Monday 19 March 2012

दासबोधाची जन्मभूमी - शिवथर घळ




भोर-महाड रस्त्यावर खतरनाक असा वरंध घाट आहे. जीवघेणी वळणं , उतार व जावळीच्या घनदाट जंगलाच्या परिसरातून घाट उतरलं की वरंध गावाच्या अगोदर पारमाची गावाकडे जाणारा रस्ता आहे. इथून पश्चिमेकडे सपाटीने गेल्यावर कावळ्या ऊर्फ मनमोहनगड या बेलाग किल्ल्याला जाणारी वाट आहे. या प्रदेशाचा रखवालदार असलेला हा किल्ला सध्या भग्नावस्थेत आहे. घाटातील वाघजाईचं मंदिर भेट देण्यासारखं आहे.
हा भाग सह्यादीतला अतीदुर्गम प्रदेश आहे. या भागात वरंध घाटाबरोबरच उंबडीर् , खुटा , गोप्या , सुपेनाळ , नाव्हंदीण वगैरे छोट्या पण धोकादायक घाटांनी देशावर जायला आडमार्गाच्या वाटा आहेत. पारमाचीहून उत्तरेला असलेल्या वाघजाई खोऱ्यात आहे ग्रंथराज दासबोधाची जन्मभूमी शिवथर घळ...

महाड-भोर रस्त्यावर बिरवाडी मागेर् बारसगाव 16 किमीवर आहे. बारसगावहून आतल्या बाजूला शिवथरघळ 15 किमीवर आहे. मोटारमार्ग अगदी शेवटपर्यंत आहे. हा पंधरा किमीचा प्रवास थोडा आडमार्गाचा आहे. वाहन घेऊन गेलं तर मोठी विजेरी व एक छोटी लाकडाची फळी जॅकला लावण्यासाठी बरोबर असणं आवश्यक आहे. कारण हा रस्ता दुर्गम भागातला असल्याने उंचसखल आहे. गाडी पंक्चर झाली तर जॅक लावणं कठीण जातं. तिन्हीसांजेनंतर मदत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. तसंच पारमाचीहून सोनुभाऊ गाठलं की पायवाटेने पाच-सहा किमीवर असलेल्या शिवथरला पायी जाता येतं.

काळ नदीचा उगम याच परिसरात होतो. पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळ नदीच्या काठावर कंुभे, कसबे आणि आंबे अशी तीन छोटी गावं वसली आहेत. या तीन गावांना शिवथर वस्त्या म्हणूनच ओळखलं जातं. सह्यादीच्या कुशीत घनदाट झाडांनी शिवथर परिसर वेढला आहे. काळ नदीच्या खोऱ्यात ही सुंदर घळ आहे. समर्थ रामदास्वामींचा मठ या परिसरात होता. म्हणूनच या घळीला समर्थ 'सुंदर मठ'ही म्हणतात.
हा जावळीचा विस्तृत प्रदेश कोकणातल्या शिवथर , आंबेनळीच्या पायथ्याच्या उमरठ या तानाजी मालुसऱ्यांच्या गावापासून ते देशावरच्या वाईपर्यंत आजदेखील घनदाट अरण्याचा आहे. या भौगोलिक परिस्थितीमुळेच रामदासांनी अफजलखानाला जावळीत खेचायचा सल्ला महाराजांना दिला. त्यानुसार महाराजांनी अफजलखानाची व त्याच्या सैन्याची पुरेपूर धुळधाण उडवली. तर अशा या जावळीत शिवथर घळी 1654 च्या पूर्वार्धात रामदास विशेष मसलत घेऊन आले. पुळे बराच काळ त्यांचं वास्तव्य इथे होतं. जावळीच्या चंदराव मोऱ्यांना स्वराज्यात आणायची त्यांची योजना होती. त्याप्रमाण महाराजांनी त्यांना स्वराज्यात समावून घेतलं. आदिलशाहाला ही बातमी समजल्यावर त्यांनी मोऱ्यांना ' चंदराव ' हा किताब बहाल केला. मोरे पाघळले व त्यांनी परत यवनांशी संधान बांधलं. समर्थांनी त्यांची समजूत घालायचा प्रयत्न केला. परत एकदा गणपतीच्या निमित्ताने त्यांना एकत्र आणलं. पुन्हा आणाभाका झाल्या. काही दिवसांनंतर मोऱ्यांनी पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं. मोरे फिरले. मग राजांनी जावळीत घोडा फेकला... मोऱ्यांचं पारिपत्य केलं. या झुंजीचा स्वराज्याला मात्र अतोनात फायदा झाला. मोऱ्यांच्या पदरचे महापराक्रमी व तेजस्वी बाजीप्रभू देशपांडे महाराजांना येऊन मिळाले. इकडे समर्थांचं दासबोध लिहिणं सुरू होतं. समर्थांनी त्यांच्या शब्दात सांगायचं तर ' येकांती विवेक करोनी! इष्ट योजना करावी ' असा महाराजांना सल्ला देत अखंड सावधपणा ठेवला. समर्थांच्या शिष्यांनी वेळप्रसंगी बैरागी , गोसाव्यांच्या , वैदूंच्या , डोंबाऱ्यांच्या वेषात राहून स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या यवनी फौजांच्या बातम्या महाराजांना कळवण्याचं काम केलं. कोकण व देशावर समर्थांचे लहान मोठे मठ कार्यरत झाले. इथून त्यांची आध्यात्मिक चिंतनाबरोबरच कावळ्याच्या नजरेने हेरगिरी सुरू होती. समर्थांचे सगळे शिष्य निष्णात घोडेस्वार व युद्धकलेत निपुण होते. असं म्हणतात , की ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी काही ऐतिहासिक पराक्रम केला त्या जागांभोवती रामदासी मठांचं जाळं विणलेलं दिसतं.

आजदेखील हा प्रदेश अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. याला समर्थ सुंदरमठ असंच म्हणत असत.
हमरस्त्यापासून आत असलेल्या या सुरम्य स्थळी सरत्या पावसाळ्यात निबिड अरण्यातील शांतता अनुभवायला मिळते. पावसाळ्यात इथला साधारण 50 फुटांवरून कोसळणारा धबधबा व इथलं धुंदकुंद वातावरण वर्णनापलीकडचं आहे. समर्थ म्हणतात , गिरीचे मस्तकी गंगा , तेथुनि चालली बळे , धबाबा लोटती धारा , धबाबा तोय आदळे... तर काळ नदीच्या पवित्र परिसरातील ही घळ धुळ्याचे समर्थभक्त शंकरराव देवांनी 1930 च्या दरम्यान शोधून काढली. घळ साधारण सव्वाशे फूट लांब व पाऊणशे फूट रुंद आहे. घळीच्या वरच्या बाजूला पायी चालत गेल्यावर घेराव या गावी मोठ्यांच्या वाड्याची ज्योती बघायला मिळतात. 

सुंदरमठ समिती इथली सर्व व्यवस्था समर्थपणे बघते. त्यांनी इथे सिद्धाश्रम नावाची वास्तू भक्तांसाठी बांधली आहे. समिती सर्व वयोगटांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवते. समितीच्या निरपेक्ष तरुण व अनुभवी अशा कार्यर्कत्यांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. ते समर्थांची शिकवण समाजपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.  घळीमध्ये वाकूनच वावरावे लागते. कारण त्याचे छत कमी उंचीवर आणि खडबडीत आहे. घळीमध्ये रामदास स्वामी व त्यांनी सांगितलेला "दासबोध' लिहून घेतानाचे कल्याण स्वामी, या दोघांच्या मूर्ती आहेत. शेजारीच रामाचे छोटेखानी मंदिर आहे. घळईत काही वेळ घालवणे हा खूप सुखद अनुभव आहे. आजूबाजूच्या दाट झाडीतून येणारा पक्षांचा गुंजारव आणि शेजारच्याच पाषाण समूहावर बरसणाऱ्या
धबधब्याचा आवाज घळई सोडल्यावरही कानात घुमत राहतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणाला शक्‍यतो पावसाळ्यातच भेट द्यावी.


शिवथरघळीत, रामदासांचे घळीतील धबधब्याविषयीचे काव्यही एका फलकावर लिहून ठेवलेले आहे. ते खालीलप्रमाणे आहे.
गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालली बळे ।
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥ १ ॥

गर्जता मेघ तो सिंधू । ध्वनीकल्होळ ऊठिला ।
कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥ २ ॥

तुषार उठती रेणू । दुसरे रज मातले ।
वात मिश्रित ते रेणू । सीत मिश्रित धूकटे ॥ ३ ॥

दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटती छाया । त्या मधे वोघ वाहती ॥ ४ ॥

गर्जती श्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री । ध्वनी कल्लोळ ऊठती ॥ ५ ॥
कर्दमू निवडेना तो । मानसी साकडे पडे ।
विशाळ लोटती धारा । ती खाले रम्य वीवरे ॥ ६ ॥

विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥ ७ ॥

- समर्थ रामदास



समितीचं मात्र आवाहन आहे , की निव्वळ धबधबा व निसर्ग या हेतूने या परिसरात येऊन गोंधळ करण्यासाठी येण्यापेक्षा विश्रांती घेण्यासाठी , नामस्मरणासाठी येणाऱ्यांचं इथे स्वागत केलं जातं.




शिवथर घळ गिरीदुर्गाचे सुशोभिकरण करण्यात आलं आहे. पर्यटकांना चढण्यास सोपं जावं यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. पायऱ्यांना दोन्ही बाजूला लोखंडी रॉडही बसवण्यात आले आहेत. पायऱ्या चढून
गेल्यावर समोरच 'शिवथर घळ संुदरमठ सेवा समिती'ची इमारत लागते. या इमारतीमध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय केली जाते. शिधा दिल्यावर इथे जेवणाची सोयही होते. इमारतीवरून जाणारा रस्ता थेट घळीपाशी जातो. या घळीमध्ये बसून समर्थांनी दासबोध ग्रंथाची रचना केली. इथे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींची मूतीर् आहे. या मूतीर्ंच्या संरक्षणासाठी काचेचं तावदान बसवण्यात आलं आहे. यामुळे पर्यटकांना दर्शन घेता येतं आणि मूतीर्ंचं सौंदर्यंही टिकून राहतं. या घळीच्या समोर सुंदर धबधबा आहे. तिथल्या शांत परिसरात हा धबधबा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.

उन्हाळा आणि हिवाळ्यात या धबधब्याचं रूप अतिशय शांत आणि मनोहारी असतं. कानात गुजगोष्टी केल्याप्रमाणे किंवा एखाद्या नाजूक युवतीच्या मधाळ स्वरासारखं या धबधब्याचं रूप भासतं. याउलट पावसाळ्यात हा धबधबा उग्र रूप धारण करतो. लांबवरही या धबधब्याचा आवाज स्पष्ट येतो. घळीजवळ
गेल्यावर या धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर येऊन क्षणार्धात आपल्याला ओलेचिंब करतात. शेजारी असलेला माणूस मोठ्याने आपल्या कानाशी ओरडला तरी त्याचा आवाज ऐकू येणार नाही इतका प्रचंड आवाज या धबधब्याचा असतो. धबधब्याचं उग्र रूप पाहण्याचा आनंद घेण्यासाठी खास सुरक्षा व्यवस्थाही केली आहे. लोखंडाचे बार डोंगराच्या कड्याला बसवण्यात आले आहे. घळीच्या वरच्या डोंगरसपाटीवर चंदराव मोरेंच्या वाड्याचे भग्नावशेष पाहायला मिळतात. इथल्या डोंगर सपाटीवरून रायगड, राजगड, तोरणा आणि प्रतापगडाचं दर्शन होतं. शिवथर घळीपासून हे चार किल्ले समान अंतरावर आहेत.

शिवथर घळीच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष घळीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण घळीपाशी जाऊन पोहोचतो.

इथे जाण्यासाठी महाडवरून रस्ता आहे. महाड सोडल्यावर पुढे एखाद दोन किलोमीटर अंतर पार करण्याच्या
आधी डावीकडे एक रस्ता जातो. तिथे शिवथरकडे अशी पाटी लावली आहे. या रस्त्यावरून गेल्यावर पारमारची गाव लागते. या गावाहून ३० किलोमीटर अंतर पार केल्यावर आपण शिवथर घळीच्या पायथ्याशी पोहचतो. तसंच गोप्या घाट पार करून पुणेमागेर्ही येता येते. हा दुसरा मार्गही जरा अवघड आहे. पुण्याहून निघाल्यावर राजगड, भुतोंडे, बेळवंडी नदी, कुंबळ्याचा डोंगर पार करून गोप्या घाट पार करून कसबेमागेर् शिवथर घळीला पोहोचता येते.



समर्थांच्यायच शब्दात सांगायचं तर , ' दरे कपारी दाटे धुकटे! पाहो जाता भयाची वाटे! ऐसे स्थळी वैभव दाटे! देणे रघुनाथाचे! विश्रांती वाटते तेथे! जावया पुण्य पाहिजे... '





 

5 comments:

  1. We are going there tomorrow morning from Pune. Can i get your contact number please.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

    समर्थे सुंदरमठी गणपती केला !
    दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!
    सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला !
    भाद्रपद माघ पर्यंत !!
    समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.
    या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.
    वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !
    हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे.
    या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो .
    समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!
    आकारा आकरी खंडी कोठी पाठविली !
    हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!!
    ११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा.....
    दास रामाचा वाट पाहे सदना !
    संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!
    शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.
    आज महाराष्ट्रात प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. हा उत्सव सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला असून या उत्सवातून प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई हे गुरुकुल येथेही हा उत्सव सुरू झाला आहे. आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ही माहिती जरूर पुरवावी.वरील संशोधन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी केले असून हया माहितीचे सर्व अधिकार राखीव आहेत. या माहितीचा संबंध कोणत्याही जात, धर्म ,पंथ ,सांप्रदाय ,पक्ष ,संघटना यांच्याशी नाही.
    रामदास पठार - सुंदरमठावर येण्याकरीता महाड-पुणे रस्त्यावर वरंधाघाटात माझेरी जवळ कमानी खालून डाव्या हाताने सरळ पुढे कि.मी. मठाच्या माळावर शेवट पर्यंत डांबरी रस्त्याने यावे.निवास, भोजन व्यवस्था पूर्व सूचना दिल्यास विनामूल्य होऊ शकते.

    ReplyDelete
  4. शिवथर प्रांतातील शिवथर घळीचे सत्य स्वीकारण्याचे आवाहन.


    हीच खरी घळ ह्याचे ठोस पुरावे,
    1) छत्रपती शिवाजी महाराजांचे रामनगर पेठ वसवण्या संदर्भातील पत्र की श्री येऊन राहिल्याउपवरी येथील व्यापाऱ्यांकडून बारा वर्षे दिवाण माफ यावरून समर्थ वास्तव्याच्या कालावधीचा अंदाज करावा.
    पत्ता कोड नलवडा मौजे पारमाची ताा शिवथर
    दूसरे पत्र समर्थशिष्य योगीराज श्री कल्याण स्वामी यांनी दिवाकर गोसावी यांना पाठवलेल्या पत्रातील उल्लेख की श्री ..... च्या दरशनास पारमाचीस सिवथर प्रांती नवलवाडीयाचा कोड तेथे जाभलीच्या चउथरीयावर श्री संतोषरूप बैसले होते.
    जर शिवथर प्रांतात समर्थांच्या दर्शनाची जागेचा उल्लेख आहे.
    हे नलवडा वा नवलवाडी चा कोड म्हणजेच सध्याचे रामदास पठार.आणि शिवथर हा तेव्हाचा तालुका चे ठिकाण होते. हया येथील मंदिराच्या जागेचे आज ही सरकार दरबारी सातबारा वरील नाव मठाचा माळ असा आहे. हया ठिकाणाहून संशोधित शिवथरघळ अवघ्या सहाशे मीटर वर आहे म्हणजेच पायी पंधरा ते वीस मिनीट. ही दोन्ही पत्र विश्वासनीय आहेत व आज ही ती समर्थ वाग्देवताच्या बाड मध्ये पहायला मिळतात.
    2) घळीची भौगोलिक स्थान आणि रचनेचा उल्लेख समर्थ शिष्य गिरिधर स्वामी यांच्या समर्थ प्रताप मध्ये आहे तो खालील प्रमाणे
    समर्थे पर्वती केले येक गुप्तसदन।
    प्रसंगे ठेवावया देवार्चन।
    सूर्यप्रकाश उदक सन्निध उर्ध्वगमन।
    मार्ग सोपान करूनी जावे॥
    समर्थ प्रताप गिरीधरस्वामींनी समर्थ रामदास स्वामींच्या या सदनाचे वर्णन केले आहे. हे सदन पर्वतावर आहे, गुप्त आहे, तेथे प्रसंगी देवार्चन म्हणजेच देवघर ठेवता येते, सूर्यप्रकाश सन्निध आहे, म्हणजेच या गुप्तसदनाला पूर्व-पश्चिमेचा उगवतीचा व मावळतीचा सूर्यप्रकाश समोर आहे, उदक म्हणजे या रामगंगा धबधबा समोर ठेऊन उर्ध्वगमन म्हणजेच उर्ध्व दिशेने जावे आणि यासाठी मार्ग सोपा करून सोपान म्हणजे शिडीसारखे चढून जावे, अशी वर्णनानुरूप परिस्थिती आढळते.
    आज ही सरकार दरबारी घळीचे सातबारा वरील नाव मठाचा माळ असा आहे. तर बाजूच्या धबधबाचे नाव भटाचा माळ आहे.
    3) आनंदवनभुवनी म्हणजे समर्थांनी केलेल्या शिवथर प्रांतातील वास्तव्यातिल स्वानुभव,हया जागेचा महिमा आणि या जागेतच पुढे काहि घडणार आहे असा उल्लेख केला आहे. तसेच हया वनभुवनाला सर्व प्रथम मान दया अशी आज्ञा केली आहे. त्यातील काही ओवी देत आहे.

    गुप्त उदंड भुवने म्हणजे शिवथरघळ

    सकळ देवांची साक्ष | गुप्त उदंड भुवने |सौख्य जे पावणे जाणें | आनंदवनभुवनी ||१५||

    रामगंगा म्हणजे बाजूच्या धबधब्याचे वर्णन

    स्वर्गीची लोटली तेथे |रामगंगा महानदी |तीर्थासी तुळणा नाही | आनंदवनभुवनी ||१३ ||

    गुप्तगंगा चा उल्लेख

    ग्रंथी जे वर्णिली मागे .| गुप्तगंगा महानदी |जळांत रोकडे प्राणी | आनंदवनभुवनी ||१४

    अकरा हया अंकाची प्रचिती

    आक्रा आक्रा बहु आक्रा |काये आक्रा कळेचीना |गुप्त ते गुप्त जाणावे |आनंदवनभुवनी ||१७ ||

    दासबोध नव्याने लिहिल्याचा उल्लेख

    लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||३८ ||

    गणपतीला केलेली प्रार्थना त्याबद्दल

    जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|विघ्न्घ्ना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||८ ||

    देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी || ४०||

    नवीन दासबोध लिहिल्याचा उल्लेख.

    वेद शास्त्र धर्म चर्चा |पुराणे महात्में किती |कवित्वे नूतने जीर्णे | आनंदवनभुवनी ||५० ||

    त्या ठिकाणचे महत्व:

    वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||५२ ||

    मानसी प्रचीत आली | शब्दी विश्वास वाटला |कामना पुरती सर्वै | आनंदवनभुवनी ||५३ ||

    येथूनी वाचती सर्वै | ते ते सर्वत्र देखती | सामर्थ्य काय बोलावे | आनंदवनभुवनी ||५४ ||

    उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||५५ ||

    पुढे हया ठिकाणी खरे काही घडणार आहे त्याची कल्पना समर्थांना ठाऊक होती.आणि काय होईल ते पहावे हया ठिकाणी अस सावध करत आहेत.

    बोलणे वाउगे होते |चालणे पाहिजे बरे |पुढे घडेल ते खरे | आनंदवनभुवनी ||५६ ||

    स्मरले लिहिले आहे | बोलता चालता हरी |काये होईल पहावे | आनंदवनभुवनी ||५७ ||

    महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी | विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी || ५८ ||

    सर्वसद्या कला विद्या | न भूतो न भविष्यती |वैराग्य जाहाले सर्वै |आनंदवन भुवनी ||५९ ||

    अशा सिद्ध स्थानास सर्वात प्रथम मान दया अशी समर्थांच्या आज्ञाचे स्मरण राहू दया

    'इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम॥'

    ReplyDelete