Wednesday, 7 March 2012

कोकणातली होळी






हिंदू पंचांगात संपन्न होणाऱ्या सणामध्ये कोकणात सर्वाधिक महत्त्व असलेला सण म्हणजे होळी. काम धंद्यानिमित्त कोकणाबाहेर असणारी मंडळी सर्व अडचणींवर मात करीत होळीचा सण साजरा करण्यासाठी आणि ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गावी हजेरी लावतात. कोकणात ग्रामदेवतेच्या उत्सवाला मोठे महत्त्व असते. येथील मंडळी नोकरी व्यवसायात कितीही मोठी झाली आणि दूरवर गेली तरी होळीच्या सणाला ग्रामदेवतेच्या पालखीपुढे नतमस्तक होण्यासाठी येतातच.  लाल मातीच्या गाभ्यात उभ्या केलेल्या पोफळी-आंबारूपी होळीच्या ज्वाळा अंधार भेदून गगनाला भिडू पाहतात त्यावेळी कोकणी माणसांना काबाडकष्ट करण्यासाठी वर्षभराची ताकद मिळालेली असते. तर चाकरमान्यांना गच्च भरलेल्या ट्रेनच्या गदीर्त लोंबकळण्यासाठी, मुंबईतला संसार रेटण्यासाठी, गावच्या आवशी, बापाशीक-मोठ्या भावाक आधार देण्यासाठी जोर आलेला असतो. 

होळीचा सण म्हणजे कोकणवासियांच्या उत्साहाला कमालीचे उधाण येणारा समजला जातो. फाक पंचमीला पहिल्या होळीला सुरवात झाली की, पालखी राजांगणी जाईपर्यंत कोकणातील गावकऱ्यांमध्ये होळीचा ज्वर भरलेला असतो.

तळकोकणात वेंगुर्ल्याचे गावकरी 'होळी' (पोफळीची झाडं) नाचवत घेऊन येत असताना पाठीमागून पोरांनी शिमग्याच्या आधीच चावट गाणी सुरू केलेली असतात. तर तिकडे वर कोकणात गुहागरकडे गोमूच्या नाचाची प्रॅक्टिस सुरू असते.  चाकरमानी बायकापोरांसकट, पैसे गाठीक बांधून तो गावाला निघालेला असतो. होळीच्या दिवसांत देवही देऊळ सोडून खांब्याच्या रूपाने चव्हाट्यावर आलेले असतात..... भक्तांची गा-हाणी ऐकण्यासाठी!

कणकवलीत घाडीगावकरच्या अंगात अवसर आलेला असतो. अंग घुमायला लागतं, दोन्ही डोळे बंद करून, मुठी आवळून, सा-या शक्तीनिशी घुमणाऱ्या या झाडाला आपली व्यथा सांगितली की ती नक्की पूर्ण होणार असा विश्वास.

हू हू हू हू...


' देवा...माझ्या चेडवाचा लगीन जमना नाय. खूप यत्न केले. दिसाक बरा, कामाक वाघ. कोणच्याय घरात पडला तर नाव काढीत. आवशी बापाशीक पुन्हा बघुक नको. पण, असा काय होता! इलेली माणसा पुन्हा फिरनत
नाय कित्याक... आम्ही कोणाचा काय वायट केला नाय, मग आमच्याच मागे किलेस कित्याक?'

अवसाराच्या तोंडून देव बोलतो...

हू हू हू हू...

' तुका काळजी कित्याक? मी काय ता बघून घेतंय. वर्साच्या आत लगीन जमतालाच. ही विभूत घे! पुडी लाल धाग्यात चेडवाच्या गळ्यात बांध! इलो माणूस मागे जावचोच नाय! देवांक विसरा नको. त्याची सेवा कर. जा!'

देवाची 'विभूत' घेऊन बाबी सावंत चेडवाकघेवन देवाच्या पाया पडता. मोठ्या उत्साहानं तो आता बेबल्याचा लगीन जमवण्यासाठी बाहेर पडणार असतो. लेकीच्या डोक्यार तांदुळ पडलेत आणि खळ्यात पंक्ती उठलेत, असं चित्र आताच त्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागलेलं असतं. मुलीच्या लग्नाचीच गोष्ट नाही तर हरवलेलं ढोर, सतत आजारी पडणारा मुलगा, कोर्टकचेरी यापासून त्याला सुटका हवी असते आणि देऊळ सोडून चव्हाट्यावर आलेल्या देवाला तो हक्काने याची सोडवणूक करण्यासाठी विचारणा करतो. प्रश्ान् श्ाद्धा व अंधश्ाद्धेचा नसतो. भरवशाचा असतो! आधाराचा असतो!! होळीच्या निमित्ताने केलेल्या कामासाठी देवाकडून मिळवलेल्या संरक्षणाचा असतो.

वर दापोलीत बुरोंडी गावात देव देऊळ सोडून पालखीच्या रूपाने लोकांच्या दारी येतो. देव दारी येणार म्हटल्यावर घरोघरी उत्साहाने कळस गाठलेला! मुंबईत पोटापाण्यासाठी धावणारी सारी माणसं
पोराटोरांसकट गावच्या घरी. अंगण शेणाने सारवून सज्ज. सड्यावरच्या गेरूने घराला तांबडा लखलखीत रंग आणि त्यावर चुन्याच्या नक्षी. पक्ष्याच्या, प्राण्याच्या, फुलांच्या, वेलींच्या. भांडीकुंडीही घासून स्वच्छ. नवा भात गिरणीला लावून आणलेला. वस्तीसाठी आलेला देव आणि त्याबरोबरची वाडीवरच्या माणसांच्या जेवणाची जय्यत तयारी. देव अंगणी येऊन गेला, याचा आनंद शंकर साळवीला वर्षभराचे कष्ट करण्यासाठी नवीन उमेद देणारा असतो. यासाठी तो वाडीकरांची आणि देवाची सेवा करण्याची एकही संधी सोडत नाही. घरातल्या पोरांना देवाच्या पायाशी घालतो आणि जयजयकाराने वाडी दणाणून निघते...

हुरा रे हुरा!
आमच्या भैरी बुवाचा सोन्याचा तुरा!!

गणपतीनंतर कोकणात नवचैतन्य आणणारा सण म्हणजे होळी. वरच्या कोकणात गुहागर, श्ाीवर्धनपासून चिपळूण, रत्नागिरीपर्यंत होळीला एकच धम्माल! गणपतीपेक्षा होळीला या भागात खूप महत्त्व. पाच दिवस, सात दिवस अग्नीच्या साक्षीने साजरा करायचा आनंद! खऱ्या अर्थाने हा लोकोत्सव असतो. लोकांनी लोकांसाठी लोकांकरता साजरा केलेला सण. भट-बामणांचा आधार न घेता! पूजाअर्चा मानकरी असलेल्या कुणबी, मराठ्यांनीच करायची. शिमग्याला भटजी लागत नाही. प्रत्येक गावानुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. रत्नागिरीच्या पट्ट्यात सुरमाड, पोफळी, आंबा अशा वेगवेगळ्यात रूपात होळी सजते. होळी जाळण्यासाठी आपल्या बागेतून झाडे देण्यासाठी चुरस असते. पण होळी कुठून आणि कुठली आणायची यासाठी कौल लावला जातो, देवाला विचारणा होते! देवाने सांगितलं की सारा गाव होळी आणण्यासाठी बाहेर पडणार. ढोलताशाच्या गजरात, नाचत, गात ती गावात देवळाच्या समोर
किंवा परंपरेनुसार ठरलेल्या जागी आणली जाते. आणि सुरू होतो शिमगा, पौणिर्मेच्या अगोदर तीन, पाच, सात दिवस. पौणिर्मेला मुख्य होळी जळण्याच्या अगोदर सारी वाडी, सारा गाव शिमगामय होतो. देवळाच्या मुख्य मंडपाच्या माडीवर ठेवलेली पालखी खाली आणली जाते. ही पालखी व त्यातले देव हा या सोहळ्याचा मुख्य गाभा असतो. तिला नवे रूप लावले जातं. रूप म्हणजे सजवणं. पालखी आणि मुख्य देवाच्या चांदी-पितळेच्या रूपातल्या मूतीर्ला दागिने, कपडे, नक्षीकामाने सजवलं जातं. माणगावपेक्षा सावडर््याची पालखी सरस असली पाहिजे, असं समस्त शिंदे मानकऱ्यांच्या बैठकीत ठरलेलं असतं. माणगावच्या राण्यांनी तोंडात बोट घातली पाहिजे, बस्स! आपला गाव, आपली पालखी!!

पालखी उचलायची कुणी, ती कुठल्या वाडीतून न्यायची, ती कुठे प्रथम थांबवायची, जागरण कुठे, जेवण कुठे, 
खेळे कुठे हे सारं सारं ठरलेलं आहे आणि त्याचा निर्णय पन्नास-साठ वर्षांमध्ये झालेला नाही, तर पार शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून त्याचा इतिहास आहे. आदिलशहाच्या राजवटीत कोकणातल्या महसूल वसुलीसाठी मराठे सरदारांना गावं वाटून देण्यात आली होती. पुढे शिवाजी महाराजांच्या काळातही ती प्रथा कायम राहिली आणि पुढे त्याची वहिवाट झाली. अनेक वाड्यांच्या मिळून बनलेल्या गावांमधून दस्त गोळा केला जाई आणि त्याची जबाबदारी एका सरदाराकडे असे. तोच त्या गावचा पुढारी. बारा-पाचाचे मानकरी त्यामधूनच निर्माण झाले.

गावचा कारभार बलुतेदार पद्धतीने हाकला जायचा. सोनार, चांभार, महार, कुंभार, मांग, बुरूड, कोळी, मुलाणी, ब्राह्माण अशा बलुतेदारांकडून गावच्या गरजा पूर्ण केल्या जात आणि त्याच्या बदल्यात या साऱ्यांना गाव आश्ाय देई. मुख्य मानकरी, जमीनदार त्यांना आपल्या जमिनीत घर बांधायला परवानगी देई. त्यांच्या पोटापाण्याची सोय करी. फक्त त्यांनी गावची कामं इनामेइतबारे करायची. त्यांनी केलेल्या कामाचा
मोबदला म्हणून धान्य, अडल्या नडलेल्या मदत, घराकुसासाठी झाडपेड दिलं जायचं. बलुतेदारी पद्धतीने आता आतापर्यंत गावं सुखी होती. खूप सुखात नव्हती, पण दोन वेळच्या पोटापाण्याची सोय होती. बलुतेदाराचं दु:ख सारा गाव आपलं समजायचा. अडल्यानडल्या प्रसंगी त्याच्या मदतीला धावून जायचा. वेंगुर्ल्यात तर परबांनी एका बलुतेदाराला फक्त होळीचा खड्डा काढण्यासाठी कसायला आणि राहायला जमीन दिली. त्याचं गावासाठी वर्षातून एकच काम. फक्त होळीचा खड्डा काढायचा आणि होळी पौणिर्मेच्या दिवशी समस्त मानकऱ्यांच्या रांगेत उभे राहून गाऱ्हाणं घालायचं. गाव करील तो राव काय करील!

याच बलुतेदारीने गावच्या जत्रा, होळी, दसरा हे सार्वजनिक सणाचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. १५ व्या शतकाचा इतिहास याला साक्ष आहे. होळीच्या निमित्ताने गावच्या वर्षाचा कामाचा आढावा घेतला जायचा.
गावातला एखादा माणूस शिरजोर झाला तर होळीला गाऱ्हाण घातलं जायचं.

खाली सावंतवाडीत आकेरी गावात पेटत्या होळीच्या समोर देवळाचा पुजारी घाडीगावकर मानकऱ्यांच्या रांगेत उभा राहून पालखीतल्या देवाला साद घालायचा.

रे म्हाराजा! बारा ऱ्हाटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हाराजा!!
आज तुका सांगण्याक कारण म्हाराजा!
पालवाचो तुकलो, गावाक ऐकना नाय, देवाक भिना नाय
तू कायता बघून घे,
वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची साल वडाक

लावून तेचेच दांत तेच्याच घशात घाल रे म्हाराजा!
वर्षाच्या आत, तुझो गुण दाखव म्हाराजा!
होळीच्या खुटावर नाक घाशीत येव दे म्हाराजा!

घाडीचा गा-हाणं संपता संपताच सा-या गावक-यांचा एक सूर लागायचा... व्हय म्हाराजा!!

या गाऱ्हाण्यात प्रत्यक्षात देवालाच न्यायाधीश केल्याने, पालव आधीच टरकलेला असायचा. त्यातच गावच्या
अघोषित बहिष्कारामुळे वर्षभरात त्याच्या नाकातोंडात पाणी जाई आणि नाक घासत तो पुढच्या होळीला गावाची, गावकऱ्यांची क्षमा मागे.

चुकी झाली रे म्हाराजा
गाव, देव सांगीत तसा वागान रे म्हाराजा,
ढोर चुकला, पण वाटेक इला
आता घरात घे, पेज पाणी सुखान खाव दे!

गावकरीही त्याला मोठ्या मनानं क्षमा करत आणि होळीच्या समोर त्याने ठेवलेलं पाच नारळाचं तोरण, पेढ्यांनी आलेल्या गावकऱ्यांचा तोंड गोड होई. माजोऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोकणात देव, सण यांचा आधार घ्यायचा, ही प्रथा पूवीर्पासूनची. नंतर कोर्ट-कचेऱ्यांचा आधार घेतला गेला, पण खूनखराबा तसा नाही. एकमेकांची डोकी फोडलीत किंवा एखाद्याला साफ खल्लास केला, असं उदाहरण विरळाच. वर्षानुवर्षं जिवाच्या आकांताने भांडतील, उरावर बसतील पण जीवावर उठणार नाहीत.
खरंतर आपला गाव, आपली पालखी याचा मार्ग ठरलेला. पण सत्ता व पैशाचा माज गावरहाटी बदलू पाहतोय. पण, अशी उदाहरणं हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकी. नवलाई, पावणाई, सातेरी, माऊली, रामेश्वर, वेताळ, रवळनाथ, वेतोबा या देवांचा धाक अजूनही कमी झालेला नाही. होळीवेळी तो प्रत्यक्षात साकारतो, इतकेच!

होळी रे होळी पुरणाची पोळी!
सायबाच्या बोच्यात बंदुकीची गोळी!!
हाय रे हाय!
दळव्याच्या संज्यात काय दम नाय!!
नावेर्कराच्या बैलाचा ढोल!
आणि तावड्याच्या नानाची टांग!!

होळीचा होम धडधडून पेटू लागला की या आणि यासारख्या असंख्य 'फाक' गुहागरपासून ते शिरोड्यापर्यंत वाडीवाडीत ऐकू येतात. मूठ आवळून तोंडावर नेत बो बो बो... करत सारा आसमंत गाजवून काढायची हीच
असते संधी. शिवाय वाडीत खालीपिली त्रास देणा-यांच्या नावाने शिमगाही घालायचा असतो तो याचवेळी. नावासकट आणि तो समोर असताना. यावेळी सबकुछ माफ!

पालखी निघाली की अख्खा गाव तिच्या मागे. सावंत वाड्यातून जगताप वाडीत, बुरोंडी गावातून लाडघरपर्यंत नेताना पालखी नाचवणं हा भन्नाट प्रकार वर्षभराचे कष्ट विसरायला लावणारा. लाकडी कोरीव अशी ही पालखी शंभर दोनशे किलोची, पण 'सिंगल फसली' माणसं एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर, डावीकडून उजवीकडे, चारही दिशांना गोल गोल नाचवू लागली की थक्क व्हायला होतं. तीच गोष्ट होळीनिमित्त बाहेर पडणाऱ्या तळकोकणातल्या तरंगाची. हे तरंग नुसते खांद्यावर घेतले की हट्ट्याकट्ट्या माणसालाही घाम फोडणारे. पण एखादा शरीराने दुबळा तरंगकरी अवसार संचारल्यावर तरंग एकहाती नाचवतो. देवळाच्या प्रवेशद्वारावरून थेट गाभाऱ्यात शिरताना एका दमात शंभरेक किलोचे तरंग घेऊन जाताना त्याला मिळणारी ताकदही अचंबित करणारी!

कुठून येते ही शक्ती?

पालखी वाडी वाडीतून, तसंच एका गावच्या सीमेवरून दुसऱ्या गावात शिरताना सारा माहोल भारलेला असतो. शेकडो माणसं दहा-दहा मैल अंतरावर तहानभूक विसरून घराघरावरून पालखी नेणार. सीमेवर दोन गावच्या पालख्या एकेमकांना सामोऱ्या जातात त्यावेळी सारा आसमंत ढोलताशांच्या आवाजात दणाणून निघतो. हणैर्ंची पालखी मुरुडच्या पालखीला सामोरी गेली की दोन बहिणीच भेटल्याचा आनंद होतो. यावेळी एकमेकांच्या गावाची, गावकऱ्यांची, देवळाची विचारपूस होणार. वळणावर थोडी विश्रांती आणि प्रसादाची देवाणघेवाण झाली की पालख्या आपल्या ठरलेल्या मार्गावरून पुढे निघणार. ज्या ठिकाणी ही पालखी थांबेल तो त्या दिवसाचा राजा. हा राजा मग जमलेल्या प्रजेसाठी प्रसंगी कर्ज काढून जेवणावळ घालणार.

' देव उपाशी नाय गेला पायजेल, माझ्या दारातून
भलं वरीसभर मी उपाशी राहीन, पण देवाचं पॉट रिकामी राहिलं नाय पायजेल...'

खरंतर देव जेवणार नसतो. देवाच्या निमित्ताने गाव जेवणार असतं आणि देवालाच तो गावाच्या रूपाने बघत असतो. दापोली, दाभोळपासून महाड, चिपळूण आणि रत्नागिरी ते थेट राजापूरपर्यंत पसरलेल्या बहुजन 
समाजासाठी होळी म्हणजे दिवाळी! नवीन लग्न झालेल्यासांठी तर देवदिवाळी! नवीन जोडप्यांचा जणू सोहळाच. मुंबईत पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करणाऱ्या बहुजनांमधले युवक लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाणार नाहीत, पण होळीला आपल्या गावी बायकोसकट हजर. पालखी जाऊन बसते, त्या सहाणेवर डोकं ठेवलं म्हणजे लग्नानंतरचं आपलं आयुष्य सुखी राहणार, यावर दृढ श्ाद्धा. वर्षभर पोरगा आला नाही तर चालेल, पण होळीला आलाच पाहिजे, असा आईबापाचा खास आग्रह! सहाणेवर डोका ठेवून म्हातारा आपल्या पोरासाठी हात जोडणार...

' माझा पक्या दूर मुंबईत. त्याची किरी वारी दूर कर. त्याच्या हाताला यश दे, पोटाला अन्न दे. वंशाला दिवा दे. पहिला पोरगा होऊ दे. राण्यांची वंशावल वाढू दे... पुढच्या येलेला सहाणेवर नारलाचा तोरण, पेढे ठेवन, गावाला जिलबीचं जेवणही घालीन.'

एकदा पालखीला हात जोडले की पक्या गण्या, मन्या, तुक्या, अज्यासकट शिमगा खेळायला मोकळा. पणसूद गावात तर भांगेसारख्या असलेल्या घोट्याने पाच दिवस धमाल. चढणाऱ्या घोट्याने अंग अंग पिसासारखं
झालं की साऱ्या गावात पंख पसरून उंडगायचा मुक्त परवाना. कोणाच्या नावाने शिव्या घाला, कोणाच्या बागेतली केळी, शहाळी खा, कोणाची लाकडं उचलून होळीत घाला... नुसती धम्माल. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता मुक्त परवाना दिलेला लोकोत्सव!

गुहागरकडे तर वाडी वाडीवर भांगेच्या वड्याच वाटल्या जातात. एकदा या वड्या दुधाबरोबर खाल्ल्या की मग कशाचीच शुद्ध राहत नाही. जेवायला लागला तर जेवतच राहतो. झोपला की दिवसभर उठतच नाही. बडबडायला लागला की सर्वांची पळापळ... याचवेळी साऱ्या पाच दिवसात खेळे, नमन, सोंगे, शबय, गोमू,
दशावतार, जाखडी नाच यांनीही समुदावरच्या भाटापासून ते डोंगरातल्या वाडीपर्यंचा अख्खा कोकण गजबजून जातो. खेळे नमन, जाखडी नाच, दशावतार चव्हाट्यावर, देवळात... तर सोंगं, गोमू, संकासूर, राधा दारोदारी.

पासेर्कर दशावतार मंडळाचा स्त्रीच्या वेषातला पुरुष, राधा, मुदृंगाच्या तालावर फेर धरते आणि वेंगुर्ल्यात जणू नाटकच आकार घेतं. हाताच्या तालावर पायांना नाचावत गिरकी घेत राधा गाते, 'सांगा मुकुंद कुणी हा
पाहिला...'

मालवणी राधा शुद्ध मराठीत गाणार! संकासूराला मात्र मालवणीत दे धमाल करण्याची मुभा.


' तुमच्या आवशीच्या घोवाक वागान खाल्यान तो... वाग काय खातलो म्हणा तुमच्या बापशीक. त्याका खावन वागच स्वर्गात जायत. रे मेल्यानो ताँड काय बगतास? घरात जावन काय तांदुळ-बिंदुळ, नारळ-बिरळ, पैशे घेवन येवा.'

राधा, संकासूराचा मान द्यावाच लागतो. तर, गावातली पोरंटोरं 'शबय' मागणार. दोन पैसे कमावणार.

ऐनाका बायना, घेतल्या बिगर जायना,
पेटीको चावी लगता है
हमको पैसा मिलता है
चोर चोर कामाठी,
उंदरानं पळवली लंगोटी,
उंदराची आय कवट खाय,
पेटीत पैसे ठेवले हाय...

तर तिकडे चिपळूण, मंडणगडला 'शेरणी' काढताना पालखीचा भन्नाट नाच व देवावरची श्रध्धा असा अनोखा संगम बघायला मिळतो. मोकळ्या चव्हाट्यावर एक ठिकाणी नारळ पुरला जातो आणि तो पालखीने शोधून काढायचा. खुल्या मैदानात पालखीच्या नाचाला उधाण येते... खांदेकरी अशा काही किमयेने पालखी नाचवतात 
की एक क्षण आपल्याला वाटते की ती निसटणार तर नाही, पण हवेत हलकाच झोक घेत ती पुन्हा खांद्यावर  
स्थिरावते तेव्हा काळजात कुठेतरी धस्स झालेलं असतं. अचानक मोराच्या पिसासारखी भासणारी पालखी जड जड होत जाते आणि खांदेकरांच्या तालावर नाचण्याऐवजी तीच त्यांना घुमवायला सुरुवात करते. खेचत खेचत खांदेकऱ्यांनाच पालखी नारळ पुरलेल्या ठिकाणी घेऊन जाते आणि तिचा खूर आपटला जातो... पुरलेला नारळ सापडतो!

उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी म्हणण्याचा काळ औद्योगिकरणाच्या रेट्यात खाडीमागेर् समुदात वाहून गेला त्याला पाऊणशे वर्षं उलटून गेली. कुणबी व बलुतेदारी हातात हात घालून नांदत होती, तोपर्यंत गावकुसाला महत्त्व होतं. पण शेती आतबट्ट्याची झाली, सर्व व्यवहार पैशात होऊ लागल्यामुळे दापोलीपासून शिरोड्यापर्यंतच्या घरटी माणसाला शहरांचा आधार धरण्यावाचून पर्याय उरला नाही. पोटासाठी दाही दिशा पसरलेल्या कोकणी माणसाला आजही लाल मातीची, आपल्या कौलारू घराची, पडिक बनलेल्या जमिनीची ओढ लागते ती जत्रा, गणपती आणि होळीच्या निमित्ताने. तेच आज त्याच्या उरल्यासुरल्या आशेचा आधारवड बनलेत... 





No comments:

Post a Comment