पराक्रमाच्या बाबतीत शिवाजीच्या तोडीस तोड असूनही मराठय़ांच्या इतिहासात थोरला बाजीराव पेशवा हा तसा ‘अनसन्ग हीरो’च म्हणावा लागेल. सध्याच्या मनोरंजनाच्या युगात तर बाजीराव-मस्तानी ही हिंदू पाश्र्वभूमीवरची लव्हस्टोरी म्हणून सादर केली जात आहे. त्यामुळे थोरल्या बाजीरावाच्या ऐतिहासिक पराक्रमी प्रतिमेचं प्रचंड नुकसान झालं. बाजीरावातला योद्धा झाकोळला गेला आणि एक प्रेमज्वरग्रस्त पेशवा तेवढाच सामोरा आला. मस्तानी हे बाजीरावाच्या आयुष्यातलं रोमॅण्टिक पर्व जरूर असलं तरी त्यावरून बाजीरावाला छंदीफंदी चौकटीत बसवणं अन्यायकारक होईल.
इतिहासकारांच्या दृष्टिने बाजीरावाचं मूल्यमापन प्रचंड मोठं आहे. मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती. नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच धुरंधर. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच रणसेनानी. बाजीराव हा जगाच्या इतिहासातला एकमेव अजेय योद्धा मानला जातो. अ मॅन हू नेव्हर लॉस्ट अ बॅटल, असं त्याचं वर्णन केलं जातं. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावाने ३५ महत्त्वाच्या लढाया केल्या आणि सर्व लढायांमध्ये तो जिंकला. त्याला हरवणं त्याच्या काळातल्या मातब्बर शत्रूंनाही जमलं नाही. पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘बाजी’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रुढ झाला.
बाजीराव जर उत्तरेत घुसला नसता आणि त्याने गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व मार्ग आपल्या कब्जात घेतले नसते तर पुन्हा एकदा अल्लाउद्दीन खिलजी, अकबर किंवा औरंगजेबासारखा उत्तरेतला शासक प्रचंड सेना घेऊन दक्षिणेत उतरला असता आणि संभाजीच्या हत्येची किंवा राजारामाच्या पळापळीची दुसरी आवृत्ती निघाली असती. बाजीरावाने आपल्या पराक्रमाने ही आपत्ती कायमची दूर केली. बाजीरावाने भीमथडीची तट्टे नर्मदापार नेल्यापासून उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत यायचे कायमचे बंद झाले. बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार, खेर हे मराठा सरदार वसवले आणि त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं उदयास आली.
बाजीरावाच्या राज्यविस्ताराच्या मोहिमेचा पुढच्या इतिहासावर असा सुयोग्य परिणाम झाला, याचं आकलन आज आपल्याला होऊ शकतं. पण सर्वसामान्य लोकांपर्यंत ते कधी पोहोचलंच नाही. मराठय़ांच्या इतिहासातला हा रांगडा पंडितप्रधान उपेक्षित राहिला. वयाच्या विसाव्या वर्षीच पेशवेपदाची वस्त्रं ल्यायलेल्या बाजीरावाला आयुष्य मिळालं केवळ ४० वर्षांचं. अवघ्या वीस वर्षांच्या त्याच्या कारकीर्दीत तो मुलुखगिरीसाठी अधिककाळ बाहेर राहिला. त्याचा अंतही माळव्यातल्या नर्मदातटावरच्या रावेरखेडीला झाला. त्यामुळे मराठी मनाने या योद्धय़ाचं अपेक्षित ऋण मान्य करताना बराचसा कद्रुपणा दाखवला. बाजीरावाचा संदर्भ आता अचानक येण्याचं कारण या उपेक्षेचंच. २८ एप्रिल १७४० रोजी (वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२) रावेरखेडीजवळ उष्माघाताने बाजीरावाचं निधन झालं. बाजीरावाच्या विरहाने त्याच्यासोबत एका हत्तीने आणि घोडय़ानेही अन्नपाणी वज्र्य करत प्राण सोडला. बाजीरावासह प्राण सोडलेल्या हत्तीची आणि घोडय़ाची थडगीही नर्मदेच्या पात्रात आहेत. जिथे बाजीरावाला अखेरचा निरोप दिला गेला तिथे नर्मदातटावर नानासाहेबाने ग्वाल्हेर संस्थानच्या देखरेखीखाली बाजीरावाची वृंदावन स्वरूपातील एक समाधी बांधली. बाजीरावाच्या अस्थि या समाधीस्थळी असल्याचं बोललं जातं. १९२५ सालापासून दरवर्षी बाजीरावाच्या समाधीस्थळी उत्सव आयोजित केला जातोय. तेव्हा इंदौरचं मल्हारराव-बाजीराव उत्सव मंडळ याकामी पुढाकार घेत होतं. १९ मे १९४० रोजी बाजीरावाच्या २००व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इथे पारतंत्र्यात असतानाही मोठय़ा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर अगदी आतापर्यंत विविध संस्था आणि इतिहासप्रेमी रावेरखेडीला येत असतात. साधारणत: २८ एप्रिल ही तारीख धरूनच अधिकांश लोक अगदी जगभरातून इथे येतात. बाजीरावाच्या पराक्रमाचे पोवाडे इथे गायले जातात. बाजीरावाच्या स्मृतिला अभिवादन केलं जातं.
बाजीराव खूप मोठा युद्धनीतीज्ञ होता. म्हणूनच तो अजेय राहिला. त्याच्या कारकीर्दीतली एकही लढाई तो हरला नाही. म्हणून त्याची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते. फील्डमार्शल मॉण्टगोमेरी यांचं युद्धशास्त्रावर आधारित ‘अ कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर’ नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यात त्यांनी बाजीरावाच्या पालखेडच्या लढाईबाबत म्हटलंय की १७२७-२८ची बाजारावाची निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची चढाई हा ‘मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी’ होता. बाजीराव आपल्या शत्रूला इप्सित स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर बाजीराव वाट पाहायचा. एखाद्या कसलेल्या शिकाऱ्याप्रमाणे तो पेशन्स ठेवायचा. घोडदळ हे बाजीरावाचं सर्वात मोठं बलस्थान होतं. दिवसाला ४० मैलाचा टप्पा त्याचं सैन्य गाठायचं. तो त्याच्या काळातला अत्युत्तम वेग होता. त्यामुळे शत्रूला सुगावा लागायच्या आतच बाजीरावाचा हल्ला झालेला असायचा.
बाजीरावाची गुप्तचर व्यवस्था ही त्याची दुसरी मोठी शक्ती होती. अक्षरश: क्षणा-क्षणांची माहिती त्याला मिळायची. मार्गात येणाऱ्या नद्या, उतार-चढाव, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती बाजीरावाकडे असायची.
बाजीराव प्रचंड महत्त्वाकांक्षी होता. त्याकाळात व्यापक पातळीवर दृष्टिकोन ठेवण्याची त्याची पात्रता होती. म्हणूनच छत्रसालाच्या मदतीला तो धावून गेला. त्याने २५ हजारांची फौज घेऊन मुहम्मद खान बंगश याला जैतपूरच्या लढाईत मात दिली. पण तो मुत्सद्दी म्हणूनही हुशार होता. म्हणूनच इलाहाबादच्या या सुभेदाराला त्याने आपल्या मातोश्री राधाबाई यांच्या काशीयात्रेची जबाबदारी घ्यायला लावली. ही स्ट्रॅटेजिक मूव्ह म्हणून खूप मोठी गोष्ट होती. त्या काळात काशी यात्रा करणं खूपच जिकिरीचं होतं. काशी यात्रेला गेलेला माणूस जिवंत परत येईलच याची अजिबात खात्री नसायची. पेशव्याच्या मातोश्रींच्या काशीयात्रेची जबाबदारी बंगशाला घ्यायला लावून त्याकाळात बाजीरावाने एका दगडात अनेक पक्षी मारले होते.
बाजीराव पराक्रमात शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होताच शिवाय त्याचं चारित्र्यही चांगलं होतं. मस्तानीशी जोडलं गेलेलं नाव हा बाजीरावाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. मात्र मस्तानीसही त्याने सहकारिणीचा दर्जा देऊ केला. त्या काळात ते मोठंच धारिष्टय़ होतं. अर्थात या चारित्र्य संपन्नतेमुळेच तो सर्व मराठा सरदारांना एकत्र करू शकला, आणि त्याने शाहूचाही विश्वास संपादन केला.
बाजीरावाची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. बाजीराव निघालाय या एवढय़ा बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परत निघाला.
डेनिस किंकेड या लेखकाने आपल्या ‘हिस्ट्री ऑफ मराठा पीपल’ या पुस्तकात म्हटलंय - ‘ब्रेव्हेस्ट ऑफ द ब्रेव्ह, फेअरेस्ट ऑफ फेअर, बाजीराव डाइड लाइक द मोस्ट फॅसिनेटिंग फिगर इन अ रोमान्स ऑफ लव्ह.’
ग्रॅण्ट डफने ‘हिस्ट्री ऑफ मराठाज’मध्ये म्हटलंय - ही हॅड बोथ द हेड टू प्लॅन अॅण्ड द हॅण्ड टू एक्झेक्यूट.
मिर्झा मोहम्मद नावाच्या एका इतिहासकाराने आपल्या ‘तारीखे मुहम्मदी’ या ग्रंथात बाजीरावाच्या निधनाबद्दल म्हटलंय- साहिबी फुतुहाते उज्जाम. अर्थात प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव मृत्यूला बिलगला.’’
जगभरातल्या इतक्या इतिहासकारांनी आणि बखरकारांनी ज्याला नावाजलं त्या पंडित प्रधान श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशवे यांची महती निनाद बेडेकरांनी थोडक्यात वर्णन केली.
खरं तर मराठय़ांच्या इतिहासात आपल्या उंबऱ्याबाहेर जाऊन मुलुखगिरी करण्याचं स्वप्नं सर्वप्रथम बाजीरावानेच दाखवलं. आज आपण परप्रांतीयांच्या घुसखोरी विरोधात आपलाच बचाव करण्यात शक्ती खर्च करतोय. पण बाजीरावाने मराठी साम्राज्यवादाचं स्वप्न तीनशे वर्षांपूर्वी जोपासलं होतं. त्यासाठी त्याने क्षत्रियत्व स्वीकारलं आणि ते ग्रेसफुली पेललं.घोडदळ हा त्याकाळातल्या लढाईचा आत्मा. मंगोलियन योद्धे घोडय़ावर मोठे होतात असं म्हटलं जायचं. तसाच बाजीराव घोडय़ावर मोठा झाला. तो त्याच्या काळातला सर्वोत्तम घोडेस्वार होता. त्याच्या शिपायांसोबत तो घोडय़ावर सर्वात पुढे असायचा. घोडय़ावरच पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खातखात दौड करीत फाके मारत बाजीराव सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही.
सर रिचर्ड टेंपल यांनी वर्णन केल्याप्रमाणे बाजीरावाकडे कुशल संघटनकौशल्य होते. तो सुंदर भाषण करायचा. समरागंणावरील विजयानंतर तो आपल्या सैनिकांना उद्देशून असे काही भाषण करी की आणखी विजय मिळवण्यास त्यांचा हुरूप वाढत असे.
खरं तर आजच्या तरुण पिढीला बाजीरावाच्या तोडीचं एखादं नेतृत्त्वं आज हवं आहे. मात्र बाजीरावच उपेक्षेच्या अंधारात आज हरवला आहे. उत्तर पेशवाईतल्या रंगढंगामुळे बाजीरावाबद्दल बहुजनांना ममत्व नाही. मांस भक्षण करणारा, मद्य प्राशन करणारा आणि मस्तानीसारख्या यवन स्त्रीवर प्रेम करून तिला शनिवारवाडय़ात आणणारा म्हणून ब्राह्मणांनी या वृत्तीनं शिपाई असलेल्या पेशव्याला उपेक्षित केलं.
तसाही पुतळे बांधून वारसा जपला जातोच असं नाही. जातीच्या नाही तर प्रांताच्या संकुचित कुंपणात इतिहासातले सुपरहीरो अडकवले जातात. पण रावेरखेडीस चिरविश्रांती घेणारा राऊ या सगळ्या पलिकडचा होता. तो रणबाँकुरा होता, मुत्सद्दी होता, तडफदार होता, काळजानं हळवा होता. म्हणून पाबळला मस्तानीस कैदेस ठेवल्याच्या बातमीने तो धास्तावला होता.
बाजी रावेरखेडीस दहा दिवस मुक्कामास होता. इतके दिवस रावबाजी एकाच ठिकाणी कधीच स्थिर नव्हता. इराणचा बादशहा नादिरशहास धाक घालणारा राऊ घरच्या भेदामुळे खचला. त्यातच त्याला वैशाखातला ऊष्मा भोवला. आणि त्याने नर्मदातीरावर वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी देह ठेवला. राऊ अधिक जगता तर आज इतिहास वेगळा असता.
पण या झाल्या जर तरच्या गोष्टी. आजही बाजीरावाची समाधी मराठी मनांना आणि मनगटांना स्फूर्ती देते. मराठय़ांच्या इतिहासाच्या खुणा तशाही लोप पावत चालल्यात. त्यात आता बाजीरावाची समाधीही जलसमाधी घेते आहे. ज्या छत्रसालाने शिवाजी महाराजांच्या वचनाचा हवाला देत ‘जो गति ग्राह गजेंद्र की, सो गति भई है आज, बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज’ अशी हाक दिली होती आणि बाजीने त्या बुंदेलाची लाज राखली होती.
आज माळव्यातल्या आपल्या बाजीचीच लाज राखण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्यानं कधी पराभव पाहिला नाही, ज्यानं आपल्या मनगटानं दिल्ली काबीज केली आणि इराणपर्यंतच्या पातशाह्या हलवल्या त्या जगातल्या एकमेव अजेय, अपराजित योद्धय़ाची समाधी बुडिताखाली जातेय आणि आपण सारे या इतिहासाचा आणि परंपरेचा वारसा सांगणारे इथे मनगटं चावत बसलोय.
नाही चिरा, नाही पणती या अवस्थेत आणखी एक पराक्रमाचा वारसा अंधाराचा आसरा घेईल, आणि प्राणांची बाजी लावणाऱ्या एका कणखर देशाचं इमान मातीमोल ठरेल.
बाजीरावकालीन दौडीचा वेग
बाजीरावाचे प्रमुख बलस्थान होते त्याचे घोडदळ. त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. मात्र बाजीरावाने आपल्या घोडदळाचा वेग विक्रमी ठेवला होता.
चिमाजी आप्पा १७३३ मध्ये ग्वाल्हेरच्या स्वारीहून परत आला तेव्हा बुंदेलखंडातील राजगडापासून पुण्यापर्यंतचे मुक्काम, रोज किती कोस चालत याच्या आकडय़ासह पेशवे दप्तरात पृ. १२२५-६ वर दिलेले आहेत. त्यावरून (कोस म्हणजे २ मैल धरून) राजगड (सिप्री नजीक) पासून बऱ्हाणपुरापर्यंत ३३४ मैलांचा प्रवास चिमाजीच्या सैन्याने २४ दिवसांत केला. याचा अर्थ एक दिवसांत सरासरी १४ मैलांची मजर हे सैन्य मारत असे. पुढे बऱ्हाणपुरापासून पुण्यापर्यंतचा ३०६ मैलांचा प्रवास त्याच सैन्याने २१ दिवसात केला. म्हणजे सरासरी दिवसास १५ मैल हे मान पडते. या ४५ दिवसात कमीतकमी प्रवास एखाद्या दिवशी ४ मैल तर एखाद्या दिवशी जास्तीत जास्त २० मैल असा केलेला आढळतो.
बाजीरावाचे वडील बाळाजी विश्वनाथ यांच्या सैन्याने ११ मैलाने प्रवास केल्याची नोंद आहे. मात्र १७३८मध्ये बाजीरावाने आगऱ्यापासून दिल्लीपर्यंतचा १२५ मैलांचा प्रवास शत्रूस चाहूल लागू न देता आडवाटेने अवघ्या १० दिवसात केला होता. म्हणजे दिवसाला १२ मैलाहूनही अधिक वेगाने. मात्र दिल्लीहून जयपुरापर्यंत शत्रूच्या तावडीतून निसटण्यासाठी तो झपाटय़ाने प्रवास करत होता. तेव्हा १८० मैल ८ दिवसात म्हणजे दिवसाला २५ मैल हा बाजीरावाचा वेग होता. तो त्या काळातला जास्तीत जास्त होता.
बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. पण अमेरिकन लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहे. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजामाविरुद्ध १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला कसं घुमवलं आणि त्याचा पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा स्ट्रॅटेजिक वॉरफेअरच्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं.
रावाच्या आयुष्यातील ठळक घटना.
१७०० ऑगस्ट १८ - (भाद्र. शु. १५) बाजीरावाचा जन्म.
१७१८ जुलै १ - बाळाजी विश्वनाथाबरोबर दिल्लीस निघाला.
१७१९ फेब्रु २८ - दिल्लीस मुक्काम.
१७२० मार्च २० - कोल्हापूर युद्ध.
एप्रिल २ - बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू.
एप्रिल १७ - मसूर येथे बाजीरावास पेशवे पदाची वस्त्रे मिळाली.
१७२१ जानेवारी ४ - चिखलठाण येथे निजामाची भेट.
मार्च ७ - सुरतेवर स्वारी.
१७२२ डिसेंबर ५ - ऐवजखानाची भेट.
१७२३ फेब्रु. १३ - बदकशा येथे निजाम भेट.
मार्च - भोपाळच्या दोस्त महमदाचा पराभव. त्याचा हत्ती घेतला.
१७२४ मार्च १४ - लांबकानीचे युद्ध.
१७२४ ऑक्टोबर - साखरखेडल्याचे युद्ध.
१७२८ फेब्रु. २५ - पालखेडच्या युद्धात निजामाचा पराभव.
मार्च ३१ - स्वारीहून परत.
१७२९ मार्च १३ - धामोरा येथे छत्रसालाची भेट.
एप्रिल - बंगषाला वेढा आणि पराभव.
एप्रिल २८ - सुपे (बुंदेलखंड येथे कायमखानाचे लष्कर लुटले.
१७३१ एप्रिल १ - डभई (गुजरात) त्रिंबकराव दाभाडय़ास मारले.
एप्रिल - बाजीरावाच्या सैन्याशी निजामाची चकमक.
१७३२ फेब्रु. १२ - सेखोजी आंग्रे भेट.
१७३३ एप्रिल ६ - जंजिऱ्यावर स्वारी.
मे २५ - मंडणगड किल्ला घेतला.
१७३४ मे - खानदेशकडील स्वारी.
१७३५ फेब्रु ४ - मानाजी आंग्रे यांच्या मदतीसाठी कुलाब्यास प्रयाण.
जुलै ६ - मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास आले तेव्हा बाजीराव घोरपडीपावेतो सामोरा गेला.
१७३६ फेब्रु ४ - उदेपूर येथील जलमंदिरास भेट.
फेब्रु. १५ - किशनगड नजीक सवाई जयसिंगाची भेट.
१७३७ मार्च २९ - दिल्लीचा पुरा जाळला.
१७३८ जाने. - भोपाळचे युद्ध व तह.
१७३९ फेब्रु. ११ - नादिरशहाच्या वर्तमानावरून पुण्याहून उत्तरेकडे स्वारी.
मे २२ - जेनाबाद येथे नादिरशहा परतल्याची बातमी कळली.
सप्टें. ३ - चिमाजी वसई घेऊन पुण्यास आला तेव्हा बाजीराव औंधापावेतो सामोरा गेला.
नोव्हें. १ - नासिरजंगाच्या स्वारीस प्रयाण.
१७४० मार्च ३ - नासिरजंगाची भेट व तह.
मार्च ७ - उत्तरेकडे प्रयाण.
एप्रिल ५ - रावेर प्रांत खरगोण येथे मुक्काम.
एप्रिल २८ - मृत्यू.
१७०० ऑगस्ट १८ - (भाद्र. शु. १५) बाजीरावाचा जन्म.
१७१८ जुलै १ - बाळाजी विश्वनाथाबरोबर दिल्लीस निघाला.
१७१९ फेब्रु २८ - दिल्लीस मुक्काम.
१७२० मार्च २० - कोल्हापूर युद्ध.
एप्रिल २ - बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू.
एप्रिल १७ - मसूर येथे बाजीरावास पेशवे पदाची वस्त्रे मिळाली.
१७२१ जानेवारी ४ - चिखलठाण येथे निजामाची भेट.
मार्च ७ - सुरतेवर स्वारी.
१७२२ डिसेंबर ५ - ऐवजखानाची भेट.
१७२३ फेब्रु. १३ - बदकशा येथे निजाम भेट.
मार्च - भोपाळच्या दोस्त महमदाचा पराभव. त्याचा हत्ती घेतला.
१७२४ मार्च १४ - लांबकानीचे युद्ध.
१७२४ ऑक्टोबर - साखरखेडल्याचे युद्ध.
१७२८ फेब्रु. २५ - पालखेडच्या युद्धात निजामाचा पराभव.
मार्च ३१ - स्वारीहून परत.
१७२९ मार्च १३ - धामोरा येथे छत्रसालाची भेट.
एप्रिल - बंगषाला वेढा आणि पराभव.
एप्रिल २८ - सुपे (बुंदेलखंड येथे कायमखानाचे लष्कर लुटले.
१७३१ एप्रिल १ - डभई (गुजरात) त्रिंबकराव दाभाडय़ास मारले.
एप्रिल - बाजीरावाच्या सैन्याशी निजामाची चकमक.
१७३२ फेब्रु. १२ - सेखोजी आंग्रे भेट.
१७३३ एप्रिल ६ - जंजिऱ्यावर स्वारी.
मे २५ - मंडणगड किल्ला घेतला.
१७३४ मे - खानदेशकडील स्वारी.
१७३५ फेब्रु ४ - मानाजी आंग्रे यांच्या मदतीसाठी कुलाब्यास प्रयाण.
जुलै ६ - मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास आले तेव्हा बाजीराव घोरपडीपावेतो सामोरा गेला.
१७३६ फेब्रु ४ - उदेपूर येथील जलमंदिरास भेट.
फेब्रु. १५ - किशनगड नजीक सवाई जयसिंगाची भेट.
१७३७ मार्च २९ - दिल्लीचा पुरा जाळला.
१७३८ जाने. - भोपाळचे युद्ध व तह.
१७३९ फेब्रु. ११ - नादिरशहाच्या वर्तमानावरून पुण्याहून उत्तरेकडे स्वारी.
मे २२ - जेनाबाद येथे नादिरशहा परतल्याची बातमी कळली.
सप्टें. ३ - चिमाजी वसई घेऊन पुण्यास आला तेव्हा बाजीराव औंधापावेतो सामोरा गेला.
नोव्हें. १ - नासिरजंगाच्या स्वारीस प्रयाण.
१७४० मार्च ३ - नासिरजंगाची भेट व तह.
मार्च ७ - उत्तरेकडे प्रयाण.
एप्रिल ५ - रावेर प्रांत खरगोण येथे मुक्काम.
एप्रिल २८ - मृत्यू.
--------- पराग पाटील
अतिशय सुंदर आढावा घेतला आहे!
ReplyDelete:-)