Thursday, 22 March 2012

पानिपतची लढाई -- २




पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरयाणा राज्यातील पानिपत नजीक झाली. याच गावानजीक पहिले दोन युद्धे झाली होती, ज्यात मोघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील पेशव्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.

पार्श्वभूमी.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्‍याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्‍या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले.

याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमुर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकर दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले.

युद्धाआधीच्या घडामोडी
भाउंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनंत अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली. राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट देखिल मिळाले. या एकत्रित सैन्याने दिल्लीवर हल्ला केला व काबीज केली. विश्वासरावला दिल्लीच्या गादीवर बसवायचा भाउंचा मनसुबा होता. भाउंनी रसदेअभावी दिल्लीलुटायचा आदेश दिला. परंतु शिखांनी व जाटांनी त्याला विरोध केला व ते युतीच्या बाहेर पडले. ही घटना युद्धात निर्णायक ठरली असे बर्‍याच इतिहासकारांचे मत आहे.


अब्दाली व मराठ्याच्या यांमध्ये नियमितपणे चकमकी घडू लागल्या कर्नाल व कुंजपुरा येथे दोन्ही फौजा भिडल्या. कुंजपुराच्या चकमकीत मराठ्यांनी अब्दालीची संपूर्ण तुकडी कापून काढली व कित्येकांना बंदी बनवले. पाउस पडत असल्याने यमुना नदी पलीकडून अब्दालीला आपल्या सैन्याची काहीच मदत करता आली नाही. चिडून जाउन अब्दालीने आपल्या सैन्याला भर पुरात यमुना ओलांडायला सांगितले.अब्दालीने दक्षिणेकडे आपल्या फौजेची वाटचाल केली व बाघपत येथे यमुना ओलांडली. यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला. 

२६ ऑक्टोबर रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणार्‍या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. अजून एका चकमकी मध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या सेनेने तुफानी हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पुर्णपणे तोडून टाकला. मराठ्यांची उपासमार होउ लागली.

पानिपतची कोंडी
पुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. मराठ्यांचा नजीबवर अब्दालीपेक्षा जास्त राग होता. एका चकमकीत नजीब मरता मरता वाचला. त्याचेही ३००० पेक्षा जास्ती सैन्य नुसत्या चकमकींमध्ये मारले गेले होते. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या गोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे भाऊही संधीचाच मार्ग शोधत होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यानी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता आडवला होता एकमेकांचे वैर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते.

अब्दाली ने संधी करायचा प्रयत्न केला परंतु नजीबने तो होउ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आज ना उद्या संधी होइल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला. भाऊंनी सरते शेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून दिल्लीला पोहोचायचे जिथे रसद पुरवठा निश्चित होता, असे ठरले.


लढाई

व्यूहरचना
मराठे रणांगणाच्या उत्तरेस स्थित होते तर अफगाणी दक्षिणेकडे. अब्दालीने आपले सैन्य तिरक्या रेषेत लावले होते तर मराठ्यांचे एकाच ओळित होते. मराठा सेनेच्या मध्यभागी भाऊ व विश्वासराव होते. डावीकडे इब्राहीमखान गारदीचे सैन्य तर उजवीकडे शिंदे व होळकरांचे सैन्य होते. मराठ्यांनी तोफखाना पुढे ठेवला. त्यांना संरक्षण करणारे भालदार व गारदी होते. तोफांच्या मागे अननुभवी तरूण सैनिक होते व जवळपास ३०,००० बुणग्यांनी लोकांनी स्वयंप्रेरणेने युद्धात भाग घेतला होता.

अफगाण्यांनी व्युहरचना यासारखीच केली होती. एका बाजूला नजीबचे रोहिले व दुसर्‍या बाजूला फारसी सैनिकांच्या तुकड्या होत्या. अब्दालीचे सेनापती शुजा उद दौला व शाह वली यांनी मधली कमान संभाळली.

युद्धाची सुरुवात
मराठ्यांकडील अन्नाचा साठा संपल्याचे लक्षात आल्यावर युद्धाशिवाय पर्याय नव्हता व १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे युद्धासाठी तयार झाले. पारंपारिक युद्ध पोषाक घालून चेहर्‍यांवर हळद , गुलाल फासून युद्धास तयार झाले. मराठे आपल्या खंदकातून बाहेर पडलेले पाहून अब्दालीने लगेचच व्युहरचना युद्धास तयार केली व तोफखान्याने मराठ्यांचे युद्धास स्वागत केले. अब्दालीच्या तोफा छोट्या अंतरावरच्या असल्याने युद्धाच्या सुरुवातीला काहीच फरक पाडू शकल्या नाहीत.

मराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खान तर्फे झाले जो आपले सामर्थ्य दाखवण्यास आतूर झालेला होता. मराठ्यांच्या तोफांची ताकद जरा जास्तच होती. तोफेचे गोळे अफगाण सेनेच्या डोक्यावरून गेले व अब्दालीचे फारसे नुकसान झाले नाही पण इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाज व भालदार यांनी अफगाण व रोहिल्यांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. रोहिले मागे हटले, लढाईची सुरुवात इब्राहिमखानने गाजवली.

दरम्यान भाऊंनी मध्यातून हल्लबोल केला व अफगाण्यांची कत्तल आरंभली अफगाण्यांच्या तकड्या पळ काढण्याच्या बेतापर्यंत भाऊने यश मिळवले शाह वली ने नवाब उद दौलाला मदत करण्यास बोलवले परंत नवाब आपल्या जागेवरुन हलला नाही. त्यामुळे काही काळ अफगाण्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण होते. अफगाणी कमानी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऍनयुद्धसमयी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही.


अंतिम सत्र
वटच्या सत्रात शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, दत्ताजीच्या वधामुळे शिंद्याचे व नजीबचे वैर टोकाला पोहोचले होते. परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. परंतु मराठ्यांचे रणांगणावर वर्चस्व अजूनही होते अफगाणी सेना वाकली होती परंतु अजून मोडली नव्हती.उजवी बाजू इब्राहिमखानने जवळपास कापून काढलीच होती. मध्य भागी भाऊंचा ताबा होता व अब्दालीच्या सेनेला दोन भागात विभागले होते व फक्त डाव्या बाजूला नजीबचा प्रतिकार अजूनही शाबूत होता. मराठ्यांनी आपल्या सेनेची वाताहत केलेली पाहून अब्दालीने आपली राखीव सेनेचा पत्ता काढला.

त्याने १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधार्‍यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत्. राखीव फौज परिणाम कारक होत आहे हे पाहून त्याने अजून राखीव फौज पाठवली.

जखमी सैनिकांनापण त्याने लढायला सांगितले. उरली सुरली १०००० ची राखीव फौजही त्याने नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठे सैनिकांना ताज्या दमाच्या सैनिकांचा सामना करायला लागला व मराठे मागे हटू लागले. याच वेळेस मागून पण तोफांना आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरुन येणार्‍या उंटावरील तोफांसारखा मराठी तोफखाना लवचिक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले.


अंतर्गत उठाव
कुंजपुरामध्ये मराठ्यांनी काही अफगाण सैनिकांना बंदी बनवले होते व युद्धाच्या परमोच्च बिंदूवर त्यांनी अंतर्गत उठाव केला व मराठ्यांच्या कमानीतच युद्ध चालू झाले. यामुळे मराठ्यांच्या सेनेला वाटले की अफगाण्यानी पाठीमागूनही हल्ला चढवला आहे व मराठ्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण झाले.

भाऊंना आपली कमान विस्कळीत झाल्याचे लक्षात आले व याच वेळेस ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली व हत्तीवरुन उतरले व स्वता: पुढे राहून प्रेरीत करणार होते. परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मरठयांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातवरण झाले आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला. अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला. मराठे युद्ध हरले. अब्दाली जिंकला.

कत्तल
मराठ्यांच्या मुख्य सेनेने जरी पळ काढायला सुरुवत केली तरी अनेक मराठ्यांच्या तुकड्यांनी अंधार पडेपर्यंत प्रतिकार करत आपल्या तुकड्या शाबूत ठेवल्या व अंधारामध्ये सावधपणे पलायन केले.

पळणार्‍या मराठी सेनेवर व बुणग्यांवरती अफगाणी भालदार व घोडदळ अक्षरशः तुटून पडले. जो सैनिक, जो नागरिक दिसेल त्याला गाठून ठार मारले गेले. सर्वाधिक हाल स्त्रियांचे झाले. अनेकांनी पानिपतच्या विहिरीत जीव देऊन मानाचा मार्ग पत्करला. ज्या स्त्रिया पकडल्या गेल्या त्यांचे अफगाणी सेनेने अत्यंतिक हाल केले. नोंदीप्रमाणे अनेकांना दासी म्हणून घेउन जाण्यात आले. भाऊंनी पार्वतीबाईंच्या रक्षकांना आदेश दिले होते की जर काही विपरीत घडले तर त्यांच्या पत्नीला म्रुत्यूदान देण्यात यावे, परंतु पार्वतीबाई आपल्या रक्षकांसोबत पुण्याला सुखरूप पोहोचल्या.

अफगाण्यांनी दुसर्‍या दिवशीपण (जानेवारी १५ला) कत्तल चालू ठेवली. सैनिकांची व नागरिकांची मुंडकी विजय महोत्सव म्हणून मिरवण्यात आली. अनेक मराठ्यांच्या तुकड्यांना युद्धबंदी बनवण्यात आले. ज्यांनी ज्यांनी प्रतिकार केला त्यांना अत्यंत हालहाल करून मारण्यात आले. इब्राहिमखान गारदीने प्रचंड प्रतिकार केला म्हणून त्याचे अतिशय खासप्रकारे हाल केले व क्रूरपणे मारण्यात आले. युद्धात मराठ्यांचे ३५००० जण मारले गेले होते. तर त्यानंतरच्या कत्तलीत साधारणपणे १०००० जण मारले गेले असण्याची शक्यता आहे.

युद्धाचे परिणाम

मराठ्यांची दुर्दशा: पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलयच ठरला. दुसरे दिवशी अनुपगीर गोसावी व काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली. तेव्हा त्यांना प्रेतांचे ३२ ढीग दिसून आले. त्यात २८ हजार प्रेते होती, दूरपर्यंत प्रेतांचे खच पडले होते. या लढाईत ९० हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनविण्यात आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली. मराठ्यांची कर्ती पिढीच या लढाईत नष्ट झाली. पानिपतमधून वाचलेले मराठे १५ दिवसांनी ग्वाल्हेरला पोहोचले. सुरजमल जाटने २० हजार नग्न मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी २ रूपये दिले. इतकी दुर्दशा मराठ्यांची झाली होती. पानिपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला.

अब्दालीचा शेवटचा विजय: या लढाईत अब्दालीला मोठा विजय प्राप्त झाला असला तरी त्याला फार मोठा लाभ झाला असे म्हणता येणार नाही. उपासमारीने मरणार्‍या मराठ्यांच्या छावणीत द्रव्याची लुट कोठून मिळणार? दिल्लीतही संपत्ती आधीच लुटली गेल्यामुळे तेथे जाऊनही अब्दालीच्या हाती फारसे काही लागले नाही. उजाड झालेल्या व भयानक उदासीनता पसरलेल्या उत्तरेत अधिक काळ राहण्यास अब्दालीच्या सैन्याने नकार दिला. अब्दालीला मात्र सधन पंजाब कायमस्वरूपी आपल्या ताब्यात असावा असे वाटत होते. त्यामुळे मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. १४ एप्रिल १७७२ मध्ये त्याचा मृत्यु झाला.

नानासाहेबांचा मृत्यु : पानिपतमध्ये भाऊ संकटात असल्याची खबर पेशव्यांना उशिरा समजली तरीही त्यांनी उत्तरेत जाण्याची तयारी केली. मार्गक्रमण करीत असता उत्तरेतील बातम्या येणेच बंद झाल्याने नानासाहेब चिंतातुर झाले. भेलसा येथे मुक्कामी असताना २४ जानेवारीस पानिपतच्या पराभवाची बातमी मिळाली.

त्यांना मिळालेल्या सांकेतिक पत्रात दोन मोती गळाले, २७ मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा निरोप होता. भाऊ, मुलगा व अनेक नातेवाईकांच्या मृत्युचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला, त्यांची मनःशांती नष्ट झाली. दिल्लीत न जाता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. पानिपतवर कुचराई केल्याबद्दल पेशव्यांनी शिंदे, होळकर, पवार यांच्या महालांची जप्ती केली पण ती काही काळापुरतीच! दिवसेंदिवस नानासाहेब भ्रमिष्ठ होऊन तब्येत खालावत गेली. त्यातच २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठेशाहीला आणखी एक धक्का बसला.

मोगलांची दुर्दशा: पानिपतच्या विजयानंतर अब्दालीने दिल्लीचा ताबा घेतला. मोगल बादशहा शहाआलम हा दिल्लीतून पळून गेला होता व त्याने अलाहाबादमध्ये आश्रय घेतला होता. रक्षणकर्त्या मराठ्यांचा नाश झाल्याने मोगल सत्तेला जबरदस्त धक्का बसला. अब्दाली मायदेशी निघून गेल्यानंतर दिल्लीची सत्ता नजीबखानाने मिळवली. मोगल साम्राज्य माधवरावाच्या काळात पुन्हा सत्तेवर आले असले तरी केवळ ते नाममात्रच होते.

इंग्रजांचा वाढता प्रभाव: नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठे संपूर्ण हिंदूस्थानात अंमल बसवीत असतांना मोगल साम्राज्याती सधन अशा बंगाल सुभ्यात इंग्रज आपल्या बुद्धीने व हिंमतीने राज्यसाधना करीत होते. पानिपतच्या लढाईमुळे मोगली राज्यासाठी भांडणार्‍या मराठे व मुसलमान सत्ता दुर्बळ झाल्या व त्याचा फायदा नवी उदय पावणार्‍य इंग्रजी सत्तेला मिळाला. मराठ्यांच्या पराभवामुळे उत्तर हिंदूस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे कार्य इंग्रजी सत्तेने केले.

शीखांची सत्ता स्थापना: पानिपतच्या लढाईपूर्वी पंजाबमध्ये मोगल, मराठे, अब्दाली व शीख यांच्यात प्रखर सत्तास्पर्धा सुरू होती. पंजाबचे मूळ मालक शीख असूनही त्यांच्या मालकीचा पंजाभ होऊ शकत नव्हता. कधी मोगलांच्या, कधी अब्दालीच्या तर कधी मराठ्यांच्या ताब्यात जात होता. सरहद्दीवरील प्रदेश असल्यामुळे सतत परक्या आक्रमणाचा धोका असल्याने शीखांना त्यांच्या अत्याचारांना कायम तोंड द्यावे लागत होते. पानिपत युद्धामुळे ही परिस्थिती बदलली. मराठ्यांचा पराभव झाला व अब्दालीही अफगाणमध्ये निघून गेला त्यामुळे पंजाबमध्ये शीखांची सत्ता स्थापन होऊ शकली.

हैदरअलीचा उदय: पानिपतच्या पराभवामूळे कर्नाटकातून मराठ्यांचा पाया उखडला गेला. मराठ्यांनी कर्नाटकचा प्रदेश पूर्णपणे जिंकला होता. पानिपतच्या पराभवामुळे पुढे काही काळ त्यांना कर्नाटककडे लक्ष देण्यास सवड मिळाली नाही. याचा फायदा घेऊन म्हैसुरच्या हिंदू राजाची सत्ता नष्ट करून महत्त्वाकांक्षी व धाडसी हैदरअलीने आपली सत्ता स्थापन केली. हैदरअलीच्या उदयामुळे मराठ्यांच्या शत्रूंमध्ये आणखी एका शत्रूची वाढ झाली कारण पुढील काळात हैदरअलीने हयातभर व त्याच्यानंतर त्याच्या मुलाने टिपू सुलतानने मराठ्यांना कायम त्रास दिला. पानिपतचे युद्ध झाले नसते किंवा या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोके वर काढून दिले नसते हे सुद्धा तितकेच खरे आहे.

माधवराव पेशव्यांचा उदय: नानासाहेबांना विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही तीन मुले होती. परंपरेनुसार नानासाहेबांनंतर पेशवेपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासरावचा अधिकार होता. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. पानिपतच्या संग्रामात लढता-लढता विश्वासराव ठार झाला व लवकरच नानासाहेबांचाही मृत्यु झाला. त्यामुळे दरबारात नानासाहेबांच्या दुसर्‍या मुलाला म्हणजे माधवरावला पेशवेपद देण्याचा निर्णय घेतला गेला आणि माधवरावाने आपल्या कर्तबगारीच्या जोरावर अत्यंत कमी काळात पानिपतच्या पराभवाचा कलंक पुसून टाकला.

उभयपक्षी चुका

मराठ्यांच्या चुका

युद्धव्यवस्थापन
अनेक इतिहासकारांनी केलेल्या अभ्यासानुसार मराठ्यांनी केलेली युद्धाची तयारी फारच तोकडी होती. बखरीतील वर्णनानुसार महाराष्ट्रातून ते उत्तर भारतात पोहचेपर्यंत अनंत अडचणींना तोंड देत सेना पोहोचली. पेशव्यांना सुरुवातीपासून रसदेचा तुटवडा जाणवत होता. रसद पुरवठ्याचे काहीच नियोजन नव्हते.

बांडगूळ बुणगे
यातच पेशव्यांची धार्मिक वृती या युद्धात अतिमारक ठरली. पुण्यातील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून यात्रेकरूंना फौजेबरोबर मोहिमेत सामील करण्यात आले. एकास एक असे होत त्यांची संख्या लाखापेक्षाही जास्त झाली. सैन्याच्या मोहिमेच्या संरक्षणात आपल्याला उत्तर भारतातील देवस्थाने (तीर्थस्थाने) पहायला मिळतील या भाबड्या कल्पनेमुळे सर्वजण आले होते. तसेच गेली ५० वर्षे मराठे जवळपास अपराजितच होते. पहिल्या मोहिमांमध्ये अनेकांनी विनासायास उत्तर भारत यात्रा पूर्ण केली होती व यावेळेस तसेच घडेल असे वाटले. कदाचित कुणालाच मोहिमेचे गांभीर्य कळाले नाही.

या यात्रेकरूंमध्ये वृद्ध-बायका मुले यांचीच संख्या जास्त होती ज्यांचा प्रत्यक्ष युद्धाच्यावेळेस काहीच उपयोग झाला नाही. उलट दोन गोष्टी अत्यंत नुकसानकारक ठरल्या - पहिली म्हणजे मिळालेल्या रसदेमधील मोठा हिस्सा या बुणग्यांना जात होता, त्याचा अतिप्रचंड ताण सेनेवर पडला. युद्धाअगोदर काही आठवडे नोंदीनुसार माणसांना खायला नाही म्हणून घोडे हत्ती यांचा चारा बंद करण्यात आला त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस दिसला. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे मराठ्यांच्या आक्रमणाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या. मराठ्यांना लढाईच्या वेळेस बुगण्यांच्या संरक्षणासाठी कित्येक सैनिकांच्या तुकड्या खर्ची पडल्या तसेच बुणग्यांना घेउन लढाईचा हा मार्ग शक्य नाही म्हणून अनेक उपायकारक आक्रमणाच्या योजना बारगळल्या. थोरल्या बाजीरावाच्या काळापासून मराठ्यांची सेना तुफानी वेगासाठी प्रसिद्ध होती तो वेग, चपळता व धडाडी कुठेच दिसली नाही.

राजकारणात
मराठ्यांचे पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण खरेतर त्यांना इतर राज्यकर्त्यांकडून मदत मिळवण्यात आलेले अपयश हे होय. यात खरेतर त्याआगोदरचा ५० - ६० वर्षाचा इतिहास कारणीभूत होता. मराठ्यांनी भारतात सर्वत्र सद्दी चालवली होती. यामुळे सर्वत्र मराठ्यांबद्दल बरीचशी दहशत उत्तर भारतातील राजकर्त्यामध्ये होती. मराठ्यांनी मांडलिक राज्याकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केल्यामुळे अनेक राज्यामध्ये नाराजी होती तसेच अनेकांना दुखावले होते. त्यामुळे ऐनवेळेस कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. परकीय सत्तेविरुद्ध पुन्हा एकदा एकत्र विरोध करण्याचे त्यांचे आवाहन वाया गेले. बहुतेकांच्या मते मराठ्यांनीच अब्दालीला चुचकारले आहे तेच त्याचे काय ते बघतील असा त्या वेळेसच्या राजकारण्यांचा सुर होता. याउलट अब्दालीने मराठ्यांना राजकारणातही मराठ्यांना कुठेही मदत मिळणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. त्याने व त्याच्या मित्र पक्षांनी याबाबतीत मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. मराठ्यांना एकटेच लढावे लागले व त्याचा प्रचंड तोटा त्यांना झाला.

दुराण्यांच्या चुका
मराठ्यांप्रमाणे अब्दालीनेही अनेक चुका केल्या. अब्दालीचा मराठी सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज चुकला होता. त्याचा तोफखाना मराठ्यांच्या तोफखान्यापुढे अगदीच कुचकामी ठरला. त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्याचीदेखील ३५-४० हजार इतकी सेना मारली गेली. युद्धानंतर अब्दालीकडे अजून प्रतिकार करू शकेल असे सैन्यच उरले नाही. म्हणूनच अब्दालीने मराठे अजून फौज एकत्र करून हल्ला करणार आहेत या बातमीवर आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला.


----------- ग्लोबल मराठी 

No comments:

Post a Comment