Wednesday, 1 February 2012

बटाट्याच्या चाळ - उपास [पु.ल.देशपांडे]

उपास 

बटाट्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली! एच्च0 मंगेशराव हे चाळीतले संगीतज्ञ; परंतु त्यांना कुठल्या चिजांचे अंतरे येत नाहीत हे एरवी 'गाणे संपले' एवढेच गाण्यतले कळणा-या राघूनांनादेखील ठाऊक. बाबलीबाईंच्या पाटल्या गहाण पडल्याची गोष्ट गहाणखतावरची शाई वाळण्यापूर्वी सर्वांच्या तोंडी झाली. आणि रतन समेळ (न्यू गजकर्ण फार्मसीच्या समेळकाकांची मुलगी) हिने द्वारकानाथ गुप्तांच्या मधूला लिहीलेले प्रेमपत्र मधूच्या हातात पडण्यापूर्वी काशीनाथ नाडकर्ण्यांच्या मुलाने गॅलरीत उभे राहून परवचा म्हणतात तसे खाडखाड म्हणून दाखवले! सगळे बहीर्जीचे वंशज नाना जातींत आणि पोटजातींत जन्मून बटाट्याची चाळीत वस्तीला आल्यासारखे आले आहेत. वासविक माझ्या उपासाचा निश्र्चय मी आधी माझ्या' मना सज्जना 'खेरीज 'येरा कोणा'लाही सांगितला नव्हता. पण उपासाला सुरवात करून पुरे चार तास लोटले नाहीत तो वर्दळ सुरू झाली.

"पतं--(मला मंडळी उगीचच पंत म्हणतात. वास्तविक म्हणतात. वास्तविक 'पंत' वाटावे असे माझ्या काही नाही. चांगला टेलिफोन ऑपरटेर आहे मी. हं, आता आपल्याला बूटपॅंट आवडत नाही हे खरे, पण म्हणून काय 'पंत'?) पंत, हा काय साला म्याडनेस!" अशा थाटात सोकाजी त्रिलोकेकरांनी सुरूवात केली, "तुम्हाला काय वाटतं? साला तुमचा बॉस अशी करून लिव्ह सॅंक्शन करील?"

"पण माझं ऎका--" मी चार तासांच्या उपासानंतर क्षीण होत चाललेल्या माझ्या आवाजात सोकाजीनानांची समजूत घालू लागलो. पण नाही! सोकाजी मला 'सर्मन' देण्याचा चंग बांधून आले होते!

"माय गुड फ्रेंड-- साले फास्टनी काय होतं?.. हा तर मुळी बॉसला कन्विस करण्याचा वे~च नाय! लिसन -- तुम्हाला पायजे तर सिक नोट देतो. माझे कझिनचा साला एम. डी हाय. यू बिल गेट ऍज मच लिव--बट साला उपास काय?"

"पण माझं ऎका--"

"अरे काय ऎका? तू काय सांगणार? धिस इज हबंग!"

चारपाच तासांच्या उपासाने माझी अशक्ततता कणकण वाढत होती आणि इथे सोकाजीनानांना जोर चढत होता.

"साला लिसन--तू जेवून घे बंर. साला सोन्यासारखा संडे हाय--आज फीश काय मिळाली होती. पण तू उपासबिपास नको करू!"

साधारण दिड तास त्रिलोकेकर बडबडून गेले आणि चाळीतले नाट्यभैरव कुशाभाऊ आले. त्यांनी तर 'एकच प्याला' तल्या 'सुधाकर, तुम्ही आमचे पाठचे भाऊ. आम्ही तुम्हांला सांगु नये; पण तुम्ही दारु सोडा!' ह्या चालीवर सुरुवात केली.

"पंत- (इथे कुशाभाऊंनी माझ्या पाटीवरुन हातही फिरवला.) पंत, ऎका माझं. दोन घास खाऊन घ्या." (ह्या वाक्याने काही अत्यंत सुतकी संकेत माझ्या मनात डॊकावले!)

"अहो पण--"

पण नाही नि परंतु नाही. पंत, आपण चाळीत इतकी वर्षे राहिलो ते भावाभावांसारखे. आमची ही आताच म्हणाली, की तुम्ही उपवास सुरू केला आहे, जेवत होतो , तसाच उठुन आलो! नाही, पंत--तुम्ही जेवायचं नाही, तर कुणी? पंत, ऎका माझं. बाबा बर्व्याच्या नारुची मुंज आठवा . विस वर्षे होऊन गेली. पंचावन्न जिलब्या उठवल्या होत्या ना तुम्ही?" इथल्या 'तुम्ही' वर कुशाभाऊने एक हुंदका देखील काढला. कुशाभाऊंचा तो कळवळा पाहून आमच्या कुटुंबाने आत डोळे पुसले. "ते काही नाही पंत, तुम्ही जेवंल पाहीजे--- उपासानं काय होणार" अहो जनोबा रेग्याचं बोलणं एवढं काय मनावर घेता?"

"जनोबाचा काय संबंध?"माझे हे वाक्य पुरे व्हायच्या आतच नाटकातल्यासारखा "काय संबंध!" एवढेच शब्द उच्चारून कुशाभाउ नाट्यभैरवाने एक प्रदीर्घ उसासा टाकला.

"कळल्या आहेत, कळल्या आहेत मला सा-या गोष्टी! टमरेलची चोरी ती काय! अरे, जाताना बरोबर थोडीच न्यायची आहे आपल्याला ही चीजवस्तु ? सांर इथंच टाकून जायंच आहे बंर!"--कुशाभाऊ

"टमरेल?"

"पंत उजाडल्यावर टमरेल--नाही टमारेल उजाडल्यावर कोंबडं झाकलं काय उजाडल्या राहतंय थोडचं ! तिन दमडीचं टमरेल ते काय आणि त्याच्या चोरीचा आळ तुमच्यावर?"

"चोरी?" मला काही कळेना.

"पंत, तुम्ही नका कष्ट करुन घेऊ. मी जनोबापुढं शभंर टमरेलं भरून ठेवतो. वापर म्हणांव दिवसभर, पण पंत, तुम्ही हा उपासाचा नाद सोडा---ही अन्नब्र्म्हाची उपेक्षा आहे, पंत."

"मला काही ऎकायचं नाही नि बोलायचं नाही. मला फक्त एकच पाहायचं आहे ते तुम्हांला भरपूर जेवताना. पंत, सोडा हा नाद --नाही हो, अंतःकरण पिळवटुन सांगतो मी तुम्हांला. नका, पंत, नका ह्या उपासापोटी आपल्या प्रकृतीचा सत्यानाश करू!"

कुशाभाऊंना आवरणे मुश्किल झाले. शेवटी त्यांच्या गेल्याच आठवद्यात झालेल्या एका नाटकाबद्दल मी बोललो तेव्हा गाडीने रूळ बदलले. पण ते किती,अगदी थोडा वेळ, आणि गाडी पुन्हा मेनलाइनवर आली!

"नका--नका हो पंत, असं करू!""अहो , काय करतोय मी!"

"कळतंय मला--तिळतीळ तुटतं माझं आतडं! पण पंत, सोडा हा अविचार!"

आता मात्र मला काय बोलावे ते सुचेना. मी डोळे मिटून स्वस्थ बसलो. नाट्यभैरव कुशाभाऊ सुमारे पाऊण तास माझे अक्षरही ऎकून न घेता बडबडत होता.बाकी कुशाभाऊची ही तारीफ आहे. नाटकातदेखील उत्साहाच्या भरात त्याने स्वतःचे, स्वतःच्या नोकराचे, आणि 'पडद्यात गलबला' ही सगळी भाषणे एकट्याने केली होती. रंगभूमीच्या दुस-या कोण्त्याही सेवकाला टिकू म्हणून द्यायचे नाही हा त्याचा संकल्प असल्यासारखा तो वागतो. चाळीतले गडी जसे दुस-या गड्याला 'टिकू' देत नाहीत त्यातलाच प्रकार! नाट्यभैरव कुशाभाऊंच्या भीमदेवी भाषणाने सा-या चाळीला माझ्या उपासाची वार्ता पोचली! आणि बि-हाडात हळूहळु, पावले न वाजवता, मंडळी गोळा होऊ लागली. मी तोंड उघडले की सर्व जण एकमुखाने "तुम्ही बोलू नका--तुम्हांला त्रास होईल!" अशांसारखे उद्गार काळजीयुक्त स्वरात काढायचे. आचार्य बाबा बर्व्याखेरीज सर्व शेजारी जमले.

तळमजल्यावरच्या किराणा-भुसार मालाचा व्यापारी शा चापशीतेखील आला!

"असा कोणी अपासबापास करायला शरुवात केला म्हणजी आमाला तो लय धास्ती वाटते. आमची कच्छमदी ते एक रावळबाप्पा होता-- असाच अपास करून मरून गेला. पंत अपास नाय कर तू--आमाला धास्ती वाटते!"

"बरोबर आहे --- सगळ्यांनी उपास करायचं तर ह्यांच दुकान कसं चालणार?" काशीनाथ नाडकर्ण्याच्या कानात जनोबा रेगे कुजबुजले. माझ्या उपासाचे एक सोडा, पण जनोबा कुठल्याच प्रसंगाचे गांभीर्य कळत नाही!

मी स्वस्थ डोळे-मिटून पडलो होतो. बाकी त्याखेरीज मी काहीच करू शकत नव्हतो. मंडळी त-हे त-हेच्या मुद्रा करून माझ्याकडे पाहत होती. लहान मुले खिडक्यांच्या गजांतून आळीपाळीने डोकावत होती.

"चिंत्याचे बाबा मरणार का रे चंदू?" कुठलेसे कारटे तेवढ्याच माझ्या जिवावरदेखील उठले! परस्पर त्याच्या पाठीत कोणीतरी धपका घातल्याचे मी ऎकले.

आत येणारा प्रत्येक जण "पंताना स्वस्थ पडु द्या--" असे सांगत होता, आणि आपण स्वतःच आमच्या खोलीत गर्दी करीत होता. माझ्या पाकीटातले सगळे 'पिवळे हत्ती' चौकशीला आलेल्या मंडळींनी संपवले होते. सुपा-या लांबवल्या होत्या. तबकात फक्त 'देठ, लवंगा, साली' शिल्लक होत्या. मी काहीही बोलायला तोंड उघडले की ",पंत, नका. तुम्ही स्वस्थ पडा!" असा एकमुखाने आवाज उठायचा! तेवढ्याच कुणीतरी माझ्या उशाशी उदबत्तीदेखील आणून लावली!

शेवटी अगदी कळवळून मी ओरडलो, "अहो, असं काही नाही. मी जो हा उपास सुरू केला आहे--"

"तो सोडा, पंत सोडा, सोडा!" नाट्यभैरव कुशाभाऊला नाटकात दुस-याची वाक्ये तोडायची इतकी भंयकर खॊड की
'भाऊबंदकी' त राघोबाचे काम करताना रामशाश्र्याच्या पार्ट्याने 'देहान्त प्रायश्रित्ता'तला 'देहान्त'म्हटल्यावर "प्रायश्रित्तावाचून गत्यंतर नाही!" हे न्यायधीशाचे उरलेले वाक्य आपण राघोबा आहोत हे विसरून त्याने स्वतःच म्हणून टाकले होते!

माझ्या भोवतालची गर्दी ह्ळूहळू वाढत होती. आमचे कुटूंबदेखील वस्तादच.आत जमलेल्या बायकांना काय काय सांगत होते परमेश्र्वर जाणे! स्वयंपाकघरातून बाहेर पडणारी प्रत्येक बाई 'हे या महाभागाचं आता अखेरचंच दर्शन!' असा चेहरा करून माझ्याकडे पाहायची आणि बाहेर पदायची. एरवी कुठल्याही बाईने माझ्याकडे वर डोळा करून पाहील्याचे मला आठवत नाही. उपासाचे निराळे निराळे म्हणतात ते 'तेज' इतक्या लवकर तोंडावर चढत असेल याची मला कल्पनाही नव्हती! ह्या सा-या जमावातून माझी सुटका करायला गजेंद्रमोक्षाच्या वेळी साक्षात श्रीविष्णू धावत आले तसे एच० मंगेशराव सोबत तबला आणि आपल्या सुस्वर पत्नी वरदाबाई यांना घेऊन आले. वरदाबाईंच्या हातात तंबोरा होता.

"पंत, येकट डिवोशनल सॉंग म्हणायचं इच्छा आहे--" अशी प्रस्तावना करून माझ्या कॉटच्या पायथ्याशी मंगेशरावांनी सपत्नीक तळ ठोकला व वरदाबाईंनी मीराबाईच्या 'तूमबिन मोरी' त तोंड घातले. वरदाबाई 'गोवरधन गिरीधारी' पर्यंत पोचल्याही नसतील. इतक्यात सोटाछाप मलमातल्या जाहीरातीत जसे 'उंदरास पाहून मांजर' न्यायाने रोग पळतात तसे आमचे सारे शेजारी पळाले! खोलीत फक्त मी आणि हट्टंगडी कुटूंबाचे संगीत एवढीच शिल्लक राहीलो. वरदाबाईंच्या स्वरातले आणि त्याहूनही एच्च० मंगेशकरावांच्या तबल्यातले सामर्थ्य त्या वेळी मला ख-या अर्थाने प्रतीत झाले! 'खडी सभामें द्रौपधी ठाडी- राखो लाज (वरदाबाई 'राकौ लाज्ज' म्हणत होत्या) अमारी' म्हणताना वरदाबाई असा एकेक सूर लावीत होत्या आणि
मंगेशराव तबल्यावर अशा काही करामती करीत होते, की एखाद्या वेळी गोवर्धनगिरिधारी माझ्या उपासाची 'खबर' घ्यायला ख्ररोखरीच येईल की काय अशी धास्ती मला वाटायला लागली! माझ्या पोटात विलक्षण कालवाकालव सुरू झाली. (ती त्या संगीतामुळे होती की भुकेमुळे होती हे अजुनही मला उमगलेले नाही.) हट्टंगडी दंपतीचे संगीत केव्हा संपले कोण जाणे, मी जागा झालो त्या वेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते.

पहिल्या दिवसाच्या उपवासात मी फक्त कॉफी, कॆळी, एक अंडे (उकडून), दोन संत्री, भुईमूगदाणे आणि भुईमूगदाण्यांनी पित्त होऊ नये म्हणून लिंबाचा रस, कॉफीने मला बद्दकोष्ठ होतो म्हणून दूध आणि दुध पचायला जड जाऊ नये म्हणून काळ्या
मनुका आणि दोन चमचे मध एवढ्यावरच भागवले.

दुस-या दिवशी सकाळी उठल्याबरोबर चाळीतले एकमेव साहित्यिक म्हाळसाकांत पोंबुर्पेकर यांनी 'चाळकरी' ह्या चाळीतल्या हस्तलिखित मुखपत्राचा अंक आणून, एखाद्या राज्याच्या सनदा अर्पण कराव्या अश्या नम्रतेने माझ्या हातात दिला.

"पंत, उपोषण-विशेषांक आहे." पोंबुर्पेकर म्हणाला.

वास्तवीक 'चाळकरी' दैनिकाच्या साधा अंक अजून निघालाच नाही. प्रत्येक अंक हा विशेषांकच असतो. आज उपोषण-विशेषांक, कालचा स्वच्छता-विशेषांक, त्यापुर्वी चाळपुनर्रचनासमीति-विशेषांक (गच्चीपुरवणीसकट), एकदा भय्या-विशेषांक,
दुस-यांदा भाडे-विशेषांक, नळ-विशेषांक---असे विशेषांकावर विशेषांक काढायची ह्या पोंबुर्प्याला खोडच आहे! त्यामुळे त्याच्या उपोषण-विशेषांकाचे मला विशेष काही वाटले नाही. अंकावरील ठळक मथळा पाहून मात्र मी स्तंभीत झालो:

"चाळीय ऎक्यासाठी पंतांचे आमरण उपोषण"

"पोंबुर्पेकर--" मी अठरा तासांच्या उपोषणानंतर शरीरात उरलेले सारे त्राण (महीन्याच्या शेवटी बि-हाडातल्या फणीकरंड्याच्या पेटीपासून ते रावळीपर्यंतच्या दिडक्या-आणेल्या एकवटून अखंड रुपया जमवतो त्याप्रमाणे) एकवटून ओरडलो. माझ्या ओरडण्याने पोंबुर्पेकर तिळमात्र हलला नाही. त्याच्या प्रत्येक अंकानंतर कोणी ना कोणी त्याच्यावर असेच ओरडतो!

"काय?" शांतपणे तो विचारता झाला.

"कुठल्या गाढवानं सांगीतलं, की मी चाळीय ऎक्यासाठी उपोषण करतो आहे म्हणून?"

"सगळे जण असंच म्हणताहेत--" पोंबुर्पेकर उद्गारला.

"मग सगळे जण गाढव आहेत!" मी म्हणालो. इटंरला मी लॉजिक घेतले होते; त्यामुळे दोन प्रमेयांतून हा सिद्धांत सटकन बाहेर पडला आणि पोंबुर्पेकर चूप झाला.

"माझा हा उपास अगदी खाजगी स्वरुपाचा आहे. त्याचा चाळीशी काय
संबंध?"

"असं कसं? समेळाकाका म्हणाले, की चाळीतल्या जातीयतेविरूद्ध तुम्ही हे उपासांच शस्र उगारलंत!"

"समेळकाका गेला खड्ड्यात!"--मी.

"ठीक आहे. पावशे म्हणाले, की हेडक्लार्कनं तुमची लिव्ह सॅक्शन केली नाही म्हणून कारकुनांच्या दुःखांना तोंड फोडण्यासाठी तुम्ही हा उपास म्हणुन तुम्ही उपास केला--"

"पावशे गेला मसणात!"---मी

"ठीक आहे. नाट्यभैरव कुशाभाऊ म्हणतो, की जनोबा रेग्यांनी त्यांचं टमरेल चोरण्याचा आरोप केला, म्हणून त्यांच्या मनाची शुद्धी व्हावी म्हणून तुम्ही उपास केला--"

"जनोबा गेला--" वरच्या दोन वाक्यांत खड्डा आणि मसण ह्या जागा भरल्यामुळे जनोबाला कुठे पाठवावे हे मला सुचेना! त्यामुळे जनोबा गेला "ह्यात", असे म्हणून मी सर्वनामावरच भागवले. परंतु पोंबुर्प्यावर परिणाम झाला नव्हता. रेफ्रिजरेटरमध्ये मेंदू ठेवल्यासारखा तो वागत होता.

"ठीक आहे! उद्याचा अंकात तुमचा खुलासा प्रसिद्ध करू."

"काही गरज नाही. माझ्या उपासाशी चाळीचा काहे संबंध नाही."

"मग कशाशी संबंध आहे?" पोंबुर्पेकर म्हणाला.

"माझं वजन उतरवण्याशी!"

"ऑं?"

"हो!"

"पण उपास हा समाजात आपलं वजन वाढवण्यासाठी करतात ना?"

"मला ठाऊक नाही. हे पाहा--" मी खण उघडून वजनाचे कार्ड त्याच्या डोळ्यांपुढे नाचवीत म्हटले, "वाचा!"

"आप बहूत समझदार है!" पोंबुर्पेकर वाचू लागला.

"ते काय वाचता? वजन वाचा-- हे पाहा,बारा स्टोन आणि तेरा पाउंड."

"फक्त तेरा पाउंड वजन तुमचं पंत--"

"आणि 'बारा स्टोन' वाचलं ते काय बारा गुणिले चौदा म्हणजे किती?"

"किती?" पोंबुर्पेकर.

"किती?"--मी.

"किती?"--पोंबुर्पेकर

"किती?"--मी.

"किती?"--- पोंबुर्पेकर.

"किती-किती काय करता? चौदा गुणिले बारा--चौदं बारे?"

"चौदं दाहे चाळाशे--म्हणजे चाळीस--"

"ऎकशॆ चाळीस ! अधिक चौदा दुणे अठ्ठाविस, म्हणजे किती झाले?"

"हो!"

"हो काय?"--एकशेअड्डूसष्ट अधिक तेरा म्हणजे एकशे एक्यायशी पाउंड!"

"कुणाचं वजन आहे हे?" पोंबुर्पेकर तोच थंडपणा चालू ठेवून म्हणाला.

"तुझ्या बापांच! मला दुस-याची वजनं करायची आहेत काय? हे माझं वजन आहे."

"असेल!"

"असेल नाही--आहे! आता सांग, माझ्या वजनाशी चाळीचा काय संबंध? एकशे एक्यायशी पौंड वजन झालं माझं--ह्यातून उद्या मला मधुमेह होणार- ब्लडप्रेशर होईल, हार्ट ट्रबल होईल! मेलो पटकन तर चाळ येणार आहे का मदतीला?"

"का नाही येणार?" पोंबुर्पेकर म्हणाला, "पावश्यांची आजी वारली तेव्हा--"

"बाहेर हो!" त्याच्या थंडपणाचा कळस झाला होता.

"रागावू नका पंत. पण हे तुम्ही आधी का नाही लोकांना सांगितलं?"

"पण तुम्ही माझं ऎकाल तर ना!"

हळूहळू माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्यी माझ्या कानांवर येऊ लागली.
पण मी कोणत्याही टिकेला भीक घालणार नव्हतो!

'ऎकशे एक्यायशी पौंड'! रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वन्न कमी झाले पाहिजे, ह्या विचाराने माझी झोप उडाली! झोप कमी झाली तर वजन उतरते ह्या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही ह्यावर माझ्या धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. "घोरत तर असता रात्रभर!" अशासारखी दुरत्तरे मला करीत असे.

"दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!" अशी भिष्मप्रतीज्ञा करून मी आहारशास्रावरच्या पुस्तकांत डॊके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्क्त द्र्व्ये, वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. सा-या
ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्याच 'कॅलरीज' मला दिसू लगल्या आणि आनंदाची गोष्ट अशी की, वजन उतरविण्याच्या शास्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनावारीने भेटू लागले. इतकेच्काय, परंतू ज्याअ आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ, सोकजी त्रिलोकेकर--

"तुला सांगतो मी पंत, डाएट कर साला बटाटा सोड! बटाट्यांच नाव काढू नकोस!"

"हो! ,म्हणजे 'कुठं राहता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा! 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खीः खीः खीः!"

जनोबा रेगे ह्या इसमला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय!

पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. "ए ईडियट! सगळ्याच गोष्टींत जोक कय मारतोस नेमी? मी सांगतो तुला पंत--तू बटाटा सोड."

मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरु झाली.

"बटाट्याचं ठिक आहे; पण पतं आधी भात सोडा!"-एक सल्ला.

"भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळी सोडा!"--काशीनाथ नाडकर्णी.

"मुख्य म्हणजे साखर सोडा!"

"मी सांगू का? मीठ सोडा!"

"लोणी-तूप सोडा--एका आठवड्यात दहा पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाइफचं घटलं."

"तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा!"--बाबुकाका.

"स्मोकिंग सोडा."

"दिवसा झोपणं सोडा."

"खरं म्हणजे पत्ते खेळायंच सोडा! बसून बसून वजन वाढतं."

आणि सगळ्यात कहर म्हणजे भाईसाहेब चौबळ म्हणाले, "पंत, नोकरी सोडा!"

"काय, म्हणता काय?"

"उगीच सांगत नाही. दिवसभर खुर्चीवर बसून बसून वजन वाढत राहतं. फिरतीची नोकरी बघा!"

काही धुर्त लोकांनी मला 'मुंबई सोडा' असाही उपदेश केला. हा उपदेश माझ्या वजनाकडे पाहून केला नसून चाळीतल्या दोन खोल्यांच्या जागेकडे पाहून केला होता, हे न कळण्याइतका मी काही 'हा' नव्हतो! फक्त 'बायको सोडा' एवढे सांगणारा
महाभाग भेटायचा राहीला होता. एकाने भर ट्राममध्ये मला 'धोतर सोडा' असे सांगून, तिकीट वगैरे घेतल्यावर, 'आणि पॅंट वापरायला सुरुवात करा म्हणजे पटटा बांधून पोट आवळता येईल!" असा उत्तरार्ध पुरा केला होता.

मी मात्र ह्य सर्व जनांचे ऎकून मनाचे करायाचे ठरविले होते. पहीला उपाय म्हणून तीनचार निरनिराळ्या काट्यांवर वजन करून पाहिले. प्रत्येक ठिकाणी निरनिराळे वजन आले; परंतु एकशे एक्यायशीच्या खाली जायला कोणताही काटा तयार नव्हता. शेवटी रेल्वे-पार्सल-हपिसातल्या काट्यावर हूंडेक-याच्या वशिल्याने मी उभा राहिलो; आणि शेरा-मणाच्या बंगाली मण, देशी मण ह्या भानगडींत माझे वजन कधी शंभर पौंडांखाली तर कधी दोनशे पौंडांवर असे बदलू लागले. तिकिटवाल्या काट्यात तर वजनाबरोबर भविष्य़ेही बदलत होती. एका तिकीटावर मी स्वभावाने धूर्त, आपमतलबी आहे असे छापले होते, तर दुस-यावर माझ्याइतका साधा माणूस 'दुनिया में क्वचितही मिलेगा' असे वार्तिक होते. एका काट्याने माझे वजन दोनशे तीन पौंड दाखवून माझ्यावर कौटुंबिक संकट कोसळणार असल्याची पूर्वसूचना दिली होती! ह्या सा-या प्रकारात मला फक्त चौदाचा पाढा 'चौदे सोळे चोवीसदोन' पर्यंत येऊ लागला, एवढाच फायदा झाला. शेवटी आपले वजन हपीससमोरच्या इराण्याच्या काट्यावर करायचे ठरवुन मी 'आहारपरिवर्तन' सूरू केले.

साखरेत सर्वात अधीक क्यालरीज असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहील्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही, घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटामिठावर उरकायची अक्त ताकीद दिली. "मुलांसाठी म्हणुन काय थोंड गोडाधोडाचं करांयच ते कर" एवढी सवलत ठेवली. पहील्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजीबात वर्ज्य करणे अवघड होते, म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत 'ही' निराळे काय करते ह्याचा अजुनही अंदाज आला नाही.

पहीला दिवस सुरळीत गेला आणि दुस-या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला! पहील्या दिवशी निम्म्याहून अधीक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती; परंतु दुस-या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने सा-या सेक्शनला पार्टी दिली, भटाने तर माझ्या 'डाएट' वर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार! बिचारा सहा वर्षांनी 'एफिशिएन्सी बार' च्या जाळ्यातून बाहेर पडला होता. भटाने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासाघासागणिक सहस्रवधी क्यालेअरीज पोटात चालल्या होत्या!
त्यामूळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटेवडे होते-- म्हणजे आणखी क्यालरीज! चिवडा अस्सल 'वनस्पती'तला, त्यामुळे आणखी क्यालरीज. आणि एवढे सगळे हादडून शेवटी "भज्ज्यांशीवाय पार्टी कसली?" या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे
चेकाळून नाडगौडाने भटाला भज्यांची परत आर्डार दिली.

शेवटी मला राहवेना! भज्यांची सहावी प्लेट उडवल्यावर, मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी 'डाएट'वर असल्याचे सांगीतल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले!

"अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध ?" भिकोबा मुसळे म्हणाला. "मी बघ एकवीस गुलाबजाम खाल्ले--एवढंच काय, आपण तर आयुष्य़ात एक्सरसाईज नाही केला. तुझी कुभं रास नि कुभं लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार! लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे!"

"नॉन्सेन्स!" जगदाळे ओरडला, "रनिंग कर रोज."

"रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट चाळीस पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी!" कु० कमलिनी केंकरे म्हणाली.

ह्या सर्व लोकांच्या सल्ल्यांत स्वतःची पत्नी, शेजारी, चुलतभाऊ अगर मामेबहीण यांची वजने उतरल्याचे दाखले होते; स्वतःचे उदाहरण द्यायला कोणी फारसा राजी नव्हता. रनिंग आणि दोरेवरच्या उड्यां ह्यांत एक 'मी पोहावे' अशीही उपसुचना येऊन फेटाळली गेली! शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी साताव्या बशीमधले भजे उचलले.

कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काही ना काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती दोन पडवळे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा, वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीप्लॉवर, वगैरे बाळसेदार मंडळींची सैपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहादेखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत
असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. ह्याविषयी विशेष चौकशी करता कुटुंबाकडून खुलासा मिळाला तो तिच्याच शब्दांत सांगणे बरे.

"म्हंजे मी आपलं मनाशी म्हटलं- बंर का (वायफळ शब्दांचे डबे जोडण्यात बायकांचा हात धरणे अशक्य आहे.) की आपलं तुमचं हे वजनाचं काढलंय तुम्ही ते-- म्हंजे नीट ध्यानात घ्या बरं का मी काय म्हणत्येय ते, नाही तर उगाच डोक्यात राख घालाल! (अजून मुद्याला स्पर्श नाही!) हो, तुमच्या घराण्याचाच गुण आहे तो! नीट ऎकायचं नाही नि मग एकदम खेकसायचं, गेल्या वर्षी सासुबाई आल्या होत्या--"

"चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढंच सांग. उगीच वायफळ बडबड नको मला!"

"हेच ते-- म्हटंल ते उगीच?.. अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हांला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी!"

"नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस?"

"अहो. थोडीशीच राहीली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता!"

"म्हणजे खलास! अग किती लाख क्यालरीज गेल्या असतील माझ्या पोटात! कसलं कमी होतंय माझं वजन? पण सांगीतलं का नाहीस मला?"

"उगीच आरडाओरड नका करू. वजनांच ते काय मेलं? होईल हळूहळू कमी! आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही; स्वतःच कमवुन खातोय म्हणावं! वाढलं तर वाढू ते वजन." मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवीत आणि माझ्या वजनक्षय -संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली.

"लाडू कशाला केलेस साखर असेल त्यांत!"

"इश्श! साखरेशीवाय लाडू आमच्या नाही घरण्यात केले कुणी!"

कुटुंबाचे 'घराणे' हा एक स्वतंत्र विषय आहे. वादाच्या कुठल्याही प्रसंगी स्वतःच्या 'सदावर्ते' घराण्याचा एकदा तरी उद्गार झालाच पाहीजे असा संकल्प आहे तीचा. आणि त्याच्या तुलनेने आमचे घराणे हे कसे 'सामान्य' आहे, हे एकदा दाखवले की ती 'सूटते'!

तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रुपाने काही क्यालरीज पोटात गेल्याच!

दोरीवरच्या उड्यांना फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली! कारण आठ गुणिले दहाच्या आम्च्या दिवाणखाण्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड! एकदा डोक्यावरून दोरी पलिकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली! दुस-यांदा अर्धवट गॅलरीत आणि अर्धावट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बाबा बर्व्यांच्या गळ्यात! त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपवास करतो हे कळल्यावर चाळीतली सर्व मंडळी 'समाचारा'ला
येऊन गेली. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असुनही आले नाहीत. कारण 'उपास' हे त्यांचे खास राखीव कुरण होते.

"हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं; पण तुमच्या वयाला न शोभणा-या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षम करतो."

"पण... मी हे मुद्दाम केलं नाही, आचार्य! अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी."

"काही उपयोग होणार नाही!"

"का?"

"का म्हणजे? जिभेवर ताबा नाहे तुमच्या. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील!"

"आता ह्या उड्या मारायला मी लाजदेखील सोडली हे पाहता ना तुम्ही, बाबा?"

"ठीक आहे. प्रथम बोलणं सोडा!"

"बोलणं सोडू?"

"अजिबात! खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही पंत; पण बोलण्यासाठीदेखील त्याचा वापर बंद केल्याशीवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही."

"पण मला बोललंच पाहिजे, बाबा." मी केविलवाण्या स्वरात ओरडलो.

"का पण? एवढा संयम नाही तुमच्यात ? मौनांच सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही....."

उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा एक तास 'मौनाचं महत्व' ह्या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्यप्रवाह अडवून मी ओरडलो,

"पण बाबा, मी बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय!"

"मी टेलिफोन-ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला."

"मग कसलं वजन उतरवणार तुम्ही?" अत्यंत कारूण्यपूर्व कटाक्ष 'टाकूनिया बाबा गेला'! आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशी मी गच्च आवळली का नाही, ह्या विचाराने मला पश्र्चाताप झाला!

मग मात्र मी चिडलो आणि निश्र्चय केला की बस्स. यापुढे उपास-वजन उतरेपर्यंत उपास! मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिनसाखरेचा आणि बिनदुधाचाच काय, पण बिनचहाचा-देखील
चहा पिऊ लागलो! साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. केळी पाहिली की मला त्यांतली जीवनसत्वे दिसून अनादी तत्व सापडलेल्या ऋषिमुनींप्रंमाणे अष्टसात्विक भाव माझ्या अंगावर दाटू लागले. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटु लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या 'दुष्टपणाने व आकसाने' केलेल्या तक्रारींमुळे थांबवाव्या लागल्या. दहा उड्या पाय न अडकता मारण्यापार्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगावरस्त्याने घावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ दहाबारा दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता! लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोज उपटून पाहतात त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते
मला. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर एक महिन्याने मी वजन करणार होतो. एक महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दुध! दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. 'गायींना चारा'वाल्या
बायांकडल्या गायी इथूनतीथून सगळ्या भाकड निघाल्या. केवळ चौकशीपोटी दोन रुपयांचा चारा गायींना चारावा लागला. दोन रुपयांत सोळ दुणे बत्तीस गायींची चौकशी केली. दोनचार वेळा त्याच त्याच गायीची चौकशी झाल्यामुळे चारावाली बाईही उखडली. पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले.

पंधरवडाभरात फक्त दोन वेळा साखरभात झाला-एकदा अण्णा पांवश्याकडेस त्यनारायणाला आमचे मेहूण गेले होते तेव्हा आणि एकदा आमच्याच घरी मी उपास सुरू केला तेव्हा हिने सत्यनारायण 'बोलून' ठेवला होता. त्या दिवशी. त्याशिवाय सोकाजीने चोरून एकदा कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी परसवटवारांनी एकदा नागपूरी वडाभात पाठविला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात केमी गेली. माझा एकूण निश्र्चय पाहून चाळीतल्या मंडळीचा आदर दुणावल्याचे माझ्या सुक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझी, माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करीत होती त्यांनीच "पंत, फरक दिसतोय हं!" अशी कबुली द्यायला सुरूवात केली.

जनोबा रेग्यांसारखा अत्यंत कुजकट शेजा-यालाही "पंत, भलतेच की हो रोडावलेत!" असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची---म्हणजे मूठभर मांस वाढण्याची! पण असली तुरळक तारीफ ऎकून मी चळण्यासारखा नव्हतो.

इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हानियंत्रणानंतर कमीत कमी विस ते पंचवीस पौंडानी तरी माझे वजन घटलेच पाहीजे, अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी ह्याच यंत्राने माझे वजन एकशेक्यांयशी पौंड दाखवले होते. एक महिन्याचा उपास, निराहार, शास्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या, इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकीटावर वजन....

मिनीटभर माझा विश्र्वासच बसेना! एकशेब्याण्णव पौंड! आणि भविष्य होते: 'आप बहूत समझदार और गंभीर है!"

सुमारे सहा आणेल्या मी त्या यंत्रात टाकल्या ---वजन कायम. फक्त भविष्य बदलत होते. शेवटी 'आपके जीवन में एक स्री आयेगी' हे वाचल्यावर मात्र मी हात आवरला.

हल्ली मी वजन आणि भविष्य ह्या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडुन दिले आहे. आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यांतून जातो.

No comments:

Post a Comment