Wednesday 1 February 2012

मुलांचे संगोपन : थोडं कठोर होऊन पाहा!

भूक नैसर्गिक असते. जर मुलं जेवायला नाही म्हणत असतील तर समजून सांगा, पण जंक-फूड देणं टाळा. हट्टीपणा करू लागली तर थोडं कठोर व्हा. आज कठोर झालात तर तुमच्या मुलाचं आरोग्य नेहमीसाठी चांगलं राहणार आहे, हे मात्र कायमच लक्षात ठेवा.
एकदम कबूल की तुम्ही उत्कृष्ट स्वयंपाक करता आणि तुमच्या जेवणाची खूपच वाहवा होते. कोणत्याही समारंभाच्या वेळी तुमच्या मैत्रिणी तुमच्याच रेसिपी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. पण.. आपल्या मुलांच्या बाबतीत मात्र एक आई म्हणून आपण अपयशी ठरतो का? आपण मेहनतीने आणि प्रेमाने केलेला कोणताही पदार्थ मुलाकडून क्वचितच आवडीने खाल्ला जातो. खरं ना? वाईट वाटतं, पण तरी आपण प्रयत्न सोडत नाही, हो ना! काही काळजी करू नका. असे नखरे करणारी मुले जवळपास सर्वच घरात असतात. काही वेळा तर आपली सहनशक्ती संपुष्टात येते. कधी वाटतं, भूक लागली की आपसूकच खाईल. पण पाहिलं तर काय ही मुले उपाशी पोटीसुद्धा खेळामध्ये छान रमून जातात. खाण्या-पिण्याची शुद्धसुद्धा नसते. मग आपल्यालाच कसं तरी होतं आणि काही तरी खातोय ना या नावाखाली चिप्स, न्यूडल्स, बिस्किट्स असे निकृष्ट पोषणमूल्यांचे खाणे आपणच त्यांना देतो. पण मुलाला खायला घालायचा हा काही योग्य मार्ग नाही. यावर उपाय काय?
आजच्या सदरामध्ये आपण बघणार आहोत की खाण्याच्या कोणत्या सवयी मुलाला लागल्या पाहिजेत आणि त्या कशा लागल्या पाहिजेत? कारण काय खावं त्याचबरोबर कधी आणि कसं खावं यावरसुद्धा मुलाचं पोषण ठरलेलं असतं. प्रत्येक मुलाला आपलं असं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्यामुळे मी आज जे सांगणार आहे ते अगदी तंतोतंत पाळता नाही आलं तरी आपल्या मुलाच्या कलेने प्रयत्न करून बघा, नक्की यशस्वी व्हाल. अजून एक प्रेमळ सूचना- तुमच्या मुलाला योग्य ‘वळण’ लागलं पाहिजे हे नक्कीच आहे, ज्याची सुरुवात एक वर्षांपासून होते, पण आज जरी तुमचं मूल मोठं झालं असेल तरी या सवयींची सुरुवात आतापासून करायला हरकत नाही.
* रागाने आग्रह करू नका. मूल खात नाही म्हणून जबरदस्तीने त्याला भरवायचा प्रयत्न केला तर, ‘खाण्याची वेळ आणि आईचं चिडणं’- हे समीकरण मुलाच्या मनात पक्कं बसेल आणि मग ‘आनंदाचे खाणे’ हे स्वप्न पूर्ण होणं थोडं कठीण होऊन जाईल, खाल्लं नाही तर शिक्षा करणं हेसुद्धा चुकीचंच! फक्त कल्पना करा की जर तुमचा ‘खाण्याचा मूड’ नसेल आणि कोणी तुम्हाला खाण्याचा आग्रह केला तर काय होईल?
* नैसर्गिक भूक : तुम्हाला आठवतं का लहान असताना जेव्हा भूक लागेल तेव्हाच मूल रडायचं आणि जबरदस्तीने दूध द्यायचा प्रयत्न केला तर उलटी व्हायची! म्हणजेच शरीराला जेव्हा गरज आहे तेव्हाच भूक लागते आणि आपोआप खाल्लं जातं. आपण मुलाने खावं म्हणून पर्याय देतो आणि खाण्याचे नखरे आहेत असं म्हणून त्यालाच दोष देतो. भूक नैसर्गिक असते. ज्यावेळी मुलं जेवणासाठी नाही सांगतात त्यांना समजावून बघा. पण जर ती हट्टी असतील किंवा जंक फूडसाठी मागणी करत असतील तर त्यांना एकटं सोडा. खरी भूक लागली की आपसूक येतील आणि हाच नियम रोज ठेवा. किती दिवस आणि किती वेळा उपाशी राहतील? भूक लागल्यावरच अन्नाचं महत्त्व कळेल. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी तुम्हाला दुष्ट व्हायला सांगत नाहीये. पण आज थोडं कठोर झालात, तर तुमच्याच मुलाचं आरोग्य नेहमीसाठी चांगलं राहणार आहे. काही दिवसांत तुम्हाला याचं प्रत्यंतर मिळेल. मुलांना मारून-ओरडून खायला घालण्यापेक्षा ही पद्धत योग्य आहे. फक्त एवढंच करा की रोज वेळेवर गरम आणि ताजे अन्न तयार ठेवा. मुलांनी खाल्लं नाही म्हणून त्याचा वैताग मुलावर किंवा तुमच्यावर काढू नका. ‘ठीक आहे, भूक लागली की सांग,’ म्हणून तुमची कामे सुरू ठेवा. संयम ठेवलात तर निकाल लगेचच मिळेल.
* लज्जतदार जेवण :  खोबरं-कोथिंबिरीने सजवलेलं ताट बघून भूक वाढते ना? मुलांना तेच हवं असतं. जेवणात तोचतोचपणा येऊ देऊ नका. जेवणाच्या पदार्थामध्ये नावीन्य असेल आणि साजरीकरण चांगले असेल तर खायला का नाही आवडणार? तुम्हाला आठवतं का पूर्वी भोंडला खेळताना खिरापत असायची आणि आजचा मेनू काय ते आपण ओळखायचं! मजा असायची ना. एखाद्वेळी गंमत म्हणून सांगा ओळखायला आजचा मेनू. खायच्या ताटल्या / बाऊलमध्ये थोडी विविधता आणा आणि बघा रोजचं खाणं आनंदाचं खाणं कसं होतं ते!
alt* एकमेका साहाय्य करू : मुलांना जेवण करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करा. त्यांना थोडी जबाबदारीची जाणीव होईल. जेवणाबाबतीत उत्सुकता वाढेल. तुम्ही पोळ्या करत असताना तुमची कणिक किती वेळा पळवली जाते, आठवतं ना? तुमच्या बरोबर भाजी-फळं आणायला जाणे, डाळ-तांदूळ निवडणे- धुणे, भाज्या धुऊन देणे, जेवणाची ताटे पुसणे, टेबलावर पाणी ठेवणे वगैरे किती तरी सोप्या कामांची जबाबदारी तुम्ही त्यांच्यावर सोपवू शकता आणि अशी ‘मेहनत’ केल्यावर जेवणाला नाही कोण म्हणणार?
* जेवणाचे वेळापत्रक : आपण थोडा वास्तवाचा विचार करूया. कितीही दिल्या तरी सुद्धा मुलांच्या क्षमतेचा विचार होणं जरुरी आहे. एक तर आवडत नसलेलं जेवण आणि तेसुद्धा नको असताना दिल्यावर काय होईल? जेवणाविषयी त्यांना तिटकाराच येईल. योग्य वेळेप्रमाणे खाणं दिलं तर भूकही त्याप्रमाणे लागते. घरी न्यूडल्स- ब्रेड-जाम- चिप्ससारखे पर्याय ठेवूच नका. अधेमध्ये जंकफूड खाण्यावर कंट्रोल ठेवला तर वेळेवर भूक लागतेच.
* विश्वासात घ्या : मुलाला विचारून मेनू ठरवला तर प्रश्नच येत नाही.
x वेळेचे नियोजन : जेवणाची वेळ शक्यतो रात्रीची तुमच्याबरोबरच ठेवा. (शक्य असेल तर दुपारचीसुद्धा) त्यावेळी टी. व्ही. बघत खाणे जरूर टाळा. घरातील मोठय़ा लोकांबरोबर गप्पा मारत जेवताना कदाचित मुलांची खाण्याविषयीची तक्रार कमी राहील.
उदाहरणादाखल मी एक तक्ता देत आहे. ‘फ्रीज कॅलेंडर’ म्हणून आपण तो वापरू शकतो. भाजीच्या किंवा फळांच्या मेनूप्रमाणे जर आपण आठडय़ाचं शॉपिंग केलं तर मग कुकिंग बिना त्रासाचं तर होईलच, पण हेच का आणि तेच का असे प्रश्नसुद्धा येणार नाहीत. दर सुटीच्या दिवशी फक्त मेनू बदलायचा. फ्रीजलाच जर लावून ठेवला तर मग प्रश्नच मिटला.
* भाजी आणतानाच आवडी-निवडी बघून आणि वेळापत्रकाप्रमाणे आणल्या तर ‘आज काय करू’ हा मोठ्ठा प्रश्न सुटतो.
* जेवणामध्ये विविधता रोज नाही देता येणार. रोजचा आहार असाच असेल- ही गोष्ट आधीच स्पष्ट केली तर रोज उठून ताटाकडे बघून तोंड वाकडं होणार नाही.
* मेनूप्रमाणे लागणारे पदार्थ सुटीच्या दिवशी आणले तर ऐन वेळी गडबड होणार नाही. उदा. भाजलेला रवा, मिसळीसाठी लागणारी कडधान्ये, भाजणीचे पीठ वगैरे.
* एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं जरूर आहे की, शिळं अन्न आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही. म्हणून जेवढं लागेल तेवढंच बनवावं.
* स्वयंपाकाचा बाऊ करू नये. योग्य नियोजन असेल तर कमीत कमी वेळात पूर्णान्न बनू शकतं.
लहानपणापासून ‘श्यामची आई’ या पुस्तकातील   अळणी पदार्थाची गोष्ट माझ्या मनाला खूपच भावली होती! अर्थात आपण सर्वच आया ज्या वेळी मुलं होतो, त्या वेळी सर्वानाच आवडलेली. एकाच वेळी ती प्रेमळ आणि कठोरसुद्धा असते ना? पण तिच्या अशा वागण्यामुळे श्यामचं कुठे नुकसान होतं का? नाही ना? मग आपण दोन्ही टोकाच्या न ठेवता जास्त प्रेमळ पण शिस्तीच्या बाबतीत थोडे कठोर असलो तर बिघडतं कुठे?
चटपटीत चपाती रोल:
(मुलं बनवू शकतील असे)
साहित्य- चपाती-२ नग - किसलेले चीज - २ मोठे चमचे उकडलेला राजमा / मूग / चवळी
१/२ कप - चिरलेला कांदा- टोमॅटो-कोथिंबीर
२ चमचे लिंबू- १/२ - मीठ-चवीनुसार तूप / बटर- १ चमचा - चाट मसाला- १ चमचा किसलेले गाजर / बीट- १ चमचा
कृती-
१. तयार चपातीला तूप किंवा बटर लावून तव्यावर गरम करा.
२. एका बाऊलमध्ये इतर सर्व जिन्नस एकत्र करा.
३. चपातीवर पसरवून रोल करा.
४. चटपटीत रोलवर ताव मारा.


Loksatta  वरून साभार

No comments:

Post a Comment