Wednesday 7 March 2012

यशस्वी वैवाहिक जीवनाची खरीखुरी सप्तपदी



लग्न म्हणजे काय?


तर ही एक समाजाने निर्माण केलेली व्यवस्था, जिथे स्त्री आणि पुरुष कायदेशीररीत्या धार्मिक विधींसह कायमसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. ही झाली लग्नाची शब्दकोषातली व्याख्या. पण खऱ्या अर्थाने सांगायचे झाल्यास लग्न म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांनी स्वसंमतीने प्रेम आणि सामंजस्याच्या आधारावर परस्परांच्या साथीने एकत्र राहण्याचा घेतलेला निर्णय. बरेचजण आपलं लग्न हे सर्वार्थाने यशस्वी करण्याच्या उद्देशाने या बंधनात प्रवेश करतात. पण बऱ्याच वेळा हा उद्देश सफल न झाल्याने अथवा जोडीदाराकडून अपेक्षा पूर्ण न झाल्याने या बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील असतात, असं का होतं? आजच्या परिवर्तनशील युगात विवाह संस्थेला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतंय. विवाह ही फक्त दोन व्यक्तींना जोडणारी गोष्ट नाही तर ती दोन कुटुंबांना एका धाग्यात बांधते. दोन संस्कृतींना एकत्र आणते. त्यामुळे आपण म्हणू शकतो की, लग्न दोन भिन्न विचारधारांना सामंजस्याने एकाच वाटेवरून चालायला लावणारी गोष्ट आहे. यात अर्थात सर्वात महत्त्वाचे दोघेजण! जे परस्परसंमतीने पवित्र गाठ बांधतात. मग जी गाठ आपणहून बांधलेली आहे तीच गाठ त्यातील काहींना नंतर बंधन का वाटायला लागते? एकमेकांचा सहवासच नाही तर नजरेलाच पडू नये असं का वाटायला लागतं?
याची कारणं अनेक असतील, पण सर्वात महत्त्वाचं किंवा सगळ्यात अंतिम कारण म्हणजे ‘जास्त अपेक्षा आणि कमी सामंजस्य’ हेच ढोबळ कारण प्रथम वाद आणि नंतर घटस्फोटापर्यंत नेतं. म्हणजे प्रत्येक वाद हा घटस्फोटापर्यंत जातोच असं नाही, पण फार कमी वाद हे सुसंवादापर्यंत जातात. ज्यामुळे विवाहाची गाठ ही अधिक पक्की होऊ शकते. म्हणजे ‘सुसंवादाने’ बऱ्याच प्रश्नांवर उत्तरं मिळतात. पण हे सगळं अवलंबून आहे काही गोष्टींवर. त्या म्हणजे विवाहबंधनात प्रवेश करणारे दोघेही त्यांच्या विवाहाकडे कोणत्या दृष्टीने बघतात व त्यांच्या जोडीदाराकडून त्यांना काय अपेक्षा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं लग्न टिकवण्याच्या दृष्टीने स्वत:कडून झटण्याची त्यांची तयारी आहे का?
म्हणूनच एक समुपदेशक म्हणून मला असं वाटतं की, लग्नाची पूर्वतयारी ही अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी फक्त शारीरिकच नाही तर मानसिक तयारीही गरजेची आहे. लग्नापूर्वी दोघांचीही मनोवस्था 
लग्नासाठी पूरक आहे ना. नवीन नातेसंबंध, नवीन जबाबदारी ते स्वीकारण्याच्या मन:स्थितीत आहेत ना. याउपर नात्यांच्या नवीन कोंदणात बसण्यासाठी आचार-विचारांची जी लवचिकता लागते त्याची तयारी आहे ना, या सर्व गोष्टींचा विचार हा सकारात्मक असेल, तरच आपण म्हणू शकतो की, लग्नासाठी दोघांचीही मानसिक तयारी झाली आहे.
लग्नाचा विचार करताना मुलीने कुठला विचार करावा हे आपण प्रथम बघूया. मुलगी जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिचं घर तिची माणसं मागे ठेवून येत असते. त्यामुळे तिने नवीन माणसं, नाती, जागा या सर्वामध्ये स्वत:ला सामावून घेण्यासाठी अथवा असं म्हणू शकतो की, त्या कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. नोकरी करीत असताना जे पद तुम्हाला दिलं जातं ते सांभाळण्याचा तुम्ही प्रयत्न करताच ना. त्याचप्रमाणे लग्नानंतर मिळालेल्या पदाला जागण्याचा प्रयत्न प्रत्येक मुलीने करायला हवा. आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होईल ही अपेक्षा सोडून द्यायला हवी आणि हे लक्षात ठेवायला हवं की, अशा गोष्टींचा आग्रह धरला तर वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे असं म्हणता येईल की, मुलीचा लवचिक दृष्टिकोन बऱ्याच समस्या टाळू शकतो.
आता आपण जेव्हा मुलीने सांगोपांग विचार करावा अशी अपेक्षा करतो तेव्हा मुलाने जर तिच्या दृष्टीने विचार केला तर बरेचसे प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतात. त्याने विचार करावा की, त्याची होणारी किंवा नुकतीच झालेली पत्नी इतकी र्वष ज्यांच्याबरोबर राहिली ती माणसं, जागा, तिचे आप्तजन या सर्वाना एका क्षणात 
सोडून ती ज्या नवीन माणसांमध्ये आली आहे ती फक्त एका माणसाच्या म्हणजे तिच्या पतीच्या विश्वासावरच. त्यामुळे त्याने वडीलधाऱ्याप्रमाणे वागून तिला समजून घेतलं पाहिजे. जसं मुलगा आपल्या आई-वडिलांचे अनुबंध तोडत नाही त्याचप्रमाणे मुलगीही तिच्या आई-वडिलांना विसरू शकत नाही. तिच्यासाठी लग्न म्हणजे फक्त तिची राहती जागा बदलण्यासारखं नाही तर त्याहून खूप काही अधिक आहे. तिला काही पूर्वीच्या सवयी सोडून नवीन सवयी आत्मसात करायच्या आहेत. नवीन नियम, नवीन अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. हे सर्व तिच्यासाठी तेव्हाच सुकर होतं जेव्हा तिच्या नवऱ्याची सुयोग्य साथ तिला मिळते.
ज्याच्यावर आपलं प्रेम आहे अशा व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा त्या व्यक्तीला गुण-दोषांसह स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. ते दोघं एकमेकांना पूरक आहेत का किंवा भविष्यातील वैवाहिक समस्या टाळण्यासाठी प्रत्येकाने खरं तर विवाह समुपदेशकाला एकदा तरी भेट द्यावी, ज्यायोगे समुपदेशकाच्या काही ठराविक प्रश्नांवरून त्या दोघांनाही आपल्यातल्या गुणादोषांची नुसती जाणीवच होणार नाही तर त्यांना स्वीकारण्यासाठी काय करावं लागेल याचंही मार्गदर्शन मिळेल.
लग्न म्हणजे फक्त दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जिवांचं मीलन नाही तर ते दोन कुटुंबांना एकमेकांच्या जवळ आणतं. दोन्ही कुटुंबांच्या समस्या, आनंद, दु:ख आणि बऱ्याच गोष्टी लग्नानंतर एक होतात, म्हणजे दोन्ही कुटुंबं भावनिकदृष्टय़ा एकमेकांत गुंतत जातात आणि मग अशा वेळेस नवरा-बायकोत वाद झाले तर पालकांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करायला हवा, म्हणजे दोन्ही कुटुंबांकडून संबंध 
दुरावण्यापेक्षा ते जवळ आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा. पालकांची योग्य भूमिका व मार्गदर्शन बऱ्याच वेळेला नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये सकारात्मक परिणाम करतं याची दोन्ही पालकांनी जाणीव ठेवायला हवी. त्यामुळे मग पेल्यातली वादळं पेल्यातच शमतील आणि लग्नगाठ अजून घट्ट होईल.
लग्नाचं दुसरं नाव म्हणजे सामंजस्य आणि लग्न चिरकाल टिकण्याकरिता प्रत्येकाने हे दाखवायला हवं. 
पुढच्या पिढीसाठी जर आदर्श निर्माण करायचा असेल तर या पिढीतील माणसांनी काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘तडजोड’ आणि तीही दोघांनी स्वखुशीने केलेली असेल तर उत्तम.
आज आपण बघतो की बऱ्याच घरांमध्ये नवरा आणि बायको दोघेही आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र असतात. त्यामुळे दोघांची स्वत:ची अशी ओळख समाजात असते. ती ओळख मिळविण्याकरिता बरेच प्रयत्न केलेले असतात आणि मग दोघेही आपल्या व्यक्तिमत्त्वाला परस्परांकडून सारखेच महत्त्व मिळावे याची अपेक्षा करतात. यात गैर काहीच नाही, पण कधी कधी त्यामुळेच एखादा छोटासा वादही वादळाचे स्वरूप धारण करतो आणि आर्थिक स्वतंत्रतेच्या बळावर दोघेही आपला अहंकार जपत वेगळं होण्याचा निर्णय घेतात, पण याच वादाकडे परस्परांच्या नजरेतून जर बघितलं तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकेल.

विवाहाची वाटचाल जर यशस्वी आणि सुकर करायची असेल तर लग्न करणाऱ्या वा लग्न झालेल्या प्रत्येकाने खाली दिलेल्या विचारांच्या सप्तपदीचं पालन केलं पाहिजे.
१)    पहिलं पाऊल :
एकमेकांच्या छोटय़ातल्या छोटय़ा गुणांचं कौतुक असावं आणि दोष सांगताना दृष्टिकोन सकारात्मक असावा.
२)    दुसरं पाऊल :
वैवाहिक जीवनात नकारात्मक विचारांचं प्रगटीकरण कमी असावं.
३)    तिसरं पाऊल :
लग्नानंतरही दोघांमध्ये मैत्रीचं नातं असावं.
४)    चौथं पाऊल :
एकमेकांबरोबरच्या अस्तित्वामुळे परस्परांच्या आयुष्याला अर्थ असण्याची जाण ही वागण्यातून दिसायला हवी.
५)    पाचवं पाऊल :
एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करून परस्परांनी त्याकरता एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे.
६)    सहावं पाऊल :
कितीही मतभेद असले तरी दोघांमधील संवाद  टळता कामा नयेत.
७)    सातवं पाऊल :
एकमेकांच्या भावनांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा एकमेकांनी आदर केला पाहिजे.

 
मतभेद असताना जर ही सप्तपदी आठवली तर निश्चितच बरेच घटस्फोट आपण टाळू शकू.
परदेशाच्या तुलनेत भारतातील घटस्फोटांचं प्रमाण कमी आहे, असं एका सर्वेक्षणानुसार सिद्ध झालं आहे. याचा अर्थ असा नाही की, ज्यांचा घटस्फोट झालेला नाही अशी जोडपी सुखेनैव नांदतायत. मतभेद वा वाद तर आहेतच, पण त्यांना एकत्र बांधून ठेवणारी कारणं भारताकडे आहेत, ती म्हणजे संस्कृती आणि नात्याची वीण. ही झाली सकारात्मक कारणं आणि नकारात्मक कारण म्हणजे आर्थिक परावलंबित्व. याचाच अर्थ आपण या सकारात्मक कारणांवर जास्त भर देऊन भावनिकदृष्टय़ा दूरगामी परिणाम टाळण्याच्या दृष्टिकोनातून या मतभेदांकडे बघितलं तर वाद हे निश्चित संवाद होतील, जे पती-पत्नीमधील नात्यांना अधिक दृढ करायला निश्चितच मदत करतील.
या सर्व विचारमंथनानंतर एक समुपदेशक म्हणून मला असं वाटतं की आपण ‘विवाह अयशस्वी का होतात?’ यापेक्षा होणारे विवाह यशस्वी कसे होतील या सकारात्मक विचारांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. याकरिता विवाहापूर्वीचे समुपदेशन अतिशय आवश्यक आहे. भारतामध्ये विवाहापूर्वीचे समुपदेशन किंवा
विवाह उपचार पद्धती (मॅरिटल थेरपी) या गोष्टी नवीन असल्या तरी बरीच जोडपी याचा फायदा घेताना दिसतात. त्यातही घटस्फोट झालेले लोकही आपल्याला पुन्हा लग्न करताना दिसतात, म्हणजे आपण एक म्हणू शकतो की, व्यक्तींचे विवाह अडचणीत असतील, पण विवाह संस्थेचा पाया भक्कम आहे.
म्हणून भारताच्या बाबतीत येथील संस्कृतीमुळे विवाहांचं चित्र अजूनही आशादायकच आहे, हेही नसे थोडके!








No comments:

Post a Comment