्षी आहेत त्यामुळे पक्षीनिरीक्षणाचा आनंदही घेता येतो.
जायचे कसे: दापोलीहून हर्णे, अंजर्ले, मुरुडकडे जाणाऱ्या बसेस आसुदबागला थांबतात. दापोलीहून रिक्षासुद्धा इथे येतात.
कशेळीचा कनकादित्य
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील कनकादित्याचे मंदिर हे या जिल्ह्यातील सूर्यमंदिर म्हणून ओळखले जाते. हे सूर्यमंदिर प्राचीन असून या मोठा इतिहास आहे.
मंदिराच्या आवारात श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गा, श्री मारुती व श्री विष्णूचीही मंदिर आहेत. कनकादित्य मंदिरावर तांब्याचा पत्रा आहे. शिलाहार वंशातील गोजराजाने शके १११३ मध्ये दानपत्र लिहून दिलेला ताम्रपट आजही मंदिरात पाहावयाच मिळतो. अनेक थोरामोठय़ांच्या पदस्पर्शाने कशेळी गाव पावन झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन मार्च १६६१ मध्ये झाले होते. इतिहासाचार्य राजवाडे (१९१३), महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (१९६१), बॅ. नाथ पै यांची कनकादित्यावर श्रद्धा होती.
राजापूरपासून ३२ कि.मी वर राजापूरमार्गे धारतळ, आडिवरे, कशेळी अशी बस व्यवस्था आहे. रत्नागिरीहून जायचे झाल्यास पावस, पूर्णगड, गावखडी, कशेळी असे जाऊ शकता. गाडी थेट देवळापर्यंत जाऊ शकते. जवळचे रेल्वे स्थानक राजापूर.

कुणकेश्वर
समुद्राच्या काठावर असलेले हे शंकराचे मंदिर पर्यटकांसाठी निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि भाविकांसाठी जागृत धार्मिक देवस्थान आहे. देवालयासमोर सहा दीपमाळा व भव्य नंदी आहे. मंदिराच्या शिखरावर गंड भेरुड, कामधेनूची चित्रे आहेत. मंदिरामध्ये शिवपिंडीव्यतिरिक्त पार्वतीची मूर्ती, नंदित्याल मागे श्री देवमंडलिक मंदिर, चार भव्य स्तंभात स्थापित कासव, तीन हाताचा गणेश आहे. नांदगांव रस्त्यावर सैतवडा धबधबा व ३० कि.मी. वर कोटकामते गावातले भगवती मंदिर बघण्यासारखे आहे.
रत्नागिरीची भगवती
रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर भगवती देवीचे प्राचीन मंदिर आहे. या गडावर ती स्वयंभू रूपात राहिली आहे. देवळावरील घुमटी हेमाडपंथी पद्धतीची आहे. त्यावेळी असलेला देवीचा घुमट अजूनही तसाच आहे. १७३६ मध्ये शाहू महाराजांनी बावडेकर यांना सांगून देवीचे मंदिर बांधल़े १९४० साली दानशूर भागोजीशेठ कीर यांनी हे मंदिर पुन्हा नव्याने बांधले. या मंदिराचा गोपूर जमिनीपासून ७० फूट उंचीचा आहे. देवीचे स्वयंभू मूर्तिस्थान हे अडीच फूट उंच आहे. देवीच्या हातात शंख, चक्र आणि ढाल, तलवार आहे. देवीची मूर्ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे.
भगवतीच्या डोंगरावरून दिसणारे सौंदर्य विलोभनीय दिसते. येथील एक वैशिष्टय़ म्हणजे डोगराच्या एका बाजूला असणाऱ्या समुद्राकाठची वाळू काळी आहे तर दुसऱ्या बाजूच्या समुद्राकाठची वाळू पांढरी आहे. त्यामुळे समुद्र एकच असला तरी पांढरा समुद्र आणि काळा समुद्र अशी दोन अंगे आपल्याला भगवतीच्या डोंगरावरून पाहावयास मिळतात.
भगवतीच्या मंदिराकडे जाण्यासाठी रत्नागिरी बसस्थानकावरून एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे. ही बस पायथ्यापर्यंत जाते. पुढे थोडा डोंगर चढून गेले की भगवतीच्या मंदिरात आपण सहज पोहचतो.
क्वालिटी रिसॉर्ट चिपळूण
कोकण फिरायचे असल्यास चिपळूण एक उत्तम पर्याय आहे. मुंबईपासून जवळपास अडीचशे किमीवर असलेल्या चिपळूणला पोहोचण्यासाठी रेल्वेने चार तास लागतात. बसने किंवा खाजगी वाहनाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरून गेल्यास साधारण सहा ते साडेसहा तास लागतात.
क्वालिटी रिसॉर्टसचे रिव्हरव्ह्यू हे रिसॉर्ट राहण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. परशुराम मंदिरापासून पायी अंतरावर असणारे हे क्वालिटी ग्रुपचे फोर स्टार रिसॉर्ट असून तेथे ३७ सुसज्ज व सुंदर व आरामदायी खोल्या आहेत. त्याचबरोबर येथे स्विमिंग पूल, आयुर्वेदीक मसाज, जिम, कॉन्फरन्स रूम, मुलांसाठी खेळघर अशा फॅसिलिटीजही उपलब्ध आहेत. गुहागर, वेळणेश्वर, डेरवण, हेदवी, परशुराम मंदिर, गणपतीपुळे अशा अनेक ठिकाणच्या साईटसीईंगसाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून गाडीची व्यवस्था केली जाते.
www.chiplunhotels.com
आडिवरेची महाकाली
भक्तांच्या नवसाला पावणारी आडिवरे गावची महाकाली देवी प्रसिद्ध आहे. वाडापेठ या ठिकाणी देवीची दक्षिणाभिमुख स्थापना करण्यात आली आहे. आद्य शंकराचर्यानीच श्री महालक्ष्मीची स्थापना केल्याचा उल्लेख पुरात आढळतो. मंदिरामध्ये महाकालीसमोर उत्तरेस तोंड करून श्री महासरस्वती, उजव्या बाजूला महालक्ष्मी आहे. महाकाली मंदिर परिसरात योगेश्वरी, नगरेश्वर, रवळनाथ मंदिरे आहेत. राहण्यासाठी भक्तनिवासाची सोय आहे. राजापूरपासून ३० कि.मी. वर अंतरावर आडिवरे हे गाव आहे. आडिवरे येथे राजापूरमार्गे किंवा बेनगीमार्गे नदी पार करून जावे लागत असे. परंतु आता पावसमार्गेही आडिवरे येथे जाता येथे. रत्नागिरीतून पावसमार्गे आडिवरेत जाताना कित्येक किमीचे अंतर कमी होते. जाताना अथांग समुद्राचे दर्शन तर होतेच.

रेडीचा श्री गणेश

रेडीचा श्री गणेश हा स्वयंभू आहे. ही मूर्ती १९७६ साली रेवती बंदराजवळील खाणीत सापडली. बसलेल्या अवस्थेतील ही मूर्ती १५ मी. उंचीची आहे. संकष्टीला येथे भक्तांची भरपूर गर्दी होते. रेडी येथे यशवंतगड हा किल्ला असून रेडी हे गाव मँगेनीज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. वेंगुल्र्यापासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर असलेल्या रेडीला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे.
राजापूरची गंगा
राजापूरची गंगा म्हणजे साक्षात स्वर्गीय गंगेचेच हे रूप असून अत्यंत अवचितपणे ही गंगा प्रकट होते आणि तितक्याच अचानकपणे ती लुप्त होते. हे मंदिर नदीकिनारी असून ही गंगा डोंगरात उगम पावते. साधारणत: दर तीन वर्षांनी येणारी ही गंगा प्रकट झाल्यावर मूळ गंगा, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, कृष्णकुंड, अग्निकुंड, नर्मदाकुंड, सरस्वतीकुंड, गोदाकुंड, वरुणकुंड, हिमकुंड, वदिकाकुंड आणि काशीकुंड अशी १४ कुंडांतून वाहते. जगातील एक आश्चर्य मानावे असे गंगामाईचं ठिकाण राजापूर शहराच्या आग्नेय दिशेला असलेल्या उन्हाळे गावाच्या टेकडीवर आहे. गंगेपासून जवळच खाली नदीकिनारी उन्हाळे गाव आहे. गावात ग्रामदैवत असलेल्या लक्ष्मीचे मंदिर आहे. जवळच बारमाही वाहणारा गंधकयुक्त व औषधी असलेला गरम पाण्याचा झरा आहे. या पाण्यानेही त्वचारोग नष्ट होतात. राजापूरपासून अवघ्या तीन कि.मी वर असणाऱ्या या ठिकाणी राहण्यासाठी धर्मशाळा व इन्स्पेक्शन बंगला आहे.
विमलेश्वर मंदिर
निसर्गाच्या कुशीत लपलेले ठिकाण आजूबाजूला दाट वनराई, नारळ-पोफळीच्या बागा, फेसाळणारा समुद्र असे हे रम्य ठिकाण. देवालयाच्या समोर पाच नग्न मर्ती, गाभाऱ्यात उंचावरील शिवपिंड हे आणखी एक वैशिष्टय़. पावसाळ्यात येथे गरम पाण्याचे झरे पाझरतात. साडा या परिसरात असलेले हे मंदिर कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. देवगडपासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या या गावाकडे जाण्यासाठी देवगड बसस्थानकावरून बसेस सुटतात.

साटम महाराजांची दाणोली

आंबोलीच्या पायथ्याशी वसलेले दाणोली हे गाव कोकणातील संत महात्म्यांच्या परंपरेतील साटम महाराजांच्या वास्तव्याने पुण्यक्षेत्र म्हणून उदयास आले आहे. ते सावंतवाडी संस्थानचे राजगुरू होते. या ठिकाणी साटम महाराजांचे समाधीस्थान, नगझरी तळे तसेच निवासस्थान आहे. महाराजांच्या पुण्यतिथीला येथे मोठा उत्सव भरतो. दाणोली हे गाव सावंतवाडी-बेळगांव रस्त्यापासून १२ कि.मी. अंतरावर आहे.



1 comment:

  1. चला मग जाऊया 2013 कुणकेश्वर यात्रेला

    अधिक माहितीसाठी विजीत करा :Experience Tourism

    ReplyDelete