-----------------
उन्हं कलली. दिवस सांजावला.
खांद्यावर कांबळं घेतलेला, एका गाठीच्या शिसवी लाकडासारख्या घोटीव देहाचा, रापलेल्या कांतीचा सावळा विठुराया राऊळाच्या पडवीत आला. हातापायावर गारेगार पाणी घेतलं, थोडं अंगावर शिंपडून तोंडावरून हात फिरवला, तसं त्याला बरं वाटलं. ‘‘परमेश्वरा, पांडुरंगा..’’ असं आपसूक ओठांवर आल्यावर तो हसला आणि वळला आणि आश्चर्यचकित झाला. आज नेहमीच्या जागी पाण्याचा गडगा तर ठेवलेला होता.. पण, दाराशी ओठंगून उभी राहिलेली हसरी रखुमाई मात्र नव्हती. ‘‘काय गडबड झाली काय जणू..’’ असं स्वत:शीच पुटपुटत त्यानं गडगा उचलला आणि घटघटघटघट एका घोटात घशाखाली रिता केला, तेव्हा
जरा थकवा आल्यासारखं वाटलं. आतून भांडय़ांचे आवाज येत होते. नेहमीपेक्षा
थोडे जास्त खणखणीत. तेव्हाच विठुरायाच्या लक्षात आलं की गाभा-याचं कोपगृह
झालेलं दिसतं.
‘‘का नाही मिळणार? साखर, दूध, चहाच्या किमती आभाळाला भिडल्या तरी कोपभर च्या देईनच की ढोसायला?’’ रखुमाईनं कप आणून विठुरायासमोर आदळलाच.
‘‘च्या जरा कडक झालाय आज..’’ गालातल्या गालात हसत विठुरायानं खडा टाकला.
रखुमाईनं लागलीच तोफ डागलीच, ‘‘कडक होईल नाहीतर काय? बायकोचं काय दुखतंय खुपतंय.. आमच्या बाबाला काही चिंता नाही.. त्यांचं ध्यान चहावर.. सुंदर ते ध्यान..’’
‘‘एकदम आमच्या ध्यानावर घसरू नका. काय गडबड झालीये ती बैजवार सांगा.’’
उत्तरादाखल रखुमाईनं विठुरायांसमोर ताजा पेपर आदळला.
विठुरायानं बातमीचं शीर्षक वाचलं, ‘‘विठुराया गरीबच.. यंदाच्या वारीत अवघ्या ८६ लाख रुपयांची कमाई..’’ रखुमाईकडे पाहून चिडवण्याच्या सुरात विठुराया म्हणाला, ‘‘आबाबाबा, 86 लाख म्हंजे आठावर सहावर किती शून्यं तेही मोजता येणार नाही आपल्याला. फारच श्रीमंत झालो आपण.’’
‘‘देवा रे देवा, काय करू आमच्या या भोळय़ा माऊलीला,’’ रखुमाई कडाडली, ‘‘अहो जग कुठं चाललंय आणि तुमचं ध्यान कुठंय? अहो, इतक्या देवांच्या मंदिरांवर सोन्याचे कळस चढले, मी गप्प बसले. कोणाच्या अंगावर किलोकिलोंचे सोन्याचे दागिने चढले, कित्येक देव हि-यामोत्यांच्या अलंकारांनी मढले, मी गप्प बसले. अख्खी हयात ज्यांनी फकिरासारखी घालवली, त्यांना रत्नजडित सिंहासनं मिळाली, मी गप्प बसले. पण, आता
नाही हो गप्प बसवत. कोण कुठला हातचलाखीची जादू करणारा बाबा- त्याची हजारो
कोटींची संपत्ती. कालपर्यंत हृषिकेशमध्ये सायकल मारत फिरणारा बाबा मंचावर
उभा राहून बिनसायकलीचे हातवारे आणि पायवारे करायला लागला- तो गेला हजार
कोटींच्या घरात. आता त्या पद्मनाभाच्या मंदिरात तर अख्ख्या देशाच्या
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती सापडलीये म्हणतात. आणि आमचे हे- एवढय़ा मोठय़ा
वारीत अवघे 86 लाख रुपये जमा झाले, तर म्हणे केवढी मोठी रक्कम-जसा टिपिकल मराठी माणूस, तसाच त्याचा देव.’’
‘‘अगं हळू हळू..’’ विठुरायानं हात रखुमाईच्या तोंडावर नेला, ‘‘त्या मराठी अस्मितावाल्यांच्या कानावर गेलं तुझं बोलणं तर काय होईल. आमचा विठुराया असा गरीब कसा, म्हणून
आकाशपाताळ एक करतील. सतत दुख-या आणि किरकि-या मराठी अस्मितेला आवाहन करून
माझ्या भाबडय़ा भक्तांना लुबाडतील. आपलं पंढरपूर आहे तसंच राहील आणि
यांच्या बंगल्यांवर मात्र सोन्याचे कळस चढतील.’’
‘‘कित्ती काळजी गं बाई या देवाला त्याच्या भक्तांची,’’ रखुमाई कृतककौतुकानं म्हणाली, ‘‘पण, भक्तांना त्याची काही कदर आहे का? तिकडे त्या देवांचे भक्त पाहा,
आपापल्या देवाला, सत्पुरुषाला सोन्यारूप्यानं मढवतायत, त्याच्यावर नोटा-नाण्यांचा वर्षाव करतायत..’’
‘‘..आणि त्याची कृपा विकत घेतायत. हा रोकडा व्यवहार आहे रखुमाई, व्यवहार,’’ आता विठुरायाचा स्वर काहीसा कठोर झाला, ‘‘याला का भक्ती म्हणतात? मला पास कर, तुला अमुक देईन. मला पैसे मिळवून दे, तुला तमुक देईन. माझी ही इच्छा पूर्ण कर, मी तुला ते वाहीन. अरे, हा देव आहे की कमिशन एजंट? जिकडेतिकडे
लाच खाण्याची आणि लाच देण्याची सवय झालेले हे नादान लोक साक्षात
परमेश्वराला लाच देऊ पाहतात. ही क्षुद्र लाच त्या विश्वरूप परमात्म्याच्या
काही उपयोगाची नाही, हे ऊठसूट अध्यात्माच्या बाता मारणाऱ्या या दगडांच्या ध्यानातही येत नाही की हे निगरगट्ट पैशानं पुण्य विकत घेऊ पाहतायत, हे
कोडं आजवर मलाही उलगडलेलं नाही. हा असला देवाचा काळा पैसा मग देवळांचे
दुकानदार बनून बसलेल्या दलालांच्या खिशात खुळखुळतो नाहीतर देवळांतल्या
अंधा-या खोल्यांमध्ये सडतो. काय उपयोग असल्या भक्तांचा आणि त्यांच्या
विकाऊ भक्तीचा? मला माझ्याकडचा खजिनाच पुरेसा आहे..’’
‘‘काय सांगताय? तुमच्याकडे खजिना आहे!.. मला कधी बोलला नाहीत ते.. कुठे दडवून ठेवलायत सांगा.’’ रखुमाईनं अधीरतेनं विचारलं.
‘‘इथे दडवून ठेवलाय इथे,’’ आपल्या छातीवर वळलेली मूठ आपटत विठुराया म्हणाला, ‘‘माझ्या भोळ्या भक्तांच्या सच्च्या भक्तीभावाचा खजिना. जरा विचार कर. नवससायास, गंडेदोरेताईत, बुवा-बापू-बाबा-महाराज, कर्मकांडं यांनी बुजबुजलेल्या या देशात माझ्यासारखा ‘निरुपयोगी’ देव आहे आणि त्याचे भक्तही आहेत, हेच आश्चर्य नाही का? ना
मी त्यांच्या नवसाला पावत ना त्यांच्या काही इच्छाआकांक्षा पूर्ण करत.
दगडाच्या मूर्तीत बद्ध झालेला कोणताही देव कोणालाही काही देऊ शकत नसतो, याचं भान माझ्या या अडाणी भक्तांना आहे. तरीही ते माझ्यात सखा पाहतात, बाप पाहतात आणि मायही पाहतात. आपल्या शेतात, कामात, औजारात, गाईगुरांत, बायकापोरांत मला पाहतात. कधी सवंगडय़ाशी कराव्यात, तशा सुख-दु:खाच्या चार गोष्टी करतात, कधी कातावून मला बोल लावतात, शिव्याही घालतात. त्यानं त्यांचं मन हलकं होतं. तेवढंच मी त्यांना देऊ शकतो आणि तेवढय़ावरच ते समाधानी आहेत..’’
‘‘..आणि तेवढय़ावरच तुम्हीही समाधानी आहात. धन्य तुमचे भक्त आणि धन्य तुम्ही,’’ कोपरापासून हात जोडून उठत रखुमाई फणका-यानं म्हणाली.
अचानक तिचं लक्ष दूर उभा राहून
डोळे मिटून कळसाला हात जोडणा-या एका फाटक्या भक्ताकडे गेलं.. संधिप्रकाशात
चमकणा-या त्याच्या सात्त्विक चेह-यावर निर्व्याज, निरागस
श्रद्धेचं अपरंपार तेज झळकत होतं. ते पाहून तिच्याही अंत:करणात आपसूक
आशीर्वचन उमटलं आणि.....
आपल्या भोळ्या नव-याचा खूप अभिमान दाटून आला.
-------- प्रहार
सप्रेम नमस्कार,आपली ही पोस्ट आजच्या परिस्थितीचे अत्यंत बोलके चित्रण करते. धन्यवाद.
ReplyDeleteमी आपली पोस्ट आमच्या स्नेही मंडळींनाही पाठवली. ।। जय विठोबा । जय ज्ञानोबा।।