Tuesday 26 June 2012

कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज.





आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज. २६ जुन १८७४ शाहू छत्रपतींचा जम झाला. त्यांचे वडिल जयसिंगराव व आई राधाबाई मुधोळच्या राजकन्या म्हणुन लौकीक होता. तर जयसिंगराव उर्फ़ आबासाहेब हे कोल्हापूरचे छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी बाळाबाई यांचे पुत्र. असा दोन्ही घराण्यांकडुन यशवंतरावांना उत्तम वारसा मिळाला होता. शाहूंचे पाळण्यातले नाव यशवंत.
शिवारायांनी स्थापण केलेल्या स्वराज्याचे रक्षण संभाजी राजांच्या करुण शेवटानंतर राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी केले. स्वत: हाती समशेर घेऊन त्या रणरागिणीने औरंगजेबाशी दोन हात केले. औरंगजेबाच्या म्रुत्यू नंतर संभाजीपुत्र शाहू मोघलांच्या ताब्यातून सुटला, त्यांने स्वराज्यावर आपला हक्क सांगितला पण ताराराणी ने नाकारला यातूनच सातारा आणि कोल्हापूर अशी स्वराज्याची दोन शकले झालीत. कोल्हापूर संस्थानच्या संस्थापक ताराराणीच्या निधनानंतर या सिंहासनाला योग्य वारस लाभला नाही कारण या गादीचे वारस अल्पवयीन व अल्पकालीन ठरलेत. इंग्रजांचा अंमल सुरु झाल्यावर त्यांच्या मर्जीनुसार वारस नेमले जात त्या राजाचा अधिकार नाममात्र होता. अधिक्रुत वारस नसल्यामुळे जवळच्या नातलगाचा मुलगा दत्तक घेण्याची प्रथा होती त्यानुसार दि. १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूर संस्थानचे वारस चौथे शिवाजी यांच्या गादीवर कोल्हापुर संस्थानमधील कागलच्या थोरल्या पातीचे जहागिरदार जयसिंगराव घाटगे यांचे पुत्र यशवंतराव घाटगे यांचे  "शाहू छत्रपती " या नावाने दत्तकविधान झाले. त्यावेळी त्यांचे वय दहा वर्ष होतं. 

राजकारण
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, दलित, बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.
बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.


 समाजकार्य
८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.
राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत आदी सर्वच जातीतील-पंथातील विद्वान, पंडीत, शिक्षित, अशिक्षित, मल्ल, शिकारी, गायक, चित्रकार, शाहीर, कारागिर, तमासगीर या सर्वावर निव्र्याज भावनेने प्रेम करून त्यांना त्यांच्या विकासासाठी व उद्धारासाठी सर्वप्रकारची मदत देत. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली व त्यानंतर ‘मूकनायक’ साप्ताहिक पूर्ववत सुरु राहिले. २० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील ‘कागल’ जहागिरीतील ‘माणगांव’ या ठिकाणी अस्पृश्यांची पहिली ऐतिहाकि परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब होते.  



‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.



‘माझे राज्य गेले तरी बेहत्तर, अस्पृश्योद्धाराचे कार्य थांबविणार नाही’ महाराजांच्या अशा कार्यामुळे अस्पृश्य जनता शाहूंना आपला त्राता, उद्धारक, मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानीत होते. ह्य़ामुळे महाराज व बाबासाहेब याचा स्नेह वाढत गेला.
करवीर राज्याचे उत्पन्न कमी असल्याने नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली. महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता.  

खासबाग कुस्तीचे मैदान म्हटले की साहजिकच कोल्हापूरचे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची आठवण येणे क्रमप्राप्त. त्यानीच या मैदानाची स्थापना केली होती. ते स्वतः अगदी लहानपणापासून निष्णात असे कुस्तीगीर होते. त्यांच्या काळात (जवळपास २६-२७ वर्षाचा काळ होता) महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी हा सुवर्णकाळ होता. कोल्हापूरच नव्हे तर सार्‍या राज्यात कुस्तीगिरांच्या तालमींचा हा उत्कर्षाचा काळ होता. त्यानी हिंदुस्थानातील कोल्हापुरात कुस्तीसाठी निमंत्रित केले. काहीजणांना वाड्यावर आणि गावात कायमचा आश्रयही दिला. पैलवानांच्या आहारासाठी [पैलवानी भाषेत 'खुराक'] महाराजांनी लाखो रुपयांची अनुदाने दिली होती. ‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले. १८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली. त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते. ‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ म्हणजे महाराजांचे क्रिडा क्षेत्राविषयीची आस्था येथे दिसते. पुढे जाऊन ३१ जुलै १८९७ रोजी जेव्हा त्यांना पुत्ररत्न झाले. त्यावेळी त्यांनी एक जंगी स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेत देशभरातील सर्व मल्ल आले होते. असा हा महान कीर्तीवंत राजा राजर्षी शाहू महाराज ६ मे १९२२ ला अनंतात विलीन झाला.

अशा थोर जाणता राजास मानाचा मुजरा.

-------------------- लोकसत्ता

No comments:

Post a Comment