Thursday 19 April 2012

मधुचंद्राचा गोडवा .....

 



डोळ्यांत होमामुळे येणारं पाणी, जमणारी आसवं, मुंडावळ्यांच्या गर्दीतून एकमेकांकडे चोरटे कटाक्ष, विधी करताना होणारा स्पर्श, त्यातून उमजणारे भाव, वाटणारी भीती, उत्कंठा, जरतारी वस्त्रांची झगमग, जोडीला सनईचौघड्यांचे आवाज, हास्यविनोद, पक्वान्नांचा सुवास, सटासट उडणारे फ्लॅशेस... थोडक्यात सेलिब्रिटी असण्याचं एक दिवसाचं का होईना फीलिंग देणारा सोहळा म्हणजे लग्न. वर सांगितलेले सर्व तपशील सर्वांना तंतोतंत लागू पडतातच असं नाही. काही ठिकाणी विधीऐवजी सही ठोकली जाते, काही ठिकाणी झटपट उरकलं जातं,   साधेपणानं. रीती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या एक दोन तासांमध्ये बाजूची व्यक्ती आपल्याशी आयुष्यभरासाठी बद्ध होते. मग लग्न ठरवून असो वा अगदी बरंच र्कोटिंग करून परिचित झालेल्या माणसाशी असो. संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलतं. निदान थोडंतरी आणि लग्नसोहळा कसाही असला तरी एक रिवाज मात्र आवर्जून पाळला जातो, हनिमून वा मधुचंद्राचा!

पूर्वी घरगुती असणारा विवाहसोहळा सध्या एक इव्हेंट झालाय. त्यामुळे घरोघरी या वेळी धावून येणारे नारायण न दिसता प्रोफेशनल मंडळी दिसू लागलीत. आधी कुजबुजत चर्चिला जाणारा मधुचंद्रसुद्धा इव्हेंट होऊन राहिलाय. लग्न होईल तेव्हा होईल, पण हनिमून डेस्टिनेशन मात्र जाहीर केलं जातं. परदेशात रिहर्सल डिनर म्हणून लग्नाच्या आधी रंगीत तालीम असते, तसा रिहर्सल हनिमूनही कुठेकुठे होतो. पण काही ठिकाणी मात्र लग्नानंतर पूजा, मग कुलदैवताला जाणे, नंतर गर्भादान विधी उरकून नवदांपत्य मधुचंद्राला जातं.

अशी जोडपी डिसेंबरपासून पार एप्रिल-मेपर्यंत सगळ्या पर्यटनस्थळी दिसतात. मेंदीचे हात, चुडा, एकदम पॉश कपडे, नवं कोरं लगेज... कळतंच, हळद अजून ओली आहे. यातलं काहीही जरी नसलं तरीदेखील सराईत हॉटेलवाल्यांना ही हनिमुनाळू जोडपी पटकन ओळखू येतात. म्हणजे लग्नाच्या मागील कारणं सूचक रीतीने पूर्वी सांगणारा हा मधुचंद्रसुद्धा पब्लिक झालाय. टूर कंपन्यांनी हनिमून स्पेशल सुरू करून एका प्रकारे याला लग्नसोहळ्यानंतरचा अपरिहार्य भाग करून टाकलाय. अधोमुख होऊन हातात दुधाचा पेला घेऊन संकोचाने खोलीकडे जाणारी नववधूही आढळत नाही. एका अर्थी हा बदल तसा स्वागतार्ह आहे. उगाचच दडपण आणणा-या गोष्टी मोकळ्या वातावरणात आल्या की त्यांचे ओझे कमी होते. हे सगळं जरी होत असलं तरी मधुचंद्र या शब्दाची नशा मात्र आहे तशीच आहे. मग ते मैसूर, उटी, बंगळुरू, महाबळेश्वर अशा ठरलेल्या ठिकाणी जाणारं जोडपं असो वा युरोपला पोचणारं कपल... मेड आणि मॅड फॉर इच अदर हा भाव त्यांच्यात दिसतोच.

वर्षानुवर्षे अनेक दांपत्यांना रोमांचित करणारा आणि आजही ताजा वाटणारा हा मधुचंद्र म्हणजे नक्की काय? वाह्यात उत्तर मलाही ठाऊक आहे पण ही संकल्पना आली कशी? आपल्याकडे लग्न झालं की गावाला जाऊन कुळाचार करण्याची पद्धत होती. हा झाला देशी हनिमून. जोडपे म्हणून एकत्र राहायला सुरुवात करण्याआधी दोघांची व्यवस्थित ओळख व्हावी. संकोच (असलाच तर) दूर व्हावा, आधी जरी मित्र असला तरी नवरा झाल्यावर त्याचा रोल व व्यक्तिमत्त्व बदलतंच. लग्नाआधीच्या तिच्या फारशा न जाणवलेल्या काही सवयी नव्या नवरोबाला खटकतात. प्रियकर असलेला तो नवरा म्हणून जरा जास्तच वागतो हे बायकोला जाणवतं. जवळपास 80 टक्के हनिमून भांडणाने सुरू होऊन थोड्या दुराव्याने, अबोल्याने, लाडिक रुसव्याने संपतात. अर्थात हे कुणी कबूल करणार नाहीत कारण हनिमून या गोष्टीबद्दल आपल्याकडे एवढं अतिरेकी वर्णन केलं जातं की  हनिमून अस्साच हवा हे डोक्यात पक्क फिक्स होतंय. काय करू नये यापेक्षा काय कारायला हवं याचे अनुभवी जाणकारांकडून मिळणारे सल्ले गोंधळात अधिक भर घालतात. मग यात पलंगतोड पानापासून सगळं आलं. अर्थात हे नवख्या मंडळींना. लग्नाआधी लिबर्टी घेतलेल्या मॉड कपल्सचाही हनिमून दुस-या कुठल्यातरी कारणाने बिनसतो. It is not pure bliss! बस, ट्रेनमध्ये आपण ढकलून जशी चौथी सीट पकडतो आणि काही काळाने नकळत मध्ये येतो तसंच हनिमूनच्या बाबतीत घडायला हवं. मला हवं तस्संच वागणारा/री लग्नानंतर बदलतेच. नकळत एका अधिकाराची भावना येते. पण या अधिकाराचं ओझं होता कामा नये याचं भान बाळगलं जात नाही. आपल्याबरोबर आपले गुरुवार, संकष्टी पाळणारा तो खरंतर काहीच मानत नाही आणि नेहमी टापटीप राहाणारी ती बाथरूमध्ये एवढा वेळ घेते, अशा अनेक वास्तव सत्यांची जाणीव या मधुचंद्राच्या काळात होते. दिवसात एखाददोन तासांसाठी भेटणे वेगळे. (आपलं बेस्ट बिहेविअर तेव्हाच दाखवलं जातं) आणि 24 तास एकत्र राहाणं वेगळं. जेवताना तो मचमच आवाज करतो, तो ड्रिंक घेतो, सिगारेटसुद्धा ओढतो असे अनेक शोध बायकोला लागतात आणि तिला फक्त सिरियल्सच आवडतात, तयार व्हायला ती प्रचंड वेळ घेते आणि प्रत्येक गोष्टीत टोकत राहण्याची वाईट खोड तिला आहे हे नव-याला जाणवतं. थोडंसं कर्मठ वाटलं तरी एक आहे. नवरा हा संपूर्णपणे बिघडलेला, बेशिस्त प्राणी असून त्याला आपल्यासारखे बनवणे हे ध्येय असल्यागत ब-याच नववधू वागतात. लग्नाआधी तशी अप्राप्य वाटणारी मुलगी बायको झाल्यावर पुरुषांची पारंपरिक मानसिकता उफाळतेच. मग तो हायफंडा राहुल असो वा मध्यमवर्गीय रमेश. एक निर्धास्तपणा त्यात येतो. आणि आधी आपलं सग्गळं ऐकणारा, सो कूल आणि क्यूट तो असा वागूच कसा शकतो हे तिला कळत नाही. लग्नानंतर संपूर्ण वेगळ्या वातावरणात बाईला जायचं असतं (हो...आजही) त्यामुळे तिचे आपल्याला सर्वांत जवळच्या त्याला घट्ट पकडण्याचा स्त्री सुलभ प्रयत्न होतोच. दोघांच्याही मानसिकतेनुसारच हे घडते...त्यावरून लगेच निष्कर्ष काढणे चूक आहे.

हनिमून ही 100 टक्के यशस्वी चाचणी नव्हे, लग्नाआधीचं ते लाँचिंग पॅड व प्रिलिम म्हणा ना. त्यामुळे त्यात थोडे प्रॉब्लेम्स, अडचणी येणारच. साधा नवा बूट दोन चार दिवस पायाला चावतो. इथे तर अख्खा हाडामांसाचा माणूस आयुष्यात आलाय. थोडे धक्के साहजिकच आहेत. सिनेमे पाहून मधुचंद्राची कल्पना आखणं म्हणजे लोकलला गर्दी नसणं इतकं काल्पनिक आणि अवास्तव ठरेल. सध्या पूर्वीइतकं कर्मठ वातावरण उरलेलं नाही. पुरेसा मोकळेपणा आलाय पण तो वरपांगी न ठेवता वागण्यातही आणणं गरजेचं आहे. मधुचंद्रात भांडणे, कुरबुरी होणार पण त्या लॉजिकल आणि तात्पुरत्या हव्यात. अवास्तव अपेक्षा ठेवून वागणं नेहमी तापदायक ठरतं. तुम्ही जसे आहात तसेच वागा. कारण उद्या ना परवा गाडं मूळपदावर येणारच. मुख्य म्हणजे भ्रामक कल्पना मनात ठेवू नका. समोरच्याने आपलं ऐकलंच पाहिजे हा हट्ट योग्य नाही. पूर्वीसारख्या अल्लड वयात हल्ली लग्न होत नाहीत त्यामुळे   पुरेसा समंजसपणा आलेला असतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक संबंध. याविषयी आजही गैरसमजुती आढळतात. लग्नाआधी बाकी प्लॅन करताना विवाहपूर्व समुपदेशन घेणे हे गरजेचे आहे. अगदी प्रेमविवाह असला तरी बहुतांशी कुरबुरी इथूनच सुरू होतात. त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही तर डाव दुर्दैवाने मांडण्याआधीच उधळला जातो. ते टाळणे आपल्याच हातात असते.

कुंडलीबरोबर रक्तगट, एड्स टेस्टसुद्धा हवे असणारे हे जग आहे. त्यांच्यात जो वस्तुनिष्ठ, शास्त्रीय दृष्टिकोन असतो तोच थोडाफार यातही हवा. जीन्स, टी शर्ट आणि कोपरापर्यंत चुडा ठेवला म्हणजे आपण तसे मॉड झालो, हे आधी मनातून काढा. पोशाखी मॉडनेस नको. हे सोपे उपायच मधुचंद्र पुढच्या सर्व वैवाहिक आयुष्यभर ठरवतील. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे हॉटेल निवडलंय त्याच्या दर्जाविषयी पक्की खातरजमा करा. तुमचे खाजगी क्षण, एकांत जाहीर करायला समाजकंटक सगळीकडे असतात. सोबत भारंभार दागिने अजिबात नेऊ नका.  तुमचे तपशील मित्रमैत्रिणींना फोनवरून मुळीच सांगू नका. हनिमूनला निघण्याआधी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन मगच गर्भप्रतिबंधक गोळ्या घ्या. स्वत: डॉक्टर होऊ नका. पण डॉक्टरांचा नंबर मात्र जवळ ठेवा. हनिमून ही सुरुवात आहे, तो निर्णायक प्रसंग नाही म्हणून त्यावरून पुढचे आडाखे अजिबात मारू नका. या साध्या गोष्टी पाळल्यात की तुमचा हनिमून आयुष्यभर ताजा राहील.

सुटसुटीत कपडे व सामान असावे म्हणजे गाडी चुकली बिकली तरी जड लगेजमुळे होणारा त्रास वाचतो.

हनिमून म्हणजे खरेदी नव्हे. त्यामुळे त्यात वेळ आणि पैसा अजिबात खर्च करू नका. तो एकमेकांवर करा.

या काळात अगदी चोवीस तास एकमेकांबरोबर राहायची गरज नाही. थोडासा वेळ फक्त स्वत:साठी ठेवा.

जमल्यास ट्रॅव्हलर्स चेक वापरा. कॅश टाळा.

आपली औषधे, कॉस्मेटिक्स आधी पॅक करा.

हनिमून तुमचा आहे. त्याची जाणीव फक्त तुम्हालाच हवी, त्यामुळे चारचौघातलं तुमचं वागणं व्यवस्थित हवं.

उठल्यासुटल्या आईला, मैत्रिणीला कॉल हे टाळा. नव-यानेसुद्धा मित्रांना थोडं विसरणं योग्य. 





No comments:

Post a Comment