Tuesday, 6 March 2012

साडेतीन शक्तिपीठे






जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मंगल त्याच्यापुढे नतमस्तक होणे हा मानवाचा स्वभाव आहे आणि म्हणूनच सृष्टीतील ज्या शक्तीचे रहस्य मानवाला आकळले नाही त्या शक्तीभोवती त्याने देवत्वाची वलये गुंफली आणि तिची उपासना करू लागला

आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत विराट, विश्वाकार आहे. चंदसुर्याचे नेत्र असलेली, हरितसृष्टीचे दिव्यांवर परिधान करणारी, नवजीवनाचे आश्वासन देणारी, प्रसंगी स्वकर्तव्याची कठोर जाणीव करून देणारी दु:खी मानवाला आपल्या कुशीत घेणारी, प्रसंगी वात्सल्यसिंधू तर कधी रणचंडीचे उग्र रूप धारण करणारी ही अदिशक्ती नाना प्रकारच्या प्रतिकांतून प्रकट होते.

या अदिशक्तीची काश्मीर, कांची व कामाख्या अशी तीन पीठे आहेत. यांना शक्तिपूजेची तीन मुख्य केंदे मानली जातात. या प्रमुख तीन पीठांचा वा शक्तिकेंदांचा ज्यात समावेश केला जातो अशी एकूण ५१ शक्तिपीठे भारतात आहेत. ही शक्तिपीठे कशी निर्माण झाली याविषयी तंत्रचूडामणी नावाच्या गंथात एक कथा आहे. ती अशी- प्रजापती दक्षाने एक यज्ञ आरंभला. त्या यज्ञासाठी त्याने सर्व देवऋषींना आमंत्रित केले, परंतु आपला जावई भगवान शंकराला बोलावले नाही. तरीही सती आपल्या वडीलांनी सुरू केलेल्या यज्ञासाठी गेली. दक्षाने तिच्या देखत शंकराची निंदा केली. त्यामुळे संतापलेल्या सतीने यज्ञकुंडात उडी घेतली. हे समजताच शंकर संतापला. त्याने दक्षासकट त्याच्या यज्ञाचा नाश केला. मग यज्ञकंुडातील सतीचे कलेवर खांद्यावर घेऊन तो त्रैलोक्यात संचार करू लागला. शंकराचा हा उन्मत्तावस्थेतील संचार थांबावा म्हणून विष्णूने सुदर्शन चक्र सोडून कलेवराचे तुकडे तुकडे केले. 

यातील ५१ तुकडे पृथ्वीवर जेथे जेथे पडले त्या ठिकाणी एक एक शक्तीपीठ तयार झाले.  त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत. महाराष्ट्रात शक्तीचा जागर हरप्रकारे केला जातो. अखिल विश्वाला व्यापणा-या शक्तीने विविध रूपांतून असुरी शक्तीचा नाश करत नवनिर्मितीचा संदेश दिला आहे. ही शक्ती  साडेतीन शक्तिपीठांच्या रूपाने जागृत आहे.

पहिले पीठ कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे


साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले पीठ कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे. ‘शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते’, ‘नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी’ असे महालक्ष्मीचे वर्णन करवीर माहात्म्य ग्रंथात आढळते. वैकुंठनायक
विष्णूची अर्धांगिनी असलेल्या या  महालक्ष्मीच्या हातात शंख, चक्र, गदा ही आयुधे आहेत. महालक्ष्मीचे मंदिर वास्तुमापन क्षेत्राचा आदर्श मानले जाते. या मंदिर बांधणीत दिशासाधन यंत्राचा वापर अतिशय सुंदर साधला गेला आहे. याचा प्रत्यय माघ शुद्ध पंचमीस येतो. सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे महालक्ष्मीच्या मुखावर येतात. त्या वेळी महालक्ष्मीचे रूप अत्यंत विलोभनीय दिसते. महालक्ष्मीबद्दल दंतकथा प्रचलित आहेत. अनेक संत-महात्म्यांनी या मंदिराच्या पावन भूमीत वास्तव्य केले आहे. चैतन्य महाप्रभू, संत बहिणाबाई यांच्याप्रमाणेच शिवाजी महाराजसुद्धा प्रतापगडच्या युद्धानंतर येथे थांबल्याचा उल्लेख कागदोपत्री सापडतो. करवीरवासिनी महालक्ष्मीला श्रीहरी विष्णूचा अवतार तसेच तिरुपती बालाजीची पत्नी समजले जाते. कोल्हापुरातील महालक्ष्मीचा नवरात्रोत्सव अत्यंत मनोहारी असतो. नऊ दिवस देवीसाठी वेगवेगळी वाहने बांधण्यात येतात. अभिषेक, पूजन, कुंकुमार्चन असे विविध कार्यक्रम या नवरात्रात घेतले जातात. कोल्हासुर नावाच्या दैत्याला ठार करणारी ही अंबाबाई आजही तेवढ्याच आश्वस्तपणे भक्तांसाठी खंबीरपणे उभी आहे. कलियुगातील कोल्हासुराचा नाश करण्यासाठी तुम्हा-आम्हा सर्वांना ती आज साद घालते आहे- उठा, सज्ज व्हा, संघर्ष करा. आजूबाजूच्या दैत्यांचा नाश करून आपले स्थान मिळवा. आपले अस्तित्व आपणच निर्माण करा, असा संदेश ही कोल्हासुरमर्दिनी आम्हास देते आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आजही या शक्तिपीठाचे महत्त्व तेच आहे, फक्त संदर्भ मात्र बदलले आहेत.

भवामि शक्तिरूपेण करोमि व पराक्रमम्

गौरी, ब्राह्मी तथा रौद्री वाराही वैष्णवी शिवा


वारुणी चाथ कौबेरी नारसिंहीच वासवी आदिशक्ती विश्वात, चराचरात वास्तव्य करून उरली आहे. तिचा जागर करणे आमचे कर्तव्य आहे.

दुसरे शक्तीपीठ माहूरगडची रेणुकामाता

पैनगंगेच्या तीरावर वसलेले माहूरगड, हे साक्षात रेणुकामातेचे निवासस्थान आहे. ही रेणुकामाता म्हणजे जमदग्नी ऋषींची पत्नी, परशुरामाची आई. जमदग्नीच्या क्रोधामुळे पुत्राकडूनच तिचा शिरच्छेद केला जातो. पुत्राच्या आज्ञापालनामुळे पिता जमदग्नी ऋषी पुत्र परशुरामाला वर माग म्हणतात. परशुराम आईला पुन्हा
जिवंत करावे, असा वर मागतो. ती पुन्हा जिवंत होते; पण जमदग्नी क्रोधित होऊन पत्नीला ‘तू इथून चालती हो’ म्हणतात तेव्हा ती पतीला उ:शाप मागते. तेव्हा जमदग्नी ‘तू जेथे जाशील तेथे तुझा जयजयकार होईल’ असा उ:शाप देतात. हीच ती रेणुकामाता. प्रत्येक युगात वेगवेगळ्या नावाने हा गड ओळखला जात होता. कृतयुगात आमली ग्राम, त्रेतायुगात सिद्धपूर, द्वापारयुगात देवनगर व कलियुगात मातापूर इ. नावाने हे स्थान ओळखले जाते. मातापूरचा अपभ्रंश होऊन माहूर हे नाव रूढ झाले. देवीला दररोज दूध-पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. या मंदिरात नंदादीप कायम तेवत असतो. त्याच्या प्रकाशात मातेचा चेहरा अत्यंत तेजस्वी व देदीप्यमान दिसतो. मातेबद्दल असेही वर्णन आढळते :

रेणुराजाची दुहिता । जमदग्नीऋषीची कांता

परशुरामाची माता । ही तर नाती नंतरची
म्हणजेच प्रथम ती रेणुराजाची कन्या आहे. जमदग्नीची पत्नी आहे. परशुरामाची माता आहे. त्यामुळे बाकीची जी नावे व नाती तिला मिळाली ती नंतरची आहेत. अशा प्रकारे ही रेणुकामाता विविध रूपांनी भक्तांना तारते, पावते. आज काळानुसार तिचे पावणे आपल्यासाठी प्रेरक ठरणार आहे. आपल्यातही रेणुकामातेचा अंश आहे. आपणही कन्या, पत्नी, माता या भूमिकांमधून जाताना या शक्तीप्रमाणेच अत्यंत जीव ओतून प्रत्येक काम करतो आणि त्या कामाचं फलस्वरूप म्हणजेच आपलं जीवन समृद्ध करतो. या मातेची उपासना, पूजा आपण केली पाहिजे ते तिचं ममत्व, तिचं सामर्थ्य, तिची निष्ठा या गुणांना आपल्यात जोपासत. तरच या तिच्या शक्तिरूपाचा प्रत्यय येईल.

तिसरे पीठ तुळजापूरची भवानी माता

साडेतीन शक्तिपीठांपैकी तिसरे पीठ म्हणजे तुळजापूरची भवानी माता. बालाघाटच्या डोंगरकड्यांमध्ये हे तुळजापूर शहर आहे. तिन्ही बाजूंना डोंगर व दाट हिरवळ, झाडी अशा या निसर्गरम्य डोंगरकड्यामध्ये ही भवानी माता वास्तव्यास आहे. गंडकी शिळेपासून बनविलेली ही मूर्ती अतिशय सुंदर, रेखीव आहे. अष्टभुजा असलेली ही मूर्ती महिषासुरमर्दिनी आहे. अष्टभुजांपैकी प्रत्येक भुजेमध्ये वेगवेगळी शस्त्रे आहेत, तर दोन
भुजांमध्ये एका हाताने महिषासुराची शेंडी पकडली आहे, तर दुसºया हाताने एक भलामोठा भाला त्याच्या छातत खुपसते आहे. सज्जनांचं रक्षण व दुर्जनांचा   नाश करणारी ही मूर्ती आजही उभी आहे, दुर्जनांना नष्ट करण्यासाठी. तिने आपली तलवार शिवाजी महाराजांना दिली, मोगलांचा नाश करण्यासाठीच. भवानी मातेचे तुळजापूरचे मंदिर अत्यंत जुने असून, हेमाडपंती रचनेत आहे. देवीला नानाविध अलंकारांनी सजविले जाते. शिवाजी राजांनीदेखील भवानी मातेला पुतळ्यांची माळ अर्पण केली होती. नऊ दिवस वेगवेगळ्या वाहनांवरून देवीचा छबिना निघतो, तर भेंडीळीचा कार्यक्रम एक आगळा-वेगळा असतो. भेंडीळीमुळे वाईट गोष्टींचा नाश होतो, असा हेतू भेंडीळीमध्ये असतो, तर गोंधळ हा देखील भवानी मातेच्या उपासनेचाच एक भाग समजण्यात येतो.

अधर्माचे निखंडन करून धर्माचे उत्थान करण्याकरिता देवीने अनेक अवतार घेतले. त्यापैकीच हा तुळजाभवानीचा अवतार मानला जातो. कर्दम ऋषी पत्नी अनुभूतीसह राहत असतात. अत्यंत ज्ञानी, तपस्वी
अशा कर्दम ऋषींचा अचानक मृत्यू होतो. अनुभूती सती जाण्याची तयारी करते; पण लहान मुलगा असल्याने तिला सती जाऊ नको, असे सांगितले जाते. तेव्हा ती ते मान्य करून तपस्विनीचे जीवन जगण्याचे ठरवते. तिच्या रूपावर लुब्ध होऊन कुकुर राक्षस तिला स्पर्श करतो. त्यामुळे तिची तपश्चर्या भंग पावते आणि क्रोधित होऊन ती भगवती देवीची आर्ततेने प्रार्थना करते, तेव्हा अष्टभुजा महिषासुरमर्दिनी धावत येते व कुकुराचा नाश करते. तेव्हा लोक तिच्या नावाचा ‘तुरजामाता की जय’ हा घोष करतात. तुरजा म्हणजे वेगाने जाणे, याचाच अपभ्रंश तुळजा झाला व हेच नाव कायम रूढ झाले.


अशा प्रकारे आपल्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून आली ती तुरजा. आजही ती आपल्याही हाकेला धावून येईल; पण त्यासाठी आपल्यात तिला हाक मारण्याचे सामर्थ्य वाढवले पाहिजे. 
अर्धपीठ वणीची देवी सप्तश्रृंगी

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी सप्तश्रृंग हे अर्धपीठ
आहे पृथ्वीतलावर उच्छाद मांडून देवदेवता आणि मानवांना ठार करून त्रस्त करून सोडलेल्या महिषासुरास आदिमाया पार्वतीने ठार करून जे निवासस्थान शोधले ते म्हणजे वणी येथील सप्तश्रृंगगड. नाशिकच्या उत्तरेस सह्यादीच्या सातमाळा डोंगराच्या रांगेत हा गड आहे. या गडाला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तश्रृंग म्हणतात. या डोंगराच्या सात शिखरावर इंदायणी, कातिर्की, शिवा, चामंुडा, वैष्णवी, वाराही आणि नरसिंही या सात देवता वास्तव्य करतात. देवीच्या समोरील डोंगराला मार्कंडेयाचा डोंगर म्हणतात. नाशिकपासून ५८ किलोमीटरवर गडाच्या पायथ्याला हे गाव आहे. गड चढून मध्यसपाटीवर पोहचले की सप्तश्रृंग हा हजाराहून अधिक लोकवस्तीचा गाव लागतो. येथून देवीपर्यंत जाण्यास ४७२ पायऱ्यांचा टप्पा चढून जावे लागते. पर्वतशिखरांच्या मधोमध गुहाकृती अशी १९ फूट उंचीची कपार आहे. त्या कपारीत खोलवर महिरप कोरली असून त्या महिरपातच श्री सप्तश्रृंगी देवीची आठ फूट उंच अशी मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती  भव्य, शेंदूरचचिर्त रक्तवर्णी आहे. देवीला १८ हात असून प्रत्येक हातात एकएक आयुधे आहेत. या देवीला अष्टभुजा महालक्ष्मी समजतात. देवीची मूतीर् पूर्वाभिमुख असून सकाळी ती बाला, दुपारी तरूणी आणि सुर्यास्तकाळी वृद्धारूप भासते असे मानले जाते. नवरात्रात तर येथे यात्राच भरते. लाखो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. 






No comments:

Post a Comment