पाऊस भुरभुरत होता. हातातली पिशवी, धोतर, क्षणोक्षणी चिखलाशी चपक चपक
करून हितगुज करणाऱ्या चपला आणि वरच्या दांडीजवळच्या तारेच्या घोड्यातून दर
तीन मिनिटाला फटक करून मिटणारी छत्री सावरीत मी वाट काढीत होतो. अंगावरून
जाणाऱ्या मोटारी धोतरावर चपलेने काढलेल्या चिखलाच्या नक्षीवर
स्प्रे-पेंटिंग करीत होत्या. घर तब्बल तीन फर्लांगांवर राहिले होते. तीन
मिनिटे झाली असावी, कारण तारेच्या घोड्यातून निसटून छत्री पुन्हा एकदा
‘जैसे थे’ झाली आणि संकटांनी सोबत घेऊन यावे ह्या नियमाला अनुसरून त्या
वळणावर एक भली मोठी मोटारगाडीही आली. मोटारवाल्याने डोके बाहेर काढले.
त्याने गाडी थांबवली दार उघडून तो बाहेरच आला. माझ्याकडे रोखून पाहू
लागला. त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर एक स्मिताची रेषा उमटली. ओठावरच्या
कोरलेल्या मिशीची एक बाजू वर गेली. त्याने डोळ्याचा काळा चष्मा काढला आणि
त्याचे ते तरतरीत डोळे पाहिल्याबरोबर एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
"बबडू!"
"हॅस्साला--" माझ्या खांद्यावर जोरात हात ठेवीत बबडू म्हणाला. "मला वाटलं की स्कालर लोक आठवण विसरून गेले."
"वा! विसरायला काय झालं--" झोपेत जाबडल्यासारखे मी बोललो.
"पण
मला मात्र साला जरा टायम लागला हां तुझी वळक पटायला. पण तू म्हणालास ‘जाऊ
दे, जाऊ दे--’ तेव्हा वाटलं की आवाजाची ष्टाइल माह्यतीची आहे. म्हटलं, बगू
स्कालर लोकांना वळक लागते की नाय."
"म्हणजे बबडूच हा!" मी धुंडिराजासारखे हळूच स्वगत म्हणून टाकले.
"गाडी झकास आहे रे! कुणाची?"
"आपलीच." त्या गाडीकडे ऐटीत पाहत बबडू म्हणाला.
"म्हणजे तुझी स्वत:ची?"
"हा! दोन हायत. एक जुनं माडेल आहे--फार्टीएट्ची फोर्ड आहे! डबडा; पण साली लकी गाडी आहे! ठेवून दिली तशीच. ही प्याकाड आहे."
"वा! पॅकार्ड म्हणजे काय प्रश्नच नाही."
मला
फक्त उच्चारच बरोबर येत होता. बबडू तसा वर्गात अतिशय लोकप्रिय! वर्गातल्या
शेवटल्या बाकावर बसून गाढ झोपायचा. मास्तरही त्याच्या वाट्याला फारसे जात
नसत!
बबडूच्या केसांची बट शाळेत येत होती तशीच होती. दात मात्र घाणेरडे दिसत होते. त्यांतला एक सोन्याने मढविलेलाही होता.
"चल बस ना--" गाडीचा दरवाजा उघडत बबडू म्हणाला.
"अरे नको! कशाला? इथेच तर जायचं आहे."
"अरे ठाऊक आहे मला. तुझं घर सालं विसरलो नाय मी. तुझ्या आईनं एकदा बेसनलाडू दिला होता--मदर आहे का रे तुझी?"
"आहे!"
पाच वर्षांच्या तुरूंगवासात त्याची भाषा बदलली असावी.
"ये." मी बबडूचे सागत केले.
"आई, ओळखलंस का याला?"
"पाह्यलासारखा वाटतो--"
"अग,
हा बबडू-- माझ्या वर्गात होता तो." हे म्हटल्यावर आईला इतके दचकायचे कारण
नव्हते. आईचे दचकणे बबडूच्या लक्षात आले नसावे. आईने हातकड्यांची खूण करून
तुरूंगात गेला होता तोच ना हा, असे विचारले. मी चटकन "हो" म्हटले.
माझ्या
पुस्तकांनी भरलेल्या कपाटाकडे एक अत्यंत आदरयुक्त नजर फेकून बबडू बोलायला
लागला. "तुला माह्यत हाय--सालं आपलं न् बुकांचं कधी जमलंच नाय! घोसाळकर
मास्तर आहे का डाइड झाला रे?"
"गेल्या वर्षी वारले!"
"च्!
साला फस्क्लास मास्तर होता. इंग्लिश काय फायन् बोलायचा. साला एक अक्षर
कळत नव्हतं मला, पण साला मी आपला ऐकत बसायचा. बस, इंग्लिश त्याच्यासारखा
बोलणारा नाय पाह्यला. इंग्लंडमधे असता साला तर डोक्यावर घेऊन नाचले असते."
घोसाळकर
मास्तरांच्या मरणाने त्यांच्या शिष्यांपैकी एकही माणूस इतका हळहळला नसेल.
मास्तर चांगले होते, अतिशय सात्विक आणि प्रेमळ होते. पण इतके
हळहळण्यासारखे होते असे मला वाटले नाही.
"तुझ्या मनाला घोसाळकर मास्तर मेल्याचं फारच लागलेलं दिसतयं--"
"काय सांगू तुला--" आणि बबडूचे डोळे चटकन पाण्याने भरले. कोणी असे रडाबिडायला लागले की माझे अवसानच जाते.
"पाच
वर्षे तुरुंगात राह्यलो. साले डाकू लोक होते त्यांना पण भेटायला त्यांचे
भाऊबंद यायचे, पण साला पाच वर्षात--त्यातली चार महिने चांगल्या
वागणुकीबद्दल कमी झाली माझी शिक्षा; पण चार वर्षे आणि चार महिने..."
"म्हणजे चार वर्षे आठ महिने.." मी शाळेतदेखील त्याला अशीच उत्तरे सांगत असे.
"तुरूंगात
काढले, पण बस् एक माणूस भेटायला आला नाय! ना बाप, ना दोस्त, ना कोण! कोण
आल असेल भेटायला? साला मी तर एकदम चकरभेंड होऊन गेलो. वार्डरनी बाहेर
नेलं-तर घोसाळकर मास्तर! मी म्हटलं, ‘मास्तर तुम्ही?’"
"पण घोसाळकर मास्तर तुला भेटायला आले?"
"अरे, ती पण एक ष्टोरी आहे. साली फिल्ममधे पण असली ष्टोरी नाय मिळत."
"पण त्यानंतर इतक्या वर्षात इतका पैसा कसा मिळवलास?"
"बस बाबांची कृपा आहे!" डोळ्याला आंगठी लावली.
जाताना त्याने वाकून आईच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला.
"औक्षवंत
हो. अशीच चांगली घरं बांध. आम्हांला चांगली जागा दे त्यात. हे घर आता
अपुरं पडतं आम्हांला. सुना आल्या, नातवंडं आली..." बबडूच्या नमस्काराला
आईने तोंड भरून आशीर्वाद दिला.
बबडूने मोटारीत बसता बसता सिगारेटकेस उघडली. आतून सिगारेट काढून मला दिली.
"अरे नको!"
"अरे, संडासात जाऊन ओढ! आईसाह्यबांचा मान ठेवतोस, चांगलं आहे." एक सिगरेट स्वत: पेटवली आणि गाडी पुढे चालवली.
मी
त्याच्या पाठमोऱ्या गाडीकडे पाहत उभा राहिलो. हातातली सिगारेट चटकन खिशात
दडपली. टेबलावर शंभराच्या नोटा तशाच पडल्या होत्या. ‘एक हितचिंतक’ ह्या
नावाने घोसाळकर गुरूजींच्या पवित्र स्मरणार्थ त्या मला राजवाडे मास्तरांना
पोहोचवायच्या होत्या.
सुन्न
होऊन मी बाहेर पाहिले. पाऊस पळाला होता. घरात पुन्हा उकाडा सुरू झाला
होता. आतून आईचा आवाज आला, "साखर भिजली की रे सगळी ! पाकच करून घालते कशात
तरी."
--- पू.ल.
No comments:
Post a Comment