सह्याद्रीमधील किल्ले आणि घाटवाटा यांच्या आठवणी तेथील तलाव आणि टाक्यांशी निगडीत आहेत. या किल्ल्यांची बांधणी, दरवाजे, बुरुज, कमानी, आतील इमारती, मंदिरं आणि पाण्याच्या टाक्यांची बांधणी, रचना, त्यावरील शिल्पं हे सगळं मोहात पाडतं. या
किल्ल्याची बांधणी करताना त्यावेळच्या स्थापत्यकारांनी पाषाणात दडलेल्या
पाण्याचा शोध कसा घेतला असेल आणि नेमक्या ठिकाणी पाण्याची टाकी, हौद तलाव कसे निर्माण केले असतील या विचारानं आपण अचंबित होतो.
पुण्याच्या
परिसरातले किल्ले कितीतरी. त्या सगळ्या किल्ल्यावरच्या पाण्याची मुबलकता
थक्क करणारी आहे. सिंहगडावर कितीतरी टाकी आहेत. अमृतेश्वराच्या देवळाखालचा
पाण्याचा तलाव विस्तीर्ण आहे. त्यानंतरचे दोन तलाव राजाराममहाराजांच्या
समाधीलगत आहेत. इथलं देवटाकं इतिहासप्रसिद्ध खरं, पण इतरही अगणित ठिकाणी असलेल्या टाक्यांचं पाणी तितकंच गोड आहे.
गडाच्या
तिस-या दरवाज्यातून आत गेल्यावर डावीकडे आणि उजवीकडे अशी प्रशस्त बांधीव
टाकी आहेत. उजवीकडच्या टाक्यालगत पुन्हा टाकं आहे. त्या शेजारच्या प्रशस्त
टाक्यात उतरायला दगडी पाय-याही आहेत. गडावरील रहिवासी त्यात कपडे धुतात.
डावीकडच्या एका टाक्यात रंगीत मासे आहेत. हौद म्हणावेत अशी ही टाकी आहेत.
पुरंदर
किल्ल्यावरील पाण्याची व्यवस्था अगदी आदर्श म्हणावी अशी आहे. प्रचंड
बांधीव असे पाषाणात कोरलेले तलाव हे पुरंदरचं वैशिष्टय़. यामुळेच
स्वातंत्र्योत्तर काळात तिथं ‘नॅशनल कॅडेट कोअर’चं केंद्र बरीच वर्ष होतं. वरच्या विस्तृत सपाट पठारावर परेड होत असे.
या
तलावाखेरीज खडकाच्या पोटात कोरून काढलेली टाकीही आहेत. गडावर चहा करून
प्रवाशांना देणारे विक्रेते याच लहान टाक्यातील पाणी पोह-यानं काढतात.
आम्हीदेखील गडावर गेल्यावर देवीच्या देवळात जाण्यापूर्वी हे थंड पाणी पिऊन
आणि या पाण्यानं पाय धुवून मंदिरात जातो.
पुरंदरला
केदारेश्वराचं मंदिर बरंच उंचावर आहे. किल्ल्यापासून थोडं उंचावर पठार आणि
त्याच्या एका अंगाला वर चढत गेलेली वाट मंदिराकडे जाते. माथ्यावर मात्र पाणी नाही. मात्र मधल्या टप्प्यावर पुन्हा पाण्याचे तलाव आणि टाकी आहेत. हे पाणी केवळ पावसाचं नाही. या टाक्यात खालून पाण्याचे प्रवाह वाहत आलेले आहेत. पाणी, स्वच्छ, मधुर
आणि थंड आहे. मोठय़ा तलावात मात्र थोडाफार कचरा आहे. काही तलावांच्या कडेचे
दगड फोडून त्यात तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती वाढलेल्या आहेत.
पुण्याजवळ
वेल्ह्याकडे जाताना डावीकडे राजगड हा देखणा गड दिसतो. उन्नत असा
बालेकिल्ल्याचा माथा आणि तिन्ही अंगाला बाहुप्रमाणे पसरलेल्या माच्या-
सुवेळा, पद्मावती आणि
संजीवनी. त्यांवर आणि बालेकिल्ल्यावरही पाण्याची विपुल टाकी आणि तलाव
आहेत. पद्मावतीच्या माचीवर पद्मावतीचं देऊळ आणि त्याच्या दोन्ही बाजूला
पाण्याची टाकी आहेत. शिवाय खालच्या अंगाला विस्तृत असा पद्मावती तलाव
खोदलेला आहे. याच माचीवर पाठीमागच्या खोलदरीत पाण्याचा तलाव आहे.
घोडय़ांच्या पाण्याची ती सोय होती.
शिवाजीमहाराजांनी
रायगड बांधून घेतला. तिथं त्यांचा राज्याभिषेक झाला. मराठी राज्याची
राजधानी म्हणून रायगडचा मान असला तरी त्यापूर्वीची दोन तपं महाराजांच्या
कारभाराचं मुख्य ठिकाण ‘राजगड’चा किल्लाच होतं. त्या सगळ्यांना पुरेल इतकं पाणी गडांतील या टाक्यांमध्ये आणि तलावांमध्ये असायचे. आताही आहे.
अवघड
ठिकाणी असलेल्या बालेकिल्ल्यावरही कितीतरी टाकी आहेत. तिथलं चंद्रकोरीचं
टाकं खरोखरच चंद्रकोरीच्या आकाराचं आहे. त्यालगतही इतर टाकी आहेत.
भटकंतीनं झपाटलेल्या आमच्या काळात या चंद्रकोरीच्या टाक्यांत पोहल्याचं आठवतं. पद्मावती माचीवरील पद्मावती तलावात कोणी पोहलं नाही असं होणारच नाही. केवढी मजा असते अशा पोहण्यात? उंचावरच्या तलावात पोहताना मन आणि शरीर कसं पिसासारखं हलकं होतं! पाण्याचा सुखद, थंड स्पर्श, शिरशिरी आणि तो अनुभव तुमच्या आत कुठेतरी उतरत जातो.
तोरण्याच्या बालेकिल्ल्यावर दोन-तीन टाकी आहेत; पण
कोकण दरवाज्यातून बाहेर पडलं की डुब्याकडे जाणा-या सोंडेच्या दोन्ही
अंगाला खाली कितीतरी टाकी आहेत. डुब्याच्या खाली एक मोठ्ठं चौकोनी टाकं
आहे. तर डुबा डावीकडे ठेवत पाठीमागच्या घोडेजिनाच्या बाजूलाही एक टाकं
आहे. पण ते बरंचसं बुजून गेलं होतं. आनंद पाळंदेंनी काही भटक्यांवर
जबाबदारी सोपवली की, हे बुजलेलं टाकं साफ करा. अजय ढमढेरे आणि त्याच्या दोस्त मंडळींनी ते मनावर घेतलं आणि ते टाकं साफ केलं.
तोरण्याच्या
या पाठीमागच्या पण देशाकडील बाजूला गडाबाहेर जाण्याचा एक दरवाजा आणि बुरुज
आहे. वाळूंज दरवाजा असं त्यांचं नाव. या दरवाजातून एक वाट खाली ‘भट्टी’ या
गावात उतरली आहे. वाळूंज दरवाजानं बाहेर पडलं की उजव्या अंगाला पाण्याचं
टाकं आहे. म्हणजे गडावर पाण्याची सोय केलेली आहे. वेल्हय़ांकडून तोरणा
किल्ल्यावर येणा-यांची संख्या खूप आहे. पण भट्टीवरून वाळूंज दरवाजानं
किल्ल्यावर येणारे लोक फार कमी.
भटकणं, मुख्यत: किल्ले भटकणं या नादानं जेव्हा आम्ही झपाटले गेलो होतो, तेव्हा अशा अनवट वाटांनी आम्ही खूप भटकायचो. वर
येताना वाळूंज टाक्यांतील पाण्यानं आमची तहान भागवली होती.
राजगड-तोरण्याला जोडणा-या डोंगरधारेनं जाताना आपण राजगडच्या संजीवनी
माचीकडून बाहेर पडतो. तेव्हाही पाणी भरून घ्यावं लागतं. संजीवनी माचीवर
ओळीनं पाण्याची टाकी आहेत. आता काही टाकी खालून फुटली आहेत. क्वचित
एखाद्या टाक्यात एकादा बेडूक किंवा मेलेला पक्षी पडलेला असतो; पण
असा अपवाद वगळता आभाळाखालची ही टाकी थंड पाण्याची तहान भागवतात. त्या
आठ-नऊ कि.मी.च्या डोंगरधारेवर एक-दोन ठिकाणी वाहतं पाणी मिळतं.
कमाल वाटते ती हरिश्चंद्रगडावरील पाण्याची. कोण होता याचा स्थापत्यविशारद? केवढी योजकता, केवढी कल्पकता त्यानं या गडावर दाखवली आहे! हरिश्चंद्रगड नवलाचाच आहे. गडाचा विस्तार प्रचंड आहे. वर सपाटी तशी कमी आहे. सगळा भाग उंचसखल. त्यावर लहान दऱ्या, खोंगळी, उंचवटे, शिखर, कडे, कपा-या, गुहा. गडाच्या मधल्या खोलगटीत हरिश्चंद्रेश्वराचं देखणं मंदिर आहे. त्याच्या पुढे एक घळ डाव्या अंगाला पायनईच्या बाजूला उतरत गेली आहे. मंदिराच्या उजवीकडे हरिश्चंद्र
आणि तारामतीची शिखरं आहेत. तारामतीच्या शिखराच्या आतल्या अंगाला कातळातून
काढलेल्या काही गुहा आहेत. ब-याचशा नैसर्गिक शिखराच्या उंचीवरून पडणारं
पावसाचं पाणी मंदिरापुढच्या खोलगटीत वाहत जातं. ही लहान कुडी मंगळगंगा नदी
अशी गडावर उगम पावते.
हरिश्चंद्रेश्वराचं
मंदिर काळ्या पाषणातून बांधून झाल्यावर रचनाकारानं मंदिराच्या पुढय़ातील
खोलगटही नीट दगडानं बांधून घेतली. मंगळगंगा नदीचा प्रवाह त्या लहान दगडी
कालव्यांतून पुढे डावीकडे वाहत जाऊन दगडांवरून उडी मारून पाचनइकडे जातो.
मंदिराला शिखर आहे आणि चारींबाजूनं दगडी भिंतही. विशेष म्हणजे मंदिराच्या
अंगणातच बाहेरच्या भिंतीच्या आतल्या अंगाला काही गुहा आहेत. त्यांच्या
बाहेरच्या अंगाला लागूनच कातळ कोरून काढलेली पाण्याची टाकी आहेत.
कातळाच्या आतल्या अंगाला असल्यानं दगडी छताखाली पाणी आहे. डोळे आणि तृष्णा
एकाच वेळी तृप्त करणारं! शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक धरायला लांब
जायला नको. देवळालगतच पाण्याची सोय.
हरिश्चंद्र गडावर गर्दी नसायची तेव्हा आम्ही देवळामागच्या मोठय़ा गुहेत झोपायचो. पाणी अगदी पायाशीच असायचं. गर्दी खूप असली की, तारामती
शिखराच्या आतल्या अंगाला असलेल्या मोठय़ा गुहांमधून भटके झोपतात. त्याही
गुहांपुढे पाण्याची टाकी आहेत. पाऊसकाळ संपल्यानंतरही
डिसें.-जानेवारीपर्यंत हरिश्चंद्र गडावरून पाण्याचे प्रवाह वाहत असतात.
मंदिराच्या
डाव्या उताराच्या अंगाला दोन गुहा आहेत. एका गुहेत कमरेइतकं पाणी भरलेलं
आहे आणि गुहेच्या मधोमध पाण्यामध्ये शंकराची पिंडी आहे. तिचा निम्मा भाग
पाण्यात आहे. पिंडीभोवती पाण्यातूनच प्रदक्षिणा घालावी लागते. आपल्या
कंठांत हलाहल धारण करणाऱ्या शंकराला गारवा लाभावा म्हणून त्यावर अभिषेक
धरतात. इथं तर शंकराची पिंडींच चक्क पाण्यात! शंकराला इथला निवास नक्कीच
प्रिय असणार. मंदिराच्या पुढय़ात जरा उंचावर एका अंगाला पाण्याची पुष्करणी
आहे. तिथं स्नान करून वा पाय धुवून मंदिरात जायचं. पाणी असं किती अंगानं
इथं भेटतं.
खडकाच्या
पोटात खांब खोदून आतल्या अंगाला असलेली पाण्याची टाकीही बऱ्याच किल्ल्यावर
आहेत. शिवनेरीवर गंगा-जमुना अशी दोन टाकी आहेत. किल्ल्यावर त्यांचंच पाणी
प्यायलं जातं. त्यातून पाईपलाईन टाकून पाणी किल्ल्यावर नेलं आहे.
पुरंदरवरही तशी सोय केलेली आहे. राजमाचीवर मनोरंजन-श्रीवर्धन असे दोन
आवळेजावळे किल्ले आहेत. मनोरंजन किल्ल्याच्या पायथ्यालाच उढेवाडीची महादेव
कोळी आणि काही कुणबी अशी वस्ती आहे. मनोरंजन किल्ल्यावर पाण्याचा प्रशस्त
तलाव आहे. त्यातून पाईप टाकून ‘सायफन’ तंत्रानं पाणी मनोरंजन किल्ल्याच्या पायथ्यालगत असलेल्या खोदीव टाक्यांत सोडलेलं आहे. आता उढेवाडीत पाणीयोजना झाली; पण त्या पूर्वी पाण्याचा मुख्य स्रोत किल्ल्यावरचं पाणी हाच होता.
श्रीवर्धन किल्ल्यावरही पाण्याची मोठी टाकी आहेत; पण पूर्वीइतकी त्याची धारणक्षमता राहिलेली नाही. उढेवाडीच्या पठारावर गावापासून अध्र्या कि.मी.वर ‘उदय सागर’ हा
पेशवेकालीन पाण्याचा तलाव आहे. त्याकाठी शंकराचं मंदिर आहे. बरंचसं मातीत
गाडलेलं होतं ते! गो.नी. दांडेकरांचा राजमाचीवर फार लोभ होता. त्यांनी
गावक-यांकडून ते माती उकरून बाहेर काढलं.
एका
भ्रमंतीत आमचा मुक्काम एक रात्र कर्नाळा किल्ल्यावर होता. इथं सुळक्याच्या
पोटात ब-याच गुहा आणि टाकी आहेत. एका टाक्याच्या पायरीवर बसून बोलता-बोलता
अनवधानानं मी टाक्यात पडले होते. आमच्या डोंगरभाऊंना पुढे हसायला कित्येक
दिवस हा विषय पुरला होता!
चावंड हा खरं तर लहान किल्ला; पण
जुन्नरजवळच्या या किल्ल्यावर सात टाक्यांचा समूह आहे. सगळ्यांमध्ये पाणी.
एका टाक्यावर कमान व गणेशपट्टी कोरलेली आहे. त्यातून जाऊन टाक्यातल्या
पाण्यात डुंबायला मोठी मजा येते. चावंड, हडसर, जीवधन ही दुर्गत्रयी जुन्नर परिसरातली. तिन्ही ठिकाणी पाण्याची टाकी आहेत. याच परिसरातून कोकणात उतरणारी घाटवाट, ‘नाणेघाट’ आहे.
सातवाहन राजवटीतील राणीनं हा घाट खोदला. या घाटवाटेनं जाणा-या व कोकणातून
देशावर येणा-या व्यापा-यांच्या तांडय़ांसाठी नाणेघाटात ऐसपैस गुहा खोदली.
शिलालेखही खोदून घेतला. पांथस्थांसाठी गुहेलगत कातळामध्ये पाण्याचे हौद
खोदले. घाटाच्या माथ्यावर गणेशमूर्ती स्थापन केली. एका बाजूला रांजण
ठेवला. त्याला जकातीचा रांजण म्हणतात. गणेश मूर्तीपाशी पुन्हा पाण्याचं एक
टाकं आहे. कोकणातून देशावर माल घेऊन येणा-या-जाणा-या लमाणांच्या तांडय़ाला
या पाण्याचा केवढा आधार वाटत असणार!
रायगड जेव्हा शिवाजीमहाराजांनी बांधून घेतला, तेव्हा खाणीतून खोदलेला दगड किल्ल्यावरील इतर इमारतींच्या बांधकामासाठी वापरला. आणि त्या खाणीचं रूपांतर मोठय़ा तलावात केलं. ‘गंगासागर’ नावानं
प्रसिद्ध असलेला हा तलाव रायगडावरील पाण्याचा मुख्य स्रोत आहे. याशिवाही
गडावर तलाव आणि टाकी आहेतच. हे राजधानीचं ठिकाण असल्यानं तिथं पाण्याची
उपलब्धता असणं गरजेचं होतंच. त्याचा संपूर्ण विचार त्यावेळच्या
स्थापत्यविशारदांनी कसा केला असेल?
हरिश्चंद्र गडावरून मळगंगेचा प्रवाह निर्माण झाला, तर ‘प्रवरा’ नदीचा
उगम रतनगडच्या किल्ल्यावर झाला. अहमदनगर जिल्हय़ातील भंडारदरा धरणाच्या
परिसरातील हा जुना किल्ला. याच्या मुख्य डोंगरकण्याच्या पोटामध्ये तुडुंब
भरलेलं टाकं आहे. नदीचा उगम तिथूनच होत असल्यानं त्याला ‘प्रवराकुंड’ म्हणतात. इथून बाहेर पडणारी धार गडाच्या अंगावरून लगेचच खाली उतरते. तीच ‘प्रवरा’ नदी. तिच्यावर ब्रिटिशांना भंडारदरा धरण बांधलं. ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते.
अलंग-कुलंग-मंडण ही दुर्गत्रयी आणि याच पंक्तीत बसणारा हरिश्चंद्रगड
हे भटक्यांचं नंदनवन. ही त्रयी अहमदनगरच्या घाटकर जवळ आहे. त्या भागातले
ते अनभिषिक्त सम्राटच आहेत. या किल्ल्यांवर खोदलेली टाकी पाहून नवल वाटतं.
अलंग-कुलंगवर 10-11 टाक्यांचा समूह आहे. सगळ्यांमधून पाणी. मंडणवर मात्र
टाक्यांची संख्या तुलनेनं कमी आहे. या तिन्ही ठिकाणची टाकी आकारानं साधारण
आयताकृती आणि मोठी आहेत.
आज आपण रेनवॉटर हार्वेस्टिंगचे तंत्र वापरतो; पण आपल्या पूर्वजांनी ते कधीच किल्ल्यांवर राबवलं. पाणी कुठे सापडेल, याचा अचूक अंदाज घेऊन टाकी खोदली. त्याचा दगड बांधकामाला, बांधबंदिस्तीला वापरला. काही ठिकाणी भूगर्भातील पाण्याचे प्रवाह मिळाले. शिवाय पावसाचं पाणी त्यात साठवता येऊ लागलं.
शिवाजीमहाराजांच्या
युद्धतंत्रांत किल्ल्यांचं महत्त्व फार मोठं होतं. त्याचं अविभाज्य अंग
म्हणजे किल्यांवरील पाणी. प्राचीन काळात दुर्गम डोंगर-दऱ्यांतून प्रवासाची
आधुनिक साधनं नव्हती. बैल, घोडा, नाही
तर पायी चालणं. अवघड घाटवाटांवरून तर फक्त पायीच प्रवास शक्य होता. अशा
वेळी इतर मानव आणि मानवेतर जीवसृष्टीसाठी कातळ खोदून पाण्याची सोय त्यांनी
केली. हे लोक महामानवच होते, असं म्हणावं लागेल.
No comments:
Post a Comment