मुंबई च्या
दक्षिणेला १६५ कि.मी. अंतरावर समुद्रकिना-यावर मुरूड गाव वसलेले आहे.
पूर्वीच्या जंजिरा संस्थानची मुरूड राजधानी होती. नारळी-पोफळीच्या हिरवाईत
लपलेली घरे आणि या हिरव्या गालीच्याला निळय़ा सागराची किनार, पूर्वेला दूरवर क्षितिजावर दिसणा-या सह्याद्रीच्या रांगा, आसपासच्या
छोट्या-छोट्या टेकड्या आणि त्यांच्यामधून लपंडाव खेळणारे खाडीच्या
पाण्याचे लहान-लहान रुपेरी प्रवाह असे निसर्गाचे लोभसवाणे लेणे ल्यालेलं
हे गाव.
गावाच्या
उत्तरेस असलेल्या टेकडीच्या माथ्यावर आहे पूर्वेच्या नवाबांचा राजवाडा. या
टेकडीवरून अलगद खाली उतरून शिरताना पहिले दर्शन होते ते निळ्याशार
समुद्राचे व पाण्याने वेढलेल्या पद्मदुर्ग (कासा) किल्ल्याचे. गावाच्या
दक्षिण टोकाला असलेला खाडीवरचा पूल ओलांडून पलीकडे गेलो की, उजव्या
वळणावर काळकाईचे खोरे आहे. इथून समुद्रात दिसतो इतिहास प्रसिद्ध जंजिरा
किल्ला सिद्दींच्या ४५० वर्षाच्या आरमारी वर्चस्वाचा साक्षीदार!
मुरूडला
मुंबईहून पनवेल-पेण-अलिबाग मार्गे जाता येते. जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी
मुरूडपासून ४ कि.मी. दूर असलेल्या राजपूर गावातून मचवे सुटतात. मुरूडला
येणा-या पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्याची उत्सुकता असतेच कारण या
किल्ल्याच्या परिसरात अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत.
सिद्धी, मराठे, पोर्तुगीज, इंग्रज, मोगल, डच
यांच्यात सागरी वर्चस्वासाठी झालेल्या सत्तास्पर्धेचा हा मूक साक्षीदार
आहे. जंजिरा हे पश्चिम किना-यांवरील स्थान प्राचीन काळात ग्रीक लोकांना ‘सिंगेर्दिस’ किंवा ‘झिझेरस’ म्हणून माहीत होते. टॉलेमीने इ.स. १५५मध्ये तयार केलेल्या आशिया खंडाच्या नकाशात ज्या ‘मुसोपल्ले’ या स्थानाचा उल्लेख केला आहे, ते आजचे म्हसळे गाव, असा
निष्कर्ष जाणकार काढतात. राजपूरपासून म्हसळे १८ मैलांवर राजपूर खाडीच्या
दक्षिण टोकावर आहे. इसवीसनाच्या ३-या शतकातील सातवाहन राजांच्या
कारकीर्दीत खोदलेली कुड्याची लेणी जवळच मांदाड खाडीच्या काठी आहेत.
यापुढील काळात १३व्या शतकापर्यंत या प्रदेशावर सातवाहन राजांची सत्ता
होती. राजपुरीचे त्या काळचे नाव पुरी होते व ती सातवाहनांची येथील
उपराजधानी होती, असे काही इतिहासकार म्हणतात.
ख्रिस्तपूर्व कोळात अरबांचेही या प्रदेशाशी व्यापारी संबंध होते. अरबी भाषेत ‘जाझिरा’ म्हणजे बेट. या शब्दाचाच ‘जंजिरा’ हा
अपभ्रंश आहे. उत्तर कोकणातील हा प्रदेश इ.स. १३१८ गुजरातच्या सुलतानाच्या
अमलाखाली गेला. १४व्या शतकात दक्षिण भारतात बहामनी राज्याची स्थापना झाली.
या राज्यात अेबिसिनीयातून आताच्या इथियोपियातून गुलाम म्हणून आयात
केलेल्या ‘हशबी’ या जमातीतून काही शूर व लढवय्ये सरदार निपजले. जंजि-याचे राज्यकर्ते ‘दशबी’ आफ्रिकेतील अरब-अल-हबीश या प्रदेशातून आलेले म्हणून जंजिरा संस्थानाला ‘हबसाण’ म्हणत
असत. १५व्या शतकात दंडाराजपुरी हे अहमदनगरच्या निजामशहाचे एक ठाणे होते.
जंजिरा किल्ला निजामशहाच्या अमलाखाली येण्यापूर्वीचा या स्थानाचा इतिहास
ज्ञात नाही. पूर्वी कोळी समाजातील लोकांनी चाचे व लुटारू यांच्यापासून
संरक्षण व्हावे म्हणून या जागी असलेल्या समुद्रातील खडकावर लाकडाचा मजबूत
तट असलेला मेढेकोट बांधला अशी माहिती मिळते. इ.स. १५६९ ते १५७१ या काळात
राजपुरीजवळील समुद्रातला हा मेढेकोट पाडून नवीन दगडी तट उभारून या
स्थानाचे नाव ठेवले जंजिरे मेहरुब (चंद्रकोरीच्या आकाराचा किल्ला. मेहरुब म्हणजे चंद्रकोर) आजचा जंजिरा तो हाच.
जंजिरा किल्ल्याचा आकार अनियमित लंबवर्तुळाकार आहे. भोवतालचा भाग काळ्या ताशीव दगडांचा तर उंची ४५ ते ५० फूट आहे. ओहोटीच्या वेळी तटाच्या पायथ्याशी असलेला विस्तृत खडक स्पष्ट दिसतो. किल्ल्यावर ‘कलालबांगडी’ आणि ‘लांडाकासिम’या दोन महाकाय तोफा आजही पाहायला मिळतात.
किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार राजपूर गावाकडे तोंड केलेले आहे. प्रवेशद्वारावरील कमानीवर ‘योहोर’ या
अरबी शब्दासह हिजरी सन ११११ इ.स. १६९४ कोरलेले आहे. त्याच्या जवळच कमानीवर
हत्ती व वाघांच्या झुंजीचे दृश्य कोरलेले आहे. कमानीच्या उजव्या बाजूस
आतील भिंतीवर एक वाघाची प्रतिमा आहे. वाघाने आपल्या पंज्यात व जबड्यात
हत्ती पकडले असून एक हत्ती शेपटीत गुंडाळलेला आहे. डाव्या बाजूस वाघ, सिंह, हत्ती यांच्या झुंजीची चित्रे कोरलेली पाहावयास मिळतात.
किल्ल्याच्या दोनही बाजूंना बुरुज आहेत, त्याच्यावर एका सिंहाच्या पायाखाली चार, तोंडात एक व शेपटीत एक, असे सहा हत्ती पकडलेलं शिल्प कोरलेल आहे. या मुख्य दरवाजातुन आत गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो. दरवाज्याच्या जवळच पीरपंचायतन असून, तेथील पटांगणात पीरमखानच्या जहाजाचे तीन नांगर पाहाता येतील. येथुन पुढे गेल्यावर एक मोठा गोडयापाण्याचा तलाव दिसतो. तलावाजवळ खाशा सिद्यीची मशिद असुन, आजूबाजूला घरांचे पडके अवशेष दिसतात. दरवाज्या जवळील दोन बुरुज धरुन, किल्ल्याला एकुण २४ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला वेगवेगळी नावे आहेत.
जंजिर्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तेथील प्रवेशव्दाराच्या वरील बाजुस नगारखान्या शेजारी असणार्या तीन तोफा. कलालबांगडी, चावरी व लांडा कासम अशी या तोफांची नावे आहेत.
शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक ‘पद्मदुर्ग’ नावाचा
मजबूत किल्ला उभारला होता. तरीही जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकलं
नाही. पद्मदुर्ग हा किल्ला जंजिरा किल्ल्यानजीक पाच-सहा कि.मी.वर आहे.
बोटीने जाऊनच हा किल्ला पाहता येतो. मुरुडयेथे एम.टी.डी.सी.तर्फे
पर्यटकांसाठी निवास व्यवस्था आहे.
No comments:
Post a Comment