Monday, 27 February 2012

कांदा भजी



प्रत्येक पदार्थ कसा खावा याचाही विचार करायला हवा. उदा. साबुदाण्याची खिचडी वर साखर भुरभुरून गच्चीत बसून खावी, पुरणपोळीत किती तूप घातलंय हे बघू नये आणि कांदाभजी नेहमी पाऊस बघत खावी.
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती स्वागतशील आहे. म्हणूनच तिनं नवीन ते स्वीकारलं; पण जुनं ते सोडलं नाही. नव्या पदार्थाच्या गर्दीत आपले पदार्थ हरवले नाहीत. बटाटावडा, थालीपीठ, मिसळ, कांदापोहे याबरोबरच महाराष्ट्रातील कांदाभजीचं वेगळं अस्तित्व आहे. सगळी प्रादेशिक वैशिष्टय़ं जपत कांदाभजीनं खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मुंबईसारख्या शहरातही आपली रूची टिकवली आहे.
 
भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग असलेला कांदा जगभरातही आवडीनं खाल्ला जातो. कापलेल्या कांद्यांवरच्या गोलाकार रेषा अनंत जीवनाचं प्रतीक आहे, असा इजिप्तमध्ये समज आहे. कांद्याच्या उग्र वासामुळे मेलेला माणूसही जिवंत होतो, असं म्हटलं जातं! एक मात्र खरं की, कांदाभजीच्या खमंग वासामुळे झोपेतला माणूससुद्धा जागा होईल एवढं निश्चित!
 
मुळात कांद्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. रक्तदाब आणि हृदयरोग आटोक्यात आणण्यात कांदा मदत करतो. कांद्यामुळे डोकेदुखी थांबते. कांदा थंड असल्यानं शरीरातील उष्णता निघून ताप कमी होण्यास मदत होते. पांढऱ्या कांद्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं, असं डॉक्टर सांगतात. अशा या बहुगुणी कांद्याचा उपयोग भारतीय पदार्थामध्ये मोठय़ा प्रमाणात केला जातो. कांद्याच्या अनेक रेसिपींबरोबर सर्वाच्या परिचयाचा आणि आवडीचा खाद्यपदार्थ म्हणजे कांदाभजी.
 
‘बाहेरचं खाऊ नकोस, आजारी पडशील’, असं कुणी म्हटलं तर हसायला येतं. ऑफिस, शाळा, कॉलेज, क्लब, पार्क यापैकी कोणतंही ठिकाण असो, माणूस एकटा असो किंवा दुकटा, त्याला बाहेरच्या खाण्याची लहर येतेच. या लहरीमागे उदर भरणापेक्षा मानसिक भूक मोठय़ा प्रमाणावर असते. कढईत गरमागरम कांदाभजी सोडल्यावर ती खाण्याचा मोह कुणाला होणार नाही? दुपारी भरपेट चापलेलं असलं तरी सायंकाळी पाय मोकळे करताना कांदाभजी आणि चहा प्यायची इच्छा होते, ती उगीच नाही!
 
आजची पिढी फिटनेस आणि आरोग्याला विशेष महत्त्व देते. मुलींना फिगर सांभाळायची असते आणि मुलांना मसल्स तयार करायचे असतात. तरीही बाहेरचं खाण्यात नव्या पिढीचा खूप मोठा वाटा असतो. मुळात बाहेरच्या खाण्याची चटक लागते ती चवीमुळे! म्हणूनच चटपटीत आणि खमंग खाण्याची वारंवार इच्छा होते. त्यातही किंमत कमी आणि तात्काळ मिळणाऱ्या मेन्यूला लोक जास्त पसंती देतात. संध्याकाळची वेळच अशी असते की, काहीतरी चटपटीत, खमंग आणि गरमागरम खाण्याची इच्छा अनावर होते. अशा वेळी कांदाभज्यांवरच ताव मारला जातो.
 
प्रत्येक पदार्थ विशिष्ट प्रकारे खाण्यात मजा असते. साबुदाण्याची खिचडी वर साखर भुरभुरून गच्चीत बसून खावी, पुरणपोळीत किती तूप घातलंय हे बघू नये आणि कांदाभजी नेहमी पाऊस बघत खावी!
 
कांदाभज्यांना खरी प्रसिद्धी दिली असेल तर बसस्टँड आणि रेल्वे स्टेशनशेजारच्या स्टॉल्सनी. महाराष्ट्रातील सर्वच भागात सर्रास कांदाभजी मिळतात.
 
कुरकुरीत कांदाभजी तयार करण्यासाठी पीठ भिजवताना पाणी घालू नये. चणाडाळीचं जाडसर पीठ घ्यावं. भज्यांसाठी कांदा उभा चिरून त्यात मीठ पेरून ठेवावं.
मिठामुळे कांद्याला छान पाणी सुटतं. आलं-लसणाची पेस्ट करावी. ही पेस्ट आणि हिरव्या मिरच्या आडव्या चिरून त्या चिरलेल्या कांद्यात पेराव्यात. लालसर झालेल्या कांद्यावर चवीपुरतं मीठ, चिमुटभर साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खाण्याचा सोडा घालावा. कांद्याला सुटलेल्या पाण्यात बेसन घालून पीठ चांगलं भिजवावं आणि नेहमीप्रमाणे भजी तळावी. बेसनच्या पिठात साखर टाकल्यानं भजी  कुरकुरीत होतात. या भज्यांना ‘खेकडा भजी’ही म्हटलं जातं.
 
भज्यांचे अनेक प्रकार आहेत; पण पावसाशी नातं जोडणारी भजी अर्थात कांद्याचीच. पण त्यातसुद्धा अनेक पोटप्रकार आहेत. ओनियन पकोडा कशाला म्हणायचं आणि भजिया कशाला, हे कळायला केवळ जीभच नव्हे तर नाकही तितकंच तत्पर असायला हवं.
 
आजकाल मोठमोठय़ा उपहारगृहात ओनियन रिंग्ज मिळतात. महाराष्ट्रातील अनेक भागात गोल कांदाभजी मिळते तर विदर्भात याच कांदाभजीला पकोडे किंवा भजे म्हणतात. पुण्याच्या सिंहगडची कांदाभजी खूपच फेमस आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी ‘भजीपाव’ हा ब्रेकफास्ट म्हणून मिळतो. मुंबईत नरीमन पॉइंट येथे एलआयसीशेजारी गोल कांद्याची, भरपूर हिरव्या मिरच्या घातलेली गरमागरम भजी मिळतात. दादरलाही चित्रा टॉकिजजवळ खमंग कांदाभजी मिळतात. कोकणात कधी जाणं झालं तर सावंतवाडीतील आनंद भुवनच्या भज्यांची जरूर टेस्ट घ्यावी. अगदीच जमलं नाही तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात चुलीवरील कढईत तळलेल्या शेर्ला आणि तळवडे गावातील भजी खाण्याची संधी सोडू अजिबात सोडू नये. कसारा घाट सोडला की, बहुतेक ठिकाणी कांदामिश्रित गोल भजी पुढय़ात येतात.
 
बटाटा, सिमला मिरची, मिरची, ओव्याची पानं, पालक, नीळ फणस आणि वांग्याचीही भजी बनवली जातात. या प्रत्येक भज्यांला स्वत:ची वेगळी चव आणि खमंगपणा असतो. कोल्हापूर-सातारा-सांगली भागात मिरची भजी मिळतात. या  भज्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या मिरच्या लहान असतात तर गोव्यात भज्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिरच्या लांब आणि कमी तिखट असतात.
 
एक मात्र खरं की भज्यासोबत चटणी, कच्च्या ताज्या हिरव्या मिरच्या किंवा उभा कापलेला कांदा हवाच.
 
पण एक बाकी खरं की, कांदाभजी हा काही हॉटेलात बसून खाण्याचा प्रकार नाही. टपरीवरच्या भज्यांवर ताव मारण्यासारखा दुसरा आनंद नाही!




No comments:

Post a Comment