Tuesday 24 April 2012

खेकड्यांच कालवण




  • साहित्य : अर्धा डझन खेकडे, एक वाटी सुकं खोबरं, दोन कांदे, चार हिरव्या मिरच्या, दोन चमचा हळद, कालवणाच्या आंबटपणासाठी आमसुलं, लसणाच्या आठ पाकळ्या, अर्धा इंच आलं, वाटीभर कोथिंबीर, दोन चमचे मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ.
  • गरम मसाल्यासाठी : आठ काळ्या मि-या, चार लवंगा, थोडी खसखस, अर्धी मूठ धने 
  • पूर्वतयारी : कोळणीकडून खेकडे साफ करून घेताना त्यांचे मोठे डेंगे आणि छोटे डेंगे वेगळे काढून ठेवायचे. खेकडय़ाचं पोटही फोडून घ्यायचं. फोडल्यावर काळं आवरण टाकावं लागतं. आवरण टाकण्यापूर्वी त्यातला आतला भाग खरडवून पिवळसर लाल रंगाचा द्रव काढून घ्यावा लागतो. त्याने आमटीच्या टेस्टमध्ये भर पडते. आतल्या पोटाकडच्या पांढ-या भागाला चिकटलेले केस, मिशा काढव्या लागतात. या पांढ-या भागात पिवळसर लाल रंगाचा द्रव असतो. तोही एका वाटीत काढून ठेवायचा. साफ केलेले खेकडे धुऊन घ्यायचे. मोठे आणि छोटे डेंगेही धुऊन घ्यायचे. छोटे डेंगे मिक्सरला लावून घ्यायचे. त्यांचा रस वेगळा काढून घ्यायचा. चोथा काढून टाकायचा. कांदा उभा चिरून त्यातला थोडा कांदा तेलात लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. उरलेला फोडणीसाठी ठेवून द्यायचा. तेलावर परतलेला कांदा वेगळा ठेवायचा. त्याच तेलात खसखस वगळून अख्खा गरम मसाला चांगला भाजून घ्यायचा. तोही वेगळा काढून ठेवायचा. मग सुकं खोबरं भाजून घ्यायचं. सुकं खोबरं भाजल्यावर त्यात भाजलेला अख्खा गरम मसाला आणि कांदा परतून घ्यायचा. मग खसखस घालायची. मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर बारीक वाटून त्याचाही हिरवा मसाला तयार करायचा.
  • कृती : जाड बुडाच्या भांडय़ात तेल गरम करत ठेवायचं. तेल चांगलं गरम झालं की, त्यात चिरलेला कांदा घालायचा. कांदा परतल्यावर खेकडय़ांचे मोठे डेंगे आणि पांढरी पोटं फोडणीला घालायची. फोडणीत खेकडे परतून घ्यायचे. खेकडे परतल्यावर त्यात हिरवा मसाला घालायचा. त्यातही खेकडे परतल्यावर त्यात मालवणी मसाला आणि हळद टाकायची. मसाल्यात पुन्हा एकदा खेकडे परतून घ्यायचे. पेलाभर गरम पाणी फोडणी टाकायचं. पातेल्यावर झाकण मारायचं. पातेल्याच्या झाकणावर पाणी ओतायचं. वाफेवर खेकडे शिजू द्यायचे. खेकडय़ाच्या डेंग्यांना लालसर गुलाबी रंग यायला सुरुवात झाली की, समजावं.. खेकडे शिजण्यास सुरुवात झाली आहे. खेकडे शिजत आल्यावर त्यात कांदा-खोबऱ्याचं वाटण टाकायचं. वाटण शिजत आलेल्या मिश्रणात चांगलं परतून घ्यायचं. या मिश्रणाला चांगली उकळी आणावी. सर्वात शेवटी मिश्रणात कोकमं आणि मीठ घालायचं. खमंग वास यायला लागल्यावर समजावं की, खेकडे पूर्ण शिजून झाले आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तांदळाची भाकरी, भात आणि दाटसर सोलकढीसोबत हे खेकडय़ाचं कालवण चविष्ट लागतं. 

  • टीप : खेकड्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे ते गोडसर लागतात. त्यामुळे कालवण तयार झाल्यावरही त्यात थोडा जास्तीचा मालवणी मसाला घालावा लागतो. अर्थात आपल्या आवडीप्रमाणे ते करावं.





No comments:

Post a Comment