स्वत:ला स्वीकारणं ही आनंद मिळविण्याची आणि यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. स्वत:चं वर्णन करा. उंच, स्मार्ट, सावळा, गोरा, सुंदर, कुरूप, प्रामाणिक अशी विशेषणं वापरा. आता वाचणं जरा वेळासाठी थांबवा. डोळे बंद करा, विचार करा आणि हे स्वत:चं वर्णन जमल्यास लिहून काढा.
जेव्हा आपण स्वत:चं असं वर्णन करतो तेव्हा कळत नकळत आपण स्वत:ची तुलना आपल्या शेजाऱ्यांशी, नातेवाईकांशी, मित्रांशी किंवा अॅक्टर्सशी करतो. आपल्याला जो इतरांकडून अनुभव येतो त्यावरून आपण ठरवतो की, आपण उंच आहोत किंवा गोरे आहोत किंवा हुशार आहोत.
जेव्हा आपण स्वत:चं असं वर्णन करतो तेव्हा कळत नकळत आपण स्वत:ची तुलना आपल्या शेजाऱ्यांशी, नातेवाईकांशी, मित्रांशी किंवा अॅक्टर्सशी करतो. आपल्याला जो इतरांकडून अनुभव येतो त्यावरून आपण ठरवतो की, आपण उंच आहोत किंवा गोरे आहोत किंवा हुशार आहोत.
तुम्हाला असं वाटत असतं की, तुम्ही बारीक आहात. पण जेव्हा तुमच्याहून बारीक असलेलं कोणी तुमच्या नजरेस आलं तर तुम्ही म्हणाल, ‘मी बारीक आहे, पण त्याच्याइतका किंवा तिच्याइतकी नाही.’ आता कोणाशीही तुलना न करता तुम्ही स्वत:चं वर्णन करणं शक्य आहे का? नाही! जोपर्यंत आपण स्वत:ची तुलना दुसऱ्यांशी करीत नाही तोपर्यंत आपण स्वत:चं वर्णन करू शकत नाही. हेच आपल्याला पहिल्यापासून सांगण्यात येतं. त्यावर आपला विश्वासही बसतो, पण हे खोटं आहे. माझे जेव्हा आत्मविकास या विषयावर कार्यक्रम होतात तेव्हा त्यातली पहिली पायरी असते ती म्हणजे स्वत:चा विकास.. कोणत्याही तुलनेशिवाय!
तुम्ही चांगले आहात आणि कोणत्याही बदलाची तुम्हाला आवश्यकता नाही हा दृष्टिकोन लोकांमध्ये यावा म्हणून मी त्यांना प्रोत्साहन देत असतो. मी जो काही आहे तो चांगलाच आहे, माझं जे काही आहे ते चांगलं आहे. जरी मी तापट डोक्याचा असेन, आळशी असेन, जाड, ठेंगणा असेन, आंधळा असेन, पण ते चांगलं आहे. तुम्ही जे काही आहात, पण स्वत:वर प्रेम करा.
माझ्या आत्मविकासाच्या कार्यक्रमात, लोकांनी स्वत:वर प्रेम करावं म्हणून मी त्यांचं मन वळवत असतो. त्यांच्यातले उत्तम गुण शोधण्यासाठी, त्यांच्यातला वेगळेपणा शोधण्यासाठी त्यांना मदत करतो. निसर्गाने त्यांना जे काही बहाल केलंय त्याच्यावर प्रेम करायलाही सांगतो. मनात काहीही न ठेवता स्वत:चा स्वीकार करण्यात सगळ्यात मोठा अडथळा तुलनेचा असतो, असं मला वाटतं.
लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती, ‘बदकाचं कुरूप पिल्लू’. हे पिल्लू त्याच्या बाकी भावंडांपेक्षा इतकं वेगळं दिसायचं की, त्याला स्वत:बद्दल कमीपणा वाटायाला लागला. पण एक दिवस मात्र त्या पिल्लाने सुंदर राजहंस पाहिले. मग त्याच्या लक्षात आलं की, आपण तर त्या राजहंसासारखेच दिसतो. त्या पिल्लाने स्वत:ला कुरूप बदक नावाचा शिक्काच मारलेला असतो. पण खरं म्हणजे एका दयाळू बदकाने त्या सुंदर राजहंसाला दत्तक घेतलेलं असतं.
पालक, शिक्षक आणि समाज आपली तुलना करतच असतात. तो तुझ्यापेक्षा इतका हुशार कसा? तुझ्या बहिणीलाच कसे नेहमी जास्त मार्क्स पडतात? हा दृष्टिकोन मुलांमध्ये खूप खोलवर रुतत जातो आणि त्याची परिणती म्हणजे स्वत:बद्दल वाटणारा कमीपणा.. आणि जर लहान मुलांचं नेहमी दुसऱ्यांशी तुलना करून कौतुक केलं तर त्यांना इतर मुलांहून वरचढ वाटायला लागतं. मध्यंतरी माझ्या एका कार्यक्रमानंतर एक आई माझ्याकडे आली. तिने तिच्या मुलामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा, असं मला विचारलं. तेवढय़ात अजून एका मुलीची आई आली आणि म्हणाली, ‘अरे बापरे, आणि माझ्या मुलीमध्ये जास्तच आत्मविश्वास आलाय. तिला जमिनीवर आणण्यासाठी मी काय करू?
उत्तर आहे, त्यांची तुलना करू नका. मुलं जशी आहेत तसाच त्यांचा स्वीकार करा. आणि त्यांनासुद्धा स्वत:चा स्वीकार करण्यास प्रोत्साहन द्या. ती मुलं कोणा दुसऱ्यापेक्षा वाईट किंवा चांगली नाहीत. ती कशीही असली तरी चांगलीच आहेत.
स्वत:ला स्वीकारणं हे मीडियामुळेही आजकाल जास्तच कठीण झालं आहे. टीव्हीवरच्या जाहिरातीमुळे आपल्याला स्वत:बद्दलच कमीपणा वाटायला लागतो आणि आपण ती उत्पादनं विकत घेतो. यामुळे त्या कंपनीला नफा होतो. त्याचा परिणाम थेट आपल्या आत्मविश्वासावर होतो. कृत्रिमपणे उभ्या केलेल्या मॉडेल्स, अॅक्टर्स यामुळे मोठाच प्रॉब्लेम समोर येतो.
आत्मविकासाची दुसरी पायरी म्हणजे सवय, प्रशिक्षण आणि शिकण्याद्वारे स्वत:चा विकास साधणे.. सर्जरी नाही, मेडिकेशन नाही, महागडय़ा वस्तू नाहीत.. या पायरीवरही तुम्ही स्वत:ची तुलना दुसऱ्या कोणाशी करीत नाही. तुमची स्पर्धा तुमच्याशीच असते. तुम्ही काल किंवा परवा जसे होता त्याहून जास्त चांगले होण्याचा प्रयत्न आज करीत असता. तुम्ही आदर्श म्हणून कोणाकडे तरी बघत असाल, पण तुम्ही त्या व्यक्तीसारखंच होण्याचं ध्येय ठेवत नाही. तुम्ही त्या व्यक्तीपुढे स्वत:ला कमी लेखत नाही. उलट ती व्यक्ती तुम्हाला कसं शिकवेल कसं प्रोत्साहन देईल आणि तुम्ही स्वत:ला कसं आव्हान देता यासाठी तुम्ही त्या आदर्श व्यक्तीचा उपयोग करून घेता.
तुम्ही जाड आहात असं तुम्हाला वाटतंय, तरीही तुम्ही स्वत:वर प्रेम करता. पण वजन कमी करायचं असं ध्येय तुम्ही ठेवू शकता. यशस्वी झालात तर उत्तमच, पण नाही झालात तरी स्वत:च्या कष्टाचं कौतुक करा आणि पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही स्वत:ला ओरडू शकता, पण स्वत:चा द्वेष करू नका. तुम्ही नेहमी स्वत:ला स्वीकारून स्वत:वर प्रेम केलं पाहिजे.
मी आता दुसऱ्या पायरीवर उभा आहे. माझा अभ्यास चालू असतो, सराव चालू असतो मी प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी होतो. मला एक सत्य माहिती आहे की, मी स्वत:ला बदलू शकत नाही, पण मी अजून चांगला होऊ शकतो याची मला खात्री आहे आणि स्वत:चा विकास हेच माझं ध्येय आहे. अजून चांगलं लिहिण्याचा, चांगलं बोलण्याचा, माझी शिबिरं उत्तम करण्याचा, स्वत:ला नेहमी फीट ठेवण्याचा मी सतत प्रयत्न करीत असतो.
जर तुम्हाला ही युक्ती आवडली असेल तर लगेच करून पाहा. वयाची अट नाही. पहिली पायरी- स्वत:चा स्वीकार. तुम्हाला पहिली पायरी पार करायला कदाचित बरेच महिने लागतील. पण स्वत:ला पूर्ण स्वीकारल्याशिवाय दुसऱ्या पायरीकडे वळू नका.
No comments:
Post a Comment