जमा खर्च
लग्न ठरल्यानंतरचा आनंद, लग्नाची खरेदी, प्रत्यक्ष लग्नाचे विधी यांमध्ये दिवस कसे भुर्रकन उडून जातात ते कळतही नाही. यानंतरच खरा संसार सुरू होतो. राजाराणीचा स्वतंत्र संसार असेल तर मात्र आपल्यावर खूप मोठी जबाबदारी येते.
लग्नाआधी जरी आपण कमवत असलो तरी कुटुंबाच्या रोजच्या गरजेसाठी आपला प्रत्यक्ष हातभार कमी असतो. तोही बहुतेकदा ऐच्छिक. लग्नानंतर मात्र सर्व खर्च स्वत:च करावे लागतात. लग्नाआधी असे खर्च करावे लागत नसल्यामुळे आपण याविषयी विचार केलेला नसतो. आता मात्र अशा खर्चासाठी बजेट बनवणे गरजेचे ठरते. योग्य नियोजन नसेल तर होणा-या खर्चावर नियंत्रण राहणे अशक्य होऊन बसते. हे रोजचे खर्च दिसायला जरी कमी मूल्याचे असले तरी महिन्याच्या शेवटी एकत्रितपणे हा खर्चाचा आकडा आपल्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर व बचतीवर परिणाम करू शकतो.
हल्ली प्रसारित होणारी एक जाहिरात आपण बघितली असेलच. यात नवरा खूपसा खर्च हा पुस्तकांवर करत असतो आणि बायको अर्थातच त्याच्या या अतिरेकी खर्चावरून त्याला टोमणा मारते. तेव्हा बँक त्याच्या मदतीला येते. तिचे म्हणणे असते की तुमच्या खर्चाचे प्रकार आहेत, प्रत्येक प्रकारच्या खर्चावर तुम्ही तुमची मर्यादा ठरवा, त्या मर्यादेच्या बाहेर जर त्या खर्चाच्या प्रकारात खर्च केलात तर तुम्हाला तुमचे ‘ओव्हरस्पेंडिंग’ निर्देशित केले जाते.
हे असे बजेट आपण स्वत:च तयार करू शकतो. मिळकतीचे चार भाग करा. पहिला म्हणजे छोट्या मुदतीची गुंतवणूक म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट; दीर्घ मुदतीची म्हणजे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट, बचत आणि खर्च. या चारही भागांत आपल्याला आपल्या मिळकतीचा किती टक्के भाग वाटायचा आहे ते ठरवा.
एकदा गुंतवणूक आणि बचत किती करायची याचा आकडा अंदाजे ठरवला तरी उरलेली मिळकत ही खर्चासाठी वापरू शकतो. खर्च या मर्यादेच्या बाहेर गेला तर तुमची बचत कमी होईल. आपण आपल्या गुंतवणुकीच्या रकमेवर परिणाम होऊ देऊ नका. खर्च जास्त होत असेल तर गुंतवणूक कमी करू, असे अजिबात करू नये. कारण दीर्घ मुदतीत नेहमीच खर्चाचा आकडा वाढता राहणार असतो, तो आपल्या गुंतवणुकीवर म्हणजेच भविष्यातल्या कमाईवर परिणाम करू शकतो. म्हणूनच खर्चाची तडजोड गुंतवणुकीशी कधीच करू नये.
खर्चाची विभागवारी करतानाही आवश्यक खर्च, मनोरंजन, ऐष अशी करावी. सुरुवातीला हे सर्व खूप त्रासदायक वाटेल. पण एकदा आपण या खर्चांवर नियंत्रण मिळवले, की असे कागदावर बजेट करायची गरजच राहणार नाही. कारण नंतर नंतर आपल्यालाच अंदाज येतो खर्चाचा. आपली आई नाही का तिच्या खर्चाचे वर्गवारीनुसार नियंत्रण करत? तिचा अंदाज खूपदा बरोबरच असतो; पण जर तिचा अंदाज चुकला तर मात्र ती त्यासाठी तिच्या बचतीतले पैसे खर्च करते.
म्हणूनच आधी आपले खर्च, त्यांची योग्य वर्गवारी आणि प्रत्येक प्रकारात करावयाचा खर्च याचा अंदाज घेणे गरजेचे आहे. अर्थात कितीही आधी तयारी केली तरी या खर्चांचा अंदाज लग्नानंतर प्रत्यक्ष संसाराला सुरुवात केल्यावरच येतो. म्हणूनच लग्न झाले नसेल तर लग्नाचा मौसम एन्जॉय करा आणि नुकतेच झाले असेल तर मात्र आपले बजेट तयार करायला घ्या, लगेच.
No comments:
Post a Comment