Wednesday 20 June 2012

गावाकडचं लगीन





‘यायचं हं’ असा लाडीक आग्रह करून बोलावलेल्या वर्‍हाड्यांचा छळ !

गाव म्हटलं की डोळ्यासमोर सर्व कसं साधं, सोज्वळ रूपात उभं राहतं. पण गावाकडची लग्नं हल्ली हल्ली तर अंगावरच येऊ लागली. काय तो बडेजाव, काय तो दिखाऊ दिमाख वर्‍हाड्यांना तोंडात बोटं घालायला लावणारी ही ‘गावाकडची लग्नं’.. लग्नाचा मुहूर्त टळूनही उरकता उरकत नाहीत ! सत्कार सोहळे, आशीर्वादाची भाषणं. पुढारी नेत्यांच्या उठाठेवीनं गजबजून गेलेल्या या लग्न नामक सोहळ्यात नवरा-नवरी, मुहूर्त याकडे लक्ष द्यायला कोणाला उसंतच नसते.

परवा एका लग्नाला गेलो होतो तेव्हाचा प्रसंग. वैशाखाचं ऊन रणरणतंय. घामाच्या धारांनी अंग घामेजून गेलंय. सगळ्यांच्या जिवाची काहिली झालेली. घड्याळात एक वाजून दहा मिनिटं झालेली. स्टेजवरील माइकवरून अखंड वटवट सुरू आहे. बाजूला बसलेले संगीत पार्टीवाले एकामागून एक रचना सादर करताहेत. मात्र, त्यांचं गाणं ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीच नाहीये! गाऊन नव्हे ओरडून त्यांचा घसा बाकी कोरडा पडलाय. कोणीतरी मध्येच त्यांना थांबवतोय. त्यांना गाण्याची अर्धी ओळही त्यांना गिळावी लागतेय! तेवढय़ात घाईघाईनं चार-दोन मान्यवरांची नावं पुकारून ‘सत्कार’ उरकून घेतले जातात..

लग्न ठरवताना अगदी आवर्जून पाहिलेला पत्रिकेवरील ‘शुभमुहूर्त’ केव्हाच टळून गेलाय. म्हणून वर्‍हाडी मंडळी अस्वस्थ आहेत. भर दुपारी मिरवणूक निघालीय.आपण ज्या शुभ मंगल सोहळ्यासाठी आला आहात.. तो सोहळा काही क्षणांत संपन्न होणार आहे.,’ असं वारंवार सांगितंल जातयं. (क्षण सोडा; अख्खा तास उलटून गेलाय.) उपस्थितांची सहनशीलता आता संपलेली. एक जण उठतो. जाऊन सूत्रसंचालकाला गाठतो. उशिराचं कारण विचारतो. तेव्हा भलतंच समजतं की ‘साहेब’ वाटेत आहेत. त्यांना यायला थोडा उशीर होतोय म्हणून.. हसावं की रडावं?

गावाकडच्या लग्नाचं स्वरूप आज इतकं बदललंय की, या लग्नांना जाणं ही विवेकी लोकांना शिक्षा वाटू लागलीय. अर्थात, हा बिघाड काही लग्नापुरता र्मयादित नाहीये. हे अगदी मान्य. परंतु समाजात अनिष्ट परंपरा, विकृती कशा निर्माण होतात? त्या पद्धतशीर कशा पोसल्या जातात? पुढे कशा फोफावतात. त्यातून सामाजिक प्रश्न कसे निर्माण होतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता असणार्‍यांनी गावाकडची लग्नं जरूर ‘अटेन्ड’ करावी.

एका मित्राच्या लग्नाची पत्रिका घरात येऊन पडली. आशीर्वाद, सन्माननीय उपस्थिती, विशेष उपस्थिती, प्रेषक, कार्यवाह, व्यवस्थापक, संयोजक, स्वागतोत्सुक, निमंत्रक, भाऊबंद, किलबिल परिवार, आणखीन फर्म्सची आणि नवरा-नवरीची मिळून तब्बल ३५९ नावं होती! अर्थातच नवरा-नवरीची नावं त्यात हरवलेली! बर्‍याचदा पत्रिकेत नावं असलेली मंडळी लग्नाच्या मांडवाकडं फिरकतही नाहीत! आपलं नाव पत्रिकेत आहे, हेच मान्यवरांना ठाऊक नसतं.

अलीकडे लग्नपत्रिकेबाबत नवं ‘फॅड’ आलंय. एकाच लग्नाच्या तीन-चार नमुन्यांतल्या पत्रिका पाहायला मिळतात. यात खटकणारी बाब म्हणजे पाहुण्यांची ‘लायकी’, त्यांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय स्थान पाहून पत्रिकांचं वितरण केले जाते. गरिबाला गरीब पत्रिका आणि दाबजोर असामींसाठी सजवलेली महागडी पत्रिका! विशेष म्हणजे असा चातुर्वण्र्य पाळायला कोणाला काही गैर वाटत नाहीये. अगदी बिनदिक्कतपणे सारं सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी उन्हातान्हात करावी लागणारी यातायात हा स्वतंत्र विषय आहे. ‘मान्यवरांची’ प्रत्यक्ष भेट होईपर्यंत यजमान लोकं पत्रिका देण्यासाठी हेलपाटे घालत राहतात. अगदी न थकता,न कंटाळता ते मान्यवरांचा पाठपुरावा करतच राहतात आणि पत्रिका वाटूनच घरी परततात

लग्नांत ‘सत्कार’ नावाचं ढोंग पोसलं जातंय. खरं तर हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. अगदी म्हणायचंच तर स्वागत म्हणावं. अनेक ठिकाणी विशिष्ट पद्धतीचे फेटे बांधायला खास माणूस बोलावतात. माइकवरून अनेक नावांचा पुकारा सुरू असतो. अमुक-तमुक यांना विनंती आहे की, त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यावं.. हे लोक मोठय़ा लगबगीनं येतात. फेटा बांधून घेतात. पुढच्याच क्षणाला काढतात. चोळामोळा करून बगलेत घालतात! फेट्याचा काहीही उपयोग होत नाही, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. पण हे ‘फेटा कल्चर’ मांडवातल्या उपस्थितांचं वर्गीकरण कन टाकतेय.

दहा-पाच कथित अमुक-तमुकरावांचा सत्कार होत असताना लग्नासाठी खास वेळ खर्चून आलेल्या पै-पाहुण्यांना काय वाटत असेल याची कोणालाच फिकीर नसते. मात्र ‘अमुक-तमुक’ची बडदास्त ठेवताना, त्यांच्या मागं-पुढं करताना यजमानाची पुरेवाट लागलेली असते. हे अमुक-तमुक कोण? तर ते असतात राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, संस्थांचे पदाधिकारी-अधिकारी अन् पत्रकारही. त्यात आमदार-खासदार साहेब, तहसीलदार, इन्स्पेक्टर किंवा बी.डी.ओ. लग्नाला आले असतील तर यजमानांची स्वारी भलतीच खूश. सोहळ्याला ‘चारचाँद’ लागल्यासारखं वाटतं त्यांना. पण उपस्थितांमध्ये कोणी संशोधक, वैज्ञानिक, साहित्यिक, ख्यातकीर्त चित्रकार, संगीत क्षेत्रातला कलावंत, सामाजिक कार्यकर्ता किंवा वेगळे काही करणारं कोणी आलं असेल तर त्यांची दखल पण घेतली जात नाही? अलीकडे लग्न म्हणा किंवा कौतुक सोहळ्यातून आध्यात्मिक गुरू, बाबा, बुवा, महाराज, उपदेशकांचे मोठ्ठं स्तोम माजलयं. मग कुठं ऐन लग्नातच दर्शनबारी सुरू होते!

मुळात ही सत्काराची किंवा नामोल्लेख करण्याची प्रथाच चूक आहे. त्यामुळे खर्‍या गुणवंतांचा सत्कार केला जात नाही, अशी तक्रार करायची नाहीये. पण यावन समाजात प्रतिष्ठेचे, गुणवत्तेचे, यशस्वीतेचे मापदंड कोणते आहेत? हे समजतं इतकंच. मुला-मुलीला सरपंच हो किंवा राजकारणात पड असे, सहसा कोणी सांगत नाही. तेव्हा आयटी, मेडिकल, इंजिनिअरिंग अशा शाखांमागे करिअरच्या शोधात धावणारी पालक मंडळी लग्नात प्रतिष्ठित कोणाला समजतात? यातून कोणता संदेश जातो? हे कधीतरी आपण तपासायला हवं.

नवरदेव उशिरा कसाबसा मांडवाच्या/मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी येतो. ‘डीजे’च्या तालावर वरपक्षाची मित्रमंडळी बेधुंद, बेभान होऊन नाचत असतात. सार्‍या वर्‍हाडाला हे मूठभर लोक वेठीस धरतात. कोणीतरी नवरदेवाला तेथून बळजबरी ‘उचलून’ आणतो. मंगलाष्टकं सुरू होईपर्यंत ‘डान्सपार्टी’ रंगलेली असते. आशीर्वाद हा जणू विवाह संस्कारातील एक संस्कारच झालाय! नवरा-नवरी बोहल्यावर ताटकळत उभे. इकडे नावामागून नावं पुकारली जातात. वर्‍हाडी मंडळी हतबल झालेली. एकदाचं कधी लग्न लागतय, असं त्यांना झालेलं. पण आयताच ‘मॉब आणि माइक’ समोर आल्यावर आशीर्वादवाले आटोपते घेतील तर शप्पथ. बहुतेकांना मुला-मुलीची नावंही ठाऊक नसतात. याला-त्याला विचारतात. पण पुढचं भाषण इतकं सराईत की बस्स. मस्त टेप ऐकावी तसं. एखादा मोठा नेता किंवा आध्यात्मिक गुरु ‘कार्यबाहुल्या’मुळे लग्नाला येऊ शकला नाही, तर आशीर्वादाचं भाषण मोबाईल माइकसमोर धरून ऐकवलं जातं!

मंगलाष्टकांच्या किती तर्‍हा. कोणी पोवाडा म्हटल्याप्रमाणे म्हणतो. एखादी संगीत पार्टी भावगीतं, भक्तिगीतं म्हटल्याप्रमाणे म्हणते. कोणी शीघ्रकवी यजमानांची नावं गुंफून कृत्रिम गाणी तयार करतो. हे ऐकायला काहीतरीच वाटतं. इच्छा असो वा नसो अशा लग्नांना जावंच लागतं. लग्न लावून घरी येताना जीव नखात येतो. एका दिवशी १0-१२ लग्नांत हजेरी लावणारेही पुढारी आपल्याकडे आहेत. कधी कधी कोडं पडतं की, असं कसं काय शक्य होतं त्यांना ? लक्षात असं आलं की, लग्नातले स्वागत, सत्कार, हार-तुरे घेतली जाणारी ‘विशेष दखल’ यांना पुढच्या लग्नाला जायला ऊर्जा देते. याशिवाय पुढारी मंडळी लग्नाकडे कौटुंबिक सोहळा, धार्मिक संस्कार म्हणून पाहतच नाहीत. त्यांच्या दृष्टीने ते जनसंपर्काचं आयतं माध्यम बनलंय. त्यामुळे आलिशान ‘एअर कंडिशनर’ गाडीतून लग्न अटेन्ड करणं त्यांना अजिबात त्रासाचं वाटत नाही.

राज्य पातळीवरील शाही विवाह सोहळे गाजतात. त्यांचे कवित्व सुरू राहतं. खाली खाली तेच झिरपतं. अनुकरण होत राहतं. आज ग्रामीण भागातदेखील ‘इझी मनी’वाल्यांची संख्या वाढलीय. ते लग्न किंवा अन्य कौटुंबिक सोहळ्यांवर प्रचंड पैसे उधळतात. त्यातून ‘लॉन्स कल्चर’ जन्माला आलंय. सायंकाळची वेळ. तिथली ती गुबगुबीत हिरवळ. ऑर्केस्ट्रा, लायटिंगचा झगमगाट, स्टेजची सजावट, बुफे जेवणाचा थाट.. जोडीला फटाक्यांची आतषबाजी (अर्थात पैशांचा धूर). काही जण तर खास यासाठी रात्रीच्या वेळेला लग्न ठेवतात. कारण एकच लग्न आता इव्हेन्ट बनलंय.. ते ‘नेत्रदीपक’ व्हावं ही महत्त्वाकांक्षा! त्यासाठी त्यावर लाखोंची उधळमाधळ होते.

गावाकडच्या तालेवार कुटुंबीयांच्या हुंड्याभांड्याच्या कल्पनाही अलीकडे बदलल्या. नवरदेव परदेशात नोकरीला असेल, त्याला तगडे पॅकेज असेल तर पुण्या-मुंबईत फ्लॅट किंवा महागडी फोर व्हीलर कार दिली जाते. सोबतीला सोनं-नाणं आणि इतर वस्तूंची रेलचेल असतेच. आज तालुकापातळीवर राहणार्‍या नोकरदारांचं स्वप्न काय असतं? तर बंगला, गाडी आणि मुलींची थाटामाटात लग्नं बस्स! ‘काय लागेल तो खर्च होऊद्या. एकदाच व्हायचं पोरीचं लग्न’ असं म्हणत अशा खर्चीक लग्नांचं खुशाल सर्मथन केलं जातंय. लग्न किती मोठं झालं? त्याला कोण कोण आलं? हे म्हणजे सोशल स्टेटसचा सिम्बॉल बनलाय. लग्नापेक्षा याच्याच चर्चा गावागावांत रंगतात. ही अशी प्रतिष्ठा मिळविण्याचा ‘संसर्ग’ सार्‍यांनाच जडलाय.

नेमकी हीच मानसिकता साधेपणानं लग्न करण्यातला अडसर बनलीय. मोठय़ांचे डोळे दिपवणारे सोहळे पाहून पोरीचं लग्न कसं करायचं, अशा विवंचनेतल्या बापांचा ऊर चेपतो. ते कोसळून पडतात. ऐपत नाही आणि पोरीचं टुमणं मागं लागलेलं ‘किमान लग्न तरी देवळात माळबीळ घालून नका करू.. ’यातून मार्ग कसा काढायचा? बाप कोंडीत सापडतो.

महागडी, डोळ्यांना जेवढी भडक वाटतात तितकीच मनाला भडक वाटणारी, दिखाऊपणाचा उबग आणणारी, चुकीच्या प्रथांवर वायफळ पैसा आणि वेळ खर्च करणारी ही ‘गावाकडची लग्नं’ बघितली की, सामुदायिक विवाह सोहळे दिलासादायक वाटतात. बडेजाव, सामाजिक प्रतिष्ठा, त्याच्या अवतीभोवतीचा महाप्रचंड खर्च यांना कटाक्षानं बाजूला ठेवून होणारे हे सामुदायिक विवाह ,‘शी काहीतरी भलतेच’ म्हणून बडेजावपणाची हौस असणारे नाकारतात, अजूनही समाजातल्या मान-सन्मानाच्या कल्पनांमुळं सामुदायिक विवाहांना हवा तेवढा पाठिंबा मिळत नाहीये. या आर्थिक विषमतेनं सामाजिक प्रश्नही जन्माला घातले. सामुदायिक विवाह सोहळ्यात पुढार्‍यांनी, धनिकांनी स्वत:च्या घरातली लग्नं लावली तर खोट्या प्रतिष्ठेपायी येणारी कर्जबाजारीपणाची दुर्दैवी वेळ गरिबांवर येणार नाही.

आताच लग्नाची तिथी संपली. पुढील पन्नास दिवस तरी लग्न सोहळ्यांना विश्रांती मिळणार आहे. गावाकडच्या एका लग्नानं मला बौद्धिक पातळीवर इतकं दमवलंय, शिणवलंय की यापुढे गावाकडचं लगीन म्हटलं तरी घाम फुटावा.

---------------- लोकमत 



No comments:

Post a Comment