Tuesday 22 January 2013

संत गाडगे महाराज - भाग २



आकाश कोसळून पडले तरी डगमगायचे नाही. खोट्यानाट्याचा मुलाहिजा राखायचा नाही. हा डेबुजीच्या स्वभावातला एक महान गुणधर्म आजही त्याच्या चारित्र्याचा एक तेजस्वी पैलू म्हणून सांगता येतो. आता शेतावर सखुबाई, मामी, आजा, आजी, बळिराम आणि कुंताबाई सगळेच जातीने काम करू लागले. कपाशी वेचायला, ज्वारी कापायला, काय वाटेल ते काम करायलासगळे घर एकजुटीने लागल्यामुळे, डेबुजी  वट्टीची शेती दापुरे पंचक्रोशीत नमुनेदार म्हणून सगळ्यांच्या नजरेत भरण्यासारखी पिकायची. आजवर गडी नोकरांकडून शेती करवी. आता आपण स्वतः कसे राबायचे? असला किंतू आजा आजी मामी आईच्या मनात डोकावू लागताच, डेबुजी म्हणाला - ``शेतकरी कधी मोठा नसतो नि छोटा पण नसतो. तो फक्त शेतकरीच असतो. शेतीच्या मातीत कष्ट करावे नि मातीतून सोने काढावे, एवढेच त्याचे काम, तोच त्याचा धर्म नि जमीन त्याचा देव. बाकीचे सारे देव धर्माचे चोचले थोतांडी. श्रीमंती गरिबीचे काय घेऊन बसलात? ढगाची साळवटं ती. येतात नी जातात. श्रीमंतीची मिजास कशाला नी गरिबीची लाज कशाला? मनगटं घासून कामं करावी. मिळेल तो ओला कोरडा घास अभिमानाने खावा आणि जगात मान वर करून वागावे. पूर्वी आपण कसे होतो नि आज कसे झालो, हव्यात कशाला शेतक-याला त्या भानगडी?’’
मेहनती दिलगी, चोरटे हुशार
सालोसाल शेती पिकवावी आणि सावकाराने कर्जाय्चा पोटी कापूस-धान्यांचे पर्वत डोळ्यादेखत उचलून न्यावे. वर्षभर काबाडकष्टकरून अखेर पदरात काय तर खळ्याच्या मातीत पुरलेले नि उरलेले धान्याचे दाणे टिपावे, नदीत नेऊन धुवावे आणि पोटासाठी घरी आणावे. करडीचे मातेरे स्वच्छ करून त्याचे घरीच तेल काढावे. धड दिवठाणाला पुरायचे नाही ते, तर खायला कुठचे? म्हातारा हंबीरराव खचत चालला ही अवस्था पाहून. डेबुजी  त्याची समजूत घालायचा. ``हे पहा आबाजी, आधी पण सावकाराच्य पेचातून मोकळे होऊ या. मग तेल तूप काय वाटेल ते खाऊ. पण जोवर ही कर्जाची अवदसा आपल्या मानेवर आहे तोवर अमृत खाल्ले तरी आंगी लागणार नाही.’’
जगात मोठा साधू कोण?
घरात मनस्वी कष्ट असतानाही डेबुजी  बैलांच्या दाणावैरणीचे हाल चुकूनसुद्धा होऊ द्यायचा नाही. आपण उपाशी रहावे पण ज्यांच्या मेहनतीवर आपली शेती पिकते, त्या मुक्या जनावरांचा घास तोडू नये, हा सिद्धांत त्याने कसोशीने पाळला. बैलांना तो जगातले खरे संत साधू म्हणून पूज्य मानायचा. त्यांना धुवून पुसून गोंजारल्यावर तो त्यांना दोन हात जोडून पूज्य भावाने नमस्कार करायचा. शेती किंवा शेतकरी यांच्यापेक्षा जगावर बैलांचे उपकार फार मोठे आहेत. रात्रंदिवस कष्ट करून जो जगाला अन्न देतो, सुख देतो, तोच खरा साधू. हा डेबुजीच्या मनीचा भाव जही त्याच्या चारित्र्यात अपरंपार उफाळलेला दिसून येतो.
डेबुजी नाक्षर खरा, पण त्याची व्यवहारी नजर मोठी चोख आणि करडी, पीक काढले किती, सावकाराने नेले किती, त्याची चालू भावाने किंमत किती,याचा बिनचूक अंदाज बांधून, त्याने तिडके सावकाराची भेट घेतली आणि हिशेब दाखवा आणि पावती करा, असा आग्रह केला. त्याने अनेक वेळा थापा दिल्या, होय होय म्हटले, सबबी सांगितल्या, पण हिशेबाचा किंवा पावतीचा थांग लागू दिला नाही. मामाचे सर्व कर्ज व्याजासकट फिटून उलट तुमच्याकडेच आमची बाकी निघते, असा डेबुजीने उलटा पेच मारला. पुष्कळ दिवस अशी माथेफोड केल्यावर, एक दिवस डेबुजीने त्याला सरळ हटकले. ``हिसेब दाखवून फेडीची पावती देत नसशील, तर यापुढे तुला एक दाणा देणार नाही. शेतावर आलास तर तंगडी छाटून लंबा करीन. याद राख. गाठ या डेबुजीशी आहे. भोलसट चंद्रभानजी मामाशी नाही.’’
आलाच अखेर तो प्रसंग
सावकाराने हिशेबाच्या आकड्यांची उलटापालट करून सगळी शेती गिळंकृत करणारा कर्जाचा आकडा डेबुजीपुढे टाकला. हा खोटा आहे, मी मानीत नाही, असा त्याने करडा जबाब दिली. उद्या आणतो तुझ्या सा-या शेत जमिनीवर टाच, असा सावकराने दम भरला. ठीक आहे, आणून तर पहा. असा सडेतोड जबाब देऊन डेबुजी परतला. वाटेत पूर्णानदीच्या काठच्या त्या जमिनीजवळ येताच त्याला ब्रह्मांड आठवले. `ही माझी जमीन. माझी लक्ष्मी. इतक्या वरसं सेवा केली हिची आम्ही सगळ्यांनी. घामाबरोबर चरबी गाळली आणि उद्या तो सावकार कायदेबाजीने हिसकावून घेणार काय आमच्या हातातनं? पहातो कसा घेतो ते.’
सगळी जमीन सावकाराच्या घरात जाणार, ही बातमी कळताच हंबीररावाच्या घरात रडारड झाली. डेबुजीने धीर देण्याचा खूप यत्न केला. मूळचा जरी तो नाक्षर तरी व्यवहाराच्या टक्क्याटोणप्यांनी त्याला मिळाले व्यवहाराचे ज्ञान पढिक पंडितांच्या शहाणपणापेक्षा अधिक कसदार होते. `माझी बाजू सत्याची नि न्यायाची आहे. सावकारशाही नि कायदेबाजी कितीही धूर्त नि चाणाक्ष असली तरीही मी त्यांना पुरून उरेन. अन्यायाचा प्रतिकार काय नुसत्या कोर्टबाजीनेच करता येतो? शेताची माती कसण्यात कसदार बनलेल्या माझ्या पीळदार मनगटाचा काहीच का उपयोग होणार नाही? पैसेवाल्यांनी कोर्ट कचे-यांच्या पाय-या चढाव्या आणि गोरगरिबांनी ठोशांनी न्यायाचा ठाव घ्यावा’ इतक्या कडेलोटावर त्याची विचारसरणी गरगरू लागली.
पांचशे कोसात सावकाराचा दरारा
सोनाजी राऊत नावाच्या वजनदार शेजा-याने डेबुजीला समजावण्याची वजनदार खटपट केली. तो म्हणाला - ``डेबुजी, ही भल्याची दुनिया नाही रे बाबा. सतीच्या घरी बत्ती नि शिंदळीच्या दारी झुले हत्ती. वाघाच्या तडाक्यातनं माणूस एकाद वेळ शीरसलामत वाचेल, पण सावकारी कचाट्यातनं? छे! नाव काढू नकोस. तशात हा सावकार म्हणजे महा कर्दनकाळ. पांचशे कोसात याचा दरारा. गाभणी गाभ टाकते.’’
डेबुजी – अरे मोठा वाघ का असे ना तो. चौदा वरसं शेत आमच्या वहिवाटीत आहे. मी नाही त्याला कबजा घेऊ देणार. वेळच पडली तर अस्तन्या वर सारून करीन काय वाटेल ते.
सोनाजी – डेबुजी, हा आततायीपणा काही कामाला येणार नाही. अरे, खैरी गावचे नि आपल्या इथले जाठ लोक म्हणजे वाघाची जात. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवायची प्राज्ञा नाही कुणाची. पण या सावकारानं त्यांचीही हड्डी पिळून मळून त्यांना गोगलगाय करून टाकलंय. पहातोस ना? मग तुझा एकट्याचा रे काय पाड? तुझ्यामागं आहे कोण? येणार कोण? या भानगडीत तू पडू नये हे बरं.
म्हाता-या हंबीररावनेही सोनाजीच्या उपदेशाला पाठिंबा दिला. ``पोरा, काय चालवलंयस हे तू. शेताचा कबजा घ्यायला सावकार उद्या आला तर येऊ दे. काय वाटंल ते करू दे. त्याला आडवा जाऊ नकोस. शपथ हे माझ्या गळ्याची, या गावात आपल्या बाजूचे कुणी नाही. घरात दातावर मारायला तांब्याचा दमडा नाही. कशाला घेतोस बाबा समर्थाशी होड? व्हायचं असंल ते होऊ दे. आपण बोलून चालून परीट. जिकडं भरला दरा तो गाव बरा समजून हवं तिथं जाऊ, कुठंही दोन कपडं धुवून पोट भरू. पण या सावकाराला आडवा जाऊ नको रे बाबा.’’

डेबुजी वट्टीच्या शेतात सावकार आज नांगर घालून कबजा घेणार, या बातमीने आसपासचा सारा शेतकरी त्या शेताच्या आजूबाजूला जमा झाला. डेबुजी मोठ्या पहाटेलाच शेतावर गेला. मागोमाग हंबीरराव, सखूबाई वगैरे मंडळी धावली. इतक्यात ८च्या सुमाराला महाशय तिडके सावकार घोड्यावर स्वार होऊन दाखल झाले. ७-८ औत, बैल, नांग-ये, ९-१० तगडे कजाखी नोकर बरोबर होते. जुंपा रे आपले बैल, घाला शेतात नांगर आणि  तो कोण नांगरतो आहे तिथे, त्याला गचांडी मारून बाहेर काढा.  सावकाराने आरोळी दिली. आजूबाजूच्या या भानगडीकडे मुळीच लक्ष न देता, डेबुजी आपला नांगर खाली मान घालून चालवीत होता. अरे पाहता काय. घाला त्याच्या कंबरेत लाथ नि द्या फेकून हद्दीबाहेर. सावकार पुन्हा गरजला. हंबीरराव व सखुबाईने रडकुंडी येऊन डेबुजीला बाहेर काढण्याचा खूप त्रागा केला. पण हूं का चूं न करता तो नांगर चालवीतच राहिला. धरा त्याला, काढा बाहेर, डेबुजी या सावकाराच्या आरोळ्या चालल्याच होत्या. अखेर त्याने हनमंत्या महाराला ``हनमंत्या, हो पुढे. हिसकावून तो औत. मार त्या चोराला गचांडी नि काढ शेताबाहेर.’’ असा निर्वाणीचा हुकूम केला.
जा गुमान मागं, नाहीतर -
हनमंत्या पुढे सरसावला. डेबुजीने त्याच्या डोळ्याला डोळा भइडवला. आगीच्या ठिणग्या पडत होत्या त्या इंगळी लाल डोळ्यांतून, ``हनमंत्या’’ डेबुजी गरजला. ``तुझ्या जिवाची तुला पर्वा नसंल, पोराबाळांची आशा नसंल, तरच पाऊल टाक पुढं. मी झालोय आताजिवावर उदार. काळाची मुंडी पिरगाळून टाकीन, तुझी रे कथा काय? एक पाऊल सरकलं पुढं का मेलास समज तू. तुझ्यामागं तुझ्या पोराबाळांना देईल का रे हा जुलमी सावकार शेरभर धान्य? जा गुमान मागं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे.’’ हनमंत्या कचकला नि जागच्याजागी थबकून उभा राहिला.
सावकाराच्या संतापाचा पारा भडकला. त्याने दोन तगडे जाठ डेबुजीच्या अंगावर सोडले. दोनी बगला एकदम पकडून त्यांनी डेबुजीचा नांगर खाली पाडला. हंबीरराव सखुबाईने रड्याचा आकांत केला. डेबुजीने एका हिसड्यात एका जाठाला कोपरखळीच्या ताख्याने पचकन खाली विव्हळत बसवले आणि दुस-याच्या पोटात लाथेची ठोकर मारून जमिनीवर पालथा लोळवला. झटकन त्याने नांगराचा तुत्या (साडेतीन हात लांबीची लोखंडाची कांब) हातात घेऊन थेट सावकारावर चाल केली. आज मी मरेन किंवा तुझ्या नरडीचा घोट घेऊन. कसा घरीजिवंत जातोस ते पहातो आता मी, अशी भयंकर गर्जना करून डेबुजी धावला. सावकार भेदरला. घोड्याचा लगाम खेचून तो परतायला वळतो न वळतो तोच डेबुजीच्या तुत्याचा तडाखा तडाड बसला घोड्याच्या पुठ्ठ्यावर. घोडा उधळला. सावकाराचे पागोटे गेले गडगडत गरगरत शेताच्या मातीत. मालक महाराज जीव घेऊन पसार झालेले पाहताच, बरोबरचे सारे नांगरे गडी नि जाठ सुद्धा भेदरले. जाता की नाही इथनं सारे? जीव घेऊन एकेकाचा. सोडणार नाही. डेबुजीचा त्या वेळचा रुद्रावतार पाहून बघ्यांचीही तिरपीट उडाली. माझ्या शेतात पाऊल टाकण्यापूर्वी घरच्या बायकांची कुंकवं पुसून या मर्दांनो, ही शेवटची गर्जना ऐकताच एकजात सगळ्यांनी भराभर पोबारा केला. डेबुजीने नांगर घेतला नि जसे काही कुठे झालेच नाही असा वृत्तीने नांगरणी पुढे चालू केली.
यमाचा काळदण्ड सावित्रीने आपल्या स्वयंभू तेजाने जसा अचानक परतवला, तसलाच प्रकार हंबीररावच्या डेबुजी नातवाने केलेला पाहताच सावकारशाही वचकाचा शेकडो वर्षांचा फुगाच फुटला. अरेच्चा, सावकाराला असा आडवून तुडवताही येतो म्हणायचे? हा नवाच पायंडा डेबुजीने व-हाडच्या शेतकरी जनतेला प्रथमच शिकवला. बिचारा तिडके सावकारही सपशेल पाणथळला. डेबुजीचे उदाहरण उद्या बाकीच्या शेतकरी कुळांनी गिरवले तर आपले काय होणार?
या भीतीने त्याच्या तोंडचे पाणी पळाले. डेबुजीला आवरा म्हणून उपदेश करणारी मंडळीच आता त्याची पाठ थोपटायला हंबीररावाकडे धावली. माणसातला कर्दनकाळ म्हणून पिढ्यानपिढ्या गाजलेला सावकाराचा दरारा डेबुजीने एकाच थपडीत मातीमोल केल्यामुळे, पुढे तडजोडीचा मार्ग बंद झाला. दापुरी गावात यायलाही त्याला तोंड राहिले नाही.
काही दिवस गेल्यावर, तिडके सावकाराने मध्यस्थांची परवड घालून डेबुजीशी तडजोड करण्याची खूप तंगडझाड केली. ``ज्याचा दाम खोटा असेल त्याने सावकाराच्या कोर्टकचेरीच्या दरडावणीला भ्यावे. माझा हिशेब उघडा नि चोख आहे. वसूल घेतो नि पावती देत नाही? पटवीत नाही? आणि गुमान येतो जमीन कबजा घ्यायला? त्या जमिनीचे मामानी रोख पैसे दिले तरी खरेदीखत केले नाही. काय, कायद्याला डोळे आहेत का फुटले? कायदा काय असा चोरांना पाठीशी घालतो होय. जा म्हणावं तुलाकाय करायचं असंल ते करून घे. आम्ही त्याची एक दिडकी लागत नाही.’’ डेबुजीच्या या बोलण्याला कोणालाही खोटे पाडता येई ना.
अखेर मूळ मालक म्हातारा हंबीरराव याला कसाबसा मथवून, सावकाराने गहाण जमिनीपैकी १५ एकर जमीन परत देऊन, आता काहीही देणे राहिले नाही, अशी दुकानपावती देऊन वांधा मिटवला. हंबीरराव, सखुबाईला आनंद झाला, पण ``तुमचे तुम्ही मालक आहात. मी एक तसूभरसुद्धा तुकडा त्याला दिला नसता.’’ हे डेबुजीचे तुणतुणे कायम राहिले.
उपाशी रहा पण कर्ज काढून सावकाराच्या जाळ्यात अडकू नकारे बाबानो, ही गाडगेबाबांची प्रत्येक कीर्तनातली आरोळी लक्षावधि लोकांनी आजवर ऐकली नि रोज ऐकतात. तिच्यामागे हा जुना इतिहास आहे, हे त्यांना आता तरी नीट उमजावे म्हणून या कथेचा किंचित विस्तार करून सांगितली.
डेबूजीचा देवीसिंग झाला.
सावकार-सापाचे नरडे दाबून सर्वस्वाचा मणि त्याच्या मस्तकातून खेचून काढण्याच्या अपूर्व यशाने दापुरी पंचक्रोशीत डेबुजीला गावकरी नि शेतकरी मोठा मान देऊ लागले. ते आता त्याला देवीसिंग या बहुमानवाचक नावाने संबोधू लागले. एक वर्षातच हंबीररावच्या घराण्याची कळा बदलली. कपाशी, ज्वारी, गहू, जवसी, करडी, तुरीचे पीकही महामूर आले. अंदाजे एक हजार रुपयांची लक्ष्मी घरात आली. आंगणात धान्यांचे कणगे उभे राहिले. धनधान्य कपडालत्ता, दूधदुभते यांची चंगळ उडाली. गावकीच्या हरएक भानगडीत लोक डेबुजीला सल्लामसलतीसाठी मानाने बोलवायचे. या बदलामुळे डेबुजी गर्वाने ताठून न जाता, उलट पहिल्यापेक्षा अधिकाधिक विनम्र होत गेला. सहज नुसती कोणी हाक मारली तरी नमस्कार करून `काय आपली आज्ञा आहे’ अशी लीनतेने तो वागायचा. गावात येणा-या भिका-या दुका-यांची, संत गोसाव्यांची, भजन कीर्तनकारांची विचारपूस करून त्यांच्या सर्व गरजा भागवायचा. आपण जे श्रम करून कमावतो त्यात गोरगरिबांचा नि गरजू लोकांचा भाग असतोच असतो. आपण घास घेण्यापूर्वी घरचा दारचे ढोर, कुत्रे-मांजरसुद्धा उपाशी राहता कामा नये. आधी दारचे अतिथी अभ्यागत यांची सोय नि मग आपम. देवाला नैवेद्य दाखवायचा तो असाच दाखवला पाहिजे. ही त्याच्या मनीची भावना असे. सुबत्ता आली म्हणून त्याच्या शेतीच्या कष्टात हयगय झाली नाही. उलट, आजा, आजी, मामी, आई यांसह कामाचा जोर वाढवला. आताही हा शेतीसाठी नोकर का ठेवीत नाही, याचेच लोकांना नवल वाटायचे.
अन्यायाची चीड
गावात नामसप्ताह व्हायचे. आंधळे पांगळे आणि अस्पृश्य टोळ्यांच्या टोळ्या अन्नसाठी गावागावाहून धावायच्या. नेहमीचा प्रघात काय, तर सगळ्यांची जेवणे झाल्यावर उरलेले खरकटे उष्टे त्या अन्नार्थी गरिबांवर दुरून झुगारायचे. डेबुजीला हा किळसवाणा बेमाणुसकीचा प्रकार सहन झाला नाही. देवाचा महाप्रसाद नीटनेटका, स्वच्छ असा आपणच गावक-यांनी तेवढा खावा आणि त्या गोरगरिबांच्या नशिबी काय खरकटे उष्टे असावे? ती काय माणसे नव्हत? चांगलं गोडधोड आपल्याला मिळावं असं त्यांना वाटत नाही होय? त्यांना खरकटे चारण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? ते काही चालणार नाही. गावकीचा महाप्रसाद त्यांना नीट पंगतीला बसवून तुम्ही खावू घालीत नसाल तर मी तुमच्यात भाग घेणार नाही. माझ्या घरी निराळा सैपाक करून मी त्यांची हवी तशी सोय लावीन आणि स्वतः त्यांच्या पंगतीला बसून प्रसाद भक्षण करीन असा सडेतोड खुलासा करताच गावक-यांचे डोळे उघडले. लोकांची कांकूं पाहताच डेबुजीने आपल्या घरी ताबडतोब चांगल्या पक्वान्नांचा बेत करू सर्व जमलेल्या अंध, पंगू, महारोगी आणि अस्पृश्य बांधवांना घरच्या अंगणात पंक्तीने बसवून पोटभर जेवू घातले. विचारवंत म्हातारेकोतारे म्हणू लागले, ``अरे हा डेबुजी आपल्यातला एकनाथ आहे रे एकनाथ’’
डेबुजीचे साधुतुल्य चरित्र आणि चारित्र्य पंचक्रोशीत गाजत वाजत असतानाच सौ. कुंताबाई बाळंत होऊन तिला मुलगी झाली. सखुबाईला पृथ्वीवर स्वर्गच आल्यासारखे वाटले. मुलाच्या बाजूने नाही तरी मुलीच्या बाजूने पणतंडवाचे तोंड पाहिले म्हणून म्हातारा हंबीरराव नि रायजाबाई आंदाने नाचू लागले. डेबुजीला मुलगी झाल्याची बातमी पंचक्रोशीत फैलावताच, गोतावळ्या जमातवाल्यांच्या तोंडाला पाणी सुटले. आता काय! बाशाच्या दिवशी डेबुजीकडे मटण दारूचे पाट वाहणार! या आशेने जो तो आमंत्रणाची वाट पाहू लागला.
परटाच्या आयुष्यात तीन बळी.
ही एक म्हणच प्रचारात होती. गरीब असो वा कोणी असो, जन्म, लग्न नि मरतिकीच्या प्रसंगी बोकडाची कंदुरी आणि मनमुराद दारू जातगोतवाल्यांना दिल्याशिवाय चालत नसे. मोठ्ठा जातधर्मच होता तो. कर्ज काढून, भीक मागून हे देवकार्य करावेच लागे. न करील तो पडलाच वाळीत.
रूढीप्रमाणे हंबीररावाने बोकडाची कंदुरी नि दारूचा बेत ठरवला. त्याचा घरात खल सुरू होताना सखुबाई कुरकुरू लागली. तिला आपल्या नव-याचे मरणकालचे ते शब्द आठवू लागले. त्या सगळ्या दुर्दैवी घटनांचा चित्रपट तिच्या डोळ्यांपुढे भराभर सरकू लागला. डेबुजीच्या कानावर हा बेत जाताच त्याने तडाड नकार दिला. ``आजवर आपल्या घरात चुकूनसुद्धा जे आपण कधी केलं नाही, ते काय आज करणार? भले जातगोतवाले रागावले तर. प्रसंगाला आले का कुणी धावून आमच्या? आमचे आम्हालाच निपटावे लागले ना? बारशाला मटण दारू द्यावी, असं कुठच्या धर्मात सांगितलंय? जगावेगळा धर्म आहे हा. मला नाही तो पसंत. आपल्या घरात मटण दारू बंद. कायमची बंद. काही चांगलं गोडधोड करून घालू गोतावळ्यांना मेजवानी.’’
जातकुळीला बट्टा लावलात तुम्ही.
गोतावळी मंडळी जमली. पाने वाढली. पण दारूचा वास तर कुठेच येत नाही? हे काय? पानावर पाहतात तो बुंदीचे लाडू वाढलेले! एक पुढारी गरजले - ``काय हो हंबीरराव, हा काय जगावेगळा प्रकार? बारशाला बुंदीचे लाडू? मटण दारू नाही? जातगोताची रूढी मोडता? आम्हाला नाही परवडणार असला अधर्म. जातकुळीला बट्टा लावलात तुम्ही. चला उठा रे. कोण असले जेवण जेवतो?’’ बिचारा हंबीरराव तर सर्दच पडला. डेबुजी पुढे सरसावला. पुढारी हुज्जत घालायला उठले त्याच्याशी. सगळेजण रागाने तापले होते. त्यांचा आवाज चढला होता. दारू मटणाच्या आशेने आलेल्या लोकांची निराशा भयंकर असते. खेडूतांत असा प्रसंगी खूनही पडतात. अगदी शांतपणाने पण निश्चयाने डेबुजी एकेक शब्द बोलू लागला. ``बापहो, नीट ऐकून घ्या. तुम्ही म्हणता ती मटण दारूची रूढी धर्माची नाही. आपल्या अडाणीपणाची नि जिभलीच्या चोचल्याची आहे. आपले धर्मगुरू बामण. ते कधी मारतात का बकरा? पितात का दारू? बारशा लग्नाला नि मरतिकीच्या तेराव्यालासुद्धा ते गोडधोड पक्वान्नांच्याच जेवणावळी घालतात. त्यांना धर्म माहीत नाही, असं का म्हणणं आहे तुमचं?’’
पुढारी – बोकड मारला नाही, दारू पाजली नाही, तर मुले जगत नाहीत.
डेबुजी – कुणी सांगितलं राव तुम्हाला हे? तुमचं तुम्ही मनचंच ठरवलंय सगळं. मारवाडी, गुजराथी किती श्रीमंत असतात! खंडी दोखंडी बकरी मारण्याच्या ऐपतीचे असतात. त्यांनी कधी बोकडाची कंदुरी केली नाही. दारू पाजली नाही. म्हणून काय त्यांची मुलेबाळे जगली नाहीत? त्यांचा काय निर्वंश झाला? उलट कंदुरी दारूचे पाट वाहवणारे आपण पहा. काय आहे तुमची सगळ्यांची दशा? शेताच्या मातीत मर मर मरता, पण सकाळ गेली, संध्याकाळची पंचीत. या मटण दारूच्या पायी घरेदारे, शेतीवाड्या सावकरांच्या घरात नेऊन घातल्यात, तरी डोळे उघडत नाहीत. विचार करा मायबाप. भलभलत्या फंदाला धर्म समजून गरीब प्राण्यांची हत्या करू नका. जीव जन्माला आला का दुस-या एका जीवाची हत्या आणि कुणी मेला तरीही पुन्हा हत्याच! हा काय धर्म समजता? चला बसा पानांवर, चांगले गोडधोड पोटभर खा, आनंद करा नि घरोघर जा. मटण-दारूच्या व्यसनाने जमातीचे आजवर झाले तेवढे वाटोळे पुरे झाले. आता जरा माणसात येऊन माणुसकीने वागू या सगळे.
या शांत पण कट्टर निस्चयी बोलण्चा परिणाम चांगलाच झाला. एकालाही त्याचे म्हणणे खोडून काढता येई ना. सगळे गातोवळे मुकाट्याने जेवले. मुलीच्या बारशाची ही बुंदीच्या लाडूंची मेजवानी दापुरीच्या पंचक्रोशीत काय, पण हां हां म्हणता सगळीकडे फैलावली. वेळ प्रसंग पाहून लोकांच्या आचार विचारांना धक्का देण्याच्या कुशलतेतच समाज-सुधारकाची खरी शहामत असते. गाडगेबाबांच्या चरित्रातला हा पैलू आजही प्रखरतेने जनतेला दिसत असतो.

 शेतीवाडी धनत्तर पिकत आहे, गुराढोरांनी गोठा गजबजलेला आहे, चंद्रभानजीचा मुलगा आता वयात येऊन तोही हाताशी काम करीत आहे, भरपूरपैसा घरात येत आहे, समाजात मान्यता वाढती आहे, असा स्थितीतही डेबुजी लोकहिताची कामे स्वयंसेवकी वृत्तीने करू लागला. नदीकाठचे रस्ते पावसाळ्यात नादुरुस्त झाले का ते खणून कुदळून नीट करायला कुदळ पावडे घेऊन डेबुजी स्वतः काम करीत रहायचा. लोकांना प्रथम आश्चर्य वाटले. पण अखेर लाज वाटून तेही कामाला लागायचे. सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटून केली पाहिजेत, हा धडा मिटल्या तोंडी त्याने गावक-यांना शिकवला. कोठे घाण-कचरा साचला का त्याने स्वतः जाऊन तो काढावा. कोणतेही काम करताना गाजावाजा नाही, लेक्चरबाजी नाही, काही नाही. वाईट दिसेल तेथे आपणहून चांगले करावे. त्यासाठी पदरमोडही करावी. हा खाक्या. कोणाचे काही अडले नडले का स्वतः जाऊन ते सावरावे. डेबुजीच्या या वृत्तीमुळे सारे लोक त्याला हा कुणीतरी देवाचा अवतार आहे असू मानू लागले.
डेबुजीची आत्यंतिक भूतदया
वाटेने जाताना जरा कुठे कुणी संकटात अडचणीत पडलेले दिसले का डेबुजी धावलाच त्याच्या मदतीला. म्हाता-या माणसाला लाकडाची गाठ फुटत नसली का याने ती फोडून द्यावी. ओझ्याखाली वाकलेल्या पोरवाल्या बाईचे ओझे आपल्य डोक्यावर घेऊन घरपोच न्यावे. चिखलात गाडी रुतली का ती जाऊन बाहेर काढावी. ना गर्व ना ताठा. व-हाडात गाडीच्या बैलांना पराण्या चोटण्याचा प्रघात फार असे. डेबुजीने ते पाहिले का कळवळत त्या शेतक-याला हटकायचा, ``बाप्पा हे काय चालवलंयस? त्या मुक्या जनावराला ना बोलता येत ना रडता ना बोंबलता. तुला कुणी ही अरी भोसकली तर कसे रे वाटंल तुला? मुक्या जनावरांचा असला छळ देवाघरी पाप आहे.’’ वारंवार प्रत्येक ठिकाणी डेबुजीने अशी कानउघडणी केल्यामुळे, त्या पराणीच्या प्रघाताला आळा बसत गेला.
बैल किंवा गाय म्हातारी झाल्यावर निरुपयोगी जनावर म्हणून खुशाल उघड्या बाजारात कसायाला विकण्याचा धंदा फार चाले. ``ज्या गोमातेने जन्मभर दूध देऊन तुमची नि तुमच्या पोराबाळांची पोटं भरली, तुमची हाडं सकस बलवान केली, शेतीला तगडे बैल दिले, शेणखत दिले, ती आता म्हातारी झाली म्हणून तुम्हाला पोसवत नाही काय? तिला कसायाला विकता आणि तिच्या हाडामासाचे टक्के घरात आणून पोटात घालता? काय तुम्ही माणसं का भुतं? तुम्हाला कुणी म्हातारपणी असंच विकलं अथवा घरातली नसती अडगळ म्हणून दिलं उकीरड्यावर टाकून, तर कसं बरं वाटंल मनाला?’’ असा उपदेश करून तो त्या गोविक्रीला आडवायचा. सामोपचाराने कुणी ऐकले नाही तर आपल्या सवंगड्याच्या मदतीने थेट बाजारात जावून सौदा मोडायचा.
जनावरांना रोग झालाका अडाणी शेतकरी औषधोपचाराऐवजी ठराविक भगताला बोलावून देव खेळवायचे. तो भगत चिक्कार दारू ढोसून अंगारे धुपारे करीत त्या ढोराभोवती आरोळ्या मारमारून धिंगाणा घालायचा. ढोर बचावले तर भगताचा देव खरा. मेले तर आपले नशीब. `लई विलाज केला’ म्हणत हळहळणा-यांना डेबुजी धिःक्काराने म्हणायचा - ``अरे रोग म्हंजे रोग. तो हा देवघुमव्या भगत काय कपाळ बरा करणार? तो काय ढोराचा डाक्टर आहे? तालुक्यात जावं, सरकारी डाक्टरांचं औषध आणावं. तसाच बिकट प्रसंग आला तर ढोराला गाडीत घालून तिथं न्यावं. म्हणजे रीतसर विलाज होईल. या देव धुपार नि दारूच्या बाटलीने काय होणार? झालंय का कधी जगात कुणाचं बरं यानी? ढोराबरोबर तुमचंही वाटोळं होईल असल्या फंदानं.’’
संसारातून समाजाकडे
पहिली मुलगी अलोका नंतर २-२- वर्षांच्या अंतराने कलावती मुलगी आणि मुद्गल नावाचा एक मुलगा झाला. मुलगा थोड्याच दिवसात वारला. घरातल्या या भानगडी आई सखुबाई निपटायची. डेबुजी तिकडे ढुंकूनही पहायचा नाही. शेती नि लोकसेवा यात तो अखंड गढलेला. जसजसे दिवस जात गेले तसतसा त्याच्या आचारविचारांना एक निराळाच गंभीरपणा येत चालला. संसार नि व्यवहाराचा गाडा चालवीत असतानाच, तो एका विशेष दृष्टिकोणातून सभोवारच्या समाज-जीवनाची सूक्ष्म पाहणी करण्यात गुंग झालेला दिसे.
संसाराचा हा मामुली गाडा हयातभर असाच हाकत राहायचे काय? जन्माला आल्यासारखे मला आणखी काही करता येण्यासारखे नाही काय? `आणखी काही’ म्हणजे तरी काय  त्याचे त्यालाही उमगे ना. माझे सर्व काही ठाकठीक चालले असले म्हणजे आजूबाजूला ही सब कुठ आल्बेल है असे थोडेच? जिकडे नजर टाकावी तिकडे दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, सावकारांच्या तिजो-या फुगवून कष्टकरी, शेतकरी स्वतः अन्नवस्त्राला महाग. अन्याय, लाचलुचपत, पैसासाठी इमान विकणारे बाया बाप्ये, टीचभर स्वार्थासाठी दुस-याचे गळे कापणारे महाजन! अन्यायाला, खोट्यानाट्याला प्रतिकार करायचीही हिंमत कोणात नाही. अनेक घाणेरड्या रूढी, देवकार्यातले अत्याचार, गांजा-दारूचा भरंसाट फैलावा, देवधर्माच्या नावावर हज्जारो पशूंची हत्या गावोगाव राजरोस चाललेली. कोणीच या पापांच्या परवडीला थोपवीत नाही. मला काही करता येईल का? एकटा तडफडणारा जीव मी! पायात संसाराची बेडी भक्कम खळाळत आहे. काहीतरी केलं पाहिजे खरं. हरकत नाही तेवढ्यासाठी जिवाची हवी ती किंमत द्यावी लागली तरी. प्राण खर्ची घालावे, उघड्या डोळ्यांनी संसाराला आग लावावी, पण समाजातली ही शेकडो पातके खरचटून नाहीशी करावी. साधेल मला हे? कोण मला मार्ग दाखवील? या नि असल्या विचारांनी डेबुजी रात्रंदिवस बहरलेला असे.

मार्गशीर्षाचा महिना, खरीब नि रब्बीची पिके भरघोस डुलत होती. पाखरे हुसकावण्यासाठी डेबुजी मचाणीवर उभा राहून जोरदार हारळ्या मारीत असताना, भर दोन प्रहरच्या रखरखीत उन्हात दूर समोरून एक विचित्र व्यक्ती खैरी गावाच्या बाजूने हळूहळू चालत येताना त्याला दिसली. धिप्पाड बांधा, दणकट देहयष्टी. चमकती अंगकांती, दाढीमिशा जटाभार वाढलेला. अंगावर लक्तराची फक्त एक लंगोटी. अनवाणी चालत शेतातली ज्वारीची कच्ची कणसे खातखात स्वारी आपल्याच तंद्रीत रंगलेली आस्तेआस्ते जवळ येताना दिसली. साधूसंतांचा डेबुजीला आधीच मोठा आपुलकीचा कळवळा.
ती विभूती माचीजवळ येत आहेशी दिसताच डेबुजीने खाली उडी मारली. दोन हात जोडून सामोरा गेला नि साष्टांग प्रणिपात घातला. त्या विभूतीने दोन हात उंचावून आशीर्वाद दिला. दोघांची नजरानजर झाली. डोळ्यांना डोळे भिडले. तेवढ्यातच परस्परांच्या हृत्भावनेची काय गूढ देवघेव झाली, सांगता येत नाही आणि गाडगेबाबाही आज सांगत नाहीत. ``महाराज, आपल्याला काय हवे?’’ असे डेबुजीने विचारताच त्या विभूतीने हासण्याचा खोकाट केला नि म्हटले - ``कछभी नही. हमारे पास सब कुछ है. तू क्या मंगता है? मै दे सकता हूं. मंगता है कुछ? चल हमारे साथ. आता है?’’
मंत्रमुग्धाप्रमाणे डेबुजी त्याच्यामागे यंत्रासारखा आपोआप जाऊ लागला. नदीच्या काठावर गेल्यावर, महाराजांनी थोडे भोजन करावे, अशी डेबुजीने प्रार्थना केली. ``ठीक, ठीक, तेरी इच्छा हो तो लाव, लाव सामान.’’ डेबुजी धावतच खैरी गावात गेला. कणिक, गूळ, साखर, तिकट, मीठ, तेल, तूप आणि एक कढई घेऊन आला. त्या विभूतीने ते सर्व पदार्थ एकत्र कालवून तो गोळा तेलात तळून काढला. ``जा आता, ही भांडी ज्याची त्याला नेऊन दे.’’ म्हणून सांगितले. डेबुजी गेला. परत आल्यावर विभूती भोजन उरकून त्याची वाट पहातच होती. थोडा प्रसाद ठेवला होता तो डेबुजीने ग्रहण केला. नंतर दोघे दापुरी स्मशानातल्या शिवलिंगाच्या ओट्यावर जाऊन बसले. सबंध रात्रभर तेथेच राहिले. काय भाषणे झाली, कसले हृद्गत चर्चिले, याचा थांगपत्ता लागत नाही. बाबाही तो आज लागू देत नाहीत. कोणी खोचून विचारले तर ``छे, असी कोणी विभूती मला भेटलीच नाही’’ असे धडकावून सांगून मोकळे होतात.
डेबीदास कहां है?
सबंध रात्र त्या विभूतीच्या सानिध्यात काढून दुसरे दिवशी १२ वाजता डेबुजी घरी परत आला. जेवण होताच जरूरीचे काम निघाले. म्हणून बैलगाडी जोडून तसाच दर्यापूरला निघून गेला. त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमाराला सारे दापुरी गाव डाराडूर झोपी गेले असताना, तो साधू ``डेबीदास... डेबीदास...डेबीदास’’ अशा मोठमोठ्याने हाका मारीत गावात फिरू लागला. लोक घाबरून बाहेर आले. पहातात तो एक जटाधारी नंगा दांडगा गोसावी नुसता डेबीदास... डेबीदास आरोळ्या मारीत आहे. पाटील आले. चौकशी केली. ``कहां है डेबीदास?’’ तो गोसावी विचारू लागला. आपल्या गावात कोण कुठचा डेबीदास? सगळे ढोंग आहे हे. हा दरोडेखोरांचा सोंगाड्या सुगावेदार असावा. द्या हुसकावून चोराला. पाटलाने महार जागल्यांना बोलावून त्याला सीमापार हुसकावून दिले.
बाबानो, काय केलंत हे?
दुस-या दिवशी सकाळी डेबुजी दर्यापुराहून परत येताच त्याला आदले रात्रीची ही हकिकत समजली. तो मटकन खाली बसला नि फुंदफुंदून रडू लागला. सखूबाईने आजा आजीने खूप खोदखोदून विचारले. शेजारापाजारी जमा झाले. बराच वेळ तो बोले ना. अखेर, ``बाबानो, डेबीदास तो मीच. माझाच शोध करीत तो आला होता. हुसकावलात त्याला? काय केलंत हे?’’ असा त्याने खुलासा करताच सगळ्यांनाच वाईट वाटले.
डेबुजी तसा उठला. स्मशानाजवळच्या महादेवाच्या ओट्यावर नि आसपास खूप तपास केला. खैरी गावात शोध घेतला. आजूबाजूची पाच पन्नास गावे तो सारखा आठवडाभर विचारपूस करीत भटकला. असा कुणी माणूस इकडे आला नाही नि आम्ही कोणी पाहिलाही नाही, असेच जो तो सांगे.
या घटनेनंतर डेबुजीच्या राहणीत नि वृत्तीत एकदम बदल झाला. रोजची ठरावीक कामे यंत्रासारखी करीत असताना तो कसल्या तरी गूढ चिंतनात गुंगलेला असायचा. पौषाचा महिना. दर रविवारी ऋणमोचन येथे या महिन्यात एक छोटीशी यात्रा भरत असे. दरसालच्या हंबीररावच्या घराण्याच्या रिवाजाप्रमाणे पौष व. ८ शके १८२७ रविवार (ता. २९ जानेवारी सन १९०५ रोजी) डेबुजी सहकुटुंब सहपरिवार ऋणमोचनला गेला.
यानंतर त्याची मुग्धावस्था वाढतच गेली. भावी आचाराची काहीतरी निश्चित रूपरेषा त्याने मनोमन आखली. चर्येवर गंभीर महासागराची शांती आणि नजरेत कठोर निश्चयाची चमक झळकू लागली. एकदम घडलेल्या या फरकाने घरातली मंडळी चरकली खरी, पण खुलासा काढण्याचे धैर्य कोणालाही होई ना.
चालू काळचा सिद्धार्थ
बुधवात ता. १ फेब्रुवारी सन १९०५, पौष व. १२ प्रदोष शके १८२७ पहाटे ३ वाजता डेबुजीच्या त्यालोकोत्तर जीवन-क्रांतीचा क्षण आला. रात्रभर बिछान्यात तो तळमळत जागाच होता. निश्चयाच्या उसाळीने एकदम तो उठला. मातोश्री सखूबाई निजली होती तेथे हळूच गेला. डोळे भरून त्या जन्मदात्या देवतेचे दर्शन घेतले. तिच्या पायांजवळ जमिनीला डोके टेकून नमस्कार केला. बाहेर येऊन आंगावरचे सर्व कपडे काढून ठेवले. नेसूचे एक फाटके धोतर पांघरून तो आंगणात आला. तेथे पडलेले एक फुटके मडके नि तोडलेल्या झाडाची एक वेडीवाकडी काठी हातात घेऊन, मागे न पाहता, सर्वस्वाचा त्याग करून झपाट्याने पार कोठच्या कोठे निघून गेला. पहाटेच्या साखरझोपेच्या गुंगीतच सगळेजण असल्यामुळे, त्याच्या या क्रांतिकारक प्रयाणाचा घरातल्या दारातल्या कोणालाही थांगपत्ता लागला नाही.
आजवर अनेकांनी संसारत्याग केलेला आहे. त्याची कारणे अठराविश्वे दारिद्र्य, कर्जाचा बुजबुजाट, मुलाबाळांचे मृत्यू, कर्कशा किंवा बेमान पत्नीशी पडलेली गाठ, कुटुंबात नि समाजात नित्य होणारी हेळणा, तिटकारा, बेकारी यांपैकी एक दोन हमखास असतात. पण डेबुजीच्या बाबतीत यातले कही कारण नव्हते. प्रामाणिक कष्ट मेहनत करून आजोबाची शेतीवाडी कर्जाच्या पाशातून मुक्त करून त्याने सुधारली होती. घरात धनधान्य, दूधदुभत्याचा सुकाळ होता. चारचौघात प्रतिष्ठा होती. घरात आज्ञाधारक पत्नी, दोन गोजीरवाण्या खेळत्या बागडत्या मुली. नातवंडांचे कौतुक करणारे आई, आजा, आजी हयात. गाई-बैल-वासरांनी गोठा गजबजलेला. मायेचा हात पाठीवर फिरवणारी आई पाठीशी सदानकदा उभी.
असा भरभराटीच्या संसाराचा डेबुजीने केलेला त्याग म्हणजे कपिलवस्तू येथील सिद्धार्थ राजपुत्राने निर्वाणाचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्राचीन राजवैभवाच्या त्यागाच्या अजरामर इतिहासाची पुनरावृत्तीच म्हटली पाहिजे.
घरात रडारड झाली. गावकरी शोधासाठी दाहीदिशांना गेले. काही तपास लागत नाही बुवा. सगळ्यांचा एकच जबाब आला.

संसारत्यागाच्या मागे काय होते?
मामुली साधू संत मोक्षासाठी संसारत्यागासाठी भगतगणांना शिकवण देतात. डेबूजीला हे मोक्ष मुक्तीचे आणि हरिनाम – स्मरणाने भवसागर तरून जाण्याचे आध्यात्मिक खूळ कधीच पटले नाही. जिवंत असता उपाशी मरा नि स्वर्गातल्या अमृतासाठी जवळ असेल नसेल ते दान करा, ही संताळी विचारसरणीही त्याने जुमानली नाही. आजही जुमानीत नाही. मग तो संसाराचा त्याग करून बाहेर का पडला? केवळ स्वतःच्या उद्धारासाठी तळमळत नव्हता. स्वतःच्या चिमुकल्या टीचभर संसारातल्या आधीव्याधींची कोडी त्याला सोडवायची नव्हती. ज्या मागासलेल्या खेडूती समाजात त्याचा जन्म झाला, त्यांच्या देवधर्माच्या भावनांवर नि कल्पनांवर त्याचा विश्वास नव्हता. धर्माच्या नावाखाली रूढ असलेल्या अनेक दुष्ट आणि व्यसनी चालीरितींच्या विरुद्ध त्याने बंडे केली होती आणि जातगोतवाल्यांचा रोषही पत्करला होता. देवाच्या नुसत्या नामस्मरणापेक्षा किंवा आराधानेपेक्षा मनगट घासून कष्टमेहनत केल्यानेच शेतीच्या मातीतून सोने काढता येते आणि शुद्ध आचारविचारांनी निर्मळ राहिल्यानेच व्यवहारातल्या दुष्ट नि लोभी माणसांच्या कारस्थानांना चाणाक्षपणे नि धीटपणाने पायबंध  ठोकता येतो, हे त्याने स्वानुभवाने इतरांना पटवूनही दिले होते. भजनाचा त्याला नाद होता आणि ईश्वरावर त्याचा भरवसाही होता. तरीही त्याची भक्ति आंधळी नव्हती. डोळस होती. वयाच्या २८ वर्षेपर्यंत जूबाजूच्य सर्व थरातील समाजांच्या सामिक नि धार्मिक जिण्याचे त्याने सूक्ष्म निरीक्षण केलेले होते. शेतकरी कामकरी वगैरे मागासलेले समाज, हाडमोडी कष्ट करूनसुद्धा कमालीच्या दारिद्र्यात किड्यामंग्यांच्या जिण्याने जगत आहेत. सावकारादि वरच्या थरातले वरचढ लोक त्यांना यंत्रासारखे कामाला जुंपून, त्यांच्या श्रमाची फळे आपण मटकावीत आहेत. श्रमजीवी लोकांना तर त्यांच्या भिकार जीवनाची ना चिळस ना लाज. वरचढांच्या लाथा खाव्या, मरे मरेतो कष्ट करून त्यांच्या तिजो-या भराव्या, आपल्या संसाराच्या मातीने त्यांची घरेदारे नि वाडे लिंपावे-शृंगारावे, हाच आपला धर्म, हेच आपले जिणे, यापेक्षा आणखी ज्ञान त्यांना काही नाही. केवळ पशुवृत्ती! वरच्या खालच्या एकंदर समाजाची दैनंदिन स्थिति पाहिली तर माणसेच माणुसकीला पारखी झालेली. धर्माचे आचरण पाहिले तर तेथेही भूतदयेला थारा नाही. देवाला दारू, माणसांना दारू, रेडे बोकडांच्या कंदुरीशिवाय देवाची शांति नाही आणि धर्माची भूक भागत नाही. भजनकीर्तनाचा थाट केवळ मनाच्या विरंगुळ्यासाठी. संतांचे बोल वतनदारीसाठी. संगीत सुराने वरच्यावर भिरकवायचे. अंतःकरणाचा नि त्यांचा जणू काय संबंधच नाही. सहानुभूती सहकार नि सेवा या भावनाच हद्दपार झालेल्या. ज्याला जिथे मऊ लागेल तिथे कोपराने खणावे नि स्वार्थ साधावा. आजवरच्या साधूसंतांनी माणसांना माणुसकी शिकवण्यासाठी जान जान पछाडली. कोटिकोटि अभंगरचना केली. पंढरीच्या वा-यांचा परिपाठ चालवला. विठ्ठलभक्तीचे लोण आब्राह्मण चांडाळांच्या झोपडी झोपडीपर्यंत नेऊन भिडवले. टाळ माळ चाळ एवढा वरवरचा देखावा झुगारता आला नाही. या परिस्थितीला आरपार पालटण्यासाठी काय केले पाहिजे? मला काय करता येईल? या मुद्याचाच डेबूजी आपल्या मनाशी बरीच वर्षे खल करीत होता.
षड्रिपूंचे दमन कसे केले?
सन १९०५ साली घरातून बाहेर पडल्यापासून तो सन १९१७ या बारा वर्षांच्या साधकावस्थेत डेबूजीने आपल्या देहमनाचा चोळामोळा करून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचे गाळीव वस्त्रगाळ पीठ कसकसे केले. त्याच्या हजारावर गोष्टी सांगता येतील. या संक्षिप्त कथानकात केवळ त्रोटक संदर्भावरच भागवणे जरूर आहे.
घरातून बाहेर पडल्यावर डेबूजी २-३दिवस सारखा चालतच होता. कोठे जायचे नि काय करायचे याचा काही विधनिषेध नसल्यामुळे, पाय नेतील तिकडे, एवढाच कार्यक्रम. दापुरीपासून ४०-४५ मैलावरच्या एका गावी सायंकाळी गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात विसाव्यासाठी जाऊन बसतो न बसतो तोच हा कुणीतरी दरोडेखारंचा टेहळ्या असावा, अशा समजुतीने गावक-यानी नि पाटलानी उपाशीतापाशी गावाबाहेर हुसकावून दिला.
पौषाचा महिना. व-हाडातली थंडी, माणूस जागच्या जागी हातपाय काकडून कोलमडून पडायचे. किर्र अंधारी रात्र. काट्याकुट्यातून पाय नेतील तसा बिचारा डेबूजी वाट काटीत चालला. वाटेत त्याला एक खळखळणारा ओढा लागला. त्याने हात, पाय, तोंड धुतले. रिकाम्या पोटात अन्नाच्या ऐवजी पाणी रिचवले. थोडी हुशारी येताच शेजारच्या शेतातली ज्वारीची चार पाच कणसे तशीच कच्ची खाऊन वर पाणी प्याला. विसाव्यासाठी ओढ्याच्या काठीच – मातीवर झोपेसाठी अंग टाकले. किर्र जंगल. आजूबाजूला श्वापदांचा सुळसुळाट. पण काही नाही. खुशाल तो डाराडूर तिथे झोपी गेला.
झुंजुमुंजू होताच उठावे. दिवसा आढळतील त्या दहा पाच गावी भ्रमण करावे, एकाद्या घरी भाकरी तुकडा मागावा, मिळाल्यास खावा, नकार दिल्यास आणखी काही तरी मागावे, लोकांनी रागवावे, शिव्या द्याव्या, मारायलाही उठावे. हुसकावून द्यावे. यांच्या शांत वृत्तीवर लवभरसुद्धा परिणाम व्हायचा नाही. हुसकावले का पुढे जावे. या रीतीने गावांमागे गावे नि खेड्यांमागे खेडी धुंडाळीत डेबूजी कोठेकोठे भटकंती करीत जाई त्याचा त्यालाच ठावठिकाणा उमजे ना.
दिवसामागून दिवस गेले. दाढीचे नि डोक्याचे केस वाढले. जटा झाल्या त्यांच्या. अंगावर चिंध्या बाजल्या. नदी ओढा लागला का तेथे आंघोळ करावी नि त्याच धुतलेल्या चिंध्या ओल्याच अंगावर पांघरून पुढे चालू लागावे. अशा विचित्र थाटाने ही स्वारी एकाद्या गावात घुसली का गावची ओढाळ कुतरडी भुंकभुकून आधी त्याचे स्वागत करायची. मग गावची उनाड पोरे त्याच्या मागे ``वेडा आला रे वेडा आला’’ असा कल्होळ करीत मागे लागायची. दगड मारायची. हा सर्व उपसर्ग शांत चित्ताने हासतमुखाने तो सहन करायचा. त्याचे पाय सारखे चालतच असायचे. विसाव्यासाठी गावात त्याला कोणी थाराच द्यायचे नाहीत. अर्थात विसाव्यासाठी सदानकदा किर्र निर्जन अरण्याचाच आसरा घ्यावा लागे.
पाय नेतील तिकडे जायचे. हव्या त्या घरी भाकर मागायची. मिळेल तर कायची. नाहीतर पुढे जायचे. असल्या क्रमात जागोजाग कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला पण होऊन मदत करायला धावायचे. हा एक धर्म डेबूजी कसोशीने पाळीत असे. सामानाने लादलेला  खटारा चिखलात रुतून पडलेला दिसला का डेबूजी तेथे धावत जाऊन तो बाहेर काढायला गाडीवानाला मदत करायचा. त्याने कोण, कुठचा, काय पाहिजे विचारले तर नुसते हसावे, दोन हातांनी त्याला नमस्कार करावा आणि मुकाटतोंडी आल्या वाटेला लागावे. हा खाक्या. आश्चर्याने तो गाडीवान पहातच रहायचा. देवच माझ्या धावण्याला पावला अशा समजुतीने तोही गाडी हाकीत निघून जायचा.
व-हाडचा सूर्य माध्यान्हीला माथ्यावर कडाडला आहे. पाय पोळताहेत. एकादी मजूर बाई पाठीला पोर बांधून डोईवर लाकडाचा किंवा कडब्याचा मानमोड्या बोजा घेऊन चाललेली दिसली का डेबूजी तिच्याजवळ जायचा. दोन हात जोडून म्हणायचा : ``माय माझी. दे तुझं ओझं माझ्या डोक्यावर. चल मी तुझ्या मुकामावर नेऊन पोचवतो.’’
विचित्र वेषाचा हा असामी पाहून ती बाई प्रथम भेदरायची. पण डेबूजी ओझ्याला हात घालायचा, स्वतःच्या डोक्यावर घेऊन घेऊन चालू लागायचा आणि तिला मुकामावर पोचवून, एक शब्द न बोलता आपल्या वाटेने निघून जायचा. ती बाई आचंब्यात पहातच रहायची. आजूबाजूचे गावकरीसुद्धा म्हणायचे, ``कोण असावा हा माणूस? आपल्या झिंगरीचे ओझे मैलभर वाहून आणतो आणि भाकरी तुकडाही न मागता खुशाल आपल्या वाटेने जातो ? कुणी देवमाणूस किंवा साधू असावा हा!’’
खेडेगावातल्या सार्वजनिक विहिरी म्हणजे घाणीची आगरे. आजूबाजूला घाण पाण्याचे ओघळ वहायचे आणि ढोरे तेच पाणी प्यायची. डेबूजीने हे पाहिले म्हणजे तो कळवळायचा. ``मला पोहरा दोरी द्या हो मायबाप. मी पाणी काढून ढोरांना पाजतो.’’ अशी त्याने विनंती करून पोहरा दोरा मिळवावा आणि विहिरीतून स्वच्छ पाणी काढून त्याने सगळ्या ढोरांना पाजावे. विहिरीभवतालची घाणेरडी जागा फावडे घेऊन स्वच्छ करावी. पोहरा, दोरा, फावडे ज्याच्या त्याच्या घरी पावते करावे आणि आपण पोटभर पाणी पिऊन पार दूर निघून जावे. लोक आचंब्यात पडायचे. हा कोण चिंध्याबुवा आला, त्याने जागा स्वच्छ करून ढोरांना पाणी काय पाजले नि मुकाट्याने निघूनही गेला. कोण असावा हा?
ज्वारी-कापणीचा हंगाम चालू. स्वारी अशा शेतांजवळून चालली असताना थांबायची. मालकाजवळ `एक पाचुंदा द्या हो बाप्पा’ म्हणायची. ``तुझ्या बापाने ठेवलाय पाचुंदा.’’ मालक गुरगुरायचा. (पाचुंदा म्हणजे पाच पेंढ्या) `बरं तर दोन पाचुंदे द्या.’ मालक रागवायचा. चल चालता हो म्हणून धमकावयाचा. कैक वेळा मारायला अंगावरही धावायचा. जसे कोठे काही झालेच नाही अशा चर्येने डेबूजी  तेथेच बसून रहायचा. मजूर कापणीत गुंगलेले. काम जोरात चालू. एकादी बाई किंवा बुवा घामाघूम थकलेली पाहून, डेबूजी त्याच्याजवळ विळा मागायचा. खुषीने दिला तर ठीक, नाहीतर घ्यायचा हिसकावून. ``माजी माय, जरा विसावा घे. मी करतो तुझं काम. रागावतेस कशाला?’’ असे म्हणून खसाखस कापणी करीत सुटायचा. इतर मजुरांच्या पुढे जाऊन त्यांच्यापेक्षा थोड्या वेळात दुप्पट तिप्पट कापणी करताना पाहून मजूर नि मालक डेबूजीकडे पहातच रहायचे. सारे मजूर दुपारच्या जेवणासाठी थांबले तरी याच्या कापणीचा सपाटा तडाखेबंद चालूच. या उप-या प्रवाशी पाहुण्याने भलताच हात चालवून सगळ्यांपेक्षा कापणीत तो पार पुढे गेलेला पहाताच मजूर नि मालक त्याला भाकरी खायला बोलावीत. ठरवलेले काम रेटले का डेबूजी ज्याचा विळा त्याला परत देऊन, मिटल्या तोंडी पार निघून जायचा. सारेजण त्या विचित्र माणसाच्या विलक्षण करणीचे कौतुक करीत त्याच्या वाटेकडे पहातच रहायचे. इथे आला काय, झपाटेबंद कापणी केली काय आणि भाकर देत असता ती नाकारून निघून गेला काय! हा काय कुणी साधू असावा का देवच असावा? एकाद्याने पाच पेंढ्या दिल्याच तर त्या घ्यायच्या आणि वाटेत कुठे थकले भागलेले किंना उपाशी पडलेले ढोर आढळले तर त्याला एक पेंढी खायला घालायची, त्याला गोंजारायचे नि पुढे जायचे. ज्वारी वहाण्याचे काम कुठे चालू असले का डेबूजीने असेच आपण मजुरात घुसून पेंढ्या गोळा करण्याचे आणि गाडीवर त्या बांधण्याचे काम करीत सुटावे. कोठे औत चालू असतील तर तेथे जावे आणि तास दोन तास स्वतः औत चालवून, घाम पुशीत पुशीत शेतक-याला नमस्कार करून निघून जावे. कोण कुठला प्रश्नाला जबाबच द्यायचा नाही. काम करावयाचे नि पसार व्हायचे. मनात आले तर दिली भाकर खायची, नाहीतर देत असतानाही पाठ फिरवून वाट धरायची. जागोजाग हे प्रकार होत असल्याच्या वार्ता खेड्यापाड्यांतून पसल्या आणि पुण्यावानाच्या शेतात देव येऊन कापणी मळणी करतो. असल्या भुमका सगळीकडे ऐकू येऊ लागल्या. ज्यांना अनुभव आले होते. त्यांनी तिखटमीठ लावून त्या कथा सांगितल्यामुळे तर त्या विचित्र देवाच्या येण्याजाण्यावर लोक डोळ्यात तेल घालून वाट पाहू लागले.
अचाट निर्भयतेची कमावणी.
एकदा स्वारी अशीच आपल्या तंद्रीत रंगलेली वाटचाल करीत असता एकदम मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, तुफानी वा-याचा सोसाटा चालू झाला. रात्रीची वेळ. जिकडे पहावे तिकडे गुडुप अंधार. इतक्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला. वाटेत गुडघा गुडघा पाणी वाहू लागले. ओढे नाले खळखळू लागले. नदीचाही प्रवाह नि वेग वाढला, पुढे पाऊल टाकायची सोय नाही. कुठे जायचे आता? फिरस्ता डेबूजी तसाच बिनदिक्कत चालत होता. अखेर वारा नि पाऊस यांच्या झुंबडीत टिकाव लागणार नाही, अशा समजुतीने नदीकाठच्या एका जुनाट निंबाच्या झाडाखाली निवा-यासाठी थांबला. कसचे काय नि कसचे काय! वा-याचा जो एक तडाक्याचा झोत आला, त्यासरशी ते प्रचंड झाड कडाडले आणि मुळासकट धाडदिशी जमिनीवर कोसळले. डेबूजी चटकन बाजूला सरला म्हणऊन ठीक झाले. ज्याचा आसरा घ्यायला तो गेला, तोच कोसळून जमीनदोस्त झाला. आता पुढे काय? कडाडणा-या विजांच्या प्रकाशात तसाच मार्ग काढीत काढीत तो एका टेकडीवर गेला. वारा नि पाऊस यांची झुंज चालूच होती. मध्यरात्रीच्या सुमाराला ते तुफान थंडावले. डेबूजी नखशिखांत चिंब भिजला. टेकडीवरच्या एका मोठ्या धोंड्यावर बसून त्याने सारी रात्र जागून काढली. अंगावरच्या भिजलेल्या चिंध्या अंगावरच वाळल्या. पहाट होताच स्वारीचे पाऊल पायपिटीसाठी लागले चालायला. बारा वर्षांच्या साधनावस्थेत गाडगे बाबांनी असले शेकडो प्रसंग अनुभवलेले आहेत. थंडी, वारा, पाऊस, कडाक्याचे ऊन्ह, तुफान वावटळी, रानातल्या वणव्यांची आग, एकूणेक प्रसंगांत त्यांनी देहाची आसक्ती कसोटीच्या सहाणेवर घासून बोथट पाडली. मनाची शांती अचल राखली. काम त्यांनी जाळलाच होता. पण क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मदादि विकारांचेही त्यांचे दमनकार्य अखंड चालूच होते. इतकेच काय पण नेहमीच अरण्यात वसतीचे प्रसंग असल्यामुळे, सर्प, विंचू, इंगळ्या, वाघ, कोल्ही, लांडगे या क्रूर श्वापदांचेही भय त्यांनी गिळून टाकले होते. निर्जन रानावनात मन मानेल तेथे तो गाढ झोपी जाई. आसपास जंगली श्वापदे येवोत जावोत ओरडोत वेढा देऊन बसोत, काय वाटेल ते करोत, त्यांची त्याला पर्वा कशी ती कधी वाटलीच नाही. रातबेरात सुद्धा तो जंगलांतून प्रवास करीत असे. हव्या त्या ओसाड जागेत विसावा घेई. थंडीच्या दिवसांत स्मशानात पेटलेल्या सरणाजवळ बसूनही शेक घेई. खाण्यापिण्याची तर पर्वाच नसे. मिळेल ते शिळेपाके कच्चे-पक्के खुशाल चवीने खाई नि ते त्याला पचतही असे. अनवाणी चालण्याने पायतळांना भोके पडली तरी त्याचीही खिसगणती त्याला नसे.
करता सवरता डेबूजी परागंदा झाल्यावर बळिरामजीने सगळ्या कामांचा उरक पत्करला, तरी आजा, आजी, आई दुःखात झुरतच होती. नातावळ्या गोतावळ्यांनी यावे, दोन दिवस रहावे, समाधान करावे नि जावे. अखेर हंबीरराव आणि पाठोपाठ २-३ महिन्यांनी रायजाबाई देवलोकी गेली. आता मात्र सखुबाईला आकाश फाटल्यासारखे झाले. निराशेच्या काळ्या ढगारालाही आशेची चंदेरी शलाका असते म्हणतात. डेबूजी गेला तेव्हा सौ. कुंताबाई ३ महिन्यांची गरोदर होती. रायजाबाईच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी बाळंत होऊन तिला मुलगा झाला. आईबापाचा मृत्यू आणि पाठोपाठ नातवाचा जन्म. जन्म-मृत्यूची ही पाठशिवणी सखुबाईच्या चांगलीच परिचयाची होती. मुलाचे नाव गोविंद ठेवून, सखुबाईने जवळचे काही गोतावळे जमवून त्याचे बारसे केले.
अखेर तपास लागला.
एक दिवस मूर्तिजापूरला कामाला गेलेला बळिरामजी घरी आला आणि टांगा न सोडताच एकदम मोठ्याने ओरडला, ``आत्या, डेबूदादाचा तपास लागला. तो साधू झालाय नि माहूर भागात फिरताना त्याला आपल्या एका वट्टीने पाहिले.’’ चला, पत्ता लागला आता शोध करून त्याला घरी परत आणायची खटपटच तेवढी करायची. माहूर भागातल्या जातगोतवाल्यांना इषा-याचे निरोप रवाना झाले. वार्षिक ऋणमोचनाची पौषी यात्राही जवळ आली. डेबूजी कुठेही असला तरी ही यात्रा चुकवणार नाही ही सगळ्यांची खात्री.
ऋणमोचनचा रविवा-या शंकर.
दापुरीपासून ऋणमोचन अवघ्या ३ मैलांवर. पौष महिन्यातल्या दर रविवारी तेथे यात्रा जमत असे. पूर्वी ती लहान असे. उगाच १०-१२ खेडूतांचे खटारे यायचे. गाडगेबाबांच्या माहात्म्याने मात्र गेली अनेक वर्षे त्या यात्रेला महात्सवाचे रूप आलेले आहे. एखाद्या पौषात ५ रविवार आले का त्या शेवटच्या रविवाराच्या देवदर्शनाचा महिमा मोठा. शंकराचा आवडता वार सोमवार. पण या ऋणमोचनच्या मुद्गलेश्वर महादेवाची यात्रा मात्र रविवाची. हे काय त्रांगडे आहे समजत नाही.
बहुतेक यात्रेकरू सर्व जमातीचे. रविवारी यात्रेला आले का प्रत्येकाने पूर्णा नदीत बुचकळी मारायची आणि ओलेत्याने शंकराला बेलपत्री वहायची, असा रिवाज. या शंकराचे नाव मुद्गलेश्वर. म्हणूनच डेबूजीच्या अल्पायु मुलाचे नाव त्याने मुद्गल असे ठेवले होते.
चुकणार नाही, येईलच तो.
पौष उजाडला नि रविवारही आला. सखुबाई बळिरामजी वगैरे मंडळी मोठ्या पहाटेलाच ऋणमोचनला येऊन बसली. पण डेबूजी कोठेच आढळे ना! पूर्णा ऊर्फ पयोष्णा नदीचे पात्र ऋणमोचनजवळ फार रुंद नि खोल. काठच्या जमिनीचा चढाव तीन पुरुष उंचीचा. मोठा कठीण नि निसरड्या चिकण्या मातीचा. स्नान करून ओलेत्याने वर येणारी मंडळी हटकून पाय घसरून पडायची. दरसालची ही कटकट.
पण यंदा नवल वर्तले. कोणीतरी एक चिंध्याधारी जटाधारी माणूस फावडे, टोपली घेऊन ओल्या मातीवर सुकी माती भराभर टाकीत सकाळपासून सारखा झगडतोय. लोकांच्या वर्दळीने चढावाचा काठ भिजला का पडलीच याची सु्क्या मातीची टोपली त्यावर. कोण बुवा यंदा हा महात्मा आला ऋणमोचनला?
निरखून पाहतात तो कोण? अहो, हा आपला डेबूजी वट्टी! जटा-दाढी-मिशांचे जंगल अमाप वाढलेले, अंगावर फाटक्या चिंध्या, घामाच्या धारा निथळताहेत. आणि आजूबाजूला किंचितही न पाहता. टोपल्या भरभरून सुकी माती आणून टाकण्याच्या कामात एकतान रंगला आहे. पिल्लू हरवलेल्या वाघिणीच्या उसाळीने सखुबाईने ``डेsबू..... माझा डेsबू’’... अशी किंकाळी मारून त्याच्याकडे झाप टाकली.
ऐन कसोटीचा प्रसंग हाच.
कोणालाही नकळत घरदार सोडून देशोधडीला निघून जाण्याने संसाराचा मोहपाश तोडला जातोच, असे थोडेच आहे? मोहपाशापासून लांब दूर असे तोवर ही भावना किंवा कल्पना ठीक असते. निर्जन अरण्यातल्या वस्तीत ब्रह्मचर्याची शेखी कोणीही मिरवावी. पण सौंदर्यवान तरुणींच्या मेळाव्यात खेळीमेळीने राहून ब्रह्मचर्य टिकवील. त्याचीच खरी शहामत आणि तोच अखेर कसोटीला उतरणार.
देह-मनाची मुंडी मुरगाळून कामक्रोधादि षड्रिपूंचे दमन करण्याच डेबूजीने एक वर्ष वनवासात घालवले. पण या घडीला त्याच्याभोवती जन्मदाती आई, शेजेची बायको, लडिवाळपणे हाताखांद्यावर खेळवलेल्या दोन गोंडस लहान मुली आणि गृहत्यागानंतर झालेला वंशाचा आधार असा तो छोटा पुत्र गोविंद, शिवाय गावोगावचे सारे जिवाभावाचे सवंगडी यांचा लोखंडी साखळदंडासारखा वेढा पडलेला. आई रडत ओरडत आहे. बायकोच्या डोळ्यांतून आसवांचे पाट वहात आहेत. मामी, मामेभाऊ, स्नेही-सोबती यांच्या विनवण्या चालू आहेत. डेबूजी निश्चल वृत्तीने सगळ्यांकडे निर्विकार मुद्रेने पहात आहे. फत्तरावर घणाचा घाव घातला तर एकादी कपरी तरी उडते. पण येथे काही नाही!
एवढेच आईला बोलून डेबूजी उठला. आता तो जाणार निघून, असे पहाताच सखुबाईने हंबरडा फोडला. ``अग, एवढी ओरडतेस कशाला? मी काही आताच जात नाही कुठे. हा पौष महिना इथेच आहे.’’ असे सांगून डेबूजी गेला निघून दुसरीकडे.
"डेबूजी वट्टी आला रे आला’’
ही हाक यात्रेकरूंत फैलावल्यामुळे, सगळे गणगोत नि लंगोटी मित्र त्याला पहायला धावले. दरसाल नदीच्या निसरड्याचा अनुभव सगळ्यांना होता, पण ओल्याचिंब मातीवर सुकी माती टाकून लोकांचे हाल कमी करण्याची कल्पना नि योजना आजवर एकाही शहाण्याच्या डोक्यात आली नव्हती. आणि आज? परागंदा झालेला आपला डेबूजी या विचित्र वेषाने यात्रेला येतो काय आणि यादवजी पाटलाकडून टिकाव, फावडे, टोपली घेऊन एकटाच ते काम करतो काय!
लोकहितासाठी असली कामे कोणी ना कोणी केलीच पाहिजेत, ही कल्पनाच ज्या खेडुतांना नाही नि नव्हती, त्यांना डेबूजीचा हा खटाटोप पाहून काय समजावे हेच समजे ना. कोणी म्हणे ``बिचारा वेडा झाला.’’ कोणी आई, बायको-मुलांकडे पाहून कळवळत. दुसरा विशेष शहाणा शेरा मारी की ``अहो पहिल्यापासूनच याला देवाधर्माची आवड, म्हणून झाला आता तो बैरागी साधू.’’ तिसरा तुंकाराने सांगे, ``अहो कसला देव नि कसला धर्म! याने आपल्या कुळदैवत खंडोबा नि आसराईचे बोकड दारू बंद करून विठोबा रखमाई करू लागला, वाडवडलांची चाल मोडली. फिरले डोके नि झाला असा वेडा पिसा.’’ ज्याला जसे सुचले तसे तो लोकांच्या जमावात येऊन शेरे मारी नि निघून जाई.
खराट्याचा नवा धर्म
सगळ्या यात्रेकरूंची स्नाने आटोपल्यावर, डेबूजीने स्वतः स्नान केले, अंगावरच्या चिंध्या धुतल्या नि तशाच पुन्हा पांघरल्या. देवळात जाऊन महादेवाला बिल्वपत्रे वाहिली. फराळाला बसलेल्या अनोळखी यात्रेकरूकडून चतकोर तुकडा भाकर, चटणी, कालवण मागितली आणि मडक्यात घेऊन नदीकाठी तो खात बसला. आईने त्याचयापुढे फराळांचे जिन्नस ठेवले, तिकडे त्याने पाहिलेही नाही. भाकर संपताच तो उठला आणि गेला निघून दूर कोठेतरी.
संध्याकाळी लोक पहातात तो डेबूजी हातात खराटा घेऊन यात्रेतली सारी घाण झाडून साफ करीत आहे. कागद पानांची भेंडोळी, खरकट्याचे तुकडे, फार काय पण जागोजाग लोकांनी केलेली मलमूत्रविसर्जनाची खातेरी, पार सगळे स्वच्छ झाडून साफ करण्याचा झपाटा चाललेला. सकाळी याने दरडीवर माती टाकून लोकांची स्नाने सोयीची केली. वाटेत दिसलेला दगड धोंडा गोटा दूर नेऊन टाकला. आता तर यात्रेतला सारा घाण, केरकचरा स्वतः भंग्याप्रमाणे साफ करीत आहे. हा काय वेडा आहे होय? येथल्या घाणीमुळे ऋणमोचनला कसली ना कसली रोगरायी होतेच. आपण कधी लक्षच दिले नाही. दरसाल असे होतेच, एवढ्यावरच आपली अक्कल ठेचाळायची. पण त्या रोगरायीला ही घाणच कारण, हे आज आपल्याला या डेबूजीने शिकवले. याला वेडा म्हणणारेच वेडे. बरे, याला साधू म्हणावे, तर आजवरचे साधू असली कामे करताना कोणी पाहिलेच नव्हते.
सारे लोक मंदिरातल्या दगडी शिवलिंगाच्या आरत्या धुपारत्यांत गुंतलेले, तर हा यात्रेकरूंच्या सुखसोयीसाठी आणि आरोग्यासाठी बाहेरची घाण काढण्यात हाडे मोडून घाम गाळीत आहे. गाभा-यातला तो दगडी देव श्रेष्ठ का देवळाबाहेरचा हा झाडूवाला श्रेष्ठ? विचारी होते ते हा विचार उघड बोलू लागला. डेबूजीकडे ते विशेष कौतुकाने नि आदराने पाहू लागले. ``अरे वेडा कसचा हा! हाच खरा महात्मा. सकाळपासनं तो तुमची सेवा करीत आहे. आता तर तुमची सारी घाण निपटून यात्रेचे ठिकाण स्वच्छ करीत आहे. ही लोकसेवा म्हणजेच खरी देवाची सेवा. उगाच टाळ मृदंग कुटून भजनाचा टाहो फोडून काय होणार आहे.’’ असे बरेच लोक बोलू लागले.

सगळी घाण निपटल्यावर डेबूजी सखुबाई बसली होती तेथे आपण होऊन आला. नमस्कार केला सगळ्या लहान थोरांना आणि मुकाट्याने बसला. सखुबाईने अंगावरून हात फिरवला. ती सारखी रडत होती. सभोवार जमलेल्या सगळ्यांनी घरी परत येण्याविषयी आग्रह केला. ``मी तुझ्याबरोबर आलो नि उद्या परवा मेलो, तर तू काय करशील? आजोबा, आजी, मामा गेले, त्यावेळी काय केलंस तू आणि करणार तरी कोण काय? स्वतःपुरते सगळेच पहातात. पण शिलकी आयुष्य गरजवंत लोकांच्या सेवेत झिजवले, तर तीच खरी देवाची सेवा. देवळातल्या दगडी देवाचे हातपाय रगडून काय होणार? सभोवार पसरलेली ही माणसांची दुनिया, हे खरे ईश्वराचे रूप. त्या हजारो लाखो देवांची पडेल त्या रीतीने केलेली सेवाच देवाघरी रुजू होते. सुवासिक फुले, पत्री आणून देवाच्या दगडी मूर्तीवर वाहण्यापेक्षा, सभोवार पसलेल्या हालत्या,  बोलत्या, चालत्या दुनियेच्या सेवेसाठी हाडे झिजवली, भुकेल्यांच्या तोंडात भाकरीचा घास घातला, तरच जन्माचे सार्थक होईल. त्या पत्रीफुलांपेक्षा माझा खराटा झाडूच श्रेष्ठ आहे. उमचायचे नाही तुम्हाला ते आज.’’ इतके बोलून डेबूजी उठला नि गेला निघून.
``मी तुह्या संग आलो अन् सकाळय परवा मेलो त तु काय करशीन? आबा, आजी, मामा मेले त्या वाकती त्वा काय केलं अन् कोन काय करनार? आपल्या पुर्त सर्वेच पाह्यतत पन् उरलं हुए आयुष्य अळल्या नळल्या गरजी लोकाईची सेवा क-याले खरसलं तर तेच खरी देवाची सेवा आहे. देवळाईतल्या दगळ गोठ्याच्या देवाचे हात पाय दाबून काही होत नाही. भोवताली पसरलेली ही माणसांची दुनिया हेच खरं देवाचं रूप आहे. त्या हजारो लाखो देवांची करता येईल त्या मार्गानं सेवाच करनं देवाच्या घरी रुजु होईन. वासाचे फूलं वेल आनून देवाच्या गोट्याच्या मूर्तीवर वाह्यल्यापक्षे भवतालच्या चालत्या बोलत्या लोकांच्या सेवेत आयुष्य खरसलं, भुकेल्या हुया लोकांच्या तोंडात भाकरीचा घास घातला, तरच जलमाचं सार्थीक होईन. त्या फुलपत्रापक्षे माझा खराटा अन् झाळनंच मुद्याचं आहे. आज काही तुम्हाले ते समजनार नाही.’’
यात्रा संपली, डेबूजी पसार
कोठे सटकला त्याचा थांग ना पत्ता. पुन्हा पायपिटी नि वनवास. दररोज १५ ते २५ मैलांची दौड सारखी चालू. रात्र नाही. दिवस नाही. ऊन्ह, थंडी, पाऊस नाही. तुफाने, वादळे, झंजावात नाही. त्याचे पाय सारखे चालतच रहायचे. जाताजाता शेतातली कणसे, कांदे, मिरच्या, शेंगा, गाजरे काय मिळेल ते खायचे आणि विसाव्यासाठी मनाला येईल तेथे अंग टाकायचे. कोणत्याही गावात एक दिवस किंवा एक रात्र यापेक्षा अधिक काळ रहायचे नाही. भूक लागली का हव्या त्या दारी जायचे आणि मायबाप चटणी भाकर द्या ही आरोळी मारायची. कोणी द्यायचे, कोणी हुसकवायचे. शिळी पाकी कशी का असे ना, भाकर, चटणी, कालवण मडक्याच्या टवकळात घ्यायचे आणि दूर नदीकाठी अथवा गावाबाहेरच्या विहिरीजवळ बसून ती खाल्ली का झाली स्वारी पसार दुसरीकडे.
कित्येक वेळा पोलीस नि पोलीसपाटील डेबूजीला चौकीत बंदीवानही करायचे. काही ठिकाणी तर चोर समजून पोलिसांनी त्याला उपाशी ठेवावे, कबुलीसाठी रात्री खूप मार द्यावा. याचे काही नाही, मार खात असतानाही हा हसायचा. पक्का बेरड आहे लेकाचा म्हणून आणखी छळायचे. डोईवर जडजड पेटारे देऊन पाचपाच मैल दुस-या गावी चौकीवर चालत न्यायचे. तेथे आणखी तपास व्हायचा. कोणी सज्जन गावकरी भेटावा नि त्याने ``अहो हा वेडा आहे. असाच गावोगाव भटकत असतो.’’ असे पोलिसांना सांगितले म्हणजे सुटका व्हायची. लगेच स्वारी आपल्या तंद्रीत हास हासत पुढे रवाना व्हायची. कोणी निंदा, वंदा वा अटकेत करा बंदा, कशाची काही दिक्कत खंत वाटायचीच नाही. शारीरिक, मानसिक, वैचारिक अवस्था एकतान, निर्लेप, निर्विकार नि स्थितप्रज्ञ. पुष्कळ वेळा तो मुद्दामच लोकांचा राग आपणावर ओढून घ्यायचा. षड्रिपूंचे दमन किती झाले आहे, याची क्षणोक्षणी पदोपदी तो कसोटी लावून पहायचा. कसोटी लावून पहायचा! लिहा बोलायला शब्द फार सोपे आहेत. वाचायलाही काही कठीण जात नाहीत. पण तसल्या एकाद्या प्रसंगाची नुसती कल्पना करून पहा, म्हणजे डेबूजीच्या साधकावस्थेतील तपश्चर्येची कदर किती भयंकर होती, याची थोडी फार कल्पना झाली तर होईल.



No comments:

Post a Comment