Thursday, 15 March 2012

महालक्ष्मीचं उदं उदं .......




 
 
दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर म्हणजे यात्रेकरूंचं तीर्थक्षेत्र मानलं जातं. देवी महालक्ष्मी ही तर खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर संस्कृतीचा वारसा जपत दिमाखाने उभं आहे. त्याकाळी केलेलं मंदिरावरील कोरीव काम, शिल्पशास्त्रानुसार केलेली मंदिराची उभारणी वाखण्याजोगी आहे आणि मंदिराचा इतिहास तर अभ्यासण्याजोगा आहे.

कोल्हापूरची एक प्रसिद्ध आख्यायिका सांगण्यात आली आहे ती अशी, - पूर्वी कोल्हापूरला पद्मापूर म्हणून ओळखलं जायचं. पद्माक्ष नावाचा राजा येथे राज्य करीत होता आणि त्याची कन्या पद्मावती. देवीची पुरातन मूर्ती ही त्या पद्मावतीसारखी होती असे म्हटले जाते. त्याकाळी शंकराचे वरदान मिळालेला केशी नावाचा राजा दक्षिणेला राज्य करीत होता. त्याला देव किंवा मानव ह्यांच्यापासून भयमुक्त केले होते, त्यामुळे त्याला मरणाची भीती नव्हती.
केशी पद्मापूरावर चाल करून गेला आणि त्याने राजा पद्माक्षचा वध केला व राजकन्या पद्मावतीला राज्यातून हाकलून दिले. असाह्य राजकन्या उत्तरेकडील बद्रीकाश्रमात गेली व तेथे तिने केदारनाथाची तपश्चर्या केली. केशीने पद्मापूरचं नामकरण केशीपूर असे केले. उन्मत्त झालेल्या केशीचा मानव आणि देवांना उपद्रव होऊ लागला. इंद्रदेवाच्या सांगण्यावरून देवलोक तक्रार घेऊन भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णूने गयासूर नावाच्या राक्षसाला केशीला मारण्याची विनंती केली. गयासूराने कोल्हागिरी येथे राहणारा आपला भाऊ कोल्हासूर याच्या सहाय्याने केशीवर हल्ला केला.
केशीपुत्र हेती आणि प्रिहेती यांनी मिळून कोल्हासुराचे शंभर पुत्र मारले. कोल्हासुराने प्रथम हेती आणि प्रिहेतीचा वध केला आणि नंतर केशीला यमसदनास पाठविले. त्यानंतर कोल्हासूर केशीपूरावर राज्य करू लागला. देवी महालक्ष्मीच्या कृपेने कोल्हासूरचे कोल्हापूर झाले. कोल्हासूरला करवीर, विशालख्या, लज्जासूर आणि कुलांधकेतु नावाचे चार पुत्र होते. कोल्हापूरचे सिंहासन बळकावण्यास करवीरला यश आले.
कोल्हासूरासमवेत रत्नासूर, महिशासूर, रक्तभोज, चंदा, मुंडा, मणी, मल्ला, मधु, कैतब नावाचे आणखी काहि राक्षस विष्णु आणि शंकराच्या वरदाने उन्मद झाले होते. प्रजेला त्यांचा उपद्रव होऊ लागला. विष्णूने कोल्हासुराचा भाऊ गयासूर व लवनासूर आणि त्याचा मुलगा विशालख्या यांचा वध केला. विधिहारीने लज्जासुराचा वध केला.
ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या शक्तीने आणि रवळनाथ आणि केदारनाथ यांच्या मदतीने देवी लक्ष्मीने कोल्हापुरात युद्ध सुरू केले, या युद्धात महालक्ष्मीसमवेत कालिका, उज्वलंबा, कतियानी, कामाक्षी, चामुंडा, चारपतंबा तर रवळनाथ आणि केदारनाथ यांच्या समवेत रंकाभैरव, काळभैरव, सिधागन आणि भुतागन यांनी राक्षसांचा पाडाव केला. कोल्हासूरपुत्र करवीर रुद्राकडून मारला गेला.
महालक्ष्मीने दक्षिणेला राक्षसांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. तिने तीर्थक्षेत्रे स्थापन केली. त्यामधील एक तीर्थक्षेत्र म्हणजे करवीर नगर म्हणजेच कोल्हापूर.

शिल्पशास्त्राच्या इतिहासाप्रमाणे इ.स. ५५० ते इ.स. ६६० मध्ये चालूक्य राजवंशातील मंगलेश राजाच्या काळात प्रथम मंदिर उभारण्यात आले. त्यानंतर गंधारादित्य राजघराण्यातील शिलाहारचा पहिला राजा जतिकच्या राजवटीत मंदिराचा शिल्पशास्त्रानुसार जीर्णोद्धार करण्यात आला. पूर्व-पश्चिम ३५० फूट तर उत्तर-दक्षिण २२५ फूट व उंचीला ४५ फूट असं एकंदरीत २७,००० चौ. फूट असलेलं हे मंदिर हेमांडपंथी पद्धितीचे आहे.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे. देवळाच्या भिंतीवर नर्तिका, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्‌साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.मंदिराच्या उत्तरेकडील घाटी दरवाज्यावर अवाढव्य अशी घंटा बसविण्यात आली आहे.
मंदिरामध्ये गदा, ढाल, शंख, चक्र धारण केलेली ५० किलो वजनाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. देवीला कर्नाटक पद्धतीने साडी परिधान केली जाते. शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट शिवाचं प्रतीक ठरतं, शरीराचा आकार म्हणजे विष्णूचं प्रतीक तर डोक्यावरील नागफणा म्हणजे ब्रह्माचं प्रतीक असलेली महालक्ष्मीची मूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेशाचं चिन्हांकित रूप आहे. गाभाऱ्याच्या मुख्य कमानीवर गणपतीची प्रतिमा बसविण्यात आली आहे.
मंदिराच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला महाकाली, डाव्या बाजूला महासरस्वतीची स्थापना करण्यात आली आहे तर समोरील बाजूस श्री गणपतीची स्थापना केलेली आहे.
सन १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा काबीज केल्यावर मंदिराला भेट देऊन महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला होता. राजाराम महाराजांची पत्नी व शिवाजी महाराजांची स्नुषा ताराबाईने अंबाबाईच्या आशीर्वादाने १७०० ते १७१२ या कालावधीत राज्य केलं.
राजाराम महाराजांचे पुत्र दुसरे संभाजीराजे (इस.पू. १७१२ ते १७६०) याने मुस्लिमांपासून मूर्तीचे रक्षण करण्यासाठी मूर्ती मंदिराचे पुजारी यांचे कपिलतीर्थ येथील निवासस्थानी हलविण्यास सांगितली व नंतर मराठा सरदार सिधोजीराव हिंदुराव घोरपडे यांना सांगून ८ नोव्हेंबर १७२३ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर मूर्तीची पुनस्र्थापना करण्यात आली.

महालक्ष्मीच्या तेजाला झळाळी चढते ती देवीच्या अस्सल बावनकशी अलंकाराची. सोन्याचा किरीट, सोन्याची कुंडलं, सोन्याचे मयूर, सोन्याची ठुशी, सोन्याचा गळसर,सोन्याचा चपलाहार, पुतळ्याची माळ, सोन्याची कंठी, चिंचपेटी, गोलपक्षी, चंद्रहार, बोरमाळ,म्हाळुंग, हा दागिन्यांचा खजिना आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा. नवरात्रोत्सवाच्या काळातमहालक्ष्मीच्या अंगावर या मौल्यवान दागदागिन्यांचा साज चढविला जातो. देवीचं ऐश्वर्यडोळे दीपवून टाकणारं आहे. हे दागदागिने अत्यंत प्राचीन आहेत.
कोल्हापूरचे राजे दुसरे संभाजी यांनीही महालक्ष्मीला दागिने अर्पण केले होते. देवीच्याखजिन्यात असलेल्या या दागिन्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे या दागिन्यात हिरे ,माणिक, मोती बसविले आहेत. सर्वसामान्यांपासून ते राजे-महाराज्यांपर्यंत महालक्ष्मी अनेकांच कुलदैवत असल्यामुळं भक्त आपल्या यथाशक्ती देवीच्या चरणी दान अर्पण करतात.
या दागिन्यांमध्ये महालक्ष्मीचं रुप अत्यंत लोभस दिसत.  साडेतीन शक्तीपीठापैकी प्रमुखपीठ अशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ख्याती आहे. नऊ दिवस देवीला नखशिखांत दागिन्यांनी सजवलं जातं. देवीचं हे रुप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी दरवर्षी लाखो भक्त येतात.  देवीचे हे दागिने नवरात्रौत्सवाच्या काळातच पाहायला मिळतात. देवीच्या अंगावर सजविण्यात येणाऱ्या या दागिन्यांनी सर्वसामान्य महिलांना मोहिनी घातली नाही तर नवलच.
साक्षात तिरुपतीसारखे यजमान असलेल्या महालक्ष्मीचं देखणेपण अवर्णनीय असंच आहे. नवरात्रीत देवीची वेगवेगळी रुप पाहायला मिळतात. नवरात्रीदरम्यान देवीच्या खजिन्यातील सगळे दागिने देवीच्या अंगावर घातले जातात. महालक्ष्मीवर श्रद्धा असणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य़ांपासून ते नेते आणि अभिनेत्यांचाही समावेश आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडूलकर आदींची महालक्ष्मीवर अपार श्रद्धा आहे आणि त्या श्रध्देतूनच या दिग्गजांनी देवीच्याचरणी दागिने अर्पण केले आहेत. देवीचं हे ऐश्वर्य याचि देही याचि डोळा पाहण्याचा अनुभव काही वेगळाच आहे.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे सर्वात वेगळेपणं म्हणजे नवरात्रीच्या काळात महालक्ष्मीच्याबांधल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आकर्षक पूजा. नऊ दिवस महालक्ष्मीची नऊ रुपे भक्तानांपाहायला मिळतात. मुळातच तेजोमय असलेल्या महालक्ष्मीच्या मूर्तीच्या पूजेचा साजपाहण्यासाठी भक्त नऊही दिवस अलोट गर्दी करतात.
 
पहाटे चार, सकाळी साडेआठ, साडेअकरा, संध्याकाळी साडेसात व रात्री साडेनऊ असा दिवसातून पाच वेळा घंटानाद केला जातो. पहाटे पाच वाजता काकड आरती, साडेआठ वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी दोन वाजता अलंकार पूजा, रात्रौ आठ वाजता धुपारती तसेच रात्रौ दहा वाजता शेजारती करण्यात येते व १०.३० वा. मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येते.
दर शुक्रवारी सकाळी आठ वाजता देवीच्या पालखीची मिरवणूक काढली जाते त्यामध्ये भालदार, चोपदार, पुजारी यांचा समावेश असतो. पालखीमध्ये चांदीची उत्सवमूर्ती चांदी-सोन्याच्या वर्खाचे कपडे आणि दागिन्यांनी सजवली जाते. मिरवणूक गणपती मंडपातून बाहेर पडते, उत्तरेकडून दत्त मंदिराकडे नेली जाते. नंतर तलावावरील मणिकर्णिकामार्गे घाटी दरवाज्याकडून अगस्ती लोपमुद्रा मंदिराला भेट देऊन परत व्यकंटेश मंदिरात आणली जाते.

 कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते.या दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभाऱ्यापर्यंत पोहचतात आणि तेथून ते महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहचतात आणि तेथून हळूहळू तिच्या मस्तकापर्यंत जातात. हा चमत्कार जवळ जवळ पाच मिनटांपर्यंत चालतो. या दिवशी देवीला खास प्रार्थना केली जाते. हा चत्मकार पहाण्यासाठी भाविक मोठया संख्येने जमा होतात. हा मुहूर्त पुजारी पंचांग पाहून ठरवितात. देवळाची बांधणीच अशातऱ्हेने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.

एप्रिल महिन्यात रथोत्सव साजरा केला जातो. चांदीची उत्सवमूर्ती रथामध्ये ठेवून त्याची मिरवणुकीला शासकीय सलामी देऊन महाद्वारातून संध्याकाळी साडेसात वाजता रथोत्सवाला सुरुवात होते. सोबत पोलिस बॅण्डची साथ असते. रथयात्रा शहारातून जाते, वाटेत फुलांच्या भल्या मोठय़ा रांगोळ्या काढल्या जातात, फटाके वाजवण्यात येतात तसेच वेगवगळी सांस्कृतिक पथकं मिरवणुकीत भाग घेतात व आपल्या कलेचं प्रदर्शन करतात.
अश्विन महिन्यात देवीचा शरदिया नवरात्रौत्सव साजरा केला जातो. नित्य चालणाऱ्या पूजेअर्चेच्या वेळेत बदल केला जातो. स. साडेआठ व साडेअकराला अभिषेक केले जातात. दुपारी दोन वाजता महानैवेद्य व आरती झाल्यावर देवीला अलंकाराने सजविले जाते. दहा दिवस रात्रौ साडेनऊ वाजता उत्सवमूर्तीला फुलांनी सजवून व रोषणाई करून मिरवणूक काढली जाते ती गरूड मंडपात पूर्ण होते. देवीला शासकीय सलामी दिली जाते. देवीला वेगवेगळी रूपं दिली जातात. मंदिरात महालक्ष्मी ट्रस्टतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दहाव्या दिवशी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील व्यंकटेश देवस्थानातर्फे आलेल्या मानाच्या साडीची मिरवणूक काढली जाते व नंतर ती साडी देवीला परिधान केली जाते. संध्याकाळी ५ वाजता उत्सवमूर्तीची मिरवणूक काढली जाते व दसरा चौकात सीमोल्लंघन उत्सव साजरा केला जातो.
मंदिरामध्ये अश्विन पौर्णिमा, कार्तिक स्नान, तुलसी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव विशेषरित्या साजरे केले जातात.


--------- लोकप्रभा

No comments:

Post a Comment