Tuesday 14 August 2012

पुण्याचा सिंहगड !




पुण्याचे दोन मानबिंदू, एक शनिवारवाडा तर दुसरा सिंहगड! यातही सिंहगड म्हटले, की नरवीर तानाजी मालुसरेंचे रणकंदन, डोंगरदऱ्यांचा मावळ, हिरव्यागर्द झाडीचा आधार, शांत-निवांत सकाळ-संध्याकाळ आणि भन्नाट वारा असे बरेच काही डोळय़ांसमोर येते. इथे मिळणारी झुणका-भाकर, कांदाभजी, मडक्यातील दही या गोष्टीही खुणावू लागतात. यामुळे अनेक भटक्यांची पावले सिंहगडची ही वाट वर्षांनुवर्षे चढत असतात.
पुण्याहून अवघ्या २४ किलोमीटरवर हा गड! उंची ४३२९ फूट! पायाच्या आतकरवाडीतून वर चढणारी वाट, पण ज्यांना गड चढायचा त्रास त्यांच्यासाठी अलीकडे गोळेवाडीतून एक घाटवाट अगदी गडावर नेऊन पोहोचवते. याशिवाय जातीचे भटके कात्रज-सिंहगड, कोंढणपूर-कल्याण-सिंहगड, खानापूर-सिंहगड अशा अन्य डोंगरवाटांवरूनही त्यांची ही पंढरी गाठत असतात. खरेतर सिंहगडावर वर्षभर पर्यटक येत असतात, पण पाऊस सुरू झाला, की तो जास्तच खुणावू लागतो.
या पाऊसवेळी कधीही आलो, तरी हा गड तुम्हाला जिंकून घेतो. हिरवे रान, डोंगर-दऱ्या, त्यावरचा
ऊन-पावसाचा खेळ, रानफुलांची नक्षी, डोंगरकपारीच्या असंख्य जलधारा, ढग-धुक्याचे लोट, सुसाट वारा आणि या साऱ्यांशी टक्कर देत मधोमध एखादे जहाज नांगरल्यासारखा उभा असलेला तो उमदा गड! सिंहगडाचे हे राजबिंडे रूपच प्रथमदर्शनी मनावर ठसते. हिरवाईचे हे रूप पाहातच तासाभरात आपण गडमाथ्यावर दाखल होतो.
काहीसा कुऱ्हाडीसारखा गडाचा आकार. यातही पूर्वेकडची डोंगररांग सोडल्यास उर्वरित बाजूंना तुटलेले कडे. या उभ्या कडय़ांवरच सिंहगडच्या तटबंदीची चिलखते चढवली आहेत. तब्बल ३३ बुरूज आणि दोन प्रवेशमार्ग! एक पुण्याकडून तर दुसरा कल्याणहून शिरणारा राजमार्ग! पैकी पुणे दरवाजाची तीन तोरणे गडाच्या सुरुवातीच्याच खांदकडय़ाखाली दडली आहेत. हा खांदकडा म्हणजे गडाची एक माची! या माचीवरच आता सिंहगडाची ओळख बनलेला दूरदर्शनचा मनोरा उभा आहे. या माचीत अद्याप पाण्याची टाकी आणि घरांचे अवशेषही दिसतात. या माचीवरच दुसऱ्या महायुद्धातील कैद्यांना ठेवण्यात आले होते. या माचीची एक गंमत इथेच सांगतो, छत्रपती शिवराय जेव्हा मिर्झाराजे जयसिंहाबरोबर तहाची बोलणी करायला बसले तेव्हा त्यांना दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत त्यांनी सिंहगडबरोबर चतुरपणे या माचीलाही आणखी एक किल्ला म्हणून जोडले. राजाच्या अंगी केवळ पराक्रम असून चालत नाही, तर त्याबरोबरच चातुर्य आणि मुत्सद्देगिरीही असावी लागते, तेव्हाच स्वराज्य उभे राहते. याचेच हे उदाहरण!

पुणे मार्गात तीन दरवाजे. यातील पहिल्या दरवाजाला आपल्या टपाल तिकिटावर स्थान मिळालेले आहे. या मालिकेतील पहिले दोन मराठेशाहीतील तर तिसरा यादवकाळातील! त्याच्या अंगा-खांद्यावरची स्तंभ कमळांची रचनाच याचे पुरावे देतात. आत शिरताच लगेच लागणारे ‘घोडय़ाची पागा’ नावाचे खोदकाम तर त्याहून प्राचीन! खरेतर हे सातवाहनकालीन लेणेच! मधोमध खांब सोडलेल्या खोल्या, आतमध्ये बसण्यासाठी ओटे, समोर मोकळे प्रांगण ही सारी विहाराची रचना! अशा ठिकाणी कुणाच्यातरी डोक्यात ‘घोडय़ाची पागा’ अशी कल्पना आली आणि घोडय़ांना न विचारताच ती रूढही झाली. या खोदकामाची उंचीही घोडय़ांना आत सामावू शकत नाही, तिथे आम्ही पागा तयार केली.
अशाच पद्धतीची आणखी दोन खोदकामे वाटेत गणेश टाके आणि देव टाक्याच्या पाठीमागे एका भूमीलगत टाक्यातही दिसतात. यावरून हा गड किमान दोनएक हजार वर्षांपूर्वीपासून वाहता असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. कुठल्याही गडावर फिरताना त्याच्या असे मुळाशी गेले, की इतिहास आणि ते स्थळ दोन्हीही रंजक होते.
या प्राचीनकाळी गडाचे नाव होते कौंडिण्यदुर्ग! कोणा कौंडिण्यऋषींच्या वास्तव्यावरून हे पडले. पुढे ऋषींनीच इथे कौंडिण्यश्वराची स्थापना केली. पुढे यादवकाळात या जागी मंदिर बांधले गेले. मग काही दिवसांनी अपभ्रंश होत या कौंडिण्यदुर्गचा झाला कोंढाणा आणि कौंडिण्यश्वराचे झाले कोंढाणेश्वर! यातूनच गडाखालच्या गावालाही नाव मिळाले कोंढणपूर!

यादवकाळापर्यंतचा हा प्रवास! यानंतर गडावर आल्या मुस्लिम राजवटी! कोंढाण्याचा पहिला लेखी उल्लेख याच काळात सापडतो. इसवी सन १३५० मध्ये लिहिलेल्या ‘शाहनामा-ए-हिंद’ या फारसी काव्यातील २२३व्या प्रकरणात मुहम्मद तुघलकाने ‘कुंधियाना’ जिंकल्याचा उल्लेख आहे. हा ‘कुंधियाना’ म्हणजेच कोंढाणा! यानंतर मग गडावर निजामशाही, आदिलशाही अवतरल्या. पुढे छत्रपती शिवरायांनी खेड शिवापूरच्या बापूजी मुगल नऱ्हेकर देशपांडे यांच्या मदतीने इसवी सन १६४७ मध्ये गडावर हिंदवी स्वराज्याचे तोरण चढवले. पण लगेच शहाजीराजांच्या अटक प्रकरणात त्यांना हा गड सोडावा लागला. १६५३ मध्ये त्यांनी तो पुन्हा घेतला आणि गडाचे नामकरण केले ‘सिंहगड’! पुढे मिर्झाराजेंबरोबरच्या तहात हरवलेला किल्ला हस्तगत करण्यासाठी तानाजी मालुसरेंना प्राणाची आहुती द्यावी लागली. शिवरायांच्या निधनानंतर हा गड कधी मोगलांकडे तर कधी मराठय़ांकडे राहिला. यामध्येच एक जुलै १६९३ मध्ये नावजी बलकवडे आणि विठोजी कारके या रणमर्दानी तानाजींच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करत गड जिंकला. या गडावरच तीन मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराममहाराजांचे निर्वाण झाले. यानंतर दोनच वर्षांनी औरंगजेबाने सिंहगड पुन्हा जिंकला आणि त्याचे नाव ठेवले ‘बक्षी-दा-बक्ष’! ‘बक्षी-दा-बक्ष’चा अर्थ दैवी देणगी! पण औरंगजेबाची ही देणगी त्याच्याकडे दोनच वर्षे राहिली. मराठय़ांनी पुन्हा हा गड जिंकला आणि तो १८१८च्या अखेरच्या मराठे-इंग्रज लढाईपर्यंत त्यांच्याकडेच राहिला!

या शेवटच्या लढाईनंतर इंग्रजांचा सिंहगड लुटीचा तपशीलदेखील धक्कादायक आहे. हा गड घेतला त्या वेळी इंग्रजांना गडावर ६७ तोफा, त्यांना पुरेल एवढा दारूगोळा, जडजवाहीर, दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज मिळाला. याची त्या वेळी किंमत होती तब्बल पन्नास लाख रुपये! गडावरील एका बांधीव खांबात सोन्याची एक गणेशाची मूर्ती मिळाली. या मूर्तीचीच पाच लाख रुपये एवढी किंमत भरली. पुढे अनेक दिवस हे इंग्रज गडावरील ही लूट टोप्यांमध्ये भरभरून आणून पुण्याच्या बाजारात विकत होते.
इतिहासाचा हा साराच भाग अनेक संदर्भ-तपशील पुरविणारा. तो लक्षात ठेवतच या सिंहाच्या गुहेत शिरावे.
तिसऱ्या दरवाजातून आत शिरताच डाव्या हातास दारूगोळय़ाचे कोठार लागते. गडावरची आज शाबूत असलेली ही एक इमारत. या कोठारावरच ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. ज्यामुळे गडावरील अनेक इमारतींना हानी पोहोचली होती. ज्याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे. गंमत अशी, की पुढे याच इमारतीत ब्रिटिशांनी काही काळ चर्चही थाटले होते.
गडाच्या मध्य भागात किल्लेदाराचा वाडा, अमृतेश्वर-कोंढाणेश्वर मंदिर, तानाजी स्मारक, राम-गणेश-देव टाक्या आदी ऐतिहासिक वास्तू आहेत. पैकी किल्लेदाराचा वाडा आता पडून गेला आहे. त्याचा तट आणि कमानीचा दरवाजाच तो काय शिल्लक आहे. या जागेतच आता गडावरील पोलीस चौकी थाटली आहे. अमृतेश्वराचे मंदिरही पडले आहे. पण गाभाऱ्यातील शुद्ध पाषाणातील भैरव-भैरवीची मूर्ती मात्र आजही लक्ष वेधून घेते. या चतुर्भुज भैरवाच्या हातात जांबिया, डमरू, त्रिशूळ आणि एका हातात नरमुंड आहे. या नरमुंडातून ठिबकणारे रक्त पिणारा श्वानही पायाशी दाखवला आहे.

अमृतेश्वर मंदिराच्या पाठीमागे तानाजी मालुसरेंचे स्मारक आहे. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले ते हे ठिकाण. त्या वेळी शिवकाळातच बांधलेल्या या चौथऱ्यावर सुरुवातीला २० फेब्रुवारी १९४१ रोजी तानाजींचा अर्धपुतळा बसवला गेला. पुढे २४ मार्च १९७६ रोजी पहिला पुतळा काढून त्याजागी आताचा धातूचा पुतळा बसविण्यात आला.
या लगतच्या टेकडीवर कोंढाणेश्वराचे प्राचीन मंदिर! यादवकाळातील हेमाडपंती शैलीतील हे बांधकाम. या मंदिराचे विविध द्वारशाखांनी सजलेले प्रवेशद्वार तर हमखास पाहावे असे. या टेकडीवरून उत्तरेकडे उतरलो, की वाटेत आणखी एक स्मारक दिसते. चौथऱ्यावर घुमटीत एका हाताची रचना तर पायाशी एका घोडेस्वाराची प्रतिमा ठेवली आहे. असे म्हणतात, तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड या दोघांमधील लढाईत या जागी तानाजींचा हात तुटला, त्याचेच हे स्मारक!
हा रस्ता असाच पुढे टिळक बंगला आणि राजाराममहाराजांच्या समाधीकडे उतरतो. सिंहगडावरचे हवामान, वातावरणाने आजवर अनेकांना मोहात पाडले आहे. यामध्ये लोकमान्य टिळक हेदेखील होते. टिळक १८८९ मध्ये गडावर राहण्यास आले. इथल्या निसर्गरम्य एकांतात त्यांनी ‘आक्र्टिक होम इन वेदाज’ हा ग्रंथ आणि ‘गीतारहस्य’ची मुद्रणप्रत तयार केली. याच बंगल्याने १९१०मध्ये टिळक आणि महात्मा गांधीजींची ऐतिहासिक भेटही अनुभवली. गांधीजी टिळकांना आपले गुरू मानत. अशा या गुरू-शिष्यांमध्ये त्या वेळी नेमकी काय चर्चा झाली ते काळालाच ठाऊक! याशिवाय नेताजी सुभाषचंद्र बोसही १९३१ साली सिंहगड भेटीवर आले होते. टिळक बंगल्यातच ते मुक्कामाला होते. कराची काँग्रेस सोडून आलेल्या नेताजींनी या सिंहगडावरच टिळक बंगल्याच्या सहवासात नव्या लढाईची प्रेरणा घेतली. आज इथे आलं, की हे सारे इतिहासभारले क्षण रोमांच उमटवत आठवतात.
या बंगल्यामागूनच एक वाट उत्तरेकडे राजाराममहाराजांच्या समाधीकडे उतरते. ऐन कडय़ालगत ही वास्तू! महाराष्ट्रातील हे एक देखणे स्मारक! चौकोनी बांधकाम, चारही दिशांना निमुळते होत गेलेले छत! इथे आतमध्ये राजारामांच्या पादुका, देवीची एक मूर्ती आहे. शिवाजीमहाराजांच्या नित्यपूजेतील एक तेजस्वी बाणही (शिवलिंग) इथे होता. हा बाण कोणी-कुठे हलवला याची माहिती मिळत नाही. समाधीचा हा परिसर स्वच्छ, मोकळा, शांत आहे. शेजारी पाण्याचे टाके आहे. पाठीमागे आता काही वर्षांपर्यंत गुलाबाची बाग होती. खरेतर इतिहासकाळात या समाधी आणि परिसराची व्यवस्था पाहण्यासाठी काही योजना लावून दिलेली होती. या साऱ्यांमुळेच हे स्मारक आज या अवस्थेत दिसते.
सिंहगडाचा हा मध्यभाग पाहात पुन्हा देव टाक्यावरून कल्याण दरवाजात उतरावे. एका खाली एक दोन दरवाजे! पैकी वरच्या दरवाजाच्या माथ्यावर दोन ओळींचा शिलालेख आहे.
‘‘श्री शालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान’’
बाळाजी बाजीरावाने हा दरवाजा बांधला किंवा दुरुस्त केला असा याचा अर्थ! या दरवाजाभोवतीच्या बुरुजांवर माहुतांसह हत्तीशिल्पं कोरली आहेत. पैकी डावीकडील अद्याप शाबूत आहे. याचा लाकडी दरवाजा आत्ता वीस-पंचवीस वर्षांपर्यंत उत्तम अवस्थेत होता. पण पुढे त्याला पाय फुटले. त्याच्या पोलादी साखळय़ा आजही दिसतात. आता त्या तरी भुरटय़ा चोरांपासून वाचवल्या पाहिजेत.

हे सारे पाहावे आणि दरवाजामागील टेकडीवर चढावे. इथे उदयभान राठोड यांचे स्मारक! एकेकाळी चौथरा आणि घुमटी असलेले हे स्मारक आता जवळपास भुईसपाटच झाले आहे. त्याचे ते कोरीव दगड अस्ताव्यस्त पडले आहेत. पुरातत्त्व खात्याच्या देखरेखीखाली असलेल्या या गडावर दिवसामागे ऐतिहासिक इमारती नामशेष होत आहेत आणि दुसरीकडे रोज एक नवी टपरी वाढते आहे. या गडाचा तट आता अनेक ठिकाणी ढासळू लागला आहे. कल्याण दरवाजाचा बुरूज नुकताच ढासळला. उदयभानचे स्मारकही नाहीसे झाले. दुसरीकडे गडावर वाढलेले बाजारू पर्यटनही सिंहगडाला त्रासदायक ठरू लागले आहे. या पर्यटकांकडून सरकार प्रवेशशुल्कापोटी पैसे गोळा करते. पण त्याचा वापर प्रत्यक्ष किल्ला वाचविण्यासाठी करण्याऐवजी सुशोभीकरणावरच होत आहे. गडावर झुणका-भाकरी, दही-ताकापुरता असलेला स्थानिक लोकांचा रोजगार ठीक होता, पण आता गडाच्या दरवाजात पानाची टपरी टाकून पान-तंबाखू विक्री होत असेल तर हे पुरातत्त्व खाते खरेच झोपले आहे असे म्हणावे लागेल.
असो! सिंहगडाच्या नशिबाचे भोग म्हणावेत आणि पुढे निघावे. उदयभान स्मारकाच्या या टेकडीवरून आपण थेट दक्षिणेच्या झुंजार बुरुजावर उतरतो. या बुरुजावर आलो, की लगेचच समोरच्या डोंगररांगांतील राजगड, तोरणा खुणावू लागतात. काही भटके याला प्रतिसाद देत सिंहगड-राजगड-तोरणा अशी वारीही करतात.
झुंजार बुरूज ते पश्चिम टोकाचा कलावंतिणीचा बुरूज यामध्ये एक भलीमोठी तटबंदी घातली आहे. या दरम्यानच्याच डोणागिरीच्या कडय़ावरून तानाजी त्यांचे मावळे घेऊन वर आले होते. हे सारे पाहात कलावंतिणीच्या बुरुजावर यावे. समोरचा दऱ्याखोऱ्यांचा खेळ मन गुंतवून टाकत असतो. आकाश निरभ्र असेल तर इथे उभे राहून तळातील हालचाल निरखावी. मुठेचे ते चमचमते पात्र आणि त्याभोवतीची शेतीवाडी पाहावी. कधी इथूनच तो धीरगंभीर सूर्यास्त पाहावा आणि पूर्वेला उगवणारा तो पौर्णिमेचा चंद्रही मनात साठवावा. पाऊसकाळी बाष्पाने भरलेले ढग हा कडा चढत असतात. ते वेगाने येतात, आदळतात आणि विस्कटतातही. सारी दरी धुकटाने भरून जाते. मग त्याला हटवत मधेच ‘सू ऽ सूऽऽ’ आवाज करत वाराही घोंगावतो. निसर्गाचे हे सारे खेळ अनुभवताना समाधी लागते आणि मग अचानकपणे त्या वाऱ्यावर डफ आणि शाहिरांचे आवाजही स्वार होतात.
..चार फेब्रुवारी १६७०, माघ वद्य नवमीची ती काळरात्र! तो शूर नरसिंह आणि पाचशे रणमावळे! घोरपड लागावी त्याप्रमाणे ते सारे कडय़ाला चिकटले.. कडा चढून गडावर दाखल झाले.. हर हर महादेवच्या गर्जना उठल्या आणि त्या अंधाऱ्या रात्री सिंहगडावर एकच हलकल्लोळ झाला. प्रचंड मोठे रणकंदन झाले. पाचशे मावळे दीड हजार गनिमांना भिडले. तलवारीला तलवार भिडली. जणू विजेवर वीजच आदळली. वादळ वणवा पिसाटला.. उदयभान आणि तानाजी मालुसरे तर एकमेकांवर तुटून पडले.. घावावर घाव पडू लागले.. यातच रावांची ढाल तुटली, पण तरीही ते लढले. अखेर दोघेही धारातीर्थी कोसळले. नरवीर झाले. मराठय़ांचा सिंह गेला, पण गड आला! शिवबांच्या तानाजीने पूर्वीच ठेवलेले ‘सिंहगड’ हे नाव सार्थक केले!
सिंहगडाला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात, पण त्यातले अनेकजण गड कुठे दिसलाच नाही असे म्हणत नाक मुरडतात. ‘इतिहास’ दिसण्यासाठी त्यात बुडावे लागते आणि ‘भूगोल’ सापडण्यासाठी त्यात हरवावे लागते. असे ज्याला जमते, त्याच्या डोळय़ांपुढे मग सतराव्या शतकातील ते रणकंदनही सहज नाचू लागते!


------------ लोकप्रभा 



No comments:

Post a Comment