Wednesday 18 April 2012

पाण्यावरचे भंगलेले स्वप्न - RMS टायटानिक





ती रात्र.. त्या रात्री आपल्या समोर काय वाढून ठेवलंय याची काळालाच नाही, तर त्या अथांग महासागरालाही कल्पना नव्हती… 14 एप्रिलला रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी टायटॅनिकच्या कॅप्टन्सनी हिमनगाची धडक चुकवली खरी, पण त्यांना जहाजाला वाचवता आलं नाही…. चार दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सातत्यानं हिमनगाबाबत इशारे मिळत होते. मात्र त्याचं गांभीर्यच जहाजावरील अधिका-यांच्या लक्षात आलं नाही. अधिका-यांच्या या चुकीमुळेच टायटॅनिक नावाचा काळा इतिहास निर्माण झाला….

इंग्लंडमधील साऊथहॅप्टनमधून हे जहाज आपल्या पहिल्याच सफरीवर न्यूयॉर्कला निघालं होतं. मजल दरमजल करत डौलांनं हे जहाज आपल्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी पाणी कापत निघालं होतं… सगळं काही आलबेल आहे असं वाटत असतानाच,  त्या दुर्दैवी रात्री न्यूयॉर्कला पोहोचण्याआधीच काळच हिमनगाच्या रुपानं आडवा आला आणि तो महाभयंकर अपघात झाला. कधीही न बुडणारं जहाज असा दावा ज्याच्याबाबतीत केला जात होता, त्या टायटॅनिकच्या पहिल्याच प्रवासात ठिक-या ठिक-या झाल्या… जहाजाला जलसमाधी मिळून आता शंभर वर्षे पूर्ण झाली असली, तरीही टायटॅनिकनं आपल्या अस्तित्वाचं कुतूहल मात्र कायम राखलंय. ते गूढ अजूनही संपत नाही… काळाच्या लाटा वर्तमानाला पुढे लोटत नेतायत, पण लाटांच्या गर्तेत खोल खोल रुतली गेलेली ती टायटॅनिक…. त्या दुर्घटनेतल्या काही प्रश्नांची उकल शंभर वर्षांनंतरही झालेली नाही ? आणि म्हणूनच आज शंभर वर्षांनंतरही टायटॅनिकच्या जलसमाधीचं चित्र अजूनही पुसता पुसलं जात नाही….


टायटॅनिक जहाज
व्हाइट स्टार लाइन कंपनीचे टायटॅनिक हे तिसरे जहाज. पहिले ऑलिंपिक, दुसरे ब्रिटानिक आणि तिसरे टायटॅनिक.
टायटॅनिक हे 882 फूट लांब व 104 फूट उंच. 46 हजार 328 टन वजन.
जहाजाच्या निर्मितीसाठी 75 लाख डॉलर खर्च.

31 मे 1911 रोजी जहाजाचे उद्‌घाटन. हे जहाज पाहण्यासाठी सुमारे एक लाख लोक जमा.

सुविधा 
3339 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता. 739 प्रथम वर्गाच्या खोल्या. 674 द्वितीय व 1026 तृतीय वर्गाच्या खोल्या. 900 कर्मचारी.
पंचतारांकित हॉटेलप्रमाणे व्यवस्था. दूरध्वनी, ग्रंथालय, दुकाने, पोहोण्याचा तलाव, व्यायामशाळा, स्क्वॅश कोर्ट.

अपघाताच्या दिशेने
समुद्रातील चाचण्या पूर्ण करून टायटॅनिक 4 एप्रिल 1912 रोजी मध्यरात्री ब्रिटनमधील सद्‌मटनला पोचले.
10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिकचा सद्‌मटन ते न्यूयॉर्क प्रवास सुरू. एकूण 1317 प्रवासी व 900 कर्मचारी. मुलांची संख्या 107.
दुपारी 12 च्या सुमारास निघालेल्या टायटॅनिकची दुसऱ्या जहाजाबरोबर टक्कर टळली. एक तास उशिराने प्रस्थान.
अटलांटिक महासागरातील ग्रॅंड बॅंक्‍स ऑफ न्यू फाऊंडलॅंडच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर हिमनग असल्याचा इशारा टायटॅनिकला देण्यात आला.
परंतु टायटॅनिक पूर्ण वेगाने जात होते. महाकाय जहाजांना हिमनगांपासून धोका कमी असतो, असे त्या काळी मानले जात होते. समुद्र शांत असल्याने व आकाशात चंद्र नसल्याने हिमनग पाहण्यात कर्मचाऱ्यांना अडचण.

बोटीची रचना करताना त्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला अजिबात प्राधान्य देण्यात आले नव्हते. बोटीला हवाबंद अशी दारे होती आणि आतमध्ये मजबूत अशा भिंती (बल्कहेडस) नव्हत्या. या भिंती आग आणि पाणी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाऊ न देण्यासाठी अत्यावश्यक असतात. टायटॅनिकमध्ये याऐवजी अधिकाधिक प्रवासी सामावून घेण्यास प्राधान्य दिले गेले. बोटीला असलेली हवाबंद दारे किंवा झडपा या समुदाच्या पाण्याच्या पातळीपासून अवघ्या तीन मीटर ऊंच होत्या. बोटीला दुहेरी तळ होता; मात्र बोटीच्या बाह्य भिंतीच्या आत दुसरीही तशीच भिंत असण्याची गरज असते. त्यामुळे बोट अधिक सुरक्षित होण्यास मदत होत असते. टायटॅनिकच्या मालकांनी मात्र त्याऐवजी एकेरीच भिंत असणे पसंत केले; कारण त्यांना पैसा वाचवायचा होता. बोटीवर ६४ लाइफ बोटी असाव्यात अशी मूळ कल्पना होती. परंतु इतक्या लाइफ बोटींना ठेवले तर बोटीवरची जागा अडेल असे कारण देऊन फक्त २० लाइफ बोटीच ठेवण्यात आल्या. अर्थात याबाबत मतांतरे आहेत. त्यावेळच्या कायद्यांनुसार २० लाइफ बोटी ठेेवण्याची परवानगी नव्हती. या लाइफ बोटींमुळे मूळ बोटीचे वजन वाढेल आणि ती कलंडण्याची संभाव्यताही मोठी असेल, असे एक कारण देण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र टायटॅनिकच्या मालकांनी विलासी प्रवास करण्यास उत्सुक असणाऱ्या आपल्या गिऱ्हाईकांसाठी अधिकाधिक मोकळी जागा ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांना सनबाथसाठी पुरेशी जागा असावी आणि ऐषोरामी पार्लर्सही असली पाहिजेत, अशी त्यांची धारणा होती. साहजिकच लाइफ बोटींची संख्या मर्यादित केली गेली, असे एका गटाचे म्हणणे आहे. या साऱ्या उणिवा असतानासुद्धा टायटॅनिकने आपला प्रवास वेगाने सुरू केला.

१० एप्रिल १९१२ रोजी इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन बंदरातून अमेरिकेच्या स्वप्नभूमीकडे पहिल्या प्रवासास निघालेली ‘टायटॅनिक’ ही महाकाय, आलिशान बोट प्रस्थानानंतर अवघ्या सहाव्या दिवशीच- १५ एप्रिलला अ‍ॅटलान्टिक महासागरात एका हिमनगावर आदळून सागरतळी विसावली. या दुर्दैवी अपघातात त्यावरील दीड हजारावर प्रवाशी तसेच नाविक मरण पावले, तर सातशेजण सुदैवाने बचावले. जगातील सर्वाधिक गाजलेली बोट दुर्घटना म्हणून टायटॅनिकच्या या शोकांतिकेचा उल्लेख आजही होत असतो. १५ एप्रिल २०१२ रोजी या दुर्घटनेला बरोब्बर शंभर वर्षे होत आहेत.
‘आर. एम. एस. टायटॅनिक’ची दुर्घटना ही सागरी विश्वातील सर्वाधिक प्रसिद्ध दुर्घटना असली तरी जीवितहानीचा विचार करता ती सर्वात मोठी घटना नव्हती. दुसऱ्या महायुद्धात बुडविण्यात आलेल्या "M. V. Wilhelm Gustloff" या जर्मन जहाजावरील नऊ हजार पाचशे जणांना जलसमाधी मिळाली. शांतताकाळातील दुर्घटनांमध्ये फिलिपिन्स येथे १९८७ साली "Donna Pazz" या फेरीबोटीला झालेल्या अपघातात चार हजार तीनशे शहाऐंशी प्रवाशी जळून अथवा बुडून ठार झाले. हे दोन्ही अपघात ‘टायटॅनिक’नंतर घडलेले. पण टायटॅनिकच्या आधीही १८२२ साली इंडोनेशियाजवळ बुडालेल्या ‘टेक सिंग’या चिनी जहाजावरील सोळाशे प्रवाशांना, तर १८६५ साली मिसिसिपीत बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या ‘एस. एस. सुलताना’च्या दुर्घटनेत दोन हजार चारशेपकी अठराशे जणांना जलसमाधी मिळाली.
‘टायटॅनिक’ तिच्या काळातील सर्वाधिक वेगवान जहाजही नव्हते. टायटॅनिक पहिल्याच सफरीस निघाले तेव्हाही तिच्यावरून प्रवास करण्याकरता चढाओढ लावण्याएवढी कुणालाही उत्सुकता नव्हती. दोन हजार पाचशे सहासष्ट प्रवाशी वाहून नेण्याची क्षमता असतानाही तिच्यावर केवळ एक हजार तीनशे सतरा प्रवाशीच होते. टायटॅनिकवर लाइफबोटीही ‘बोर्ड ऑफ ट्रेड’च्या तेव्हाच्या नियमांच्या मागणीपेक्षा अधिक होत्या. अकराशे अठ्ठय़ाहत्तर प्रवाशांना पुरेल एवढी त्यांची क्षमता होती. टायटॅनिकवर प्रवाशांचे सामान भरपूर होते. मोटारगाडय़ाही होत्या. परंतु तिच्याबद्दलच्या दंतकथांप्रमाणे उल्लेखावेत असे सोने वा हिऱ्यांचे अलंकार अथवा कसलेही खजिने नव्हते. ‘रुबायत ऑफ उमरखय्याम’ची एक रत्नजडित प्रत ही टायटॅनिकवरील सर्वात प्रसिद्ध वस्तू होती. तिची तेव्हाची किंमत फक्त चारशे पाच पौंड होती. टायटॅनिकवरील सगळ्यात महागडय़ा निवासव्यवस्थेचे भाडे तेव्हा आठशे सत्तर पौंड होतं. टायटॅनिकच्या नावाआधी आर. एम. एस.- ‘रॉयल मेल स्टिमर’ लावण्यात आले, याचे कारण एवढेच, की तिला तेव्हाच्या ‘रॉयल मेल’ टपाल व्यवस्थेकडून त्यांचे टपाल वाहून नेण्याचे कंत्राट मिळाले होते.
आर. एम. एस. टायटॅनिक बुडण्याआधी तिला कोणीही ‘अन्सिंकेबल’ हे विशेषण लावले नव्हते. टायटॅनिक बुडाल्यानंतर अनेकांनी तिला ‘अन्सिंकेबल’- जी बुडणे शक्य नाही अशी- म्हणण्यास सुरुवात केली.   
टायटॅनिकने तिच्या पहिल्या सफरीच्या सहाव्या दिवशी सागरतळ गाठला, हा तिला ‘अन्सिंकेबल’ म्हणण्यातला रोमँटिसिझम. ती बुडाली तेव्हा तिच्यावर प्रवाशी आणि कर्मचारी मिळून दोन हजार दोनशे चोवीस जण होते. त्यांच्यापकी फक्त सातशे दहा जण वाचले. टायटॅनिक बुडाल्यावर तातडीने सुरू झालेल्या शोधमोहिमेला ७३ वष्रे यश लाभले नाही. टायटॅनिकचे हे ७३ वर्षांचे अदृश्य होणे अनेक दंतकथांना जन्म देत राहिले.. टायटॅनिकचे गूढ अधिक आकर्षक बनत गेले. परंतु टायटॅनिक अदृश्य होण्याचे कारण अतिसामान्य होते. टायटॅनिक ज्या ठिकाणी बुडाले असे समजले जात होते, तो समज थोडाफार चुकीचा होता. टायटॅनिक तेथून २१.२ कि. मी. अंतरावर समुद्रपृष्ठाखाली बारा हजार फूट- म्हणजे जवळजवळ पावणे चार कि. मी. खोल सापडले.. ७३ वर्षांनंतर! तेव्हा १५ चौरस कि. मी. परिसरात टायटॅनिकचे अवशेष विखुरलेले होते. त्यात प्रवाशांच्या सामानाचे, जहाजाच्या सजावटीचे तसेच इंजिनचे तुकडेही आहेत. टायटॅनिक बुडताना बाराशे टन वजनाचे, तीन दशलक्षापेक्षाही अधिक खिळे ठोकून, सहा फूट रुंद, तीस फूट लांब आणि दीड इंच जाडीचे पोलादी पत्रे एकमेकांस जोडून घडविलेले टायटॅनिकचे महाकाय ‘अन्सिंकेबल’ धड मॅचबॉक्सप्रमाणे फाटून त्याचे दोन तुकडे झाले. प्रवाहात वाहणाऱ्या ढलप्यांप्रमाणे ते समुद्राखालील प्रवाहासोबत नेईल तेथे वाहत चार कि. मी. खोल बुडाले.
मुंबईहून रेवसला निघालेली ‘रामदास’ बोट १९४७ साली कुलाब्यापासून दहा मलांवर बुडाली, ती दहा वर्षांनी आपोआप वर येऊन बॅलार्ड पिअरला लागली होती. अशी अनेक उदाहरणे पाहता टायटॅनिकचे अवशेष २१ कि. मी. दूर सापडणे हे आश्चर्यकारक नाही. समुद्रतळावर विसावलेल्या टायटॅनिकच्या दोन विभक्त भागांतही एक- तृतीयांश मलाचे अंतर आहे!
मात्र, टायटॅनिक हे तेव्हाचे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते, हे मात्र निर्वविाद. सागरावर कधीही तरंगले नसेल एवढे महाकाय, आरामदायी आणि देखणे जहाज बांधण्याची कल्पना ‘व्हाइट स्टार लाइन’चा चेअरमन जे ब्रूस इस्मे आणि ब्रिटिश भांडवलदार जे पिअर पॉण्ट मॉर्गन या दोघांची! मात्र, त्याचा सागरी आकर्षण वा रोमँटिसिझमशी यित्कचितही संबंध नव्हता. त्यांच्या प्रतिस्पध्र्यानी अतिशय वेगवान प्रवासी जहाजांची सागरी वाहतूक सेवा पुरविण्यास सुरुवात केल्याने ‘व्हाइट स्टार लाइन’ला स्वतचा धंदा टिकविण्यासाठी काहीतरी पाऊल उचलणे भाग होते. त्यांच्या चेअरमनने प्रतिस्पध्र्याच्या वेगाशी स्पर्धा करण्याऐवजी प्रवासी वाहून नेण्याच्या जहाजाच्या क्षमतेशी स्पर्धा करण्याचे ठरवले. १९०८ साली त्यांनी बेलफास्ट येथील कारखान्यास तीन महाकाय जहाजांच्या बांधणीचे काम दिले. १९०९ साली प्रत्यक्ष जहाजबांधणी सुरू झाली. १० एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिकच्या पहिल्या सफरीस सुरुवात झाली. १५ एप्रिल रोजी ती बुडाली तेव्हा तिचा मास्टर कॅप्टन स्मिथने स्वेच्छेने टायटॅनिकसोबत जलसमाधी स्वीकारली. जहाजाचे बॅण्डपथक वॅलेस हार्टलेच्या नेतृत्वाखाली जहाज बुडेपर्यंत बॅण्ड वाजवत होते. स्वतचे मरण निश्चित असूनही अनेकांनी प्रथम स्त्रिया आणि मुलांना लाइफबोटींत उतरू दिले. तेव्हा समुद्राच्या पाण्याचे तापमान उणे दोन डिग्री सेल्सिअस होते. पोहता येत असले तरी पाण्यात पडल्यावर गोठून मृत्यू निश्चित होता. जहाज वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या आठशे पासष्ट पुरुष कर्मचाऱ्यांपकी सहाशे त्र्याण्णव जणांनी मृत्यू स्वीकारला. हे सारे घडत असताना ‘व्हाइट स्टार लाइन’चा चेअरमन जे बूस इस्मे- ‘अन्सिंकेबल टायटॅनिक’ ज्याची मूळ कल्पना- त्याने इतरांआधी लाइफबोटीत जागा पटकावून स्वतचा जीव वाचवला. त्यामुळे पुढे त्याची छी थू झाली. पण स्वतचा जीव वाचवणे त्याच्या मनोवृत्तीस महत्त्वाचे वाटले. नफा कमावण्यासाठी जहाजे चालवणे, एवढाच त्याचा धंदा होता.
१० एप्रिल १९१२ च्या दुपारी अमेरिका नावाच्या स्वप्नभूमीकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टायटॅनिकच्या पहिल्या सफरीस साऊथहॅम्पटनच्या बंदरातून सुरुवात झाली तेव्हा तिच्यावर नऊशे बावीस प्रवाशी होते. तिचे ग्रॉस टनेज सेहेचाळी हजार तीनशे अठ्ठावीस टन होते आणि तिच्यामुळे दूर सारल्या गेलेल्या समुद्राच्या पाण्याचे वजन बावन्न हजार तीनशे दहा टन होतं. तिची लांबी आठशे ब्याऐंशी फूट, जास्तीत जास्त रुंदी ब्याण्णव फूट, तळापासून फनेलच्या माथ्यापर्यंतची उंची एकशे पंचाहत्तर फूट होती. त्यापकी खालचे चौतीस फुटांचे धूड पाण्याखाली होते. ती जेव्हा बंदरातून सरकू लागली तेव्हा तिने कापलेल्या पाण्याच्या डोंगराच्या धडकेमुळे बंदरात उभी असलेली जहाजे लाटांच्या िहदोळ्यावर उंच चढून खाली भिरकावली जाऊ लागली. बंदरात बांधलेल्या ‘न्यू-यॉर्क’ जहाजाच्या केबल्स त्या ताणाने तुटल्या. असहाय ‘न्यू-यॉर्क’ गिरकी घेत टायटॅनिकच्या दिशेने झेपावले. कॅप्टन स्मिथने टायटॅनिकच्या इंजिन्सना विरुद्ध दिशेस जाण्यास फर्मावले. शेजारी उभ्या असलेल्या टगबोटने दिशाहीन न्यू-यॉर्कला टायटॅनिकपासून दूर लोटले. टायटॅनिक आणि न्यू-यॉर्कची अटळ टक्कर केवळ चार इंचांनी टळली. अशी टायटॅनिकच्या पहिल्या सफरीची सुरुवात होती !
साऊथहॅम्प्टन- चेरबोर्ग- क्वीन्सटाऊन या बंदरांत थांबत, प्रवासी आणि माल उचलत अखेरीस कॉर्कहार्बरमधून टायटॅनिकने ११ एप्रिल १९१२ रोजी दुपारी दीड वाजता पश्चिमेच्या दिशेने झेपावत अ‍ॅटलान्टिक महासागर कापायला सुरुवात केली. तिचा शेवटचा टप्पा अ‍ॅम्ब्रोज लाइट- न्यू-यॉर्क फक्त दोनशे बावीस मलांवर असताना ती हिमनगावर आपटून बुडाली. तेव्हा तिने तीन हजार मलांपेक्षा अधिक अंतर सरासरी ताशी चोवीस मल वेगाने पार केले होते.
वाटेत टायटॅनिकला शीत वातावरणाचा फटका, जोरदार वारे आणि आठ फूट उंचीच्या लाटा आडव्या आल्या होत्या. पण १४ एप्रिलच्या संध्याकाळी वातावरण शांत आणि निरभ्र झाले होते. गारठा वाढला होता. समुद्रावर हिमनग तरंगत असल्याच्या धोक्याच्या सूचना इतर जहाजांकडून टायटॅनिकला मिळाल्या होत्या. पण महाकाय जहाजांना हिमनगाचा धोका नसतो, हा समज त्याकाळी दृढ होता. म्हणूनच कॅप्टन स्मिथने टायटॅनिक ‘फूल स्पीड’ने जाऊ देण्याचा आदेश दिला होता. टायटॅनिकने वेग कमी करावा असे कोणतेही कारण उद्भवू शकते, यावर त्याचा विश्वास नव्हता. ‘कॅलिफोíनयन’ जहाजाने हिमनगाबाबत दिलेली धोक्याची सूचना टायटॅनिकच्या सीनिअर वायरलेस ऑपरेटरला मिळूनही त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले होते.
रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी टायटॅनिकच्या टेहेळ्याला समोर तरंगणारा प्रचंड हिमनग दिसला. ब्रीजवर फर्स्ट ऑफिसरने हिमनगास वळसा घेण्यासाठी जहाज वळवण्याचा आणि इंजिन्स विरुद्ध दिशेस फिरविण्याचा आदेश दिला. पण तोवर उशीर झाला होता. टायटॅनिक हिमनगावर आदळली. पाण्याखालील उजव्या बाजूच्या पोलादी अंगास छेद गेले. वॉटर टाइट कम्पार्टमेन्टमध्ये पाणी शिरलं. टायटॅनिकचं वाचणं अशक्य आहे, हे पहिल्या काही क्षणांतच निश्चित झालं.
टायटॅनिकशी संबंधित कोणीच अशा अपघाताच्या संभाव्यतेचाही विचार केलेला नव्हता. जहाजाच्या पूर्ण क्षमतेएवढे प्रवाशी टायटॅनिकवर नसले तरी असलेल्या लाइफबोटींत जहाजावरील फक्त अध्र्या माणसांसाठीच जागा होती. अशावेळी काय करायचं, हे प्रवाशांना माहीत नव्हतं. काय सांगायचं, हे अधिकाऱ्यांना ठाऊक नव्हतं. तृतीय श्रेणीने प्रवास करणारे अनेक प्रवाशी पोलादी डेकखाली भरणाऱ्या पाण्यात अडकून बुडाले. स्त्रिया आणि मुलांना प्रथम वाचवू पाहणारे अनेक प्रवाशी डेकवरच राहिले.
टक्कर झाल्यानंतर अडीच तासांनी टायटॅनिकच्या बुडण्याचा वेग वाढला. पुढील भागात पाणी भरून नाकाड समुद्रात रुतू लागले. पाठचा भाग पाण्याबाहेर येऊ लागला. कायम पाण्याखाली असणारे तिचे तेवीस फूट व्यासाचे प्रोपेलरचे पोलादी पंखे पाण्याबाहेर येऊन आभाळाच्या दिशेने उंचावू लागले. तिसऱ्या आणि चौथ्या फनेलमधील पोलादी डेक फाटला. जहाजाचा पाठचा भाग संपूर्ण पाण्याबाहेर आला. बूड वर करून काही वेळ सरळ उभा राहिला. जीव वाचवणारे अनेकजण हाती सापडेल त्या टायटॅनिकच्या भागाला लटकले. पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी पाठचा भाग समुद्रात संपूर्ण बुडाला. लटकणारे सारे प्रवाशी उणे दोन डिग्री सेल्सिअस थंड तापमान असलेल्या पाण्यात भिरकावले गेले. त्यातील बहुतेक गोठून, हायपोथर्मिआने किंवा काíडआक अ‍ॅरेस्टने दगावले. आधीपासून लाइफबोटींत बसलेले या बुडणाऱ्यांपकी फक्त तेराजणांनाच वाचवू शकले. वस्तुस्थिती अशी होती की, तेव्हाही तरंगणाऱ्या लाइफबोटींत आणखी पाचशेजणांना पुरेल एवढी जागा शिल्लक होती!
टकरीनंतर वायरलेस, रॉकेट, दिव्यांच्या साहाय्याने मदतीची हाक टायटॅनिकने मारली होती. पण ती ऐकू येणारे कुठलेही जहाज जवळपास नव्हते. पहाटे चारच्या सुमारास ‘आर. एम. एस. कारपाथिआ’ तेथे पोहोचली. वाचलेल्या सातशे दहा व्यक्तींना घेऊन कारपाथिआ तीन दिवसांनी रात्री नऊच्या मिट्ट अंधारात न्यू-यॉर्कला पोहोचली तेव्हा टायटॅनिकवरील प्रवाशांचे चाळीस हजार शुभचिंतक भरपावसात बंधाऱ्यावर त्यांची वाट पाहत होते. किती तरले आणि किती बुडाले, याची निश्चित माहिती हाती येण्यास आणखी चार दिवस लागले. बातमीची वाट पाहत तोपर्यंत रस्त्यावर ताटकळणारी सारी गर्दी संध्याकाळी घरी परतली तेव्हा साऊथहॅम्प्टनमध्ये एकही घर असं नव्हतं, ज्यांनी स्वतचा नातेवाईक अथवा मित्र गमावलेला नाही. टायटॅनिकवरील वयाने सर्वात लहान प्रवासी मिल्विना डीन नऊ आठवडय़ांची होती. ती पुढे ९७ वष्रे जगली.
टायटॅनिक बुडाल्यानंतरही एकसंध आहे, असा समज असलेल्या अनेकांनी टायटॅनिक समुद्राबाहेर परत काढण्याच्या अगणित योजना आखल्या. पण टायटॅनिक जिथे सापडली तिथे असणारा समुद्राच्या पाण्याचा दाब प्रत्येक चौरस इंचाला सहा हजार पाचशे पौंड असल्याने टायटॅनिक अख्खी असती तरी तिथून उचलता येणे आजही अशक्य झाले असते. टायटॅनिकचे दोन्ही तुकडे सागरतळावर एवढय़ा जोराने आदळले, की टायटॅनिकचे पोलादी नाकाड चुरगळले आणि पाठचा भाग तर पार उद्ध्वस्तच झाला. एकावर एक असलेले त्याचे आठ डेक चपातीच्या चळतीप्रमाणे एकमेकांस चिकटले. टायटॅनिक सापडल्यानंतर पाणबुडे, वैज्ञानिक, चित्रपट निर्माते, टूरिस्ट, भंगारवाले असे शेकडो जण असंख्य वेळा त्या अवशेषांतून फिरले. हाताला लागलेल्या टायटॅनिकवरल्या हजारो वस्तू आणून त्यांनी विकल्या किंवा त्यांचे प्रदर्शन मांडले. टायटॅनिकचे अवशेष अस्ताव्यस्त तुडवले.
टायटॅनिक बुडाली तो सागरतळ कुठल्याच देशाच्या हद्दीत येत नसल्याने टायटॅनिकच्या अवशेषांची लूट थांबवणं कोणाच्याच हाती नव्हतं. परंतु या घटनेस शंभर वष्रे झाल्यामुळे टायटॅनिकचे अवशेष आता युनेस्कोच्या अधिकाराखाली येऊन यापुढे होणारी लूट, नाश, विक्री थांबणार आहे. बेकायदेशीर मालकांनी पळवलेले अवशेष गोळा करून एकत्र आणता येणे शक्य होणार आहे. युनेस्कोच्या डायरेक्टर जनरल बोकोव्हा यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘टायटॅनिक बुडण्याची घटना ही मानवतेच्या स्मरणात रुतून बसलेल्या नांगरासारखी आहे.’ टायटॅनिकचे अवशेष हे मानवी शोकांतिकेचे स्मारक आहेत.
टायटॅनिकची निर्मिती फक्त नफेखोरीसाठी झाली होती. टायटॅनिकचा अपघात निव्वळ निसर्गाबद्दलच्या अनादरापोटी, तसेच मानवी घमेंड आणि गुर्मीमुळे झाला. या संहारास कारण होणाऱ्या मानवी शोकांतिकेस सागराने कायमचं पोटात दडवलं असलं तरीही तो आक्रोश परत परत बाजारात मांडून विकण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. टायटॅनिकच्या दुर्घटनेनंतर पहिल्याच महिन्यात ‘ऑफूल टायटॅनिक डिझ्ॉस्टर’ या नावाखाली न्यूज-रील दाखवून पसे कमावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या शोकांतिकेचे गुडविल वापरून विविध भाषांतील निदान नऊ चित्रपटांनी तरी आपला गल्ला भरून घेतला. केट विन्स्लेट आणि लिओनार्दो डी’ कॅप्रिओच्या ‘टायटॅनिक’ने तर १९९७ साली सारेच रेकॉर्ड मोडले. या दुर्घटनेला आता शंभर वष्रे सरल्यानंतर अजूनही खोटय़ा, दुर्दैवी प्रेमकथांच्या चमचमीत फोडण्या देऊन टायटॅनिकच्या आक्रोशाची विक्री होतेच आहे.  या शोकांतिकेस होणाऱ्या शतकाचा मुहूर्त साधून जगात अनेक ठिकाणी भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहेत. त्यावर कोटय़वधी डॉलर्स खर्च होणार आहेत. त्यातून अब्जावधींची मिळकत होणार आहे.

बारा हजार फूट खोल सागराच्या तळाशी दडलेली टायटॅनिक पुढील ५० वर्षांत संपूर्ण गंजेल आणि तिचं पोलाद सागरतळातील मातीत मिसळून जाईल असा अंदाज आहे. त्यानंतर गंजक्या पोलादाच्या मातीत न गंजणारे अवशेष उरतील, तेवढेच! पण तेव्हाही या शोकांतिकेस दीडशे वष्रे झाल्याचा उत्सव होईलच. दगावलेल्या १५१४ जीवांची आठवण विकली जाईल, हे मेल्यानंतरही त्या मृतांची पाठ न सोडणारे दुर्दैव आणि जगभरच्या चित्रपट व प्रसारमाध्यमांची ताकद! नाहीतर दुर्घटना काय कमी घडतात? माणसं काय कमी मरतात? जहाजं काय कमी बुडतात? १९४७ साली ‘रामदास’ बोट बुडून गिरगाव-परळमधल्या सहाशेपेक्षा अधिकांना जलसमाधी मिळाली, हे खुद्द गिरगाव-परळमधल्या कितीजणांना आज ज्ञात आहे? लातूर, भोपाळ दुर्घटनाच काय, २६/११ देखील विस्मरणात जाते आहे. परेश मोकाशी नसते तर दादासाहेब फाळक्यांची आठवण कुणाला झाली असती? फाळक्यांचे घर, राजा रविवम्र्याचा प्रिंटिंग प्रेस, प्रभात स्टुडिओ अदृश्य झाला म्हणून कोणी कशाला काय वाटून घ्यायचं? पण कॅमेरॉनच्या चित्रपटात लिओनार्दो रविवर्मा झाला असता आणि केट विन्स्लेट त्याची मॉडेल झाली असती, तर जगाच्या इतिहासात राजा रविवर्मा निश्चितच अमर झाला असता!
टायटॅनिकच्या दुर्घटनेतून वाचलेली, टायटॅनिकचा मांडलेला बाजार सर्वात अधिक काळ भोगणाऱ्या इंग्लंडच्या मिल्विना डीनचे वडील टायटॅनिकसोबत खाली गेले. ती, तिचा भाऊ आणि आई यांना वाचवणारे तिचे वडील इतर अनेक दुर्दैवी प्रवाशांसोबत टायटॅनिकच्या अवशेषांत अजून कुठेतरी अडकून राहिले आहेत, ही जाणीव सोबत घेऊन ती ९७ वष्रे जगली. ती म्हणते-
"The Titanic was tragedy, which tore so many families apart. I lost my father and he lies on that wreck. I think it is disrespectful to make entertainment of such tragedy." 
(‘टायटॅनिकच्या शोकांतिकेने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली. मी माझा जन्मदाता गमावला. तो त्या अवशेषांत कुठेतरी विसावला आहे. अशा शोकांतिकेला करमणुकीचे साधन बनवणे अनादराचे आहे असे मला वाटते.’)

  अशी काही वर्षं गेली. १९८५ सालामध्ये त्या बोटीच्या अपघाताबाबत पुन्हा नव्यानं चौकशी सुरू झाली. १९९६ सालामध्ये टायटॅनिक जिथे बुडाली , त्या जागेचा शोध घेणाऱ्या तुकडीला बोटीच्या पुढच्या भागामध्ये , म्हणजे जिथे हिमनगाची धडक बसली होती तिथे , एकंदर सहा ठिकाणी पत्रा फाटलेला आढळला. तिथूनच्या पत्र्याच्या प्लेटस गायब झालेल्या होत्या. तिथूनच थंडगार पाणी प्रचंड वेगानं बोटीत घुसलं होतं. त्या प्लेटस गायब झाल्या , कारण त्यांना एकत्र धरून ठेवणारे बोल्ट (रायव्हेटस... दोन्ही बाजूंनी बोळवायचे खिळे) आपल्या जागेवरून निखळले होते. त्या धडकेसमोर ते टिकाव धरू शकले नव्हते. त्याच जागेवर पुढे असे सहा बोल्ट मिळाले. त्यांचा अभ्यास केला , तेव्हा संशोधक चकित झाले. याचं कारण त्या बोल्टमध्ये त्यांना अशुद्ध धातूची मळी मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं दिसून आलं. १९९८ सालामध्ये त्यांनी म्हणजे डॉ. फोक यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कमी दर्जाचे बोल्ट वापरल्यानं बोटीच्या प्लेटस आपल्या जागेवरून निखळल्या आणि प्रचंड वेगानं आणि दाबानं पाणी बोटीमध्ये शिरून ती बुडाली , असा निष्कर्ष जाहीर केला. परंतु हा निष्कर्ष हंगामी स्वरूपाचा आहे , असं स्पष्ट करण्यास ते विसरले नव्हते...



बुडालेल्या टायटॅनिकचे ४८ बोल्ट मिळवण्यातही या अभ्यासकांना यश आलं. त्या बोल्टची त्यांनी आधुनिक तंत्रानं तपासणी केली. त्यासाठी कम्प्युटरची आणि त्याच्या सहाय्यानं केलेल्या प्रतिमानांचीही मदत घेण्यात आली. त्या काळात इतर बोटींसाठी वापरण्यात आलेल्या बोल्टची आणि टायटॅनिकसाठी वापरलेल्या बोल्टची तुलना करण्यात आली. असं सारं केल्यावर आणि दप्तरखान्यातल्या कागदपत्रांच्या नोंदी वाचल्यावर असं दिसू लागलं की ज्यांनी टायटॅनिकची उभारणी करण्याचं काम हाती घेतलं होतं , त्यांनी उत्तम दर्जाचे बोल्ट वापरलेच नव्हते. कंपनीनं ते तयार करण्यासाठी नंबर ३चं लोखंड ऑर्डर केलं होतं. या नंबरचं लोखंड उत्तम समजलं जातं , पण नंबर ४चं लोखंड अत्युत्तम समजलं जातं आणि तेच बोटीचा नांगर , मोठाल्या साखळ्या आणि बोल्ट बनवण्यासाठी वापरलं जातं. टायटॅनिकच्या निर्मात्यांनी त्यापेक्षा हलक्या दर्जाचं लोखंड वापरलं होतं. त्यात भर म्हणून की काय पण जे कारागीर असे बोल्ट तयार करतात , तेसुद्धा हव्या त्या संख्येनं मिळू शकले नव्हते.

असे बोल्ट तयार करणं हे मोठं कौशल्याचं काम असतं. त्यासाठी वापरावयाचं लोखंड अगदी लालबुंद झालेल्या चेरीच्या फळासारखं दिसेल इतकं तापवावं लागतं आणि मग त्या लालबुंद लोखंडावर योग्य रीतीनं हातोडा चालवून बोल्ट बनवावे लागतात. हे काम सुमार दर्जाच्या कारागिराकडं गेलं , तर तयार होणाऱ्या बोल्टची गुणवत्ता कमीच असते. अशी कमी गुणवत्ता असलेले किंवा हिणकस दर्जाचे बोल्ट टायटॅनिकच्या पुढच्या आणि मागच्या भागामध्ये वापरले गेले होते , तर मधल्या भागामध्ये पोलादाचे बोल्ट वापरले होते. त्या भागावर सर्वाधिक ताण पडेल , असं गृहीत त्यामागं होतं , असंही आता कागदपत्रांतील नोंदी सांगत आहेत. त्या काळामध्ये हारलँड अँड वुल्फ या कंपनीची कनार्ड लाईन नावाची प्रतिस्पधीर् कंपनी होती आणि तिनं टायटॅनिकच्याही अगोदर काही काळ उभारलेल्या लुसियाना नावाच्या बोटीसाठी सर्वत्र अस्सल पोलाद वापरलं होतं , असंही आता उघडकीला आलं आहे. दुदैर्वानं टायटॅनिकच्या पुढच्या भागालाच हिमनगाची धडक बसली. त्याच भागामध्ये कमी दर्जाचे बोल्ट होते. ते तुटले. त्या बरोबर त्यांच्या आधारावर असलेल्या प्लेट निखळल्या... पाणी आत घुसलं. अत्युत्तम दर्जाच्या लोखंडापासून तयार केलेले बोल्ट पुढच्याच काय पण सर्वत्रच वापरले असते , तर त्या हिमनगाची धडक बसल्यानंतरही सगळेच बोल्ट तुटले नसते. काही तुटले असते , काहीच प्लेट निखळल्या असत्या. त्यामुळं ज्या वेगानं पुढच्या घटना घडल्या , तितक्या वेगानं त्या न घडता बोट कितीतरी जास्त काळ तरंगत राहिली असती. हजारोंना मिळालेली जलसमाधी टळली असती...

हा निष्कर्ष जाहीर होऊनही आता १० वर्षं झाली आणि आता नव्यानं प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये टायटॅनिक बांधणाऱ्या कंपनीच्या संचालकांनी उत्तम दर्जाचे बोल्ट वापरले नाहीत , ते तयार करण्यासाठी लागणारे उत्तम कारागिरी त्यांनी नेमले नाहीत , काम वेळेत पूर्ण करण्याच्या हट्टापायी अनेक तडजोडी केल्या , एकाचवेळी तीन बोटी बांधण्याचा पराक्रम (टायॅनिकच्याबरोबरच ऑलिम्पिक आणि ब्रिटानिका या बोटीही बांधल्या गेल्या. पैकी ऑलिम्पिक बोटीनं २४ वर्षं सेवा केली आणि मग ती निवृत्त झाली , तर ब्रिटानिका पाणसुरुंगामुळं १९१६ साली बुडाली.) करण्याच्या आकांक्षेपायी त्यांचं दर्जाकडं दुर्लक्ष झालं , असं नमूद केलं आहे. या तीनही बोटींसाठी प्रत्येकी ३० लाख बोल्टची गरज होती. संपूर्ण बोट एकसंध ठेवणारा हा घटक किती महत्त्वाचा असतो , ते वेगळं सांगायची गरज नाही. परंतु टायटॅनिकची ज्यावेळी उभरणी सुरू होती , तेव्हा या बोल्टचा तुटवडा भासत होता , असं या बोटींची उभारणी करणाऱ्या हारलँड अँड वुल्फ या कंपनीच्या दप्तरखान्यातील कागदपत्रांच्या नोंदीवरून दिसते असं आता इतिहासकार म्हणत आहेत.

या दुर्घटनेतून चांगले निष्पन्न झाले ते एवढेच, की जुने, कालबाह्य़ सागरी कायदे आणि नियम बदलले. कारण टायटॅनिकवर जे घडलं त्यात नियमबाह्य़ काहीच नव्हतं. सागरी कायद्याप्रमाणे आवश्यक होत्या त्याहून अधिक लाइफबोटी, सुविधा, तंत्रज्ञ टायटॅनिकवर होते. ती जुनाट ‘मेरीटाइम रेग्युलेशन्स’ सुधारून लाइफ- बोटींची संख्या, नियमित होणारी लाइफबोट ड्रील्स, संदेशवाहकावर चोवीस तास ठेवायचे लक्ष या साऱ्याशी संबंधित नियम अधिक कडक करण्यात आले, ज्यांचे आजतागायत नाविकांकडून पालन होत आहे. पुढेही होत राहील. टायटॅनिकच्या शोकांतिकेचे हेच खरे स्मारक.


No comments:

Post a Comment