परिक्रमावरून चालताना सोनेरी हरिमंदिराचं प्रतिबिंब त्या तलावात दिसतं. खरंतर त्या तलावावरून त्या शहराला ‘अमृतसर’ असं नाव पडलंय. ‘सर’ म्हणजे तलाव. त्या तलावात पाणी नाहीच. ते अमृत आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे.
या तलावाबद्दल अनेक कहाण्या सांगितल्या जातात. तशा जुन्या कुठल्याही वास्तूला आख्यायिका जोडलेल्या असतातच. हा तलाव म्हणे रामायणातच्या काळापासून आहे. रामाने सीतेचा त्याग केल्यावर सीता या तलावाजवळ राहिली. तिथंच लव-कुशांनी रामाचा घोडा अडवला. त्याचा पराभव केला. तिथे एक झाड आहे. त्या झाडाला ‘दुख भंजनी बेरी’ म्हणतात. त्या झाडाखाली राम शेवटच्या घटका मोजत पडला होता. त्या वेळी लव-कुशला कळलं की आपल्या हातून ‘पितृहत्या’ होतेय. त्यांनी या तलावातलं अमृत रामाला पाजलं. राम पुन्हा खडखडीत बरा झाला. एक झाड मी तिथे पाहिलं ते तेव्हाचंच असं लोकं म्हणतात. ते झाड इतकी वर्ष कसं जगलं? वगैरे प्रश्न विचारू नये. श्रद्धेच्या पुस्तकात त्याचं उत्तर नसतं.
हल्ली रामाचा संबंध आला की थोडी भीतीच वाटते. कुठून ‘जय श्री राम’ आवाज येईल आणि कुठली वास्तू कधी वादग्रस्त ठरेल सांगता येत नाही. पण इतिहास सांगतो की या तलावाभोवतीची जागा शिखांचा चौथा गुरू रामदास याला मोगल सम्राट अकबराने दिली. या रामदासाचा मुलगा अर्जुन शिखांचा पाचवा गुरू झाला. त्यानं हे मंदिर या तलावाभोवती बांधलं. हिंदूंची गंगा तसा हा शिखांचा तलाव. तिथल्या पाण्यात डुबकी मारली की ६८ तीर्थक्षेत्रांचं पुण्य मिळतं म्हणे. इतकं स्वस्तात मिळणारं पुण्य घ्यायची माझी खूप इच्छा होती, पण अंगातले दोन स्वेटर उतरवायला मन धजावत नव्हतं. मी फक्त पाय पाण्यात बुडवले आणि हरिमंदिराकडे निघालो. पण तरीही किमान १७ तीर्थक्षेत्रांच्या (साधारण एक-चतुर्थाश) पुण्ण्याची मिळकत माझ्याकडे असावी. श्रद्घा ही फार मोठी गोष्ट आहे. त्या तलावातल्या पाण्याच्या स्पर्शासाठी त्या थंडीतही भक्तगण आसुसलेले होते. तो तलाव पहिल्यांदा १९२३ साली पूर्ण रिकामा केला गेला. पाणी स्वच्छ करावं हा त्यामागचा हेतू होता. ती ‘कारसेवा’ चालली असताना हजारो शीख देशभरातून आले व सोन्याची फावडी आणि चांदीची घमेली घेऊन गाळ काढण्यात आला. त्या श्रमदानात हिंदू-मुस्लीम सामील झाले. असं म्हणतात की, गुरू गोविंदसिंगांचा तो प्रसिद्ध पांढरा ससाणा निळ्या आकाशातून अवतरला व मंदिराच्या सोनेरी मुकुटावर बसला. अजूनही हयात असलेली त्या काळची माणसं या ससाण्याच्या आठवणी सांगत असतात.
या मंदिराची एक गंमत आहे. त्यासाठी जागा दिली अकबराने. त्याच्या पायाचा दगड बसवला लाहोरच्या हजरत मियाँमीरने. मंदिरात अर्थातच मूर्ती नाही. कारण शीख एकेश्वरवादी. तिथे त्यांच्या पवित्र ग्रंथाची पूजा होते, पण त्या ग्रंथात फक्त गुरूनानक किंवा इतर गुरूंचे विचार नाहीत. त्यात कबिराचे दोहे आहेत, नामदेवाच्या ओव्या आहेत, थोडक्यात, त्या काळातल्या सर्व देवपुरुषांच्या रचना आहेत. त्याची भाषा फक्त गुरुमुखी आहे. त्या मंदिरात सण साजरे होतात हिंदूचे. दिवाळीला तर खास रोषणाई असते. खजिन्यातल्या दागिन्यांनी मंदिर सजवलं जातं. थोडक्यात हे मंदिर म्हणजे सर्वधर्मसमभावाचं खरं प्रतीक आहे. पण तरीही या मंदिराला इस्लामी धर्मवेडाचा फटका बसलाय. जहांगीरने हे मंदिर बांधणाऱ्या गुरू अर्जुनाचं डोकं उडवलं. अहमदशहा अब्दालीने तर हे मंदिर वारंवार तोडलं. धर्मवेडाबरोबर ‘लूटमार’ हाही त्यामागचा हेतू असू शकेल. कारण त्या काळी मंदिरात प्रचंड संपत्ती असायची. अहमदशहा अब्दालीने हे मंदिर सात वेळा जमीनदोस्त केलं आणि शिखांनी ते सातही वेळा पुन्हा बांधलं. या मंदिराबरोबर अकाल तख्तही तोडलं जायचं. हे अकाल तख्त १६०६ साली गुरू हरगोविंदने बांधलं, यामागचा हेतू? शिखांची राजकीय व धार्मिक सूत्रं तिथून हलवली जावी. याच अकाल तख्तामधून नंतर जर्नेलसिंग भिंद्रनवालेला भारतीय सैन्याने बाहेर काढलं.
हे मंदिर खऱ्या अर्थाने सुवर्णमंदिर झालं महाराजा रणजितसिंगच्या काळात. त्याने पंजाबात चाळीस वर्षं
संगमरवरात बांधलं आणि मंदिराचा अर्धा भाग गोल्ड प्लेटिंग केलेल्या तांब्याच्या पत्र्याने सजवला. ते मंदिर काही पूर्णपणे सोन्यात बांधलेलं नाही पण वरच्या भागाला सोन्याचा पत्रा लावल्यामुळे ते चकाकतं. परिक्रमावरून तलावात त्या मंदिराकडे जाणारा रस्ताही संगमरवरी आहे. कठडा संगमरवरी आहे. दिव्यांचे खांब संगमरवरी आहेत आणि सोनेरी मुकुट घालावा तसे कंदील त्या दिव्यावर बसवले आहेत. मंदिरात एक कोपरा किंवा एक भाग असा नाही की जिथे कोरीव काम नाही. मार्बलमधलं फुलांचं डेकोरेशन तर निव्वळ अप्रतिम. हे काम मुस्लीम कलाकारांवर सोपवलं होतं. जिथे ‘गुरुग्रंथ’ ठेवलाय तिथली कनॉपी (छत्रीच्या आकाराची) मोती व पाचूने सजवलेली आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ‘शिशमहल’ आहे. वर गच्चीत सोनेरी घुमट व त्या घुमटांची इतर छोटी पिल्लं पाहिली की पूर्वी या देशात सोन्याचा धूर निघत होता हे पटतं. मंदिराच्या खजिन्यात जी संपत्ती आहे त्याची मोजदाद कित्येक कोटींत होईल.
रणजितसिंगने एकदा सुवर्णमंदिर उभारल्यावर त्यावर पुन्हा जमीनदोस्त व्हायची पाळी आली नाही. कारण तोपर्यंत भारतातली इस्लामी साम्राज्य कोसळायला लागली होती. पुढे गोरा साहेब आला. साहेबाने मंदिराला वगैरे हात लावला नाही. जालियनवाला बागेची माती रक्ताने रंगवणारा जनरल डायर या सुवर्णमंदिरात कराकरा बूट वाजवत फिरला. शिखांच्या धार्मिक भावना त्या बुटाखाली चेचल्या गेल्या. पण त्या मंदिराचा दगड जागचा हलला नाही.
पण धर्माचे मठाधिपती कधीकधी किती विचित्र वागतात पाहा! या मंदिराचा पाया मुस्लीम संताने बसवलेला त्यांना चालला. मंदिरातली कलाकुसर मुस्लीम कारागिरांनी केलेलीही त्यांना चालली, पण ज्या रणजितसिंगने मंदिरावर सोनं चढवलं, त्याने एका मुस्लिम सुंदरीशी लग्न केलेलं त्यांना आवडलं नाही. अकाल तख्तच्या प्रमुखाने राजाला काय शिक्षा ठोठावली असेल? त्याला आम जनतेसमोर झाडाला बांधलं आणि चाबकाने फटके मारले. पंजाबच्या त्या सर्वात पराक्रमी राजाने ते चुपचाप सहन केले.
‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे शीख धर्माचं एक मूलभूत तत्त्व आहे. सुवर्णमंदिरात त्याचा ठायी ठायी प्रत्यय येतो. तिथे ‘गुरू का लंगर’मध्ये कुणीही कधीही पोटभर जेऊ शकतो. फुकट खाणावळ असली तरी पाणचट डाळ, कच्च्या चपात्या किंवा आंबलेली भाजी तिथे दानधर्माच्या नावाखाली वाटली जात नाही. मी काही तिथे जेवलो नाही पण प्रसादाचा नुसता शिरा हातात घेतल्यावर हात तुपाळले. भक्तांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून तिथे अद्ययावत हॉस्पिटलसुद्धा आहे.
त्या मंदिराच्या आवारात एक छोटी म्युझियमवजा आर्ट गॅलरी आहे. १९७१च्या भारत-पाक युद्धात वापरलेल्या बॉम्बचे शेल्स, काही बंदुका, गुरुमुखातलं जुनं साहित्य, जुनी नाणी वगैरे गोष्टी आहेत. पण महत्त्वाचा आहे तो सुंदर चित्रांद्वारे रंगवलेला शिखांचा इतिहास. तो इतिहास आपल्याला विचार करायला लावतो.
नानकांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. त्यांनी शीख धर्माची स्थापना केली. पण हा धर्म म्हणजे हिंदू धर्माचे एक बंडखोर बाळ होतं. हिंदू संस्कृतीचा पगडा त्या धर्मावर आहेच आहे. नानकांनी आणि त्यानंतरच्या शीख गुरूंनी इस्लामला कधी शत्रू मानलं नाही. पण काही मोगल राजांनी शिखांना शत्रू मानलं. गुरू अर्जुनाची हत्या जहांगीरने केली. त्यांचा नववा गुरू तेगबहाद्दूरचं शीरही मोगल सम्राटाने उडवलं. म्हणून तर त्यांचा दहावा आणि शेवटचा गुरू गोविंदसिंगने शिखांना हातात तलवार घ्यायला लावली आणि त्यांच्यातला पुरुषार्थ जागा केला. शीख आक्रमक बनले. इतके की, एका इंग्रज तत्त्ववेत्याला कुणी तरी विचारलं की शीख म्हणजे नक्की कोण? तेव्हा तो म्हणाला , ‘‘आक्रमक, दुष्ट हिंदूंना शीख म्हणतात.’’ इस्लामचे अनुयायी आणि शीख यांच्यातून कालपरवापर्यंत विस्तव जात नव्हता. जहांगीरने पेटवलेली दुश्मनीची आग १९४७ च्या फाळणीपर्यंत विझली नव्हती. उलट शीख व हिंदूचे संबंध सलोख्याचे होते. शिखांच्या नव्या पिढीने तर पगडी, कृपाण या गोष्टी ‘जुन्यापुराण्या’ मानून त्या सोडायला सुरुवात केली होती. फार वर्षांपूर्वी खुशवंतसिंगसारखा अभ्यासक म्हणाला होता, ‘‘तरुण पिढी जर धर्माबद्दल अशीच उदासीन राहिली तर पुढच्या शतकात पगडीधारी शीख पाहायला मिळेल की नाही हे सांगता येणार नाही.’’
------ लोकप्रभा
No comments:
Post a Comment