Tuesday, 21 February 2012

तेर - उस्मानाबाद





-------------------------
मराठवाड्यातील उस्मानाबाद शहरापासून २३ किलोमीटरवर असलेले तेर गाव ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. तेरणा नदीच्या काठावर वसलेल्या तेरचे धार्मिक, सामाजिक व व्यापारीदृष्ट्याही महत्त्वाचे स्थान आहे. तेरचा उल्लेख करताच समोर येते ते संत गोरा कुंभार यांचे नाव. गोरोबा काकांची समाधी तेरणा नदीच्या उत्तर तीरावर आहे. दरवर्षी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येथे मोठी यात्रा भरते.

तेरमधील जैन मंदीरे, बौद्ध स्तुप, त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर, रामेश्वराचे मंदिर व पुरातत्व वस्तू संग्रहालय प्रसिद्ध आहेत. 'पेरीण्लस ऑफ दी एरिथ्रयन सी' या ग्रंथाचे लेखक ग्रीक देशातील खलाशी होते. या ग्रंथातील ५१ व्या प्रकरणामध्ये तेर गावाचा उल्लेख दक्षिण पंचायतीतील महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्र असा करण्यात आला आहे. बॅरिगाझा (गुजरात राज्यातील भडोच शहर) पासून दक्षिणेस २० दिवसांच्या प्रवासानंतर गाठता येणारे गाव तगर म्हणजेच आजचे तेर. तगर हे शहर असून तेथे पूर्वेस दहा दिवस प्रवास केल्यानंतर पोहोचता येते. तगर येथून साधे कपडे, विविध तर्‍हेची मलमल आणि गोणपाट बॅरीगाझा येथे पाठविली जातात. त्याचप्रमाणे समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशात तगरला येणारा माल बॅरीगाझा येथे पाठविला जातो, असे तेरचे वर्णन या ग्रंथात आढळते. तेरचे नाव काही प्राचीन ग्रंथात तगर, तगरपूर, तगरनगर असे आहे. संस्कृत भाषेत तेर या नगराचा 'तगरम्‌' असा उल्लेख आहे. पुराणात याला 'सत्यपुरी' असे म्हटले आहे.

प्राचीनकाळी तेर हे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. तेर हे पैठण, नेवासे, जुन्नर या व्यापारी केंद्राशी जोडलेले होते. भारतीय वाङ्मयात तेरचे व्यापार व कलाशिल्प नगरी असे वर्णन आहे. सातवाहन राजांच्या काळात तेरचा युरोपमधील ग्रीस व रोम या देशाशी व्यापारी संबंध होता. तेर येथील उत्खननात सातवाहनकालीन नाणी सापडली आहेत.


१६ शतकांचे साक्षीदार असलेल्या त्रिविक्रम मंदिराने तेरच्या वैभवात आणखीन भर टाकली आहे. त्रिविक्रम मंदिर हे बौद्धकालीन असल्याचे मत काही संशोधकांनी व इतिहास तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्रिविक्रम मंदिर हे चौथ्या शतकातील असावे, असे मत इतिहास संशोधक पर्सी ब्राऊन यांचे आहे. आजही तेर व आसपासच्या परिसरात उत्तरेश्वर, कालेश्वर या हिंदू मंदिराबरोबर जैन मंदिरे आहेत.

कालेश्वरचे मंदिर हे राष्ट्रकुटांच्या काळातील असून त्याचे शिखर दाक्षिणात्य (द्रविड) शैलीचे आहे. हे मंदिर विटांनी बांधलेले आहे. मंदिरासमोरील मंडप हा अलीकडच्या काळातील असून कमानी इस्लाम शैलीच्या आहेत. मंदिराच्या गर्भग्रहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. या मंदिराच्या मूळ भिंती ढासळू नयेत म्हणून चुन्यात बसविलेल्या भिंती बांधण्यात आलेल्या आहेत.

त्रिपुराकेश्वर मंदिर हे तेरणा नदीच्या पात्रात दगडांचा वापर करून बांधलेले आहे. गर्भगृहामध्ये शिवलिंग व त्याच्यासमोर बाहेर मंदिर आहे. हे मंदिर मध्ययुगीन चालुक्य शैलीत आहे. उत्तरेश्वर मंदिर हे माती व लाकडाने बांधण्यात आलेले आहे. यात दगडाचा वापर केलेला नाही. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात शिवलिंग आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार लाकडाचे असून त्यावरील कोरीव काम उठावदार आहे. मंदिर इसवी सनाच्या ७ व्या शतकातील आहे. सध्या मंदिरात शिवलिंग असून आसपास सूर्य, विष्णू, भैरव आणि विरगळ दिसतात. सूर्य मूर्तीखाली सातघोडे व सूर्याच्या दोन्ही बाजूस कमलधारी स्त्रिया आहेत. देवळाजवळील एका दगडावर कमळाभोवती १२ राशींची चिन्हे आहेत.
तेरच्या पश्चिमेस नागठाण म्हणून एक वास्तू आहे. ही वास्तू दगडाने बांधलेली असून गर्भग्रहाच्या भिंतीत एक शिल्पयुक्त फरशी आहे. त्या शिल्पात चैत्य व त्यावर नागवृक्ष दाखविलेला आहे. त्याचबरोबर खुद्द पार्श्वनाथ वस्ती ही एक चार दालनाची इमारत असून त्यात पार्शवनाथ, महावीर व चामरधारींच्या मूर्ती आहेत. जिनवीसहित सापडलेल्या लेखानुसार या जैन मंदिराचा काल इसवी सन १४ ते १६ वे शतक असा आहे. अगदी अलीकडच्या काळातील नृसिंह व रामेश्वरांची मंदिर येथे आहे. नृसिंहाचे मंदिर गावच्या आग्नेयेस अर्ध्या मैलावर असून ते विटांनी बांधलेले आहे. गावठाणाच्या रामेश्वराच्या मंदिरात शिवाचे मंदिर आहे.

तेर येथे संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे. संत गोरोबा कुंभार यांना तत्कालीन संत नामदेव, ज्ञानदेव हे आदराने काका म्हणून संबोधित. दरवर्षी गोरोबा काकांची पालखी येथून पंढरपूरला जाते. कै. रामलिंगप्पा खंडाप्पा लामतुरे व त्यांचे चिरंजीव भागवतप्पा लामतुरे यांनी पुरातन वस्तुचे संग्रह केल्यामुळे तेरची ख्याती झालेली आहे. कै. रामलिंगप्पा यांनी छंद म्हणून तेर व परिसरात सापडलेल्या जुन्या वस्तुंचा संग्रह करण्यास सुरुवात केली. या वस्तूंमध्ये जुनी नाणी, मातीच्या मुर्ती, हस्तीदंताच्या मुर्ती, शंखाच्या बांगडा, दगड व मातीचे विविध आकाराचे मणी, अलंकार, रोमन बनावटीचे दिवे, कर्णभूषणे यांचा संग्रह आहे. हा संग्रह इतिहास व संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा आहे.

रामलिंगांप्पा यांनी सन १९६१-१९६२ साली हा संग्रह विनामुल्य महाराष्ट्र शासनाला दिला. १९६७ साली शासनाने ५ हजार वस्तू असलेला हा संग्रह घेण्याचा निर्णय केला हा दुर्मिळ वस्तुसंग्रह एका छोटा इमारतीत संचलित असून पुरातत्व विभागातर्फे याची व्यवस्था पाहिली जाते. या संग्रहालयात हस्तीदंताची स्त्रीमुर्ती विशेष लक्ष वेधून घेते. शंखापासून निर्मित बांगडा, मणी, बौद्ध धर्मियांची धार्मिक चिन्हे आहेत. या व्यतिरिक्त देवदेवतांच्या मुर्ती, दिवे, व धातूची नाणी यांचा संग्रह आहे. गावच्या तेरणा नदीच्या तीरावर कोट टेकडी, साहोरे टेकडी, मुलानी टेकडी तर उत्तर तीरावर सुलेमान टेकडी, रेणुका टेकडी, सुतार टेकडी आहेत. या टेकडींच्या खाली तेरचा इतिहास दडला आहे.

तेर हे सात वाहनाच्या काळात व्यापारी व कला केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. तर गुप्त, चालुक्य यांच्या काळात धार्मिक वास्तु व मंदिर निर्मितीसाठीही महत्त्वाचे होते. यादव काळापर्यंत येथे मंदिराची निर्मिती होती. संत गोरोबाकाकांच्या समाधी शेजारी एक दगडी घाट बांधलेला आहे. भाविकांची सोय व्हावी म्हणून पूल वजा कोल्हापूरी बंधारा बांधलेला आहे. इतिहासाचे साक्षीदार असलेले तेर ऐतिहासिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.





---- Webdunia

No comments:

Post a Comment