Tuesday, 6 March 2012

शिवरात्र







वद्य चतुर्दशी हा दिवस महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देव हिंदू संस्कृतीप्रमाणे जन्म, पालन आणि अंत यांचे प्रतिनिधी दैवत आहेत. महेश म्हणजेच शिव, रुद्र, शंकर. या शिवाची उपासना वेदकालापासून भारतात रूढ आहे. शिव अर्थात रुद्र ही संहारक देवता आहे. मग या संहारक देवतेला प्रसन्न करून घ्यायचे, तिचा आशीर्वाद मिळवायचा तर तिची पूजा अर्चा, मंत्र, जप, होमहवन, व्रत आणि उपवास हे आलेच. यातूनच शिवआराधना, पूजा सुरू झाली. श्रीरामानेही अनेक ज्योर्तिलिंगांची स्थापना करून पूजा केल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. भारतात असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांचा संबंध रामाशी आहे. बहुतेक ज्योर्तिलिंगे रामस्पर्शाने पावन झालेली आहेत. किंबहुना ती रामानेच स्थापन केलेली आहेत. शिवआराधनेने सकल मनोकामना पूर्ण होतात आणि मोक्ष मिळतो, असाही समज आहे. प्रत्येक महिन्यात शिवरात्र ही तिथी असतेच. जसे पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती करणारे वारकरी आजन्म वारी आणि एकादशी करतात तसेच शिवभक्ती करणारे शिवरात्र व्रत करतात.

प्रत्येक देवदेवतांच्या पूजेचा, आराधनेचा आणि त्यांच्या फळपुष्पांचा ठरावीक नियम आहे. शिवपूजा ही बेलपत्र अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून शंकराच्या पूजेत नेहमी बेलपत्र असते. तीन पानांचा संदर्भ
ब्रह्मा, विष्णू, महेशाशी आहे. रुद्र संहारक असला तरी भोळा आहे. श्रद्धेने केलेल्या भक्तीने लगेच प्रसन्न होतो. आणि हवा तो आशीर्वादही देतो. शिवरात्रीविषयी एक श्रद्धायुक्त कथा आहे. आपणास रात्रीच्या वेळी आकाशात अनेक नक्षत्र, तारे दिसतात. त्यात एक मृगनक्षत्र असते. त्यात दिसणा-या मृग आणि व्याधाची कथा शिवरात्रीदिवशी घडली. या दिवशी व्याधाच्या हातून नकळत सहस्र बिल्वदलांचा अभिषेक शिवाला झाला. चुकून शिवाचे नामस्मरणही घडले. आणि योगायोगाने त्या दिवशी त्याला उपाशी राहावे लागले म्हणून उपासही घडला. अशा वेळी त्याला मृग दिसला, त्याने मृगाला मारण्यासाठी बाण उचलला; पण त्याच क्षणी तो मृग मनुष्यवाणीने बोलू लागला. ‘मी माझ्या पिलांना भेटून येतो, मग तू मला मार.’ व्याधाने त्याला जाऊ दिले. मृगही दिलेल्या वचनाप्रमाणे पाडसाला भेटून परत आला; पण तोपर्यंत शिवरात्रीदिवशी नकळत घडलेल्या शिवआराधनेमुळे व्याधाच्या मनातला दुष्टपणा जाऊन तेथे मायेचा ओघ सुरू झाला होता. त्याने मृगाला जीवदान दिले. त्याच्या या सत्कृत्यामुळे शिवशंकराने विमान पाठवून व्याधाला आणि मृगाला कैलासी नेले. त्या दोघांना त्याने अक्षय स्थान दिले. तेव्हापासून शिवरात्रीचे व्रत सुरूझाले. महाशिवरात्रीची रात्रही खूप मंगल समजली जाते. संपूर्ण दिवस आणि रात्री जो मनापासून शिवशंकराचे स्मरण, पूजन, आराधना, उपास करतो तो शिवस्थानी विराजमान होतो, असा समज आहे.  म्हणून प्रत्येक महिन्याची शिवरात्र नाही केली तरी चालते. मात्र, महाशिवरात्र करावी, असे म्हणतात. या रात्री शिवासमोर शिवरात्र वात लावण्याचा प्रघात आहे. ही वात अखंड सुतापासून केलेली 750 पदरी असते. यामुळे मनातला अंधकार नाहीसा होऊन शुचितेचा प्रकाश अंत:करणात प्रकटतो.

शिवरात्रदिवशी कवठाचे फळही मुद्दाम खातात, कारण कवठातील बियांमध्ये अमृतकण असतात असा समज आहे. आध्यात्मिक, धार्मिक भावनेने शिवरात्र माहात्म्य आपण पाहिलेत. हे जरी कोणाला पटत नसेल तरी महाशिवरात्र करायला हरकत नाही. कारण त्या निमित्ताने आपण एका चैतन्याचा अनुभव घेतो. एका खूप मोठ्या धार्मिक संप्रदायात असल्याचे मानसिक समाधान मिळते. मुळातच माणूस हा समाजप्रिय आहे. त्यामुळे समाजातल्या चालीरीती तो सहज स्वीकारतो. उपवास म्हणजे नुसता खाण्यात बदल नाही, तर जास्तीत जास्त देवाच्या सहवासात राहण्याचा तो एक मार्ग आहे. खाण्यावर नियंत्रण ठेवून शरीराची व निर्मल मनाने पूजाअर्चा केल्याने मनाची शुद्धता होते. हे सर्वात महत्त्वाचे आहे. फक्त हेच कारण सांगून व्रत, उपवास
करा म्हटले तर कोणी करणार नाही, म्हणून पूर्वजांनी याला अध्यात्माची जोड दिली असून त्याभोवती सुंदर गोष्टींची गुंफण केलेली आहे. त्यामुळे त्याला एका धर्मभावनेचे वलय प्राप्त होते. 

या वलयाचा अनुभव तुम्हीही घेऊ शकता शुद्ध, सात्त्विक भावनेने महाशिवरात्र उपवास करून.




No comments:

Post a Comment