Wednesday, 29 February 2012

विठाबाई (मांग) नारायणगांवकर



योगीराज बागुल यांनी लिहिलेल्या `तमाशा: विठाबाईच्या आयुष्याचा' या चरित्रग्रंथावर आधारलेला आणि त्यांनीच लिहिलेला कार्यक्रम नुकताच यशवंत नाट्यमंदिरात पाहावयला मिळाला. `पंचमी' या संस्थेने हा कार्यक्रम सादर केला. विठाबाईच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग कथन करून विठाबाईच्या फडात गायल्या गेलेल्या गण-गवळी, पोवाडा, लावणी, विरहगीत, शौर्यगीतं अशी कार्यक्रमाची रचना असून कार्यक्रमाचे निवेदन अभय कुलकर्णी यांनी केले आणि विठाबाईच्या फडाचे, आयुष्याचे चित्र प्रेक्षकांच्या डोळ्यापुढे उभे केले.
    ``आजच्यासारखी कुठली बिदागी आणि कुठली सुपारी? खेळ करून झाला की माझा बाप मला दारोदार वटी पसरून भाकर तुकडा मागायला पाठवी. मिळालं ते त्याच गावात खाऊन त्याच गावात उरल्याली रात काढून पुढचं गाव असा जतन केला आम्ही तमाशा'' विठाबाईचे हे अनुभवाचे बोल. तमाशासाठी. या मातीतल्या लोककलेसाठी, तिने ज्या खस्ता खाल्ल्या, त्यामुळे सिनेमाची चंदेरी दुनियाही तिला कधी भुलवू शकली नाही. ज्याच्या सिनेमात काम करण्यासाठी जीव पाखडत त्या व्ही. शांताराम आणि राज कपूर यांनी स्वत: विनंती करूनही काम करण्याचे विठाने नम्रपणे नाकारलं. आणि शारीरिक त्रासाला तोंड देत तमाशाची कास अखेरच्या श्वासापर्यंत सोडली नाही. तिला सामाजिक भानही होते. त्यामुळे लोककलेच्या क्षेत्रात मी मी म्हणणाऱयांची तिने छुट्टी केली आणि ती या क्षेत्रातली सम्राज्ञी झाली. विठाबाईचे वडील भाऊ मांग नारायणगांवकर हे पठ्ठे बापूरावांचे शिष्य आणि विठाबाई भाऊंची शिष्या. त्यामुळे विठाबाईंनी पठ्ठे बापूरावांचाच वारसा चालवला असं म्हणावयाला हरकत नाही. तिने तमाशात उदंड नाव कमावलं. एकेकाळी विठाबाईचे फड हा शेकडो कलाकारांच्या आणि फडात पडेल ती काम करणाऱया मजुरांच्या उपजीविकेचे हक्काचं साधन होतं. पण पैशाचा पूर एका दिशेने आला आणि दुसऱया दिशेने निघून गेला. या कलावतीची घागर मात्र कोरडीच राहिली. जिच्या फडाचा जमा झालेला पैसा गोणपाटात पायांनी दाबून भरला जाई त्याच विठाबाईला वृद्धत्वाच्या काळात टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी नारायणगावात जोगव्याच्या नावाखाली पदराची ओटी पसरावी लागली.
   त्याचप्रमाणे तमाशाला आलेल्या रसिक प्रेक्षकांनी नाराज होऊ नये म्हणून नवव्या महिन्यातही ती बोर्डावर उतरली. नाचगाणं करताना तिच्या पोटात कळा सुरू झाल्या. तरी ती नाचतच होती. पण कळा असह्य झाल्यावर ती स्टेजमागे गेली आणि बाळंतपण उरकलं. नाळ दगडानं तोडली गेली आणि ती पुन्हा रंगमंचावर आली. हजारो रसिकांनी हा प्रसंग अनुभवला. विठाबाईच्या कलेवर सारे फिदा होते, प्रसिद्धी पैसा यश सारं काही चालून येत होतं. पण जवळच्याच माणसांनी तिला दगा दिला. विठाबाई कर्जबाजारी झाली. वय वाढलं तरी लावणी म्हटलं की तिच्या अंगात अक्षरश: संचार व्हायचा. पण आर्थिक अडचणी आणि आजारपणाने या लावणीसम्राज्ञीला गाठलं गेलं इत्यादी तिच्या संगीतमय, कष्टप्रद आयुष्याचं चित्र या कार्यक्रमात संगीत साथीने साकारलं गेलं. त्यात नाट्य होतं, नृत्य होतं, निवेदनही होतं. ``विठू माऊली तू माऊली जगाची. शुभ मंगल जनी गण नाचला, चाळ माझ्या पायात, शूरा मी वंदिले, सैनिक हो तुमच्यासाठी, लग जा गले, ए मेरे वतन के लोगो, बाळा जो जो रे, नाचू किती लाजू किती, कान्होबा तुझी घोंगडी, डेरेदार बहरलं झाड, पोटासाठी नाचते मी,'' इत्यादी गाण्याभोवती विठाचा जीवनपट साकारण्यात आला.
   `माझ्या डोळ्यात कचरा गेला, एक हौस पुरवा महाराज, कंबर लचकली, ' या लावण्या नृत्यांगना स्मिता वेताळे यांनी झाकदार पेश केल्या. विश्वजीत बोरवणकर, संचिता गर्गे, आदिती प्रभू देसाई, राजश्री लेले, मानसी फडके या गायक वृंदाने आपली कामगिरी झकासपणे पेश केली. गावकुस बाहेरच्या कलावंतांनी जगविलेल्या तमाशाकलेच्या या साम्राज्ञीची चित्तरकथा तिच्या गाण्याच्या साथीने `पंचमी' या संस्थेने रंगमंचावर मांडली आहे. विठाबाईंच्या आयुष्यातील काही ठळक प्रसंग, त्याला सुसंगत अशा विठाबाईच्या फडात गायल्या गेलेल्या गण-गवळणी, पोवाडा, लावणी, विरहगीत, शौर्यगीतं अशी या कार्यक्रमाची रचना असून कार्यक्रमाचे निवेदन अभय कुलकर्णी तन्मयतेने करतात. गायक कलाकारांनीही या कार्यक्रमाला यथार्थ साथ देऊन कार्यक्रम श्रवणीय केला आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासून लोककलेसाठी आपले सारं आयुष्य कारणी लावणाऱया विठाची अखेर अंगावर काटा उभी करणारी आहे. वयाच्या 17व्या वर्षी ती आई झाली आणि 30व्या वर्षी तिने आठव्या मुलाला जन्म दिला. स्त्रीला फडमालक कसे वापरतात याचं विठा हे मूर्तीमंत उदाहरण आहे. राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार तिने मिळवले पण दुर्दैवी विठा पुरुषी जुलमाची, अत्याचाराची आणि अशिक्षितपणाची बळी ठरली. 15 जानेवारी 2002 रोजी पुण्याच्या केईएम रुग्णालयात अर्धांग वायुने तिचे निधन झाले. 




No comments:

Post a Comment