Saturday 5 January 2013

बंगालची दुर्गापूजा



आश्विन महिन्यात देशभरात सर्वत्र आदिशक्तीची पूजा केली जात असली, तरी बंगालची दुर्गापूजा मात्र वैशिष्टय़पूर्ण मानली जाते. किंबहुना दुर्गापूजा आता देश, प्रांताची सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. जगात सार्वजनिकरीत्या साजरा होणारा सर्वात मोठा सण असे दुर्गापूजेचे वर्णन केले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी जसे लोकमान्य टिळकांनी घरगुती गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले, अगदी तसेच बंगालमध्येही घडले. स्वातंत्र्यदेवीचे प्रतीक म्हणून दुर्गादेवीची आराधना केली जाऊ लागली. बंगालमध्ये १४व्या शतकाच्या अखेरीस तत्कालीन जमीनदार आणि जहागीरदारांनी आपापल्या महालात दुर्गापूजा करण्यास सुरुवात केली. अर्थात त्याला खरे सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त होण्यास आणखी दोनशे र्वष जावी लागली. १७६१ मध्ये हुगळी शहरात १२ तरुण मित्रांनी एकत्र येऊन सार्वजनिकरीत्या वर्गणी गोळा करून दुर्गापूजा करण्यास सुरुवात केली. बारा मित्रांनी सुरू केली म्हणून या उत्सवास ‘बारोयारी' पूजा असेही म्हटले जाते. त्यानंतर हे लोण सर्व बंगालमध्ये पसरले. भारतावर अधिसत्ता गाजविणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचे सुरुवातीचे मुख्यालय कोलकात्यात होते. कोलकाता हीच इंग्रजांची राजधानी होती. कंपनीचे अधिकारीही दुर्गापूजा महोत्सवात सहभागी होऊन स्थानिक जनतेची मने जिंकून घेण्याचा प्रयत्न करीत असत. अतिंद्रनाथ बोस यांनी १९२६ मध्ये सार्वजनिक दुर्गापूजा महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात करून सर्व धर्म आणि पंथीयांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
भाद्रपद अमावस्येपासून वेध
बंगालमध्ये जरी पंचमीपासून दुर्गापूजा केली जात असली, तरी त्याचे वेध मात्र सर्वपित्री अथवा भाद्रपद आमावस्येपासून लागतात. आपल्याकडे जसे दिवाळीत नरक चतुर्दशीच्या पहाटे आकाशवाणीवरून नरकासुर वधाचे कीर्तन दरवर्षी प्रसारित होत असते, तसेच घटस्थापनेच्या आदल्या दिवशी भल्या पहाटे महिषासुरमर्दिनीचे आख्यान बंगालच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत असते. १९५० पासून सातत्याने हे आख्यान प्रसारित होत असून लाखो बंगाली ते भक्तिभावाने ऐकतात. दिवंगत बीरेंद्रकृष्ण भद्र आणि पंकजकुमार मुल्लिक यांच्या आवाजातील हे देवीआख्यान ऐकण्यासाठी सारा बंगाल पहाटे चार वाजता उठून रेडिओला कान लावतो.
महाराष्ट्रात घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव साजरा होत असला, तरी बंगालमध्ये तो पंचमी म्हणजे पाचव्या दिवसापासून साजरा केला जातो, अशी माहिती गेली ३५ वर्षे महाराष्ट्रात असणाऱ्या दीपांणिता रॉय यांनी दिली. दीपांणिता ठाण्यातील बंगाली समाज संघटनेत पदाधिकारी म्हणून कार्यरत असून दरवर्षी शहरात दुर्गापूजा करतात. यंदा त्यांच्या उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्या म्हणतात, बंगालमध्ये पंचमीच्या दुर्गापूजेस प्रारंभ होतो. नऊ सुहासिनी नदीवर जाऊन घटातून पाणी आणतात. त्या नऊ घटातील पाणी दुर्गापूजेसाठी वापरले जाते. अर्थात पंचमीच्या दिवशी फार मोठी पूजा होत नाही. खरा सोहळा दुसऱ्या दिवशी षष्ठीच्या दिवशी असतो. या दिवशी विवाहित महिला त्यांच्या मुला-मुलींच्या भल्यासाठी उपवास करतात. अर्थात उपवासाचे हे बंधन पूजाविधी संपेपर्यंतच असते. एरवी दुर्गापूजा महोत्सवात मात्र विविध खाद्य-पक्वान्नांची रेलचेल असते. त्यात सामिष आहारही असतो. दुर्गा, कालीमाता, महालक्ष्मी अशा आदिमायेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. पूजेचा मुहूर्त पंचांगानुसार ठरतो. कालीमाता दोन प्रकारच्या असतात. एक- नीला काली, जी आकाशनिळ्या रंगाची असते आणि दुसरी- समाकाली ही पूर्ण काळ्या रंगाची असते. नीला कालीचा उजवा पाय, तर समाकाली देवीचा डावा पाय पुढे असतो. कालीमातेस बळी देण्याची प्रथा आढळून येते. सर्वसाधारणपणे बोकडाचा बळी दिला जातो. बळी देण्यासाठी सफेद भोपळ्याचाही वापर केला जातो. सकाळ-संध्याकाळी आरती केली जाते. तेव्हा पारंपरिक ढाक हे वाद्य वाजविले जाते. पूजाकाळात प्रत्येक दिवशी मंडपात महाप्रसाद असतो. अष्टमीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. रात्री साधारण ११ ते १२च्या दरम्यान १०८ दिवे लावून महालक्ष्मीचे पूजन केले जाते.
चित्तवेधक मूर्तिकला
अप्रतिम मूर्तिकला हा या उत्सवाचा प्राण असतो. आपल्याकडे जसे दसऱ्यापासूनच काही मूर्तिकार पुढील वर्षीसाठी गणेशमूर्ती घडविण्याच्या कामास सुरुवात करतात, तसे बंगालमध्ये अक्षय्य तृतीयेस मूर्तिकार काम सुरू करतात. मूर्तीसाठी गंगा नदीच्या काठाची माती आणली जाते. विशेष म्हणजे मूर्तिकामासाठी चिमूटभर का होईना एखाद्या वारांगनेच्या घरातून माती आणण्याची परंपरा कसोशीने पाळली जाते. कोलकातामधील कुमारतुली (कुंभारवाडा) भागात मोठय़ा प्रमाणात मूर्तिकाम होते. आता देशभरात विखुरलेला बंगाली समाज आपापल्या ठिकाणी सार्वजनिक दुर्गापूजा आयोजित करतो. तिथे पारंपरिक मूर्ती घडविण्यासाठी खास बंगालमधून कलावंतांना आमंत्रित केले जाते.
नवमीच्या दिवशी कुमारीपूजन केले जाते. या दिवशी पूजास्थळी नऊ वर्षांखालील मुलींना देवी मानून त्यांची पूजा केली जाते. त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. विजया दशमीच्या दिवशी या महोत्सवाची सांगता होते. आपल्याकडे एकमेकांना आपटय़ाची पाने सोने म्हणून वाटून हा दिवस साजरा केला जातो. बंगालमध्ये सुहासिनी महिला या दिवशी सिंदुरखेळा करतात. सिंदुरखेळा म्हणजे आपल्याकडचा हळदीकुंकू समारंभ. संध्याकाळी हा उत्सव झाला की देवीची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. त्या वेळी आपण गणपती विसर्जन मिरवणुकीत जसे गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..! म्हणतो, अगदी तसेच बंगाली भाविक ‘अच्छे बोछोर अबार होबे’ म्हणजे ‘हे असे पुढील वर्षीही घडेल’ अशी घोषणा देतात.
दुर्गापूजेची परंपरा जमीनदारांनी त्यांच्या घरात सुरू केली असली तरी सध्या मात्र बंगालमध्ये मोठय़ा प्रमाणात सार्वजनिक स्वरूपातच हा सण साजरा केला जात असल्याची माहिती अरुणिमा रॉय यांनी दिली. या दिवशी सहसा घरात कुणी स्वयंपाक करीत नाहीत. शहरातील हॉटेल्सही या काळात खास खाद्य महोत्सव भरवून पारंपरिक पदार्थ उपलब्ध करून देत असतात. दुर्गापूजेसाठी बांधण्यात आलेले ‘पेंडॉल' अप्रतिम आणि भव्य असतात. एखाद्या भव्य देवालयासारखे पेंडॉलचे स्वरूप असते. त्याभोवती डोळ्याचे पारणे फेडणारी विजेची आरास केली जाते. संध्याकाळी शहरभर फिरून अशा आरासी पाहणे हा एक मोठा आनंदसोहळा असतो. आपल्याकडे गणेशोत्सवात जसे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम सादर होतात, तसेच दुर्गापूजा महोत्सवात बंगालमध्ये करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. बंगाली समाज उत्सवप्रिय मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी दुर्गापूजा महोत्सव संपत असला तरी याच दिवसापासून दिवाळीपर्यंत एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्याचे पर्व बंगालमध्ये सुरू होते. या काळात प्रत्येक घरात काही ना काही गोड पदार्थ खायला मिळतात
 
----- लोकप्रभा 

No comments:

Post a Comment